प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण १ लें.
लोकहित.- आतां लोकांनां जे फायदे होतील ते पाहूं. एकतर एका प्रांतांतील लोकांमध्यें परस्परांचें म्हणणें सर्वांना नीट समजून सलोखा अधिक उत्पन्न होईल व त्यायोगें सर्वांचे पुष्कळ हित होईल. दुसरें, हिंदुस्थानच्या भाषांची अधिक काळजी घेतली जाईल व त्यायोगें त्यांची वाढ नीट होईल. तिसरें देशी भाषांच्या द्वारा शिक्षण देण्याची व्यवस्था अधिकाधिक झाल्यानें उच्च शिक्षण देणार्या संस्थांचा फायदा घेणारे लोक अधिकाधिक निघतील व त्यायोगें लोकमाजाचें पाउल जोरानें पुढें पडत जाईल.
देशाचे राजकीय विभाग चांगल्या तत्त्वावर केले जातील व देशीभाषांनां योग्य तें स्थान दिलें जाईल तेव्हांच सर्व देशाला सामान्य अशा राष्ट्रीय संस्कृतीची इमारत बांधावयाला आरंभ झाला असें होईल. पाश्चात्त्यांपासून ज्या शास्त्रीय शोधांचा फायदा आपण घेणार ते शोध आपल्या लोकांनां परिचित करावयाचे तर त्यांच्या मातृभाषांच्या द्वाराच हें काम झालें पाहिजे. देशभाषांचा दर्जा जसा आपण वाढवूं तसे देशांतील बहुसंख्याक लोक महत्त्वाला चढतील. राजकीय दृष्टीनें आणि सामाजिक दृष्टीनें देशांतील बहुसंख्याक लोक महत्त्वाला चढतील. राजकीय दृष्टीनें आणि सामाजिक दृष्टीनें देशांतील बहुजनसमाज आपलें स्वत्व प्रस्थापित करून लागला म्हणजे देशांत राहणीचा सारखेपणा वेगानें वाढत जाईल आणि जी एक सामान्य राहाणी म्हणून ठरेल ती देशांतील अल्पसंख्याक लोकहि बहुतांशानें स्वीकारतील. असें झालें म्हणजे देशांतील आर्थिक संबंध बदलतील व त्यांची पुनर्घटना करावी लागेल अथवा दुसर्या शब्दांत सांगावयाचें म्हटलें म्हणजे आज जें अर्थशास्त्र जातवारीनें बांधलें आहे त्याच्या जागीं भारतीय अर्थशास्त्राची उभारणी होऊन नव्या आर्थिक युगाला आरंभ होईल.
वर वर्णन केलेल्या विकासास अधिक त्वरित गति देण्यासाठीं राष्ट्रीकरणाचें व्यावहारिक स्वरूप समजलें पाहिजे. दोन विविध संस्कृती नष्ट होऊन तिसरी संस्कृति उत्पन्न होईल किंवा एक संस्कृति दुसर्या संस्कृतिस आत्मसात् करून सर्वांस सामान्य अशी एक संस्कृति देशांत उत्पन्न होईल हा प्रश्न भवितव्याच्या काळोखांत लपला गेला आहे. राष्ट्रीकरण किंवा एकसंस्कृतिकरण साममूलक नसून दंडमूलक आहे. याचा अर्थ असा नव्हे कीं जें काय एकीकरण होणार तें रक्तपातामुळेंच उत्पन्न होईल, तर दोन बाजूच्या लोकांनीं तडजोडीनें तुमचें काय ठेवावयाचें व आमचें काय ठेवावयाचें या विषयींचा तहनामा करून सामान्यचार उत्पन्न करावयाचे हि कल्पना यश पावणें अशक्य आहे. जें काय शक्य दिसतें तें हें कीं दोन समुच्चयांपैकीं प्रत्येक समुच्चयाच्या संस्कृतीच्या ज्या अंगास अधिक बल असेल तें त्या समुच्चयाच्या संस्कृतीचें अंग टिकेल आणि विरुद्ध संस्कृतीचें तत्सदृश अंग विलयास जाईल. तसेंच जो समाज अधिक बलवान् त्याचीं अधिक अंगें टिकतील. म्हणजे नवसंस्कृतींत जीं पूर्वसंस्कृतीचीं अंगें शिल्लक राहतील तीं संग्रामांतर्गत बलामुळें टिकून राहतील.
तडजोडीचा संप्रदाय उत्पन्न होऊन तो कधीं कधीं मूलभिन्न समुच्चयांच्या संस्कृतींचें एकीकरण करूं पहतो पण त्यास देखील प्रत्येक संस्कृतीवर छाप टाकण्यासाठीं झगडावेंच लागतें.
