प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २१ वें.
मुसुलमानांची हिंदुस्थानावर सत्ता.

गुलाम, खिलजा, तघलखघराणीं.- महंमद घोरीनंतर कुतुबुद्दीन नांवाचा गुलाम सुभेदांरानें दिल्लीचें राज्य बळकावलें. या गुलाम घराण्यानें इ. स. १२०६ ते १२९० पर्यंत राज्य केलें. त्यानींच दिल्लीजवळ कुतुबमिनार नांवाचा लाल दगडांचा प्रचंड मनोरा बांधला. यानंतरच्या खिलजी घराण्यांत अलाउद्दीन हा फार प्रसिद्ध बादशहा झाला. याच्या कारकीर्दींत मुसुलमानांनीं दक्षिणेंत स्वा-या करून साम्राज्य बरेंच वाढविलें. अलाउद्दीनालाहि इमारती बांधण्याचा मोठा नाद होता. या घराण्याचा वेळीं साम्राज्याच्या सैन्यांत मोगलांचा विशेष भरणा झाला व ही गोष्ट अफगाण राज्यकर्त्यांना घातक झाली. खिलजीनंतर तघलख घराण्यानें १६२०-१४१४ पर्यंत राज्य केलें. या घराण्यांतला महमद तघलख हा फार विलक्षण बादशहा झाला. त्याच्याबद्दल एल्फिन्स्टन म्हणतो, 'मनुष्य स्वभावास अतिशय भूषणभूत अगर दूषणभूत झालेल्या व्यक्तींत हा अग्रगण्य असून हा जितका गुणवान तितकाच क्रूर व जुलमी राजा होऊन गेला.'