विभाग नववा : ई-अंशुमान
अंबरखाना - मराठी राज्यांत अठरा कारखाने असत; त्यांपैकीं, अंबरखाना हा असे. अंबर म्हणजे धान्य; तेव्हां, अंबरखाना म्हणजे धान्यागार, किंवा धान्याची कोठी. राजधानींत तर अंबरखाना असेच; परंतु प्रत्येक किल्ल्यावरहि असे. त्यांत दोन दोन तीन तीन वर्षांचें धान्य सांठवून ठेवीत.
किल्ल्यास वेढा पडला म्हणजे मग या धान्याचा उपयोग करीत. हे वेढे ३।४ वर्षेंहि सतत पडत. उ.,जिंजी, विजापूर व गोवळकोंडा वगैरे.
पुणें येथें शनिवारवाड्याच्या गणेशदरवाज्यासमोर, हल्लीं जेथें बाग आहे, तेथें पेशव सरकारचा अंबरखाना होता. पुणें ग्याझिटियरकारानें, अंबर याचा अर्थ अंबारी असा करून, 'अंबार्या ठेवण्याची जागा तो अंबरखाना' असा अंबरखान्याचा हास्यस्पद अर्थ केला आहे; पन्हाळा किल्ल्यांत फार मोठा अंबरखाना अद्यापिहि शाबूत आहे.