उदारमतवाद.- संस्कृतीच्या एकीकरणाचीं वरील तत्त्वें लक्षांत घेऊन आपलें कर्तव्य काय ठरतें तें पाहूं. दोन समुच्चयांच्या ठिकाणीं राष्ट्ररूपी एक समुच्चय उत्पन्न करावा या इच्छेनें जो उपदेश हिंदुस्थानांत न्यायमूर्ति रानड्यासारख्या विद्वान् गृहस्थांनीं प्रसृत केला तो ज्या एका वाक्यांत सांठविला आहे असें “मी हिंदु नाहीं, मी मुसुलमान नाहीं, मी हिंदी आहे” हें उदारमताचें वाक्य होय.
राष्ट्रीकरणाचा यापेक्षां निराळा मार्ग रामदासांनीं उपदेशीला. “मराठा तेवढा मेळवावा आणि महाराष्ट्रधर्म वाढवावा” हें रामदासांचें वाक्य वारंवार उच्चारिलें जातें. त्या उपदेशाचा थोडक्यांत अर्थ म्हटला म्हणजे सदृश समाज एकत्र करावा आणि त्या सदृश समाजाचें सादृश्य इतरांवर लादावें. राष्ट्रीकरणासाठीं एका समुच्चयास संग्राहक बनलें पाहिजे आणि दुसर्या समुच्चयास संग्राह्य म्हणजे संग्रहणाचा विषय झालें पाहिजे. एका पक्षास आपला समाज वाढविण्याची इच्छा पाहिजे आणि दुसर्या समाजास त्या समाजाच्या समुच्चयांत शिरण्याची महत्त्वाकांक्षा पाहिजे. समाजवर्धिष्णु इच्छेशिवाय जो उदारमतवाद पसरतो तो स्वसमाजनाशक आहे. स्वसमाजवर्धनाची चळवळ जोराची नसतां जेव्हां उदारमतवाद सुरू होतो तेव्हां तो कोणा परक्या जयिष्णु समाजाच्या शिकवणीमुळें सुरू झाला आहे कीं काय इकडे लक्ष दिलें पाहिजे.
उदारमतवाद आपल्या देशांत “सुधारक” नांवाच्या संप्रदायाशीं बराच संलग्न आहे. पूर्वींच्या अनेक रूढींशीं झगडण्यामध्यें या संप्रदायानें आपलें बरेंच बल खर्च केलें आहे, तथापि या संप्रदायाच्या मतांचें ऐतिहासिक स्थान लक्षांत घेऊन विवेचन केलें पाहिजे आणि उदारमतवादानें ज्या मोकळिकी उत्पन्न करण्याची खटपट केली आहे त्यांची राष्ट्रीकरणाच्या तत्त्वाशीं कितपत संगति किंवा असंगति आहे याचा विचार केला पाहिजे.
एखाद्या विचारपद्धतीच्या ग्राह्यग्राह्यतेचें परीक्षण करतांना स्वतःची समाजिक परिस्थिति अवलोकन करून त्या विचाराच्या अवलंबनानें त्या सामाजिक परिस्थितीवर म्हणजे व्यक्तिविषयक आणि समूहविषयक आयुष्यावर काय परिणाम होईल हें निरीक्षिलें पाहिजे. तसेंच आपला विचार अधिक स्मूक्ष्मपणें करण्यासाठीं ज्या कालीं, आणि ज्या स्थळीं उर्फ समाजांत विशिष्ट विचारपद्धति उत्पन्न झाली असेल त्या कालीं त्या समाजांत त्या विचारपद्धतीच्या अवलंबनानें कसा काय फायदा झाला अगर होण्याचा संभव आहे हें तपासून नंतर मग ती परिस्थिती आपल्या समाजांत आहे कीं काय हें पहावें, आणि मग त्या बाह्य विचारांची ग्राह्यग्राह्यता ठरवावी. स्वतःच्या समजाची, आणि बाह्य समाजाची तुलना करीत असता दोन्ही ठिकाणीं एकसारखींच व्यंगें आहेत आणि ती व्यंगें दूर करण्यासाठीं कोणते सामाजिक उपाय योजिले जातात एवढेंच पाहून चालावयाचें नाहीं तर समाजनियंत्राची आणि समाजप्रगतीचीं करणयंत्रें आणि त्यांची शक्ति यांजविषयीं विचार केला पाहिजे. जेथें समाजप्रगतीचीं करणें जय्यत आहेत तेथें खटाटोप थोडा लागतो. आणि जेथें तीं करणें अस्तित्वांत नाहींत अगर नष्ट झालीं आहेत तेथें अनेक खटपटी फुकट जातात. एवढेंच केवळ नाहीं तर कार्याच्या शक्याशक्यतेवरूनच विचारांची ग्राह्याग्राह्यता म्हणजे वृद्धिकारकता अगर नाशाकारकता ठरते. जेथें लोकांच्या हातीं सत्ता असते तेथें कांहीं बाबतींत औदार्य दाखविलें तर तें उपयोगी पडतें, जेव्हां लोकांच्या हातीं सत्ता नसते तेव्हां औदार्य अनेक प्रसंगीं नाशकारक होतें. सामान्य सिद्धांत प्रथम सांगून कालव्यय न करितां इंग्रजी “उदारमतवादाचा” स्वीकार आपण कितपत करावा हें हिंदुस्थानीय परिस्थितींत त्या औदर्यानें अकल्याण होईल कीं फायदा होईल हें पाहून ठरवूं आणि या बाबतींत समाजशास्त्रविषयक काय सिद्धांत बांधणें शक्य आहे हें मागाहून पाहूं.
