प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ६ वें
यावद्वीप संस्कृति.

ऐतिहासिक माहितीचे तुकडे. - जावानीज बाबद ग्रंथ, चिनी ग्रंथ, शिलालेख, ताम्रपट इत्यादि साधनांनीं आज यवद्वीपाचा इतिहास लिहिला जात आहे. बाबद ग्रंथ जर मनोरंजक कथा आपल्या पुढें ठेवतात, तर त्यांच्या विश्वसनीयतेविषयीं चिनीं ग्रंथ व शिलालेख संशय उत्पन्न करितात. इतिहास आणि काव्य यांची भेसळ ज्याप्रमाणें रामायण व पुराणें यांमध्यें दृष्टीस पडते त्याप्रमाणें बाबद ग्रंथांतहि दृष्टीस पडते. जगदुत्पत्तीविषयक विचार आणि प्राचीन कथा यांचा व खर्‍या इतिहासाचा मेळ बसविण्याविषयीं उदाहरणार्थ राजघराण्यांचा संबंध ब्रह्मदेवाशीं जोडण्याविषयीं धडपडी या बाबद ग्रंथांत दिसतात. बाबद ग्रंथांनीं वर्णलेलीं स्त्रिया मिळविण्याकरितां युद्धें हीं देखील फार प्राचीन कालाच्या इतिहासाची छटा त्या ग्रंथांस देतात.

यवद्वीपांतील प्रबल संस्थान जें मयपहित त्याचा संबंध तुमपेल व केदिरि या संस्थानांशीं, बलिद्वीपाशीं, सुमात्राशीं व आसपासच्या जिंकलेल्या मुलखांशीं तर येतोच, पण चिनी व तार्तार यांसारख्या दूर देशच्या लोकांशींहि येतो. हिंदुस्थानांतील राज्याशीं राजकीय संबंध शोधण्यासाठीं झालेल्या प्रयत्‍नांस अजून यश आलें नाहीं.
मयपहितसंबंधी जावानीज इतिहासग्रंथांत जी माहिती मिळते ती फारच अपूर्ण आणि अविश्वसनीय आहे. ‘परारतन’ नामक ग्रंथांत जी माहिती आहे ती सर्वांत चांगली आहे. हा ग्रंथ डॉ. ब्रँडिस यानें लोकांच्या नजरेस आणला.

एकांत तुमपेल येथील राजांविषयीं माहिती आहे. यावर डॉ. ब्रँडिस यानें ऐतिहासिक भाष्य केलें असून त्यासाठीं त्यानें जावानिज बाबद नामक ग्रंथ, चिनी ग्रंथ आणि जावा येथील प्राचीन शिलालेख इत्यादि साहित्य वापरलें आहे.

परारतन या महत्त्वाच्या ग्रंथांतील मुख्य भाग येथें देतों.

या ग्रंथांत प्रांरभीं मयपहित राजघराण्याचा प्राचीन दंतकथात्मक इतिहास दिला आहे.

या घराण्याचा संस्थापक केन अंगरोक हा होय. ह्या विषयीं माहित असलेल्या कथा येणेंप्रमाणेः-

तुंगल अमेतुंग हा केन अंगरोक याच्या देदीस नामक पत्‍नीला पळवून नेतो-त्याचा मृत्यू कट्यारीनें होईल आणि त्याप्रमाणें त्या मुलांचा आणि नातवंडांचा अंतहि कट्यारीनेंच होईल असें भविष्य-तुंगल अमेतुंग याचा खून-तुंगल अमेतुंग याच्या पासून अनुशपति नामक पुत्रास देदीस ही प्रसवते-अंगरोक राजा होतो-श्रीराजस आणि अमूर्वभूमी हें नांव धारण करतो-तुमपेल देश “दह” (केदिरि) पासून स्वतंत्र होतो. दहविरुद्ध युद्ध-दहनृपतीचा पराभव (शके ११४४). पुढें २७ वर्षें राज्य करून म्हणजे शक ११६९ मध्यें राजा केन अंगरोक हा भविष्याप्रमाणें गुप्‍त कट्यारीनें ठार होतो. त्याची रक्षा कांगे निंगं येथें रक्षिली आहे.

