प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
परिशिष्ट.
विस्तृत गोषवारा.
-प्रस्तावना.-
प्रस्तावनेंत युद्धाचीं कारणें सांगितलीं आहेत व तह ज्या पक्षांमध्यें होत आहे त्या पक्षांचीं नांवें दिलीं आहेत. तहाचा एक पक्ष म्हणजे चार बडे दोस्त, ब्रिटिश साम्राज्य, फ्रान्स, इटाली व जपान आणि पुढील छोटे दोस्त बेल्जम, ग्रीस, हेजाझ, आर्मीनिया, पोलंड, पोर्तुगाल, रुमानिया, सर्ब-क्रोट-स्लाव्ह व झेको-स्लोव्हाकिया; तहाचा दुसरा पक्ष तुर्कस्तान.
-प्रकरण १.-
यांत राष्ट्रसंघाचा करारनामा आहे.
-प्रकरण २.-
तुर्खस्तानच्या सीमा.
यूरोपीय तुर्कस्तानची सीमा चाताल्जा रांग ही ठरली आहे, मात्र ही मर्यादा वायव्येकडे थोडी वाढवून डर्कासचें सरोवर तुर्कांच्या हद्दींत घेतलें आहे. आशियांतील तुर्कस्तानच्या सीमा पूर्वींप्रमाणेंच आहेत, मात्र दक्षिण सरहद्द बदलली आहे. तहामध्यें यूरोपीय व आशियांतील तुर्कस्तानाच्या नव्या सीमा, तसाच स्मर्ना टापू ग्रीकांनां दिला आहे त्याची सीमा विस्तारानें वर्णन केली आहे. सरहद्द कमिशनकडे सरहद्दीपैकीं कांहीं भाग ठरविण्याचें काम आहे. या भागाचें वर्णन तहांत नाहीं. आज ज्या सरहद्दी ठरविल्या आहेत त्या तुर्कस्तान व आर्मीनिया यांच्यामधील भागाच्या बाबतींत बदलणें न बदलणें प्रेसिडेंट युनायटेड स्टेट्स यांच्या मतावर अवलंबून ठेविलें आहे. ट्रेबिझांड, अर्जरूम, वान व बिटलिक या भागांत आर्मिनियाची सरहद्द कशी असावी तें ठरविणें या प्रेसिडेंटकडे सोंपविलें आहे.
-प्रकरण ३.-
राजकीय कलमें. कान्स्टांटिनोपल.
या तहांतील इतर कलमांनां विरोध न येतां कान्स्टांटिनोपलवर तुर्कांची सत्ता राखणें शक्य आहे तेवढी राखण्याचें दोस्त कबूल करीत आहेत. मात्र या कबुलीला एक अट आहे व ती ही कीं, तुर्कांनीं या तहांतील कलमांप्रमाणें वर्तन जर न केलें, किंवा याला पुरवणी तह अथवा ठराव म्हणून जे जोडले आहेत त्यांतील कलमें मोडलीं, विशषतः जर तुर्कराज्यांत ज्या जाती संख्येनें अल्प आहेत त्यांचें रक्षण करण्याच्या कामांत तुर्कांनीं कसूर केली तर हा कान्स्टांटिनोपलसंबंधाचा ठराव दोस्त बदलतील व याप्रमाणें बदललेला ठराव तुर्कांस मान्य करावा लागेल.
सामुद्रधुन्या.
दार्दानेल्स, मार्मोराचा समुद्र व बास्फोरस हे भाग यापुढें युद्ध असो व शांतता असो सर्वदां सर्व राष्ट्रांच्या व्यापारी आणि लढाऊ जहाजांनां व व्यापारी व लष्करी आकाशयानांनां जाण्यायेण्यास अगदीं खुले राहतील. या जलप्रदेशांत कोंडमारा करणें, युध्यमान राष्ट्राचे हक्क बजावणें अथवा एखादें युद्धाचें कृत्य हें फक्त, राष्ट्रसंघाच्या कारभारीमंडळाचा तसा ठराव झाल्यास या ठरावानें मुभा दिलेल्या राष्ट्रालाच करतां येईल; एरवीं असलीं कृत्यें करावयाचीं नाहींत. या जलप्रदेशावर सत्ता चालविण्यासाठीं सामुद्रधुनी-कमिशन नेमलें आहे. तुर्कसरकार व ग्रीकसरकार यांनीं या कमिशनास आपापले सत्ताधिकार जरूर तेवढे सर्व दिले आहेत. या कमिशनमध्यें प्रतिनिधी असणार ते येणेंप्रमाणें. युनायटेड स्टेट्सला या कामांत आपला भाग असावा असें वाटून तें आपल्या हिश्श्याप्रमाणें काम करण्यास खुषीनें पुढें येईल त्या वेळीं त्याचा एक प्रतिनिधि, रशिया राष्ट्रसंघाचा सदस्य झाला म्हणजे त्याचा एक प्रतिनिधि, ग्रीस, रुमानिया यांचा एकेक प्रतिनिधि, बल्गेरिया राष्ट्रंसंघाचा सभासद झाल्यावर त्याचा एक प्रतिनिधि, याप्रमाणें या कमिशनांत प्रतिनिधी असतील. प्रत्येक राष्ट्रानें एकेकच प्रतिनिधि कमिशनवर नेमावयाचा आहे; पण युनायटेड स्टेट्स, ब्रिटिश साम्राज्य, फ्रान्स, इटली, जपान व संयुक्त रशिया यांनां दोन मतें व राहिलेल्या तीन राष्ट्रांनां एकेक मत द्यावयाचा अधिकार राहील.
या कमिशनला सदरील जलप्रदेशावर अधिकार चालविण्याची जी सत्ता दिलेली आहे तिचा, त्या ठिकाणीं जे इतर स्थानिक अधिकारी असतील त्यांच्या अधिकाराशीं कांहींहि संबंध नाहीं. कमिशनचें निशाण, कमिशनचें बजेट, कमिशनची घटना सर्व अगदीं स्वतंत्र असेल. या जलप्रदेशांत मध्यमार्गाची सुधारणा करणें, बंदरांत जाण्याचे मार्ग नीट करणें, दिव्यांची तजवीज करणें, धोक्याचीं पिपें लावणें; जहाजें नांगरण्याच्या जागा, जहाजें ओढून आणण्याची कामगिरी, जलमार्गज्ञ वाटाड्यांची व्यवस्था यांजवर देखरेख करणें; या तहांत बंदरें, जलमार्ग, आगगाडीचे रस्ते यांसंबंधाची व्यवस्था ठरविणारा जो भाग आहे त्यांतील कलमांबरहुकुम कान्स्टांटिनोपल व हैदरपाशा या बंदरांत व्यवस्था होत आहे कीं नाहीं हें पाहणें; फुटलेलीं जहाजें, अशा जहाजांतील माल वांचविण्याची व्यवस्था, माल जहाजांवर चढविणें किंवा जहाजांवरून उतरणें या गोष्टींवर देखरेख करणें, हे अधिकार कमिशनला दिलेले आहेत.
या सामुद्रधुन्यांच्या मार्गाच्या खुलेपणाला व्यत्यय येण्याचीं चिन्हें दिसलीं तर सदरील कमिशननें ग्रेट ब्रिटन, फ्रान्स व इटली यांच्या कान्स्टांटिनोपल येथील प्रतिनिधींकडे दाद मागावी असें ठरलें आहे. सदरील तीन राष्ट्रें या तहाअन्वयें सामुद्रधुनीप्रदेशांत सत्तासंरक्षणार्थ सैन्य ठेवतील. यांचे प्रतिनिधी या प्रदेशांत आंतून किंवा बाहेरून मार्गप्रतिरोध होत आहे असें कमिशननें त्यांनां कळवितांच, दोस्तसरकारांच्या लष्करी व आरमारी सेनानींच्या सल्ल्यानें योग्य ती उपाययोजना करतील.
या कमिशनला जमीनजुमला व कारखाने विकत घेतां यावे, कर्ज काढतां यावें व सामुद्रधुनी-प्रदेशांतील जहाजांवर पट्ट्या बसवितां याव्या असे अधिकार दिले आहेत. कान्स्टांटिनोपलचें आरोग्यखातें, तुर्की आरोग्यखातें, बॉस्फोरसची राष्ट्रीय लाइफ बोट कचेरी यांनां सामुद्रधुनी-प्रदेशांत जे अधिकार चालवितां येत असत ते आतां कमिशनकडे दिले आहेत, तसेंच गोद्या, प्रकाशगृहें, धक्के व इतर बाबींसंबंधीं कंपन्यांनां किंवा व्यक्तींनां जे सवलतींचे हक्क वगैरे आहेत त्या बाबतींत कमिशनचें आणि या इसमांचें व कंपन्यांचें नातें कोणत्या प्रकारचें आहे तें तहांत स्पष्ट केलें आहे.
कमिशनला आपली स्वतःची शिपाई-पलटण ठेवण्याचा अधिकार आहे. कमिशन जी नियमावली तयार करील तिजविरुद्ध वागण्याबद्दल शासन करण्याचें काम त्या त्या ठिकाणच्या न्यायकचेर्यांनीं-कॉन्सलच्या, तुर्कांच्या अथवा ग्रीकांच्या कचेर्यांनीं-कारावें अशी व्यवस्था केली आहे. कमिशननें जहाजांवर ज्या पट्या व जे कर बसवावयाचे ते बसवितांना जहाज आलें कोठून, जावयाचें कोठें, कोणत्या बंदरांतून निघावयाचें, तें कोणत्या राष्ट्राचें आह, त्याचा मालक कोण, त्यावरील माल कोणत्या देशांतला व कोणाच्या मालकीचा आहे वगैरे कसल्याहि गोष्टींचा विचार न करतां सर्वांवर सारख्याच प्रमाणानें बसवावे व त्यांची उकळणीहि सारख्याच तर्हेनें करावी, असें ठरलें आहे. १८८८ च्या सुएझ कालव्यासंबंधींच्या ठरावपत्रकांत, लढाऊ जहाजें, धरलेलीं शत्रूचीं जहाजें, युध्यमान राष्ट्राचीं जहाजें या कालव्यांतून जाण्यासंबंधानें व त्यांच्या तेथें राहण्यासंबंधानें जे नियम आहेत, तसेंच या जहाजांची दुरुस्ती, त्यांजवर अन्नपाण्याचा पुरवठा करणें, नाखव्यांची भरती करणें यासंबंधानें जे नियम आहेत तेच नियम सामुद्रधुनीच्या बाबतींत केलेले आहेत. मात्र राष्ट्रसंघाच्या कारभारीमंडळानें संमति दिल्यावर युध्यमान राष्ट्रालाहि या प्रदेशांत वाटेल तसें वागतां येईल, असें ठरविलें आहे. शिवाय, तुर्कांच्या शत्रुकडे जात आहे असा युद्धोपयोगी माल या सामुद्रधुनी-प्रदेशांतून जाऊं द्यावयाचा नाहीं, वगैरे गोष्टींसंबंधानें कांहीं नियम करण्याचें काम राष्ट्रसंघावर सोंपविलें आहे.
कुर्दिस्तान.
