प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ९ वें.
अर्वाचीन परदेशगमन - आफ्रिका व अमेरिका येथील वसाहती
आमची बाहेरच्या जगांत किंमत.- पारीस येथें असलेले शेपन्नास जवाहिरे आणि लंडन, लिव्हरपूल, जिनोवा इत्यादि ठिकाणीं असलेले तुरळक दुकानदार सोडून दिले आणि प्रोफेसर, ब्यारिस्टर या नात्यानें उपजीविका करणारा बोटावर मोजण्यासारखा वर्ग वगळला तर आपले जे लोक यूरोपीय संस्कृतीच्या देशांत जातात त्यांची किंमत मजूर होण्यापलीकडे लागत नाहीं हें सामान्यतः सांगितलें पाहिजे. जेथें हिंदुस्थानी वस्ती पुष्कळ आहे,तेथें कांही लोक हिंदूंच्याच गरजा भागविणारे खाणावळवाले आणि दुकानदार बनतात यांतहि नवल नाहीं. पूर्वेकडे जाणार्या आणि आफ्रिकेंत गेलेल्या लोकांत व्यापारी वर्ग आहे तोहि मोठा महत्त्वाचा नाहीं. त्याची मजल लहानसान दुकानदारीपलीकडो जात नाहीं. अमेरिकेंत मजूर म्हणून देखील भारतीयांची किंमत मोठी नाहीं. वाशिंग्टन संस्थानांत १९०७ सालचे निरनिराळ्या लोकांस मिळणारे मजुरीचे दर पाहतां असें दिसलें कीं, अमेरिकनांस मजुरी अडीच डालर मिळत होती, तर जपान्यांस सवादोन डालर मिळत होती, चिनीस दोन डालर पंधरा सेंट म्हणजे पूर्णांक पंधरा शतांश डालर मिळत होती आणि हिंदुस्थानी लोकांस पावणेदोन डालर मिळत होती. या निरनिराळ्या लोकांच्या कामाची किंमत त्यांस मिळणार्या वेतनाच्या प्रमाणांतच होती असें इमिग्रेशनचे कमिशनर डॉ० जेंक्स यांस माहिती देणारांकडून कळलें. म्हणजे मजूर या नात्यानें हिंदुस्थानी लोकांची किंमत अमेरिकन लोकांच्या पाऊणपट आहे. येथें हेंहि सांगितलें पाहिजे कीं, अमेरिकेस जाणारा वर्ग बर्याच मेहनती अशा पंजाबी लोकांचा असतो.
कलाकौशल्यांत मागसपणा आणि विद्वान् वर्गांचा अभाव हीं ज्या हिंदू वसाहतींचीं लक्षणें आहेत, आणि भांडवलाचें एकीकरण होऊन जींत स्वजनांचा अभिमान बाळगणारे मोठाले संघ बनले नाहींत, अशा हिंदूंची जगांत आर्थिक दृष्ट्या आणि सांस्कृतिक दृष्ट्या कांहींएक किंमत नाहीं.
जगामध्यें आपली पदवी अंत्यजाची आहे हें वाक्य लाला हरदयाळ यानें उच्चारून बर्याच भारतीयांच्या मनास दुखविलें, तथापि त्यांत सत्यांश बराच आहे. कांहीं संस्कृतचे प्रोफेसर आपल्या समाजिवषयीं ग्रंथ वाचून लिहिणारे कांहीं ग्रंथकार आणि प्राचीन संस्कृतीचे संशोधक यांनीं थोडीबहुत आपली स्तुति केली म्हणजे आपण हुरळून जातों आणि जगांत आपणांस मोठी मान्यता आहे असें समजतों. तथापि परदेशीं गमन करणारांस आपल्या राष्ट्राचा उपमर्द वारंवार ऐकूं येतो. रूझवेल्ट म्हणतो, ज्या देशानें व्हिक्टर ह्यू गो आणि डान्टे यांसारखे लोक निर्माण केले तो देश, ज्या देशांत तीस कोट लोक आहेत आणि जे उंदारांसारखे ‘फळतात’, अशा देशापेक्षां कितीतरी पटीनें श्रेष्ठ आहे. पुष्कळ परकीय ग्रंथकार लिहितातः “हिंदुस्थानी मनुष्यांस स्वतःच्या अस्तित्वाबद्दल गर्व वाटण्यास कोणती गोष्ट आहे म्हणाल तर ती ही कीं, दोन तीन हजार वर्षांपूर्वींच्या त्यांच्या पूर्वजांनीं साबणाच्या बुडबुड्यांप्रमाणें सुंदर दिसणारे विचार व्यक्त केले.” परकीय देशांत आपल्याकडील लोक गेले तर कांही माणसें आपल्या बुद्धिवैभवानें किंवा कर्तृत्वानें इतरांवर छाप पाडतात. तथापि एकंदरींत आपली इभ्रत फारशी मोठी नाहीं. निग्रोपेक्षां आपली जात जराशी वरची लेखितात हें खरें आहे. तथापि त्याच्यापलीकडे आपणांस लोकांनीं आदरानें वागवावें असें आपलें वर्तन नाहीं. ज्या चिनी मनुष्याविषयीं अमेरिकन लोकांत द्वेषबुद्धि वाटते त्याच चिनी लोकांनीं प्रामाणिकपणामुळें अमेरिकन लोकांच्या मनांत आदर उत्पन्न करविला. आपल्याविषयीं तसें विधान आपणांस करतां येत नाहीं. हिंदुस्थानी मजूर कामचुकार, दारूबाज, कज्जेखोर, कोर्टांत वारंवार जाणारा असी यांनीं आपली ख्याती करून घेतली आहे. हार्वर्डचे प्रोफेसर अर्चिबाल्ड कूलिज अमेरिकेच्या राजनीतिविषयक प्रश्नाविषयीं विचार करतांना ‘America as a world power’ या ग्रंथांत लिहितातः “हिंदुस्थानी मजुरास बंदी करणें कठिण नाहीं; कां कीं, ब्रिटिश सरकारच त्यांस आपल्या वसाहतींत संचरूं देत नाहीं. पण चिनी व जपानी लोकांची गोष्ट तशी नाहीं. त्यांच्या पाठीमागें स्वाभिमानी साम्राज्यें आहेत.” आपल्या पारतंत्र्यामुळें आपली किंमत बाहेर देशीं बरीच कमी होत हें यावरून उघड आहे.