इंग्लंडमध्यें प्रागतिक लोकांमध्यें उदारमतवाद पसरत आहे आणि या मतवादामुळें इंग्लंडचें आणि साम्राज्याचें पुष्कळ कल्याण झालें आहे ही गोष्ट निर्विवाद आहे. उदाहरणार्थ, हिंदुस्थानामध्यें मतस्वातंत्र्यास मिळालेली वांव, ख्रिस्ती संप्रदायाचें शिक्षण इंग्लडनें आम्हांवर लादलें नाहीं ही गोष्ट, तसेंच कॅथोलिक, ज्यू, इत्यादि संप्रदायांस इंग्लंडांत मिळालेलें उपासनास्वातंत्र्य आणि संस्कारस्वातंत्र्य इत्यादि गोष्टी लक्षांत घेतल्या म्हणजे इंग्लंडमधील अन्याय नष्ट करण्यास आणि साम्राज्यांत सुखवृद्धि होऊन साम्राज्य बळकट करण्यास उदारमतवाद कारण झाला आहे हें उघड होते. तथापि तेवढ्यावरून आपल्या देशांत सामाजिक आणि राजकीय सुधारणांचें प्रवर्तन करण्यास ही “उदारमतवाद” नांवाची विचारपद्धति उपयोगी पडेलअसें मात्र नाहीं. उलट पक्षीं हिच्यावर जर अंधश्रद्धा बसली तर त्याच्या योगानें देशाचें आणि त्यांतल्या त्यांत हिंदूसमाजाचें मोठें नुकसान होणार आहे. तें नुकसान कसें होणार याचें स्पष्टीकरण पुढें येईलच.
उदारमतवादाचे आपण सामान्यतः दोन भाग पाडूं. पहिला भाग म्हटला म्हणजे शासनतंत्रानें काय करावें या विषयींचे अधिक मोकळीक देणारे विचार होत. या भागास आपण शासनविषयक उर्फ राजकीय औदार्य असें म्हणूं. दुसरा भाग म्हटला म्हणजे लोकांनीं मनांत आणि हृदयांत कोणते विचार आणि भाव बाळगावेत म्हणजे सरकारकडून अनियंत्रित असल्यामुळें लोकांस आपल्या मनाप्रमाणें वर्तन ठेवण्यास किंवा लोकमताच्या जोरावर नियमन करण्यास जें आचारक्षेत्र मोकळें असतें त्या क्षेत्रांत व्यक्तींस अधिक स्वातंत्र्य देणारे विचार होत. या आचारविषयक विचारांस आपण सामाजिक औदार्य म्हणूं. या दोन विचारसमूहांत तीक्ष्ण भेद नाहीं. जे लोक स्वयंशासित आहेत त्यांच्यामध्यें खासगी आचारविचारांचें नियमन आणि सरकारी धोरण यांत पुष्कळशी सरूपता असते, आणि यासाठीं इंग्लंडमधील खासगी बाबतींतील “उदारपणा” राजनीतीचा अंश समजून त्या दोहोंची युक्तायुक्तता एकत्र ठरविली पाहिजे. उलट हिंदुस्थानांतील उदारपणाचें परिक्षण जित आणि दुर्बल लोकांच्या राजनीतितत्त्वानुसार केलें पाहिजे.
