प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १२ वें.
समाजरूपांतराचे नियम आणि हिंदुसमाजाचें भवितव्य.
जातींची घटना आणि विघटना.- नवीन जातींच्या घटनेसंबंधानें आणि जुन्या जातींच्या विघटनेसंबंधानें सर्वसामान्य तत्त्वें येणेंप्रमाणें सांगतां येतील.
(१) जेव्हां वर्ग, जाती, आणि राष्ट्रें आपली प्रसरणशक्ति घालवितात तेव्हां त्या संकुचित होऊन त्यांच्या निराळ्या जाती बनतात.
(२) आपली जात किंवा वर्ग वाढवावा या तर्हेची भावना जातीमध्यें किंवा राष्ट्रामध्यें किंवा वर्गामध्यें कधीं कमी कधीं जास्त अशी असते आणि तद्विषयक त्यांची वृत्ति वारंवार बदलते; आणि परक्यांचा समावेश आपल्या जातींत करावा किंवा करूं नयें हें त्या जातीच्या तात्कालिक वृद्धिपर किंवा संकोचपर भावनांवर अवलंबून असतें.
(३) ज्या अर्थीं अनेक जातींचें अगोदरचें स्वरूप वर्ग किंवा राष्ट्र यांच्या स्वरूपाचें म्हणजे पुष्कळसें बंधनरहित असतें त्या अर्थीं जाती कशा बनतात हें स्पष्ट करण्यासाठीं वर्ग कसे बनतात किंवा राष्ट्रें कशीं बनतात हें स्पष्ट केलें पाहिजे.
(४) जाती आणि इतर राष्ट्रवर्गादि भिन्न समूह यांच्या मधील भेद हा जितका तीव्र आहे असें समजलें जातें तितका नाहीं. समूहाचें संवर्धन किंवा संकोच हा समूहांतील वारंवार बदलणार्या लोकवृत्तीवर अवलंबून असतो आणि यासाठीं विशिष्ट समूह जात आहे किंवा वर्ग आहे याविषयींचें विधान विशेष काळजीपूर्वक केलें पाहिजे आणि जें विधान आज बरोबर असेल तें शंभर वर्षांपूर्वीं बरोबर असेलच असें नाहीं हेंहि लक्षांत ठेवलें पाहिजे.
(५) समूहाची वृद्धि जी होते ती सामुच्चयिक प्रयत्नानें झाल्याचें दिसत नाहीं. ज्या जातींत पंचायत किंवा कोणतीच शासनसंस्था नाहीं त्या जातींत सामुच्चयिक प्रयत्नाचा संभव नाहीं. तथापि ज्या जातीमध्यें पंचायती वगैरे आहेत त्या जातींत देखील वृद्धि होरो ती सामुच्चयिक प्रयत्नानें झाल्याचें दिसत नाहीं. नेहमीं असें दिसतें कीं एखाद्या समाजांत कांहीं बलवान व्यक्ती उत्पन्न होऊन त्या आपलें कार्यकर्तृत्व दाखवितात आणि आपल्या चळवळीनें समाजाची वृद्धि करितात आणि या त्यांच्या प्रयत्नानें जातीच्या स्वरूपांत फेरफार होतो.
(६) बहुतकरून असा नियम समजावा किं जे बलवान संघ आहेत त्यांची प्रवृत्ति प्रसारशील असते आणि जे दुर्बल समूह आहेत ते संकोचनप्रवृत्तीच असतात.
