प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.
 
प्रकरण ६ वें.
वेदप्रवेश-ब्राह्मणें.

वेदग्रंथांचा संहितांनंतर दुसरा मोठा वर्ग जो ब्राह्मणांचा, त्याविषयीं मॅक्समुल्लरनें एके ठिकाणीं असें म्हटलें आहे कीं, भारतीय वाङ्मयाच्या क्षेत्रांतील संशोधकांनां हे ब्राह्मण ग्रंथ कितीहि हृदयंगम वाटले तरी, सामान्य सुशिक्षित लोकांनां ते अगदींच नीरस वाटतात. ह्यां ग्रंथांत नुसती बडबड, आणि त्याहीपेक्षां वाईट म्हणजे पारमार्थिक बडबड, ह्याखेरीज दुसरा विषय नाहीं. भारतीय बौद्धिक संकृतीच्या इतिहासांत ह्या ब्राह्मणग्रंथांचा केवढा दर्जा आहे हें ज्याला म्हणून माहीत नाहीं, त्याला तर पुरतीं दहा पानें वाचून झालीं नाहींत तोंच पुस्तक मिटून ठेऊन द्यावें असें वाटल्यावांचून राहणार नाहीं. {kosh Essays by Max Muller p. 105.}*{/kosh} हे ग्रंथ यजुर्वेदापेक्षांहि वाचण्याला कंटाळवाणे वाटतात हें जरी खरें असलें तरी भारतीय लोकांचें अलीकडच्या काळांतील सबंध धार्मिक व तात्त्विक वाङ्मय आकलन करण्याच्या कामीं ह्यांचीच कांस धरणें जरुर पडतें व शिवाय सामान्य धर्मशास्त्राच्या दृष्टीनेंहि ह्यांचें फार महत्त्व आहे. धर्मशास्त्रांचें अध्ययन करणाराला स्तोत्रांचा इतिहास जाणण्यास यजुर्वेदसंहितांकडे ज्याप्रमाणें धांव घ्यावी लागते, त्याप्रमाणें त्याला यज्ञयाग व पौरोहित्य यांच्यासंबंधीच्या इतिहासाचें ज्ञान करुन घेण्यास ब्राह्मण ग्रंथांना अगदीं प्रमाणभूत मानावें लागतें.

ब्राह्मण ह्या शब्दाचा मूळ अर्थ, यज्ञकर्मामधील एखाद्या मुद्दयावरील विद्वान् याज्ञिकाचें विवेचन असा आहे; व ह्या शब्दाचा समुदायविषयक अर्थ घेतल्यास, यज्ञकर्मावरील याज्ञिकांच्या अशा चर्चांचा व विवेचनांचा एक संग्रह, असा अर्थ निघतो. कारण, यज्ञकर्माला फारशा पोषक नाहींत अशा जगदुत्पत्तिविषयक गोष्टी व इतर जुनीं कथापुराणें जरी या ग्रंथांतून पुष्कळ सांपडतात, तरी ह्यांत यज्ञयागाशिवाय चर्चेचा दुसरा विषय नाहीं. ह्यांत वाजसनेयि संहितेप्रमाणें मोठमोठाले यज्ञ सांगितले आहेत, त्यांविषयीं निरनिराळे विधी संस्कार दिले आहेत व निरनिराळ्या यज्ञकर्मांतील संबंध व त्यांतील शस्त्रें व स्तोत्रें या सर्वांचें कधीं अक्षरशः तर कधीं थोडक्यांत निरुपण केलेलें आहे. वरील गोष्टींनां विधींची सांकेतिक योजना, त्यांचीं कारणें व तसेंच त्यांचा स्तोत्रकर्माशीं संबंध हीं जोडण्यांत आलेलीं आहेत. विधिसंस्कारांच्या मुद्द्यांवर जेथें विद्वान् लोकांत निरनिराळीं मतें आहेत तेथें एका मतास पुष्टि देऊन, इतर मतांचा अनादर करण्यांत आला आहे. कांहीं ठिकाणीं निरनिराळ्या प्रदेशांनां निरनिराळे संस्कार घालून दिले आहेत व कांहीं विशिष्ट प्रसंगीं यज्ञसंस्कारांत सुद्धां फेरबद्दल केलेला आढळतो. यज्ञकर्मांत याज्ञिकांना किती दक्षिणा द्यावी हें बरोबर रीतीनें प्रत्येक वेळीं सांगण्याची कधींहि कसूर झालेली दिसत नाहीं. त्याचप्रमाणें, यजमानाला अमुक अमुक यज्ञकर्मसंस्कारांपासून ह्या जन्मीं किंवा पुढील जन्मीं अमुक अमुक फळ मिळतें हें विस्तृत रीतीनें सांगण्यांत आलें आहे. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे, जर पारमार्थिक ज्ञानाला ‘शास्त्र’ असें म्हणतां येईल तर ह्या ब्राह्मणग्रंथांचें “यज्ञशास्त्रग्रंथ” असें आपणांला सार्थ नामाभिधान करतां येईल.

