प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण १० वें.
संघरक्षण, संघसदस्यत्व, आणि शिक्षणपद्धति.
परकीय राष्ट्रसंप्रदायांविषयीं वृत्ति.- ख्रिस्ती इत्यादि परकीय राष्ट्ररूपी संप्रदायांसंबंधानें आपली वृत्ति कशी असावी याबद्दल एक नियम असा सांगतां येईल कीं, ज्यांस आपणांस देशाबाहेर ठेवतां येणार नाहीं त्यांस आपण आपल्या समाजांत घेतलें पाहिजे. ख्रैस्त्य हें एक परमार्थसाधन आहे, ही एक परमेश्वरविषयक भावना आहे. ख्रैस्त्य म्हणजे विशिष्ट पोषाख नव्हे, विशिष्ट खाद्यपेयें नव्हेत व विशिष्ट राजसत्तेचा अभिमानहि नव्हे. तसेंच विशिष्ट भाषेची अथवा वाङ्मयाची उपासना नव्हे, किंवा विशिष्ट गुरुमंडळावर अवलंबन नव्हे. ख्रैस्त्य म्हणजे जीं राष्ट्रें ख्रिस्ती नसतील त्यांच्या आचारांचा त्याग करणें हेंहि नव्हे. वाङ्मय, भाषा, गुरुमंडळ, सण, रिवाज हे सर्व ख्रिस्तानें केलेल्या उपदेशाचे अगर उत्पन्न केलेल्या भावनांचे यदृच्छनिर्मित साहाय्यक अगर वाहक असतील पण त्या उपदेशाचा भाग नव्हत. कोणताहि ख्रिस्ती मनुष्य ज्या राष्ट्रांत जन्मला असेल त्या राष्ट्राच्या भाषेचा, वाङ्मयाचा व इतिहासाचा अभिमान त्यानें धरावा. जें ख्रिस्ती मतांशीं अविरुद्ध असेल तें टाकण्याचें ख्रिस्ती लोकांनां कारण नाहीं. रामनवमी हा सण घ्या राम हा थोर ऐतिहासिक पुरुष होऊन गेला. त्याच्या आठवणीसाठीं जो सण स्थापित झाला तो ख्रिस्त्यांनीं कां टाकावा बरें? जें जें कांहीं थोर असेल तें ईश्वरांशच होय, तें ईश्वरावतारच होय, ही कल्पना ख्रिस्ती मंडळीस मानावयाची नसली तरी केवळ लौकिक भावनांनीं ख्रिस्त्यांनीं रामनवमी करावयास हरकत नाहीं. जो पुरुष ऐतिहासिक आहे त्याचे गुण गातांना आमच्याबरोबर ख्रिस्त्यांनीं यावयास कोणती हरकत आहे? रामनवमीप्रमाणेंच गोकुलाष्टमी होय. तींतहि ख्रिस्ती लोकांचें अंग राहिल्यास हरकत ती कोणती? शालिवाहन किंवा विक्रमशकानुसार वर्षप्रतिपदा करण्यास तर कोणाचीच हरकत नाहीं. सिंहलद्वीपांतील ख्रिस्तीमंडळींनीं शालिवाहनाची वर्षप्रतिपदा पाळण्यास सुरुवात केली आणि या कार्यांत चर्चनें देखील आडकाठी घेतली नाहीं. दसरा हा तर कार्यासाठीं आरंभ करण्यास शुभ मुहुर्त म्हणून धरला जातो. कां कीं, रामानें याच वेळेस रावणावरील स्वारीस प्रारंभ केला. महाराष्ट्रीयांचा लढाईसाठीं बाहेर पडण्याचा हाच दिवस असा देखील लौकीक आहे. शमीपूजनाचा विधि हा तर पांडवांच्या अज्ञातवासाच्या प्रारंभाची आठवण करून देणारा. याप्रमाणें आपल्या थोर पूर्वजांच्या किंवा त्यांच्या विजयाच्या स्मारकस्वरूपाचे जे दिवस आहेत ते टाळण्याचें मुळींच कारण नाहीं.
दिवाळी हा उत्सव तर मोंगल बादशहांनीं दरबारचा उत्सव दिवस म्हणून ठरविला होता. अनेक उत्सव लौकिक आहेत तथापि परिस्थिति मात्र अशी झाली आहे कीं, ख्रिस्ती मंडळी या प्रकारच्या उत्सवांपासून अलिप्त आहेत.
ख्रिस्ती व मुसुलमान या समाजांसंबधानें आपली वृत्ति काय असली पाहिजे याविषयीं कांहीं विचार मागें व्यक्त केलेच आहेत; पण एक मुख्य विचार व्यक्त करावयाचा राहिला तो येथें करतों.