कुर्दिशांची वस्ती ज्या भागांत मोठी आहे त्या भागाला स्थानिक स्वराज्य देण्याचें टर्की कबूल करीत आहे. या प्रदेशाच्या सीमा पश्चिमेस यूफ्रेटीस नदी, उत्तरेस आर्मीनियाची दक्षिण सरहद्द जी ठरेल ती, दक्षिणेस टर्कीची दक्षिण सरहद्द ठरेल ती. आर्मीनियाची सरहद्द ठरविणार यु. स्टे. चे प्रेसिडेंट, टर्कीची सरहद्द ठरविणार ब्रिटिश, फ्रेंच व इटालियन प्रतिनिधींचें कमिशन. सदरील स्थानिक स्वाराज्याच्या घटना-पत्रकांत असिरो-खाल्डियन आणि इतर ज्या अल्पसंख्याक जाती अथवा संप्रदाय आहेत त्यांच्या हक्कांचें संरक्षण होण्यासाठीं विशेष नियम घातले जातील. हाच हेतु साध्य होण्यासाठीं पर्शिया-टर्की सरहद्दीवरील फेरफार करून टर्कीची सरहद्द नवी आंखली जाईल. याप्रमाणें कुर्दिस्तानला स्थानिक स्वराज्य प्राप्त झाल्यानंतर ठराविक मुदतींत त्यानें राष्ट्रसंघाच्या कारभारी मंडळाकडे पूर्ण स्वातंत्र्यासाठीं पाहिजे तर अर्ज करावा. हा अर्ज कारभारी मंडळानें मंजूर केल्यास टर्कीनें कुर्दिस्तानला पूर्ण स्वातंत्र्य दिलें पाहिजे. कुर्दिस्तान याप्रमाणें स्वतंत्र झाल्यावर मोसलमध्यें जो या प्रदेशाचा भाग आज अंतर्भूत केला आहे, त्या भांगांतील कुर्दिश लोकांनींहि त्यांनां हवें असल्यास स्वतंत्र कुर्दीस्थानांत मिळून जावें.
स्मर्ना.
स्मर्ना शहर व त्या भोंवतालाचा कांहीं आंखीव टापू टर्की ग्रीक सरकारकडे देत आहे. टर्कीचे या टापूवरील राज्याधिकार ग्रीक सरकार यापुढें टर्कीचे म्हणून चालवील. अधिसत्ता टर्कीचीच राहील व या सत्तेची खूण म्हणून स्मर्नाच्या बाहेर एका किल्ल्यावर टर्कीचें निशाण राहील. ग्रीक सरकारनें या प्रदेशांत राज्य कारभार करावा, व्यवस्थेसाठी सैन्य ठेवावें व आपल्या जकातबंदींत या प्रदेशाचा अंतर्भाव करावा. या प्रदेशांत एक पार्लमेंट प्रमाण-बद्ध प्रतिनिधि-निवडीच्या तत्त्वावर अल्पसंख्याक समुदायांचे प्रतिनिधी घेऊन स्थापन करावयाची. या पार्लमेंटसंबंधाची योजना ग्रीसनें राष्ट्रसंघाच्या कारभारीमंडळापुढें ठेवावी व त्या मंडळाची मताधिक्यानें मान्यता मिळाल्यावर ती अमलांत यावी. या योजनेप्रमाणें जी निवडणूक करावयाची ती कांहीं ठरींव दिवस, टर्कीनें हद्दपार केलेले लोक परत यावे म्हणून, तहकूब ठेवल्यास चालेल. तेथील अल्पसंख्याक समाजांचें संरक्षण, तेथील रहिवाशांची राष्ट्र-गोत्रवार नोंद व त्यांचें परदेशांत रक्षण व्हावें यासबंधीं तजवीज, सक्तीच्या लष्करी नोकरीची बंदी, व्यापार व नेआण यांची मोकळीक, टर्कीनें स्मर्ना बंदर वापरावयाचें त्याच्या अटी, चलन, आर्थिक जबाबदारी आणि फोकीआच्या मीठखाणी यांसंबधीं विशेष ठराव केलेले आहेत. स्मर्नामध्यें पांच वर्षें या प्रकारचा कारभार झाल्यानंतर तेथील पार्लमेंटनें राष्ट्रसंघाच्या कारभारीमंडळाकडे ग्रीसच्या राज्यांत आपणांस सामील करून घेण्याविषयीं वाटल्यास अर्ज करावा. हें कारभारीमंडळ वाटल्यास या अर्जांतील मागणीच्या निकालासाठीं सर्वजनमत घ्यावयाची तजवीज करील. मध्यमंडळानें स्मर्नावाल्यांचा अर्ज मंजूर केल्यास टर्कीनें ग्रीक सरकारकडे स्मर्ना मुलखावरील आपले सत्ताधिकार कायमचे दिले पाहिजेत.
ग्रीस.
तहनाम्याचा नकाशा झाला आहे त्यांत यूरोपीय टर्कीच्या ज्या सीमा दाखविल्या आहेत त्या सीमांबाहेरील सर्व मुलखावरील आपला सत्ताधिकार टर्कीं ग्रीसच्या स्वाधीन करीत आहे. इंब्रॉस, लेमॉन्स, सामोप्रेम, मितिलेन, सॅमॉस, निकारिया, कोईस आणि इजिप्शन समुद्रांतील इतर कांहीं बेटें यांजवरील सत्ताहि टर्की ग्रीसच्या हातांत देत आहे. सामुद्रधुनी-प्रदेशांत ग्रीसला टर्कीइतकाच अधिकार व जबाबदारी आहे. ग्रीसशीं वेगळा तहनामा व्हावयाचा असून त्यांत असें ठरणार आहे कीं, ग्रीसच्या नव्या मुलखांत ज्या अल्पसंख्याक जाती, संप्रदाय व भाषा असतील त्यांचें त्यानें संरक्षण करावें, विशेषतः आड्रियानोपल येथें या संरक्षणाच्या कामाकडे विशेष लक्ष द्यावें आणि आपल्या मुलखांत मालाच्या नेआणीस मोकळीक ठेवावी व परराष्ट्रांच्या व्यापाराला न्यायाच्या सवलती द्याव्या. ग्रीस या तहान्वयें कांहीं आर्थिक जबाबदारीहि अंगावर घेत आहे.
आर्मीनिया.
आर्मीनिया हें स्वतंत्र संस्थान आहे अशी मान्यता टर्की देत आहे. युनायटेड स्टेट्सचे प्रेसिडेंट आर्मीनियाची सरहद्द अर्जरूम, ट्रेबिझाँड, वान, बिटलिक या टापूंत जी ठरवितील ती टर्की मान्य करील. या प्रेसिडेंटाच्या मध्यस्थीनें जो तुर्क मुलुख आर्मीनियाला प्राप्त होईल त्या मुलुखाबरोबर आर्मिनियाला जी कांहीं जबाबदारी व जे कांहीं हक्क प्राप्त होतील, त्यासंबंधानेंहि तहांत खुलासा केलेला आहे. तसेंच टर्कीच्या मुलखांतील आर्मिनियाची सरहद्द कायमची ठरविणें, जॉर्जिया व अझरबैजन या देशांचा व आर्मीनियाचा ज्या प्रदेशांत संबंध येतो तेथें त्या तिघांची सरहद्द आपापसांत न ठरल्यास ती ठरविणें आणि आर्मीनियाशीं वेगळा तह करून त्या देशांतील अल्पसंख्याक पंथ, भाषासमूह व जाती यांच्या संरक्षणाची व्यवस्था करणें व तेथें परराष्ट्रांचा व्यापार न्याय्य रीतीनें चालावा आणि नेआणीला प्रतिबंध होऊं नये यासाठीं तजवीज करणें या सर्व गोष्टींची व्यवस्था तहांत केली आहे.
सीरिया व मेसापोटेमिया.
सीरिया व मेसापोटेमिया यांस तह करणारीं राष्ट्रें आज मर्यादित स्वातंत्र्य देत आहेत. राष्ट्रसंघाच्या करारनाम्याचें कलम २२ यांतील व्यवस्थेनुसार ही स्वतंत्रता मर्यादित केलेली आहे. कोणी तरी राष्ट्र त्याला मिळालेल्या आज्ञापत्रानुसार या स्वातंत्र्यदान केलेल्या देशांनां राज्यकारभाराच्या संबंधांत सल्ला व मदत देईल. हे देश आपल्या पायांवर उभे राहण्यासारखे होत तोंपावेतों ही व्यवस्था राहील. सल्लामदतीसाठीं पालकराष्ट्र निवडणें व नियुक्त करणें आणि या देशाच्या मर्यादा ठरविणें हें काम मुख्य दोस्तांकडे आहे.
पालेस्टाइन.
राष्ट्रसंघाच्या करारनाम्याच्या २२ कलमानुसार पालेस्टाइनचा कारभारहि पालकराष्ट्राकडे देण्यांत येत आहे. या पालकाची निवड व या प्रतिपालित देशाच्या मर्यादा ठरविणें हें काम प्रमुख दोस्तांकडे आहे. २ नोव्हेंबर १९१७ या दिवशीं ब्रिटिश सरकारनें जें अभिवचन जाहीरपणें दिलें आणि ज्याला इतर दोस्तानीं आपली अनुमति दिली तें ज्यू लोकांनां पालेस्टाइनमध्यें आपलें राष्ट्रीय गृह करण्यास पूर्ण अधिकार देण्याचें अभिवचन या तहांत पुनः दिलें आहे. पालेस्टाईनमध्यें ज्या निरनिराळ्या सांप्रदायिक जाती आहेत त्यांचे हक्क वगैरेंचा अभ्यास करून त्यांची व्यवस्था लावण्यासाठीं एक जादा कमिशन राष्ट्रसंघनियुक्त अध्यक्षांच्या नेतृत्वाखालीं नेमावयाचेंहि ठरलें आहे. पालेस्टाइनकरितां जें पालकराष्ट्र नेमावयाचें त्या राष्ट्राला कोणकोणते अधिकार द्यावयाचे वगैरेसंबंधींचा खर्डा प्रमुख दोस्त तयार करतील व तो राष्ट्रसंघाच्या कारभारीमंडळाच्या अनुमतीसाठीं त्याजकडे पाठविला जाईल.
हेजाझ.
दोस्तांनीं यापूर्वींच हेजाझ हें स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिलेली आहे. टर्की या दोस्तांच्या कृतीला मान्यता देत आहे. हेजाझच्या ज्या मर्यादा ठरतील त्या कबूल करून या देशावरील आपल्या स्वामित्वाचे हक्क टर्की सोडीत आहे. मुसुलमानांच्या दृष्टीनें मक्का व मदिना हीं तीर्थें असल्याकारणानें हेजाझचा राजा अशी हमी देत आहे कीं, सर्व ठिकाणच्या मुसुलमानांनां या तीर्थांच्या ठिकाणीं यात्रेसाठीं अथवा दुसर्या धार्मिक हेतूनें जाण्यायेण्यास बिलकुल अडथळा होणार नाहीं. या तीर्थाच्या ठिकाणीं ज्या धार्मिक देणग्या वगैरे चालत आहेत, त्या सर्व तो आदरानें पुढें चालवील. हेजाझच्या राज्यांत तुर्कस्तानाच्या साम्राज्यांत नवीं उत्पन्न झालेलीं राष्ट्रें आणि राष्ट्रसंघाचें साहाय्य असणारीं राष्ट्रें या सर्वांनां सारख्याच सवलतींनीं मोकळेपणानें व्यापार करतां यावा, असें कलमहि तहांत आहे.
इजिप्त, सुदान, सायप्रस.
