प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ११ वें.
बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम.
पारशी, यहुदी व चिनी यांचा हिंदुसमाजावर परिणाम.- आज या देशांत ख्रिस्ती व मुसुलमान यांनीं एतद्देशीय लोकांस आपल्यांतलें केलें, एवढेंच नव्हे तर पारशांनीं देखील हिंदूंतील माणसें घेऊन समाजवर्धन केलें. आजच्या पारशी लोकांतील अनेक लोकहि मुळचे इकडचेच आहेत. डावर हें आडनांव ठाण्याच्या आसपासच्या वारली जातींत व पारशांतहि आढळतें. देशांतील शिष्टवर्ग त्यांच्या संप्रदायांत मिळेना व केवळ खालच्या जातीचेच लोक त्यांच्या जातींत समाविष्ट होत म्हणून ही पार्शीकरणाची चाल त्यांनीं अलीकडे बंद केली आहे असें डॉ. ढाला म्हणतात. अलीकडे पारशांत परकीय लोकांस स्वसमाजांतर्गत करावें म्हणून म्हणणारा एक पक्ष आहे तथापि त्या पक्षाचा हेतु यूरोपीय लोकांचा आणि विशेषेंकरून स्त्रियांचा समावेश स्वजातींत व्हावा असा आहे. त्या पक्षास विरुद्ध पक्षाचे लोक ‘चिरूटिया’ किंवा ‘मडमिया’ (म्हणजे चिरूट ओढणें किंवा मडम बायको करणें या बाबतींत स्वातंत्र्य अपेक्षिणारा वर्ग) म्हणतात. परजातीयांस स्वजातींत घ्यावें किंवा नाहीं याबद्दल पारशांनीं इराणांतील धर्मशास्त्रज्ञांकडून रेवायत नांवानें ओळखिले जाणारे जे शास्त्राधार आणले त्यांत परप्रवेशानुकूल अभिप्राय व्यक्त करून घेतला आहे. आजचे पारशी स्वजातिसंवर्धनाकडे फारसें लक्ष घालीत नाहींत याचें एक कारण जातीच्या पंचायतीचा जो निधि आहे त्या निधीचा फायदा घेणार्यांची संख्या वाढूं नये असें सांगण्यांत येतें. तथापि हें कारण सर्वांशी खरें नाहीं. स्वकीय विद्या समाजसभासदत्व हें धन समजून त्याचा उपभोग इतरांस घेतां येऊं नये ही भावना हिंदूंप्रमाणें त्यांतहि आहेच. पारशी मद्रासांमध्यें अवेस्ता शिकविण्यासाठीं परकीयांस अजून घेत नाहींत या गोष्टीवरून पारशांनीं वेदरक्षणाच्या सांप्रदायिक बाबतींत हिंदूंचें किती अनुकरण केलें आहे हें दिसतें. पार्शी लोकांचें हिंदूंशीं साम्य दाखविणारी दुसरी एक गोष्ट अशी आहे कीं, गाथा, वेंदिदाद या ग्रंथांत जे विचार उपदेशिले आहेत ते पारशांच्या विचारांचें नियमन करीत नाहींत, केवळ उपासना आणि विधी या गोष्टींपुरताच पारशी दस्तुरांचा आज उपयोग आहे. दस्तुर जे अवेस्ताचे पाठ म्हणतात ते शुद्ध नाहींत तर ते मूळ गाथांचे खरे उच्चार सोडून भ्रष्ट उच्चार करितात अशी पारशी सुशिक्षितांची समजूत आहे. {kosh ही समजूत दृढ होण्यास ग्रंथांच्या पूर्वींच्या यूरोपीयांनीं (उ० वेस्टरगार्ड, १८५४) संशोधिलेल्या प्रती होत. आतां गेल्डनरची आवृत्ति प्रसिद्ध झाली आहे. तींतील उच्चार भिक्षुकी उच्चारांच्या अधिक जवळचे आहेत.