पूर्वीं ह्या ब्राह्मणग्रंथांसारखे पुष्कळ ग्रंथ असावेत, कारण उपलब्ध असलेल्या ब्राह्मणग्रंथांतून अनुपलब्ध ब्राह्मणग्रंथांतील पुष्कळसे उतारे सांपडतात. हे अनुपलब्ध ग्रंथ सोडून दिल्यास राहिलेले ब्राह्मणग्रंथहि कांहीं थोडेथोडके नाहींत. हे सर्व ग्रंथ भारतीय वाङ्मयाच्या महाग्रंथपंक्तींत येऊन बसतात. चार वेद निरनिराळे आहेत हें त्यांच्या संहितांवरुन दिसून येतें. ह्या प्रत्येक वेदापासून व त्याच्या शाखांपासून निरनिराळे पुष्कळ ब्राह्मणग्रंथ तयार झाले. कृष्णयजुर्वेदसंहितेंत मंत्रांखेरीज यज्ञाचा उद्देश व कार्य ह्यासंबंधी चर्चा व अभिप्राय ह्यांचाहि अंतर्भाव केलेला आहे. यजुर्वेदसंहितेंत जे अशा प्रकारचे ब्राह्मणग्रंथांसारखे घटकावयव आहेत, त्यांपासून हें ब्राह्मण वाङ्मय तयार झालें. कृष्णयजुर्वेदांत मंत्रांशीं संबद्ध असलेले यज्ञकर्मविधी व अर्थवाद ह्यांचा जो उपन्यास केलेला आहे त्याचा आधार घेऊन एकामागून एक वैदिक संप्रदायांनीं आपले भिन्न भिन्न ग्रंथ तयार केले, व पुढें पुढें तर असा नियमच ठरल्यासारखा झाला कीं, प्रत्येक वैदिक संप्रदायाला त्याचा स्वतःचा असा एक ब्राह्मण ग्रंथ पाहिजे. या गोष्टी लक्ष्यांत घेतल्या असतां, ब्राह्मणग्रंथांची संख्या इतकी मोठी कशी झाली, कांहीं ग्रंथ त्यांतील विस्तार व विषय ह्यांवरुन पाहतां ब्राह्मण ह्या नांवाला अपात्र असतांना व पुष्कळ अर्वाचीना असतांना ब्राह्मणग्रंथ ह्या सदराखालीं कसे आले हें समजून येते. “ब्राह्मण” ह्या नांवांनीं ओळखले जाणारे पुष्कळसे सामवेदाचे ग्रंथ वरील प्रकारचे आहेत; त्यांनां वेदांगें हेंच नांव सार्थ होईल. त्याचप्रमाणें अथर्ववेदाचा “गोपथ ब्राह्मण” ग्रंथ हा ग्रंथांत अगदीं अलीकडच्या काळांत जे कांहीं वेदविषयक ग्रंथ निर्माण झाले आहेत त्यांपैकीं एक होय. प्राचीन काळीं अथर्ववेदाचा ब्राह्मणग्रंथ मुळींच नव्हता. पुढें जेव्हां प्रत्येक वेदाचा एखादा तरी ब्राह्मणग्रंथ पाहिजे अशी कल्पना रुढ झाली, तेव्हां ही उणीव भरुन काढण्याचा प्रयत्न केला गेला.

आतां, जुन्या ब्राह्मण ग्रंथांत जे अगदीं महत्त्वाचे असे आहेत त्यांपैकीं कांहींची ओळख करुन घेऊं:-

ऐतरेय ब्राह्मण.- हें ऋग्वेदाचें ब्राह्मण आहे. ह्यांत आठ पंचिका व प्रत्येक पंचिकेंच पांच अध्याय, असे एकंदर चाळीस अध्याय आहेत. महिदास ऐतरेय हा ह्या ग्रंथाचा कर्ता असावा असें म्हणतात, पण वास्तविक तो फक्त ह्याचा संग्राहक किंवा प्रकाशक होतासें दिसतें. ह्यांत प्राधान्यानें सोमयाग (अग्निष्टोम), अग्निहोत्र व राजसूय यांचें वर्णन आलेलें आहे. शेवटले १० अध्याय पाठीमागून ह्या ब्राह्मणास जोडले आहेत असें मानण्यांत येतें.

कौषीतकी ब्राह्मणः- कौषीतकी किंवा शांखायन ब्राह्मण हें ऋग्वेदाचें दुसरें ब्राह्मण होय. यांत तीस अध्याय आहेत. पहिल्या सहा अध्यायांत अग्न्याधान, अग्निहोत्र, दशपूर्णमासाच्या इष्टी, ऋतुयाग वगैरेसंबंधीं माहिती दिली आहे; व सात ते तीसपर्यंतच्या अध्यायांत अगदीं ऐतरेय ब्राह्मणांतल्यासारखें सोमयागाचें वर्णन दिलें आहे.

