प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १३ वें.
स्पर्धाक्षेत्राकडे पुन्हां एकदां.
पूर्वगत माहितीचें विंहगवृत्तीनें अवलोकन करून ज्या गोष्टी आपण प्रदेशानुरुप मांडल्या त्या आतां विषयानुरूप मांडल्या पाहिजेत. विषयास प्रारंभ जगाच्या स्पर्धेच्या अवगमनानें झाला, आणि ज्या स्पर्धा करणार्या संस्था जगांत आहेत त्या सर्वांत संस्कृतिसंस्था ही अत्यंत महत्त्वाची आणि आपल्या इतिहासांत अनेक राष्ट्रांचा इतिहास समाविष्ट करणारी असल्यामुळें संस्कृतिस्पर्धेचा विषय अगोदर हातीं घेऊन आपला ज्या संस्कृतीशीं अवयवावयवी संबंध आहे त्या हिंदु संस्कृतीचें आणि तिच्या प्रसाराचें व्यापक ज्ञान व्हावें म्हणून हिंदूंच्या जगभर झालेल्या खटपटी व चळवळी यांची जागेचा मर्यादितपणा लक्षांत घेऊन जितकी विस्तृत माहिती देतां आली तितकी दिली आहे. तिचें अवलोकन केलें असतां ब्राह्मणांच्या, बौद्धांच्या आणि संस्कृत वाङ्मयाच्या प्रवर्तकांच्या चळवळीचें खोल जरी नाहीं तरी व्यापक ज्ञान होईल. आतां हिंदु संस्कृतीच्या नांवें खालील खात्यांवर काय पडलें आहे याचा हिशोब देतों.
(१) हिंदु संस्कृतीनें म्हणजे संस्कृत ग्रंथांनीं व भाषेनें संस्कार केलेल्या भाषा.
(२) तिनें संस्कारिलेल्या जाती.
(३) हिंदूंच्याच वंशजांकडून व्याप्त झालेले किंवा त्यांचा जेथें बराचसा जमाव आहे असे प्रदेश.
(४) हिंदु संस्कृतीचें कालदेशदृष्ट्या महत्त्वमापन.
(१) भारतीय संस्कृतीचा संस्कृतभाषा व संस्कृतवाङ्मय यांच्याद्वारा इतर देशांवर झालेला परिणाम येणेंप्रमाणेः-
संस्कृत भाषेशीं निकट नात्याच्या भाषा भरतखंडाबाहेर ज्या देशांत आढळतात असे देश सिंहलद्वीप आणि मालदीव बेटें हे होत. या भाषा प्रचारावरून भारतीय जनतेचें मोठ्या प्रमाणावर प्रयाण सिद्ध होतें. ज्या आर्य भाषाकुलाबाहेरील भाषांवर संस्कृत भाषेंतील शब्दांचें त्यांत मिश्रण होऊन परिणाम झालेला आहे अशा भाषा अनेक असून त्या अनेक भाषाकुलांतील आहेत. ब्रह्मदेशांत चालणार्या ब्रह्मी, कुकिचिन, लोलो, सिनिटिक (करेण), थइ इत्यादि संघांतील सुमारें ७३ पोटभाषा या मूळ तिबेटो-चिनीकुलांतील असून त्यांत अनेक संस्कृत शब्द शिरले आहेत. मलायो-पॉलिनेशियन कुलांतील मलयु भाषा, ऑस्ट्रो-एशियाटिक कुलांतील मोन-ख्मेर व पलौंगवा संघांतील सुमारें १० भाषा व इंडो-चिनी संघांतील बिम, बत्ता, तागाल, लाव इत्यादि भाषा व द्राविड कुलांतील तुलुव, कोदगु, गोंडी व कोरकु या भाषा, जावाबेटांतील कविभाषा आणि फिलिपाइन व सुमात्राबेटांतील भाषा या सर्व भाषांमध्यें संस्कृत शब्दांचें मिश्रण झालें आहे. म्हणजे संस्कृतभाषेचा पगडा तिबेटो-चिनी, ऑस्ट्रो-एशियाटिक, द्राविड, इंडो-चिनी इत्यादि कुलांतील जवळ जवळ १०० परकीय भाषांवर बसला आहे.
संस्कृत भाषेचा यापेक्षां महत्त्वाचा परिणाम म्हणजे संस्कृत ग्रंथांचा प्रवेश ज्या भाषांत झाला आहे अशा भाषा मलयु आणि जावा या होत.
ज्या भाषांवर संस्कृत भाषेचा परिणाम झाल्याचें स्पष्ट दिसत नाहीं पण तसा संशय घेण्यास सबळ कारणें आहेत अशा भाषांमध्यें सेलिबिसमधील बूगी भाषा मोडते.
चिनी भाषेंत संस्कृत वाङ्मयाचा प्रवेश झाला पण त्या भाषेवरील परिणाम अद्यापि मोजला गेला नाहीं. तिबेटी व जपानी भाषांवर परिणाम झाल्याचीं चिन्हें दिसत आहेत.
ज्या भाषा मूळ आर्यकुलांतील असून ज्यांचें स्वरूप इतर भाषांचा त्यांवर परिणाम झाल्यानें पालटलें आहे अशा भाषा म्हणजे मालदिवी व काफरिस्तानांतील पैशाची या होत. हा भारतीय विजयाचा भाग नसून अपसृष्टीचा भाग होय. लखदिवी भाषा द्राविड कुळांतील असून अपसृष्ट झाली आहे.