}*{/kosh} जे विचार लोकांत सांगावेत आणि ज्या मतांची स्थापना चोहोंकडे करावी असे विचार आणि अशीं उत्साहजनक मतें पार्शीं ग्रंथांत नाहींत असें नाहीं. पण ते विचार अजून कर्तव्यास स्फूर्ति देतील इतक्या स्पष्ट तर्हेनें दस्तुरांच्याच मनांवर बिंबले नाहींत. अवेस्ताचा अर्थ न समजतां संध्येसारखा पाठ म्हणावा यापलीकडे त्यांचें ग्रंथज्ञान फारसें गेलें नाहीं. पार्शांच्या अस्तित्वामुळें हिंदूंवर काय सामाजिक परिणाम झाले हें सांगता येत नाहीं. थोडेसे हिंदू केव्हांतरी पारशी झाले हा एक परिणाम दिसतो. आपल्यांतील सोंवळ्याच्या कल्पना कमी होण्यास इराण्यांची होटेलें कारण झालीं, हा एक दुसरा परिणाम दिसतो. गुजराथी भाषेवर पारशी भाषेचा कांहीं परिणाम झाला आहे. पारशी गुजराथी म्हणून एक बोली तयार झाली आहे. तरी पण पारशांचा आपल्यावर फारसा परिणाम होण्याऐवजीं आपलाच पारशांवर अधिक झाला असें म्हणतां येईल.
पारशांशिवाय दुसरा परकीय संस्कृतीनें वेष्टीलेला अल्प समुदाय म्हणजे यहुद्यांचा होय. यहुद्यांपैकीं कांहीं गेल्या शतकांतील आहेत आणि कांहीं फार जुने आहेत. हे देखील आज आपला संप्रदाय वाढवीत नाहींत. तथापि कांही वर्षांपूर्वीं ते संप्रदाय वाढवीत असावेत असे वाटते. कोचीन येथें गोरे व काळे असे यहुद्यांमध्ये भेद आहेत. तेथील गोरे यहुदी देखील अनेक शतकें येथें आहेत त्या गोर्यांचें म्हणणें असें आहे कीं, ते स्वतः शुद्ध रक्ताचे आहेत आणि काळे यहुदी मिश्र किंवा मूळचे हिंदू आहेत. काळे यहुदी असें म्हणतात कीं, आम्ही जुनें आहोंत. गोरा आणि काळा हा जसा यूरोपीयांनीं हिंदुस्थान जिंकल्यामुळें तीव्र भेद वाढत आहे. बेने इस्त्रायलांस इतर यहुदी कमी समजतात. बेने इस्त्रायस पूर्वीं नवीन आलेल्यांस हलके समजत असत.
डेव्हिड सासून यानें यहुदी लोकांसाठीं ज्या मोठमोठ्या देणग्या दिल्या त्यांचा उपयोग बेने इस्त्रायलांस होत नाहीं. बेनें इस्त्रायलांमध्यें मराठी भाषा लपविण्याची प्रवृत्ति होण्यास यहुदी समाजांतील काळागोरा भेद बराच कारण होतो हें स्पष्टपणें निर्देशिलें पाहिजेच. कोंकणी यहुदी म्हणजे बेने इस्त्रायल यांचीं व इतर यहुदी लोकांचीं लग्नें होत नाहींत. जेव्हां होतात तेव्हां त्या संबंध करणार्या गोर्या यहुद्यास इतर यहुदी वाळींत टाकतात, अशीं कांहीं उदाहरणें कलकत्त्यास दृष्टीस पडतात. गोर्या यहुद्यांपैकीं सर्वच लोक बेने इस्त्रायलांचें जातीनें यहुदीपण अमान्य करीत नाहींत. उलटपक्षीं बेने इस्त्रायलहि असें सांगूं लागले आहेत कीं, आम्हां बेने इस्त्रायलांतच काळा आणि गोरा अशे भेद पूर्वींपासून आहेत. असें सांगणारे बेने इस्त्रायल स्वतःस गोर्यांत जमा करतात हें सांगावयास नकोच. बेने इस्त्रायलांच्या रक्ताविषयीं शंका न घेतां त्यांच्या आचाराच्या शुद्धतेविषयीं दोष काढण्याचें सुरू झालें आहे. उदाहरणार्थ बेने इस्त्रालांच्या बायका तेबिल्ला घेत नाहींत म्हणजे विटाळशांनीं देवळांतील हौदांत स्नान करून शुद्ध व्हावयाचें तें त्या करीत नाहींत वगैरे अपवाद आतां बाहेर पडूं लागले आहेत. यहुदी लोकांच्या धर्मांविषयींचा आणि इतिहासाविषयींचा विचार पुढें येईल.