पंचविंश किंवा ताण्डय (महा) ब्राह्मण.– हा पंचवीस अध्यायांचा एक सामवेदाचा ब्राह्मणग्रंथ आहे. अतिप्राचीन ब्राह्मणांपैकीं हा एक आहे. यांत जुन्या महत्त्वाच्या कथा सांपडतात. याच्या १७ व्या अध्यायांत व्रात्य-यक्ष-स्तोमाचें जें वर्णन आलें तें विशेष बहारीचें आहे. ह्या यज्ञसंस्कारानें हीन, पतित व बहुधा अनार्य जातींच्या लोकांना पावन करुन ब्राह्मणवर्णांत घेत असत.

षड्विंश ब्राह्मण.- हें पंचविंश ब्राह्मणाचें पूरक किंवा परिशिष्टच आहे म्हटल्यास चालेल. पंचविंश ब्राह्मणांत २५ अध्याय आहेत, तेव्हां हा त्याचा २६ वा अध्यायच आहे असें पाहिजे तर म्हणावें. ह्यांतील शेवटच्या म्हणजे सहाव्या अध्यायास “अद्भुत ब्राह्मण” म्हणतात. ह्यांत शकुन, अपशकुन, अरिष्ट वगैरेंचें वेदांग ग्रंथाप्रमाणें विवेचन आहे.

जैमिनीय ब्राह्मण.- हें सामवेदाचें ब्राह्मण आहे. हें फारसें प्रख्यात नाहीं.

तैत्तिरीय ब्राह्मण.- हा ग्रंथ तैत्तिरीय कृष्णयजुर्वेदाच्या संहितेचा उत्तरभागच म्हणतां येईल. कृष्णयजुर्वेदाच्या संहितेंत ब्राह्मण आलेलें आहे. त्यावरून तैत्तिरीय-ब्राह्मणांतील भाग तैत्तिरीय संहितेला मागाहून जोडण्यांत आला आहे हें उघड होतें. ह्या तैत्तिरीय ब्राह्मणांत आलेलें पुरुषमेधाचें वर्णन आपण प्रथम येथेंच पाहतों. अशा प्रकारचा यज्ञ संहितेंत कोठेंहि नाहीं. यज्ञशास्त्राची घटना नवीन आहे अशाबद्दलच्या अनेक पुराव्यांपैकीं हा एक पुरावा आहे.

शतपथ ब्राह्मण.- हा शुक्लयजुर्वेदाचा प्रमुख ब्राह्मणग्रंथ आहे. ह्याचें १०० अध्याय आहेत, म्हणून ह्याला “शतपथ” असें नांव पडलें, सर्व ब्राह्मण ग्रंथांत हा फार महत्त्वाचा व प्रसिद्ध असा ग्रंथ आहे. वाजसनेयि संहितेप्रमाणें ह्या ब्राह्मणाच्याहि दोन शाखा आहेत, एक कण्वाची व दुसरी माध्यंदिन. माध्यंदिन-शाखीय ब्राह्मणांत १०० अध्यायांचीं १४ कांडें आहेत. पहिल्या नऊ कांडांत वाजसनेयि संहितेंतील १८ अध्यायांत सांगितलेल्या कर्मानुष्ठानांवर सविस्तर विवेचन केलेलें आहे. हीं पहिलीं नऊ कांडें शेवटल्या पांच कांडांपेक्षां जुनीं आहेत यांत शंका नाहीं. यांतील पहिलीं पांच कांडें एकमेकांशीं बरींचशीं संबद्ध आहेत. त्यांत वारंवार याज्ञवल्क्याला आचार्य असें संबोधून त्याचें म्हणणें प्रमाणभूत मानलें आहे. चवदाव्या कांडाच्या शेवटीं त्याला अखिल शतपथ ब्राह्मणाचा कर्ता असें म्हटलें आहे. तेंच ६ ते ९ कांडांत याज्ञवल्क्याचें नुसतें नांव सुद्धां दृष्टीस पडत नाहीं. त्याच्या ऐवजीं अग्निचयनादि कर्मांसंबंधानें शांडिल्य हाच प्रमाणभूत मानून त्याचे आधार दाखविले आहेत. दहाव्या कांडांतल्या अग्निरहस्याचा प्रख्यापक तो हाच शांडिल्य. ११ ते १४ हीं कांडें मागील भागाला परिशिष्टांसारखीं असून शिवाय ह्यांत कांहीं अध्याय साधारणतः ब्राह्मण ग्रंथांत न येणा-या अशा विषयांवर आहेत. उदाहरणार्थ उपनयन हा विषय, यांत विद्यार्थ्याला धार्मिक ग्रंथांचें गुरुजवळ अध्ययन करावयाचें असतें (११, ५, ४), स्वाध्याय, हा ब्रह्मदेवाप्रीत्यर्थ यज्ञ म्हणून मानला जाई (११, ५, ६-८), उत्तरक्रिया व समाधि बांधणें (१३, ८). १३ व्या कांडांत अश्वमेध, पुरुषमेध व सर्वमेध हे विषय आहेत व १४ व्यांत प्रवर्ग्यसंस्कार आहे. ह्या विस्तृत ग्रंथाचा शेवट जुन्या पण महत्त्वाच्या बृहदारण्यक उपनिषदामध्यें झाला आहे.

