विभाग सोळावा: धम्मपद- नेपाळ  
         
निराशावाद (पेसिमिझम) आणि आशावाद (ऑप्टिमिझम)- या संसाराकडे पाहण्याच्या दोन दृष्टी असून त्या सामाजिक व धार्मिक विचारपद्धतीवर अनेक शतकें यूरोपांत व हिंदुस्थानांत परिणाम करीत आहेत. जीवित निराशापूर्ण असून मनुष्याच्या आयुष्यांत सुखापेक्षां दु:खच आहे अशा मतास निराशावाद म्हणतात. हें मत आशावादाच्या म्हणजे जगांत दु:खापेक्षां सुख अधिक आहे, आणि जगांत अखेर सत्याचाच किंवा सत्पक्षाचाच विजय होणार या मताच्या अगदी उलट असून या दोहोंच्या मधोमध क्रमोत्कर्षवाद (मेलिओरिझम) आहे. याचा अर्थ जग हळूहळू उत्कर्ष पावत असून मनुष्याची चांगलेपणांत प्रगति होत आहे असा आहे. मलेओरिझम हा शब्द अमेरिकेचे प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ लेस्टर वार्ड यांनीं प्रचारांत आणला.

सामान्य मनुष्य आशावादी किंवा निराशावादी होतो तो तात्विक विचारामुळें नव्हे तर त्याच्या वैयक्तिक परिस्थितीमुळें त्याची कौटुंबिक व सांपत्तिक स्थिति, शारिरक आरोग्य वगैरे बाबतींत होणारा उत्कर्षापकर्ष किंवा उपजत स्वभावधर्म यामुळें तो तसा बनतो, असें या दोन वादांच्या अनुयायित्वाचें भौतिक स्पष्टीकरण करण्यांत आलें आहे.

साधारणपणें मनुष्याचे या जगांतील जीवित हें विरोध, निराशा, दु:ख, शारीरिक आजार व अखेर मृत्यू यांनीं व्याप्त असल्यामुळें  जगाचें ज्ञान होऊं लागल्यापासून मनुष्याच्या मनाला नाउमेद करणारे प्रसंग वरचेवर येतात व तो साहजिकच निराशावादी बनूं लागतो. इतकेंच नव्हे तर निरनिराळ्या युगांतील व देशांतील मोठमोठे विद्वान व प्रतिभासंपन्न कवी याच निराशावादानें ग्रस्त दिसतात. होमर आपल्या काव्यांत म्हणतो, ``एकंदर जीवजातींमध्यें मनुष्यापेक्षां अधिक दु:खमय जीवित कोणाचेंहि नाहीं (ईलि. १७, ४४६). सोफोक्लीज म्हणतो ``जन्मास न यावें हें सर्वांत अधिक चांगलें पण जन्म आलाच तर जेथून मनुष्य आला तेथें पुन्हां परत शक्य तितक्या लवकर जाणें हें बरें.’’