(२) आतां भारतीय संस्कृतीनें संस्कारलेल्या जातींचा हिशोब घ्यावयाचा. येथें आपणांस प्रथम ब्राह्मणांचें अगर तत्सम जातींचें हिंदुस्थानाबाहेर अस्तित्व किती ठिकाणीं आढळतें हें पाहिलें पाहिजे. हें अस्तित्व अनेक ठिकाणीं आहे. ब्रह्मदेशांत पावन, सयामांत ब्राह्मण, कांबोजांत बकु अथवा प्राम ब्राह्मण व आचार जात, मलायांत इदान जात, बलि व जावामध्यें पादण्ड, इत्यादि लौकिक नांवांनीं ओळखल्या जाणार्या जाती ब्राह्मणच आहेत. जेथें ब्राह्मणगौरव आहे तेथें हिंदुत्व पक्कें आहे असें समजावें. ज्या बाह्य देशांतील जातींवर भारतीय संस्कृतीचा परिणाम झाल्याचें अवशेषरूपानें दिसत आहे अशा जाती शोधूं लागल्यास पेगूंतील तलैंग लोक, काचिन लोक, आराकानांतील माघ, ब्रह्मी, काफरिस्तानांतील लोक, बलुचिस्तानांतील गिचकी जात, इराणांतली लुरी व गुदाद, आफ्रिकेंतील जुबालँडमधील कांहीं जाती, सेलिबिसमधील बूगी, बोर्निओमधील लोक, सुमात्रांतील अनेक जाती, कांबोजमधील चाम, इत्यादि आढळतात. बौद्धांचा तर सिंहली, ब्रह्मी, चिनी, जपानी, या लोकांवर व पूर्वेकडील द्वीपकल्पांतील व बेटांतील, लोकांवर अनेक बाबतींत महत्त्वाचा परिणाम झालेला आहे.
(३) भारतीयांच्या वंशजांकडून व्याप्त झालेले किंवा त्यांचा जेथें बराचसा जमाव आहे असे प्रदेश म्हटले म्हणजे, सिंहलद्वीप, लखदीव, मालदीव, अंदमाननिकोबार, ब्रह्मदेश, मलाया, सयाम, कांबोज, कोचिनचीन, टाँकिन, जावा, बलि, सुमात्रा, लाँबक, सेलिबिस, फिजीबेटें, मादागास्कर, पूर्व आफ्रिका, दक्षिण आफ्रिका, ब्रिटिश गियाना, त्रिनिदाद, व डच गियाना हे होत.
(४) भारतीय संस्कृतीचें कालदेशदृष्ट्या महत्त्वमापन करावयाचें तर सिलोनचा अगोदर उल्लेख केला पाहिजे. सिलोन देशांत भारतीय संस्कृतीचा प्रसार अत्यन्त प्राचीन काळीं झाला व सिलोन हें हळूहळू भरतखंडाचा एक भाग बनलें. त्यानंतर ब्रह्मदेश, मलाया, सयाम, कांबोज इत्यादि पूर्वेकडील देशांत भारतीय संस्कृतीचा प्रसार झाला व तेथें सिलोनइतका नसला तरी बराच महत्त्वाचा परिणाम झाला. पश्चिमेकडे फार प्राचीन कालापासून भारतीयांच्या वसाहती व राज्यें हीं अफगाणिस्तान, इराणचा कांहीं भाग, बलुचिस्तान इत्यादि प्रदेशांत होतीं; पण मुसुलमानी संस्कृतीनें तीं नष्ट झालीं व आतां फक्त कांहीं गोष्टी अवशेषरूपानें राहिल्या आहेत. मुसुलमानी आवेगापुढें भारतीय संस्कृतीच्या पराभवाचा काळ म्हटला म्हणजे ख्रिस्तोत्तर १००० पासून १५०० पर्यंतचा होय. त्यानंतर यूरोपीय सत्तेचा काल होय. ज्या लोकांनां मुसुलमानांबरोबर फारसे झुंजावें लागलें नाहीं अगर निदान त्यापुढें नमावें लागलें नाहीं असा प्रदेश म्हटला म्हणजे सिंहलद्वीप व इंडोचायनांतील कांहीं भाग होय. हिंदूंची उचल मुसुलमानांच्या सत्तेच्या प्रकर्षानंतर झाली असे प्रदेश म्हटले म्हणजे हिंदुस्थानांत विजयानगर, महाराष्ट्र व पंजाब हे होत व बाहेर बलिद्वीप हें होय. आफ्रिकेच्या पूर्व किनार्यावर भारतीयांच्या वसाहती बरेच दिवसांपासून आहेत; व तो प्रदेश वसतियोग्य करण्यास त्याच कारण झाल्या आहेत. आतां मात्र तेथें यूरोपीयांचा प्रवेश होऊन ते सर्वसत्ताधीश बनले आहेत. यानंतर अलीकडे जे भारतीय कूली म्हणून बाहेर गेले ते फिजीबेटें, ब्रिटिश गियाना, डच गियाना, त्रिनिदाद, दक्षिण आफ्रिका इत्यादि प्रदेशातं आढळतात. त्यांचें जरी तेथें संख्येनें महत्त्व असलें तरी त्यांची स्थिति अत्यंत निकृष्ट आहे.
आतां आपण विविध संस्कृतींचे स्पर्धासंबंध लक्षांत घेऊं.
