विभाग आठवा : आफ्रिका ते इक्ष्चाकु
आमातिसार - ज्यामध्यें मलमार्गाचा अधोभाग दूषित होऊन त्यांत दाह व व्रण होतात असा हा एक सांथीचा रोग आहे. उष्णकटिबंधांतील देश तेथील हवामान या रोगास अनुकूल असल्यानें या रोगाचें आदिस्थान होत, व या रोगामुळें या व इतर देशांत होणारी मृत्युसंख्या थोडी थोडकी नसते. पूर्वी या रोगाच्या ख-या कारणाची चांगलीशी माहिती नव्हती. फक्त लक्षणें व कांहीं उपचार ठाऊक होते. पण अलिकडे या रोगाविषयीं महत्वाचें नवे शोध लागून नवीन उपचारहि प्रचारांत आले आहेत. ते असे:- या रोगाचे दोन भेद त्याच्या कारणपरत्वें आहेत. एक ‘प्राणिजजंतुजन्य’ व दुसरा ‘उद्भिजजंतुजन्य’ आहे. प्राणिजजंतूस आमीबा असें नांव आहे. उद्भिज्ज जंतूंमध्यें दोन जाती आहेत व त्यांपैकीं एकाचा शोध शिगा या जपानी शास्त्रज्ञानें लाविला, व दुस-याचा शोध फ्लेक्स्नर यानें फिलिपाइन बेटांत लाविला. प्रथम या दोन्ही उद्भिजजंतूमध्यें काहींच फरक नाहीं असें वाटले होतें, पण अधिक शोधामुळें त्यांचे गुणधर्म कांहीं बाबतींत – विशेषत: विषोत्सर्जनाच्या बाबींत – अगदीं भिन्न असल्याचें आढळून आलें एकाचें विष द्रवरूप असतें दुस-याचें तसें नसतें. दुसरा चमत्कार असा कीं ज्या एका उद्भिज प्रकारच्या जंतूमुळें आमातिसार होतो त्या रोग्याच्या रक्ताच्या लशींत त्याच प्रकारचें जंतू मिश्र केले असतां ते एकमेकाकडे आकर्षिले जाऊन संलग्न होतात पण दुस-या प्रकारचे जंतू मिश्र केले असता असें होत नाहीं.
रो ग ल क्ष णें:- वरचेवर पोटांत कळ, मुरडा होऊन आंव पडणें ही मुख्य लक्षणें होत. ही दोन्ही भेदांत कमी अगर जास्ती प्रमाणांत कधीं असतात तर कधीं नसतातहि यासाठीं सूक्ष्मदर्शक यंत्रानेंच रोगकारक जंतू उद्भिज आहे किंवा प्राणिज ( आमीबा ) आहे हें ठरवितां येतें. ज्या रोग्यांत सर्व लक्षणे उत्तम रीतीनें पाहाण्यास सांपडतात त्यास आमातिसार होण्याच्या अगोदर बरें न वाटून भूक नाहींशी होणें, थोडा अतिसार व त्या बरोबर जरा पोटांत दुखणें ही पूर्वचिन्हे होतात. हाच अतिसार पुढें जास्त वाढून एकामागून एक असे रेच होऊं लागतात. या प्रमाणें दिवसांतून फार वेळा शौचास होतें. मलोत्सर्जन होणार आहे असा भास व इच्छा सदा रोग्यास होऊं लागून त्यापासून त्रास होतो. प्रथम नेहमींप्रमाणे पण जरा पातळ असा मळ पडतो. पण पुढें त्याचें स्वरूप पार बदलतें. प्रथम बरेंच शौचास होत असतें तें थोडेथोडें होऊं लागून त्यांत चिकट आम पडूं लागतो. त्यानंतर थोडा रक्तमिश्रित असा आम पडून कधींतर निवळ रक्तहि पडतें. या रक्ताबरोबर आतड्यांतील कुजलेल्या अंतस्त्वचेचीं जळमटें व त्यापासून पू, लस इत्यादि दाहजन्यस्त्राव हीं मिश्रित असतात. मळास एक विशिष्ट प्रकारची असह्य दुर्गंधि असते. प्रथम रोग्याच्या शरीर प्रकृतींत फारसा फरक होत नाहीं पण रोगाचें वाढतें मान झाल्यावर ज्वर व दाहामुळें रोग्यास वरचेवर कोरड पडून तृषा लागते व लघवीस थोडे व उन्हाळी लागल्याप्रमाणें दुखून होतें. रोग्याची शक्तिहि एकदम फारच कमी होते ती इतकी कीं, इतर फारच थोड्या रोगांत अशी स्थिति होत असेल. यापुढें रोग्यास कदाचित आराम पडतो. पण जर तो न पडला तर मात्र मृत्यू येतोच. येणेंप्रमाणें मळावाटे रक्तस्त्राव होऊन अगर वरील मुरडा वगैरे इतर लक्षणांचे श्रम सहन झाल्यामुळें रोगाच्या आरंभापासून एक ते तीन आठवड्याच्या आंत रोगी मरतो. मरणाचे अगोदर मळास मनस्वी दुर्गंधि येऊन तो आपोआप रोग्यास नकळत गुदद्वारांतून बाहेर पडतो.