(७) बर्याचशा जातींचा इतिहास लक्षांत आणतां आपणांस असें दिसून येईल कीं, आपल्या जातीमध्यें जातींतच उत्पन्न झालेल्याखेरीज इतर कोणाचा प्रवेश होऊं द्यावयाचा नाहीं किंवा मिश्रविवाहापासून उत्पन्न झालेल्या संततीचा स्वीकार करावयाचा नाहीं हें तत्त्व ज्या जातींचा इतिहास आपणांस ठाऊक आहे त्यांपैकीं कोणीहि पूर्णपणें पाळिलें नाहीं. कोणत्या जातींतील माणसांचा प्रवेश आपल्या जातींत होऊं द्यावयाचा या संबंधाची निवड करून परकीय रक्त बहुतेक सर्व जातींत कमी अधिक प्रमाणानें घेतलें गेलें आहे. हें विधान महाराष्ट्रांतील कोंकणस्थ, देशस्थ व कर्हाडे ब्राह्मण, मराठे, माळी, सोनार, महार आणि महाराष्ट्रांतील गौड ब्राह्मण या सर्वांसंबंधानें करितां येईल. मराठे आणि धनगर यांनीं तर मुसुलमान दासीपासून झालेली प्रजा देखील आपणांत समाविष्ट करून घेतली आहे.
(८) जेव्हां एखादी नवीन जात वर्ग या रूपानें किंवा राष्ट्र या रूपानें तयार होऊं लागते त्या वेळेस असें होऊं लागतें कीं, ती जात निरनिराळ्या जातींचीं कुलें, वर्ग किंवा पोटजाती आपणांत समाविष्ट करून घेते. अशा वेळेस सामाजिक घटनेचें एखादें निकाळें तत्त्वहि उदयास येतें. ही गोष्ट मराठ्यांसारख्या जातीवरून सिद्ध होईल.
(९) जेव्हा सामाजिक घटनेचीं नवीन तत्त्वें उद्भूत होतात तेव्हां जुनीं तत्त्वें कमी महत्त्वाचीं होतात आणि जुन्या जाती नाहींशा होऊन नव्या जाती निर्माण होतात. ब्राह्मण जातींचें पृथक्त्व महाराष्ट्रांत वेदशाखामूलक आहे, परंतु तैलंग, द्राविड इत्यादि देशांत तें मतमूलक आहे.
(१०) जेव्हां जुने समुच्चय जाऊन नवीन समुच्चय बनतात त्या वेळेस त्या नवीन होणार्या समुच्चयांत निरनिराळ्या जातींचे लोक आले असतां ते त्या नवीन समुच्चयाच्या पोटजाती बनतात. त्या जातींमध्यें किंवा समुच्चयांमध्यें जेव्हां एकीकरणाचा प्रयत्न होतो तेव्हां आपसांतील पोटभेद काढून टाकण्याकडे प्रवृत्ति होऊन त्या जातींस अधिकाधिक एकरूपात येते. महाराष्ट्रांतील निरनिराळ्या जातींमध्यें ज्या पोटजाती आहेत त्यांपैकीं पुष्कळांची नांवें एकच आहेत. उदाहरणार्थ सोनारांत किंवा साळ्यांमध्यें ज्या पोटजातींचीं नांवें म्हणूंन सांपडतील तींच नांवें दुसर्या कांहीं जातींत सांपडतील. या तर्हेच्या गोष्टी उपर्युक्त तत्त्वाची सिद्धता करितात.
वरील विवेचनावरून असें दिसेल कीं, जातिभेद नष्ट न होण्यास कारणें लौकिक आहेत, आणि तो मोडण्यास जे प्रयत्न झाले पाहिजेत त्यांचा शतांशहि समाजाकडून झाला नाहीं. समाजाचें एकीकरण करण्यास ज्या गोष्टी उत्पन्न झाल्या पाहिजेत, त्यांपैकीं समाजास हेतु उत्पन्न झाला पाहिजे व समाजास केंद्र उत्पन्न झाला पाहिजे या मुख्य होत. आजपर्यंत सर्व समाजास एकत्र बांधूं इच्छिणार्या चळवळी पारमार्थिक स्वरूपाच्या असल्यामुळें त्यांचा केवळ एक विशिष्ट संप्रदायाच्या स्थापनेपुरता परिणाम झाला.