अंगरोक याची उत्पत्ति ब्रह्मदेवापासून वर्णिली आहे. त्याच्यानंतर त्याचा सावत्र मुलगा अनुशपति हा गादीवर आला. पुढील वर्षीं अंगरोकच्या देदीस खेरीज दुसर्‍या एका पत्‍नीपासून झालेल्या रादेन्तोहजय नामक मुलानें त्यास ठार केलें. त्याची रक्षा कीडल येथें रक्षिली आहे. रादेन्तोहजय यास शके ११७१ मध्यें गादी मिळाली पण त्यास फार थोडा काळापर्यंत राज्य करतां आलें. त्यानंतर रंगवूनी यास गादी मिळाली. रंगवूनी हा अंगरोक व देदीस यांचा मुलगा होता, त्यानें विष्णुवर्धन हें नांव धारण केलें.

महिषचंपक रंगवूनीचा मित्र आणि संबंधी यास राज्याचा चालक केलें. भट्टार नरसिंह हें नांव त्यानें धारण केलें. शके ११९४ त रंगवूनी वारला, त्यानंतर कृतनगर (दुसरें नांव भट्टार शिवबुध) हा गादीवर बसला. हा छांदिष्ट आणि निष्काळजी राजा होता. याची कारकीर्द मोठी आणीबाणीची होती. गादीवर बसल्यानंतर थोडक्याच दिवसांत मलयु (म्हणजे सुमात्रा) देशाशीं यानें युद्ध सुरु केलें, आणि यामुळें राज्यरक्षणासाठीं अवश्य असें सैन्य उरलें नाहीं. त्यामुळें दहचा राजा जयकटोंग यास फावलें. त्यानें चीनच्या मंगोलियिन बादशहाशीं देखील युद्धास सुरवात केली. त्याचा सेनापती रादेन (रत्‍न) विजय (महिषचंपकाचा पुत्र) हा होता.

जयकटोंग यानें तुमपेलच्या उत्तरेवर स्वारी केली. त्यास रादेनविजय यानें मोठ्या यशस्वी रीतीनें अडथळा केला, तथापि कृतनगर हा दुसर्‍या एका युद्धांत पडला. रादेनविजय यानें राजाच्या मृत्यूचें वर्तमान ऐकतांच तो घाईनें परत आला आणि एका राजकन्येला सोडविलें. तो पुढें मदुरा येथें गेला आणि तेथें वीरराज (उर्फ बाणकविदे) याच्या आश्रयास राहिला. वीरराज हा त्यांचा शत्रु जो जयकटोंग त्याचा मित्र होता, तथापि वीरराज यानें त्याचें स्वागत केलें, आणि राजकन्येची काळजी घेतली. एवढ्या काळांत म्हणजे शके ११९८ मध्यें जयकटोंग यानें तुमपेल घेतलें. जयकटोंग यानें हें शहर ११९८ मध्येंच घेतलें किंवा नाहीं याबद्दल वाद आहे, आणि यावर डॉ. ब्रँडिस यानें टीपा लिहिल्या आहेत. रादेनविजयास दह येथील राजानेंच ठेवून घेतलें. जयकटोंग यास ट्रिक येथील जमिनी अधिक सुपीक करण्यासाठीं वीरराज यानें सल्ला दिला. मदुरा येथील कांहीं लोक विजय यानें आणले होते. ते भुकेले झाले. त्यांनीं मय नांवाचें फल खाल्लें, तें त्यांनां कडू लागलें आणि त्यामुळें त्या प्रदेशास मयपहित (कडूमय) हें नांव पडलें.

१२१५त तार्तार लोक या बेटांत उतरले त्यांस रादेन विजय जाऊन मिळाला अर्थात त्यानें दहविरुद्ध  बेमानी केली. जयकटोंग याचा पराभव झाला आणि तार्तारांनीं त्यास पकडलें. रादेनविजय यानें कृतनगर राजाची दुसरी पुत्री सोडविली; आणि तिला घेऊन तो मयपहित येथें गेला. नंतर त्यानें तार्तारांच्या विरुद्ध जाऊन त्यांस हांकून दिलें आणि ते चीनला गेलें.

