विभाग दहावा : क ते काव्य
कंकनहळळी तालुका - बंगलोर जिल्ह्याचा (म्हैसूर) दक्षिणेकडील तालुका. उ.अ. १२० १५' ते १२० ४९' व पू.रे. ७७० १४' ते ७७० ३८'. क्षेत्रफळ ६२३ चौरस मैल. लोकसंख्या (इ.स. १९११) ९५०२४. या तालुक्यांत एक शहर व २३४ खेडीं आहेत. खुल्या जागेंत रगी, आंवरे आणि एरंडीचीं झाडें होतात. चिंच व नारळ यांचें पीक ओढ्यांच्या कांठानें होतें. या तालुक्याची जमीन उथळ व खडकाळ आहे.
गांव - बंगलोर जिल्ह्यांतील कंकनहळळी तालुक्याचें मुख्य ठाणें. हें उ.अ. १२० ३३' व पू.रे. ७७० २६' यांमध्यें अर्कावती नदीच्या तीरीं आहे. हें बंगलोरच्या दक्षिणेस ७० मैलांवर आहे. लोकसंख्या (१९११) ४८७०. येथील किल्ला चन्नापट्टणाच्या जगदेवरायानें १५७७ त बांधला. ब्रिटिश सैन्यास येथें स्थान मिळूं नये म्हणून टिपूनें हें दोनदां उध्वस्त केलें. १८७० पासून येथें म्युनिसिपालिटी आहे.