सर्व लोकांत सामान्य तर्हेनें उच्च प्रकारची वृत्ति व आचार उत्पन्न करण्यास विशेष व्यक्तिंचा पारमार्थिक उपदेश हें यंत्र अपुरें आहे, सर्व लोकांस साधें शिक्षण देण्याची खटपट ज्या वेळीं होऊन तींत यश येईल तेव्हां जनतेच्या अज्ञानापासून सुशिक्षित वर्गालाहि तापदायक होणारीं बंधनें कमी होऊं लागतील. सर्वसामान्य समाज गतानुगतिक असतां सुशिक्षितांस वेगळें राहून चालत नाहीं. शिक्षण सार्वत्रिक जोपर्यंत नाहीं तोंपर्यंत तीव्र आचारभेद राहील. एक दोन मराठे ब्राह्मणासारखे वागतील पण सर्व मराठे निराळेच वागतील आणि दिसतील. निरनिराळ्या जातींमध्यें वरवर दिसणारेंहि सादृश्य जोंपर्यंत वाढलें नाहीं तोंपर्यंत जातिभेदाविरुद्ध ओरड फोल होते. समाजांत सादृश्य वाढविण्यासाठीं मोठ्या प्रमाणावर शिक्षणाची खटपट पाहिजे आणि तें स्त्रियांतहि पाहिजे. शिक्षणानें उत्पन्न होणारें सादृश्य वाढलें आणि सर्व समाजास एकत्र ओढणार्या व्यक्ती अगर संस्था निर्माण झाल्या म्हणजे जातिभेदाचें स्वरूप कमी तीव्र होईल. हें सादृश्य उत्पन्न व्हावयाचें तें भारतीय विद्येमार्फत होईल, अगर इंग्रजी विद्येमार्फत होईल, याचा विचार पुढें करूं. तसेंच सर्व समाजामध्यें वजनदार असा एखादा शिष्टवर्ग उत्पन्न झाल्यास तो केंद्र होऊन त्याच्यामार्फत जातिभेद मोडण्यास मदत होत. तो शिष्टवर्ग कसा उत्पन्न होईल त्याचें स्वरूप कसें काय असलें पाहिजे हाहि विचार त्याबरोबरच करूं.
मुसुलमानांचें भवितव्य आणि हिंदूंचें भवितव्य या दोहोंचाहि विचार साकल्यानें केला पाहिजे. या दोघांचें एकत्व होईल किंवा दोन्ही समाज निरनिराळे रहातील यांपैकीं कांहीं तरी एक होणार हें उघड आहे. हे दोन पृथक् राहतील असें भविष्य करणें म्हणजे मनुष्योपायाची व्यर्थता व्यक्त करणें होय; आणि सर्व सामाजशास्त्रीय विद्येचा राजनीतीचा आणि या सर्वांहून मोठें जें ज्ञान त्या ज्ञानाचा उपमर्ध करणें होय. समाजभिन्नता जर विचारमूलक आहे तर विचाराच्या ओघाबरोबर समाजाचें स्वरूप बदललें पाहिजे. संप्रदाय जर विचारमूलक आणि आचारमूलक आहेत, आणि विचार शेवटीं सत्याच्या अनुषंगानेंच प्रवृत्त होणार हें सर्व विचारांचेंच ध्येय आहे; आणि सत्य जर शास्त्रांचा विषय आहे तर शास्त्रांची प्रगति झाल्यानंतर विचारभिन्नता राहील कशी व आचारभिन्नता राहील कशी?
समाजाचें पृथक्त्व आचारमूलकच असेल आणि आचार जर विचारमूलक असतील आणि विचार जर सत्यमूलक असतील तर सत्याच्या अनुषंगानें सर्व लोकांत विचार व आचार यांचें ऐक्य अगर सादृश्य हीं उत्पन्न होणारच. मग जर लोकभेद राहिला तर त्याचें कारण निराळें असलें पाहिजे. सध्यांच्या वृत्तींत फरक होणार नाहीं व दोन्ही समाजांचें पृथक्त्व कायमचें राहणार, हा सिद्धांत केवळ विचार न करणार्या आणि भेदाचा डोंगर पाहून घाबरून गेलेल्या मनुष्याचा होईल. प्रज्ञाचा होणार नाहीं.
लोकांत जे भेद राहतात ते भेद रक्षण करण्यासाठीं कांहीं तरी संस्था किंवा त्या संस्थेच्या अस्तित्वानें हित पावणारा मनुष्यवर्ग लागतो. ती संस्था अगर तो मनुष्यवर्ग आपल्या वर्गाच्या हितासाठीं माणसामाणसांत भेद राखतो. लदाखमध्यें बौद्ध आणि मुसुलमान निराळें कां तर एकाच्या हजार वर्षांपूर्वींच्या बापदाद्यांस महंमदाचा उपदेश ग्राह्य वाटला आणि दुसर्यास पंचवीसशें वर्षांपूर्वींच्या बुद्धाचा उपदेश ग्राह्य वाटला. म्हणून दोघांनीं एकमेकांशीं भांडावयाचें, अशी स्थिति दिसते. संप्रदायसंस्थापकाचा उपदेश काय होता याची माहिती कोणासच नाहीं. एक आपणास मुसुलमान म्हणवितो व दुसरा बौद्ध म्हणवितो एवढें मात्र खरें. त्यांचें भिन्नत्व आज राहतें तें भिन्न उपदेशांमुळें खास नव्हे तर मनुष्यांमनुष्यांमध्ये द्वैत उत्पन्न करून ज्या मध्यस्थांचा फायदा होत असतो त्यांच्यामुळेंच हें संप्रदायभिन्नत्व टिकतें. या वेळेस ज्ञान व विचार या दोहोंकडेहि दुर्लक्ष होतें आणि बाह्य आचार थोडाबहुत टिकतो. मुसुलमानाचें पृथक्त्व निराळें ठेवण्यास ब्राह्मणासारखी कायमची जात नाहीं किंवा रोमन कॅथोलिक संप्रदायाच्या सोपानपरंपरायुक्त गुरुमंडलासारखें गुरुमंडल नाहीं. महंमदी संप्रदायाचीं मुख्य अंगें म्हणजे, एक ग्रंथ, त्यानें सांगितलेल्या प्रार्थना व रिवाज, आणि चार कायदेपंडितांच्या परंपरा, बरीचशी सामुच्चयिक संपत्ति आणि खिलाफ हीं होत. कायदेपंडितांच्या परंपरचें महत्त्व कमी होण्यास अवश्यक गोष्ट ही कीं, कुराणाचा अर्थ लावण्यांत व्यक्तीनीं आपलें स्वातंत्र्य स्थापणें. या तर्हेचें स्वातंत्र्य जेव्हां स्थापिलें जाईल तेव्हां कुराणाचा मूळ अर्थ लक्षांत येऊन त्यापासून भिन्न असे जे आचारविचार आणि कायदा वगैरे गोष्टी समाजावर लादल्या गेल्या असतील, त्यांपासून आपलें स्वातंत्र्य स्थापण्याची मुसुलमानांस बुद्धि होईल. या तर्हेनें एका गोष्टीची वाट लागेल. खलीफाची वाट अंशेंकरून लागलीच आहे. मुसुलमानांचें पृथक्त्व आणि ऐक्य कायम राहण्यास कारण झालेली जगज्जयिष्णु आकांक्षा गेल्या तुर्कांबरोबर झालेल्या मित्रसंघाच्या तहांत धुळीस मिळाली. ती आकांक्षा नष्ट होण्याबरोबर मुसुलमानांच्या पृथक्त्वाचें राजकीय प्रयोजनच गेलें. सामुच्चयिक संपत्तीनें तयार झालेलें ऐक्य व पृथक्त्व हीं कांहीं दिवस कायम राहतील, आणि त्यांमुळें व राजकीय सनदी हक्कांमुळें हिंदुस्थानांतल्या हिंदुस्थानांत मुसुलमानांचा वरचष्मा असावा ही भावना कायम राहील आणि त्यामुळे संघबलानें प्रयत्नहि होतील. तथापि त्याचा परिणाम फारसा अनिष्ट होणार नाहीं.