टर्की आपले इजिप्तवरील सर्व हक्क ता. ५ नोव्हेंबर १९१४ या दिवशींच रद्द झाले अशी मान्यता देत आहे आणि ग्रेटब्रिटननें १८ डिसेंबर १९१४ या दिवशीं इजिप्त आमचें रक्षित राष्ट्र म्हणून जो जाहीरनामा काढला त्याला टर्की आपली संमति देत आहे. टर्कीच्या प्रजाजनांनां इजिप्तचे प्रजाजन कसें होतां येईल त्यासंबंधाचे नियम, तसेंच दोस्तांनां व त्यांच्या प्रजाजनांनां ज्या सवलती वगैरे परराष्ट्रांत मिळतील तसल्याच सवलती इजिप्तला व त्याच्या प्रजाजनांनां मिळाव्या यासंबंधीं नियम, आणि या दोन पक्षांचा माल व जहाजें यांनां सारख्याच तर्हेनें वागविण्यांत यावें व ग्रेटब्रिटननें इजिप्तच्या प्रजेचें परदेशांत संरक्षण करावें यासंबंधीं व्यवस्था तहांत आहे. २९ आक्टोबर १८८८ च्या कान्स्टांटिनोपल येथें सहीशिक्का झालेल्या कराराअन्वयें सुलतानाला सुएझ कालव्यावर जे हक्क देण्यांत आले ते सर्व हक्क या तहाअन्वयें टर्की ग्रेटब्रिटनच्या हवालीं करीत आहे. तर्क सरकराची व तुर्क प्रजाजनांची जी मिळकत इजिप्तमध्यें आहे तिची व्यवस्था लावण्यासंबंधाचीं कलमें यांत आहेत इजिप्त तुर्क सरकारला पूर्वीं खंडणी देत होतें त्या खंडणीवरचा पूर्वींचा आपला हक्क या तहाअन्वयें तुर्क सरकार सोडून देत आहे. इजिप्तच्या खंडणीच्या तारणावर जें कर्ज तुर्कसरकारनें काढिलें होतें त्याची जबाबदारी ग्रेटब्रिटन या तहानें आपणाकडे घेत आहे. ब्रिटिश व इजिप्शन सरकारांच्या दरम्यान १९ जानेवारी १८८९ रोजीं झालेला ठराव व त्याचीच पुरवणी म्हणून १० जुलै १८८९ रोजीं झालेला ठराव सुदानच्या राज्यकारभाराच्या संबंधाचा व त्याच्या राजकीय स्थानासंबंधाचा आहे, तो पाळला जावा. तह करणारीं राष्ट्रें या दोन्ही ठरावांनां आपली अनुमति देत आहेत. ५ नोव्हेंबर १९१९ रोजीं सायप्रस आपल्या ताब्यांत घेतल्याचें ब्रिटिश सरकारनें पुकारलें त्या गोष्टीस तह करणारे मान्यता देत आहेत. टर्की या बेटावरील आपले सर्व हक्क सोडीत आहे. पूर्वीं हें बेट टर्कीला खंडणी देत असे तिजवरील हक्कहि टर्की सोडीत आहे. सायप्रसमध्यें जन्मलेल्या व वस्तीस असलेल्या तुर्क प्रजाजनांनां ब्रिटिश प्रजाजनत्व प्राप्त होण्यासंबंधींचे नियमहि तहांत दाखल आहेत.
मोरोक्को व टयूनिस.
३० मार्च १९१२ पासून फ्रेंचांचे प्रोटेक्टोरेट मोरोक्कोमध्यें आहे व १२ मे १८८१ पासून हें प्रोटेक्टोरेट (पालकसत्ता) ट्यूनिसमध्यें आहे. या दोन्ही ठिकाणची फ्रेंच पालकसत्ता टर्की मान्य करीत आहे. टर्कीमध्यें या देशांतून जो माल येईल त्याचा आणि फ्रेंच मालाचा टर्की सारखाच विचार करील.
लिबिया, इजियन बेटें.
१२ आक्टोबर १९१२ च्या लौसानच्या तहानें लिबियावरचें जे हक्क सुलतानाकडे राहिले होते ते टर्की आतां सोडीत आहे. यदिकानीज आज इटलीच्या ताब्यांत आहे त्याजवरील आणि कास्तेलोरीझो याजवरील हक्कहि टर्की इटलीच्या स्वाधीन करीत आहे.
राष्ट-गोत्र.
टर्कीचा जो मुलुख या तहानें टर्कीपासून वेगळा केलेला आहे त्या मुलखांत वस्तीला असणारे टर्कीचे प्रजाजन कोणत्या राष्ट्र-गोत्राचे ते ठरविण्यासाठीं तपशीलवार नियमावली आहे ती आस्ट्रियाशीं झालेल्या तहांतील नियमावलीच्या धर्तीवर आहे.
सर्वसामान्य कलमें.
दोस्त राष्ट्रें तर्केतर शत्रुराष्ट्रांशीं जे तह व पुरवणीकरार करून चुकले आहेत, तसेंच रशियन साम्रज्याच्या ठिकाणीं आज अस्तित्वांत आलेल्या व पुढें अस्तित्वांत येणार्या राष्ट्रांशीं जे तह व करार दोस्तांनीं केले आहेत किंवा करतील त्यांनां टर्की मान्यता देत आहे. त्याचप्रमाणें ब्रेस्टलिटोस्कचा तह, बोल्शेव्हिस्ट सरकारशीं टर्कीनें केलेले तह, करार व ठराव हे सर्व टर्की अमान्य करीत आहे. प्रमुख दोस्त, इतर ज्या राष्ट्रांशीं टर्कीचे न्यायकोर्टविषयक करार झालेले आहेत त्या दोस्त व तिर्हाईत राष्ट्रांच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानें, तुर्की न्यायखात्याच्या सुधारणेसंबंधाची योजना तयार करतील व ही योजना टर्की मान्य करील. या योजनेंत तुर्की न्यायखात्यांत एकतंत्री अथवा मिश्र घटनेचा अंमल करावयाचें ठरेल. ही योजना, सध्यांची जी परकीयविषयक करारबद्ध न्यायपद्धति टर्कीमध्यें आहे ती रद्द होऊन तिचे जागीं अमलांत येईल. टर्कीच्या ज्या प्रजाजनांनीं युद्धांत दोस्तांनां मदत दिली त्यांनां माफी मिळावी, आणि जे मुसुलमान दुसर्या कोणत्याहि राष्ट्राच्या स्वामित्वसत्तेखालीं अथवा पालकसत्तेखालीं आहेत त्यांजवर तुर्कांनीं आपला पूर्ण स्वामित्वाचा अगर विशिष्ट न्यायविषयक हुकमतीचा हक्क सोडून द्यावा, अशाबद्दलचीं कलमेंहि या भागांत आहेत.
-प्रकरण ४.-
अल्पसंख्याकांचें संरक्षण.
टर्कीच्या राज्यांतील सर्व लोकांच्या जीविताच्या व स्वातंत्र्याच्या संरक्षणाबद्दल टर्कीनें हमी घेतली पाहिजे. रहिवाशाचा जन्म, राष्ट्र-गोत्र, भाषा, मानवकुल अथवा धर्म यांच्याकडे पाहून भेदाभेद न करतां सर्वांचें सारखेंच संरक्षण केलें पाहिजे. युद्ध चालू असतां जबरदस्तीनें ज्या लोकांनां मुसुलमान बनविलें त्यांनां परत आपल्या धर्मांत जाऊं देण्याबद्दल तहांत जादा कलम घातलें आहे. तसेंच युद्धकालीं अटकेंत अथवा कैदेंत ठेवलेल्या अथवा पळवून नेऊन बेपत्ता केलेल्या इसमांनां, मग ते कोणत्याहि कुळीचे व धर्माचे असोत, शोधून काढणें व मोकळे करणें हीं कामें करण्यासाठीं राष्ट्रसंघ मिश्रकमिशनें नेमील व त्यांच्या हुकमतीखालीं टर्की सदरील कामें करील, असें ठरलें आहे.
टर्कीतील अल्पसंख्याक जातीनीं खुषीनीं देशत्याग करण्याचें व दुसर्या देशाला जाण्याचें ठरविल्यास त्यांस अडथळा येणार नाहीं, अशाबद्दल टर्की करारनामे करून देईल. त्याचप्रमाणें दुसर्या देशांतील अल्पसंख्याक जाती टर्कीमध्यें रहावयास येतील तर अन्योन्याच्या समान वागणुकीच्या तत्त्वावर त्यांनां मज्जाव होणार नाहीं असे करार टर्कीं करून देईल, हेंहि ठरलें आहे. १९१५ त पास केलेला सोडलेल्या मालमत्तेसंबंधींचा कायदा टर्की रद्द करीत आहे, आणि राष्ट्र-संघ अतुर्क जातींच्या ज्या लोकांचें युद्धकाळीं नुकसान झालें त्यांच्या नुकसानभरपाईसाठीं जीं मिश्रपंचमंडळें नेमणार आहे त्यांच्या नजरेखालीं टर्की या लोकांची मालमत्ता परत देईल किंवा त्यांचें नुकसान कांहीं मर्यादेपर्यंत भरून देईल. पुनर्घटनेचीं कामें, ठिकणिकाणीं असलेलीं अनिष्ट माणसें दूर करणें, युद्धामध्यें ज्या मालमत्तेचे मालक मरण पावले अथवा नाहींसे झाले आहेत आणि जिला आतां कोणी वारस राहिलेला नाहीं त्या मालमत्तेची व्यवस्था लावणें, तसेंच युद्ध चालू असतां जी मालमत्ता जबरदस्तीनें विकली तिची विक्री रद्द ठरवून तिची पुढची व्यवस्था लावणें, हीं सर्व कामें सदरील पंचमंडळांवर सोंपविलीं आहेत.
या प्रकरणांतील रालिलेलीं कलमें अल्पसंख्याकांच्या राजकीय व नागरिकत्वाच्या हक्कांचें संरक्षण व्हावें, त्यांनां आपापल्या भाषांचा अनिर्बंध उपयोग करतां यावा, टर्कीच्या सरकाराकडून प्रतिबंध न होतां आपापल्या धार्मिक व लोकोपकारी आणि शिक्षणाच्या संस्था स्थापण्याचा हक्क त्यांनां असावा, त्यांच्या धर्मांत व शिक्षणांत त्यांनां स्वातंत्र्य असावें अशा संबंधाचीं आहेत. या प्रकरणांतील गोष्ट लिहिल्याप्रमाणें व्यवहारांत घडून याव्या यासाठीं उपाययोजना करण्याचें काम प्रमुख दोस्त राष्ट्रसंघाच्या कारभारी मंडळाच्या साहाय्यानें करतील आणि ही उपाययोजना जी ठरेल ती टर्की मान्य करील.
-प्रकरण ५.-
लष्करी कलमें.