अशी कथा व्यक्त केली गेली आहे कीं, तार्तार लोक रिक्त हस्तानें परत जाऊं नये म्हणून तेथील दोन सुंदर राजकन्या चीनच्या बादशहास नजर करण्यासाठीं घेऊन गेले. तथापि चिनी ग्रंथकार याविषयीं कांहींच लिहीत नाहींत. त्यांस पराभव नमूद करणें मोठें महत्त्वाचें वाटलें नसावें. इकडे जे जावा येथील सैन्य सुमात्रा येथें लढत होतें त्यांनीं देखील दोन राजकन्या पकडून आणल्या.

तार्तारांनीं पकडलेल्या जयकटोंग हा १२१५ किंवा १२१६ मध्यें मरण पावला.

१२१६ मध्यें रादेनविजय हाच कृतराजस जयवर्धन हें नांव धारण करून राजा बनला. त्याच्या सर्वांत अधिक मानाच्या पत्न्या म्हणजे कृतनगर  राजाच्या मुली होत्या, हें त्याच्याच एका लेखांत सांगितलेलें आहे. या लेखांत बरीचशी माहिती आहे, आणि त्यांतून कित्येक उतारे ब्रँडिस यानें  घेतले आहेत. त्यानें कांहीं पूर्वोपकारस्मृतीदाखल कुदादु येथील जमीन कुदादु येथील लोकांस बक्षीस दिली आणि त्याचें एक लेखपत्रहि करून दिलें. कृतराजस यानें फार थोडा काळ राज्य केलें, तो बहुतेक शके १२१७ मध्यें वारला असावा. त्याची रक्षा अंतपुर येथें नेली.
मयपहित येथील दुसरा राजा म्हटला म्हणजे रादेन काल गेमेत हा होय. हा विरोदनविजय आणि मलयु देशाची राजकन्या दारा फेतक यांचा मुलगा होता. राजपदावर असतां याचें नांव भट्टार जयनगर असें होतें. त्याच्या कारकीर्दींत बंडें पुष्कळ झालीं. त्यास त्याची प्रजा फारशी मानीत नव्हती. क्षत्रिय त्याचे वैरी बनले. त्यानें आपल्या चुलत्यास उपद्रव दिला आणि तंगशा याच्या पत्‍नीस दूषित केलें. तंगशा यानें त्याचा सूड असा घेतला कीं, राजा आजारी असतां तंगशा शेजारीं बसला होता तेव्हां त्यानें राजास खुपसून ठार मारलें(१२५०).

त्याच्यानंतर राज्य भ्रेंग जीवन नांवाची त्याची सावत्र बहीण हिच्या हातीं गेले.

राज्यकर्ती या नात्यानें तिचें नांव जयविष्णुवर्धिनी होतें. ती आपल्या हयं वुरुकनामक अल्पवयस्क पुत्रासाठीं कारभार करीत होती. हयं वुरुकच्या बापाचें नांव कृतवर्धन हें होतें. (चक्रधर असें नांव परारतन या ग्रंथांत आहे तें चुकीचें आहे असें डॉ. कर्न म्हणतो. परारतन या ग्रंथांत पदवी व नांव यांत घोंटाळा केला असावा.) कृतवर्धन हा न्यायाधिकारी होता. हें नांव ब्रँडिस यानें विवेचनार्थ घेतलेल्या एका जुन्या लेखांत आढळतें. जयविष्णुवर्धिनी या राज्ञीनें जाव्हा, बलि व इतर अनेक बेटांचें स्वामित्ववाचक शब्द वापरले आहेत. मयपहितच्या राज्याचें सर्वांत श्रेष्ठत्व आणि विस्तृतत्व हंय वुरुकच्याच राज्यांत वाढलें.