आफ्रिकेंत गेलेल्या भारतीयांची काय स्थिति आहे याची कल्पना सामान्य जनतेस आज पुष्कळ आहे. नाताळ, ट्रान्सव्हाल, इत्यादि प्रदेशांत जो आपला तिरस्कार आणि छळ झाला त्यांचा इतिहास महात्मा गांधी यांच्या चरित्रावरून सर्वविश्रुत झालाच आहे. कोठेंहि जा, आपलें वास्तव्य तद्देशीयांस प्रिय नाहीं हें खरें. प्रिय नसण्याचीं कारणें अनेक आहेत. त्यांत हिंदुस्थानचें पारतंत्र्य हें एकटेंच महत्त्वाचें कारण असेल असें वाटत नाहीं. सीरियन्, आर्मेनियन, इत्यादि राष्ट्रें देखील परकीय अंमलाखालींच आहेत. तथापि हिंदूचा परदेशांत जसा तिरस्कार होतो तसा त्यांचा होत नाहीं. जेथें हिंदुस्थानीं लोकांची तद्देशीय किंवा यूरोपांतून तेथें वसाहतीसाठीं गेलेल्या लोकांशीं स्पर्धा होते तेथें मत्सरभाव आणि द्वेषभाव हीं उत्पन्न व्हावयाचींच. ज्यांच्यांशीं स्पर्धा होते त्या लोकांशीं स्पर्धा करणारांचें जितकें सादृश्य जास्त असेल किंवा त्यांच्याशीं स्पर्धा करणारांची आत्मीयता होणें जितकें शक्य असेल तितकी त्या दोघांमध्यें द्वेषबुद्धि कमी उत्पन्न होते असा सामान्य नियम आहे. स्पर्धामूलक द्वेष एका देशांतील जातीजातींतहि असतो हें आपण पहातोंच. अमेरिकेसारख्या देशांतहि तो आहेच. या स्पर्धेमुळें अमेरिकन लोकांचे ज्यू, आयरिश, पोल, इटालियन इत्यादि अनेक लोकांशीं वारंवार खटके उडतात आणि कधी कधी त्यामुळे खुनाचे प्रसंगहि उत्पन्न होतात. आयरिश आणि इटालियन हे ख्रिस्ती खरे, पण क्याथोलिक आहेत. त्यांची इतरांशी लग्न करण्याची प्रवृत्ति सहज होत नाहीं आणि त्यामुळें त्यांच्याविषयीं जरा निराळेपणा अमेरिसन लोकांस भासतो. डच, डेन, स्वीड आणि जर्मन हे प्राटेस्टंट असल्यामुळें अमेरिकनांत सहज मिसळून जातात. रशियांतून अमेरिकेंत जे लोक जातात त्यांची कथा ज्यू वगैरे लोकांप्रमाणेंच असते. जितका एखादा बाह्य वर्ग अगर जात पचनीं पाडण्यास म्हणजे आपल्या समाजांत समाविष्ट करून घेण्यास कठिण तितका तद्देशस्थांत त्यांच्याविषयीं द्वेष अधिक, अशी वस्तुस्थिति आहे.
चिनी व हिंदी लोकांचें जें बहिर्गमन होतें त्यामुळें कांहीं सामान्य आणि कांहीं भेददर्शक गोष्टी नजरेस येतात. एक तर, सोंवळेंओंवळें, खाद्यपेय आणि विवाह या बाबतींत चिनी मनुष्य कमी बद्ध असल्यामुळें आणि मारामारीला आणि क्रौर्यासहि तो अधिक उद्युक्त असल्यामुळें परदेशांत भारतीयांचे जसे हाल होतात तसे चिनी लोकांचे होत नाहींत. शिवाय, नवीन गोष्टी शिकण्यास आणि मेहनत चापून करण्यास चिनी जितके समर्थ दिसतात तितके भारतीय दिसत नाहींत हेंहि कबूल केलें पाहिजे. चिनी लोकांच्या पाठीमागें त्यांचें स्वजातीय सरकार आहे तसें भारतीयांच्या पाठीमागें नाहीं, यामुळें विशेष फरक झाला आहे असें दिसत नाहीं. आजपर्यंत त्यांचें सरकार दुबळेंच आहे आणि त्यामुळें हक्कांच्या संरक्षणासाठीं झालेल्या प्रयत्नांस चिनी लोकांस सरकारची फारशी मदत मिळाली नाहीं असेंच दिसतें. तथापि चिनी लोकांत संघशक्ति दांडगी असल्यामुळें आणि त्यांच्यात सामान्यतः शिक्षण अधिक असल्यामुळें व त्यांचा व्यवहारांतील प्रामाणिकपणा लोकांच्या नजरेस आल्यामुळें चिनी लोक हळू हळू स्वतःच्या हिंमतीवर किफायतीचा धंदा करणारे व्यापारी बनले आहेत. हिंदूंची गोष्ट तशी नाहीं. शिक्षणाचा अभाव, भांडवलाच्या बाबतींतील परतंत्रता आणि संघशक्तीचा अपरिपक्व विकास या सर्व गोष्टी हिंदूंत दिसून येतात, आणि त्यामुळें हिंदू अधिक असहाय दिसतात. लोकांची इभ्रत वाढविण्यास पाठीमागें सरकारचा जोर असेल तर कांहीं थोडाबहुत फायदा होईल, नाहीं असें नाहीं. तथापि खरा फायदा जो होतो तो स्वतःच्या उन्नतीकरितां स्वतःच केलेल्या प्रयत्नांनीं होतो. पैशाचें एकीकरण आणि काम करणार्या लोकांस पैशाचें साहाय्य या दोन गोष्टी झाल्या म्हणजे लोक व्यापारी बनतात; आणि त्यांचें मजूरवर्गांतून डोकें वर निघतें. असो.