सर्व राष्ट्रांचीं सैन्यें मर्यादित करणें या हेतूस धरून कार्यारंभ व्हावा म्हणून टर्की खालील लष्करी, आरमारी, व आकाशयानसंबंधी कलमें अक्षरशः पाळण्याचें मान्य करीत आहे. या तहावर सही झाल्यापासून तीन महिन्यांच्या आंत तुर्की सैन्यास रजा देणें आणि दुसर्या कित्येक लष्करी नियंत्रणा पाळणें टर्की मान्य करीत आहे. सैन्यभरती यापुढें खुषीची असली पाहिजे, कोणत्याहि जातीच्या व धर्माच्या मनुष्याला सैन्यांत शिरण्याचा सारखाच हक्क राहील, बिनकमिशन्ड आफिसर व शिपाई यांची नोकरी ओळीनें १२ वर्षें घेतलीच पाहिजे, कमिशनी आफिसरांनीं २५ वर्षें काम केलें पाहिजे, युद्धांत काम केलेल्या आफिसरांची राखीव रांग ठेवावयाची नाहीं, दरवर्षीं जे कांहीं आफिसर व शिपाई त्यांची मुदत संपल्यापूर्वीं सैन्यांतून निघतील त्यांच्या जागीं नवी भरती कमिशनी व इतर वर्गांतील लायक माणसांच्या एकंदरीच्या शेंकडा ५ या प्रमाणाबाहेर करावयाची नाहीं, टर्कीला राज्यांतील व्यवस्थेसाठीं व संरक्षणासाठीं, अल्पसंख्याकांच्या हक्करक्षणासाठीं व सरहद्दीच्या प्रदेशांत ताबा ठेवण्यासाठीं खालीलप्रमाणें लष्कर ठेवतां येईल. जेंदार्मरी (लष्करी पोलीस) ३५०००; विशेष आपत्तीच्या प्रसंगीं जेंदार्मरीला मदत करण्यासाठीं जादा फौज २००००; सुलतानाचा लवाजमा ७००. जेंदार्मरीचीं माणसें टर्कीच्या निरनिराळ्या विभागांत वांटून दिलीं पाहिजेत. हे विभाग ठरविणें व टर्कीच्या सशस्त्र सैन्यावर हुकमत चालविणें हे अधिकार दोस्तांच्या कमिशनाला दिलेले आहेत. टर्कीच्या या दोस्तकमिशननें ठरविलेल्या प्रत्येक विभागांत एक जेंदार्मरी पलटण राहील. या पलटणींत एकंदर जेंदार्मरीच्या चवथ्या हिश्श्यापेक्षां अधिक लोक ठेवावयाचे नाहींत. जेंदार्मरीमध्यें तोफखाना व यंत्रकलाभिज्ञांची पलटण ठेवावयाची नाहीं. जेंदार्मरीला कवाईत शिकवून तयार करणें आणि तिच्या मध्यें अंमलदारीचीं कामें करणें यासाठीं दोस्त राष्ट्रें व तिर्हाईत राष्ट्रें यांच्याकडून लष्करी अंमलदार पुरविले जातील. जादा फौज म्हणून जी वर सांगितली आहे तिच्यांत पायदळ, घोडदळ व सामान्य कारभाराचें दळ याशिवाय तोफखाना व यंत्रकलाभिज्ञाच्या कंपन्या असल्या तर चालतील. कोणत्याहि एका विभागांत ही जादा फौज तिच्या एंकदरीच्या तिसर्या हिश्शापेक्षां अधिक ठेवतां कामा नये. याप्रमाणें तुर्की फौज सुलतानाच्या खासगी लवाजम्याचे लोक सोडून, ५०५०० ठरली आहे. या फौजेंत २०५०० पेक्षां अधिक आफिसर नसले पाहिजेत. जकातखात्यांतील व जंगलखात्यांतील अंमलदारांची संख्या आणि शहरपोलिसांची संख्या वाढविण्याची बंदी आहे. तसेंच शहर पोलिसांनां अथवा रेल्वेवरील कामगारांनां लष्करी शिक्षण देण्याची बंदी आहे. कोणत्याहि पलटणीला पुरवणी-रांग म्हणून फौज तयार करण्याचीहि बंदी आहे. लष्करी शिक्षणाच्या शाळा कमी करून सर्व राज्यांत अंमलदारांकरितां एक बिनकमिशनी अधिकार्यांसाठीं दर विभागास एक, एवढ्याच शाळा ठेवावयाच्या.
सशस्त्र सैन्य टर्कीनें ५०५०० पर्यंत ठेवावें असें ठरलें आहे. या सैन्याला लागेल तेवढीच युद्धसामग्री, दारूगोळा व शस्त्रास्त्रें संग्रहीं ठेवण्यास टर्कीला परवानगी आहे; ही सामग्री किती लागेल, त्याचें कोष्टक सदरील सैन्यसंख्येच्या गरजांचा विचार करून तयार केलेलें आहे. या कोष्टकाप्रणाणेंच टर्कीनें या सामग्रीचा संग्रह करावा. सामग्रीचा जादा सांठा करावयाचा नाहीं. जी मर्यादा सदरील कोष्टाकांत घालून दिलेली आहे त्या मर्यादेच्या बाहेर असलेली सामग्री, दारूगोळा व शस्त्रास्त्रें टर्कीनें दोस्तांच्या हवालीं केली पाहिजेत. ज्वाला-क्षेपकें, विषारी वायू, टांकीं अथवा शस्त्ररथ टर्कीनें बाहेरून आणावयाचे नाहींत व देशांतहि तयार करावयाचे नाहींत. दोस्तांच्या नियंत्रणमंडळाच्या परवानगीनें चालविलेल्या कारखान्यांतूनच फक्त टर्कीमध्यें शस्त्रास्त्रें व इतर युद्धसामग्री तयार केली जाईल. परदेशीं पाठविण्याकरितां शस्त्रास्त्रें व दारुगोळा तयार करण्याची टर्कीला बंदी आहे. त्याचप्रमाणें परदेशांतून हा माल आणण्याचीहि त्याला बंदी आहे.
गडकिल्ल्यांची व्यवस्था.
सामुद्रधुनी-प्रदेशांत जाण्यायेण्याचा अटक होण्याला संभव न रहावा म्हणून, मार्मोरा समुद्राच्या आणि सामुद्रधुन्यांच्या किनार्यापासून आंत १२॥ मैल पावेतों असलेले किल्ले, तटबंदी व तोफताफे यांचा नाश करावा. मार्मोरा समुद्रांतील बेटें व लॅम्नॉस, इम्ब्रॉस, सामोथ्रस, तेनेदोस आणि मिनिलेन ही बेटें यांवरील तटबंदी वगैरेहि नष्ट करावी. सदरील प्रकारची तटबंदी वगैरे पुन्हां उभारण्याची बंदी आहे. त्याचप्रमाणें चालत्या तोफा लवकर इकडून तिकडे नेतां येण्यासाठीं पक्के रस्ते अथवा लोहमार्ग बांधण्याचीहि बंदी आहे. ग्रेटब्रिटन, फ्रान्स व इटली यांनां या प्रदेशांत जे पक्के व लोखंडी रस्ते तोफा वगैरेंची नेआण करण्यासारखे असतील ते मोडून टाकण्याची व लागेल तितकी फौज येथें ठेवण्याची सत्ता आहे. याव्यतिरिक्त या प्रदेशांत कसलेंहि लष्करी काम होतां उपयोगी नाहीं. या कलमाप्रमाणें दोस्त अधिकार्यांच्या हुकमतीखालीं असणारी जेंदार्मरी व सुलतानच्या लवाजम्यांतील फौज यांनांहि या प्रदेशांत फिरण्याचा हक्क नाहीं.
आरमारी कलमें.
या कलमांअन्वयें टर्कीनें आपलीं लढाऊ जहाजें दोस्तांच्या स्वाधीन करावयाचीं आहेत. फक्त थोडींशीं हलकीं हलक्या शस्त्रांचीं पोलिसकामास व मासेमारीच्या कामास उपयोगीं अशीं जहाजें टर्कीनें स्वतःजवळ ठेवावीं. पृष्ठगामी लढाऊ जहाजें बांधणें अथवा दुसरीकडे मिळविणें या गोष्टीची टर्कीला बंदी आहे. पोलिसकामासाठीं व मासेमारीच्या कामासाठीं जी जहाजें ठेवण्याची टर्कीला परवानगी दिली आहे त्यांतील कांहीं कमी झाल्यास तेवढीं नवीं घ्यावयास अथवा तयार करावयास हरकत नाहीं. पाणबुडीं जहाजें मात्र मुळींच व्यापारासाठीं देखील घेण्याची अथवा तयार करण्याची परवानगी टर्कीला नाहीं. लढाऊ जहाजें पृष्ठगामी व पाणबुडी, तयार होत आहेत तीं मोडून टाकलीं पाहिजेत. मात्र जीं पृष्ठगामी जहाजें लढाऊ म्हणून तयार होत असतां आतां व्यापारी म्हणून बनवितां येत असतील, तीं तशीं बनवावीं. सदरील मोडतोडीनें जें सामान मोकळें होईल तें फक्त व्यापारासाठींच उपयोगांत आणण्याची परवानगी आहे. आरमारी युद्धसामग्री व दारूगोळा, पोलिस व मासेमारी जहाजांसाठीं जितका ठेवावयाची परवानगी आहे त्याखेरीज सर्व दोस्तांच्या स्वाधीन केला पाहिजे आणि हा माल यापुढें टर्कीच्या राज्यांत तयार करण्याची बंदी आहे. टर्कीच्या आरमारी आफिसरांतील व नाखव्यांतील कांहीं लोक पोलिस मासेमारी व रखवाली कामापुरते टर्कीनें ठेवावे व बाकीच्यांनां त्यानें रजा द्यावी. यापुढें पोलिस व मासेमारी कामासाठीं जी भरती करावयाची ती खुषीनें करण्यांत आली पाहिजे व भरती केलेल्या लोकांकडून सारखी पुष्कळ वर्षें नोकरी घेतली पाहिजे. सामुद्रधुनी, प्रदेशांत जीं बिनतारी संदेशवाहक स्टेशनें आहेत ती टर्कीनें दोस्तांच्या ताब्यांत द्यावयाचीं. यापुढें टर्कीला व ग्रीसलाहि अशीं स्टेशनें या प्रदेशांत बांधण्याची परवानगी नाहीं. प्रमुख दोस्तांचें एक आरमारी प्रतिनिधि-कमिशन या वरील गोष्टी टर्कीकडून व्हाव्या तशा होत आहेत कीं नाहींत हें पाहण्यासाठीं नेमण्यांत येईल.
आकाशायानें.
या कलमान्वयें स्थलगामी अथवा जलगामी आकाशी फौज ठेवण्याची टर्कीला बंदी आहे. या तहावर सही झाल्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आंत टर्कीनें आपली आकाशी फौज मोडून टाकली पाहिजे. दोस्त जोंपावेतों टर्कींतून अगदीं पूर्णपणें निघून गेले नाहींत तोंपावेतों त्यांच्या अंतरिक्षयानांनां टर्कीच्या राज्यांत वाटेल तिकडे फिरण्याची व वाटेल त्या ठिकाणीं उतरण्याची मुभा आहे. हा तहनामा कबूल झाल्यानंतर सहा महिनेपावेतों टर्कीच्या राज्यांत अंतरिक्षयानें तयार करणें, बाहेरून येथें आणणें अथवा तेथून बाहेर देशीं पाठविणें, या गोष्टी मना आहेत. ही मानई अंतरिक्षयानांच्या फुटकळ भागांनांहि लागू आहे. सध्यां टर्कीच्या राज्यांत जीं अंतरिक्षयानें लष्करी वा आरमारी तयार आहेत किंवा तयार होत आहेत, अथवा दुरुस्त केलीं जात आहेत अथवा ज्यांचे फुटकळ भाग जोडण्याचें काम चालू आहे अशीं सर्व यानें, तसेंच या यानांत ठेवण्यासाठीं असलेलीं शस्त्रास्त्रें, दारुगोळा अथवा इतर यंत्रें, हीं सर्व प्रमुख दोस्तांच्या स्वाधीन तह झाल्यापासून तीन महिन्यांच्या आंत केलीं पाहिजेत. इतर शत्रुराष्ट्रांशीं झालेल्या तहांतील कलमांसारखींच अंतरिक्षक्रमणासंबंधाचीं कलमें या तहांत आहेत.
दोस्त कमिशनें.