“उदार” विचारपद्धतीचे वर सांगिलेले दोन भाग करण्याचें मुख्य कारण एवढेंच कीं, “उदार” अगर “अनुदार” विचारांनीं शासनतंत्रावर परिणाम करण्यास हिंदू लोकांस फारशी संधिच नाहीं. उदाहरणार्थ, मुसुलमान आणि ख्रिस्ती लोकांस ते पाखंडी आहेत असें म्हणून त्यांस आपण जाळून टाकावें, अगर त्यांस दुसर्या कोणत्या तरी रीतीनें होईल तितकें छळावें असे वेडे विचार जरी आपल्या मनानें घेतले तरी त्याप्रमाणें कृति आपणांस शक्य नाहीं, कारण आपण पूर्णसत्ताधारी राजे कोठें आहोंत? शासनपद्धतीवर आपल्या विचारांचा परिणाम झाला तरी तो अत्यल्प होत आहे. पुढच्या दहा वर्षांत आपणांमध्यें उदारमतवाद जो पसरवावयाचा त्याचें कारण आम्हीं लोकांवर जुलूम करूं नये यासाठीं पसरवावयाचा असें मुळींच नाहीं. आम्हांस खेळखंडोबा करण्यास जर कांहीं अवकाश असेल तर तो आम्हीं जेवावें कोणाबरोबर, कपडे कसे घालावेत, हजामत कशी करावी, जेवण्यांत कोणते पदार्थ खावेत, लग्नें कोणांबरोबर करावींत आणि तीं कशीं कारवींत, लग्न लावण्यास भिक्षुक घरीं बोलवावा कीं नवरानवरीनें म्याजिस्ट्रेटाकडे जावें, इत्यादि गोष्टीसंबंधानें चळवळ किंवा पाहिजे तसें आचरण करण्यास परवानगी देण्यापुरता आहे. उपर्युक्त गोष्टींचा राजकारणाशीं संबंध नाहीं असें नाहीं पण तो फार दूरचा आहे. आपल्या देशांत राजकारणासंबंधानें सुव्यवस्थित विचार झालाच नाहीं, आणि राजकारणाशीं वरील गोष्टींचा संबंध कसा पोंचतो हें आपलें आपणांस स्पष्ट झालेलें नाहीं. “उदारमतवादी” लोकांनीं वरील गोष्टींचा राजकारणाशीं संबंध येतो ही गोष्ट ओळखली आहे, आणि पुष्कळ देशाभिमानी लोक उदारमतवादानें प्रेरित होतात याचें कारण त्यांनीं तो संबंध ओळखला आहे हें होय. मात्र त्यांच्याकडून उदारमतवादास संमति मिळाली आणि त्याच्या प्रवर्तनासाठीं खटपट सुरू झाली ती त्यांजकडून सर्व गोष्टींचा सूक्ष्मपणें विचार न झाल्यामुळें आणि इंग्लंडामध्यें उदारमतवादामुळें इंग्लंडचें कल्याण होत आहे ही गोष्ट त्यांस ढळढळीत दिसत असल्यामुळें झाली हें ध्यानांत ठेवलें पाहिजे.
एवंच उदारमतवादाचें परिक्षण जें करावयाचें तें राजकीय उर्फ शासनविषयक ध्येयानुसार करावयाचें आहे, आणि येथें जे प्रश्न विचारासाठीं घ्यावयाचे ते समाजिक होत. कारण राजकीय बाबतींत उदारमतवाद अगर अनुदारमतवाद यांच्या अनुसार कार्य करण्यास आपणांस फारशी सवडच नाहीं. “उदारमतवाद” म्हणजे कांहीं नवा नाहीं. प्रत्येक देशांत निरनिराळ्या काळीं पूर्वस्थितींत उत्पन्न झालेल्या विचारांपासून अगर विचारजन्य मनोभावांपासून लोकांस सोडविण्यासाठीं आणि लोकांमध्यें सुखवृद्धि करण्यासाठीं कांहीं विशिष्ट तर्हेचे उदारमतवाद उत्पन्न होतात. स्टोइक्, एपिक्यूरियन् वगैरे विचारपद्धती ग्रीस देशांत पैदा होऊन त्यांचा रोमन साम्राज्यांत प्रसार झाल आणि रोमन साम्राज्यांत त्यांनीं एकत्वभाव, विश्वबंधुत्व आणि समानता हीं उत्पन्न केलीं. हीं उदारमतवादासारखींच मतें होतीं, आणि इंग्लंडमधील उदारमतवादाचे कित्येक पुरस्कर्ते आपली गुरुपरंपरा उर्फ विचारपरंपरा अगदीं तेथपर्यंत नेऊन भिडवितात. विशिष्ट तर्हेचें साम्राज्यकार्य व्हावयाचें होतें म्हणून त्या तर्हेच्या कल्पनांचा प्रसार रोमन साम्राज्यांत झाला. हिंदुस्थानांतील हिंदुमुसुलमानांतील दुही कमी होऊन हिंदुमुसुलमान बादशाहाशीं राजनिष्ठ रहावेत यासाठीं मुसुलमानी उदारमतवाद अकबराच्या कारकीर्दींत कसा उदयाला आला ही गोष्ट इतिहासविश्रुत आहे. हिंदू लोकांची संस्कृति अधिकाधिक वृद्धिंगत व्हावी एतदर्थ हिंदुस्थानाच्या बौद्धिक इतिहासांत उदारमतवादाचें प्राबल्य वारंवार झालेलें दिसून येतें. उदाहरणार्थ, आर्य हा शब्द प्रागैतिहासिक कालीं जातिवाचक न रहातां गुणवाचक आणि पदवीवाचक बनला आणि “आर्य” या शब्दास उत्तमाचारयुक्त मनुष्य असा अर्थ उत्पन्न झाला हा त्या कालीं प्रसृत झालेल्या एक प्रकारच्या उदारमतवादाचा परिणाम असावा. निरनिराळीं दैवतें आणि परमार्थसाधनें मान्य करून त्यांची वैदिक देवतांशीं सरूपता स्थापन केली. याच्या योगानें निरनिराळ्या अनार्य जातींचें श्रौतस्मार्तधर्मयुक्त समाजाशीं एकीकरण झालें हा देखील औदार्याचाच परिणाम होय. तसेंच निरनिराळ्या जातींचे आचारविचार पाहून त्यांचा समावेश धर्मशास्त्राच्या ग्रंथांत केला. उदाहरणार्थ राक्षस, गांधर्व आणि पैशाच हे विवाह धर्मग्रंथांत उल्लेखित केले, आणि धर्मग्रंथांत निरनिराळ्या जातींचे “धर्म” (कायदा) चौकसून राजानें ते अंमलांत आणावेत असा धर्मशास्त्रानें उपदेश केला. हें धर्मशास्त्रविषयक औदार्य समाजास एकसूत्री करण्यास कारण झालें. याच्या योगानें हलक्या जातींत देखील ब्राह्मणनिर्मित धर्मशास्त्रविषयीं आपलेपणा उत्पन्न झाला.