आतां आपल्या देशांतील चिनी लोकांकडे वळूं. आज त्यांची संख्या जरी अल्प आहे तरी ती पुढेंमागें मोठी होईल असा बराच संभव आहे. शिवाय हे लोक आले म्हणजे आपल्या देशांतील वैसदृश्य अधिक वाढलें असें होईल. या बाबतींत सरकारी शासनाचा उपयोग करून घेण्यासाठीं लोकांनीं जागरूक राहिलें पाहिजे. चिनी लोक या देशांत आले तर त्याची फिकीर येथील सरकारास खास वाटत नाहीं. पूर्वीं एकदां साष्टी बेटांत चिनी लोकांची वसाहत करवावी म्हणजे मुंबईच्या इंग्रज व्यापार्यांस लागणारे मजूर भरपूर मिळतील अशा तर्हेची योजना ईस्ट इंडिया कंपनीच्या हातीं राज्य कारभार असतां झाली होती. तथापि ती पुढें सोडून देण्यांत आली. कांहीं चिनी कैदी हिंदुस्थानांत ठेविले होते आणि त्यांस येथील हलक्या जातींच्या स्त्रियांपासून संततीहि झाली आहे. या संततीस आज नांव काय आहे तें कळलें नाहीं. थरस्टन {kosh Castes & Tribes in Southern India, Madras 1909,}*{/kosh} यांस “चायनीच तामिल क्रास” म्हणजे चिनी तामिळ मिश्रण असें म्हणतो. या वर्गाचें पुढें भवितव्य काय याजकडेहि आपणांस दृष्टी ठेवली पाहिजे.कलकत्त्यास अनेक चिनी येऊन जोड्यांचा व्यापार करणें, बूट तयार करणें, सुतारकाम करणें, या धंद्यांत पडलेले आढळतात. आजचे कलकत्त्यांतील सगळ्यांत चांगले सुतार हे चिनी होत असा समज कलकत्त्यास आहे. हे लोक जर देशांतच राहिले तर देश्य संस्कृति दुर्बल करण्यास जीं कारणे आहेत त्यांत आणखी एकाची भर पडेल. जेथें जातिभेद तीव्र आहे तेथें परकीय लोक आपल्या समाजांत समाविष्ट व्हावे ही इच्छा ठेवणें म्हणजे फार दूरच्या गोष्टीसंबंधानें ओरड करणें होय. या लोकांवर आपली छाप आपल्यांतीलच एखाद्या संप्रदायाकडून पडते असें दिसत नाहीं. कलकत्त्यास देखील कांहीं बौद्ध आहेत पण त्यांचा आणि चिनी लोकांचा संबंध मुळींच दिसत नाहीं. हे सध्यां अगदीं तुटक असल्यासारखे आहेत. नाहीं म्हणावयास एकदां असें प्रसिद्ध झालें होतें कीं हे चिनी लोक नेटिव ख्रिस्ती स्त्रियांशीं लग्ने करतात. हें जर खरें असेल तर कदाचित बंगालीपणा चिनी लोकांच्या भावी प्रजेंत शिरेल. कलकत्त्यांतील बंगाली लोकांस या संबंधानें स्पष्ट माहिती नाहीं, किंवा यासंबंधाचा विचारहि ते करूं लागले नाहींत.