[ ब्रँडिस यानें असें म्हटलें आहे कीं, सुमात्राद्वीपाचा राजा आदित्यवर्मन् यानें शक १२६५ मध्यें ज्या राणीस राज्यावर बसविलें, व मञ्जुश्रीमध्यें ज्या जावा येथील राणीचा उल्लेख आहे ती जयविष्णुवर्धिनी राणीच असावी. आदित्यवर्मनचें तिच्याशीं कांहीं तरी नातें असून कादचित् त्यांचा प्रेमसंबंध असावा. आदित्यवर्मन् हा बौद्धसंप्रदायी होता. ] हयं वुरुक याचा जन्म शक १२५० मध्यें झाला असावा व त्यानें शक १२७२ मध्यें आपल्या आईच्या हातून अधिकारसूत्रें घेतलीं असावीं. तो शक १३११ मध्यें मृत्यू पावला. हयं वुरुक याच्या कारकीर्दीमध्यें मयपहित वैभवशिखरास पोंचले. या राजाला राजसनगर व संग हयंग वेकसिंग सुख अशींहि नांवें होतीं.  

परारतन आणि नागरकृतागम या दोन्हीहि ग्रंथांत जावाच्या साम्राज्याखालीं असलेल्या सर्व प्रदेशांची माहिती दिलेली आहे. पैकीं एका ग्रंथांतील माहिती विशेष विस्तृत आहे.

परारतन या ग्रंथांत पुढील नुसती यादी आहे.

बली, दोम्पो, सेरन, गुरुन, तंजुंगपुर, सुण्ड पलेंबगं, हरू, पहंग, तुमसिक.

नागरकृतागमांतील पुढील यादी अधिक विस्तृत आहे.
१. सुमात्रा (याला जावांतील लोक मलय म्हणत)-जांबि, पलेंबगं, तेब, धर्माश्रय, कंडिस्, कहवस्, मनंगकबो, सियक, रेकान, कांपर, पने, कांपे, हरु, मण्डहिलिंग, तुमिहगं, पर्तक, बरत, ल्वस, समुद्र, लमुरि, बतन, लांपुगं, बरूस्, हे आणि मलयमधील इतर भाग.

२. बोर्निओ (तंजुंगनगर)-कपुअस, कतिंगान, सांपित, कुट, लिंग्ग, कुट वरिंगिन, संबस, लवइ, कंडगंडगंन, लंड, समेडंग, तिरेम, सेदु, बुरुने,कल्कस अलुडुंग, सोलोत, पसिर, बरितु, सवकु, तबलुंग, तुंजुंकुते, मलनो, राजधानी-तंजुंगपुरी.

३. मलाक्का-पहंग, हुजुंग, तनः, लेंका-सुक, सेमोंग, कलंतेन, त्रिंग्गनो, नगोर,  पकमुवर, दुंगुन, तुमसिक, संगह्यंग हुजुन, केलंग, केड, जेरे, कंजपिनिरन्, व इतर द्वीपसमूह, इत्यादि.

या काव्यामध्यें परारतन या ग्रंथापेक्षां ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा भाग बराच आहे; आणि परारतन या ग्रंथामध्यें असणारी माहितीहि यांत अधिक विस्तृत दिलेली आहे. या काव्यांत वर्णन केलेल्या हकीकती कवीच्या समकालीनच आहेत. याच्यामुळेंच आपणाला तेथील राजघराणें, तेथील राजांचे परकीय राजांशीं विशेषतः चंपा, कांबोज, व सयाम येथील राजांशीं संबंध, त्याच्या देणग्या, वर्षासनें, इ. व त्याचीं सर्व लोकांच्या कल्याणासाठीं केलेलीं कामें वगैरे बाबींचें व राजधानी मयपहित व इतर देवालयें यांचें विस्तृत वर्णन वाचावयास मिळतें.

परारतन ग्रंथांत तेथील राजघराण्याबद्दल अशी माहिती मिळतें कीं, हयम् वुरुक याच्या आईस आणखी दोन मुली होत्या, त्यांपैकीं वडील मतहुन येथील राजास व धाकटी पगुहन येथील राजास दिल्या होत्या. वडील मुलीचें नांव रोदन लरंग असें आढळतें.