आपण हें लक्षांत ठेवलें पाहिजे कीं, ख्रिस्ती व मुसुलमान यांस आपलें परमार्थसाधन किंवा आपले मार्गदर्शक यांसंबंधींच्या ज्ञानाचा हिंदूंत प्रसार करावयास फारशी हरकतच करूं नये. देव एक आहे, मूर्ति त्याची कल्पना बरोबर होऊं देत नाहींत, यांसारख्या कल्पना मुसुलमानांनीं अगर ख्रिस्त्यांनीं देशांत पसरविल्या तर त्यांनें हिंदूंचें काय बिघडणार? जर शैवास वैष्णव खपतात आणि दोहोंस गाणपत्य खपतात तर ख्रिस्ती लोक तरी आपणांस कां खपूं नयेत? खपत नाहींत हें मात्र खरें. गाणपत्यांपैकीं कोणी विष्णूची उपासना केली तर गाणपत्यांस खेद होत नाहीं अशी ज्या अर्थीं आज स्थिति आहे त्या अर्थीं ख्रिस्ती संप्रदायाविषयीं जी असहिष्णुता आम्हांस वाटते तिचें कारण आमच्या पारमार्थित मतांचा ख्रिस्ती पारमार्थिक मतांशीं असलेला भेद खास नव्हे. या असहिष्णुतेचें कारण लौकिक आहे. ही गोष्ट ख्रिस्ती लोकांनीं व आम्हीं ओळखावी हें बरें. केवळ पारमार्थिक मतांखेरीज ज्या गोष्टींबद्दल हिंदूंस विषाद वाटतो तीं कारणें ख्रिस्ती समाजानें लवकर दूर करावीं हें चांगलें.
प्रादेशिक समाज टिकून इतर प्रकारचे समाज दुर्बल होत जाणार म्हणून प्रादेशिक समाज जितके मनुष्याच्या सर्व प्रकारच्या अपेक्षांनां पोषक होतील तितके करावेत हें चांगलें. भाषावार प्रांतरचनेसंबंधीं विवेचन याकरितांच आवश्यक होतें.
आपल्या राष्ट्राच्या घटनेंत एक प्रश्न नेहमीं आपणांपुढें येणार किं, राष्ट्राचा प्रत्येक भाषेशीं किंवा भाषामूलक प्रांताशीं संबंध काय असावा? प्रांतिक म्हणजे भाषामूलक सामाजिक भावना आणि अखिल भारतीय सामाजिक भावना यांचा परस्परसंबंध काय राहील?
केवळ भावनांच लक्षांत घेतल्या असतां दोन पक्ष दृष्टीस पडतात. एक प्रांतिक भाषेचा अभिमानी आणि एक भारतीय ऐक्याचा अभिमानी. पुष्कळांची अशी इच्छा आहे कीं, प्रांतिक भाषेचा विकास होऊं देण्यापेक्षां सार्वराष्ट्रीय अशा एखाद्या भाषेचा विकास होऊं द्यावा आणि त्या भाषेचें ग्रहण हिंदुस्थानांतील सर्व लोकांनीं करावें आणि प्रत्येक स्थानाच्या भाषा असंवृद्ध राहूं देऊन मरूं द्याव्या. हें सर्व अशा हेतूनें करावयाचें कीं पुढें सार्वराष्ट्रीय भाषा प्रत्येक ठिकाणीं स्वीकृत होईल आणि त्यामुळें सर्व राष्ट्राचें खरेंखुरें ऐक्य होईल. राष्ट्रांतील कांहीं लोकांस अधिक फायदा देणारा आणि कांहीं लोकांचें तात्पुरतें नुकसान करणारा असा जरी हा कार्यक्रम होईल तरी याच्या योगानें देशाचें अंतिम कल्याण होईल असें या सार्वराष्ट्रीय भाषेच्या अभिमान्यांचें म्हणणें असतें. या दोन मांडण्यांचा आपण निःपक्षपातानें विचार केला पाहिजे. देशांत इंग्रजी भाषेचें स्वामित्व राखावें आणि देशी भाषांचें महत्त्व कमी व्हावें म्हणून प्रयत्न करणारा मनुष्य देखील देशाच्या ऐक्याचेंच साध्य पुढें मांडीत असतो. देशाचें ऐक्य साधण्यासाठीं एक भाषेचा प्रचार करावा असें म्हणणारे जे कांहीं लोक आहेत ते कधीं इंग्रजीचा, कधीं उर्दूचा, कधीं हिंदीचा व कधीं संस्कृतचा पक्ष घेतांना दृष्टीस पडतात; किंवा खालील विधान केलें तर कदाचित् अधिक बरोबर होईल कीं देशामध्यें हिंदीचे, उर्दूचे, इंग्रजीचे आणि संस्कृतचे जे जे अभिमानी आहेत ते आपआपल्या प्रिय भाषेचें महत्त्व वाढविण्यासाठीं तिचें अखिलभारतीयत्व गात असतात.