हिब्रु धर्मग्रंथांची मनुष्यजीवितासंबंधीची सर्व शिकवण आशावादीपणाची आहे. बाकी सर्व पौरस्त्य व पाश्चात्य समाजांत निराशावादच सर्वत्र आहे. मात्र अलीकडे पाश्चात्त्य देशांत भौतिक सुस्थिति व शास्त्रप्रगतीनें निसर्गावर वाढलेल्या सत्तेच्या आत्मप्रत्ययामुळें आशावाद वाढत आहे; निराशावाद व आशावाद ही मतें अर्वाचीन काळांत विशेष पुढें आली तरी प्राचीन पौरस्त्य तत्त्वज्ञान व ख्रिस्तपूर्वकालीन यूरोपीय विचार यांत त्यांचीं बीजें आढळतात. प्लेटोतें मत व बुद्धमत निराशावादी दिसलें तरी अंतिम आशावादी आहे. ख्रिश्चन धर्मानें मनुष्यभवितव्याविषयीं निराळी आशा दाखवून कांहीं काळ कांहीं ठिकाणी निराशावादास हांकून लावलें. यूरोपमध्यें उत्तरेस ट्युटन लोकांत निराशावाद जास्त होता. भूमध्यसमुद्राच्या लगतच्या मुलुखांत हें मत विशेष प्रचलित नसे. पण ट्युटन लोकांतहि भावी आयुष्यांत या आयुष्यांतील विषमता नाहींशी होण्याची आशा वर्तमानकालीन दैववादाहून अधिक जोरदार असे. भावी काळांत होणार्‍या आनंदाच्या कल्पनेनें ख्रिस्ती धर्मानें जरी निराशावादास नाहीसें केले तरी निराशावादाचें तत्त्व गेलें नाही. शरीरदंडन, मौन इत्यादि यतिधर्म मध्ययुगीन ख्रैस्त्यांतहि वृद्धि पावलेच होते. अगदी आलीकडे यूरोपांत जो निराशावाद प्रसृत झाला त्याच्यापूर्वी तेथें आशावाद १७ व्या आणि १८ व्या शतकांत होता त्याचा प्रमुख पुरस्कर्ता जर्मन तत्त्ववेत्ता लिबनिझ हा होय. त्यानें तत्त्वज्ञानविषयक अथवा धार्मिक आशावाद प्रतिपादून या विश्वांत ईश्वर सर्व संभवनीय मार्गांनीं व भागांतून चांगले निवडतो हें मत पुढें मंडले. कांट हा वैयक्तिकदृष्ट्या मनुष्यांविषयीं जरी निराशावादी असला तरी नैतिक शक्तीसंबंधी आसावादी आहे व हेगेल हा जरी एखाद्या क्षणास जगांत दु:ख अधिक असलें तरी कलह व दु:खानुभव यांनीं जगाची कल्याणाकडेच प्रगति होत आहे असें म्हणतो. याच काळांत इंग्लंडांत लॉक, शॅफ्टस्वरी, बॉलिंगब्रोक वगैरे तत्त्ववेत्ते आशावाद प्रतिपादीत होते. १९ व्या शतकांत शौपेनहार व हार्टमन हे प्रसिद्ध निराशावादी झाले आहेत. शौपेनहारनें हेकेलचा निराशावाद वाढविला. विश्व हें फक्त प्रेरकशक्तीनें चाललें आहे, त्यांत विचार नाही, ही प्रेरकशक्ति अविचारी आहे. तशीच अहेतुक व म्हणून असुखी आहे, जग हें या शक्तीचें दृश्य असल्यामुळें तेंहि असुखी आहे, इच्छा ही असुखाची स्थिति आहे, असुख म्हणजे दु:ख व म्हणून इच्छातृप्ति म्हणजे दु:खविमोचन. हार्टमन्चें मत (अन्कॉन्शस) शौपेनहारच्या प्रेरक मताप्रमाणएंच आहे. शौपेनहार व हार्टमन यांच्या निराशावादांत बुद्धमताप्रमाणएं एक प्रकारचा गूढवाद (मिस्टिसिझम) दिसतो. पण या निराशावादाबरोबरच उत्क्रांतिवादानें (एव्होल्यूशन) आशावाद उत्पन्न केला आहे. योग्यताजातिजीवन (सर्व्हायव्हल ऑफ दि फिटेस्ट) म्हणजे या जगांत जें सर्वांत अधिक योग्य असतें तेंच शिल्लक रहातें, या मतांत आशावाद भरला आहे. या मताप्रमाणें मनुष्याची प्रगति पूर्णत्वाकडे होत आहे.

भारतीय- याचे तीन वर्ग पडतात; परिस्थितिविषयक, प्रकृतिविषयक व तत्त्वज्ञानविषयक. पहिला, आपल्या परिस्थितीतींल आपत्ती, हवामान, वगैरेमुळें; दुसरा, प्रत्येक गोष्टीची वाईट बाजू पाहण्याची संवय असल्यामुळें; व तिसरा वर्ग आपलें जीवितविषयक जें तत्त्वज्ञान असेल त्यामुळें उत्पन्न होतो. याप्रमाणे मानवी मनावर तीन प्रकारचे दाब पडून साहाजिक त्याचें मन निराश होतें. याशिवाय, विद्यमान किंवा भावी आयुष्याविषयी किंवा या दोन्ही आयुष्यांविषयीं मनुष्य निराश बनत असतो. अत्यंत वाईट निराशावाद म्हणजे जेव्हां मनुष्याला इहलोक किंवा परलोक कांहीं एक किंमतीचे नव्हते व सर्व वस्तूंच्या ठिकाणीं अहंकार भरलेला आहे असें वाटूं लागतें तो. चार्वाकाच्या मतास डॉ. ग्रिसवल्डनें निराशावाद म्हटलें आहे पण तें म्हणणें बरोबर नाही. परलोक कबूल करून या भूतलावरच सुखाचा शोध करावा, दु:ख टाळीत जावें असें चार्वाकमत आहे.