प्रस्तुत काव्यावरून अशी माहिती मिळते कीं, हयं वुरुक याची धाकटी बहीण लासेमची राजकन्या मतहुन येथील राजा राजसवर्धन यास दिली होती. परारतनमध्यें हयम् वुरुक याची सर्वांत धाकटी बहीण पजंग येथील राजकन्या इचें सुमन याजबरोबर लग्न झाल्याचा उल्लेख आहे. परंतु या काव्यांत तिच्या नवर्‍याचें नांव पगुहन् येथील राजा सिंघवर्धन असें आहे. या काव्यांत असें आहे कीं, या  राजाच्या आईस म्हणजे दह येथील राजकन्येस, तिची वडील बहीण कुरिपन अथवा जीवन येथील राजकन्या हीच राज्यकर्ती जयविष्णुवर्धिनी राणी (इचें पूर्ण उपपद हजि राजदेवी महाराजसा) असून, तिच्या बरोबरचा मान मिळत असे. तिच्या नवर्‍याचें नांव विजयराजस असें बखरींत आहे व तेंच काव्यांतहि आढळतें व तो वेंगकेर येथील राजा होता.

इतिहासावरून आपणास असें कळतें कीं, हयम् वुरुक याचा द्वितीय विवाह त्याच्या सख्या मावस बहिणीशीं म्हणजे दह येथील राजकन्येच्या मुलीशीं झाला असून तिचें उपपद पदुकचोरि असें होतें. या काव्यांत तिचें सुसुमनदेवी असें नांव आढळतें व तिला परमेश्वरी हें उपपद आढळतें व ती सर्व राण्यांत योग्य व श्रेष्ठ होती असें वर्णन आढळतें.

परारतन ग्रंथांक शक १२८४ (ख्रि. श. १३६२-६३) मध्यें एका मोठ्या श्राद्धसमारंभाचा उल्लेख आहे. या काव्यांत कवीनें ६७ व्या सर्गामधें पितृश्राद्धाचें वर्णन केलें आहे.

परारतन या ग्रंथावरून हयम् वुरुक यास नाट्याची आवड असून त्याचें अभिनयकौशल्य अप्रतिम असल्याचें कळतें. याच्या नाट्याचें वर्णन प्रस्तुत काव्याच्या ९१ व्या सर्गांत आलें आहे.

आठव्या सर्गामध्यें मयपहित राजधानीचें वर्णन असून तेथील इमारती, देवालयें व इतर स्थलांचे वर्णन आहे. सध्यां हें वर्णन कदाचित् आपणाला सत्यापासून किंचित् दूर वाटेल परंतु कवीनें तें आणल्या समकालीन देशबांधवांकरितां लिहिलें होतें ही गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे. तरी सुद्धां राजधानींतील इमारतींचे वर्णन आपल्याला फार महत्त्वाचें आहे. कारण त्यावरून आपला भारतीय-जावानी-शिल्पकलेचा इतिहास अजमावतां येतो.

हयम् वुरुक स्वतंत्रतेनें कारभार पाहूं लागल्यानंतर प्रथम त्यानें सर्व देशाची माहिती करून घेण्याकरितां आणि आपल्या प्रजेस दर्शन द्यावें म्हणून सर्व राज्यांत प्रवास केला. यापैकीं एका प्रवासाच्या वेळीं या काव्याचा कर्ता त्याजबरोबर होता. त्यामुळें त्याला स्वतः पाहिलेल्या स्थळांचें, इमारतींचें व तत्संबद्ध ऐतिहासिक गोष्टींचें वर्णन विस्तृततेनें देण्याची संधि मिळाली. या प्रवासवर्णनावरून आपणास जावाची १४ व्या शतकांतील भौगोलिक स्थिति कळून येते व तिची सध्यांच्या स्थितींशीं तुलना करतां येते.

मधून मधून कवीनें स्वतःबदलचेहि कांहीं कांहीं प्रसंग वर्णिले आहेत. उदाहरणार्थ एका ठिकाणीं त्यानें एका वृद्ध बौद्ध भिक्षूच्या भेटीची हकीकत दिली आहे. हा भिक्षु ८३ वर्षांचा असून तो राजाचा आप्‍त होता व त्याच्याकडे राजकीय पुरुषांच्या समाधिस्थानांचें रक्षण करण्याची कामगिरी होती. कगेनेंगन येथें पहिली समाधि या वंशाच्या संस्थापकाची होती.