एतद्देशीय ख्रिस्ती आणि चिनी पुरुष यांच्या योगानें जी संतति तयार होते ती दुसर्या परक्या समाजांत समाविष्ट होत असावी अशी कल्पना देणारा पुरावा थोडाबहुत पुढें आलेला आहे. मद्रास येथें १९१५ च्या जानेवारींतील इंडियन सायन्स काँग्रेसमध्यें डॉ. आननडेल यानें यूरेशियन समाजाच्या घटनेसंबंधीं एक व्याख्यान दिलें त्यांत असें दाखविलें कीं, यूरेशियन म्हणजे यूरोपीय पुरुष आणि एशियांतील स्त्रिया यांपासून होणारी संतति असा जो समज आहे तो बराचसा खरा नाहीं. यूरोशियनांत अनेक जातींचें मिश्रण सांपडतें, म्हणजे कांहीं ‘दिव्यजनसंभव’ प्रजा यूरेशियन लोकांत शिरली असावी असें त्यानें चिनी, मलायी वगैरे स्वरूपाच्या जमा केलेल्या यूरेशियनांच्या चित्रांवरून दिसतें.
बाह्य लोकांपैकीं जे लोक आपल्याच देशांत येऊन राहिले त्यांच्या चळवळींकडे आणि त्यांच्या संख्येच्या वृद्धीकडे आणि अपकर्षाकडे आपलें सतत लक्ष राहिलें पाहिजे. इतर देशांशीं स्पर्धा करण्याच्या कल्पनेपूर्वीं देशांतल्या देशांतच आपण कोणीतरी आहोंत ही वृत्ति नसेल तेथें उत्पन्न झाली पाहिजे व असेल तेथें टिकवली पाहिजे. परदेशी लोकांचें जर देशांतच महत्त्व वाढलें तर तें फार घातुक आहे. स्पर्धा करणार्या समुच्चयांपैकीं एकाची वृद्धि आणि प्रगति दुसर्याच्या प्रगतीस अनेक प्रसंगीं अडचण उत्पन्न करते. यूरोपीयांचे येथें जे व्यापारी संघ असतील किंवा गिरण्या असतील त्यांच्यापुढें आपला टिकाव लागला नाहीं आणि आपल्या व्यापारी संस्था मृत होऊं लागल्या तर मुळावरच घाला आल्यासारखें होईल. असें होण्यापेक्षां येथें आलेल्या यूरोपीयांचें आणि आपलें व्यवहारविषयक एकीकरण होण्याचा रंग दिसूं लागला आहे. पुष्कळ कंपन्या अशा निघतात कीं, कांहीं भांडवल एतद्देशीयांचें तर कांहीं यूरोपीयांचें; कंपनींतील कांहीं नोकर हिंदी तर कांहीं यूरोपीय. आपल्यामध्यें जोंपर्यंत कलाकौशल्य आणि व्यवस्थेची उत्तम शिस्त हीं वृद्धिंगत झालीं नाहींत तोंपर्यंत आपणांस यूरोपीय मंडळीच्या साहाय्याशिवाय गत्यंतर नाहीं. असो.
आतां यूरोपीय मंडळीची या देशांतील लोकसंख्या किती आहे हें आपण पाहूं.
हिंदुस्थानांत १९११ सालीं परक्या देशांत जन्म झालेल्या लोकांची एकंदर संख्या साडेसहा लाखांवर होती. या साडेसहा लाखांपैकीं यूरोपांत जन्म झालेले एक लक्ष बत्तीस हजार होते. आफ्रिकेंत जन्म झालेले दहा हजार, अमेरिकेंत जन्म झालेले दहा हजार, अमेरिकेंत जन्म झालेले २७६० आणि आस्ट्रेलेशियामध्यें जन्मलेले १२६७ होते. १९०१ सालीं या परक्या देशांतून आलेले लोक बरेचसे कमी होते. यूरोपांतून फक्त एक लक्ष चार हजार लोक आले. ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंड या भागांतून हजारों लोक केवळ शिपाईपेशासाठीं येतात. त्यामुळें यूरोपीयांची संख्या फुगली आहे. हे लोक जर वगळले तर येथें येणारे यूरोपीय किती थोडे आहेत याची कल्पना येईल. युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लड, स्काटलंड, आयर्लंड आणि वेल्स या भागांत जन्मलेले लोक जर वगळले तर या देशांतील यूरोपीय स्त्रीपुरुषांची संख्या १९०१ सालीं आठ हजार होती ती १९११ सालीं ९ हजार झाली. यावरून किती थोडक्या लोकांनीं आपला परदेशी व्यापार आणि देशाच्या सर्व किल्ल्या ताब्यांत ठेवल्या आहेत हें कळून येईल. बाहेरून आपल्या देशांत येणारा वर्ग अधिक सुशिक्षित व व्यवहारज्ञ आणि आपलें काम कसें करावें हें जाणणारा असतो. संख्येच्या दृष्टीनें अल्पत्व असून इतर दृष्टीनीं मोठें महत्त्व असलेला असा हा वर्ग आहे.
