प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २१ वें.
मुसुलमानांची हिंदुस्थानावर सत्ता.

हिंदुस्थानावर मुसुलमानांच्या पहिल्या स्वा-या :- प्राचीनकाळापासून हिंदुस्थानाशीं अरब लोकांचा व्यापार चालू होता. इ. स. ६३७ मध्यें खलीफ उमरच्या वेळेस अरबांची एक टोळी ठाणें येथें आली होती. पुढें इ. स. ६६४ त महलब नामक मुसुलमान सरदार कांहीं फौजेनिशीं मुलतान पावेतों येऊन परत गेला. आठव्या शतकाच्या आरंभीं वलीद खलीफ बगदाद येथें अरबी खिलाफतीवर असतां, सिंध प्रांतांतील कांहीं भागावर दाहिर नांवाचा रजपूत राजा राज्य करीत होता. बकर किल्ल्याजवळ आरोड म्हणून शहर होतें, ती दाहिराची राजधानी. ह्या दाहिरराजाशीं प्रथम मुसुलमानांचा तंटा लागला. सिंधप्रांतांत देवल नामक बंदरीं मुसुलमानांचे एक हजार लोक रजपुतांनी पकडून ठेविले. मुसुलमानांनीं ते दाहिर राजापासून परत मागितले. परंतु देवलबंदर दाहिरच्या ताब्यांत नसल्यामुळें ती मागणी त्यास कबुल करतां येईना. त्याची ती सबब न ऐकतां त्याजवर खलीफ वलीदचा सरदार महंमद कासीम यानें फौजेसह स्वारी केली. त्या लढाईंत दाहिर समरांगणीं पडला व कासीमनें लोकांजवळून खंडणी वसूल केली. याबद्दल उल्लेख सतराव्या प्रकरणांत आलाच आहे.

दाहिर राजाच्या दोन मुली होत्या. त्यांस बंदिवान करून कासीमनें खलीफ वलीद यास नजर पाठविल्या. त्यांनीं कासीमचा सूड घेण्याची विलक्षण युक्ति केली. वडील मुलीवर खलीफांची मर्जी बसली. तेव्हां एके प्रसंगीं दीनवाणीनें ती मुलगी खलीफास म्हणाली, 'मजवर कासीमनें बलात्कार केला असल्यामुळें मी भ्रष्ट आहे.' कासीमचें हें दुष्कृत्य ऐकतांच खलीपास अत्यंत संताप येऊन त्यानें कासीमास ठार मारविलें. त्याचें प्रेत पाहून मुलीस फार आनंद झाला; व ती म्हणाली, 'माझ्या' बापाचा घात करणा-या दुष्टाचा चांगला सूड घ्यावा एवढ्याच साठीं मी हा आरोप त्याजवर आणला. मी भ्रष्ट नाहीं. हें ऐकून व तिचें खोटें वर्तन पाहून खलीफानें तीसहि ठार मारलें. अशा रीतीनें कासीम वा सूड व पातिव्रत्यसंरक्षण अशा दोनहि गोष्टी तिनें साधल्या. सिंधप्रांतावरची ही स्वारी सन ७११ चे सुमारास झाली. पण पुढें तीस वर्षांच्या आंत मुसुलमानांस रजपूतांनीं तेथून पार हांकून लावलें. नंतर दोनअडीचशें वर्षें मुसुलमानांचा उपद्रव हिंदुसथानास झाला नाहीं.