देशाचे विभाग जर भाषेच्या तत्त्वानुसार पडतील आणि देशभाषेंत जर राज्य चालवावें ही परिस्थिति उत्पन्न होईल तर मुसुलमानांस हिंदूंशीं सदृशच व्हावें लागेल आणि आज ज्याप्रमाणें जैनांचें पृथक्त्व थोडेंसें निराळें आहे तथापि सर्वसामान्य समाजांतील तो वर्ग आहे त्याप्रमाणेंच मुसुलमानांची स्थिति होईल. देशामध्यें आर्थिक आणि राजकीय प्रश्नास जितकें अधिक महत्त्व येत जाईल तितकें पारमार्थक प्रश्नांचें महत्त्व कमी होईल. हिंदु समाज हा पारमार्थिक परंपरेनें बद्ध नाहीं आणि पारमार्थिक परंपरेचा जातिभेदाशीं संबंध नाहीं. यामुळें हिंदुस्थानांतील मुसुलमानांस मुसुलमानी संप्रदायाचे हिंदू म्हणवून घ्यावयास कोणतीच हरकत नाहीं. तथापि परंपरनें दृढ झालेल्या हिंदु शब्दाच्या अर्थासंबंधीं कल्पना एकाएकीं नष्ट होणार नाहींत आणि त्यामुळें मी मुसुलमान असून हिंदु आहें असें मुसुसमानानें आणि मी ख्रिस्ती असून हिंदू आहें असें ख्रिस्त्यानें म्हटल्यास आज ख्रिस्त्यांस, मुसुलमानांस व हिंदूंस सर्वांसच तें विलक्षण वाटेल. तथापि समाजाचें स्वरूप जितकें अधिकाधिक स्पष्ट होत जाईल तितकी मुसुलमानांस व ख्रिस्त्यांस आपल्या सांप्रदायिक उपासना सोडावयास न लावतां हिंदुसमाज वाढविण्याची कल्पना अधिक पटेशी होईल. सर सय्यद अहमद यांनीं मुसुलमानी संप्रदायाचे हिंदू असें हिंदुस्थानांतील मुसुलमानांनीं कां म्हणवून घेऊं नये असा प्रश्न उपस्थित केला होता पण या गोष्टीस बरींच वर्षें लोटलीं.
आपल्या देशामध्यें जो कायदा आहे तो कधींकाळीं कोणत्यातरी पुस्तकांत लिहिलेल्या नियमावरून इंग्रजांनीं घेतला असून तो लोकांच्या बोकांडी बसविला गेला आहे. शब्दांच्या अर्थाची धुडगूस करून कायदा बदलविण्याचे दिवस नाहींसे होऊन लोकेच्छा आणि लोकप्रवृत्ति यांच्या पायावर भावी हिंदुस्थानांतील कायदा उभारला जाईल. सरकारला हिंदु कायद्यांत हात घालूं द्यावयाचा नाहीं, या तर्हेची बुद्धि जी समाजांत वागत होती व आहे ती लोकसत्ता वाढूं लागेल तेव्हां कमी कमी होत जाईल. देशविभाग भाषेच्या तत्त्वानुसार पाडले गेले तर सामाजिक कायदे करण्याची प्रवृत्ति अधिकाधिक वाढेल. ही प्रवृत्ति वाढूं लागली म्हणजे आजच्या परिस्थितीस अनुकूल काय आहे याविषयीं विचार उत्पन्न होऊन लोक कायदे करूं लागतील. हीच प्रवृत्ति मुसुलमानांतहि उत्पन्न होईल, आणि त्यामुळें आजच्या मुसुलमानांनीं आपल्या विचारानें मुसुलमानांकरितांच जरी कायदे निर्माण केले तरी ते हिंदूंच्या कायद्यांजवळजवळच येतील, आणि चार कायदेपंडीतांच्या परंपरचें दास्य सुटेल. कालांतरानें इस्टेटीच्या वांटणीचे कायदे देखील देशांत सारखेच असावे असें लोकांस वाटूं लागेल, आणि या रीतीनें कायद्याच्या बाबतींत एकरूपात झाली म्हणजे उपासनेस कोठें जमावयाचें एवढ्याच भेदानें लोकांमध्यें भेद