भारतीय संस्कृतीला मुसुलमानी, चिनी व यूरोपीय या तीनहि संस्कृतीशीं झगडावें लागलें. चिनी संस्कृतीचा व आपला संबंध कसा काय आला या विषयीं साकल्यानें कल्पना आपणांकडे नाहीं म्हणून त्या स्पर्धेचें स्वरूप दाखविणारे उल्लेख एकत्र केले पाहिजेत. सिंहलद्वीपाकडे पाहिलें तर त्याजवर चिनी स्वारी १४०८ सालीं होऊन तेथील राजा चौथा पराक्रमबाहु यास चिनी फौजेनें कैद करून नेलें आणि पुढें ३० वर्षेंपर्यंत सिंहलद्वीप चीनचें मांडलिक होतें. खुद्द हिंदुस्थानांत पाहिलें तर असें दिसतें कीं, १८९० सालापर्यंत सिक्किम संस्थान चीनचें मांडलिक होतें आणि त्या सालीं चीननें त्यावरील आपलें अधिराजत्व सोडून इंग्रजसरकारास दिलें. इसवी सनाच्या ७ व्या व ८ व्या शतकांत काश्मीरचें राज्य देखील चीनला खंडणी देत होतें आणि नेपाळ दरबार जरी आज चीनची सत्ता कबूल करीत नाहीं, तरी मधून मधून आपला आहेर चीनच्या दरबारला पाठवितो. ब्रह्मदेश व चीन यांच्यामध्यें अनेक युद्धें अनेक प्रसंगीं झालीं आणि त्यांत कांहीं कालपर्यंत चीनचें अधिराजत्व ब्रह्मदेशास कबूल करावें लागलें. इडोचायना म्हणजे पूर्वेकडील द्वीपकल्प यामध्यें हिंदुस्थानची राजकीय शक्ति नव्हतीच पण सांस्कृतिक शक्ति देखील बरीच वितळलेली दृष्टीस पडते आणि चीनची वाढलेली दृष्टीस पडते. राजकीय गोष्टीच घेतां हें सांगितलें पाहिजे कीं कांबोजच्या राजानें चीनशीं मित्रत्वाचें नातें जोडण्याचा प्रयत्न इ. स. ६१६ पासून केला होता आणि पुढें आपण सुभेदाराची पदवी चीनकडून घेतली. टाँकिन संस्थान तर चिनी सत्तेखालीं जाऊन तेथें चिनी राज्यपद्धति चालू झाली. यवद्वीपांत देखील चिनीलोकांची स्वारी झाली होती आणि मयपहित येथील दोन सुंदर राजकन्या चीनच्या बादशहास नजर करण्यासाठीं तार्तार फौज घेऊन गेली. येणेप्रमाणें चीनचें वर्चस्व हिंदुस्थानच्या उत्तरेस, दक्षिणेस आणि पूर्वेस भासत होतें आणि हिंदुस्थानी कल्पनांचा जरी या प्रदेशांत प्रसार झाला तरी चीनची विद्या आणि बल यांचा परिणाम या देशांवर हिंदुस्थानच्या संस्कृतीचीं जाड पुटें बसण्यास प्रतिकूल झाला.
चिनी व भारतीय संस्कृतीच्या स्पर्धाक्षेत्रांत चीन, जपान, तिबेट, कांबोज व सयाम ह्या देशांचाच मुख्यत्वेंकरून समावेश होत असून ही स्पर्धा जवळ जवळ ख्रिस्ती शकाच्या आरंभापासून सोळाव्या शतकापर्यंत चालू होती.
भारतीय संस्कृतीचा चिनी संस्कृतीवरील सर्वांत मोठा विजय म्हटला म्हणजे भरतखंडांत निघालेल्या एका म्हणजे बौद्ध संप्रदायानें त्या संस्कृतीच्या घरांत शिरून तेथें आपलें कायमचें ठाणें बसविलें हा होय. सांप्रदायिक ग्रंथांच्या अनुषंगानें हिंदु कायदा, वर्षाचे विभाग पाडण्याची हिंदु रीति इत्यादि दुसर्याहि कित्येक गोष्टींचा चीन देशांत प्रवेश झाला असावा. चिनी राष्ट्रांत बौद्ध संप्रदायास शालिवाहन शकाच्या प्रारंभास बादशहाच्य बुद्धसंघप्रवेशामुळें प्रामुख्य आलें. त्या सुमारास १३ भारतीय ग्रंथकारांच्या १०४ ग्रंथांचीं चिनी भाषेंत भाषांतरें झालीं होतीं, व इ. स. ६७ पासून १०५८ पर्यंत ७५ प्रमुख भारतीय ग्रंथकारांनीं चिनी भाषेंत ६७५ हून अधिक ग्रंथरचना करून बौद्धसंप्रदायमूलक वाङ्मयाचा त्या देशांत पाया घालून दिला.
जपानांत भारतीय संस्कृति चिनी संस्कृतीच्या प्रवाहाबरोबरच शिरली. ह्या दोन्हीहि संस्कृतींचा प्रसार त्या देशांत कोरियामार्फत झाला. चिनी संस्कृतीचा परिणाम जपानच्या वाङ्मयावर झाला तोच त्याचें आपणांशीं सादृश्य जुळविण्यास कारण झाला. जपानांतील कांहीं मूर्तींचें भारतीय स्वरूपाचें तोंडवळें, आ, ई, ऊ, ए व ओ ह्या स्वरांचा चिन्हांच्या साहाय्यानें व्यंजनांशीं संयोग करण्याची रीत, कांहीं संस्कृत ग्रंथ, मोठमोठीं देवालयें, नगारे व घंटा यांचें अस्तित्व, अर्वाचीन काळाचा परिणाम होण्यापूर्वीं बर्याच प्रमाणांत तेथें प्रचारांत असलेली मांसनिवृत्ति, पारमार्थिक संप्रदाय व राष्ट्रीय संस्कार यांचें भिन्नत्व हिंदुस्थानांतील ब्राह्मणांसारखे तेथील शिंतो नांवाचे राष्ट्रीय संस्कारकर्ते, हीं सर्व चिनी संस्कृतीपेक्षां भारतीय संस्कृतीची तेथें अधिक छाप पडल्याचीं उदाहरणें आहेत.
