प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ६ वें
यावद्वीप संस्कृति.
यावद्बीप संस्कृतीच्या अभ्यासाचा प्रारंभ.- इ. स. १८४६ मध्यें डच हिंदुस्थानच्या सरकारनें ज्या वेळीं बलिलिंग येथील सुलतानावर फौज पाठविली त्या वेळीं त्या स्वारीबरोबर आर्. फ्रेडरिक नांवाचा एक मनुष्य गेला होता. त्यानें संस्कृत भाषेचा अभ्यास केलेला होता; आणि या ज्ञानाचा उपयोग त्यानें जावाकडील प्राचीन भाषांचें ज्ञान मिळविण्याच्या कामीं केला. तो कांहीं दिवस बलिद्वीपांत राहिला. तेथें त्यांनें बरीच मेहनत घेऊन कांही हस्तलिखित ग्रंथ मिळविले आणि शब्दशास्त्राविषयक अभ्यासाच्या बाबतींत तेथील पुरोहितवर्गाचें साहाय्य घेऊन त्यांच्या धर्मांचें बरेंचसें ज्ञान संपादन केलें. या सर्व संशोधनाचा सारांश त्यानें बटेव्हिया येथील संशोधक संस्थेच्या नियतकालिकांत {kosh Verhandlungen der Batavischen Gensellschaft.}*{/kosh} अहवालरूपानें प्रथम प्रसिद्ध केला. याचा पहिला भाग सिंगापुर येथील नियतकालिकांत त्याच सुमारास प्रसिद्ध झाला होता.{kosh Journal of the Indian Archipalago १849. Published by Logan in Singapore.}*{/kosh} या दुसर्या नियतकालिकावरून व Tijdschrift या नावांच्या जावामध्यें निघणार्या नियतकालिकावरून वेबर यानें आपल्या Indische Studien Vol II या ग्रंथांत यासंबंधीं माहिती दिली आहे. हा फ्रेडरिकचा स्वतःचा लेख रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नितकालिकांत प्रसिद्ध झालाच आहे. तो अहवाल, वेबरचा लेख, लायडन युनिव्हरसिटींतील जावानीज आणि बलिनीज हस्तलिखितांची डच यादी, ब्रँडीस याचा जावानीज शब्दकोश या प्रकारच्या साहित्यावरून आपणांस सुमारें पांचशें ग्रंथांचा पत्ता लागतो. या प्रकारच्या साहाय्यावरून पुढील मजकून तयार केला आहे.
फ्रेडरिकच्या अहवालास ‘बविद्वीपासंबंधीं थोडी माहिती’ अशा अर्थाचा मथळा असून त्यांत तीन भाग आहेत. (१) भाषा आणि वाङ्मय (२) संप्रदाय, पंथ, संस्कार, प्रेतविधि इ. (३) जाती व राजघराणीं.
प्रथमतः फ्रेडरिकनें घेतलेल्या पहिल्या विषयाचाच विचार करूं म्हणजे फक्त जाव व बलि या द्वीपांतील भाषा आणि वाङ्मय यांसंबंधींच उपलब्ध माहिती विचारास घेऊं.
बलिद्वीपांतील दोन लौकिक म्हणजे प्रचारांतील बोलण्याच्या भाषा आहेत आणि दोन पण्डिती म्हणजे लेखनाच्या भाषा आहेत.
(१) मूळच्या देश्य रहिवाशांची भाषा, मलायी, सुदानी व इतर जावाच्या पूर्वेकडील पॉलिनेशीयांतील भाषांसारखीच असून त्यांच्याशीं संबद्ध आहे.
(२) जावानी ग्रांथिक भाषा ही सध्याच्या जावानी भाषेपासून अगदीं निराळी असून जावांत मुसुलमानांचा प्रवेश झाल्यामुळें सुमारें ४०० वर्षापूर्वीं जे हिंदु लोक बलिद्वीपांत गेले त्यांनीं या भाषेचा तेथेप्रचार केला व ही त्यांची लौकिक म्हणजे बोलण्याची भाषा होती.