निरनिराळ्या वेदांच्या ब्राह्मणांतील फरक असा मांडतां येतो कीं, ऋग्वेदाच्या ब्राह्मणांत एकंदर यज्ञविधीचें विवेचन करितांना, होत्यानें म्हणजे ऋग्वेदाच्या ऋचा म्हणणारानें जो विधि करावयाचा त्याचें समग्र वर्णन दिलें आहे, सामवेदाच्या ब्राह्मणांत उद्गात्यांची म्हणजे सामवेदगायकांचीं जीं कर्तव्यकर्मे आहेत तीं तपशीलवार दिलीं आहेत, आणि यजुर्वेदांच्या ब्राह्मणांत अध्वर्यूनें जीं जीं यज्ञसंबंधीं कामें करावयाचीं असतात त्यांविषयीं साद्यंत माहिती सांगितली आहे. त्यांतील महत्त्वाच्या मुद्दयांविषयीं पाहतां सर्व ब्राह्मणें जवळजवळ सारखींच आहेत असें म्हटल्यास चालेल. त्यांच्यांतील मुद्दयाचा विषय बहुधा एकच असतो व म्हणून सर्व एकाच साच्यांतले आहेत. हें वाङ्मय निर्माण होऊन त्याचा विस्तार होण्याला बरींच शतकें लागलीं असावींत. हा दीर्घ काळ लक्षांत घेतां वरील सादृश्य विशेष चित्त वेधक होतें. ५०।६० आचार्यांच्या वंशावळीवर {kosh “वंश ब्राह्मण” म्हणून सामवेदाला जोडून एक ब्राह्मण ग्रंथ आहे. त्यांत ४३ आचार्यांची एक वंशावळी आहे. शेवटचा आचार्य जो कश्यप ह्याला अग्निदेवापासून ही वंशावळी मिळाली असें सांगतात. शतपथब्राह्मणामध्यें चार निरनिराळे वंशवृक्ष दिले आहेत. त्या ग्रंथाच्या शेवटीं दिलेल्या एका वंशवृक्षाच्या प्रारंभीं असें वाक्य आहे कीं, “हें ब्राह्मण आम्हांला भारद्वाजी पुत्रापासून प्राप्त झालें आहे, भारद्वाजी पुत्राला वात्सिमांडवीपुत्रापासून ...” इ. ४० आचार्यांच्या मातृप्राप्त नांवांचीं यादी ह्यापुढें आलेली आहे. या यांदींतील ४५ वा याज्ञवल्क्य आहे. उपनिषदांत ज्याचा उल्लेख आलेला आहे तो उद्दालक ऋषि ह्याचा गुरु असें येथें सांगितलें आहे. शेवटचा (५५वा) मानव आचार्य जो कश्पनैध्रुवि त्याला प्रत्यक्ष वाग्देवीनें हें ब्राह्मण शिकविलें. वाग्देवीला तिचा पिता जो अंभृण ह्याजपासून व अंभृणाला आदित्यापासून या ब्राह्मणाचा उपदेश झाला.}*{/kosh} जर आपला विश्वास असेल तर मग सदरील काल १००० वर्षाच्या पलीकडे आहे असें म्हणतां येईल.