तहांतील लष्करी, आरमारी व अंतरिक्षदळासंबंधीं ठराव जे अमलांत यावयाचे ते त्या त्या खात्यासाठीं दोस्तांचें कमिशन नेमलें जाईल त्याच्या हुकमतीखालीं अमलांत यावयाचें असून या कमिशनांचा पगार व इतर खर्च टर्कीनें दिला पाहिजे. या कमिशनांपैकीं लष्करी हुकमत व घटनेचें कमिशनखेरीजकरून बाकीचीं कमिशनें त्यांचें काम संपल्याबरोबर मोडलीं जातील. लष्करी कमिशनकडे नव्या तुर्की हत्यारी फौजेची घटना, विभागणी व हुकमत यांजवर देखरेख ठेवण्याचें काम असल्यानें, हें कमिशन मात्र इतरांसारखें मोडलें जाणार नाहीं. तह झाल्यापासून पांच वर्षेंपावेतों हें कमिशन अधिकारावर राहील. या मुदतीनंतर प्रमुख दोस्त परिस्थितीचा विचार करून हें कमिशन पुढें ठेवावयाचें कीं नाहीं तें ठरवितील. सदरील तीन कमिशनांच्या प्रतिनिधींचें एक मंडळ सामुद्रधुनी-प्रदेश सुरक्षित राहण्यासाठीं जी उपाययोजना होईल तिजवर देखरेख करील. या प्रकरणांतील सामान्य कलमान्वयें ३० आक्टोबर १९१८ रोजीं झालेल्या युद्धतहकुबीच्या तहांतील कांहीं भागाचा अंमल पुढें चालु ठेवण्याचें ठरविलें आहे. टर्कीनें अथवा कोणत्याहि तुर्क मनुष्यानें परराष्ट्रांच्या लष्करी आरमारी अथवा अंतरिक्ष कारभारांत भाग घ्यावयाचा नाहीं. दोस्तांपैकीं कोणीहि कोणत्याहि तुर्क प्रजाजनाला या वरील कामासाठीं नेमणार नाहीं. फ्रान्सनें मात्र आपल्या लष्करी कायद्यानुसार आपल्या परकी पलटणींत भरती करावी असें जादा कलम या प्रकरणांत घातलें आहे.
-प्रकरण ६.-
युद्धकैदी.
तुर्कांनीं जे सामान्य लोक अटकेंत ठेवले आहेत ते व त्यांनीं युद्धांत केलेले कैदी आपल्या खर्चानें ज्याच्या त्याच्या देशीं पोंचवून द्यावे. १९२० जानेवारीच्या पूर्वीं शिस्तीविरुद्ध वागल्याबद्दल जे सजा भोगीत आहेत त्यांच्या सजेचा विचार न करितां त्यांची त्यांच्या देशी पाठवणी केली पाहिजे. शिस्तीच्या गुन्ह्यां खेरीज इतर गुन्हे ज्याचें झाले आहेत त्यांनां ही सवलत नाहीं. दोस्तांच्या ताब्यांतील ज्या तुर्क प्रजाजनांनां टर्कींत परत जाण्याचें नसेल त्यांची व्यवस्था दोस्त आपल्या खुषीप्रमाणें लावतील आणि ज्यांनां टर्कींत परत जावयाचें आहे त्यांनां दोस्तांनीं टर्कींत परत पाठवावयाच्या अगोदर टर्कींत असलेल्या दोस्त प्रजाजनांची मुक्तता टर्कीनें केली पाहिजे. टर्कीच्या हातून ही गोष्ट न झाली तर कोणाहि तुर्क प्रजाजनाला टर्कींत पोंचविलें जाणार नाहीं. चौकशीकमिशनें जीं दोस्त नेमतील तीं, युद्धकैदी सांपडत नाहींत त्यांचा तपास लावणें, ज्या तुर्क अंमलदारांनीं दोस्त प्रजाजन लपवून ठेवल्याचें ठरेल त्यांनां शिक्षा करणें, दोस्त प्रजाजनांविरुद्ध तुर्कांनीं काय अपराध केले आहेत ते बाहेर आणणें या गोष्टी करतील. या कार्यांत तुर्क सरकारनें या कमिशनांनां लागतील त्या सोयी करून दिल्या पाहिजेत.
कबरस्थानें.
टर्कींत ज्या ज्या ब्रिटिश, फ्रेंच व इटालियन शिपायांचें व खलाशांचें दफन झालेलें आहे ती ठिकाणें, तसेंच या राष्ट्रांनां दफनाकरितां लागणारी जागा व या दफन भूमींनां जाण्याचे मार्ग करण्यासाठीं लागणारी जागा तुर्क सरकारनें त्या त्या सरकारांच्या स्वाधीन केली पाहिजे. ग्रीक सरकारनेंहि याचप्रमाणें त्याच्या स्वामित्वाखालीं दिलेल्या सामुद्रधुनी-प्रदेशांत तजवीज केली पाहीजे. हा तह अमलांत आल्यापासून सहा महिन्यांचे आंत ब्रिटिश, फ्रेंच व इटालियन सरकारें तुर्क सरकारला व ग्रीक सरकारला आपल्या स्वाधीन कोणत्या जागा झाल्या पाहिजेत तें कळवतील. या जागांत गॅलीपोली द्वीपकल्पांतील कांहीं भाग घेतला जाईल. या जागांचा दफनाखेरीज इतर कोणत्याहि कामाकडे उपयोग केला जाणार नाहीं. किनार्यावरील दफनार्थ दिलेली जागा लष्करी, आरमारी किंवा व्यापारी कार्यासाठीं उपयोगिली जाणार नाहीं. वरील दोस्त राष्ट्रांनां लागणारी जमीन जर जबरदस्तीनें घेण्याचें जरूर होईल तर तें काम तुर्क व ग्रीक सरकारांनीं आपल्या खर्चानें केलें पाहिजे. या सरकारांनीं सदरील जमिनीवर कसलाहि कर बसवूं नये. या जमिनीकडे जाण्यायेण्याचे सर्व मार्ग या सरकारांनीं नीट दुरुस्त ठेवले पाहिजेत, कबरस्थानाकडे जाऊं इच्छिणार्या कोणत्याहि मनुष्याला मोकळेपणानें जाऊं दिलें पाहिजे, आणि या स्मशानांच्या व्यवस्थेसाठीं जीं माणसें नेमलीं जातील त्यांनां सर्व प्रकारें मदत केली पाहिजे. ही जी जमीन ब्रिटिश, फ्रेंच व इटालियन सरकारांच्या स्वाधीन होणार तिजवरील राज्याधिकार तुर्कांचा व ग्रीकांचाच राहील आणि त्यांनीं स्मशानांत अथवा कबरस्थानीं अपवित्र काम करून तीं अशुद्ध करणारांनां शिक्षा देण्याची तजवीज केली पाहिजे. दोस्त व तुर्क सराकारांनीं आपापल्या राज्यांत असलेल्या शिपाई व खलाशी यांच्या कबरस्थानांनां पवित्र मानून त्यांची व्यवस्था ठेवावी आणि दोस्त यासंबंधांत जीं कमिशनें नेमतील त्यांनां मान्यता देऊन हरप्रकारची मदत द्यावी. कैदी मेले कोण व त्यांचीं कबरस्थानें कोठें आहेत यासंबंधाची माहिती तुर्क सरकार व दोस्त यांनीं एकमेकांनां पुरवावी.
-प्रकरण ७.-
शिक्षा.
दोस्त राष्ट्रें युद्धाचे कायदे व चाली मोडणारांस देहदंड करण्यासाठीं लष्करी कोर्टें स्थापणार आहेत. टर्कीनें असे गुन्हे केलेले सर्व लोक दोस्तांच्या स्वाधीन केले पाहिजेत. टर्कीचा मुलुख तोडून दुसर्या ज्या सरकारच्या स्वाधीन करण्यांत आलेला आहे त्यानींहि त्यांच्या हद्दींत व ताब्यांत असलेले वरील प्रकारचे गुन्हेगार दोस्तांच्या स्वाधीन केले पाहिजेत. आरोपींनीं लागेल तो वकील द्यावा. टर्की सरकारनें या खटल्यांत लागतील ते कागद व माहिती पुरवली पाहिजे. तुर्कसरकार त्याच्या ताब्यांतील मुलखांत ज्या कत्तली झाल्या त्यांची जबाबदारी ज्यांवर आहे तीं सर्व माणसें दोस्तांच्या स्वाधीन करील. या गुन्हेगारांची चौकशी करण्यासाठीं स्वतंत्र कोर्ट नेमावयाचें, किंवा राष्ट्रसंघानें या चौकशीच्या वेळेपावेतों असे खटले चालविण्यासाठीं कोर्ट नेमल्यास त्या कोर्टापुढेंच हे गुन्हेगार न्यावयाचे, हें दोस्त ठरवितील.
-प्रकरण ८.-
देणें घेणें.
या प्रकरणाच्या आरंभी जर्मनी, ऑस्ट्रिया व बल्गेरिया यांच्याशीं झालेल्या तहांतल्याप्रमाणें ‘आम्हीं (टर्कीनें) तुमच्यावर स्वारी करून तुम्हाला युद्धांत पाडलें व म्हणून तुमचें या युद्धानें जें नुकसान झालेलें आहे तें भरून देण्यास आम्ही बांधलेले आहों’ असा मजकूर आहे. टर्कीचा मुलुख पुष्कळसा त्याच्या ताब्याखालून काढला असल्यानें दोस्त सरकारें त्याजवर फार देणें काढणार नाहींत; तर पुढें निर्दिष्ट केलेल्या बाबींची भरपाई टर्कीनें केली म्हणजे तो ऋणोत्तीर्ण झाला असें समजतील. तुर्कांच्या साम्राज्यकर्जाकडे ज्या उत्पन्नाच्या बाबींचा विनियोग तारणाच्या अगर फेडहप्त्यांच्या रूपानें व्हावयाचें ठरलेलें आहे त्या बाबी वगळून इतर सर्व बाबींचें उत्पन्न खालील देणें वारण्याकरितां प्रथम लाववयाचें असें ठरलें आहे. खालील देण्याच्या बाबींचा अनुक्रम जसा येथें दाखल केला आहे त्याच क्रमानें सदरील उत्पन्नाचा फेडीकडे विनियोग केला जाईल.
(१) तहाची बजावणी सुरू झाल्या दिवसापासून दोस्तांचें जें हक्कसंरक्षक मुलुखव्यापी सैन्य टर्कीचें राज्यांत असणार त्याचा मामुली खर्च. (२) टर्कीचा जो मुलुख टर्कीच्या ताब्यांत राहणार आहे तेथील मुलुखव्यापी दोस्तदळाचा आक्टोबरपासूनचा खर्च, तसेंच टर्कीपासून जे भाग अलग केलेले आहेत त्यांपैकीं कांहीं सदरील ताबेदळाचा खर्च सोसणारांकडे गेलेले आहेत ते खेरीज करून राहिलेल्या प्रदेशांतील ताबाफौजेचा खर्च. या खर्चासाठीं वार्षिक हप्ते ठरविले जातील व हे हप्ते ठरवितांना टर्कीला या तहानें साम्राज्यकर्जाचें जें व्याज द्यावें लागणार तें व्याज पुरें देऊन टाकण्याला कांहीं व्यत्यय न यावा इकडे लक्ष दिलें जाईल. (३) युद्ध सुरू असतांना दोस्तांच्या प्रजाजनांनां जें नुकसान सोसावें लागलें आहे तें व या तहाची बजावणी सुरू होण्याच्या तारखेपर्यंत दोस्तांच्या बिनलष्करी प्रजाजनांचें जें नुकसान झालें असेल तें सर्व भरपाई करून देण्याचें टर्की मान्य करीत आहे. टर्कीच्या मुलुखांतून जे भाग काढले गेल आहेत ते ज्या राष्ट्रांनां मिळाले आहेत त्यांनां तेथील सर्व मालमत्ता, तुर्क साम्राज्याची अथवा सुलतानची खासगी म्हणून जी मालमत्ता आहे ती सर्व मालमत्ता, या तहाअन्वयें कांहीं एक मोबदला न देतां मिळणार आहे. ज्या राष्ट्रांनां टर्कीच्या मुलुखाचे भाग प्राप्त झाले आहेत, तीं राष्ट्रें तुर्कसाम्राज्याच्या कर्जाबाबत जो वार्षिक हप्ता तुर्कसाम्राज्याला द्यावा लागेल त्यांत आपल्या हिश्श्याप्रमाणें हप्ता देण्याला बांधलेलीं आहेत. बाल्कन द्वीपकल्पांतील सरकारें व आशियांत जीं नवीन सरकारें निर्माण केलीं आहेत तीं सरकारें त्यांच्या त्यांच्या वाट्यांला जें देणें आलेलें आहे तें देणें बिनहरकत त्याजकडून दिलें जाईल अशी योग्य जामीनकी देतील. बाल्कन युद्धाच्या पूर्वींच्या तीन वर्षांचें टर्कीचें उत्पन्न व टर्कीपासून अलग केलेल्या त्या त्या विभागांतलें उत्पन्न यांवरून सरासरीनें या सर्व प्रदेशांचें वार्षिक उत्पन्न काढून विवक्षित विभागाच्या उत्पन्नाच्या टर्कीच्या एकंदर उत्पन्नाशीं असलेल्या प्रमाणांत त्याच्या देण्याचें प्रमाण ठरविलें जाईल. बाल्कन युद्धानें दोस्तांनां जे मुलुख मिळाले त्यांनांहि तुर्क साम्राज्यकर्जाचा भाग हिस्सेरशीनें आपल्या अंगावर घ्यावा लागेल व ही हिस्सेरशी वरीलप्रमाणें ठरविली जाईल.