उ ता र प ड ण्या चीं ल क्ष णें.–रोगाची परमस्थिति झाल्यावर पोटांत होणारा मुरडा थांबतो. जें निवळ रक्त व आंव पडत होती तें स्वरूप हळू हळू बदलत जाऊन पिंवळसर खरा मळ पडण्यास आरंभ होतो व शौचासहि कमी वेळां जावें लागतें. शक्तिपातामुळें आलेली ग्लानि कमी होऊं लागते. पण चांगली शक्ति येण्यास फार दिवस लागतात. कांहीं रोगी तर पूर्ण बरे न होऊन त्यांचा आजार संग्रहणीवर जातो. ह्या संग्रहणीमुळेंहि रोग्यास अतिक्लेश होऊन बहुधां अल्पवयांत व अकालीं मृत्यू येतो.
रो गा चे श री रा व र हो णा रे प रि णा म.–शरीरांत उदरामध्यें मोठा नळ ( आंतडे ) असतो, त्याच्या खालील भागांत अन्न पाचक, रसोत्पादक कांही पिंड व ग्रंथी असतात. या रोगाचें विष या उपयोगी ग्रंथीवर व पिंडावर दाहक्रिया सुरू करितें. रोग सौम्य असतांनां हे पिंड दाहामुळें लाल भडक होऊन त्यांतून रक्त, पू व लस हीं निघालेली असतात. ती शौचावाटें पडून जातात. पण रोगाचें उग्र स्वरूप असल्यास आंतड्यांची श्लेष्मलत्वचा व्रणारोपण होऊन त्या त्या ठिकाणीं कुजते, त्याचा क्रम असा असतो कीं प्रथम विविक्तपिंडामध्यें ( मोठ्या आंतड्यांतील ) व त्याच्या भोंवताली हे व्रण होऊं लागून त्यांतून स्त्राव होतो. प्रथम लहान असणारे हे व्रण मोठे होऊन एकमेकांत मिसळून मोठा व्रण तयार होऊन आंतड्याचा बराच भाग नासतो. रोग जर थांबला तर हे व्रणहि बरे होण्याचा संभव असतो. पण कधीं कधीं ते बरे न होऊन श्लेष्मावरणाखालील आंतड्यांचीं आवरणें प्रणित होऊन संग्रहणी रोगाच्या रूपानें रोग सुरूच असतो. क्वचित्काळीं हे व्रण आंतड्यास भोंक पडेपर्यंत खोल जाऊन आंत्रावरणदाह अगर एखादी धमनी फोडून उदरांतर्गत रक्तस्त्राव यासारखें प्राणघातक भय व अरिष्ट उत्पन्न करितात. जरी हे व्रण बरे झाले तरी ते मोठे असल्यामुळें ते आंखडून लहान होतांना आंतडयाची पोंकळीहि मळ पुढें जाण्यास प्रतिबंध होईल इतकी संकोचित करतात. व या कारणानेंहि पुढें रोगी दगावण्याचा संभव असतो. या रोगाचा भयंकर दुष्परिणाम म्हणजे यकृत विद्रधि हा होय. हे एकच व भंले मोठें गळूं होतें असा साधारण समज आहे. पण असे बारीक अनेक विद्रधी त्याच इंद्रियांत ( यकृत ) होत असावेत असें वाटतें. परंतु त्यांच्या लहान आकारामुळें बाह्य लक्षणें दिसून येत नाहींत असें विद्वान शोधकांचें मत आहे.