(३) कवि व (४) संस्कृत या दोन्हि भाषाहि जावांतून हिंदू लोकांनीं बलिद्वीपांत नेल्या.
जे हिंदु व विशेषतः ब्राह्मण जावा बेटांत आले त्यांनीं आपल्या धर्मशास्त्रविषयक ग्रंथांबरोबर संस्कृत भाषा आणली; परंतु त्या लोकांची बोलण्याची भाषा एखादी प्राकृत पोटभाषा असली पाहिजे. कारण ज्या कालीं म्हणजे ख्रिस्ती शकाच्या पांचव्या शतकांत ते जावा बेटांत आले त्या कालीं भरतखंडांत संस्कृत भाषा जर कदाचित् कधीं काळीं बोलण्याची भाषा असलीच तर ती प्रचारांतून गेल्यास निदान १००० वर्षें होऊन गेलीं होतीं. उत्तरकालीन वसाहतीच्या कल्पनेविरुद्ध एक शक्य प्रमाण म्हणून वेबरनें पुढें आणलें आहे ते हें कीं पॉलिनेशियांतील भाषांमध्यें एकहि प्राकृत शब्द आढळत नाहीं. त्याप्रमाणें कविभाषेंतील भारतीय शब्दांत प्राकृत भाषेचीं चिन्हें शब्दांचें मिश्रण होऊन, त्यांचीं लघुरूपें होऊन, किंवा त्यांतील कांहीं अक्षरांचा लोप होऊन इत्यादि प्रकारांनीं घडून आलेलीं दिसत नाहींत. त्याचेहिं पुढें वेबरनें खंडन केलें आहे. तो म्हणतो जर जावामध्यें आलेल्या भारतीयाची भाषा प्राकृत असेल, आणि ती तशी असावी असें अनुमान त्यांच्या आगमनाच्या कालावरून करतां येण्यास हरकत नाहीं, तर ती त्यांनीं जावामध्यें आल्यावर टाकून देऊन जावामधीलच देश्य लौकिक भाषेचा स्वीकार केला असला पाहिजे; आणि या गोष्टीस त्यांचें अल्पसंख्याकत्व कारण झालें असेल. याशिवाय ही एक गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे कीं, भारतीय पंडितांच्या दृष्टीनें प्राकृत भाषांचें महत्त्वच नव्हतें. पंडित वाङ्मय संस्कृतमध्येंच असे आणि प्राकृत भाषेचा आश्रय व्यवहाराकरितां करीत पण प्राकृत भाषा त्यांच्या दृष्टीनें सोंवळ्या नसून ओंवळ्या होत्या.
जावामध्यें ऐतिहासिक ग्रंथ थोडेबहुत आहेत, पण त्यांचा ऐतिहासिक अर्थ लावला गेला नाहीं. जो कांहीं अर्थ लावला गेला आहे त्यावरून हे ग्रंथ बरेचसे अविश्वसनीय असावेत आणि संशोधनाच्या कामास निरुपयोगी असावेत अशी समजूत झाली आहे.
हिंदु संस्कृतीचें जावा येथील स्वरूप आपणांस समजून आलें म्हणजे संस्कृतीचा प्रसार कसा काय होत होता त्याचें स्वरुप समजतें. जावा येथील भारतीयत्वाचे धागे आपणांस समजण्यासाठीं आपण जावांतील संस्कृतीचीं निरनिराळीं अंगें तपासलीं पाहिजेत. प्रथमतः हिंदुस्थानाशीं ऐतिहासिक संबंध जावा येथील ग्रंथ आपल्या वाङ्मयांत कोणत्या तर्हेनें व्यक्त करतात तो पाहूं.
एक संबंध म्हटला म्हणजे आपले पूर्वज हिंदुस्थानांतून आदिशकाबरोबर आले अशी भावना त्यांनीं ठेविली होती हा होय. यवद्वीपाचा हिंदुस्थानाशीं एकसारखा संबंध दाखविणारे उल्लेख तपासून काढले गेले नाहींत.