भारतीय संस्कृतिजन्य बौद्ध संप्रदायाचा तिबेटवर इतका पगडा बसला आहे कीं, तेथें आतां अन्य संप्रदायाचा प्रसार होणें अशक्य झालें आहे. सातव्या शतकांत तिबेटी लोकांनीं संस्कृत वाङ्मयाच्या अभ्यासास सुरुवात करून आपली वर्णमाला तयार केली. त्यानंतर संस्कृत ग्रंथांचीं तिबेटी भाषेंत जीं उत्कृष्ट भाषांतरें झालीं त्यामुळें तिबेटी भाषेस बरेंच सोष्ठव प्राप्त झालें. १५ व्या शतकाच्या प्रारंभास तिबेटी लोकांनी चिनी वाङ्मयाचा जारीनें अभ्यास सुरु केला. अठराव्या शतकाच्या प्रथम पादांत तिबेटवर चिनी सत्ता पूर्णपणें प्रस्थापित झाली. तथापि, ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य हे तीन वर्ण, ब्राह्मणांप्रमाणें बोनबो नांवाच्या राष्ट्रीय संस्कारकर्त्यांचा वर्ग, विदुरासारखा वर्ग, विटाळाची कल्पना, साठ संवत्सरांचें चक्र, हिंदु व तिबेटी कालगणनापद्धतींतील साम्य, तिबेटांतील शिक्षणपद्धति व न्यायमीमांसकांची जुनी शिक्षणपद्धति यांतील सादृश्य, गोत्रांचें अस्तित्व, वांशिक धंदे, अस्पृश्यत्व, पूर्व तिबेटांतल्या तुकुहन लोकांतील सुतकाची चाल, बौद्धांतील कर्मवाद, पुनर्जन्मवाद, अद्वैतवाद, भोग्य वस्तूंचा त्याग इत्यादि कित्येक गोष्टींत ह्या लोकांच्या संस्कृतीचा भारतीय संस्कृतीशीं संबंध अद्याप दृष्टीस पडतो.
पूर्वेकडील देशांपैकीं कोचिनचीन व टाँकिन या देशांत चिनी संस्कृतीनें आपला पगडा बराचसा बसविलेला आहे. येथील अधिकार्यांचे दरबारी पोषाख, त्यांच्यामधील दहा दर्जे, त्यांच्याकडून होत असलेला कान्फ्यूशसच्या तत्त्वांचा पुरस्कार, त्यांच्या शासनपद्धतींतील कांहीं अंगें, चिनी लिपी व वाङ्मय यांचा त्या देशांत झालेला प्रसार, पितृपूजा, उपाध्याय वगैरे बाबतींत त्यांच्या धर्मांचें चिनी धर्मांशीं सादृश्य, या सर्व गोष्टी तेथील लोकांवर चिनी संस्कृतीचा किती परिणाम झाला आहे हें दाखवितात. या दोन्हीहि देशांनीं चीनच्या सत्तेखालीं बरींच वर्षें काढलीं आहेत. मध्यंतरी इ. स. १३७१ मध्यें भारतीय संस्कृतीचा संस्कार झालेल्या कांबोज राष्ट्रानें कोचिनचीनास आपल्या अमलाखालीं आणलें होतें. परंतु कोचिनचीन व टाँकिन या दोहोंतून एकाहि देशावर भारतीय संस्कृतीचा म्हणण्यासारखा परिणाम झालेला दिसून येत नाहीं. या राष्ट्रांचीं सांप्रदायिक तत्त्वें चिनी बौद्धांच्या तत्त्वांसारखीं आहेत. तेथें बौद्ध संप्रदायाचा प्रवेश अगदीं अलीकडे म्हणजे इ. स. १५४० त झाला असून त्याच्या अनुषंगानें जी कांहीं भारतीय संस्कृति तेथें शिरली असेल तेवढीच.
