प्रस्तावनाखंड - विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
ग्रंथप्रवेश
बुद्धपूर्वजगासंबधाने माहिती या भागांत दिली आहे. ही माहिती वाचकांस प्रसंगीं अपुरी, प्रसंगीं अतिविस्तृत अशी वाटेल. मिसरदेश किंवा असुरदेश यांविषयीं जितकी निश्चित बुद्धपूर्व माहिती आहे तितकी आज हिंदुस्थानासंबंधानें नाही, असें असतां हिंदुस्थानावर पुष्कऴ पानें खर्चिलीं आहेत आणि मिसर असुर देश यांनां पानें थोडी दिलीं आहेत. याला स्वदेशाभिमानाखेरीज निराऴें कारण वेदकालासंबंधी जी माहिती प्रस्तुत ग्रंथापूर्वी प्रसिद्ध झाली आहे ती आमच्या मतानें अनिश्चित अपुरी व कांहींच निश्चयात्मक न सांगणारी आहे. जास्त पानें व्यापण्यास माहितीची निश्चितता कारण होत नसून अनिश्चितता कारण होतें. वेदांसंबंधी आम्हांस जे कांही मांडावयाचें ते संशोधकग्रामांतील प्रचलित मतांविरूद्ध असल्यामुऴें अधिक सविस्तर विवेचन करणें प्राप्त झालें. इजिप्त व असुर यांच्या इतिहासाविषयीं आणि संस्कृतीविषयी लेखांत जी माहिती दिली आहे ती प्रचलित ग्रंथांवरून दिली आहे. आम्ही आमच्या जबाबदारीवर लिहीलें असें त्यांत कांहींच नाहीं.
हिंदुस्थानाच्या राजकीय इतिहासाची साधारण स्थूल कल्पना द्यावयाची झाल्यास पहिलें महत्वाचें वृत्त म्हटलें म्हणजे दाशराज्ञयुद्ध होय. हे कुरूयुध्दापूवा सुमारें ६०० वंर्षे झालें असावें. रामरावणयुद्ध खरोखर झालें होतें असें खात्रीनें सांगतां येत नाहीं, तथापि तें झालें असणेंहि अशक्य नाहि. ते झालें असल्यात तें दाशराज्ञयुध्दापूर्वी सुमारें शेंदोनशे वर्ष झालें असावें. तें झालें असल्यास तें दाशराज्ञयुद्धापूर्वीचें महत्वांचें राजकीय वृत्त होय. कुरूयुद्ध ख्रिस्तर्पूव १५०० वर्षे या सुमारास झालें असलें तर दाशराज्ञयुद्ध ख्रि. पू. २१०० वर्षें या सुमारास झालें असावें, आणि रामरावणयुद्ध ख्रि. पू. २३०० वर्षें या सुमारास झालें असावे. दाशरथी रामचंद्रापूर्वीची राजावलि विचारात घेतल्यास गंगथडीची इतिहास आपणांस ख्रि. पू. ३५०० पासून ४००० पर्यंत फार तर नेतां येईल. इतकें झालें तरी इजिप्त व असुर याचा इतिहासप्रारंभ व भारतीय इतिहासप्रारंभ यांमध्ये ४००० वर्षाचें भगदाड पडतेंच.