जमाबंदीवर ताबा.
फ्रान्स, ग्रेटब्रिटन व इटाली या राष्ट्रांच्या प्रतिनिधीचें एक जमाबंदी कमिशन टर्कीच्या जमाबंदीची व्यवस्था लावण्यासाठीं नेमण्यांत येईल. या कमिशनवर टर्कीचा एक प्रतिनिधि घेतला जाईल. त्याची सल्ला घेण्यांत येईल, पण त्याला मताचा अधिकार नाहीं. या जमाबंदी कमिशनकडे मुख्यतः खालीं देलेलीं कामें सोंपविलीं जातील. (१) टर्कीसरकारचीं अंदाजपत्रकें तपासणें.
ही तपासणी होऊन कमिशनची मंजूरी मिळाल्याशिवाय अंदाजपत्रकांचा अंमल होतां उपयोगी नाहीं. (२) अंदाजपत्रकाचा अंमल कसा काय केला जात आहे, जमाबंदीविषयींच्या कायदेकानूंची बजावणी कशी होत आहे त्यावर देखरेख करणें. (३) टर्कीचें चलन सुधारण्यासाठीं उपाययोजना निर्णीत करणें.
याशिवाय, टर्की सरकारनें नवा कर बसविण्यापूर्वीं किंवा जकातपद्धतींत फेरफार करण्यापूर्वीं तसेंच देशांत किंवा देशाबाहेर कर्ज काढण्यापूर्वी या कमिशनची अनुमति घेतली पाहिजे. त्याचप्रमाणें टर्कीच्या राज्यांत नव्या सवलती कोणाला देणें असेल तर त्यालाहि कमिशनची अगोदर संमति घेतलेली पाहिजे.
हें जमाबंदीकमिशन पुढें कर्जफंडकचेरीचें काम करील. या कचेरीकडे टर्कीनें सावकारांनां लावून दिलेल्या वसूलबाबींची व्यवस्था करण्याचें काम आहे. जमाबंदीकमिशनची स्थापना सध्यांच्या कर्जफेडमंडळाच्या जागीं करावयाची किंवा कसें, तें ठरविण्याचा अधिकार फ्रान्स, ग्रेटब्रिटन व इटली येथील सरकारांनां आहे. हीं सरकारें यासंबंधांत सावकारांचा सल्ला घेऊन बहुमतानें निर्णय करतील. हा निर्णय करावयाचा तो सध्यांच्या कर्जफेडमंडळाची मुदत पुढें सहा महिने तरी राहील अशा बेतानेंच केला पाहिजे.
या जमाबंदीकमिशनला सध्यां तहाच्या संबंधांत जें विशिष्ट कार्य आहे तें येणेंप्रमाणेः- दोस्तांनां तुर्क राज्यांत आपलें सैन्य ठेवण्याचा जो खर्च येईल, त्यासाठीं व दोस्तांच्या प्रजाजनांच्या नुकसानभरपाईसाठीं तुर्क सराकरनें वार्षिक हप्ते द्यावयाचे आहेत त्या हप्त्यांच्या रकमा ठरविणें; तसेंच टर्कीचे तुकडे ज्या राष्ट्रांच्या वांट्याला आलेले आहेत त्यांजवर टर्कीच्या कर्जाचा हिस्सा कोणता बसतो तें ठरवून, त्याप्रमाणें त्यांनीं या कर्जाच्या फेडीकडे देण्याचे हप्ते ठरविणें. या कमिशनकडे असलेलें तिसरें विशिष्ट कार्य म्हणजे जर्मन तहांतील कलम २५९-(१), (२), (४), (७), प्रमाणें व आस्ट्रियन तहांतील क. २१० (१) प्रमाणें जें सोनेंनाणें तुर्कांकडे येणार आहे त्याची व्यवस्था लावणें.
-प्रकरण ९.-
व्यापारी कलमें.
टर्कीशीं दोस्तांचें जें व्यापारी नातें असावयाचें तें पूर्वींच्या करारनाम्यांतील व्यवस्थेप्रमाणेंच असावयाचें आहे. ही पूर्वींची कौलबंदी व्यवस्था युद्धापूर्वीं ज्या दोस्तांनां लागू होती त्यांनां पुन्हां लागू केलेली आहे व ज्या दोस्त राष्ट्रांनां ही व्यवस्था लागू नव्हती त्यांनांहि या तहाअन्वयें तिचा फायदा मिळेल. जकातीचा दर किंमतीवर शें. ११ टक्के म्हणजे १९०७ मध्यें ठरविलेला आहे तोच राहील; मात्र या तहाअन्वयें जें जमाबंदीकमिशन नेमलेलें आहे त्या कमिशनला आयात करांत फेरफार करणें, उपभोग कर बसविणें, तुर्क प्रजाजन व तुर्क मालमत्ता यांजवर बसविलेले कर दोस्त प्रजाजन व दोस्त मालमत्ता यांस लागू करणें, आयात-निर्यातीस बंदी करणें, यासंबंधांत पूर्ण अधिकार दिलेले आहेत. मात्र सदरील कोणताहि व्यवहार करावयाचा तो दोस्तांनां सहा महिने आगाऊ कळवून केला पाहिजे.
जहाजासंबंधींचे कागदपत्र, नव्या राष्ट्रांचीं निशाणें, व्यापारांत अन्याय्य चढाओढ, पूर्वींचे दोन राष्ट्रांमधील व अनेक राष्ट्रंमधील तहनामे, औद्योगिक, वाङ्मयात्मक, कलात्मक मालमत्तेचें संरक्षण यासंबंधाचीं कलमें सामान्यतः पूर्वींच्या तहानाम्यांतल्याप्रमाणेंच आहेत. या पूर्वींच्या तहनाम्याप्रमाणेंच या तहांतहि असें आहे कीं, दोस्तांच्या राज्यांत जी कांहीं तुर्क मालमत्ता असेल ती वाटल्यास विकून जे पैसे उभे राहतील ते, दोस्तांच्या तुर्कराज्यांतील मालमत्तेचें नुकसान व दोस्त प्रजानांचें तुर्क सराकरला युद्धापूर्वीं जें कर्ज होतें तें कर्ज तुर्कांनीं भरपाई करावयाचें आहे त्यास तारण म्हणून, दोस्त आपल्या ताब्यांत ठेवतील. या विक्रीच्या पैशांनीं तुर्कांकडे असलेलें घेणें भरून न निघाल्यास जी बाकी निघेल ती वर दिलेल्या जमाबंदी कलमानुसार वेळोवेळीं तुर्क राज्यांत वसुलाची जी वाढ दिसून येईल तिच्यांतून भरपाई करून घेतली जाईल. टर्कीचा जो मुलुख इतर राष्ट्रांनां प्राप्त झाला आहे त्यांत हें विक्रीचें कलम लावतांनां कोणाहि तुर्क व्यक्तीची मालमत्ता या कलमाखालीं येत नसून फक्त तुर्की व्यापारी मंडळ्यांचीच मालमत्ता विक्रीस पात्र आहे, असें ठरलें आहे.
दोस्तांनां वाटल्यास त्यांस टर्कीमध्यें जर्मन, ऑस्ट्रियन, हंगेरियन अथवा बल्गेरियन व्यापाराचा शिरकाव होऊं नये अशी व्यवस्था करतां यावी, या उद्देशानें कांहीं कलमें तहांत घातलीं आहेत तीं:- दोस्त सरकारांनां तुर्क सरकारकडून सदरील राष्ट्राच्या प्रजाजनांची मलामत्ता विकून टाकविण्याचा हक्क आहे; तुर्क मुलुख जो जो तुर्कांकडून काढला गेला आहे तेथील जर्मनादिकांची मालमत्ता दोस्त स्वतःच विकून टाकतील; या विक्रीचे जे पैसे येतील ते सामान्यतः त्या त्या मालमत्तेच्या मालकांनां दिले जातील. मात्र जी मालमत्ता जर्मनादि सरकारांची आहे ती विकून आलेले पैसे पूर्वींच्या तहाअन्वयें जें नुकसानभरपाई-कमिशन नेमलेलें आहे त्या कमिशनच्या स्वाधीन केले जातील.
जर्मन लोकांच्या ताब्यांतील रेल्वे कंपन्यांची मालमत्ता हस्तगत करण्याबाबत विशेष कलमें तहांत घातलेलीं आहेत तीं अशीः निरनिराळ्या भागांत असलेल्या रेल्वे मालमत्तेची त्या त्या भागाच्या नव्या सरकारानें व्यवस्था लावावीं. टर्कीच्या राज्यांत जी अशी मालमत्ता आहे ती जमाबंदी कमिशनच्या ताब्यांत दिली जाईल; या मालमत्तेची किंमत पंचांमार्फत ठरवून हें कमिशन त्याची व्यवस्था लावील; या सर्व विक्रीचा पैसा येईल तो जमाबंदी कमिशन तिर्हाईत राष्ट्रांपैकीं ज्याचा या रेल्वेंत कांहीं भाग आहे त्यांनां त्यांच्या हिशेबाप्रमाणें वांटून देईल व आस्ट्रिया, जर्मनी वगैरेंचा हिस्सा भरपाई कमिशनांच्या स्वाधीन करील.
युद्धापूर्वीं टर्कीच्या राज्यांत तुर्क लोक व टर्कींत न राहणारे किंवा उद्योगधंदा न करणारे असे दोस्त प्रजाजन यांजमध्यें जें देणेंघेणें झालेलें होतें त्या देण्याघेण्याची व्यवस्था लावण्यासंबंधीं कांहीं कलमें या तहांत आहेत. दोस्त व तुर्क प्रजाजन यांजमध्यें युद्धापूर्वीं झालेले करारमदार कायम ठेवावयाचे असतील किंवा मोडून टाकावयाचे असतील तर ज्या दोस्त राष्ट्रांचा त्यांत संबंध येतो त्यांच्या कायद्याप्रमाणें हा व्यवहार झाला पाहिजे असें ठरविलें आहे. काराराच्या निरनिराळ्या प्रकारांची व्यवस्था कोणत्या रीतीनें लावावयाची त्यासंबंधाचीं तपशीलवार कलमें आहेत. तुर्कसरकारकडून ज्या दोस्त राष्ट्रांनां कांहीं हक्क-सवलती प्राप्त झालेल्या होत्या त्या तशाच त्यांजकडे चालू राहिल्या पाहिजेत असें ठरलें आहे. तुर्की राज्याचे जे भाग अलग केलेले आहेत त्या भागांत जे हक्क युद्ध चालू असतांना टर्कीनें कोणाला दिले असतील ते दोस्तांनीं अमान्य करावयास हरकत नाहीं. पालकसत्तेखालीं जे टर्कीचे विभाग दिले जाणार आहेत त्या विभागांनीं वाटल्यास सदरील प्रकारच्या सवलती रद्द कराव्या, पण त्याजबद्दल त्या मालकांनां पंच ठरवितील तो मोबदला त्यांनीं दिला पाहिजे. या सर्व व्यवस्थेच्या बाबतींत व व्यापारी कलमांखालील दुसर्या व्यवस्थेच्या बाबतींत ज्या तुर्की व्यापारीमंडळ्या युद्धापूर्वीं दोस्त-हुकमतीखालीं होत्या त्या दोस्त प्रजाजनांच्या म्हणून समजल्या जातील.