उदारमतवाद हा संघसाधक आहे. ज्या संघाची वृद्धि व्हावी असें आपलें मत असेल त्या संघाची वृद्धि होण्यासाठीं इतर संघांशीं एकत्व साधणार्या योजक अगर भेदक वृत्ती घालवून द्याव्यात असें त्या संघाची वृद्धि करूं पहाणार्या लोकांचें म्हणणें असतें. उदाहरणार्थ, माध्वांचे गुरू अलीकडे महाराष्ट्रीय माध्वांस असें सांगतात कीं, तुम्हीं माध्व ब्राह्मणांबरोबरच लग्नें करा, मग तो तेलगु आहे अगर कानडी आहे इकडे पाहूं नका. रोमन कॅथोलिक संप्रदायाचे उपदेशक आणि गुरू असें सांगत असतात कीं, जात अगर राष्ट्र यांचा लग्नव्यवहारांत विचार करूं नका पण तुम्हीं प्राटेस्टंटांबरोबर लग्नें लावूं नका. पौरस्त्य कॅथोलिक स्त्रीपुरुषांबरोबर पाश्चात्त्य कॅथोलिक अनेक प्रसंगी लग्नें करितात हें हिंदुस्थान, जावा, फिलिपाइन्स इत्यादि ठिकाणांकडे अवलोकन केलें असतां दिसतें. कॅथोलिकांस कॅथोलिक ख्रिस्ती संप्रदाय वाढवावयाचा आहे आणि कॅथोलिक लोकांत राष्ट्रविषयक मनोभाव कमी होऊन संप्रदायविषयक मनोभाव वाढवावयाचा आहे यासाठीं त्यांचा कॅथोलिकांमध्यें राष्ट्रविषयक आणि जातिविषयक औदार्य वाढविण्याचा प्रयत्न आहे. कॅथोलिक संघ हा राष्ट्रघटनेस विरुद्ध होता, आणि इटालियन लोकांचें राष्ट्ररूपानें एकीकरण व्हावयास या संप्रदायानें बराच विरोध केला. जुन्या एखाद्या संघाचा नाश करून नवीन संघाची वृद्धि करणें हें सर्व उदारमतवादांचें धोरण असतें. एखाद्या काळीं चालू असलेल्या उदारमतवादाचें परीक्षण करूं लागतांना आपण असा प्रश्न विचारावा कीं कोणत्या संघाच्या नाशार्थ आणि कोणत्या अभिवृध्द्यर्थ हा उदारमतावद आहे.
अमेरिकेंत एक दुर्बल उदारमतवाद आहे. तो म्हणतो कीं, गोरा, नीग्रो, चिनी इत्यादि भेद, तसेच ख्रिस्ती व ज्यू हे गोर्यांतील भेद, राज्यव्यवहारांत तसेंच सामाजिक व्यवहारांत आणूं नयेत. हा उदारमतवाद दुर्बल आहे असें म्हणण्याचें कारण एवढेंच कीं, गोर्यांनीं काळ्या लोकांबरोबर लग्नें करावींत असें प्रसिद्धपणें म्हणण्याचें धैर्य तसल्या लग्नांची युक्तता पटलेल्या समाजशास्त्र्यांस देखील होत नाहीं. तथापि काळ्यांबरोबर लग्नें करण्यास हरकत नाहीं असें म्हणण्यास तयार असलेला वर्ग अत्यंत अल्प आहे, आणि जो आहे तो तीं तत्त्वें अमलांत मुळींच आणीत नाहीं. गोर्या बाईनें नीग्रोबरोबर लग्न लावलें म्हणजे ती बाई गोर्यांच्या जातींतून निघून काळ्यांच्या जातींत जाते. तथापि या अमेरीकन उदारमतवादाचें ध्येंय राष्ट्राचें दृढीकरण करणें हेंच आहे.