यूरोपांतील लोकांचें या देशांत महत्त्व केवळ त्यांच्या हातीं राज्यकारभार आहे याच दृष्टीनें आहे असें नाहीं. त्यांच्या हातीं किती उद्योगधंदे आहेत इकडे लक्ष दिलें पाहिजे. रेल्वे जेथें सरकारी नाहीं तेथें यूरोपियन भांडवलवाल्यांच्याच मालकीची असते. देशांत ज्या अनेक ब्यांका आहेत त्यांपैकीं बहुतेक ब्यांकांचे म्यानेजर व मुख्य अधिकारी यूरोपियनच आहेत. आपल्या लोकांनीं कांहीं उद्योग काढले आणि मोठें भांडवल त्यांत गुंतविलें म्हणजे त्यांस यूरोपियन अधिकारी नेमल्याखेरीज गत्यंतर नसतें. या सर्व गोष्टी लक्षांत घेतल्या असतां यूरोपीय लोकांचें देशांत सध्यां असलेलें वर्चस्व केवळ सरकारी मर्जीमुळें यूरोपीय उच्चस्थानावर बसतो एवढ्यावरच आधारलेलें नसून त्यांच्या अधिक इभ्रतीवर, अधिक विद्येवर आणि अधिक मेहनतीवर त्यांनां देशांत श्रेष्ठ स्थान मिळत आहे हें उघड होतें. ही गोष्ट आपल्या जितकी लवकर लक्षांत येईल तितकें चांगलें. वस्तूंची पैदास करण्यांत आणि कच्चा माल घेऊन त्याचा पक्का माल बनविण्याच्या कृतींत असलेलें यूरोपीयांचें प्रावीण्य त्यांस महत्त्वाच्या स्थानावर अधिष्ठित करीत आहे. विद्या आली म्हणजे अधिकारहि हातीं येतो. याच चहाच्या मळ्यांचेंच उदाहरण घेऊं. १९११ सालच्या आंकड्याप्रमाणें आसमांतील ६०९ चहाच्या मोठ्या मळ्यांपैकीं ५३६ मळे इंग्रज किंवा यूरेशियन लोकांनीं चालविले आहेत; आणि त्यांच्या मालकीचे मळे घेतले तर ते ६०९ पैकीं ५४९ भरतील, म्हणजे कांहीं मळे यूरोपियन लोकांच्या मालकीचे असून त्यावर व्यवस्था हिंदी लोकांची आह. हिंदी लोकांच्या मालकीचे चहाचे मळे आसमांत फक्त साठ आहेत, पण हिंदुस्थानी म्यानेजरांच्या देखरेखीखालीं असलेले ७३ आहेत.