निराशावादाचीं कारणें:- भारतांत निराशावाद चांगलाच अस्तित्वांत आहे याबद्दल वाद नाहीं. वाद आहे तो त्याच्या कारणासंबंधी. कांहीं पंडित प्रतिपादितात की हा निराशावाद परिस्थितिविषयक आहे; व या त्यांच्या प्रतिपादनांत बरेंच तथ्यहि आहे. ज्याप्रमाणें स्वार्‍या करून येणार्‍या अकियन, डोरियन, भूमध्यसमुद्रांतले मिनोयन या लोकांशीं ग्रीक जेव्हां समरस झाले तेव्हां त्यांची कलाकौशल्यासंबंधीं प्रकृति जशी बळावली त्याचप्रमाणेंच असें म्हणतां येईल कीं, भारतावर चाल करून येणार्‍या आर्यांची मूळ रहिवाशांशी जेव्हां वैचारिक एकरूपता झाली तेव्हां त्यांच्या प्रकृतीवर निराशेचा पगडा बसण्यास बरीच मदत झाली. वैदिक कालापासून उपनिषद कालापर्यंतचा भारतीय आर्यांचा इतिहास हा आशावादित्वापासून निराशावादित्वाकडे त्यांनां घेऊन जाणार्‍या चळवळीचा इतिहास म्हणतां येईल. त्याचप्रमाणें इतर फरकहि महत्त्वाचे आहेत. ऋग्वेदांत लिंगपूजा झिडकारिली आहे (७, २१, ५; १०, ९९, ३) पण पुढील काळांत ती अत्यंत रूढ झाली. ऋग्वेदांत पुनर्जन्माची कल्पना स्पष्ट आढळत नाही. पण उपनिषदकालांत तो एक श्रद्धाविषय होऊन बसला. यावरून काय दिसतें? कीं हिंदुस्थानची रहाणी व हवामान यांचा बाहेरून आलेल्या आर्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला. अर्वाचीन हिंदुस्थानांतील कांहीं गोष्टींवरूनहि याची शक्यता दिसून येईल. हिंदुस्थानांत जन्म पावलेल्या यूरोपीयन लोकांवर इकडील बराच परिणाम झालेला दिसून येतो व पुष्कळसे आंग्लोइंडियन आपल्याकडील जादूटोण्याच्या मागें लागतात. तेव्हां त्यांच्या बाबतींत केवळ परिस्थितीचा परिणाम झालेला नसून आनुवंशिक संस्काराचाहि कांहीं परिणाम असतो. जगाचा कंटाळा व सर्वत्र वाईट बाजूकडे नजर याच गोष्टींनीं भारतीय निराशावाद दृष्ट होतो असें नसून भारतीय आध्यात्मिक कल्पनांपासून उद्धवलेला आणि तत्त्वज्ञानाच्या भाषेनें आणि विचारसंमतीनें परिस्फुटता पावलेला विचारसंप्रदाय हा एक त्या निराशावादाचें महत्त्वाचें अंग आहे. बार्थ, ओल्डनबर्ग व इतर पंडित यांचा वरीलप्रमाणें कयास आहे.