हिंदुस्थानच्या प्रत्येक भागामध्यें तेथील देशभाषेस जर प्रामुख्य मिळालें तर हिंदुस्थान एक होण्याच्या ऐवजीं विभागला जाईल असा संशय वारंवार उपस्थित केला जातो; या प्रश्नाचा आपण काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. कोणत्याहि प्रांतांतील लोकांचा जर पुष्कळ व्यवहार स्वभाषेंत होऊं लागला तर एका भागास दुसर्या भागांत काय चाललें आहे हें पुष्कळवेळां कळणार नाहीं असें पुष्कळांस वाटतें. परंतु ही समजूत ग्राह्य न होण्यास एक कारण आहे तें हें कीं, ज्या त्या देशांत ज्या त्या भाषेचें प्रामुख्य झाल्यानें आणि प्रत्येक भागांत इतर भाषा बोलणार्या लोकांचेंहि अस्तित्व असल्यामुळें त्या देशामध्यें परका आलेला वर्ग देशभाषा अधिक काळजीपूर्वक शिकेल आणि परका मनुष्य तेथें परका न राहतां त्या देशांतील समाजाचा सदस्य होण्याचा अधिक संभव राहील व लग्नव्यवहारहि अधिक सोपे होतील. वर्हाड व मध्यप्रांत येथें कायमची वस्ती करून राहणार्या तैलंगी नायडूंनीं तैलंगी ब्राह्मण ज्याप्रमाणें महाराष्ट्रीय ब्राह्मणांत लग्नें करितात त्याप्रमाणें त्यांनीं मराठ्यांबरोबर लग्नें करावयास हरकत नसावी अशा हेतूनें चळवळ चालविली होती. या तर्हेची चळवळ करण्याकडे प्रवृत्ति होण्यास एक कारण म्हटलें म्हणजे येथील बरेचसे नायडू (तेलंगे) भाषेनें मराठी झालेले आहेत. यावरून असें दिसतें कीं, देशभाषाप्रामुख्य विवक्षित देशाचा त्या देशांत आलेल्या इतरांशीं असलेला संबंध दृढ करण्यास पोषकच होईल.
दुसरी एक अशी गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे कीं, काश्मीरचा शेतकरी आणि पंढरपूरचा शेतकरी या दोहोंचा फारसा संबंध घडून येणें शक्य नाहीं. झालें तर एवढेंच होणार कीं, काश्मीर येथील मध्यम वर्ग उर्फ पुढारी वर्ग आणि पंढरपूरचा पुढारी वर्ग यांचें संघट्टन होईल. हें संघट्टन देशांतील राज्यकारभार देशभाषेंत चालला तरी बंद पडणार नाहीं. याशिवाय जर सर्वसमान्य जन सुशिक्षित व कर्तृत्ववान् होईल तरच त्या त्या भागाच्या पुढार्यांस जोर येणार. प्रत्येक भागांत जर देशभाषा दुर्बल राहिली तर दोन भागांतील पुढार्यांचा एकमेकांस पाठिंबा मिळाल्यापासून कांहीं एक फायदा व्हावयाचा नाहीं.
थोडक्यांत सांगावयाचें तें हें कीं, स्थानिक भाषा नष्ट करण्याचे खेळ कोणाहि मुत्सद्दयानें करूं नयेत. हे खेळ केल्यानें ज्यांची भाषा दडपली गेली असेल त्यांच्यामध्यें द्वेषबुद्धि उत्पन्न होते. भाषा मारून टाकणें सोपें नाहीं हेंहि लक्षांत ठेवलें पाहिजे. वेल्स आणि आयर्लंड येथें इंग्रजी भाषा देश्य भाषांस मारून टाकण्याचा प्रयत्न आज आठशें वर्षें करीत आहे, परंतु परिणाम काय झाला? आज वेल्समध्यें व आयर्लंडमध्यें असे अनेक भाग आहेत कीं जेथें केवळ इंग्रजी जाणणारानें आपल्या बरोबर दुभाष्याच नेला पाहिजे. रशिया व जर्मनी यांनीं पोलिश, युक्रेन, फिनिक इत्यादि भाषा मारून टाकण्याचा प्रयत्न केला तरी त्या भाषा मेल्या नाहींत आणि त्या लोकांची राष्ट्रीय भावनाहि मेली नाहीं.
संघांचे संघ बनवून रचना करतांना हें तत्त्व लक्षांत ठेवावें कीं मूल संघ जितका अधिक पक्का असेल तितका संघांचा संघ पक्का होईल हा नियम लक्षांत ठेवून मूलसंघ एक भाषेचा पक्का होईल कीं अनेक भाषांचा हा विचार करावा व भारतीय ऐक्याची दिशा ठरवावी.
या विवेचनाचा इत्यर्थ हाच कीं, कोणीहि आपली भाषा दुसर्यावर दडपण्याचा प्रयत्न करूं नये आणि प्रांतिक भाषेंत किती व्यवहार ठेवावा आणि परकीय भाषेंत किती व्यवहार ठेवावा हा प्रश्न त्या प्रांताच्याच हिताच्या दृष्टीनें सोडविला जावा. असो.