या वंशावळींचा हेतु यज्ञाचा उगम, ब्रह्मन्, प्रजापति किंवा आदित्य अशासारख्या देवतांपासून झालेला आहे हें दखविण्याचा असतो. असें जरी आहे तरी त्यांतील पुष्कळ नांवें खरोखरी अस्तित्वांत असलेल्या घराण्यांतल्या नांवांशीं जुळतात; तेव्हां तीं सर्व काल्पनिक आहेत असें म्हणणें वाजवी होणार नाहीं. या सर्व आचार्यांच्या वंशावळी सोडून दिल्या तरी ब्राह्मणग्रंथांतून ज्यांनां प्रमाणभूत मानलें आहे अशा पुष्कळ आचार्यांचीं नांवें कायम राहतात. ब्राह्मणसंग्राहक यज्ञशाखांचा उत्पत्तिकाल भूतकालाच्या पोटांत फार खोल आहे असें जें मानतात तें खरें असलें पाहिजे. यज्ञशास्त्राच्या विकासाला पुष्कळ शतकांची आवश्यकता होती. ब्राह्मणवाङ्मयाच्या विस्तारास लागलेलीं हीं शतकें कोणचीं असा जर प्रश्न आला तर संहितांच्या कालाप्रमाणें या ठिकाणींहि निश्चित काल सांगतां येणार नाहीं. यासंबंधांत निश्चित गोष्टी आहेत त्यां ह्या कीं, ऋग्वेदमंत्ररचना ब्राह्मणवाङ्मयाच्या फार पूर्वीच पुरी झाली होती व सूक्तकाव्य हें स्तोत्र आणि यज्ञ यांचें मिळून एक निराळें “शास्त्र” बनविण्यास सुरुवात झाल्याच्या वेळचें आहे. त्याचप्रमाणें हेंहि बहुधा निश्चित आहे कीं, अथर्ववेदांतील बहुतेक अभिचारमंत्र व विधी हे ब्राह्मणविधानांच्या फार पूर्वींचे आहेत. असें दिसतें कीं, अथर्ववेदसंहिता आणि यज्ञविषयक संहिता (म्हणजे यजुर्वेद व सामवेद) यांचा शेवटचा संग्रह व ब्राह्मणवाङ्मयाचा प्रारंभींचा संग्रह बहुधा समकालीन असावेत, म्हणजे या सहितांचा अगदीं शेवटचा शेवटचा भाग व ब्राह्मणांचा अगदीं पहिला भाग, हे दोन्ही एकाच काळीं रचले असावेत. एका बाजूला यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद यांच्या संहिता व दुस-या बाजूला ब्राह्मणें घेऊन, या दोहोंतील देशविभाग व लोकस्थिति यांचें ज्ञान करुन देणा-या गोष्टींची ऋग्वेदांतील तशाच जातींच्या गोष्टींशीं तुलना करुन पहिल्यास हेंच सिद्ध होतें. ऋग्वेदकाळांत आर्यलोक सिंधुनदीच्या आसपासच्या प्रदेशांत वास्तव्य करीत होते, पण अथर्ववेदकाळांत ते पूर्वेकडे गंगा व यमुना या नद्याकांठच्या प्रदेशांपर्यंत आले होते असें दिसतें. ब्राह्मणें व यजुर्वेदसंहिता ह्यांतून उल्लेखिलेला प्रदेश हा कुरूंचा व पांचाळांचा प्रदेश होय. माहाभारतांत वर्णन केलेल्या किंबहुना महाभारतरचनेस स्पूर्तिदायक झालेल्या मोठमोठ्या लढाया ह्या कुरु व पांचाळ ह्या दोन वंशांत झालेल्या घनघोर लढाया होत. कुरुक्षेत्राच्या पवित्र भूमींत स्वतः देव यज्ञयाग करीत असत असें मानण्यांत येतें. कौरवांचें राज्य जें कुरुक्षेत्र तें गंगायमुना यांच्या पश्चिमेकडील भागांत सरस्वती व दृपद्वती या दोन लहान नद्यांमधील प्रदेशांत वसलें होतें व शोजारचें पांचाळांचें राज्य गंगा व यमुना या नद्यांमधील प्रदेशांत वायव्येकडून आग्नेयीकडे पसरलें होतें. हिंदुस्थानांतील हा विशिष्ट प्रदेश ज्याला गंगा व यमुना यांमधील “दुआब” म्हणतां येईल व जो दिल्लीपासून मथुरेपर्यंत पसरला आहे तो अजून देखील “ब्रह्मावर्त” (ब्राह्मणभूमि) या नांवानें प्रसिद्ध आहे. ब्राह्मणधर्मशात्राप्रमाणें येथील चालीरीती सर्व हिंदुस्थानदेशभर पाळण्यांत याव्या असें आहे. यजुर्वेदसंहितांचें व ब्राह्मणांचें उगमस्थान म्हणूनच हें स्थान पूज्य व प्रसिद्ध आहे असें नव्हे, तर हें सर्व ब्राह्मण संस्कृतीचें माहेरघर आहे. ब्राह्मण संस्कृति येथूनच सर्व देशभर पसरली.

ऋग्वेदकालानंतर धार्मिक व सामाजिक स्थित्यंतरें बरींच झालीं. अथर्ववेदांतल्याप्रमाणेंच यजुर्वेदसंहिता व ब्राह्मणें ह्यांतून देखील ऋग्वेदांतील देव सांपडतात; पण त्यांचें सामर्थ्य कमी झालेलें दिसून येतें. त्यांच्या वांट्याला जें कांहीं सामर्थ्य येतें तें यज्ञापासून. ह्याच्या उलट, विष्णू, रुद्र, शिव ह्यांसारखे ऋग्वेदांतील गौण देव यज्ञविषयक संहिता व ब्राह्मणें ह्यांतून प्रामुख्यानें भाग घेतात. या ग्रंथांत प्रजापति हा श्रेष्ठ देव म्हणून मानण्यांत आला. देव व त्याचप्रमाणें असुर या सर्वांचा तो पिता होय. असुर हा शब्द – अवेस्तांत ह्याला समानार्थी “अहुर” असा शब्द आहे – ऋग्वेदांत देव ह्या अर्थी असून, तो वारंवार वरुण देवाला उदेशून योजला आहे; पण पुढें त्याला “दानव” असा अर्थ आला. ब्राह्मणांत वारंवार देव व असुर ह्यांच्यांत लढाई जुंपत असल्याचें सांगितलें आहे. पण ह्या लढाया ऋग्वेदांतील इंद्र व वृत्र यांच्या लढाईप्रमाणें घनघोर नसत. देव व असुर एकमेंकांवर चढाई करण्याकरितां यज्ञांची कांस धरीत. ब्राह्मणांत असें सांगितलें आहे कीं, देवांनां सुद्धां आपल्या कार्यसिद्धीकरितां यज्ञ करावे लागतात. ब्राह्मण ग्रंथांतून यज्ञाला जितकें महत्त्व दिलें आहे तितकें  दुस-या कशालाहि दिलेलें नाही. या ठिकाणीं यज्ञ हा इष्टसिद्धीचें साधन या दृष्टीनेंच केवळ वर्णिलेला नसून हा स्वतःच आपल्या ठिकाणीं एक साध्य म्हणून किंबहुना उच्चतम जीवितसाध्य म्हणून मानलेला आहे. यज्ञ ही एक सर्वांनां भारी अशी शक्ति आहे; इतकेंच नव्हे तर ही सृष्टीची उत्पादक शक्ति आहे; व म्हणून सृष्ट्युत्पादक प्रजापति हा यज्ञतुल्य आहे किंवा यज्ञ हा प्रजापतितुल्य आहे, कसेंहि म्हटल्यास वावगें होणार नाहीं. “प्रजापति हा यज्ञ आहे” हें वाक्य ब्राह्मणांमध्यें पुष्कळ ठिकाणीं आढळून येतें. “यज्ञ हा सर्व वस्तूंचा व सर्व देवांचा आत्मा आहे.” “सर्वं वा एषोऽभि दीक्षते । यो दीक्षते यज्ञं ह्याभिदीक्षते यज्ञं ह्येवेदं सर्व मनु तं यज्ञं सभ्भृत्य यमिममभिदीक्षते सर्वमिदं विसृजते ।।“