भारतीय तत्त्वज्ञानांत निवृत्तीचें स्तोम फार माजल्यामुळें भारतीयांचें मन प्रवृत्ति अथवा कर्मापासून दूर जाऊं लागलें, त्याचा परिणाम तें केवळ विचाराचें जाळें विणण्यांत गुंतून राहून दुर्बल बनत चाललें. कर्मप्रवृत्ति ही या विचारांस सहाजिकच आळा घालते. व्यक्तीचें किंवा राष्ट्राचें आयुष्य जर एखाद्या उच्च ध्येयानें प्रेरित होऊन कर्मप्रवृत्त होईल तर त्याचे विचार परिभ्रमणापासून व मन दुर्बलतेपासून परावृत्त होईल. मनुष्यास मिथ्याविचार व दु:खदायक कल्पना यामुळें बंधन प्राप्त होतें असें भारतीय तत्त्वज्ञान म्हणतें, पण चुकीची कर्मप्रवृत्ती हें बंधाचें कारण मानीत नाहीं. (बौद्ध तत्त्वज्ञान तसें मानतें), म्हणझे बंधनांची व्याख्या करतांनं बुद्धीस व मनाच्या भावनास प्राधान्य दिलें असून कर्मप्रवृत्तीच्या नीति-अनीतिपरतेस गौण स्थान दिले आहे. भारतीय तत्त्वज्ञानांत ज्याप्रमाणें ज्ञान व संवेदना यांस महत्त्व दिलें आहे तसेंच भारतीय विचारपरंपरेंत बुद्धीस महत्त्व दिलें आहे, पण आचारांत कित्येक वेळां सुखप्रदतेस महत्त्व दिलेलें आढळतें. भरतखंडांत आपणांस एकीकडे पूर्णपणें वैराग्यवृत्ति, तत्त्वज्ञानाची सत्यान्वेषी शांति तर दुसरीकडे वैभवांत खेळणार्‍या राज्याचें ऐश्वर्य असे दोन परस्परविरोधी देखावे दिसतात व हे वरील तत्त्वज्ञानाचेच परस्परविरुद्ध दोन ध्रुवबिंदू होत. पण या दोघ्यांच्याही मनांत निवृत्तिपर विचार उत्पन्न होतात. ते एकाच्या मनांत ऐहिक सुखापेक्षां आत्म्यामध्यें लीन होऊन मिळणारें सुख शाश्वत असतें या समजुतीमुळें येतात तर दुसर्‍याच्या मनांत वैभव भोगून मन विटल्यामुळें येतात. भर्तृहरीचें वैराग्य व शृंगारशतक ही वरील प्रवृत्तीचीं उत्कृष्ट उदाहरणें आहेत. भारतीय मनाला कर्मप्रवृत्तीचें महत्त्व बरोबर आकलन न होण्याचें एक कारण येथील हवामान असूं शकेल. परंतु कोणत्याहि गोष्टीकडे पाहण्याच्या वेळची मानसिक परिस्थिति हीहि या बाबतीत महत्त्वाची आहे. सुखग्राहक मनसिक वृत्तीमध्ये कोणत्याहि वस्तूकडे पाहिल्यास मनुष्य सहसा निराश होत नाही; उलट सर्वच दु:खमय आहे अशा मनोवृत्तीनें कोणत्याहि गोष्टीकडे पाहिल्यास मनुष्यास आशाहि लागत नाही. भरतखंडांत निराशावाद शिरण्याचें कारण वरील प्रकारच्या परिस्थितीमुळें बनलेली मनोवृत्ति होय. येथें विचार अथवा संवेदना यांस कर्मप्रवृत्तीचें नियंत्रण केव्हांहि घातलेलेंच नाही. यामुळें बाहेरील अनुत्तेजक अशी हवामानाची परिस्थिति व सर्व जग क्षणिक, व दु:खमय आहे अशा तर्‍हेच्या विचारसरणीचा मनावर पगडा यांमुळे निराशावादास स्थान मिळालें आहे.