चिनी व हिंदू यांची तुलना करून चिनी लोकांचें परदेशगमनविषयक संख्यामहत्तव वारंवार सांगण्यांत येतें. पुष्कळ यूरोपीय ग्रंथकार या फरकाची कारणमीमांसा करूं पाहतात आणि असें दाखवितात कीं, चीनच्या आसपास पुष्कळ बेटें आहेत तशीं हिदुस्थानच्या आसपास नाहींत म्हणून चिनी लोकांचा इतरत्र प्रसाल झाला. चिनी लोक चोहोंकडे इतके कां पसरतात यावर जितका विचार झाला आहे तितका हिंदू कां पसरतात याच्यावर झालेला नाहीं. तथापि चिनी लोक खरोखर हिंदूंपेक्षां अधिक पसरले आहेत काय याचा विचार झाल्याचें दिसत नाहीं. आम्हांस चिनी लोकांचें बहिर्देशगमन हिंदूंच्या बहिर्देशगमनापेक्षां कमीच असावें असा दृढ संशय येतो आणि त्याचें निराकरण विरुद्ध बाजूचा भक्कम पुरावा आल्याखेरीज व्हावयाचें नाहीं. आमच्या गणतीनें चीनचें साम्राज्य आणि हाँगकाँगसारखे प्रदेश वगळतां बाहेरदेशीं गेलेल्या चिनी लोकांची संख्या अठरा लक्षांपेक्षां कमी आहे, तर बाहेरदेशीं गेलेल्या हिंदुस्थानी लोकांची संख्या एकवीस लाखांवर आहे. हिंदूंची गणती करतांना आम्ही नेपाळ, भूतान आणि पोर्तुगीज हिंदुस्थान हीं वगळलीं आहेत. चीनच्या एकंदर लोकसंख्येसंबंधानें ती पन्नास कोटींवर असावी अशा तर्हेचीं विधानें आजपर्यंत पुष्कळ झालीं आहेत. तीं विधानें सोडून आतां बरींच नियमित विधानें होऊं लागलीं आहेत. पंचवीस वर्षांपूर्वीं जी लोकसंख्या पन्नास कोटी म्हणून समजली जात होती ती दहा वर्षापूर्वीं चाळीस कोटी समजली जाऊं लागली आणि आजची गणती बत्तीस कोटींपेक्षां अधिक म्हणजे हिंदुस्थानच्या साम्राज्याच्या एकंदर लोकसंख्येइतकीच जवळ जवळ दिसते. चीनच्या एकंदर लोकसंख्येसंबंधानें जे अतिशयोक्तीचे विचार व्यक्त झाले आहेत, त्यांमध्येंच चिनी लोकांच्या बहिर्देशगनाच्या बाहुल्यासंबंधाचे विचार जमा धरावयास हरकत नाहीं. चिनी लोकांच्या एकंदर परदेशगमनाचे आंकडे येणेंप्रमाणेः-
चिनी लोक बाहेर देशांतून किती आहेत. | |
न्यु साउथ वेल्स | ७५०० |
व्हिक्टोरिया | ९३७७ |
क्वीन्सलँड | ६७१४ |
साउथ ऑस्ट्रेलिया | २५५ |
उत्तर ऑस्ट्रेलिया | १०३३ |
बोर्निओ | २६००२ |
कॅनडा | २७७७४ |
कोचीन चीन | ७६००० |
फिजी | ३०५ |
बिस्मार्क आर्चिपेलेगो | १२०० |
सामोअन बेटें | २००० |
हवाइ | २२२५० |
जमेका | २१११ |
जपान | ११८६९ |
कोरिया | १८९७२ |
मादागास्कर | १००७ |
मलाया स्ट्रेट्स सेटलमेन्ट्स | ४२५६७९ |
फेडरेटेड मलाय स्टेट्स | ४३३२४४ |
नॉनफेडरेटेड - जोहोर | ६३४०५ |
मलाय स्टेट्स् - जोहोर | |
नॉनफेडरेटेड - केदा | ३३६४६ |
मलाय स्टेट्स् - केदान्तन | ९८४४ |
चिनी लोक बाहेर देशांतून किती आहेत. |
|
मारिशस | ३६८६ |
पनामा | ३५०० |
पेरु | ५०००० |
फिलिपाइन | ३५००० |
पोर्टोरिको | २० |
रीयुनिआँ | ८८४ |
रशिया | ८०००० |
सारावाक | २६००२ |
सयाम | २००००० |
युनायटेडस्टेट्स् | ७१००० |
एकूण | १६५०३७९ |
हिंदुस्थान | ८१५६८ |
१७३१९४७ |
जगामध्यें संस्कृतींत कनिष्ठ समजल्याजाणार्या आणि परिश्रमाची संवय नसलेल्या जातींचा संहार होत आहे. हिंदी महासागर आणि पासिफिक बेटें यांतील मूळचे रहिवासी आर्थिक चढाओढींत होत असलेला पराभव, आणि सिफिलिससारख्या रोगांचां प्रसार यांनां आणि पुष्कळ ठिकाणी निरनिराळ्या साथींनां भराभर बळी पडत असल्यानें जगांतील बराचसा भाग उघडा पडणार आहे. हा भाग एशियांतील अधिक प्रगत आणि श्रमसहिष्णु लोकांच्या वसतीनें पुढेंमागें व्यापिला जाणार हें उघड आहे. यासंबंधांत आपल्यापुढें प्रश्न उत्पन्न होतो तो हा कीं, पृथ्वीवरील बराचसा भाग चिनी, मलायी लोकांनीं व्याप्त व्हावा कीं हिंदूंनीं व्याप्त व्हावा. उष्ण प्रदेशांत कायमची वसाहत करण्यास गोरे लोक असमर्थ आहेत. आफ्रिकेच्या उत्तर किनार्यास राष्ट्रांचें स्मशानगृह म्हटलें आहे. कां कीं, येथें प्राचीन कालापासून अनेक यूरोपीय राष्ट्रांच्या आणि जातींच्या वसाहती झाल्या आणि त्या सर्व आज केवळ स्मृतिमात्र उरल्या आहेत. गोर्या लोकांनीं देश्यांबरोबर लग्नें केल्याशिवाय त्यांचें उष्ण कटिबंधांत चिरस्थायित्व नाहीं. तेव्हां हा प्रदेश पुढेंमागें एशियांतीलच जातीपैकीं ज्या अधिक साहस, अधिक श्रमसहिष्णुता दाखवितील त्यांचा आहे हें उघड आहे. वसाहती करण्यास आपला सुशिक्षितवर्ग मोठमोठे भांडवलवाले सावकार बरोबर घेऊन बाहेर पडलेला नाहीं, त्यामुळें जमिनीच्या आजच्या स्वस्तपणाचा किंवा मोफतपणाचा फायदा भारतीयांस चांगला मिळत नाहीं. ज्या देशांत नागरिकत्वाचे हक्क भारतीयांस सहज मिळतील आणि जेथें त्यांचें कालांतरानें महत्त्व वाढेल असा प्रदेश म्हणजे पोर्तुगीज व स्पानिश भाषांनीं व्याप्त असलेला दक्षिण अमेरिकेचा भाग होय. तिकडे भारतीयांचा मोर्चा मुळींच वळलेला नाहीं. उत्तर अमेरिकेंत शीखांचें गमन अप्रिय झालें आणि दक्षिण अमेरिकेंत त्यांनीं जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस कांहीं तरी सबब काढून शीख लोकांस मज्जाव केला असें समजतें. तेथील अधिकार्यांस हिंदू तेथें गेले तर हरकत नव्हती. पण त्यांस टोपी घालणारे हिंदू हवे होते, लांबलचक केंस राखून फेंटा घालणारे नको होते. तुमचें पारमार्थिक मत किंवा उपासना कांहींहि असो बाह्म स्वरूपांत तरी तुम्ही आमच्यासारखे दिसा, असा ब्रेझिल येथील लोकांचा आग्रह होता. तथापि संप्रदायचिन्हाच्या तीव्र प्रेमामुळें शीखांस आपला वेणीसंभार काढून टाकणें अयोग्य वाटलें. येथें हेंही सांगितलें पाहिजे कीं, दुसर्या एका क्षुद्र कारणासाठीं कांहीं शीख वेणीसंभार काढावयास तयार होतात. वेणी ठेवल्यानें वेश्यागमनास पुष्कळ अडथळा होतो म्हणून ते पुष्कळदां ही वेणी काढून टाकतात!! असो.
जगांतील पुष्कळसा भाग अजून व्याप्त व्हावयाचा आहे. तथापि बराच कालपर्यंत आतां परदेशगमन कठिण होईल असें वाटतें. कां कीं, हिंदुस्थानांतच मजुरीचे दर वाढत आहेत आणि मजुरांचा तुटवडा येथील वाढत्या कार्यक्षेत्रामुळें आतांच जाणवूं लागला आहे. परदेशगमनाच्या प्रश्नाचा खल
व्हाइसरायांच्या कौन्सिलांत होत असतां नागपूरचे सर गंगाधरराव चिटनवीस यांनीं मजूर बाहेर देशीं करारानें पाठविण्याची पद्धति बंद करावी असें सुचवितांना हाच मुद्दा पुढें आणिला होता.
जे लोक परदेशांत जातात ते अंशेंकरून देशास पारखेच होतात. तथापि जेथें ते जातील तेथें जर त्यांचा पगडा बसावयास लागेल तर ते स्वदेशास जरी पारखे झाले तरी स्वसंस्कृतीला पारखे होणार नाहींत. त्यांची वस्ती कायम व्हावी आणि त्यांनीं स्वसंसक्तीला चिटकून रहावें म्हणून ज्या अनेक गोष्टी अवश्य आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टींपैकीं एक म्हटली म्हणजे स्वसंस्कृतिरक्षणार्थ म्हणून मुद्दाम हिंदुस्थानांतून तिकडे लोक गेले पाहिजेत. या बाबतींत आर्यसमाजाची देखील हालचाल कोठें फारशी दिसत नाहीं. तसेंच आपल्या लोकांस आहे त्यापेक्षां अधिक प्रतिष्ठित पद प्राप्त होण्यासाठीं कांहीं भांडवलवाले देखील गेले पाहिजेत. येथें जमीन महाग आहे तथापि परदेशीं ती अजून बरीच स्वस्त आहे. ती जमीन आज जर कोणी घेऊन ठेवील तर कालांतरानें त्याचीं मुलेंबाळें धनाढ्य बनतील. शिवाय स्त्रियांचें गमनहि अवश्य आहे. परदेशीं जाऊन वसाहत करण्याच्या कामीं स्त्रियांनीं धैर्य दाखविलें पाहिजे. जेथें नवरा जाईल तेथें बायकोनेंहि जावें. यांत फारसा धोका नाहीं. हिंदुस्थानांत स्त्रियांची मान्यता आपण जितकी मानतों त्यापेक्षां पाश्चात्त्य संस्कृतीचे लोक अधिक मानतात, यामुळें स्त्रियांनां सच्छीलानें वागण्यास मोठीशी अडचण होईल असें नाहीं. स्त्रियांनीं एकटें जाणें कदाचित आज सुरक्षित नसेल. तथापि नवर्याबरोबर किंवा भावाबरोबर जाण्यांत मुळींच भीति नाहीं. विद्यार्थी जातात ते सपत्नीक गेले तर खर्च विशेष वाढेल असेंहि नाहीं. तेवढ्याच खर्चांत बायको काटकसरी व दक्ष असल्यास दोघांचाही गुजारा होऊं शकेल.