राहील. मुसुलमानांचें व हिंदूंचें आचारविचार साम्य दोन तर्हांनीं होईल. एकतर मुसुलमान लोकांच्या विचारांतच विकास होऊन त्यांची वृत्ति इतर जगाशीं सख्यक्षम होण्याच्या पद्धतीनें होईल अथवा मुसुलमान होतांनाच जुन्या हिंदू चालीरीति पुसटून जाण्याची क्रिया अपूर्ण राहिल्यानें होईल. सध्यां आपणांस दोन्ही प्रकारचें कार्य दिसत आहे. कुराणाविषयीं वृत्ति कशी काय रहावी याविषयीं मुसुलमानांत विचारांचे फांटे फुटले नाहींत असें नाहीं. ते फांटे विचाराचा अनेक बाजूंनीं विकास दाखवितात. ग्रंथवचन युक्तिनें सिद्ध करण्याची वेळ आली म्हणजे ग्रंथवचनापेक्षां युक्तींचें प्राधान्य सहजच आलें. मुसुलमानी विचारास जे फांटे फुटले आहेत ते नवीन विचारास वाव देण्यासाठीं आहेत. नवीन विचारांस वाव दोन तीन तर्हांनीं मिळावयाची. कुराणाशिवाय इतर सांप्रदायिक वाङ्मयाचें महत्त्व वाढवावयाचें, किंवा आप्तवाक्याचा अर्थ लावण्यांत कल्पकता दाखवावयाची किंवा परमेश्वराचे वक्ते महंमदाशिवाय इतर मान्य करावायाचे. या सर्व तर्हेनें मुसुलमानी विचारची प्रगति होत आहे. मुसुलमानांच्या चळवळींचें क्षेत्र पाहण्यासाठीं आपणांस पंजाब व बंगाल इकडे नजर फेंकली पाहिजे.
बंगालमध्यें पूर्वीं वाहाबी नांवाचा एक पंथ मुसुलमानांमध्ये निघाला होता. त्यांची चळवळ बंद करण्याचे प्रयत्न झाल्यानंतर त्यांपैकीं जे शिल्लक राहिले त्यांतील कांहीं आपणांस ‘अहल इ हादी’ असें म्हणवूं लागले. ‘अहल इ हादी’ या शब्दाचा अर्थ परंपरेतील लोक असा आहे. त्यांनां हें नांव मिळण्याचें कारण त्यांचें म्हणणें असें होतें कीं, “हादी म्हणजे कुराणांत न सांपडणारीं परंतु परंपरेनें चालत आलेलीं जीं महंमदाचीं वचनें आहेत त्यांचा अर्थ लावण्याचा आपणांस हक्क आहे.” वाहाबीपैकीं कांहीं लोक आपणांस ‘धैर मुकल्लिद’ म्हणजे परंपरेपासून फुटून निघालेले असें म्हणत व ते सुनी पंथाच्या चार इमामांचीं तत्त्वें मान्य करीत नसत. यांनांच रफियदैन असेंहि एक नांव असे.
बहार आणि ओरिसामध्यें अहमदी यांचा एक नवीनच पंथ आहे. यांचें मत असें आहे कीं, मेसाया, माहदि, कृष्ण हीं सर्व निरनिराळीं नांवें अथवा उपपदें आहेत व हीं सर्व नांवें या पंथाचा संस्थापक जो मिर्झा गुलाम अहमद तो आपणां स्वतःस लावीत असे. तो आपणास मुसुलमानांची सुधारणा करणारा म्हणून ‘माहदि’ म्हणवीत असे. ख्रिस्ती लोकांस पुन्हां ख्रिस्ताचीं तत्त्वें पाळावयास लावणारा म्हणून ‘मेसाया’ म्हणवीत असे व हिंदूंनां ऋषिप्रणीत धर्माची पुन्हां ओळख करून देणारा म्हणून कृष्ण म्हणवीत असे. सर्व धर्मांचें मूळ सत्यांत आहे आणि महंमदानें सर्व धर्मांतील सत्य घेऊन तें कुराणांत गोंविलें असें त्याचें तत्त्व असे. सर्व धर्मांच्या मूळाशींहि तेंच सत्य असून वेदांमध्यें, बायबलमध्यें, गीतेमध्यें व बुद्धाच्या वचनांतहि तेंच आहे.