जावा येथील इतिहासग्रंथ हिंदुस्थानांतून जावामध्यें झालेल्या प्रयाणाची माहिती देत नाहींत किंवा त्या विषयावर ग्रंथहि नाहिंत. बलिद्वीपांत एक ब्राह्मण पहिल्या प्रथम गेला त्याचें नांव “निरर्थ” म्हणून प्रसिद्ध आहे, आणि त्याच्या नांवावर एक काव्यसमुच्चय खपत आहे, त्यास हन्यंग निरर्थ हें नांव आहे.
जावा येथील हिंदूंच्या संस्कृतीचे ठसे सामुच्चयिक आयुष्यक्रमाच्या ज्या अनेक अंगांवर दिसून येतात तीं अंगें येणेंप्रमाणेः-
राज्यव्यवस्था हिंदुस्थानांत आणि जावा येथें सारखीच होती असें दिसतें. राजा महिषी व इतर राण्या हें स्वरूप भारतीय राजगृहाचें आहे तसेंच राजा आणि अनेक मंत्री यांनीं संयुक्त अशी राज्यव्यवस्था हें स्वरूप हिंदुस्थानी दरबाराचें आहे. जावामध्यें हेंच दिसून येतें. एवढेंच नव्हे, तर अनेक राज्यांतील अधिकार्यांचीं नांवें देखील भारतीय आहेत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या “नागरकृतागम” नांवाच्या जावानीज काव्यांत अशीं त्रेचाळीस नांवें आलीं आहेत. अमात्य, मंत्री, पुरोहित, धर्माध्यक्ष हीं नांवें आपणांस परिचित दिसतात. अधिकारपदाचीं अनेक नांवें तर संस्कृत शब्दापासून झालेलीं दिसतात. जाव्हा येथील राजकार्यें कांहीं अंशीं भिन्न असणार आणि त्यामुळें कांहीं अधिकाराचीं नवीन नांवेंहि उत्पन्न होण्याचा संभव आहे. उदाहरणार्थ, “जलधिमंत्री” हें पद घ्यावें. हिंदुस्थानांतील समुद्रकांठ नसलेल्या संस्थानांस एक जलधिमंत्री ठेवण्याची जरूर नाहीं हें उघड आहे. प्रत्येक अधिकार्याचे अधिकार कोणते होते हें सांगण्यास अधिक खोल संशोधन झालें पाहिजे. आम्ही येथें त्या ग्रंथांतील अधिकार्यांच्या नांवांची यादी देऊन मोकळे होतों.
अध्यक्ष, अमात्य, आत्मराज, आधिमंत्री, आर्य्य, उपपत्ति, कण्डमोहि, कनुरुहन्, गुस्ति, जलधिमंत्री, तंगर, तण्ड, तुमेंग्गुंग, देमुंग, धर्माध्यक्ष, पञ्जि, पतिः, पमेगेत, पुरोहित, मंदुरि, मञ्चनगर, मंत्री, मंत्रिहरहजि, महागुरु, महाधिकार, युवमंत्री, रंग्ग, राजपराक्रम, राजाध्यक्ष, राणाधिकार, रामाधिराज, वंग्शाधिराज, वदन, वद्वहजि, वीरप्राण, वीरमंडलिक, वीराधिकार, वृद्धमंत्री, शूराधिकार, सिंघाधिकार, सुजनोत्तम, सुधम्मोपपत्ति, स्थापक.
धर्माध्यक्ष आणि महागुरु हे दोन अधिकारी निरनिराळे होते हें वरील यादीवरून दिसून येईल. धर्माध्यक्षाचें काम न्यायाचें होतें हें त्या ग्रंथांत आलेल्या वर्णानावरून दिसतें. महागुरु हा राजाचा केवळ पारमार्थिक हित पहाणारा अधिकारी असे.