स्त्रीपुरूषांचा परस्परसंबंध हा विषय नेहमींच महत्त्वाचा आहे आणि आपल्या परदेशास गेलेल्या बांधवांच्या बाबतींत तो अधिकच महत्त्वाचा आहे. भारतीय स्त्रियांचा आजचा जीवितक्रम असा नाहीं कीं, त्या पुरुषांच्या अनेक खटाटोपांमध्यें धैर्यानें सहकारिता करूं शकतील. स्त्रिया मोकळेपणानें हिंडण्यास येथें बर्याच अडचणी आहेत आणि परदेशीं जाणार्या स्त्रियांची संख्या फारच थोडी आहे. इंग्लंडांतील विद्यार्थ्यांमध्यें पुरुषांची संख्या जवळ जवळ दोन हजार आहे. पण विद्यार्थिनी दहा वीस तरी निघतील किंवा नाहीं याची शंका आहे. विद्यार्थी सिव्हिलसर्विसची परीक्षा पास झाल्याबरोबर त्यावर पाश टाकण्याच्या आशेनें, उजवावयाच्या मुलींस घेऊन एखाददुसरी बंगाली स्त्री लंडनला आलेली दृष्टीस पडते. अमेरिकेंत कांहीं मिशनमार्फत आलेल्या ख्रिस्ती विद्यार्थिनी दिसतात. तथापि विद्यार्थिनींचें परदेशीं अस्तित्व अपवादादाखल आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. उच्च वर्गांतील स्त्रियांचें व तरुण मुलींचें गमन इंग्लंडसारख्या देशांत शिक्षण आणि लग्न या दोन्ही हेतूंनीं होतें. हे दोन्ही हेतू चांगले आहेत. आपणांस पाहिजे आहे तें एवढेंच कीं, स्त्रियांच्या परदेशगमनाचा वेग आणि प्रमाण आहे त्यापेक्षां अधिक व्हावें. चांगल्या वर्गांतील स्त्रिया जाण्याचें महत्त्व मोठें आहे. कनिष्ठ किंवा मजूर वर्गांतील स्त्रियांच्या परदेशगमनामुळें हिंदी स्त्रियांविषयीं परकीय लोकांचें मत आज चांगलें नाहीं. चांगल्या वर्गांतील स्त्रिया जर परदेशीं जाऊं लागल्या तर हिंदू स्त्रियांविषयीं आदर वाढेल आणि आपणांस आपले आर्थिक आणि सामाजिक प्रश्न सोडविण्यास आणि विशेषतः आपल्या लोकांचा आपलेपणा राखण्यास मदत होईल. आपल्या देशांतून स्त्रिया बाहेरदेशीं स्वतंत्रपणें जात नाहींत, एवढेंच नव्हे तर आपल्या पुरुषांचें बाहेरदेशीं जे प्रयाण होतें तेंहि सस्त्रीक होत नाहीं. पुष्कळ तरुण सिंधी व्यापारी यामुळें समाजांतील वृद्ध गृहस्थांवर चिडतात. कित्येकांनीं तर आम्हांस असें सांगितलें आहे कीं, सिंधी वृद्ध गृहस्थ आपल्या मुलांस ‘तुमच्या बायका आम्ही पाठविणार नाहीं, तुम्हीं पाहिजे तर तेथें कांहीं गुपचिप व्यवहार करा,’ असें सांगतात. स्त्रियांच्या बहिर्देशगमनाच्या अभावामुळें जे अनेक अनिष्ट परिणाम होत आहेत त्यांतील कांहींचा निर्देश येथें करणें अवश्य आहे. हे परिणाम बरेच व्यापक आहेत. त्यांतील मुख्य येणेंप्रमाणेः-
(१) अनेक तरुण वाईट मार्गाला लागतात. इंग्लंडसारख्या देशांत ब्रह्मचारी जाऊन त्यांपैकीं ब्रह्मचारीच परत येणारा वर्ग निम्यापेक्षां कमीच भरेल. जे लोक वाईट मार्गास लागतात त्यांपैकीं कांहीं जणांनां उपदंशप्रमेहादि रोग जडतात आणि ते पुढें हे रोग आपल्या पत्नींस देतात आणि आपल्या मध्यम वर्गांतील अनेकांचीं अपत्यें भाजून निघालेल्यासारखीं निघतात.
(२) जे लोक धंदा वगैरे शिकण्यासाठीं जातात त्यांपैकीं जे चांगलें असतात अशा अनेकांस परत येण्याची घाई सुटते. आपणांस विद्या जर खरी संपादन करावयाची असेल तर तो धंदा किंवा त्याचा अभ्यास पांचसात वर्षें केल्याशिवाय ती संपादितां येणार नाहीं, म्हणजे त्या विषयांत श्रेष्ठता येणार नाहीं. देशांतील धंदे उच्च स्थितींत आणण्यासाठीं किंवा बरीच पुढची विद्या संपादन करण्यासाठीं विशिष्ट शाखेंत सात आठ वर्षें अभ्यास किंवा परिश्रम अवश्य आहे. बाहेर देशीं गेलेला तरुण दोन चार वर्षांत कांहीं प्राथमिक ज्ञान मिळवितो, तों त्यास विवाहित असल्यास बायकोस भेटण्याची आणि अविवाहित असल्यास लग्न करण्याची घाई सुटते आणि परत यावें लागतें. आमचे तरुण लोक तेथें सपत्नीक गेले किंवा अविवाहितांस पत्नी निवडण्यासाठीं तेथेंच भारतीय तरुण मुली असल्या तर त्यांस परत येण्याची अशी घाई सुटणार नाहीं. तेव्हां शैक्षणिक दृष्टीनें स्त्रियांचें परदेशगमन अवश्य होय.
(३) सस्त्रीक व्यक्तीस सड्या व्यक्तीपेक्षां समाजांत मान्यता अधिक असते. लोकांनां आपल्या घरीं जेवावयास बोलावण्यानें स्नेहसंबंध अधिक जुळतो, व ही गोष्ट सस्त्रीक व्यक्तीलाच साधते. सस्त्रीक लोकांविषयीं सहानुभूति अधिक असते. बाजारांत त्याची पत असते. हा कोणी उपटसुंभ मनुष्य नव्हे असी लोकांची कल्पना होण्यास प्रमाण मिळतें; आणि याचा परिणाम सर्व व्यवहारांवर होतो.
(४) व्यापारउद्योग करणारा आपल्या उद्योगाला अनेक वर्षें चिटकून राहिला तरच त्या उद्योगाची वृद्धि होते. शांतपणें बसून फार फाजील घाई न करतां संस्थांचें, मग त्या व्यापारी असोत किंवा धर्मादायाच्या असोत, संवर्धन केलें पाहिजे. सस्त्रीक राहिलेला मनुष्य पंधरावीस वर्षें शांतपणें राहून व्यापाराची वृद्धि करूं शकतो. जमीनजुमला खरेदी करूं शकतो. ही गोष्ट आपल्या बायकांस हिंदुस्थानांतच ठेवून परदेशीं राहणार्या लोकांस शक्य नाहीं.