परारतनमध्येंहि त्याची समाधि याच ठिकाणीं असल्याचा उल्लेख आहे. प्रपंच कवीला या ठिकाणीं जाऊन त्या भिक्षूची गांठ घेण्याचें मुख्य कारण म्हटलें म्हणजे केन अंग्रोक या राजाचा व त्याच्या वंशजांचा इतिहास माहित व्हावा हें होय. त्याची माहिती मिळविण्याची इच्छा त्या भिक्षूनें पूर्ण केली. तेव्हां ४० ते ४९ पर्यंतच्या सर्गांत कवीनें केन अंग्रोक राजाच्या उद्यापासून (येथें त्याचें नांव रंग्गः राजस असें आहे.) भटार कगोनेंगन या ठिकाणीं तो समाधिस्थ होईपर्यंतची सर्व हकीकत देऊन हयम् वुरुक याच्या कारकीर्दीपर्यंतची सर्व कथा गोष्टीच्या रूपानें दिली आहे. मयपहित येथील राजवंशाची उत्पत्ति ब्रह्मा, गिरींद्र, शिव यांपासून झाल्याचें वर्णन केलें आहे. इतिहासग्रंथांत केदिरिच्या अस्ताचा शक ११४४ हा दिलेला आहे. इतिहासाच्या आरंभीं आपणास शक ११०४ सांपडतो. तो बहुतकरून राजाचा जन्मशक असावा परंतु कवीनें त्याबद्दल स्पष्टपणें कांहींच लिहिलें नाहीं. या काव्यामध्यें त्याचा मृत्युशक ११४९ हा दिला आहे परंतु परारतनमध्यें ११६९ हा दिला आहे. याच्यानंतर त्याचा पुत्र अनूषनाथ हा गादीवर आला. अनूषनाथ व अनूषपति हे दोन्ही शब्द समानार्थीच आहेत. हा शके ११७० मध्यें मरण पावला. त्याची समाधि किदल येथें असून तेथें एक शिवालय बांधिलें आहे. तो शैव होता म्हणून तो शिवालयांतच मृत्यूच्या वेळीं आला असें लोक म्हणत.

त्याच्यानंतर त्याचा पुत्र विष्णुवर्धन हा गादीवर बसला. तोहजय यानें चांगलें पण फार थोडा वेळ राज्य केलें म्हणून त्याच्याबद्दल फारशी हकीकत दिली नाहीं. परंतु यावरून  तोहजयाच्या कृत्यांचें जें वर्णन इतिहासग्रंथांत आलें तें चुकीचें आहे असें म्हणतां येत नाहीं. प्रपंचानें (नागरकृतागम) दिलेली हकीकत त्याच्या कालापुरती खरी व पुराव्याकरितां ग्राह्य मानण्यास हरकत नाहीं.

विष्णुवर्धनाच्या हकीकतींत मात्र यी दोन्ही ग्रंथांत फारच साम्य आहे. परारतन या ग्रंथांत विष्णुवर्धन आणि भटार नरसिंघ यांच्यामधील प्रसंगांचें व लिंग्गपति याला केलेल्या शासनाचें जें वर्णन आलें आहे त्या वर्णनास या काव्यावरून पुष्टि मिळते. विष्णुवर्धन अथवा विष्णु हा शत ११९० किंवा ११९४ मध्यें  पावला. त्याचे अवशेष अंशतः वलेरि येथील शिवालयांत व अंशतः जगहु येथें बौद्ध म्हणून पुरण्यांत आले. त्याच्यानंतर लवकरच त्याचा मित्र नरसिंघ मृत्यु पावला व त्याच्या नांवचें कुमित्र येथें एक शिवालय बांधिलें.