पारमार्थिक व शास्त्रीय विषयांच्या बाबतींत तेथील लौकिक भाषेंत तुल्य अगर मुळींच शब्द नसल्यामुळें तेथील लौकिक भाषेंत शब्दांची भर घालणें अवश्य झालें. अशा रीतीनें पारमार्थिक उपदेशकांनीं वरचेवर उपयोगिलेले संस्कृत शब्द तेथील लोकांस हळू हळू परिचित होत जाऊन अनेक संस्कृत शब्द तेथील भाषेंत शिरले. भारतीय प्राकृत भाषेचा पगडा जावानीज लोकांवर पडला नाहीं याचें श्रेय वेबरनें बौद्धांस दिलें आहे. तो म्हणतो कीं, जेथें बौद्ध जाऊन राहत तेथें तद्देशीय लोकांशीं तादात्म्य पावत, आणि आपलेपणा त्यांवर गाजवीत नसत. बौद्धानीं अशी चाल घातली त्यामुळें पुढें ब्राह्मणांनां भारतीय भाषा जावा येथील लोकांवर लादतां आल्या नाहींत. बौद्ध डेमोक्रेटिक (उदारवृत्ति) होते आणि ब्राह्मण अरिस्टोक्रेटिक (अहंकारवृत्ति) होते, या पूर्वकालीन निराधार समजुतीस बळी पडून वेबरनें हीं विधानें केलीं आहेत. हीं विधानें अनेक चुकांनीं भरलीं आहेत. त्यांतील मुख्य येणेंप्रमाणेः-
बौद्ध ज्या ज्या ठिकाणीं जातील त्या त्या ठिकाणच्या देश्यभाषांचे ते ब्राह्मणांपेक्षां अधिक अभिमानी होते असें दिसत नाहीं. ब्राह्मण संस्कृतचा प्रसार करीत तर बौद्ध पाली भाषेचा प्रसार करूं पहात. तथापि या प्रयत्नांत त्यांस यश येत नसें एवढेंच. कां कीं, बौद्ध ग्रंथ म्हणजे भारतीय संस्कृतीचा केवळ एक अंश होय. त्यांतील पौराणिक पुरुषांचे, नक्षत्रांचे, भैषजांचे, छंदांचे उल्लेख समजण्यास संस्कृत ग्रंथांशिवाय गति नाहीं, आणि त्यामुळें बौद्धांस देखील संस्कृत ग्रंथांचा परिचय करून घ्यावा लागे आणि संस्कृत भाषा पसरवावी लागे. संस्कृत शब्द म्हणजे मूळ किंवा शुद्ध आणि प्राकृत शब्द अशुद्ध किंवा लौकिक होय अशीच कल्पना जेथें असते तेथें प्राकृत शब्दाच्या ऐवजीं संस्कृत शब्दच वापरण्याची प्रवृत्ति होणार. पाली भाषेनें ज्या प्रदेशावर फार मोठी छाप टाकली असा प्रदेश म्हणजे सिंहलद्वीप होय. पण तेथील वाङ्मयांत देखील पाली शब्दांऐवजी संस्कृत शब्दच वापरण्याकडे फार प्रवृत्ति दिसते, हें सिंहली भाषेचा एक देखील नमुना ज्यानें पाहिला असेल त्यास सहज दिसून येईल. संस्कृत भाषेचा द्वेष करावयाचा आणि होतां होई तों तिच्यांतील शब्द येऊं द्यावयाचे नाहींत ही वृत्ति ठेवल्याखेरीज प्राकृत शब्दांऐवजीं संस्कृत शब्द शिरल्याशिवाय राहणार नाहींत, मग लेखक बौद्ध असो अगर ब्राह्मणानुयायी असो.
बौद्ध यवद्वीपांत अगोदर गेले आणि ब्राह्मण नंतर गेले असें खात्रीपूर्वक म्हणतां येत नाहीं.