यज्ञाशीं संबंध येत असलेली प्रत्येक गोष्ट किंवा वस्तु सारखीच महत्त्वाची व मंत्रप्रभावाची असते, मंत्र व विधी, ऋचा व त्यांचे छंद, गीतें व त्यांचे स्वर, या गोष्टी व यज्ञपात्रें हीं सर्व सारख्याच दर्जाचीं व महत्त्वाचीं आहेत. प्रत्येक यज्ञकर्म फार फार विस्तारानें सांगितलें आहे. क्षुल्लक बाबीला सुद्धां फार महत्त्व देण्यांत आलें आहे. एखादें कर्म उजव्या अंगाला करावें कीं डाव्या, यज्ञभूमीवर एखादें भांडें मांडावयाचें झालें तर तें या जागीं मांडावें कीं त्या जागीं, दर्भाचें टोंक उत्तरेला करावें कीं ईशान्येला, होत्यानें अग्नीच्या पुढून पदन्यास करावा कीं मागून, त्यानें तोंड कोणच्या दिशेला करावें, यज्ञाच्या अन्नाचे किती भाग पाडावेत, अग्नींत तूप टाकावयाचें तें त्याच्या उत्तरार्धांत कीं दक्षिणार्धांत किंवा मधोमध, कोणत्या वेळीं मंत्राचा पुनः पुनः उच्चार करावयाचा, कोणत्या वेळीं कोणतें स्तोत्र म्हणावयाचें ह्या सर्व गोष्टींचा एकामागून एक अशा असंख्य यज्ञाचार्यांनीं विस्तृतपणें विचार केलेला दिसतो व ब्राह्मणांत यासंबंधाचें फारच शोधक बुद्धीनें निरूपण केलें आहे. याजकाचें बरेंवाईट सर्व ह्या गोष्टीविषयींच्या त्याच्या ज्ञानावर अवलंबून असतें. याविषयीं शतपथ ब्राह्मणांत खालीलप्रमाणें म्हटलें आहेः-

“होय. हीं यज्ञांतील अरण्यें व ओसाड जागा आहेत. यांतून पलीकडे जाण्यास शेंकडों दिवस गाडींत बसून जावें लागतें. जे या अरण्यांत कांहीं माहिती नसतांना प्रवेश करितात त्यांची, अरण्यांत फिरणा-या मूर्ख मनुष्यांची क्षुधा व तृषा लागल्यामुळें किंवा दुष्ट व राक्षस पाठीस लागल्यामुळें जशी अवस्था होते तशी अवस्था होते. परंतु जे ज्ञाते आहेत ते एका नदीच्या प्रवाहापासून दुस-या नदीच्या प्रवाहाकडे किंवा एका सुरक्षित जागेपासून दुस-या सुरक्षित स्थळाकडे जावें त्याप्रमाणें एका देवतेपासून दुस-या देवतेकडे जातात व याप्रमाणें मोक्ष व स्वर्ग मिळवितात. {kosh शतपथ ब्रा. १२.२.३,१२.}*{/kosh}

यज्ञविद्यारूपी अरण्यांतून मार्गदर्शक होणारे “ज्ञाते” लोक म्हणजे याज्ञिकच; तेव्हां याज्ञिक ब्राह्मणवर्णाचा अधिकार त्या वेळीं अमर्यादित असल्यास नवल नाहीं. ब्राह्मणवर्ण असें जें म्हटलें तें चुकीचें नाहीं; कारण ब्राह्मणांतून व त्याचप्रमाणें अथर्ववेदाच्या कांहीं खंडांतून अशा तर्‍हेचा वर्ण आढळतो. त्या वेळीं वर्णाश्रमधर्मपद्धति अस्तित्वांत होती. “{kosh तैत्तिरीय सं. १.७.३,१.}*{/kosh} ब्राह्मण हे प्रत्यक्ष देवच आहेत” असें वारंवार म्हटलेलें पाहण्यांत येतें. शतपथब्राह्मणांत तर असें सांगितलें आहे कीं,