-प्रकरण १०.-
अंतरिक्षक्रमण.
दोस्तांच्या आकाशयानांनां टर्कीच्या जमिनीवर व जलप्रदेशावर वाटेल तिकडे जाण्यायेण्याचा व वाटेल तेथें उतरण्याचा, तसेंच टर्कींच्या मुलखांतून दुसर्या मुलखांत जाण्याचा हक्क टर्की देत आहे. टर्कीमध्यें जीं विमानगृहें राष्ट्रीय व्यवहारासाठीं म्हणून आहेत तीं सर्व दोस्तांनीं वापरावीं, टर्कीच्या आकाशयानांनां वरील बाबतींत असणारे सर्व हक्क दोस्तांच्या यानांना आहेत, व व्यापारी माल आकाशमार्गानें नेण्याआणण्यासंबंधांत दोस्तांच्या यानांनां पहिल्या नंबरच्या सवलतीच्या राष्ट्राप्रमाणें वागविलें जाईल, असें सामान्यतः ठरलेलें आहे. दोस्त सांगतील त्या ठिकाणीं विमानगृहें बाधण्याचें टर्की पत्करीत आहे. टर्कीच्या जमिनीवरून व जलप्रदेशावरून दोस्तांच्या आकाशयानांनां जाण्यायेण्यास अडथळा न व्हावा यासाठीं विशेष प्रसंगीं विशेष उपाययोजना करण्याचा हक्क दोस्तांनां आहे. टर्कीच्या बाजूनें लढलेल्या राष्ट्रांनां सदरील हक्क नाहींत; तसेंच दोस्तांच्या संमतीवांचून या राष्ट्राच्या साध्या बिनलष्करी लोकांनां आकाशमार्गें जाण्यायेण्याची सवलत टर्कीनें द्यावयाची नाहीं. मात्र या राष्ट्रांनीं राष्ट्रसंघाचें सभासदत्व स्वीकारावें किंवा १३ ऑक्टोबर १९१९ च्या कराराप्रमाणें त्यांनीं चालावें असी त्यांस दोस्तांकडून परवानगी मिळाली तर टर्कीनें त्यांस बिनलष्करी आकाशयानें टर्कींच्या जलस्थलप्रदेशांत चालविण्याची परवानगी देण्यास हरकत नाहीं. सदरील १३ आक्टोबरच्या करारांत जे अंतरिक्षणक्रमणासंबंधीं नियम दाखल आहेत त्या नियमांप्रमाणें टर्कीचीं आकाशयानें चालतील अशी हमी टर्की घेत आहे. या प्रकरणांतील कलमांची अंमलबजावणी टर्की राष्ट्रसंघाचें सभासदत्व पत्करील किंवा त्याला सदरील १३ आक्टोबर १९१९ च्या कराराप्रमाणें चालण्याची दोस्त परवानगी देतील त्या वेळीं बंद होईल.
-प्रकरण ११.-
बंदरें, जलमार्ग व लोहमार्ग.
दोस्त देशांतून येणारीं व दोस्त देशांत जाणारीं माणसें, माल, जहाजें, आगगाड्या वगैरेंनां तुर्क मुलखांत तुर्की प्रजाजनांप्रमाणें जाण्यायेण्याची पूर्ण मोकळीक पाहीजे. तुर्क मुलखांतून दुसर्या देशांत जाण्यायेण्याबद्दल दोस्तांच्या मालावर कसलीहि जकात ठेवूं नये. वाहतुकीचे दर भलतेच ठेवूं नयेत. जहाजें अथवा दुसरीं नेआणीचीं साधनें अमुक राष्ट्राचीं आहेत अथवा नाहींत या गोष्टींवर त्यांनां सवलती देणें किंवा त्यांजवर जादा खर्च लादणें अवलंबून ठेवूं नये. तुर्कराज्यांतून परमुलखांत जाणार्या येणार्या व्यापारी मालावर दोस्तांची देखरेख राहील व अशा मालाच्या बाबतींत कोणाला विशेष सवलती अथवा त्रास दिला जाऊं नये अशी व्यवस्था होईल. अप्रत्यक्षपणेंहि असा पंक्तिप्रपंच करण्याची मनाई आहे. तुर्कांच्या मुलखांतून परमुलखांत जाणारा माल लवकर नेला जाईल अशी तजवीज केली जाईल. दोस्तांच्या बंदरांकडे जाणार्या मालावर विशेष कर आकारण्याची मनाई आहे. तसेंच या बंदरांकडे जाणार्या मालाला बुद्धया मागें ठेवून इतरांचा माल अगोदर रवाना करण्याचीहि मानाई आहे.
पूर्वेकडील बंदरांपैकीं खालील बंदरें सार्वराष्ट्रीय केलीं आहेत. या बंदरांत राज्यसत्ता सामान्यतः तुर्क सरकारचीच राहील. ज्या बंदरांत अशी राज्यसत्ता सर्व अथवा अल्पांशानें नाहींशी केली आहे त्यांच्या संबंधानें स्वतंत्र कलमें आहेत. सार्वराष्ट्रीय बंदरें:-
सेंट स्टिफानोपासून डोल्मा वागचीपावेतोंचा कान्स्टांटिनोपलाचा भाग, हैदरपाशा, स्मर्ना, अलेक्झांड्रेटा, हैफा, बसरा, ट्रेबिझाँड, बाटुम. राष्ट्रसंघाच्या सभासद-राष्ट्रांचे प्रजाजन, माल व निशाणें यांनां या बंदरांत सर्वांस सारखें पूर्ण स्वातंत्र्य राहील. या बंदरांत या सर्वांनां सवलती भाडीं व करपट्ट्या यांसंबंधानें सारखेंच वागविलें जाईल. या वरील बंदरांत “स्वतंत्र क्षेत्रें” म्हणून कांहीं टापू निश्चित केलेले आहेत. या स्वतंत्र भागांत सर्व राष्ट्रांनां लागतील त्या सोई कोणालाहि कमी अधिक न गणतां केल्या पाहिजेत. या भागांत एक लहानशी कायमची पट्टी जकात म्हणून घेतली जाईल. याखेरीज दुसरी कसलीहि जकात अगर इतर पट्टी या स्वतंत्र क्षेत्रांत कोणाकडूनहि घेतली जाणार नाहीं.
भूमध्य समुद्र व इजियन समुद्र यांजकडे जाण्याचा मार्ग तुर्कांनां खुला रहावा म्हणून टर्कीच्या राज्यांतून जीं बंदरें व जे मुलुख अलग केले आहेत त्या बंदरांतून व मुलखांतून जाण्यायेण्याची टर्कीला मोकळीक ठेवलेली आहे. स्मर्नाचा जो भाग ‘स्वतंत्र क्षेत्र’ म्हणून ठरेल त्या भागांतील कांहीं भागावर कायमच्या गहाणदाराची सत्ता टर्कीला दिली जाईल. या गहाणाच्या शर्ती राष्ट्रसंघ ठरवील. जॉर्जिया, अझरबैजन, पर्शिया, आर्मिनिया यांनां बाटुम बंदरानें काळ्या समुद्रांत उतरण्याचा हक्क दिला आहे. ट्रेबिझांड बंदरांत आर्मिनियाला कांहीं भाग कायम गहाण म्हणून मिळेल. या गहाणाच्या अटी स्मर्नांत तुर्कांनां घातल्या जातील त्याच असतील.
आगगाड्या.
यासंबंधाच्या कलमांतील सार खालीलप्रमाणें आहे. दोस्त देशांतून टर्कीला येणारा अथवा इतर देशाकरितां आलेला पण टर्कीमधून जाणारा, तसेंच टर्कीमधून अथवा टर्कीच्या रस्त्यांनें इतर देशांतून दोस्त देशाकडे जाणारा जो माल असेल त्याला शक्य तितक्या सवलती मिळतील. ज्या मंडळ्यांच्या दोस्तांच्या इच्छेनें कांहीं विशेष हक्क प्राप्त झाले आहेत, त्या मंडळ्यांच्या हक्कांनां बाध न येतां जितक्या सोईसवलती वरील प्रकारच्या मालाला देणें शक्य आहे तितक्या सर्व देण्याचें ठरलें आहे. बर्नचे भाड्याच्या दरांचाहि विचार या कलमांत केलेला आहे. बर्नचे रेल्वेविषयक ठराव, त्यांच्या जागीं नवा रेल्वेकरार होईपावेतों टर्कीनें बंधनकारक धरून वागावें. नवा रेल्वेकरार झाला म्हणजे तो टर्कीला बंधनकारक होईल. दोस्त देशांतील ठिकाणांचीं थेटचीं तिकिटें असलेल्या माणसांनां व मालाला पोंचविणार्या मालगाड्या व पासेंजर गाड्या, तसेंच परदेशीं वसाहतीसाठीं जाणार्यांच्या गाड्या टर्की आपल्या राज्यांत दोस्तांच्या सहकारितेनें ठेवील. टर्कीच्या राज्यांत ज्या मालाच्या आगगाड्या आहेत त्यांचा व दोस्त देशांतील मालगड्यांचा मेळ बसावा म्हणून लागणारे गाड्यांचे भाग टर्की आपल्या संग्रहीं ठेवील. जे मुलुख टर्कीच्या राज्यांतून वेगळे केलेले आहेत, त्यांत असलेल्या आगगाड्यांचीं स्टेशनें वगैरे बांधकामें त्या त्या नव्या सरकाराच्या स्वाधीन करण्याची तजवीज केलेली आहे. तसेंच या लोहमार्गावर चालवावयास आगगाड्या वगैरे चालता माल टर्कीच्या एकंदर संग्रहांतून किती घ्यावयाचा त्याचें प्रमाण ठरलेलें आहे. आगगाड्यांच्या ज्या रस्त्यांचा कारभार या तहाअन्वयें अनेक सरकारच्या कक्षांत गेलेला आहे, त्या रस्त्यांच्या बाबतींत कोणीं किती गाड्या वगैरे चालत माल घ्यावयाचा तें परस्पर करारमदारानें ठरवावें. हें आपसांत न ठरल्यास राष्ट्रसंघ नेमील त्या पंचांकडून या बाबीचा निर्णय होईल. दोस्त देशांच्या दरम्यान थेट जाणार्या येणार्या मालाची नेआण, गाड्यांची देवघेव, थेटचे वाहतुकीचे दर व या संबंधीच्या इतर गोष्टी, १ आगष्ट १९१४ रोजीं जे तुर्क राज्यांत म्हणून आगगाडीचे रस्ते होते त्यांजपुरत्या ठरविण्यासाठीं, एक कायमची तज्ज्ञपरिषद निर्माण केली आहे. या परिषदेंत ज्या सरकारांचा सदरील वाहतुकीशीं संबंध येतो त्या सरकारांनीं प्रतिनिधी नेमावयाचे आहेत. ही तज्ज्ञपरिषद आपलें काम करूं लागण्यापूर्वीं तात्पुरती व्यवस्था म्हणून असें ठरलें आहे कीं, सैन्याची नेआण, त्याचप्रमाणें दारुगोळ्याची व इतर सामग्रीची नेआण, तुर्क राज्यांतील कांहीं भागांत धान्य वगैरे पाठविणें, नेआणीसंबंधांत विशेष प्रसंगींचे म्हणून जे नियम केलेले आहेत ते रद्द करून मामुली पद्धतीवंर नेआण सुरू करणें, या सर्व बाबतींत दोस्तांच्या अधिकार्यांकडून ज्या सूचना टर्कीला केल्या जातील त्याप्रमाणें त्यानें वागावें.