ज्या समाजांत कांहीं बाबतींत उदारपणा दिसतो त्याच समाजांत दुसर्या कांहीं गोष्टींविषयीं अत्यंत अनुदारपणा असतो. राष्ट्रीकरणध्येयाच्या पूर्तीसाठीं त्यांस पुष्कळ उदार मतें देखील गुंडाळून ठेवावीं लागतात. उदाहरणार्थ, अमेरिकन लोकांचें असें मत आहे कीं मनुष्यास वाटेल तिकडे जाण्यास आणि वाटेल तो व्यवहार करण्यास स्वातंत्र्य असावें. त्यांची राष्ट्रस्थापनेची विचारपरंपरा व्यक्तिस्वातंत्र्य रक्षण करण्याची आहे. असें असतां, चिनी अथवा जपानी लोकांस अमेरिकेंत येण्यास त्यांनीं मज्जाव केला आहे आणि आतां हिंदूंस मज्जाव करण्याचा प्रयत्न त्यांनीं चालविला आहे. त्यांचें असें मत आहे कीं, ज्या लोकांचा अंतर्भाव आपल्या राष्ट्रांत लग्नव्यवहारानें रक्त मिसळून होणार नाहीं त्या जातींस देशांत येऊं देणें बरोबर नाहीं, कारण त्यानें राष्ट्रीयत्व भंग पावेल. लोकसत्तात्मक राज्य आणि राष्ट्रसाधन हीं स्वतंत्रेचीं मोठीं चहातीं आहेत असें मुळींच नाहीं. ज्यू अगर ख्रिस्ती हा विचार मनांत न आणतां लग्नें करा असें जे लोक म्हणतात तेच लोक बाहेर देशांतून आलेल्या मनुष्यानें बाह्य पोषाख ठेवूं नये अमेरिकन पोषाखच घ्यावा म्हणून आग्रह करितात. जेथें हजारें इटालियन अगर जर्मन कुटुंबें आहेत तेथें देखील बाह्य शिक्षणसंस्था चालूं देत नाहींत शिक्षण सर्व देशभाषेंतूनच झालें पाहिजे, नवागतानें भाषेंनें इंग्रज आणि राष्ट्रानें म्हणजे जातीनें अमेरिकन झालें पाहिजे हीच त्यांची शासननीति आहे. अमेरिकन कायद्यानेंच सर्व व्यवहार झाला पाहिजे, बाहेर देशाचा कायदा अमेरिकेंत बिलकुल ठेवावयाचा नाहीं, मनुष्य मूळ जातीनें इटालियन असो अगर जर्मन असो त्याचें अमेरिकेंत लग्न व्हावयाचें तें अमेरिकेंतल्या कायद्याप्रमाणेंच झालें पाहिजे, त्याच्या देशाच्या चालीप्रमाणें झालें तर तें लग्नच नव्हे, वगैरे कायद्याच्या बाबतींत सर्व लोकांचें एकीकरण करून कायद्यानें लोकांवर अमेरिकन एकाचारता लादली आहे. उदारमतवाद हा राष्ट्राच्या एकरूपतेस पाश्चात्त्य लोक आडवा येऊं देत नाहींत, तर राष्ट्राची एकरूपता साध्य होण्यासाठीं आणि राष्ट्राच्या एकरूपतेस अडचण करणार्या भावनांस, संस्थांस, आणि आचारांस दुर्बल करण्यासाठीं उदारमतवादाचा आश्रय पाश्चात्त्यांकडून केला जातो. परामार्थिक संप्रदायांच्या मार्फत लग्नें न होतां राष्ट्रनियुक्त अधिकार्यांमार्फत लग्नें व्हावींत अशी जी त्यांची खटपट आहे ती केवळ उदारमतवादाचा प्रसार करण्यासाठीं नसून संप्रदायांचा लोकांवरील अधिकार कमी करून सर्वलोकयुक्त असें जें राष्ट्र त्याचा अधिकार वाढविण्याची ही मसलत आहे.
इंग्लडमध्यें व कांहीं अंशीं पश्चिम यूरोपामध्यें जो उदारमतवाद झाला त्याचीं मुख्यें अंगें येणेंप्रमाणें होत.
(१) शासनतंत्राचें परमार्थविषयक संघांपासून स्वातंत्र्य स्थापन करणें, आणि व्यक्तीवर परमार्थविषयक संघांचा ताबा कमी करणें.
(२) परमार्थविषयक संघांच्या शिकवणीमुळें आणि नियंत्रणामुळें माणसामाणसांत भेद पडून स्नेहविषयक, विचारव्यंजनाविषयक, आणि विवाहविषयक बाबतींत अडचणी उत्पन्न होतात त्या अडचणी नष्ट करणें.
(३) परमार्थविषयक मतांवर नागरिकत्वाचे हक्क अवलंबून राहूं नयेत अशी व्यवस्था करणें.