यानंतर कृतनगर हा गादीवर आला. त्यानें शक ११९७ मध्यें मलय देशाशीं युद्ध केलें. लवकरच यानें सुमात्रा व पहंग या देशांवर स्वामित्व स्थापित केलें आणि सुण्डदेश, मधुर व इतर कांहीं भागांस जावाचें वर्चस्व कबूल करावयास लाविलें. या राजाच्या स्वभाववर्णनामध्यें काव्यांत आणि परारतन या ग्रंथांत विरोध दिसतो. काव्यामध्यें त्याला केवळ चांगुलपणाची मूर्ति कल्पिली आहे. परंतु हा कवि बौद्ध होता व तो राजा कट्टा बौद्ध होता यावरून या कवीपेक्षां परारतन या ग्रंथावरच जास्त विश्वास ठेवण्यास हरकत नाहीं.

कृतनगर शक १२१४ मध्यें निर्वाणास गेला. परारतनमध्यें याचा मरणशक दिलेला नाहीं. (ब्रँडिस याच्या मतें याचा मृत्युशक ख्रि. श. ११९७ हा असावा. परंतु कर्नच्या मतें ही गोष्ट अशक्य दिसते. कारण चीन देशचा मंगोलियन बादशाह कुब्लइखान यानें चीनच्या विजयानंतर जी जावावर स्वारी केली ती करण्यास त्यानें १७ वर्षें वाट पाहिली असण्याचा मुळींच संभव नाहीं. या स्वारीच्या वेळीं कृतनगर राजा मृत्यू पावून फारशीं वर्षें लोटली नव्हतीं असा उल्लेख चिनी बखरींतून आढळतो). कृतनगर मेल्यानंतर शिवबुद्ध लोकास गेला असें वर्णन आहे. त्याचे अवशेष ज्या गांवीं आहेत त्यास शिवबुद्ध असेंच नांव आहे तेथें त्याची मूर्ति स्थापन केली आहे. दुसर्‍या एका ठिकाणीं त्याची एक जिनरूपी मूर्ति स्थापन केली आहे.

या राजाच्या मरणानंतर केदिरीचा मांडलिक राजा जय कतोंग यानें बंड केल्यामुळें फार वाईट काळ आला. या राजाचें वर्णन कवीनें फार वाईट म्हणून केलें आहे. या दुःस्थितींतून देशाला कृतनगर राजाचा पुत्र विजय यानें सोडविलें. त्यानें कुब्लइखानानें पाठविलेल्या तार्तार लोकांशीं सख्य करून त्यांच्या मदतीनें जय कतोंग याचा पराजय केला. व शेवटीं तार्तार सैन्यावर उलटून त्यांची कत्तल केली तेव्हां बाकी राहिलेले तार्तार चीन देशास परत गेले. त्यांनीं जातांना  जय कतोंग याचें बुणगें मात्र आपल्याबरोबर नेलें असें चिनी बखरींत वर्णन आहे.


जय कतोंग याच्या मरणानंतर शक १२१६ मध्यें विजय गादीवर बसला. यानें कृतनगर जयवर्धन असें नांव धारण करून मयपहित येथें आपली राजधानी स्थापिली. यानें फारच थोडे दिवस राज्य केलें. तो शक १२१७ मध्यें मृत्यू पावला. काव्यामध्यें याचा मृत्युशक १२१६ म्हणून दिला आहे परंतु तो वरील गोष्टीशीं विसंगत दिसतो. परारतनमध्यें शक १२१७ दिला आहे. त्याला क्रतोन येथें पुरिलें असून तेथें त्याचें बुद्धमंदिर आहे. या देवालयाचें नांव अन्तःपुर असेंहि आहे. सिंपिंग येथें त्याचें एव शिवरूपी मूर्तीचें देवालय आहे.

जयनगर हा त्याच्यानंतर गादीवर आला. तो शक १२५० पर्यंत राज्य करून विष्णुलोकास गेला. तो वैष्णव होता. त्याचे अवशेष दलेम येथें असून तेथें विष्णुरूपी मूर्तीचें देवालय आहे. अशींच देवालयें इतर दोन ठिकाणीं आहेत. हीं ठिकाणें शिलापेटक आणि बुवत हीं होत. या ठिकाणींहि विष्णुच्या मूर्तीं आहेत. सुकलील येथें त्याची ध्यानिबुद्ध अमोघसिद्धि या नांवाची बौद्धमूर्ति आहे. परारतन या ग्रंथांत फक्त एवढेंच सांगितलें आहे कीं, त्यास चोपोंगन येथें पुरलें व त्या गांवास श्रृंग्गारपुर असेंहि नांव आहे.