येत्या पांच वर्षांत सार्वराष्ट्रीय वाहतुकीची व्यवस्था व जलमार्ग, बंदरें, आणि लोहमार्ग यांची सार्वराष्ट्रीय व्यवस्था, या बाबतींत जे सामान्य करारमदार राष्ट्रसंघाच्या पसंतीनें होतील ते सर्व टर्की मान्य करील.
ध्वनिवाहक व लेखवाहक तारायंत्रें.
(टेलिफोन व टेलिग्राफ).
टर्कीच्या राज्यांत टेलिफोन व टेलिग्राफच्या तारा घालण्यासाठीं टर्की विशेष सवलती देऊ पुढें या तारयंत्रांची व्यवस्था ठेवील. दोस्तांच्या दरम्यानच्या दोन्ही प्रकारच्या तारायंत्री व्यवहाराला टर्की सर्व प्रकारची मोकळीक ठेवील. हा तारायंत्र-व्यवहार आपलाच आहे असें समजून सर्व प्रकारच्या राष्ट्रीय तारायंत्राच्या सवलती टर्कीनें याला दिल्या पाहिजेत. कॉन्स्टांटिनोपलच्या हद्दींतील तारा जमिनीवर जोडण्यासंबंधीचे हक्क टर्कीनें दोस्त सांगतील त्या सरकारच्या अथवा कंपनीच्या स्वाधीन केले पाहिजेत. जेद्दा-स्वाकिन आणि सायप्रस-लाटाकिया या जलगामी तारांचें स्वामित्व टर्की प्रमुख दोस्तांच्या स्वाधीन करीत आहे.
सर्व सामान्य कलमें.
सदरील बाबींत कोठें मतभेद वगैरे होईल त्याचा निर्णय राष्ट्रसंघ करील. माणसें व माल वहाणें आणि परमुलखांत जाणार्या माणसांनां व मालाला टर्कींतून मार्ग देणें या बाबतींत सर्व दोस्तांनां सारख्याच सवलती ठेवाव्या अशा स्वरूपाचीं जीं कलमें आहेत त्यांचा राष्ट्रसंघ तीन वर्षांनीं विचार करील राष्ट्रसंघानें अशी तपासणी न केल्यास, सदरील कलमांचा अंमल जीं दोस्त राष्ट्रें टर्कीला उलट सवलती देतील त्यांच्यापुरताच राहील.
निरनिराळ्या राष्ट्रांशीं टर्कीनें पूर्वीं केलेल्या करारनाम्याअन्वयें त्या त्या राष्ट्रांनां दिलेल्या हक्क-सवलतींत जो फेरफार या तहांतील तत्संबंधीं कलमाअन्वयें होत आहे तेवढा वगळून बाकी जे कांहीं विशेष हक्क सदरील कौलबंदीनें कोणा राष्ट्राच्या प्रजाजनांनां, टर्कीच्या मुलखांत प्रजा झाले असतील त्यांनां अथवा सदरील करारनाम्यांच्या जागीं दुसरे करारनामे होऊन कोणाला दिले जातील त्यांनां या तहानें बाधा येत नाहीं.
-प्रकरण १२ वें. -
या प्रकरणांत जर्मनांशीं झालेल्या तहांत जे मजूरवर्गासंबंधाचा करारनामा आहे तो सविस्तर दिला आहे.
-प्रकरण १३ वें.-
किरकोळ कलमें.
२६ फेब्रुवारी १८८५ रोजीं पास झालेला बर्लिनचा करारनामा तसेंच २ जुलै १८९० रोजीं पास झालेला ब्रुसेल्सचा करारनामा व या करारनाम्यांत पुरवणीदाखल अथवा सुधारणेदाखल पास झालेले इतर करारनामे यांतून असलेलीं हत्यारांबाबतचीं आणि दारूबाबतचीं व दुसर्या गोष्टींबाबतचीं जीं कलमें आहेत तीं टर्की मान्य करीत आहे व असले दुसरे करारनामे दोस्त यापुढें करतील तेहि टर्की मान्य करील. १९१८ जुलैमध्यें फ्रान्स व मोंटेको यांच्या दरम्यान झालेल्या तहाला प्रस्तुत तह करणारीं राष्ट्रें मान्यता देत आहेत. या तहनाम्यावर सही करणार्या कोणत्याहि दोस्त राष्ट्राकडे टर्कीचें, हा तह सहीशिक्कायुक्त होण्यापूर्वींच्या घटनांवरून, जें घेणें वगैरे निघत असेल तें सर्व टर्की सोडून देत आहे. कोणत्याहि दोस्त राष्ट्राच्या प्राईझ कोर्टानें (जप्त-जहाज-न्यायचेरीनें) तुर्की जहाजांच्या बाबतींत दिलेला निकाल व हुकुम टर्की मान्य करील. तुर्की जप्त-जहाज-कचेर्यांनीं दिलेले फैसल्ले तपासण्याचा अधिकार दोस्त कचेर्यांनां आहे. युद्धामध्यें टर्कीच्या फौजेनें मोडलेल्या व बुडविलेल्या जहाजांची माहिती टर्कीनें दोस्तांनां पुरविली पाहिजे. तसेंच दोस्त सरकारच्या अथवा दोस्त प्रजाजनांच्या (दोस्त प्रजाजनांच्या कंपन्या धरून) कला-कुसरीच्या वस्तू, ऐतिहासिक स्मृतिचिन्हें, संगृहीत कागदपत्र व विजयचिन्हें जीं तुर्कांनीं पाडाव करून नेलीं तीं सर्व परत केलीं पाहिजेत.
यानंतर टर्कीचा पुराणवस्तुविषयक कायदा सुधारण्यासंबंधींचे नियम व ह्यापुढें पुराणवस्तुसंशोधन कोणत्या नियमांनुसार चालावे ते नियम या तहांत आहेत. तसेंच टर्कीपासून विभक्त केलेल्या मुलखांतील धार्मिक, पुरातन, ऐतिहासिक व कलाकुसरीच्या वस्तू युद्धामध्यें टर्कीनें आणल्या असतील त्या परत कराव्या, या मुलखांतील संगृहीत कागदपत्र, बांधकामांच्या वगैरे योजनापत्रिका, जमीनविषयक हक्कांचे कागद व मुलकी लष्करी जमाबंदी, न्याय आणि इतर खात्यांचे वरीलखेरीज इतर कागदपत्र वगैरे टर्कीनें त्या त्या सरकारच्या स्वाधीन करावे, टर्कींतील वकफसंबंधीं कागदपत्र पाहण्याचा हक्क या मुलखांतील सरकारांनां टर्कीनें उलट सवलतींच्या अटीवर द्यावा, युद्धतहकुबीच्या तहानंतर दोस्त न्यायकोर्टांनीं जे निकाल दिले आहेत ते टर्कीनें मान्य करावे, दोस्तराष्ट्रें वाटल्यास तिर्हाईत राष्ट्रांची सल्ला घेऊन टर्कीच्या राज्यासाठीं जी आरोग्यविषयक कारभाराची योजना ठरवितील ती टर्कीनें मान्य करावी, हेजाझच्या यात्रेंत आरोग्यविषयक कारभाराची नियंत्रणा कोणाच्या हातांत असावी ती सदरप्रमाणें दोस्त राष्ट्रें ठरवितील तीहि टर्कीनें मान्य करावी, हा तह अमलांत येण्यासाठीं जरूर ते कायदे टर्कीनें पास करून घ्यावे, या तहाच्या अंमलबजावणीच्या संबंधांत ज्या गोष्टींचा तपास करणें राष्ट्रसंघाच्या कारभारीमंडळाला जरूर वाटेल त्या गोष्टीच्या तपासाला सर्वप्रकारें मदत टर्कीनें करावी, अशा प्रकारचीं कलमें तहांत आहेत. रशिया राष्ट्रसंघाच्या सभासद झाला व कांहीं विवक्षित शर्ती त्यानें मान्य केल्या तर त्याला या तहाचा एक भागीदार होतां येईल असेंहि कलम तहांत आहे.
या तहावर टर्कीची सही झाली व प्रमुख दोस्तांपैकीं तिघांची सही झाली (या तहावर टर्कीतर्फें १० आगस्ट १९२० रोजीं सही झाली) कीं, हा तह तेवढ्या दोस्तराष्ट्रपुरता अमलांत येईल.
तुर्कांसंबंधाचा झालेला हा तह योग्य आहे अगर अयोग्य आहे हा विचार करण्याची जागा नाहीं. लोकमत क्षुब्ध फार झालें तें कां झालें, हिंदुस्थानाची अत्यंत राजनिष्ठा आणि शांतताप्रिय प्रजा येथील अधिकारीवर्गाच्या विरुद्ध फार कां झाली एवढेंच येथें स्पष्ट करावयाचें होतें व याचसाठीं वरील गोष्टी दिल्या आहेत.
तुर्कांशीं हा जो तह झाला त्या तहाविरुद्ध जे आक्षेप आणले जातात त्यांत ब्रिटिश मुत्सद्यांकडून कांहीं वचनभंग झाला आहे असेंहि प्रतिपादिलें जातें. वचनभंग झाल कीं झाला नाहीं हाही विचार येथें अप्रस्तुत आहे. इंग्रजी अधिकार्यांनीं पॅन इस्लामिझमच्या शिकवणीस पूर्वीं जें उत्तेजन दिलें त्यामुळें येथील मुसुलमानांच्या मनांत कांहीं भावना वाढविल्या गेल्या; या भावनांनां तुर्की तहामुळें मोठा धक्का कसा बसला याची कल्पना वरील हकिकतीवरून येईल. आजच्या असंतोषास पूर्वीं उत्तेजित केलेली पॅन इस्लामिझम् बरीचशी कारण झाली असें म्हणण्यास आम्हांस हरकत दिसत नाहीं.
असहकारितेच्या ठरावास जोर मिळण्यास कारण झालेल्या अंतःस्थ कारणांमध्यें ज्याला अत्यंत प्राधान्य दिलें जातें तें कारण म्हटलें म्हणजे पंजाबप्रकरण होय हें वर सांगितलेंच आहे. पंजाबांत १९१९ एप्रिल, मे व जूनमध्यें जे प्रकार घडले त्यांचा देशावर मोठा परिणाम झाला. काँग्रेसनें यासंबंधानें एक कमिशन नेमून चौकशी केली व एक अहवाल प्रसिद्ध केला. त्या अहवालांत निरनिराळ्या गांवीं झालेले म्हणून जे प्रकार उल्लेखिले आहेत, त्यांपैकीं कांहीं मासल्यासाठीं खालीं दिले आहेत.
पंजाबांत झालेल्या प्रकारांची लष्करी दृष्टीनें योग्यायोग्यता ठरविण्याचें हें स्थळ नव्हे. येथें लोक प्रक्षुब्ध होण्यास कारण काय झालें याची नीट कल्पना येण्यापुरत्या कांहीं गोष्टी मात्र संक्षेपानें वर्णिल्या आहेत.