आर्यांचा प्रसार बौद्ध संप्रदायापूर्वींच सिंहलद्वीपांत झाला होता. यवद्वीपांत झालेलें गमन कोणाच्या काळचें होतें याविषयीं खात्रीपूर्वक माहिती देतां येत नाहीं. सिंहलद्वीपांत प्रयाण आणि यवद्वीपांत प्रयाण हे प्रश्न अगदीं निरनिराळे आहेत. सिंहलद्वीपांत आर्य जातीचे लोक जाऊन त्यांनीं वसाहत केली असावी आणि ती देखील इतक्या प्राचीनकाळीं केली असावी कीं, ब्राह्मणी संस्कृति आणि ब्राह्मणी जातहि उदयास आली नसावीं. लंकाद्वीपांत जें प्रयाण झालें तें हिंदुस्थांनांतील दक्षिण भाग आर्यांनीं तुडविण्यापूर्वीं झालें असें गृहीत धरलें आहे. जर आर्यांबरोबर ब्राह्मण गेले असते तर त्यांची जात स्वतंत्रपणें सिंहलद्वीपांतील सिंहली समाजांत आजपर्यंत असती पण तशी असल्याचें दिसत नाहीं. आर्यांमधील ब्राह्मण या वर्णास जातीचें स्वरूप येण्यापूर्वीं म्हणजे ख्रिस्तीशकापूर्वीं सुमारें कमींत कमी १००० वर्षें आर्यांची सिंहलद्वीपांत वसाहत झाली, आणि त्या समाजांतील पुरोहितवर्गास आपलें पृथक्त्व निर्माण करण्यामध्यें यश आलें नाहीं.*
यवद्वीपांतील स्थिति निराळ्या प्रकारची आहे. तेथील वसाहत बरीच उत्तरकालीन झाली असावी. भारतीय संस्कृतीचें स्वरूप आणि यावद्वीप संस्कृति या दोहोंस सामान्य अशी भारतीय संस्कृति ज्या कालीं असेल त्या कालीं प्रयाण झालें असावें असा एक पक्ष घेतां येईल, आणि या दृष्टीनें या दोहोंची तुलना विशेष फलप्रद आहे.
अर्वाचीन भारतीय संस्कृतीपासून भिन्न अशीं यावद्वीप संस्कृतीचीं स्वरूपें आणि भारतीयांच्या स्थलांतराच्या कालाच्या निदर्शक गोष्टी येणेंप्रमाणेः-
(१) यवद्वीपांत चातुर्वर्ण्य हें जिवंत समाजघटनातत्त्व होतें आणि जातिभेदाच्या तीव्रत्वाखालीं या तत्त्वाचा मृत्यु झाला नव्हता आणि तें तत्त्व शुद्ध स्वरूपांत तेथें व तदनंतर बलिद्वीपांत राहीलें.
(२) बौद्ध आणि ब्राह्मण यांची तडजोड जी व्हावयाची ती बुद्धास विष्णूचा अवतार न करितां शिवाचा भाऊ करून झाली.
(३) महाभारताचें आजचें स्वरूप पूर्णपणें निश्चित झालें नव्हतें. रामायणाचें उत्तरकांड जोडलें गेलें नव्हतें.
(४) दक्षिण द्वैपायन संस्कृतींत नाटकांच्या ग्रंथांचा अभाव असून कळसूत्री बाहुल्यांच्या खेळापलीकडे तिकडे नाटकें गेली नाहींत.
(५) वर्षगणनेसाठीं शालिवाहनाचा शक तेथें चालू आहे.
(६) छंद पुष्कळ गेले आहेत; आणि ते उत्तरकालीन आहेत.
(७) कामंदकीय नीतिसाराचें अस्तित्व तेथें दिसतें.
---------------------------------------------------------------------------------------
* नीतिंनिगंडुव ग्रंथांत गोवीयांची ब्राह्मणांपासून उत्पत्ति सांगितली आहे तथापि गोवीयांस प्रामुख्य देण्यासाठीं तें विधान असल्यामुळें जमेस धरतां येत नाहीं.