(४) लग्नव्यवहाराचा परमार्थाशीं संबंध न ठेवतां ते केवळ सामाजिक संस्कार आहेत अशी भावना उत्पन्न करणें.
(५) नागरिकत्वाच्या हक्कांचा उपभोग घेणारा वर्ग जितका अधिक होईल तितका करणें.
(६) स्त्रिया वगैरे वर्गांची परतंत्रता काढून टाकून होईल तितकी स्वतंत्रता त्यांस उपलब्ध करून देणें.
(७) “नैसर्गिक नियम” म्हणून जे कांहीं आहेत त्यांच्या कार्यास ज्या राजकीय कारणांनीं व्यत्यय येईल तीं कारणें नाहींशीं करणें.
याशिवाय दुसरीं कांहीं तत्त्वें या उदारमतवादी लोकांस मान्य होतीं. उदारमतवाद्यांनीं योजिलेले हे सर्व फेरफार राष्ट्राच्या बलास हितावह परंतु ख्रिस्ती संप्रदायाच्या बलास अहितावह होते. वर सांगितलेल्या तत्त्वांपैकीं कांहीं तत्त्वें आणि त्यांचें सामाजिक प्रयोजन हीं स्पष्ट केलीं पाहिजेत.
परमार्थविषयक संघ उर्फ “चर्च” याचें पाश्चात्त्य राजकारणांत काय स्थान होतें हें मागें १४ व्या प्रकरणांत स्पष्ट केलें आहे.
समाजाला बळकटी येण्यासाठीं एक गोष्ट अवश्य आहे ती ही कीं, समाजांतील उच्च वर्गांत मोडण्याची संधि वाटेल त्यास असावी आणि गुणानें व संपत्तीनें मनुष्य मोठ्या पदवीला चढला म्हणजे त्यास समाजांतील श्रेष्ठ स्थान उपलब्ध व्हावें. समाजांतील उच्च स्थानीं बसलेल्या वर्गास खालच्या वर्गाची घाण येऊं लागते, आणि त्यास खालच्यांस खालींच ठेवावेसें वाटतें. या तर्हेची स्थिति आली म्हणजे समाजांत एक मोठा असंतुष्ट वर्ग वाढेल. तो वर्ग वाढूं नये म्हणून उदारमतवाद उत्पन्न व्हावा लागतो. इंग्लंडमध्यें शासनपद्धतीचें स्वरूप असें आहे कीं प्रत्यक्ष सत्ता ज्या वर्गाच्या हातांत त्या वर्गाला समाजिक मोठेपणा नाहीं. त्यामुळें सामाजिक मोठेपणा ज्या सरदारवर्गांत आहे त्या सरदारवर्गांत सामान्य स्थितींत जन्मून महत्पदास पोंचलेल्या मनुष्याचा प्रवेश करून द्यावयाची आवश्यकता तेथें उत्पन्न झाली.
इंग्लंडमध्यें शासनपद्धतीची पूर्णता करण्यासाठीं उदारमतवादाचा उदय झाला. राजा, सरदार आणि जनता या त्रयीच्या सहकारित्वानें तथापि मुख्यत्वेंकरून जनतेच्या इच्छेनेंच शासन चालवें हें लोकांस युक्त वाटत होतें, आणि तें शासन दिवसानुदिवस निर्दोष करण्याचा प्रयत्न होत होता, व तें निर्दोष होण्यासाठीं लब्धाधिकार जनतेसच शिष्टत्व यावें हें अवश्य होतें आणि ही गोष्ट जनता आणि सरदार यांतील सामाजिक आणि सांस्कृतिक अंतर कमी झाल्यानेंच घडून येणें शक्य होतें. सरदारांनीं सामान्यांबरोबर लग्नव्यवहार करूं नये ही वृत्ति इंग्रज लोकांत आज देखील आहेच, तथापि पूर्वीं सरदारांमध्यें अशी वृत्ति होती कीं ज्यांची सरदारी अधिक जुनी त्यांनीं नवीन बनलेल्या सरदारांबरोबर लग्नें करूं नयेत. हीच वृत्ति मोडण्यास कांहीं पिढ्या लागल्या. सरदारी उर्फ क्षत्रियत्व लोकांस राजमान्यतेनें मिळे त्या वेळेस कांहीं लोक व्यापारांत पैसा मिळवून त्यांतील अंश राजद्वारीं ओतून सरदार बनले. ते मूळचे जमीनदार देखील नव्हते. अशा काळीं नव्या सरदारांच्या अस्तित्वाचें समर्थन करणारें लोक असें दाखवूं लागले कीं, पहिल्या हेनरीच्या कारकीर्दीपासून जमीनदारीविरहित सरदार होते, त्यांनीं पुढें थोड्याबहुत जमिनी घेतल्या आणि त्यांस पुढें त्या गांवांच्या नांवानें लोक ओळखूं लागले. त्या काळीं नवीन सरदार