कांबोज देशाचा हिंदुस्थानांतील लोकांपेक्षां चिनी राष्ट्राशींच अधिक संबंध आला होता. तेथें हिंदू लोकांची ख्रिस्ती शकाच्या आठव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत एक वसाहत होती. पण त्याच्याहि पूर्वीं म्हणजे इ० स० ६१६ त कांबोजच्या राजानें चिनी दरबारांत आपला पहिला वकील पाठविला होता. इ०स० ११२८ त चीननें कांबोज येथें आपला सुभेदार नेमला; १३७१ सालीं कांबोजच्या राजानें चिनी साम्राज्यांतर्गत कोचिनचीनचें राज्य आपल्या हाताखालीं घातलें; व इ०स०१४५२ मध्यें चीननें कांबोजकडे आपला वकील पाठविला. या सर्व गोष्टींवरून इ. स. ६१६ पासून १५३८ त सयामनें कांबोजचें राज्य जिंकीपर्यंत चीन व कांबोज या देशांचा कोणत्या ना कोणत्या रीतीनें परस्परांशीं संबंध येत होता हें उघड होतें. तेराव्या शतकांत तर चिनी रहिवाशी कांबोजांत राहत असून ते व्यापारांत अग्रेसर होते. चिनी लोकांच्या संपर्कामुळें गृहोपयोगी लाकंडी सामानसुमान व भांडीं यांची कांबोजमधील लोकांस माहिती झाली. तेराव्या शतकाच्या अखेरीस कांबोजांत चिनी अंत्येष्टीविधीप्रमाणें विधि प्रचलित होता. रस्त्यावर चीनप्रमाणें डांकघरांची पद्धतहि तेथें त्या वेळीं अस्तित्वांत होती; व राज्यांतील वरिष्ठ अधिकार्यांतून वरिष्ठ शासनयंत्रांत सहा मंत्री घेण्याची पद्धतीहि चीनच्या संसर्गानेंच कांबोजमध्यें अस्तित्वांत आली. तथापि भारतीय संस्कृतीचा कांबोजवर बराच परिणाम झालेला आहे. तेथील बकु अथवा प्राम जातीचे लोक ब्राह्मणांचे वंशज आहेत. हे राजपुरोहित असून त्यांनां बेरोहेत असें म्हणतात. ते लांब शेंडी ठेवितात व त्यांचा आचार सोंवळेपणाचा असतो. वर्षाचे भाग पाडण्याची रीत व द्वादशवर्षांचें चक्र या गोष्टीहि भारतीय संस्कृतीच्याच निदर्शक आहेत. त्यांच्या वर्षाचा आरंभ चीनप्रमाणें कुंभराशीच्या अर्ध्यावर होत नसून भारतीयांप्रमाणें मार्चच्या मध्याच्या सुमारास होतो. दहाव्या शतकाच्या सुमारास कांबोजांतील ब्राह्मणी संस्कृतीच्या र्हासास सुरुवात होऊन तेथें बौद्ध संप्रदायाचा प्रवेश झाला; तथापि अद्यापहि त्या देशांत शैवसंप्रदायी लोक पुष्कळ आहेत. तेथील अंकोरवात वगैरे मोठमोठीं देवालयें, मूर्ती, लिंगें हे सर्व प्राचीन ब्राह्मणी संस्कृतीचेच अवशेष आहेत.
सयामांतील लोकांत आढळून येणारा चिनी संस्कृतीचा मागमूस पहावयाचा म्हटला म्हणजे पहिली गोष्ट त्यांच्या थइ भाषेंत बहुतेक एकाक्षरी शब्दांचा भरणा असून तिचें चिनीशीं साम्य आहे ही होय. त्या भाषेंतील अंक चिनीसारखेच आहेत. त्यांची काव्यें पठण करण्याची रीत कांहीं जण सामवेदपठणासारखी आहे असें म्हणतात तर कांहींच्या मतें ती चिनी पद्धतीप्रमाणें आहे. कांबोजप्रमाणें सयामच्या शासनपद्धतीवरहि चिनी संस्कृतीचा परिणाम झालेला दिसतो. तथपि प्राचीन काळीं ब्राह्मणांनीं सयामच्या राजकीय व सामाजिक घडामोडींत बरेच फेरफार घडवून आणले. हिंदुस्थानाशीं व्यापारी दळणवळण सुरू होऊन हिंदुस्थानांतील माणसें तिकडे गेलीं व तेथें हरिहरांचीं देवालयें वाढलीं. सयामांत अद्याम ब्राह्मणवर्ग जातिरूपानें आहे. घराची वास्तुशांति, राज्याभिषेक करणें व पत्रिका जुळविणें हीं तेथील ब्राह्मणांचीं कामें आहेत. थइ भाषेंत राम व रामायणांतील इतर व्यक्ती यांच्या विषयींचे ग्रंथ असून रामायणांतील प्रसंगावर नाटकेंहि होतात. सयामांतील आधारभूत जुन्या कायदेग्रंथाचा हिंदु कायद्याशीं निकट संबंध आहे. या आधारभूत कायदेग्रंथांत पुष्कळ फरक करण्यांत आला आहे, तरी लाओम येथें अमलांत असलेला कायदेग्रंथ मूळ मानवधर्मशास्त्राच्या पाली भाषांतरावरूनच तयार झालेला आहे. तेथील न्यायांत हिंदूप्रमाणें दिव्याची पद्धतहि दिसून येते.