आतां पूर्वसंस्कारांचे अवशेष बाटलेल्या मुसुलमानांत कसे राहतात हें पाहूं. कांहीं कांहीं ठिकाणीं जे वन्य लोक बाटवून मुसुलमान केले गेले ते अद्यापिहि आपलेच जुने आचार व शेजारपाजारच्या हिंदूंचे आचार पाळतात. पूर्निया जिल्ह्यांतील एका मुसुलमानी पंथांत कांहीं लोक हिंदूंप्रमाणेंच पितरांची पूजा करितात. त्यावेळीं ते दोन बांबू जमीनींत पुरून त्यांची पूजा करितात. ते झाडांची पूजा करून त्यांच्यापुढें भाकरी, साखर वगैरे नैवेद्य दाखवितात. कनिष्ठ जातीच्या मुसुलमान व हिंदूंचें दुसरें एक सामान्य दैवत म्हणजे देवता महाराज हें होय. याच्या द्वारपालास हादि म्हणतात. हें दैवत म्हणजे एक बांबू जमीनींत पुरलेला असतो व त्याला एक टोपली, एक तिरकमटा, एक मासे धरण्याचें जाळें व गळ अशीं बांधलेलीं असतात. या पूर्निया जिल्ह्यांतील मुसुलमान म्हणविणारे लोक हिंदूंच्या देवतांची, ग्रामदेवतांची वगैरे पूजा हिंदू पुजार्यांच्या हातून करतात. ते आपल्या शेजारपाजारच्या हिंदूंबरोबर हिंदू सण पाळतात व कालीच्या देवळास जातात. बहुधा प्रत्येक घरांत ‘खुदाइ घर’ म्हणून एक भाग असून त्यांत अल्ला व काली यांची प्रार्थना करितात. {kosh Purnea Steelement Report.}*{/kosh} हीं उच्च जातीच्या बाटलेल्या मुसुलमानांतहि अद्यापि हिंदू चालीरिती पाळतात. शाहाबाद जिल्ह्यामध्यें एक मूळचें रजपूत घराणें बाटून ख्रिस्ती झालेलें आहे. ते स्वतःला अद्याप रजपूत म्हणवितात. ते लग्नला ब्राह्मणाकडून मुहूर्त काढून घेतात व लग्नविधिहि हिंदू पद्धतीचा करितात.
हिंदुस्थानच्या पुष्कळ भागांतून मुसुलमान लोक हिंदू चालीरीती पाळतात. सर्पदंश झाला असतां ते हिंदू मांत्रिकांनां बोलवितात व ते मांत्रिक आपल्या देवतांस उद्देशून मंत्र म्हणतात. बंगालमध्यें मुसुलमान लोक हिंदू पुजार्याच्यामार्फत सर्पांची देवता मानसा हिची पूजा करितात. ओलाबिबि आणि सीतलादेवी यांची रोगनिवारणार्थ पूजा करणारे मुसुलमान बहार आणि बंगालमध्यें आढळून येतात. बहारमध्यें मुसुलमान बायका ‘छटपूजा’ नांवाच्या सूर्याच्या वार्षिक उत्सवांत भाग घेतात. ही पूजा केली नाहीं तर त्यांचेवर छटीमाता (सठी) कोप करील अशी त्यांची समजूत आहे.