परदेशीं आणि विशेषेंकरून यूरोपांत पुरुषांबरोबर स्त्रिया जाणें हें आपल्या राहणीच्या सुधारणेच्या दृष्टीनेंहि अत्यंत महत्वाचें आहे. आपल्या राहणींत सुधारणआ होण्यास स्त्रियांस अधिक चांगल्या प्रकारची राहणी दिसली पाहीजे. घरच्या राहणीवर पुष्कळ गोष्टी अवलंबून असतात. पाश्चात्त्य तर्हेची रहाणी दिवसानुदिवस आपल्या घरांत, निरुपायानें म्हणा किंवा उपयोगाची वाटते म्हणून म्हणा, शिरत आहे. आपलीं घरें आणि शहरें अत्यंत गलिच्छ आहेत. पुणें शहरांत स्वच्छ घर मिळण्यास किती अडचण पडते हें प्रत्येक भाड्यानें रहाणार्या पुणेंकरास ठाऊक आहे. समाजाच्या अपेक्षा उच्च झाल्याशिवाय सुधारणा होणार नाहीं. गृह सुधारणें म्हणजे अनेक गोष्टींत सुधारणा करणें होय. पाश्चात्य गृहिणीस घरांतील भिंतीस कागद कसा लावावा, घरांतील प्रत्येक सामान चक्क कसें ठेवावें, तें अधिक दिवस कसें टिकवावें, रफू कसा करावा, स्वयंपाक लौकर कसा करावा, वगैरे गोष्टी ठाऊक असतात. खराब झालेल्या टेबलखुर्च्यांस वारणीस कसें लावावें, स्टोव्ह किंवा भांडीं चकचकीत ठेवण्यास कोणती रासायनिक द्रव्यें वापरावीं, हें समजतें. व्यवहारांतील अनेक धंदे गृहव्यवस्थेचींच अंगें आहेत. खाणावळी, चहाचीं दुकानें, कपडे धुणें कपडे नीट करणें, बरेंचसें शिवणकाम, लोणचींमुरंबे करणें, फळें राखून ठेवणें, वसतिगृहें चालविणें, लहान मुलांकरतां नर्सरी म्हणजे जोपासनागृहें चालविणें, बुटांनां पालिश करणें, भाकर्या म्हणजे पाव करून विकणें, केक्स तयार करणें, हे सर्व धंदे जरी निराळे आहेत, तरी त्यांचें ज्ञान प्रत्येक पाश्चात्त्य गृहिणीस असावें लागतें. परदेशी डॉक्टरीचा किंवा वकिलीचा धंदा शिकण्यासाठीं गेलेल्या तरुणांस या गोष्टीं मन घालणें मुळींच शक्य नाहीं. तथापि स्त्रिया तेथें गेल्यास अशा अनेक उपयुक्त कला हिंदुस्थानांत सहज आणतील.
ज्या प्रदेशांत भारतीयांची वस्ती बरीच मोठी आहे अशा अनेक वसाहतींत स्त्रियांचें संख्येनें अल्पत्व असल्यानें जे अनेक परिणाम दृष्टीस पडतात त्यांपैकीं कांहीं येणेप्रमाणेः- पहिला परिणाम म्हटला म्हणजे तेथील समाजामध्यें चार पांच पुरुषांनीं एका स्त्रीबरोबर रहावें अशा प्रकारची चालच पडल्यासारखी झाली आहे. दुसरा परिणाम म्हटला म्हणजे आपल्यापैकींच एकाची लग्नाची बायको त्याजपासून फितविण्याचा इतर हिंदुस्थानी लोकांकडून अधिक जारीनें प्रयत्न होतो. तिसरा स्वाभाविक परंतु निरानिराळे इतर परिणाम करणारा परिणाम म्हटला म्हणजे स्त्रियांची वाढलेली किंमत हा होय. याचे परिणाम असे होतात कीं सर्वांत जास्त पैसे देणार्या मनुष्यास तरुण मुलीचा विक्रय होतो; आणि अधिक पैसे देण्यास समर्थ आणि अधिक गरजू मनुष्य बहुधा उतारवयाचा असतो, त्यामुळें पुष्कळ मुली म्हातार्यांच्या हातीं लागतात. म्हातार्या नवर्याची तरुण बायको फितवणें हें काम सोपें असल्यानें सहजच फार चालतें आणि त्यामुळें पुढें बायकांचे खून होतात. पुष्कळदां बायका नवर्यास टाकून जातात किंवा चोरून व्यभिचार करितात. हिंदू बायका निग्रोबरोरहि पळून जाण्यास कचरत नाहींत असें दाखविण्यार्या गोष्टी ब्राँकहर्स्टनें पुढें आणल्या आहेत आणि चोरून झालेला पत्रव्यवहारहिमासल्याकरितां छापला आहे. बायको पळून जाणें हें दोन गोष्टींमुळें नुकसानीस कारण होतें. एकतर बायको जाते आणि दुसरें, ती जातांना आपले दागिने घेऊन जाते. हिंदु आपल्या जवळ असेल नसेल तें सर्व बायकोच्या अंगाखांद्यावर घालतो, त्यामुळें हें दुसरें नुकसानहि पुष्कळच होतें. यांत आणखी एक घोंटाळा उत्पन्न करणारी गोष्ट म्हटली म्हणजे हिंदुपद्धतीनें लावलेलें लग्न वसाहतींत कायदेशीर ठरत नाहीं. बरेच लोक या कायद्याविषयीं अज्ञान असतात, त्यामुळें किंवा बेफिकिरपणामुळें ते लग्नें नोंदून घेत नाहींत. डॉ. कोमिन्स याला ब्रिटिश गियाना येथील अधिकार्यांनीं जो रिपोर्ट केला त्या रिपोर्टांतून प्रस्तुत कायद्याच्या परिणामांचा उल्लेख करून असें दाखविलें आहे कीं, पुष्कळ हिंदू जोडपीं आपलें लग्न आपण ख्रिस्ती नसतां ख्रिस्ती चर्चमधून लावतात. मॅजिस्ट्रेटसमोर स्वस्त लग्न लावून न घेतां ख्रिस्ती देवळांत जाऊन लग्न लावून घेण्याचें कारण एखाद्या समारंभांत आपण केंद्रवर्त्ती व्हावें अशीं हिंदू स्त्रियांची इच्छा असते असें दिलेलें आहे.