---------------------------------------------------------------------------------------
उत्तरकालींन वाङ्मय परद्वीपांत लौकर जाईल पण उत्तरकालीन समाजघटना जाणार नाहीं; आणि यामुळें द्वैपायन छंदःशास्त्र हें पूर्णपणें कालसूचक नाहीं त्याप्रणाणें कामंदकाचाहि ग्रंथ गमनकालसूचक नाहीं. नाटकांचा अभाव मात्र कालसूचक आहे. असें शक्य आहे कीं कालिदासादि कवींची किंवा भासाचीहि कृति उद्भवण्याच्यापूर्वीं हें परदेशगमन झालें असावें. बुद्धास जोडण्याऐवजीं शिवाच्या एंकदर कथानकाशीं जोडलें यांचें कारण असें देतां येईल कीं तेथें गेलेले लोक शैव होते. तथापि तेथें वैष्णव दैवतेंहि दृष्टीस पडतात. कांहीं असो पौराणिक ब्राह्मणी ग्रंथांचा उदय होऊन त्यांचा परिणाम पुष्कळसा होण्यापूर्वींच हें परदेशगमन झालें होतें हें खास. वेबरनें हें परदेशगमन पांचव्या शतकांत झालें असावें असें म्हटलें आहे; आणि आदिशकाच्या निव्वळ अविश्वसनीय दंतकथेवरून ख्रिस्ती शकाच्या पहिल्या शतकांत हें परदेशगमन झालें असावें असें डच ग्रंथकार समजतात. सध्यांच्या शोधाच्या स्थितीवरून हा काल आंकड्यांनीं सांगतां येणार नाहीं पण ज्या काळांत हें प्रयाण झालें त्या काळाची बौद्धिक परिस्थिति कशी काय होती हें समजण्यास वरील विधानें उपयोगीं पडतील. तेथें ज्योतिर्विषयक कांहीं ग्रंथ उपलब्ध झाल्यास आणि उपलब्ध असलेल्या तेथील व आपल्याकडील वस्तूचां तौलनिक अभ्यास झाल्यास आणखी महत्त्वाचीं तत्त्वे हातीं येतील.
बौद्ध आणि इतर भारतीय हे कांहीं भिन्न लोक नव्हते आणि त्यामुळें एकच लोक अगोदर जाणें आणि दुसरे न जाणें हें शक्य नाहीं. बौद्ध अगोदर गेले कीं इतर लोक व बौद्ध हे बरोबर गेले हें गमनकालावरून व प्रयोजनावरून ठरेल. ज्या कालीं भारतीय गेले तो काल पौरणिक देवतांच्या उत्पत्तीच्या पूर्वींचा असला आणि त्या वेळेस बौद्धांचें वर्चस्व किंबहुना हिंदुस्थानपुरतें पण सर्वव्यापित्व असलें तर बौद्ध अगोदर गेले असें होईल पण असा काल कधीं तरी होता असें वाटत नाहीं. बौद्धांचें सर्वव्यापित्व हिंदुस्थांनांत कधींच नव्हतें. बौद्धांचें गमन अगोदर झालें हीं कल्पना दुसरी आणखी एक कल्पना केली असतां शक्य होईल. ती कल्पना म्हटली म्हणजे संप्रदायाचे प्रचारक तेवढे गेले ही होय पण तीहि शक्य नाहीं. बौद्ध भिक्षू उपदेशाला गेले तरी तेथें येथील समाजव्यवस्था नेऊं शकणार नाहींत, हें तिबेट, चीन व जपान या बौद्धसंप्रदायप्रविष्ट प्रदेशांच्या उदाहरणांवरून स्पष्ट होत आहे. ज्याअर्थीं समाजव्यवस्था तेथें नेली त्याअर्थीं भारतीयांचा बराज मोठा समुदाय ब्राह्मण व क्षत्रियवर्गासह गेला असावा आणि भारतीयांचा यवद्वीपांत प्रवेश हा बौद्ध संप्रदायाच्या प्रचाराच्या इतिहासांतील भाग नसून हिंदूंच्या जगद्व्यापी चळवळीच्या इतिहासाचा भाग होय असें दिसतें.
संस्कृतिप्रसाराच्या दृष्टीनें सिंहलद्वीप, यवद्वीप आणि महायान-संप्रदायप्रविष्ट प्रदेश यांत संस्कृतीचे तीन भिन्न प्रकार दृष्टीस येतात.