या राजाचें एक पराक्रमाचें कृत्य म्हणून या कवीनें वर्णन केलें आहे तें म्हटलें म्हणजे लुमजंग येथील नंबि राजाचा त्यानें केलेला पराजय हें होय. हीच हकीकत परारतन ग्रंथांत विस्तारानें सांगितली आहे.

जयनगर याच्या मागून त्याची बहीण जीवन (कुरिपन) येथील राजकन्या गादीवर बसली अशी माहिती मिळते. जरी तिच्या हातांत सार्वभौम सत्ता होती तरी ती वास्तविकपणें आपल्या अज्ञान मुलाच्या वतीनें प्रतिनिधि म्हणून राज्य करीत होती. राज्याचा मुख्य भार सेनापति पतिः गजमद याच्यावर होता. यानें पुष्कळ विजय मिळविले. यानें खर्‍या राजापेक्षांहि सार्वभौमत्व गाजविलें. अलीकडील सम्राटांस त्याचें उदाहरण घेतां येईल. परंतु त्याच्या स्वभावांत क्षुद्रपणा अणुमात्रहि नव्हता. या राणीच्या कारकीर्दींतील महत्त्वाची गोष्ट म्हणून या काव्यांत शक १२५३ तील सडेंगवरील स्वारीचें वर्णन केलें आहे. परारतनमध्येंहि या स्वारीचें वर्णन आहे.

या ठिकाणीं त्या बौद्ध भिक्षूच्या मुखानें सांगितलेली हकीकत संपते.

मधून मधून कवीनें कांहीं स्थलांचें वर्णन केलें आहे परंतु तीं स्थलें म्हणजे बहुतेक समाधिस्थानें आहेत. सिंधसरी येथील शेवटचा राजा कृतनगर यानें देणगी दिलेलें उसान येथें एक देवालय आहे तें लक्षांत ठेवण्यासारखें आहे. हा राजा शैव आणि बौद्ध दोन्हीहि धर्म सारखेच मानित असे म्हणून त्यानें या देवळाचा खालचा भाग शैव धर्तीचा व वरचा भाग बौद्ध धर्तीचा बांधला आहे, आणि खालीं शिवाची प्रतिमा स्थापन करून वरतीं मुकुटधारी ध्यानिबुद्ध अक्षोभय याची मूर्ति स्थापन केली आहे.

नजराणे.- येथील राजांस येणार्‍या नजराण्याचे पदार्थ म्हणून हत्ती, हस्तिदंत, जंग्गल केदिरी येथून नारळ व राण्यांस खाण्याकरितां सुपारी यांचा उल्लेख आढळतो. शंख व शिंपा हीं राजगृहासाठीं खलाशी आणीत, भोज्य पदार्थ पगुहन येथील मांडलिक राजाकडून आणि चित्रें हण्डिव हण्डिव याजकडून, तसेंच इतरांकडून दुकूल व सुपारीच्या झाडाचीं वस्त्रें देणगीच्या रूपानें राजगृहांत आलेलीं दृष्टीस पडतात. मतहुन येथील राजानें एक कळीचें चित्र दिलें त्याच्या तोंडांतून पक्वान्नें व द्रव्य निघत असे, असाहि इतिहासाला कांदबरीचें स्वरूप देणारा मौजेचा उल्लेख आढळतो. या देणग्यांचा कांहीं भाग पुरोहित व ब्राह्मण यांच्या स्त्रिया यांस मिळे व उच्च दर्जाचे क्षत्रिय, राजाचे आप्‍त, यांसहि ब्राह्मणांप्रमाणेंच भोज्य पदार्थांचा वांटा मिळत असे. नंतर उरलेलें सैनिकांस देत असत. यावरून देणग्यांचे मालक ब्राह्मणाप्रमाणें क्षत्रियहि झाले होते असें दिसतें.