स्त्रीपुरुषांचा संबंध असमाधानकारक करण्यामध्यें वसाहतींतील कायद्यांचा दोष केवळ कुली स्त्रियांवर कोणी कुलीनें बलात्कार केला तर त्यास शिक्षा फारच अल्प होते हा त्यास शिक्षा फारच अल्प होते हा आहे. कायद्यानें फक्त महिन्या दोन महिन्यांची शिक्षा ठेवली आहे. याचें कारण एवढेंच दिसतें कीं, कुलीस आणलें तें त्याजकडून काम घेण्यासाठीं; त्यास तुरुंगांत घातलें तर काम कमती होईल; त्याचा पुरता फायदा वसाहतीस मिळणार नाहीं; या प्रकारची व्यापारी कायदे बनवितांना ठेवली गेली.
स्त्रीपुरुषांच्या संबंधाच्या पवित्रतेस विघातक अशा वर ज्या गोष्टी सांगितल्या त्यांखेरीज आणखी एक विघातक गोष्ट म्हटली म्हणजे आपल्या देशांतून तिकडे वारवधूच पुष्कळ नेल्या ही होय. शंभर पुरुषांमागें चाळीस तरी स्त्रिया नेल्याच पाहिजेत, हा हिंदुस्थान सरकारचा कायदा असे; आणि परदेशांत जावयास चांगल्या बायका तर तयार होत ना. लग्न झालेले पुरुष सपत्नीक गेले तर शेंकडा चाळिसाचें प्रमाण भरण्यास मदत होईल. पण कुटुंबवत्सल माणसें फारशीं साहसास प्रवृत्त होत नाहींत. बहुतेक जाणारे लोक सडेच असावयाचे. अशा प्रसंगीं कायद्याचें कलम पाळून कुली नेण्यासाठीं बाजारांतील स्त्रियांकडे धांव घ्यावी लागली. अशा प्रकारच्या अनेक स्त्रिया तिकडे गेल्या म्हणजे वसाहतींतील लोकांची हिंदू स्त्रियांच्या नीतीसंबंधानें कल्पना चांगली कशी होणार ? हिंदू स्त्रियांवर बलात्कार यूरोपियन मळेवाले करतात ही गोष्ट आपण अनेक प्रवाशांच्या वर्णानांतून ऐकतों आणि देशापुढें ही गोष्ट अनेकदां मांडली जाते. याप्रकारें वर्णन करणारांत अनेक प्रामाणिक लोक आहेत तेव्हां तें खोटेंहि नाहीं. तथापि हिंदू स्त्रियांच्या अब्रुविषयीं आदर कमी उत्पन्न होण्यास दुसरीं कांहीं महत्त्वाचीं कारणें आहेत ही गोष्ट मात्र आपण विसरतां कामा नये.
परदेशीं गेलेल्या भारतीयांनीं तेथें जाऊन स्थाइक व्हावें अगर परत यावें हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. स्थाइक व्हावयाचें झाल्यास आपल्या स्त्रिया. तेथें बर्याच गेल्याशिवाय चालणार नाहीं. ज्या जातीचे पुरुष त्या जातीच्या स्त्रिया असल्या तर लग्नव्यवहार अधिक सुलभ व सुखावह होतो. तसेंच जर बर्याचशा स्त्रिया तेथें गेल्या नाहींत तर गेलेल्या मंडळीचें भारतीयत्व एका पिढींतच नाहींसें होईल. बरींचशीं माणसें प्रजोत्पतीशिवायच मरून जातील आणि कांहीं तेथेंच लग्न करितील. जर त्यांनीं तद्देशस्थ स्त्रियांशीं लग्नें केलीं तर मुलांचा हिंदुस्थानकडे ओढा कांहींच उरणार नाहीं आणि जीं माणसें परदेशास गेलीं तीं आपण गमावलीं असेंच होईल. कानडा आणि अमेरिकेचा पश्चिम भाग येथें हिंदुस्थानी पुरुषांची वस्ती बरीच आहे आणि भारतीय स्त्रिया फारच कमी आहेत एवढेंच नव्हे तर यूरोपीय वंशाच्या स्त्रिया देखील तेथें फार थोड्या आहेत. कां कीं पैसा मिळविण्या करितां पुरुष दूर ठिकाणीं जातात आणि स्त्रिया मागें राहतात हें स्त्रीपुरुषांच्या संख्याविषमत्वाचें कारण तेथेंहि परिणाम करीत आहेच. जेव्हां पुरुष मात्र अन्यदेशीं जातात आणि त्यांच्या जातीच्या स्त्रिया तेथें जात नाहींत तेव्हां अशा पुरुषांची स्थिति बरीचशीं पराधीन होते. कारण, या पुरुषांनां तद्देशस्थ कुमारींची अपेक्षा असणार आणि यासाठीं त्या समाजांत आपला प्रवेश व्हावा अशी इच्छा असणार; व उलट तद्देशस्थांस भारतीयांच्या समाजांत मिसळ्याची किंवा आपल्या समाजामध्यें भारतीयांचें स्वागत करण्याची मुळींच इच्छा नसावयाची. आपल्या तत्रत्य समाजांत स्त्रिया असल्या म्हणजे अशी स्थिति न राहतां दोन्ही समाजांमध्यें दळणवळण अधिक वाढेल. आपले जेथें पुरुषच आहेत आणि ते त्या देशांत असणार्या स्त्रियांच्या प्राप्त्यर्थ तेथील तरुणांशीं स्पर्धा करीत आहेत, तेथें अशा स्थितींत आपल्या लोकांची लग्नें झाल्यास तीं तात्पुरता अनिष्ट परिणामहि घडवून आणतील; कारण, हिंदू हे यूरोपीयांशीं विवाहयोग्य आहेत किंवा नाहींत हाच प्रश्न सध्याच्या स्थितींत तेथें उपस्थित होणार; युरोपीय हे हिंदूंशीं विवाहयोग्य आहेत किंवा नाहींत हा प्रश्न तेथें उपस्थित होणार नाहीं; आणि उत्पन्न झालेला प्रश्न यूरोपीय पुरुष आपल्या स्वतःच्या मताप्रमाणेंच सोडविणार. समाजाचें मत हें पुरुषाधीन असतें. स्त्रियांच्या आधीन नसतें. उभयसमाजांत परस्परविवाह बरोबरीच्या नात्यानें व्हावा ही कल्पना तेथील पुरुषांच्या मनांत आपल्या स्त्रियांचें तेथें अस्तित्व असल्याशिवाय उत्पन्न होणार नाहीं. यासाठीं आपल्या स्त्रिया परदेशीं असणें अवश्य आहे. शिवाय आपल्या स्त्रिया तेथें असल्यास आपल्या पुरुषांचें स्त्रीप्राप्त्यर्थ परावलंबित्वहि कमी होईल. हिंदु मनुष्य परकीय लोकांशीं लग्न करण्यास नाखूष असतो हें खरें, तथापि आपल्या जातीबाहेर लग्न करण्याची त्याची नाखुषी निग्रो स्त्रियांच्या संबंधानें तितकी दिसत नाहीं. १९०८ सालीं शोध केला होता त्यावेळेस पंजाबी पुरुषांनीं कानडांतील इंग्रज मुलींशीं केलेलीं लग्नें दहाबारांवर होतीं. असो.
