प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २१ वें.
मुसुलमानांची हिंदुस्थानावर सत्ता.

औरंगजेब.- (१६५८-१७०७).- याच्या कारकीर्दींत मोगल साम्राज्याची फार झपाट्यानें अवनति झाली. औरंगजेबाच्या अंगीं राज्यकारभार चालविण्यास योग्य असे बरेच गुण होते. त्यानें दक्षिणेत स्वतंत्र बनलेल्या सुलतानांनां जिंकलें व दूरवर स्वतःचा अम्मल बसविला. परंतु याच्या कारकीर्दींत दोन नवीं हिंदु राष्ट्रें उदयास येत होतीं, एक मराठ्यांचें व दुसरें शीखांचें. शिवाय औरंगजेब मरण पावतांच दक्षिण हैद्राबादचा निझाम अयोध्येचा नबाब, व बंगालचा सुभेदार हे स्वतंत्र राजे बनले. औरंगजेबानें मोंगल साम्राज्य वाढविलें पण त्याचा पाया भक्कम केला नाहीं. दक्षिणेंतील विजापूर व गोंवळकोंडा येथील स्वतंत्र मुसुलमानी राज्यें अनेक वर्षांच्या लढायानंतर औरंगजेबानें जिंकलीं आणि मुसुलमानांच्या या आपसांतीत तंट्याचा फायदा मराठी राज्याचा संस्थापक शिवाजी यानें भरपूर घेतला.

दिल्ली येथील औरंगजेबाच्या दरबाराचें अनेक यूरोपीय प्रवाशांनीं वर्णन लिहून ठेविलें आहे. टॅव्हर्नियर म्हणतोः ''ऐश्वर्याच्या बाबतींत या थोर मोंगलबादशहाची तुलना यूरोपांतील फ्रान्सच्या राजाशीं करतां येण्यासारखी आहे. १ नवंबर १६६५ रोजीं परत निघण्याकरितां मी बादशाहाचा निरोप मागितला. तेव्हां त्यानें आपल्या जन्मदिनोत्सवाचा देखावा पाहण्याकरितां मी राहावें अशी इच्छा मला दर्शविली. या उत्सवप्रसंगीं राजाची तुला करून त्याचें वजन गेल्या वर्षापेक्षां अधिक भरल्यास मोठा सार्वजनिक आनंदोत्सव करण्यांत येतो. साम्राज्यांतील मोठमोठे अमीर उमराव, प्रांतोप्रांतीचे अधिकारी व दरबाराचे स्त्रीपुरूष बादशाहाला मौल्यवान रत्नें, सोनेरुपें, मोठ्या किंमतीचे गालीचे, हत्ती, उंट, घोडे, वगैरे नानाप्रकारचे नजराणे देतात. या थोर मोगल बादशाहाची सात शोभिवंत सिंहासनें असून तीं सर्व हिरे, पाच, माणकें व मोती यांनीं मढवलेलीं आहेत. त्यांपैकीं मयूरसिंहासन सर्वोत्कृष्ट आहे. हत्तींनां बादशाहापुढें गुडघे टेकून मुजरा करण्यास शिकविलेलें असतें. बादशाहाच्या विशेष प्रीतीच्या हत्तीचा खर्च दरमहा पांचशें रुपये असतो व त्याला खावयास शर्करामिश्रित मांस व प्यावयास दारु देतात. बादशहाची स्वारी निघते तेव्हां अनेक उमराव किंवा सरदार घोड्यावर बसून त्याच्या मागून जातात व त्यांच्यापैकीं अगदीं हलक्या दर्जाचा उमरावहि दोन हजार घोडेस्वारांचा अधिकारी असतो.

शिवाजीच्या मरणानंतर मराठ्यांचे राज्य बुडविण्यास चांगली संधि मिळाल्यामुळें १६८२ मध्यें औरंजेब स्वतः सैन्यासह दक्षिणेंत आला. त्यानें मराठ्यांचा अनेक ठिकाणीं पराभव केला, आणि विजापूर व गोवळकोंडा ही राज्ये बुडविली; व तो मरेपर्यंत मराठ्यांशीं झगडत राहिला.

औरंगजेबाचें मोठें साम्राज्य एकत्र राखण्यास त्याच्या सैन्याप्रमाणें त्या वेळेच्या हमरस्त्यांची मोठी मदत झाली. लाहोरपासून डाक्का शहरापर्यंत एक मोठा रस्ता होता. शिवाय आग्र्यापासून सुरतेपर्यंत एक मोठा रस्ता व दुसरा ब-हाणपूरपर्यंत व तिसरा गोवळकोंड्यापर्यंत होता. या रस्त्यांवर झाडें लावलेलीं असून जागजागीं विहिरी व धर्मशाळा होत्या. राजधानीपासून दूरदूरच्या शहरीं टपाल नेण्याकरितां जासूद होते. व्यापारी मालाची नेआण बैलांवरून होत असे व ती पद्धति अद्यापहि पूर्ण नाहींशीं झाली नाही.