उ प चा र.-कोठल्याहि ठिकाणीं हा रोग तुरळक असा नेहमींचाच होऊन बसल्यास अगर त्याची सांथ आल्यास प्रतिबंधक उपाय योजल्यानें त्याच्या प्रसारास पुष्कळ आळा बसतो. उन्हांत हिंडून नंतर एकदम सर्द जागेंत जाणें, हिरवीं कच्चीं व आंबट फळें खाणें, खाण्यापिण्यांत अतिरेक करणें या सर्व गोष्टी वर्ज करून आपण जें खातों अगर पितों त्या जिनसांची स्वच्छता कितपत आहे याकडे बारीक लक्ष असावें. पिण्याचे पाणी उकळून प्यावें. असले रोगी घरीं अगर रुग्णालयांत उपचारासाठीं असल्यास जंतुघ्न औषधांचा उपयोग शक्य त्या ठिकाणीं नेहमीं करावा व त्यांचा उपयोग रोग्यास वारंवार होणारें मलोत्सर्जन त्यांशी मिश्र करून मग तें टाकून देण्याच्या कामीं करींत असावें. कांहीं रोगी सौम्य प्रकारच्या आजारानें पछाडलेले असतात; किंवा अजीर्ण होऊन अमातिसार होण्यास निमित्त घडलेलें असतें. रोग्यास सर्दीनाशक व घाम आणणारें एखादें औषध देणें प्रशस्त होय व शिवाय प्रथम थोडेसें एरंडेलांत ४-५ थेंब अफूचा अर्क मिश्र करून तो रोग्यास दिल्यानें रोगाचें आदिकारण जी आंतडयांतील अजीर्ण जन्य घाण ती निघून जाते. दुसरा याहून बरा उपाय म्हणजे सोडियम सल्फेट हा रेचक क्षार असतो तो १ ड्राम प्रमाणांत पाण्यांत विरघळवून दिवसांतून चार ते सहा वेळ द्यावा. या बरोबरच पोटामध्यें ‘इपिक्याकुआन्हा’ या औषधाच्या पुडीच्या गोळ्या करून त्या देणें प्रशस्त होय. अत्यवस्थ रोग्यांनां उतार पडत नसल्यास काडीखार, टॅनालबीन या सारख्या औषधाचें अल्प प्रमाणांत पाण्यांत केलेले स्तंभक मिश्रण घेऊन त्याचा बस्ति देतात. पण रोग्याच्या गुदद्वारास हें सहन होणें अवघडच असतें कारण तें फार नाजूक व अशक्त झालेलें असतें
जंतुजन्य अमातिसारांत (शिगाजंतु) रोगमारक लस टोंचून उत्तम उपयोग होतो व ती लस रोगप्रतिबंधकहि आहे म्हणून कोणी ती देवीच्या तोडग्याप्रमाणें सांथींत आपणांस रोग होऊं नये म्हणून अगोदरच टोंचून घेतात. रोग झाला असतां रोग्यास गरम कपडे घालून व आंथरूण पांघरूण गरम कपडयाचें योजून ऊब राहील अशी व्यवस्था ठेवावी. खाण्यास व पिण्यास फक्त पातळ पदार्थ द्यावेत व तेहि गरम करून द्यावेत. थंड पदार्थ प्याल्यानें आंतडयांतील मळ पुढें ढकलण्याची लाट अगर शक्ति उत्पन्न होऊन शौचास लागते. प्राणिजजंतुजन्य रोगामध्यें वर सांगितलेल्या इपिक्याकुआन्हा याचें सत्व ( एमेटीन हायड्रोक्लोराइड ) हें अर्धा ते एक ग्रेन एकदां अगर दोनदां पिचकारीनें टोंचून घालावें. अगर इपिक्याकुआन्हाच्या गोळ्या देण्याचे अगोदर अफूच्या अर्काचे १५-२० थेंब दिल्यानें रोग्यास ओकारी येत नाहीं. कारण या औषधानें ती येण्याचा संभव फार असतो. रोग्यानें अगदीं निजूनच असावें व पूड घेतल्यानंतर बराचवेळ खाण्यापिण्यास कांहीं देऊं नयें. बहुधां ओकारी अशी क्वचित् होते. नुसते उमासे येतात व थोडा बर्फाचा तुकडा तोडांत धरल्यानें ते थांबतात. गोळ्या फक्त आंतडयांतच विरघळतील असे केराटीनचें पुट देऊन गोळ्या करितात त्यामुळें ही ओकारीची भीति व त्रास टळतो. रॉस ह्या डॉक्टराचें मत असें आहे कीं, या पुडीच्या गोळ्या घेणें व एमेटीन टोंचून घेणें हे दोन्ही उपाय बरोबर व एकदम अमलांत आणल्यानें, आंतडयांत व एकंदर प्रकृतींत एकदम चांगला आराम पडतो. या इलाजांनी मुरडा लागलीच कमी होतो. आंव कमी होऊं लागून मळ बांधून शौचास होऊं लागतें. आंव व रक्त हीं कमीं होतात. असें झालें म्हणजे हीं औषधें देण्याचें बंद करून अफू, खडूची भुकटी, बिसमथ क्षार इत्यादि सौम्य अवष्टंभक उपचार करून रोगशमन करावें.
हे रोगी बरे झाले तरी यांच्या मळामध्यें प्राणिजजंतु असतात म्हणून हे रोगी विषूचिका व विषमज्वरांत वर्णन केल्या प्रमाणें रोगप्रसारास फार मदत करितात. या साठीं अशा रोग्यांनां दहाबारा दिवस एमेटोन बिसमथ आयोडाईड हें औषध ५ ग्रेन प्रमाणांत दिवसांतून तीन वेळां द्यावें. संग्रहणी झालेले रोगी या वरील पोटांतील औषधांनी व गुदद्वारांत घालण्याचीं वरील अन्य औषधें योजून बरे होतात. नंतर त्यांस लोहमिश्रित शक्तिचें औषध द्यावें. आमातिसारा संबंधी आयुर्वेदांतील माहिती ‘अतिसार’ व अमांश या लेखांत आलेली आहे.