भारतीय व महंमदी संस्कृतींच्या स्पर्धेचा विचार करूं लागलें असतां ज्या कांहीं गोष्टी आपल्या दृष्टीस पडतात त्या येणेंप्रमाणें:- अफगाणिस्तान, बलुचिस्तान, इराण, मलाया द्वीपकल्प, जावा इत्यादि देशांत महंमदी संस्कृतीनें मजबूत व कायमचें ठाणें बसविलेलें दिसून येतें व त्यांचा जुन्या भारतीय संस्कृतीशीं संबंध केवळ त्या संस्कृतीच्या स्थानिक अवशेषांवरूनच ओळखतां येण्याजोगा राहिला आहे. प्रत्यक्ष हिंदुस्थानांत जवळ जवळ एक पंचमांश प्रजा मुसुलमान झाली आहे. या स्पर्धेचें क्षेत्र (१) अफगाणिस्तान (२) बलुचिस्तान, (३) इराण, (४) बोर्निओ (५) सोकोत्रा, (६) आफ्रिका, (७) तार्तरी, (८) त्रान्सकाकेशिया, (९) लखदीव, (१०) सुमात्रा, (११) सेलिबिस, (१२) मालदीव, (१३) फिलिपाइन्स, (१४) मलायाद्वीपकल्प, (१५) जावा, (१६) बलि व (१७) लाँबाक इतक्या देशांत असून स्पर्धेचा मुख्य काळ १० व्यापासून १५ व्या शतकापर्यंत होता. अफगाणिस्तानांत आज महंमदी संस्कृतीनें आपलें अप्रतिहत साम्राज्य स्थापन केलें आहे तरी, अद्यापहि तेथें भारतीय संस्कृतीचे प्राचीन अवशेष मधून मधून आढळून येतात. अफगाणिस्तान व बलुचिस्तान या दोन्हीहि देशांतील शेवटचें हिंदू राज्य अकराव्या शतकाच्या सुमारासच लयास गेलें. बौद्ध संप्रदायाच्या भरभराटीच्या काळीं अफगाणिस्तानांत अनेक बौद्ध मठ, स्तूप व नवविहार होते हें त्यांचे जे आज अवशेष सांपडतात त्यांवरून सिद्ध झालें असून, बामियन नांवाच्या गांवीं तर अद्यापहि बौद्धमूर्ती दृष्टीस पडतात. अठराव्या शतकाच्या अखेरीस गझनीचा व्यापार सर्वस्वीं हिंदूंच्या हातीं होता व अद्यापहि अफगाणी तुर्कस्तानांतील हैबक गांवाच्या व्यापारपेठांत हिंदूंचीं पुष्कळ दुकानें आहेत. काफिरिस्तानांतील लोक तर १८९४ पोवेतों मुसुलमान झाले नव्हते. तथापि आज अफगाणिस्तानच्या महंमदी संस्कृतींत हिंदु संस्कृतीचा जर कांहीं महत्त्वाच अवशेष शिल्लक दिसत असेल तर तो खुद्द अफगाण लोकांस लागू पडणार्या त्यांच्या पुख्तनवाली धर्मशास्त्रांतच होय. ह्या कायदेपुस्तकांत कित्येक रजपूत चालीरीतींचें व कल्पनांचें प्रतिबिंब पहावयास मिळतें. अफगाणिस्तानापेक्षां बलुचिस्तानांत भारतीय संस्कृति अधिक टिकाव धरून राहिली असें म्हटलें पाहिजे. कारण सातव्या शतकांत एक बौद्ध भिक्षु लासबेला येथें राज्य करीत असून, त्या वेळीं सर्व गंडावा प्रांत बुद्धानुयायी होता. अकराव्या शतकांत लासबेला येथें ज्या मुसुलमानानीं आपलें राज्य स्थापिलें ते मूळचे रजपूत घराण्यांतीलच होते. मकरान नांवाचा बलुचिस्तानांत जो एक प्रांत आहे तेथील गिचकी नांवाची मुख्य जात आपणांस रजपूत वंशाची म्हणवीत असून आम्ही सतराव्या शतकांत राजपुतान्यांतून येथें आलों असें ते सांगतात. या प्रांतावर बलुचिस्तानचा अंमल केवळ नामधारीच आहे. इराणमध्यें भारतीयांचा अंमल केव्हांहि नव्हता. तथापि तेथेंहि लुरिस्तानांत आज पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारे मुसुलमान आढळून येतातच. याशिवाय आश्रेफ नांवाच्या शहरातं हिंदुस्थानांतून आली असें समजण्यांत येणारी गुदाद नांवाची एक जात आहेच. पुनर्जन्मावरील विश्वास तिबेटांतील मुसुलमानांत देखील आढळून येतो. तिबेट हें भारतीय व महंमदी संस्कृतींचें स्पर्धाक्षेत्र होतें असें म्हणतां येत नाहीं. कारण तेथें मुसुलमानांची संख्या थोडीच असून, आहेत तेहि काश्मिरी व चिनी मुसुलमानांचे वंशज आहेत. या देशांत बौद्ध संप्रदायाचा इतका पगडा बसला आहे कीं, तेथें इतर कोणत्याहि धर्माचा शिरकाव होणें शक्यच नाहीं. त्रान्सकाकेशिया व तार्तरी हे देश आज सर्वस्वीं महंमदी संस्कृतीनेंच व्यापलेले आहेत. तथापि दोन्हीहि देशांत आज भारतीय संस्कृतीचे प्राचीन निर्जीव अवशेष मात्र मुबलक पहावयास सांपडतात. तार्तरी देशांत काश्गर प्रांतीं ख्रिस्ती शकाच्या पहिल्या आठ शतकांत बौद्ध संप्रदाय प्रचलित होता. त्या प्रांतांत व खोतान प्रांतांत कित्येक बौद्ध मूर्ती, नाणीं व संस्कृत हस्तलिखितें सांपडलीं आहेत. आबाकान्स्क शहरींहि हिंदुत्वाचे व बौद्ध संप्रदायाचे अवशेष मूर्तिरूपानें आढळून येतात. हिसार प्रांतीं तर व्यापारी वर्गांत हिंदूंचें अस्तित्व दिसून येत असून बुखारा संस्थानांतील बराचसा व्यापार हिंदूंच्याच हातीं आहे. ह्या संस्थानांतील हिंदू व्यापार्यांची संख्या सुमारें ३०० असावी. सोकोत्रा येथील व्यापार आरंभीं हिंदुस्थानच्या लोकांच्याच हातीं