इया वै देवा देवाः । अहैव देवा अथ ये ब्राह्मणाः श्रुश्रुवाॐसोऽनूचानास्ते मनुष्यदेवास्तेषां द्वेधा विभक्त एव यज्ञ आहुतय एव देवानां दक्षिणा मनुष्यदेवानां ब्राह्मणांनाॐशुश्रुवुषामनूचानानामाहुतिभिरेव देवान् प्रीणाति दक्षिणाभिर्मनुष्यदेवान् ब्राह्मणाञ्छुश्रुवुषोऽनूचानांस्तऽएनमुभये देवाः प्रीताः सुधायां दधति ।। शतपथ ब्रा. २.२.२, ६.

देव दोन तर्‍हेचें आहेत. पहिले देव म्हणजे स्वर्गांतलें देव. विद्वान् व अध्ययन करणारें जे ब्राह्मण ते मनुष्यांतले देव. यांच्यामध्यें यज्ञाची पुढील दोन तर्‍हेनें वांटणी केली  आहे. देवांनां आहुति देण्यांत येते; व विद्वान् आणि अध्ययन करणा-या ब्राह्मणांनां दक्षिणा देण्यांत येते. यजमान (यज्ञ करणारा) देवांनां आहुती देऊन संतुष्ट करतो व विद्वान् व अध्ययन करणा-या ब्राह्मणांनां दक्षिणा देण्यात येते. यजमान (यज्ञ करणारा) देवांना आहुती देऊन संतुष्ट करतो व विद्वान व अध्ययन करणा-या ब्राह्मणांना दक्षिणा देऊन संतुष्ट करतो. ह्या योगानें हे उभय तर्‍हेचे देव त्याला स्वर्गलोकांत आनंदाप्रत नेतात.

ब्राह्मणग्रंथांतून ब्राह्मणांचीं चार कर्तव्यें सांगितलीं आहेत. तीं ब्राह्मणपरंपरा चालविणें, शील राखणें, (ज्ञान मिळवून) कीर्ति संपादन करणें व “लोकांना पक्कदशेला आणणें” (यज्ञ करुन लोकांना परलोकास पात्र करून ठेवणें) हीं होत. त्याचप्रमाणें, “परिपक्क” झालेल्या लोकांनीं ब्राह्मणांशीं कसें वागावें ह्याबद्दल चार नियम केले आहेत. अशा लोकांनीं ब्राह्मणांनां मान द्यावा, पारितोषिकें द्यावींत, त्यांच्यावर जुलुम करूं नये व त्यांना ठार मारू नये. राजानें केव्हांहि ब्राह्मणाच्या संपत्तीला शिवतां कामा नये. राजानें आपलें सर्व राज्य व राज्यांत जें कांहीं असेल तें जरी यज्ञदक्षिणा म्हणून ऋत्विजांनां देऊन टाकलें तरी ब्राह्मणांची संपत्ति त्या दानांत येऊं शकत नाहीं. आतां राजाला ब्राह्मणांवर जुलूम करतां येईल, पण त्यानें तसें केल्यास त्याचें कल्याण होणार नाहीं. राज्याभिषेकाच्या वेळीं उपाध्याय खालील अर्थाचे मंत्र म्हणतो. “लोकहो । हा मनुष्य तुमचा राजा आहे; आम्हां ब्राह्मणांचा राजा सोम आहे.” ह्यावर शतपथ ब्राह्मणांत अशी टीका आहे. “या विधीच्या योगानें उपाध्याय सर्व राष्ट्राला राजाचें भक्ष्य करुन सोडतो; तो फक्त ब्राह्मणांनां वगळतो; म्हणून राजानें ब्राह्मणाला आपलें भक्ष्य करूं नये; कारण तो त्याचा राजा नसून सोम हा त्याचा राजा आहे.{kosh शतपथ ११.५.७, १, १३.५., २४, १३.१.५,४, ५.४, २, ३.}*{/kosh}” फक्त ब्राह्मणाचा खून हाच खरा खून. ब्राह्मण व अब्राह्मण यांच्या भांडणांत न्यायाधीशानें ब्राह्मणाच्या वतीनेंच नेहमीं निकाल दिला पाहिजे, कारण ब्राह्मणाला कधीं विरोध करतां कामा नये. {kosh शतप १२.३.५, ३. तैत्तिरीय सं. २.५.११,९.}*{/kosh} मृत मनुष्याच्या क्रियेच्या वेळीं लागणारा अश्मा व मृत्तिकापात्रें, अग्निहोत्राकरितां पाळलेली गाय नाठाळ किंवा रोगी असेल तर ती, अशांसारख्या इतरांनां देण्याला निषद्ध मानलेल्या गोष्टी, ब्राह्मणांनां देऊन टाकाव्या असें आहे; विशेषतः यज्ञांत उरलेलें अन्न व इतर पदार्थ ब्राह्मणांखेरीज इतरांनां निषिद्ध आहेत; ब्राह्मणानें मात्र त्यांचा यथेच्छ उपभोग घ्यावा, कारण “ब्राह्मणाचें पोट कशानेंहि दुखत नाहीं किंवा बिघडत नाहीं.” {kosh तैत्तिरीय सं. २.६.८, ७.}*{/kosh}