सिंहलद्वीपांत जनताच प्रामुख्यानें भारतीय आहे; आणि त्यामुळें तेथें आपली भाषा पसरली. यवद्वीपांत देश्य संस्कृति अल्प असून सर्व संस्कृति आणि समाजव्यवस्था या सर्वांस आपले स्वरूप देण्याइतका व मूळच्या लोकांची भाषां संस्कारावयास समर्थ तथापि तीस नष्ट करावयास असमर्थ इतका जनसमूह तेथें गेला होता असें दिसतें. तिबेट, चीन, जपान येथें आपली जनता फारशी गेली नसून केवळ उपदेशक वर्ग मात्र गेला असावा असें दिसतें. हा उपदेशक वर्ग अर्थात् बौद्ध होता.
वेबर आणि त्याचे अनुयायी कित्येक लेखक यांची कल्पना साधारण अशी दिसते कीं, कोणत्या तरी काळीं बौद्ध संप्रदाय प्रचाराचें काम मोठ्या जोरानें करीत असावा आणि जावा, बोर्निओ, सेलिबिस इत्यादि बेटें आणि सयाम, चीन, तिबेट इत्यादि देश त्या प्रचारानें संस्कारले. त्यांच्या या कल्पनेस आधार नाहीं. प्रत्येक ठिकाणीं दृश्य होणार्या अल्प अगर दिर्घ भारतीयत्वाचीं कारणें भिन्न आहेत. संस्कृतिप्रसाराच्या इतिहासांतील प्रश्नांवर प्रकाश पाडण्यासाठीं बुद्धसंप्रदायाच्या स्तुतिपाठकांनी दिलेल्या उत्तरांसारखीं सोपीं उत्तरें देण्याची प्रवृत्ति दिवसानुदिवस कमी होत जाईल तर बरें.
देश्यभाषा कायम राहून संस्कृत भाषेनें तीवर संस्कार मात्र करावा आणि त्या भाषेंत निदान स्त्रीशूद्रांसाठीं वाङ्मय उत्पन्न करावें हा प्रकार ज्याप्रमाणें द्राविड देशांत झाला त्याप्रमाणेंच यवद्वीपांतहि झाला; आणि ज्याप्रमाणें तामिळ भाषेंत वाङ्मय तयार झालें त्याप्रमाणेंच यावद्वीप भाषांत तयार झालें. पंडितांच्या मनांत सामान्य जनांनां कांहीं तरी सांगावयाचें होतें. तें सांगणें अवश्य झालें तेव्हां यवद्बीपांतील भारतीय जेतृवर्गाची भाषा बदलली असल्यामुळें भारतीय पंडीतांस जें काय सांगावयाचें तें स्थानिक भाषेंत सांगावें लागलें.
वरचेवर अनेक संस्कृत शब्दांचा भरणा जाव्हाच्या देश्य भाषेंत होऊन एक नवीनच भाषा तेथें तयार झालीं तिचें नांव कवि. ही भाषा बहुधा पारमार्थिक शिक्षण अथवा उपदेश आणि ग्रंथलेखन या कामींच उपयोगांत येत असे .
कविभाषा बहुत करून जे देश्य लोक भारतीयांच्या पारमार्थिक संप्रादायांत शिरत किंवा यांच्या संस्कृतीचा व संस्कारांचा स्वीकार करीत त्यांनांहि उपयोगी पडे. धर्मशास्त्रय ग्रंथ संस्कृत भाषेंतच असत. ज्या पौराणिक कथा किंवा इतर पारमार्थिक गोष्टी लोकांस कळवावयाच्या असत तेवढ्याच कविभाषेत आणीत असत. यामुळें कविभाषा ही सामान्य लोकांस पवित्र भाषा वाटे पण पुरोहितांनां केवळ सोपी व साधी अशी वाटे व ते तिचा काव्ये लिहिण्याकडे उपयोग करीत व अजूनहि करितात. ते कवि आणि श्लोक यांमध्यें फार अंतर मानीत. कवि भाषेच्या इतिहासाचे पुरोहितांच्या दृष्टीनें तींतील संस्कृत शब्दांच्या मिश्रणाच्या प्रमाणावरून तीन कालविभाग पंडीतांनीं पाडले आहेत पण त्यांकडे आपणास या ठिकाणीं लक्ष देण्यास सवड नाहीं.