होता; पण पुढें तो अरबांनीं घेतला. मादागास्कर बेटांत बर्याच शतकांपासून, व पोर्तुगीजांच्या आफ्रिकेंत दिडशें एक वर्षांपासून हिंदू व्यापारी आहेत. अबिसीनियाशीं तर हिंदु लोकांचा व्यापार पूर्वापारापासून आहे. बोर्निओ हें पूर्वीं यवद्वीपाच्या हिंदु साम्राज्याखालीं होतें. त्या बेटांतील ब्रुनीई संस्थान १५ व्या शतकापर्यंत हिंदु सत्तेखालीं होतें. त्यानंतर पुढें तेथें मुसुलमानी राज्य झालें. या देशांत हिंदुत्वाची छाप पडते न पडते तोंच तेथें महंमदी संस्कृतीचा फैलाव झाला. लखदीवचे सुलतान इंग्रची अंमलाखालीं येण्यापूर्वीं मलबारांतील कॅनॅनूरच्या राजाचे मांडलिक होते. त्या बेटांतील भाषा मल्याळीच आहे, पण तींत अरबी शब्दांचें मिश्रण असून ती अरबी लिपींतच लिहितात. सुमात्रा बेटांतील मूळ संस्कृति हिंदूच होती व तें पूर्वीं जावानीज साम्राज्याखालीं होतें. इ. स. १२६५ त सुमात्रा येथें आदित्यवर्मा नांवाचा बौद्ध राजा होता. पण पुढें मुसुलमानांच्या स्वार्या होऊन आतां तेथें मुसुलमानी संप्रदाय सर्वमान्य झाला आहे. सेलिबिस बेटांत हिंदु व महंमदी संस्कृतीच्या स्पर्धाकाळास सतराव्या शतकाच्या आरंभाच्या सुमारास सुरुवात झाली. या बेटांतील बूगी भाषा संस्कृतजन्य असून तिच्यामधील ऐतिहासिक काव्यांतील वृत्तें संस्कृतसारखींच असतात. आज ह्या बेटांत किनार्यावर मुसुलमानी संप्रदायाचा अंमल आहे; तथापि अंतःस्थ भागांत जुन्या चालीरीतीच दृष्टीस पडतात. मालदीव बेटांतील भाषा सिंहली म्हणजे संस्कृतजन्य असून लोक अरब व हिंदू यांच्या मिश्रणानें बनलेले आहेत. फिलिपाइन्स बेटांत मुसुलमान प्रजा थोडी आहे. तेथील जुन्या परंपरागत भाषांत संस्कृतजन्य शब्द आढळून येतात. मलाया द्वीपकल्पांत बर्याच प्राचीन काळीं बौद्ध संप्रदाय प्रचलित होता. इ. स. १८०५ च्या सुमारास ह्या द्वीपकल्पचा किनार्यावरील प्रदेश महंमदीयांनीं व्यापला. मलयु भाषा अरबी लिपींत लिहितात; पण तिच्यामध्यें संस्कृत व तत्साधित शब्दांचा भरणा अरबी अंशाहून अधिक असून अरबी शब्द अद्यापि त्या भाषेंत संस्कृत शब्दांप्रमाणें पूर्णपणें मिसळलेले नाहींत. मलयु वाङ्मयांत कांहीं कथा संस्कृतवरून व कांहीं अरबी भाषेंतून रूपांतर करून घेतलेल्या आहेत. जावानीज राष्ट्र इ. स. १४०० पावेतों पूर्णपणें हिंदूच होतें. आज ह्या बेटांतील लोक मुसुलमान आहेत; तथापि त्यांच्या चालीरीती मुसुलमानांहून भिन्न आहेत. ते लोक हिंदु कायदाच वापरीत असून त्यांच्या स्त्रिया तर अजूनहि हिंदुधर्मच पाळतात. ह्या बेटांत अद्याप हिंदु संस्कृतीच पुष्कळ अवशेष शिल्लक आहेत. तेथें शालिवाहन शक चालतो. जावा भाषेंतील वाङ्मय संस्कृतापासून झालें असून त्यांत भारतीय छंद आहेत. तेथील गांवांचीं व संस्थानांचीं नांवें हिंदु संस्कृतीचे अवशेष आहेत. तेथें अमात्य आणि मंत्रिमंडळ यांनीं युक्त अशी राज्यव्यवस्था आहे. अमात्य, मंत्री, पुरोहित, धर्माध्यक्ष वगैरे अधिकार्यांचीं नांवें भारतीयच आहेत. लौकिक भाषेंत आणि पारमार्थिक व शास्त्रीय विषयांमध्यें भारतीय शब्दांचा भरणा आहे. बलिबेट तर अद्यापि सर्वस्वीं हिंदु आहे. तेथल्या समाजांतील चातुर्वर्ण्यव्यवस्था, ब्राह्मणांचा धोतर, उपरणें व तांबडी टोपी यांनीं युक्त पोषाख, त्यांच्या अंगावरील जानवें व रुद्राक्षमाला हीं चिन्हें, तेथें प्रचलित असलेला शालिवाहन शक व हिंदु कालगणना, महिन्यांतील जेष्ठ व आषाढ हीं हिंदु नांवें, सूर्यग्रहणीं सूर्य राहूकडून ग्रस्त होतो ही कल्पना, त्या देशांतील संस्कृत व संस्कृतपासूनच तयार झालेलें कविवाङ्मय, इत्यादि सर्व गोष्टी त्या बेटाच्या हिंदूत्वाची साक्ष पटवितात. हल्लीं तेथें ज्या खालच्या जातींचा ब्राह्मणांकडून तिरस्कार केला जातो त्यांत मात्र मुसुलमानी धर्म वाढत आहे. ह्या बेटाजवळच असलेलें लाँबाक बेट इ. स. १८३९ पासून १८९४ पावेतों बलिद्वीपस्थ हिंदूंचें मांडलिक होतें. आज ह्या बेटांत महंमदी संप्रदायानें आपलें ठाणें बसविलें आहे. तथापि तेथील लोकसंख्येमध्यें जवळ जवळ एक षष्ठांश लोक बलिद्वीपस्थ हिंदू असतील.