आणि जुने सरदार यांच्यामध्यें भेद राहूं नये म्हणून खटपट होती. जो जुन्या घराण्यांतील सरदार नवीन झालेल्या सरदार घराण्यास तुच्छ लेखणार नाहीं तो उदारमताचा समजला जाई. अर्थात् हें उदारमत म्हणजे, अमुक वर्गानें अमुक वर्गाशीं कसें वागावें, राग कोणाचा करावा लोभ कोणाचा करावा इत्यादि जे सामाजिक भाव लोकांत वागत असतात त्या भावांची आणि शासननीतीची एकाग्रता करणारें यंत्र होतें. समाजशासन ज्या पद्धतीनें चालत आहे त्या पद्धतीनेंच चालत रहावें आणि ती पद्धति ज्या प्रसंगांनीं बिघडेल ते प्रसंग टाळावेत अगर त्यांजवर उपाय योजावा ही वृत्ति समाजशासनविषयीं विचार करणार्या लोकांमध्यें असते. समाजाचें शासन बहुतांशीं सरदारांकडून होत असतां सरदारांमध्यें गृह्य आणि नैतिक तसेंच सांपत्तिक उच्चत्व रहाणें ही गोष्ट अवश्य आहे. पुष्कळ सरदार केवळ जमिनीचेच मालक असत आणि जमीनदारीचा मान देशामध्यें मोठा असे. तथापि कालांतरानें व्यापाराची आणि कारखान्यांची वृद्धि होऊन संपन्नतेस पोंचण्यास नवीन करणें उत्पन्न झालीं. जमिनीची मालकी एवढेंच संपत्तिसाधन राहिलें नाहीं. तथापि बड्या घराण्यांतल्या म्हणजे क्षत्रिय वर्गांतली लोकांनीं वैश्यवृत्ति करूं नये हा परंपरागत भाव लोकांत वागत होता, व पुष्कळदां असेंहि होई कीं, व्यापारी आणि कारखानदार पैसे मिळवून थाटामाटानें रहात, आणि त्यांच्या थाटमाटापुढें सरदारांचा थाटमाट फिक्का पडे. कधीं कधीं तर पुष्कळ सरदार मोडकळीस आले असल्यामुळें त्यांची स्थिति सामान्य लोकांच्या स्थितीपेक्षां देखील वाईट होई. अशा प्रसंगीं पैसे मिळविण्यासाठीं इतर धंदे करण्यास हरकत नाहीं अशी उदारमताची मीमांसा झाली. कारण सरदारास आपल्या मोठेपणाचें संरक्षण करण्यासाठीं पैशाची देखील जरूर असते. तसेंच सामान्य लोकांची शासनतंत्रांत सत्ता वाढली आणि सरदारांची कमी झाली. हळू हळू सामान्यत्वांतून उच्च पदवीस चढणारांचा आणि सरदारांचा वस्तुतः एकच वर्ग झाला आणि अधिकाधिक होऊं पहात आहे. अशा वेळीं सामान्यजन व सरदारवर्ग यांचा विभक्तपणा राखणें योग्य नाहीं असें उदारमत झालें कारण शासननीति आणि सामाजिक भावना यांची एकमार्गता या औदार्यानें साध्य होते. तसेंच शासनविषयक फरकामुळें सामान्यवर्गाशीं सरदारांनीं मिसळावें, लग्नव्यवहार करावा हें देखील योग्यच झालें. जो सरदार सामान्यांशीं मिसळतो तो लोकप्रिय होतो आणि या दोन्ही वर्गांच्या एकत्र मिसळण्यानें समाजास बल उत्पन्न होतें. लोकसत्तापक्ष बळावला म्हणजे राष्ट्रामध्यें एकस्वरूपता आणि एकत्वभाव वाढतो. तथापि समाजांतील सत्ता संस्कृतीनें आणि शिष्टाचारानें युक्त अशा वर्गांतच रहाते. शिष्टाचाराचा प्रसार सामान्यांच्या शिष्ट पुढार्यांत होतो तो उच्चवर्गाच्या अनुकरणानेंच होतो आणि सामान्यवर्ग हाच संपत्तीमुळें, अधिकारामुळें आणि शिष्टाचारग्रहणामुळें शिष्टवर्ग बनतो. उदारमत हें जुना शिष्टवर्ग आणि नवा शिष्टवर्ग या दोहोंच्या एकीकरणास आणि समाजाचें आचारविषयक शासन एकाच वर्गाकडून व्हावें या ध्येयाच्या साधनास उपयोगी पडतें.
हिंदुस्थानामध्यें चातुर्वर्ण्यविषयक पुनर्घटना झाली पाहिजे असें जे म्हणतात त्यांच्या मनांतील हेतु परंपरागत शिष्टवर्ग आणि प्रत्यक्ष शिष्टवर्ग यांतील अंतर काढून टाकलें जावें हाच आहे.