मुसुलमानांमध्यें हिंदूंच्या जाती शिल्लक आहेत. अशा जाती प्रांतोप्रांतीं आहेत त्यांपैकीं काश्मीर प्रांतांतील अशा प्रकारच्या जातींची यादी येणेंप्रमाणेः-
अनेक मतानुयायी जाती. | ||
जातीचें नांव. | लोकसंख्या. | समुच्चय. |
अरोरा | ३,५२७ | हिं. शी. आ. मु.* |
बरवाला | ११,३५५ | हिं. मु. |
बसिथ | ७,६४७ | हिं मु. शी. |
बवरिया | ३४ | मु. हिं. |
बझिगार | १,२७६ | हिं. मु. |
बेदा | २२४ | मु. बौ. |
बेलदार | २,४१८ | हिं. मु. |
चुरा | ८,६९९ | हिं. आ. मु. शी. |
दर्जी | ३,९५८ | हिं. मु. |
दम | ५२,०९९ | हिं. आ. मु. शी. |
गद्दी | १०,५६३ | हिं. मु. |
गोरख | १,३३० | हिं. मु. बौ. |
हजाम | ३४,४५६ | हिं. मु. शी. |
जाट | १४१,४३९ | हिं. आ. मु. शी. |
झीवार | १३,५०० | हिं. मु. शी. |
जोगी | ५,५५३ | हिं. मु. |
कुंहिआर | १८,९५८ | हिं. मु. शी. |
लभाना | ५,३२१ | हिं. मु. शी. |
लोहार | २८,८८४ | हिं. मु. शी. |
मंग्रीक | ९८,५०८ | मु. बौ. |
मेघ | ७५,४०९ | हिं. आ. मु. शी. |
रजपूत | २०४,७४२ | हिं. आ. मु. शी. |
रिगझंग | ४,८८८ | मु. बौ. |
तरखान | २७,८७१ | हिं. मु. शी. |
तेली | १९,३०९ | हिं. मु. |
ठक्कर | १०४,६१३ | हिं. आ. मु. |
थथिआर | ६३ | हिं. मु. |
झरगर | ६,३७९ | हिं. मु. शीं. |
* हिं.=हिंदु; शी.=शीख; आ.=आर्य; मु.=मुसुलमान; बौ.=बौद्ध.; ___ खानेसुमारी १९११ |
वरील कोष्टकावरून दिसून येईल कीं रजपूत, अरोरा यासारख्या केवळ मोठमोठ्या जाती मुसुलमानांत शिल्लक उरल्या नसून पोटजातीहि शिल्लक उरल्या आहेत. सिलोनमध्यें ज्या प्रमाणें ख्रैस्त्य हें जातिकारक राहिलें नसून केवळ मत आहे त्याप्रमाणें “मौसलमान्य” अथवा ‘महंमदीयत्व’ जातिकारक न होतां केवळ मत होईल अशी अपेक्षा करण्यास हिंदू व मुसुलमान यांमध्यें दिसून येणार्या सारख्याच जाती कारण होतात. कांहीं काळापूर्वीं जारीनें आणि आज थोडाथोडा अजून असा प्रकार दिसतो कीं, मुसुलमान आपल्या जातीचीच हिंदूंमधील मुलगी करतात व हिंदू त्यांस मुली देतात. ही चाल बंद पाडण्यास स्वामी दयानंदानीं बराच प्रयत्न केला. मुसुलमानांमध्यें जाती राहिल्यानें पुढेंमागें हिंदू व मुसुलमान यांच्यामध्यें अधिक मोकळेपणानें व्यवहार होईल असें वाटतें.
समाजाचें भवितव्य प्रछन्न आहे. बर्याच गोष्टी आपल्या प्रयत्नावरच अवलंबून राहणार, आणि यासाठीं आपणांस प्रयत्नांची दिशा समजली पाहिजे. ती समजण्यासाठीं स्पर्धा क्षेत्राचें सिहांवलोकन करून नंतर भवितव्याच्या प्रश्नांचा खोल विचार केला पाहिजे.