भारतीय व यूरोपीय संस्कृतीच्या स्पर्धेस सोळाव्या शतकापासून सुरवात झाली. भारतीय संस्कृतीशीं यूरोपीय संस्कृतीच्या स्पर्धेचा विचार करावयाचा तो तिच्या पारमार्थिक व आधिभौतिक अंगांचा भेद लक्षांत ठेवून केला असतां अधिक बोधप्रद होईल. यूरोपीय संस्कृतीच्या पारमार्थिक अंगाच्या प्रसाराचा इतिहास म्हणजे ख्रिस्ती संप्रदायाच्या प्रसाराजा इतिहास होय. खास हिंदुस्थानामध्यें इ. स. १९११ सालीं ख्रिस्ती झालेल्या लोकांचें हिंदु संस्कृतीच्या लोकांशीं प्रमाण शेंकडा दीड एवढेंच कायतें होतें. जपान, चीन, तिबेट, सिंहलद्वीप, जावा इत्यादि ज्या ज्या देशावर भारतीय संस्कृतीचा परिणाम झालेला आहे, त्या सर्व देशांत ख्रिस्ती मिशनर्यांचा प्रवेश झाला असून तेथें त्यांनां संप्रदायप्रसाराच्या कामांत थोडेंबहुत यश मिळालेंहि आहे. परंतु मिशनरी लोकांनां त्यांचीं सावजें अडाणी लोकांतच विशेषतः आढळून आलीं आहेत, व अशा बाटवून ख्रिस्ती केलेल्या लोकांचे प्रमाण फारच थोडें असून अशा प्रकारच्या संप्रदायप्रसाराचा सामान्य जनतेवर फारच थोडा परिणाम झाला आहे. तिबेटी लोकांसारख्या बौद्ध संप्रदायाच्या कट्ट्या अनुयायी लोकांत तर संप्रदायप्रसारच्या कामांत मिशनरी लोकांस मुळींच यश मिळालें नाहीं, असें म्हटलें तरी चालेल. यूरोपीय संस्कृतीच्या आधिभौतिक अंगाचा परिणाम मात्र ज्या ज्या देशांत ह्या लोकांचा तेथील जनतेशीं निकट संबंध आला त्या त्या देशांतील सर्वच जनतेवर कमी अधिक प्रमाणांत एकसारखा होत आहे. जपान, चीन व तिबेट हे तीन देश खेरीज करून बाकीचे भारतीय संस्कृतीनें संस्कारलेले सर्वच देश कोणत्या ना कोणत्या रीतीनें यूरोपीय राष्ट्रांच्या वर्चस्वाखालीं आले आहेत; व तेथें पाश्चात्त्य शिक्षणाच्या प्रसाराबरोबर यूरोपीय संस्कृतीचाहि तद्देशीय लोकांचे पोषाख, आचार व विचार यांवर परिणाम होत आहे. हिंदुस्थानाबाहेरील भारतीय संस्कृतीनें संस्कारलेल्या लोकांचे पोषाख व आचारविचार यांवर यूरोपीय संस्कृतीचे जे ठळक ठळक परिणाम झाले आहेत त्यांचा हिशोब पुढें दिल्याप्रमाणें आहे. सिंहली लोकांमध्यें पातराटांवर यूरोपीय संस्कृतीचा परिणाम विशेष झाला आहे. त्यांचा पोषाख व आचार यूरोपियन लोकांसारखे असून त्यांनां रोमन-डच कायदा लागतो. फिलिपाइन्समध्यें पूर्वीं हिंदु संस्कृति असतां आतां तेथील बहुतेक प्रजा ख्रिस्ती झालेली आहे. मलयु भाषेकरितां मोलक्कामध्यें लॅटिन लिपी वापरण्याचा प्रघात आहे. एका मलयु ग्रंथांत शंभु, ब्रह्मा, महादेव, विष्णु व देवी सारी यांची उत्पत्ति गुरु नामक एका अडामच्या वंशजापासून वर्णिली आहे. असलाच प्रकार महाचिनोक नांवाच्या थई म्हणजे सयामी ग्रंथांतहि आढळून येतो. त्या ग्रंथांत जनक राजाची कथा असून तींत फ्रेंच व फ्रँक्स यांचा उल्लेख आढळतो. सयामसारख्या स्वतंत्र संस्थानांतहि यूरोपीय आधिभौतिक संस्कृतीचा प्रवेश झाल्यावांचून राहिला नाहीं. तेथील राजानें शंभर वर्षांपूर्वींच इंग्रज अधिकार्यांकडून आपल्या सैन्यास लष्करी शिक्षण देववून घेतलें असून त्याच्या आरमारांतहि यूरोपियन तर्हेच्या बोटी आहेत. हल्लीं देशांत आगगाडी झाली असून यूरोपीयन सल्लागारांच्या मदतीनें तेथील राजानें आपल्या राज्यकारभारांत बर्याच पाश्चात्त्य सुधारणा घडवून आणल्या आहेत. ही जर मागसलेल्या पण स्वतंत्र म्हणविणार्या संस्थानची स्थिति, तर जपानसारख्या पुढारलेल्या राष्ट्रानें पाश्चात्त्यांची सर्वच्या सर्वच आधिभौतिक संस्कृति उचलली असली, किंवा सिंहलद्वीपासारख्या तीन चार शतकांपासून यूरोपीयांच्या सत्तेखालीं खिचपत पडलेल्या राष्ट्रास व्यवहारांतहि रोमन डच कायदा लावण्याची पाळी आली असली तर त्यांत नवल नाहीं. तिबेटसारख्या कांहीं देशांत पाश्चात्त्यांची आधिभौतिक संस्कृति शिरकाव करूं शकली नाहीं, ती पुष्कळ अंशीं त्या देशांच्या भौगोलिक परिस्थितीमुळेंच होय.