आपले शास्ते या दृष्टीनें त्यांचें महत्त्व आपल्यावर किती आहे हें सांगावयास नकोच. स्वराज्य मिळालें तरी बर्याच काळापर्यंत हें महत्त्व कमी होणार नाहीं. कदाचित उलट वाढत जाण्याचाहि संभव आहे. यूरोपीयांचें देशांत जें महत्त्व आहे तें अधिकारामुळें आहे; तथापि बराचसा अधिकार गुणमूलक आहे. पुढें एवढें मात्र होईल कीं, नालायक यूरोपियन लोकांस केवळ यूरोपियन म्हणून मोठेपणा मिळवयाची कमी होईल. हिंदुस्थानांतील लोकांस जर राज्यकारभारांत आणि जगांत महत्त्व आलें तर त्यांचें कार्यक्षेत्र विस्तृत होईल आणि तें तसें होऊं लागलें म्हणजे त्यांस कार्यकर्तीं माणसें प्रथम यूरोपांतूनच आणावीं लागतील. आपल्या कारखान्यांवर आणि पेढ्यांवर आपण इंग्रज कां नेमतों ? उत्तर एवढेंच कीं, त्यांची आवश्यकता आज आहेच. आपला सुशिक्षित समाज फारच अल्प आहे आणि आहे तो जगांतील स्पर्धेशीं फारसा परिचित नाहीं. आपल्यामध्यें सर्व प्रकारच्या कार्यांस उपयोगीं पडणारीं माणसें अजून उत्पन्न व्हावयाचीं आहेत.
यूरोपीयांचे जे आपणांवर परिणाम होतात त्यांत सांस्कृतिक परिणाम फारच मोठे आहेत. अनेक नवीन शास्त्रें यूरोपांत आणि अमेरिकेंत उदयास आलीं. शास्त्रांचा हेतु जर सत्यशोधन आहे आणि सत्यामध्यें जर द्वैत नाहीं तर या सर्व शास्त्रांचा परिणाम आपल्या विचारपद्धतीवर होणारच. आज शास्त्रविकासाचा आपणांवर परिणाम एवढाच होत आहे कीं, शास्त्रज्ञानमुळें यूरोपीय लोकांस आलेलें बल आपणांस भोंवतें आणि त्यांनीं उत्पन्न केलेले पदार्थ आपणांस वापरावयास मिळतात. त्यांची शास्त्रें जाणून घेऊन आपणांमध्यें आपण कर्तृत्व उत्पन्न करून घ्यावयाची क्रिया फारशी सुरू झाली नाहीं आणि त्यांचें शास्त्रज्ञान आणि आपलें जुनें ज्ञान यांचें एकीकरणहि झालें नाहीं. हें एकीकरण कसें होईल हा एक मोठा स्वतंत्र विषय आहे आणि त्याचें विवेचनहि स्वतंत्रपणे करण्याचें योजिलें आहे.
हिंदु समाजावर परिणाम घडविण्यासाठीं ज्या ख्रिस्त्यांच्या मिशनरी संस्था आहेत त्यांचें स्थूलस्वरूपावर्णन दिलेंच आहे. हिंदु समाजाच्या आणि त्यांच्या प्रयत्नांच्या झटपटीमुळें समाजाचें भवितव्य कसें होणार आहे याचें विवेचन पुढें येईल.
आतां मुसुलमानांकडे वळूं. ख्रिस्ती संप्रदायापेक्षांहि ज्या परकिय संप्रदायाचें कार्य मोठें होऊन ज्यानें साडेसहा कोटींवर लोक आपल्याकडे ओढले असा संप्रदाय महंमदाचा होय. मुसुलमानांचा सर्व इतिहास हा या संप्रदायाचाच इतिहास आहे. कां कीं, संप्रदायासाठीं राज्य आणि राज्यासाठीं संप्रदाय इतका निकट संबंध मुसुलमानी संप्रदायाचा आणि राज्याचा आहे.
मुसुलमानांची वाढती संख्या आपणांस परिचित आहे. मुसुलमानांच्य हिंदुस्थानांत वाढत असेलेल्या या संख्याबलाबद्दल मुसुलमानांविषयीं मत्सरबुद्धि जागृत होत आहे. तथापि यासंबंधांत ज्या एका मुख्य गोष्टीचा विचार करावयास पाहिजे ती ही कीं संख्याबल हें त्यांच्या समाजास व्हावें तसें हितावह होत आहे कीं कसें ? मुसुलमानांचें संख्याबल त्यांस हितावह होत नाहीं कारण, मुसुलमानांमध्यें काम करण्यास लायख अशा स्त्रीपुरुषांचें प्रमाण कमी आहे. १९११ सालीं दहा हजार हिंदु पुरुषांत वीसपासून चाळीस वर्षांचे ३२१६ पुरुष होते. मुसुलमानांत फक्त ३०४७ होते. चाळीपासून साठ वर्षांपर्यंतचे पुरुष हिंदूंत १६७३ होते तर मुसुलमानांत १४९३ होते. १९०१, १८९१, १८८१ सालीं देखील अशीच स्थिति दिसते.