निराशावादाचा ब्राह्मणी विचाराशी संबंध:- कर्मवादाचा उगम उपनिषदांत कसा झाला याचें विवेचन वेदविद्या विभागांत (पृ. १७८) केलें आहेच. ब्रह्म, कर्म व पुनर्जन्म या तीन महत्त्वांशी भारतीय नैराश्यवाद संबद्ध आहे असें कांहीस वाटतें. ब्रह्मतत्त्व हें आशावादित्वाचें मोठें उगमस्थान असलं तरी तें मनुष्याला अप्राप्य अशा स्थितींत असल्याने त्याच्याशी तुलना करतांना जगाचें क्षुद्रत्वच चटकन नजरेंत भरतें. या ब्रह्माऐवजी वरुणदेवतेला जर भारतीयांच्या धार्मिक भावनेंत अद्वितीय स्थान मिळालें असतें तर हे लोक आशेच्या तेजानें उज्वल दिसूं लागले असते असें ग्रिस्वोल्डसारखे (दि गॉड वरुण इन् दि ऋग्वेद) कांहीं पंडित समजतात. कर्मवाद व पुनर्जन्म हीं परस्परावलंबी आहेत; व त्यांच्यापासून निराशेचा उद्धव आहे असें म्हणणार्‍या ख्रिस्त्यांची विचारसरणी अशी की या तत्त्वांपासून आशावाद उत्पन्न न होण्याचें कारण मनुष्याच्या मुक्ततेचा सर्व भार त्याच्यावरच पडतो व आपण पापी, हतबल व दरिद्रि असल्यानें आपल्या हातून हें अवघड काम कसें पार पडेल या चिंतेनें तो निराश होतो, व त्याला असंख्य जन्म घेतल्याशिवाय मुक्ति मिळणार नाहीं असें हिंदु तत्त्वज्ञान सांगतें. याप्रमाणें तो दु:खद व आभासमय मायेनें बद्ध होतो व आशा सफल होण्याचा काल जन्मजन्मांतरी पुढें ढकलला गेल्यानें त्याचें अंत:करण खिन्न होतें.

भरतखंडामध्यें कर्मवादास प्राधान्य असून मनुष्याची उन्नति अगर अवनति ही त्याच्या कर्मावर अवलंबून असते अशी समजूत आहे. त्यानें पुण्यकर्म केल्यास त्याचें फल त्यास मिळतें व पापकर्म केल्यास त्याचें फळ त्यास भोगावें लागतें. यामुळें मनुष्याची कर्माकडे प्रवृत्ति होत नाहीं असें ग्रिस्वोल्डसारख्या कांहीं आशायुक्त ख्रिस्त्यांस वाटतें. त्यांचें म्हणणें असें कीं, ख्रिस्ती लोकांत ज्याप्रमाणें मनुष्यानें केलेल्या पापाचें फल ख्रिस्तानें भोगलें तसा भरतखंडामध्यें मनुष्यांच्या पापाचें फल भोगणारा कोणी नाहीं. यामुळें निराशवादास स्वाभाविकच स्थान आहे!! प्रस्तुत ख्रिस्ती कल्पना सोडल्या तरी कांहीं विचारांचा परिणाम नैराश्य वादांत होत असेल यांत शंका नाही. कलियुगासारखी इतिहासविकासाची खोटी कल्पना लोकांस निराशवादी करीत अशावी.

पुनर्जन्मांच्या विचारांमुळें परिणाम अगदी दोन प्रकारचे होतात. आपल्यांस या जन्मीं सुख मिळालें नाहीं तर पुढच्या जन्मीं मिळेल अशी आशा मनुष्यास असते उलट पक्षीं अनेक जन्माचीं पापें जर मनुष्यांवर परिणाम करवीत असतील एका जन्माच्या सत्कर्मानें काय मोठेसें होणार अशी कल्पना कांहींच्या मनांत येत असावी.