हिंदुस्थानी स्त्रीपुरुषांचें अनेक ठिकाणीं असलेलें संख्याप्रमाण पुढें दिलेल्या कोष्टकावरून लक्षांत येईल. |
भरतखंडाबाहेरील भारतीय लोक, त्यांपैकीं भरतखंडांत जन्मलेले लोक व त्यांतील स्त्रियांचें पुरुषांशीं प्रमाण. |
भारतीय पुरुषांचें अस्तित्व असून स्त्रियांचें अस्तित्वच नाहीं अशीं पुष्कळ ठिकाणें या कोष्टकांत दृष्टीस पडतात. जेथें एकंदर वस्ती फारच अल्प म्हणजे दहाच्या आसपास आहे अशा ठिकाणचे आंकडे सोडून देतां आपणांस असें म्हणतां येईर कीं मारिशस, सिलोन,नाताळ, आणि जमेका हीं स्थानें वगळून इतरत्र स्त्रियांची कमतरता फार आहे. कानडामध्यें स्त्रियांच्या आगमनास विघातक अशी वृत्ति तेथील सरकारनें ठेविली होती. यांत हेतु हा होता कीं अशा पेंचांत हिंदी लोकांस पाडून त्यांनां स्वदेशीं जाणें भाग पाडावें. या परिस्थितीचा परिणाम काय झाला हें लाहोरच्या कटाच्या खटल्यावरून स्पष्ट होणार आहे. या परिस्थितीनें उघड झालेल्या ब्रिटिश सरकारच्या कानडांतील दौर्बल्यामुळें हिंदुस्थानांतील अत्यन्त राजनिष्ठ लोकांस अराजनिष्ठ बनविणें हें बंड करण्याच्या कटाच्या उत्पादकांस शक्य झालें. गदरची चाललेली चळवळ ही एकच चळवळ कानडांतील शीख लोकांमध्यें नव्हती. गुरुद्वाराच्या चळवळी, धार्मिक स्वरूपाच्या चळवळी वगैरे तेथें अनेक होत्या. परंतु या सामाजिक चळवळी करणारांचें आणि तुमचीं दुःखें ब्रिटिश सरकारच्या कानावर घालतों म्हणून चळवळ करणारांचें तेज चिडलेल्या लोकांत अर्थातच कमी पडलें. कनेडीयन लोकांस हिंदुस्थानांत बंड झालें तर त्याची पर्वाच नव्हती. ते म्हणत बंड झालें तर आम्ही लढावयास दारूगोळा व पैसा पाठवून देऊं. पण या काळ्या अदमींचें वास्तव्य आम्हांस नको. दक्षिण आफ्रिकेमधील लोकांनीं बर्याच प्रसंगीं असल्याच प्रकारची वृत्ति प्रदर्शित केली होती. असो.
निरनिराळ्या वसाहतींमध्यें जे हिंदू गेले त्यांची कथा मनोरम करण्यासाठीं त्यांच्या वैभवाच्या, सौख्याच्या, किंवा ज्यांबद्दल आपणास अभिमान वाटेल अशा युद्धांच्या कथा देतां येत नाहींत. त्यंचें अस्तित्व आपल्या लोकांस सांगावयाचें म्हणजे तेथील कागाळ्याच वर्णन करावयाच्या. आपल्या देशांतच धर्मप्रचारक संस्था कोठें आहेत तर आपण स्वत्वाचें रक्षण करणारे प्रचारक तेथें पाठवूं ? आपल्या देशांतच भांडवलाचें एकीकरण कोठें झालें आहे ? हें एकीकरण होऊन आमचें भांडवल कर्तृत्वक्षेत्रासाठीं जगाच्या पृष्ठभागावर चोहोंकडे पाहूं लागलें तरच त्याचा आणि निरनिराळ्या हिंदुस्थानी वसाहतींचा संबंध उत्पन्न होईल. जगाच्या अनेक घडामोडींचें आणि रोज बदलणार्या परिस्थितींचें आपणच अवलोकन कोठें करितों तर विदेशीं गेलेल्या स्वजनांस आपण जीवनार्थ कलहामध्यें धडपड करण्यासाठीं जागृत करूं शकूं ? आपली आपल्या देशांतच अधिक प्रगति झाल्याशिवाय इतरत्र गेलेल्या स्वजनांचें दुःखनिवारण आपणांस अशक्य आहे. जगांतील सामान्य मनुष्य या नात्यानें प्रत्येकास जे हक्क अवश्य आहेत तेच आपणांस अजून मिळवावयाचे आहेत, तेव्हां आपल्या संस्कृतिप्रसाराची गोष्ट सहजच दूर आहे. प्राचीन काळचा आपला प्रसार आणि आजचा प्रसार यांतील महदंतर आतांपर्यंत झालेल्या विवेचनावरून स्पष्ट लक्षांत येईल. किरणांची अपेक्षा तेजोमय गोलकाशिवाय अशक्य आहे. जोपर्यंत स्वदेशांतच आपण मोठमोठ्या योजना केल्या नाहींत तोंपर्यंत इतरत्र गेलेल्या लोकांस आपण टेंकू तरी कसा देणार ?