बुद्धपूर्व जगाच्या इतिहासांमध्यें बराचसा भाग अनिश्चित आहें. असुर व मिसर यांचे ख्रि. पू. ८००० वर्षापासून राष्ट्ररूपानें आणि संस्कृतिरूपानें अस्तित्व असलें, व हिंदुस्थानचें ख्रिस्तपूर्व चार हजार वर्षें इतकें संस्कृतिरूपानें अस्तित्व असलें पाहिजें असें धरलें तरी भारतीय संस्कृतीस अर्वाचीनत्व येतें. ऐक्ष्वाकु वगैरे राजघराणीं जमेस धरलीं तरी त्यांच्या अगोदरची संस्कृति कशी काय होती कऴत नाही. तसेच दक्षिणेकडे कोणती राष्ट्रे होती, त्याची इक्ष्वाकुपूर्वसंस्कृति काय असावी, हेंहिं सांगता येत नाहीं. कुरूयुध्दाचा काऴ आज पूर्णपणे निश्चित झाला आहे असें आम्हांस वाटत नाहीं. ख्रि. पू. १५०० हा अजमासें काऴ म्हणून घेतला आहें. कित्येकांच्या मतें हा ख्रि. पू. १८०० पर्येंत जातो, तर कित्येक हे युद्ध ख्रिस्तपूर्व १२०० पर्यंत आणून ठेवतात. वेदांत धतिराष्ट्रांचा व पारिक्षिताचा उल्लेख असून देखील कुरूयुध्दाचा उल्लेख नसल्यामुऴें हे युद्ध झालें होतें किंवा नाही अशाहि शंका प्रदर्शित केल्या गेल्या आहेत. या विषयावर वाडःमय पुष्कऴ असल्यामुऴें आणि सुतवर्ग हे युद्ध झालें किंवा न झालें याविषयीं बिलकुलच संशय दाखवीत नसल्यामुऴें, आणि उल्लेखाचा अभाव अस्तित्वाविरूद्ध खात्रीलायक पुरावा नसल्या मुऴें हे युद्ध झालें असलें पाहिजे असें गृहीत धरलें आहे आणि त्याचा अजमासें काल ख्रि. पू. १५०० हा धरला आहे.
दुस-या व तिस-या भागांतील वेदविषयाचें विवेचन एकंदर तपासलें तर कांहीं ठिकाणीं थोडीशी परस्परविरूद्धता आढऴून येईल. आणि याचें कारण असें कीं, दुस-या भागाचें मुद्रण बहुतेक संपल्यानंतर या भागांत व्यक्त केलेलीं आमची मतें दृढ झालीं. दुसरा भाग मुद्रित झाला त्या वेऴेस, ऋग्वेद हे आर्यम् लोकांचे देशप्रवेशवाडःमय नव्हे. सर्व ऋग्मंत्रापूर्वीं दाशराज्ञ युद्ध झालें, दाशराज्ञयुध्दापूर्वीच देश्य आर्यंम् सूतसंस्कूति अनेक शतकें अंसावी, आर्यदासभेद जातिमूलक नसून यजनविषयक होता, वर्ण शब्दाचा जुना अर्थ आचार किंवा संप्रदाय असावा इत्यादि मतें निश्चित झालीं. नसल्यामुऴें संशोधकवर्गोत असलेल्या जुन्या कल्पनांची छटा मधून मधून त्यांत दिसेल. पण ती फार थोडी आहे.
प्रस्तुत भागांत वेदकालीन शब्दसृष्टी हे प्रकरण दुस-या भागांतच घालण्यासाठीं तयार केंलें होतें, ते फारसा बदल न करतां तसेच मुद्रित केंलें आहे. या प्रकरणांत वर दिलेल्या मताशीं संगति उत्पन्न करण्याकरितां फेरफार करावयाचे ते केले नाहींत; उलट भिन्न ग्रंथकारांची मतें मांडलीं आहेत. हीं मांडतांना मेकडोनेल आणि कीथ यांच्या ‘वेदिक इंडेक्स’ चा बराच उपयोग केलेला आहे आणि जेव्हां वेदिक इंडेक्सने दिलेल्या आधारांचें विशिष्ट पुस्तक हातांशीं नसेल तेंव्हां वेदिक इंडेक्स मधले विधान जसेंचें तसेंच ठेवलें आहे.