कलियुगाची कल्पना, कालाचें अनंतत्त्व कार्याचें वैयर्थ्य इत्यादि गोष्टींचा पगडा मनावर बसून हिंदु मनांची ठेवण निराशामय बनली आहे; व त्याचा ओढा नेहमीं संन्यासधर्माकडे असतो. मागें गेला तो काळ अधिकाधिक सुखाचा असतो ही त्यांची जात्याच कल्पना युगानुक्रमावरून दिसून येते. ही समजूत कशी चुकीची आहे व निराशावादी म्हणतात त्याप्रमाणें दिवसानुदिवस जगाची अवनति होत नसून त्याची स्थिति उत्तरोत्तर कशी सुधारक आहे हें `जगद्विकासाचीं कारकें’ या `बुद्धोत्तर जग’ (तिसर्‍या) विभागाच्या ३० व्या प्रकरणांत दाखविलें आहे; अर्थशास्त्र या लेखांतहि यासंबंधी थोडेसें विवेचन केलें आहे व आजहि हिंदुस्थानांत आशावाद उत्पन्न होत असलेला आनंददायक देखावा दृष्टीस पडतो. लोकांनां कांहीं स्वास्थ्य व सुख मिळूं लागल्याकारणानें निराशेची पकड ढिलीं होऊं लागली आहे. शिवाय, भक्तिमार्ग व इतर धार्मिक पंथ उदयास येऊन भारताला निराळा धार्मिक आशावाद शिकवीत आहेत. पाश्चात्य आधिभौतिक वादानें यापूर्वीच जमीन तयार करून ठेविली आहे व तींत आर्यसमाज व ब्रह्मसमाज आचारप्रधान धर्माचा क्षय झाला तरी अध्यात्मिक भावना कमी होणार नहींत अशा आशेचें बीं पेरीत आहेत. सुराज्य, स्वातंत्र्य, समता, शिक्षण, सामाजिक सुधारणा वगैरे व्यावहारिक जगांतल्या गोष्टींकडे लोकांचें आतां लक्ष लागूं लागलें आहे. तेव्हां भावी काल पूर्ण आशावादित्वाचा उगवेल अशी आशा करण्यास बरीचशी जागा आहे.

पौरस्त्य किंवा पाश्चात्य निराशावादाबद्दल असें म्हणण्यास हरकत नाही की तत्त्वज्ञान विषयक ज्या सिद्धांतांवर तो उभारलेला आहे ते सिद्धान्तच अग्राह्य आहेत. मानवी दृष्टीनें जगाबद्दल एवढेंच म्हणतां येईल कीं जगांतील बर्‍याचशा गोष्टी अद्याप मानवीबुद्धीला आकलन झाल्या नाहींत व म्हणून बर्‍याच वेळां आपल्या मानवी आशा तृप्त होत नाहींत त्यामुळें मन निराश व दु:खीं होतें. तथापि तेवढ्यावरून सर्व जीवित दु:खमय आहे असला निराशावाद प्रस्थापित होऊं शकत नाहीं तसेंच पूर्णपणें आशावाद प्रस्थापित करणेंहि कठिण आहे. कारण जी गोष्ट एका मनुष्याला चांगली वाटते तीच दुसर्‍याला वाईट वाटते. सुख हें ध्येय आशावादी व निराशावादी दोघांनांहि मान्य असून जग हें दु:खाला अधिक कारणीभूत कीं सुखाला अधिक कारणीभूत हा प्रश्न सोडवावयाचा आहे. पण जगांतील एकंदर सुखांची व दु:खांची बेरीज घेऊन वजाबाकी सांगणें हेंच काम अशक्य आहे. कारण सुखदु:खविषयक मानसिक भावना याच इतक्या अत्यंत गुंतागुंतीच्या व अन्योन्यरूपांतर क्षम आहेत कीं त्यांचें निश्चितपणें स्वरूप ओळखणें पुष्कळ वेळां अशक्य असतें. कित्येक वेळां खुद्द दु:खापासूनच एकप्रकारचें विलक्षण समाधान वाटत असतें. प्रयत्न व श्रम, कष्ट व भय, स्वार्थत्याग, आत्मयज्ञ व मृत्यु या दु:खमय वाटणार्‍या गोष्टीच पुष्कळ वेळां मनुष्यामधील सर्व कर्तृत्वशक्ति जागृत करून त्याला यावरून दु:खमय गोष्टी करण्यास प्रवृत्त करतात व त्या करण्यानें त्याला सुख होत असतें. याप्रमाणें बारकाईनें विचार केल्यास निराशावादी लोक  दु:खांची म्हणून जी यादी करतात तीच चुकीची आहे असें म्हणावें लागतें. प्रत्यक्ष अनुभव असा आहे कीं, सुखाच्या किंवा दु:खाच्या कोणत्याहि प्रसंगी ` सदिच्छा’ (गुडवइल) मनांत वास करींत असल्यास किंवा आपल्याकडील अध्यात्म तत्वज्ञानांतील सुखदु:खातीत असलेली स्थितप्रज्ञता प्राप्त झालेली असल्यास तिच्या पुढें सामान्य सुखदु:खें किंवा आशा निराशावाद यांनां कांहीं महत्त्व उरत नाहीं.