प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २१ वें.
मुसुलमानांची हिंदुस्थानावर सत्ता.
अकबर बादशाह - (१५५६-१६०५) हुमायूनचा मुलगा अकबर चवदा वर्षांचें वय होण्यापूर्वींच राज्यावर आला. म्हणून प्रथम कांहीं वर्षें बहिरामखान या हुषार पण क्रूर इसमानें राजयकारभार चालविला. त्यानें शूर घराण्यांतील शिकंदर व वजीर हिमु यांचें बंड मोडलें. चारपांच वर्षांनीं अकबर स्वतः राज्यकारभार पाहूं लागला. तरवार गाजविण्याचें सामर्थ्य असतांहि ज्यांनीं आपली सत्ता प्रजेचें धर्मस्वातंत्र्य व विचारस्वातंत्र्य रक्षण करण्याकडे उपयोगांत आणली, असले राज्यकर्ते जगाच्या इतिहासांत फारच थोडे आढळतात. अशा अत्यंत थोर राज्यकर्त्यांत अकबराची गणना होते. ''इंग्लंडची तत्कालीन राणी एजिझाबेथ व स्पेनचा राजा फिलिप यांच्यांशीं तुलना करतां अकबराचा दर्जा त्यांच्यांहून उच्च लागतो,'' असें क्रूक म्हणतो. अकबराच्या कारकीर्दींचे तीन विभाग पडतात. त्यानें पहिलीं पंधरा वर्षें युद्धे करणें, शिकार वगैरे खेळ खेळणें व इमारती बांधणें यांत घालविलीं; १५७६ पासून पुढील वर्षे शिया पंथ, हिंदुधर्म ख्रिस्ती संप्रदाय वगैरे धर्मांचे ज्ञान मिळविण्यांत, व जमाबंदी वगैरे राज्यकारभाराच्या खात्यांत सुधारणा करण्यांत त्यानें खर्च केलीं; व नंतर तिसरा पंधरा वर्षांचा विभाग दुःखकारक परिस्थितींत काढला; कारण त्याच्या तोडीचा लायक वारस त्याला नव्हता, पूर्वींचे स्नेही एकेक त्याला सोडून गेले, व उतार वयामुळें शारीरिक व मानसिक शक्ति क्षीण होऊन राज्यकारभार त्याला उरकेनासा झाला. असो अकबर राज्यकारभार पाहूं लागला तेव्हां तो अवघा अठरा वर्षांचा होता पण बुद्धि व शिक्षण यांच्यामुळें त्याची लायकी विशेष होती. त्याचा जन्म हुमायून इराणांत पळून जात असतां वाटेत झाला, व पूर्व वय एक प्रकारच्या बंदिवासांत गेलें. बापानें केलेल युद्धांत भाग घेतल्यामुळें अकबराचे धैर्यशौर्यादि गुण वृद्धिंगत झाले; व बहिरामखान राज्यकारभार करीत असतां अकबराच्या अंगीं फार धूर्तपणा आला. शिवाय तो उदार व मनमोकळ्या स्वभावाचा होता. त्यानें सर्व हिंदुस्थान आपल्या राजछत्राखालीं आणण्याचा निश्चय तडीस नेला. त्यानें हिंदुमुसुलमानांनां समानतेनें वागवून हिंदूंनां लायकी पाहून राज्यकारभारांत मोठमोठ्या हुद्दयाच्या जागा दिल्या. अकबरानें अन्तर्गत राज्यकारभारांत इतक्या चांगल्या सुधारणा केल्या व धार्मिक बाबतींत इतकें उदार धोरण स्वीकारलें कीं, उत्तमोत्तम राजांच्या यादींत त्याचें नांव पडतें. तो स्वतःकडवा मुसुलमान नसल्यामुळें इतर धर्मांच्या उपदेशकांचें म्हणणे ऐकून त्यांच्याशीं वादविवाद करीत असे. त्यामुळें अखेर त्यानें एक नवीनच धर्म काढला, व त्याला फैजी व अबुल फजल या दोन विद्वान् मुसुलमान बंधूंची मदत फार झाली. पण यामुळें तो कट्ट्या मुसुलमानी धर्माभिमान्यांनां अप्रिय झाला.
हिंदुधर्मीयांनां सहिष्णुतेनें वागवून त्यांच्या चालीरीतींत त्यानें सुधारणा केल्या. बालविवाहास बंदी, यज्ञयागादिकामध्यें होणा-या पशुहत्येस मनाई, विधवाविवाहास परवानगी, व सती जाण्याच्या चालीस प्रतिबंध त्यानें केला. कारकीर्दींच्या सातव्या वर्षींच त्यानें झिझिया नामक हिंदूंवरील जुलुमी कर बंद केला.
इतकी सुधारलेली भरभराटीची त्याची कारकीर्द झाली, तरी त्याच्या राज्यांत मधूनमधून बंडें होत असत. तीं मोडण्याचें व युद्धें करून नवें मुलुख जिंकण्याचें त्याचें काम अखेरपर्यंत चालू होतें.
जहांगीर व शहाजहान.- अकबर मरण पावतांच त्याच्या साम्राज्यांत बंडें, आपसांतील युद्धें, जनानखान्यांतील कृष्णकारस्थानें, स्त्रियांचा कारभार, वगैरे गोष्टी सुरू झाल्या. या सर्व गोष्टी अकबराचा मुलगा सेलीम उर्फ जहांगीर याच्या कारकीर्दींत चालू होत्या. त्याची राणी नूर जहान हिच्या हातांत राज्याचीं सूत्रें होतीं. जहांगीरनंतर त्याचा मुलगा शहाजहान बादशहा झाला. तो थाटमाट व भपका यांचा फार षोकी होता. त्याचें मयूरसिंहासन साठ लक्ष रूपये किंमतीचें होतें. त्याचा दिल्ली येथील राजवाडा व आग्रा येथें त्यानें आपल्या राणीच्या स्मरणार्थ बांधलेली ताजमहाल नामक इमारत यांची जगांतील आश्चर्यांत गणना होते. मोंगल साम्राज्याचा अखेर जो अंत झाला त्याला कारण या कारकीर्दींपासून हिंदू लोकांच्या छळास झालेला आरंभ हें होय. शहाजहानला कारकीर्दीच्या अखेरीस कौटूंबिक भांडणतंट्यामुळेंहि फार त्रास झाला. त्याच्या ह्यातींतच त्याच्या मुलांमध्यें राज्याकरितां भांडणें सुरू झालीं. सर्वांत थोरला दारा याला राज्य मिळूं नये अशी धाकट्या सुजा, औरंगजेब व मुराद या तिघांची इच्छा होती. या भांडणांत अखेर धूर्त व कपटी औरंगजेबाला राज्य मिळालें व शहाजहानला उरलेली ह्यात कैदेंत काढावी लागली