बुद्धपूर्व जगाच्या इतिहासास आरंभ केला आहे तो विश्वोत्पत्तिविषयक विचारांपासून केला आहें. जडापासून जीवाची उत्पत्ति कशी झाली हें शास्त्रज्ञांस अजून मोठें गूढ आहे. स्पेन्सरनें आपल्या विकासवादाच्या मांडणींत तेवढाच भाग वगऴला आहे. विकासवादाच्या मांडणीचा तो भाग भरून काढावा म्हणून अनेक प्रयत्न झाले आहेत ते सर्वस्वी यशस्वीं झाले नाहींत तथापि ती मांडणी कशी करतां येते हें दाखविण्यासाठीं प्रो. सहस्रबुध्दे यांचा एक लेख दिला आहे. जीवोत्पत्तीपासून मनुष्य विकासापंर्यत ज्या अनेक पायर्या आहेत त्यांचें विवेचन येथें केलें नाहीं. तें शरीरखंडांत येईलच. मनुष्यप्राणी प्रथम कोंठें विकसित झाला, त्याचें प्राथमिक स्वरूप कसें होंतें हीं अजून गूढेंच आहेत. त्या विषयावर शेकडों ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत मनुष्यप्राण्याचा विकास आणि आज उपलब्ध असलेले अनेक मानववंश व अनेक भाषा यांचा वंशवृक्ष पद्धतशीर तयार करतां येईल इतकी शास्त्राची प्रगति झाली नाहीं. मनुष्यभ्रमणाचा इतिहास तयार झाला नाही, म्हणून हीं तयार करण्याचा प्रयत्न कसा चालू आहे हें दाखविण्यासाठीं या इतिहासक्षेत्रास उपयोगीं पडण्यासारखी शास्त्रीय पद्धति येथें मांडली आहे. भाषाशास्त्रविषयक अभ्यासामध्ये शब्दसंग्रह व भाषांचे व्याकरण यांच्या प्राचीन इतिहासाचें अवगमन करण्यासाठीं बलाबल किती आहे हेंहि मांडलें आहे. हें विवेचन सामान्य वाचकास एतव्दिषयक शास्त्रीय पद्धतीमध्ये प्रवेश करून देण्यात उपयोगीं पडेल अशी अशा आहे.
ज्ञानकोशाच्या प्रस्तावनाखंडाचे पांचहि विभाग मिळून एक पूर्ण ग्रंथ होतो. तिसरा आणि चौथा विभाग मिऴून सामाजिक व राजकीय इतिहासाची संगति मांडली आहे, आणि पांचव्या विभागांत ज्ञानाच्या वाढीचा इतिहास आहे. पहिला विभाग जगाचें अवलोकन भारतीय दृष्टीनें करीत आहे, आणि आपले अत्यंत व्यापक हितसंबंध पहात आहे. दुसरा विभाग हा तिसर्या व पांचव्या विभागाचा सामान्य आरंभ होय. वेद हें साहित्य राजकीय व सामाजिक इतिहासांसाठीं तिसर्या विभागांत उपयोजिलें, तर वैज्ञानिक इतिहासासाठीं ते अवगाहन करून त्यापासून उत्पन्न होणारें ज्ञान पांचव्या विभागांत मांडलें वैज्ञानिक, सामाजिक आणि राजकीय इतिहासाचा प्रारंभ जे वेद त्यांच्याच अस्तित्वाचें स्पष्टीकरण अत्यंत व्यापकपणें करणें हे दुसर्या विभागाचें कार्य होय. वेदविषयक अभ्यासावर ज्ञानकोशाच्या प्रस्तावनाखंडांतील सुमारें एक हजार पृष्ठें खर्ची पडलीं आहेत, व त्यांत जे संशोधन मांडले आहे ते करण्यासाठीं तीस हजार रूपयांवर रक्कम खर्च झाली आहे.
बुद्धपूर्व जगामध्ये जैन मताची संस्थापना धरतां येईल. जैन मत महावीरापूर्वीं होतें असें धरलें तर जैनांची प्राचीनता बुद्धाच्या पुष्कळच पूर्वीची होईल. बुद्धपूर्व जगाच्या इतिहासामध्यें जैन मत घ्यावयास हवें पण जैन वाडःमय मात्र अत्यंत जुन्या बौद्ध ग्रंथांनंतरचें आहे. या संप्रदायाची अशी स्थिति असल्यामुळें हें वाडःमय व संप्रदायाची हकीकत शेवटीं परिशिष्टांत दिली आहें. जैन वाडःमयाचा हा इतिहास डा. विंटरनिट्झ यांच्या ग्रंथाधारे लिहिला आहे.
हा भाग तयार करतांना राजश्री य. रा. दाते; स. वा. देशपांडे; चि. शं. दातार; सिद्धेश्वर शास्त्री चित्राव; ल. के. भावे; चिं. ग. कर्वे व मि. एच. कोडन यांची उल्लेख करण्याजोगी मदत झाली आहे.