हिंदुमुसुलमानांच्या तुलनेसंबंधाच्या दोघांच्या वाढीवर परिणाम करणार्या आणि दोन्ही समुदायांच्या सौख्यविषयक प्रश्नांवर प्रकाश पाडणार्या महत्त्वाच्या गोष्टी येणेंप्रमाणेः-
१५-२० या वयाचे पुरुष मुसुलमानांत १८९१ सालची गणना वगळतां हिंदूंपेक्षां कमीच दिसतात.
१५-२० वयाच्या स्त्रिया मुसुलमानांमध्यें हिंदूंपेक्षां नेहमीं जास्त असतात.
२०-४० वर्षांच्या स्त्रिया हिंदूंमध्यें मुसुलमानांपेक्षां अधिक आहेत.
१५-४० वर्षांच्या स्त्रिया घेतल्या तर त्या हिंदूंमध्येंच अधिक दिसतील.
तथापि स्त्रियांच्या प्रसवशक्तीच्या जोमाचीं हिंदुस्थानांतील मुख्य वर्षें १५-२० हींच आहेत. कां कीं, येथें लग्नें लवकर होतात आणि १५ पासून ४५ वर्षांपर्यंत स्त्रियांची प्रसवशक्ति एकसारखी वयपरत्वें कमी कमी होत जाते.
मुसुलमानांमध्यें व हिंदूंमध्यें पंधरापासून वीस वर्षांच्या मुलींपैकीं शेंकडा ८५ मुली विवाहित असतात.
१० वर्षापर्यंतच्या पुरुषांची संख्या दहा हजार हिंदूंत १९११ सालीं २६२९ होती तर मुसुलमानांमध्यें ती २९२३ होती. स्त्रियांमध्येंहि अल्पवयी स्त्रियांचें प्रमाण फार मोठें आहे. यावरून असें दिसून येतें कीं मुसुलमान समाजामध्यें मुलें फार आहेत. आयुर्मर्यादा हिंदूंपेक्षां कमी. स्त्रियांमध्यें २०-४० वर्षांच्या स्त्रिया कमी, १५-२० वर्षांच्या पुष्कळ. विवाहकाल हिंदूंमध्यें व मुसुलमानांमध्यें सारखाच, आणि त्यामुळें हिंदूंपेक्षां मुसुलमानांत प्रजोत्पत्ति अधिक पणा अल्पवयी मृत्यू त्यापेक्षांहि अधिक आहेत.
याचा अर्थ हा कीं, मुसुलमान समाजावर अपत्यसंगोपनाचा बोजा हिंदूंपेक्षां अधिक आहे आणि द्रव्योत्पादनक्षम वयाचीं माणसें मुसुलमानांत कमी आहेत. एकंदरींत मुसुलमानांचें संख्याधिक्य थोडेंसें भ्रामक आहे. त्यांची एकंदर लोकसंख्या अधिक भरते पण ती कामास येत नाहीं; तिचा बराच भाग केवळ कार्यक्षम लोकांवर अधिक बोजा टाकण्यास कारण होतो.
या तर्हेचें विवेचन करणें म्हणजे अर्थशास्त्रांत शिरणें होय. तिकडे शिरलें म्हणजे पुष्कळच लिहिलें पाहिजे. सध्यां समाजाचा तात्त्विक विचार करीत करीत हिंदु, मुसुलमान आणि ख्रिस्ती यांच्या प्रश्नांकडे त्यांचें भवितव्य जाणण्यासाठीं वळूं. भवितव्य काढावयाचें तें सर्वांचेंच एकदम काढावें लागतें, आणि यासाठीं समाजाचें विशेष व्यापक नियम लक्षांत घ्यावे लागतात.