याप्रमाणें शेवटीं असा सिद्धांत निघतो कीं, ब्राह्मण हा स्वर्गांतल्या देवांच्या तोडीचा मृत्युलोकींचा कोणी देव आहे असें नसून, त्यानें स्वतःच आपणाला देवकोटींत घालून टाकलें आहे. शतपथब्राह्मणांत तर म्हटलें आहे कीं, {kosh शत.ब्रा. १२.४.४,६.}*{/kosh} ‘ब्राह्मण हा एका ऋषीचा वंशज असून त्याच्या ठिकाणीं सर्व देव एकाकार झाले आहेत.’ ब्राह्मणग्रंथांच्या प्रारंभीं दिसून येणारें अशा प्रकारचें ब्राह्मणवर्गाचें धार्ष्ट्य व त्याचा अहंकार हें केवळ संस्कृतीच्या इतिहासांतलें ब्राह्मणी औद्धत्याचें एक मजेदार उदाहरण नसून, सबंध भारतीय प्राचीन कालांत दिसून येणा-या, किंबहुना अतिप्रातीन आर्य लोकांच्या मनोभूमींत चांगल्या रुजलेल्या अशा भावनांचें {kosh अविव्दांश्वैव विद्वांश्व ब्राह्मणो दैवतं महत्। मनु. ९.३१७.                   
+    +    +    +    +    
सर्वथा ब्राह्मणाःपूज्याःपरमं दैवतं हि तत् । मनु. ९.३१९.)}*{/kosh}
हें एक बाह्यचिह्न आहे असें म्हणतां येईल. उदाहरणार्थ, एकीकडे एक हिब्रू कवि असें म्हणतो कीं, “हा मनुष्य मनुष्य तरी कोण, कीं ज्याविषयीं तूं नेहमीं सावधान असतोस व हा पावन मनुष्य तरी कोण कीं तूं ज्यास भेटूं इच्छितोस” तर दुसरीकडे एक ग्रीक कवि असें लिहितो कीं, “जगांत सामर्थ्यवान् अशा पुष्कळ गोष्टी आहेत पण त्या सर्वांत जास्त सामर्थ्यवान् असा मनुष्यच”. एक जर्मन कवि, ज्यानें फॉस्ट म्हणून एक अति बलवान् मनुष्य कल्पून त्याला भूतलोकाच्या द्वारावर जोरानें लत्ताप्रहार करावयास लावलें आहे तो ‘प्रॉमेथियस’ या काव्यांत, प्रॉमेथियसच्या तोंडीं असे शब्द घालतोः-

“देवांनो । ह्या पृथ्वीवर तुमच्यासारखे दीनवाणे व कंगाल कोणीहि नसतील |"

ब्राह्मणग्रंथांतून असें आढळून येतें कीं, यज्ञप्रभावामुळें याज्ञिकाला देवांच्याहि वरचा दर्जा प्राप्त होतो. महाकाव्यांतून तर असें वाचण्यांत येतें कीं, उग्र तप आचरिल्यानें तपस्व्यांचा एवढा मोठा बडेजाव वाढतो कीं, देवांनां आपली गादी कायम राहते कीं नाहीं अशाविषयीं संदेह उत्पन्न होतो. बौद्धधर्मांत तर सर्व देव व त्यांचा राजा इंद्र ह्यांचें महत्त्व अगदीं कमी करून टाकण्यांत आलें आहे. इतर मर्त्यांपेक्षां ह्यांच्यांत अधिक कांहीं असेल तर ती त्यांची ब-यापैकीं राहणी व तीसुद्धां ते बुद्धभक्त आहेत तोंपर्यंतच. त्यांच्यावर फक्त बुद्धदेवच आहे असें नाहीं तर, जगाला तुच्छ मानून व सर्व प्राण्यांच्या ठायीं प्रेमबुद्धि ठेवून जो अर्हत् म्हणजे साधु बनला आहे असा प्रत्येकजण बुद्धदेवाप्रमाणेंच या देवांच्या वर असतो.

यावरून असें दिसून येतें कीं, बौद्धधर्माचा उगम ज्या मोठ्या धार्मिक चळवळीपासून झाला आहे, तिचें बीज या ब्राह्मणग्रंथांतून अगोदरच रुजलेलें होतें. जूनीं अस्सल ब्राह्मणें हीं बौद्धकालापूर्वीचीं आहेत याविषयीं शंका नाहीं. ब्राह्मणग्रंथांत बौद्धधर्माचा मागमूसहि लागत नाहीं, {kosh वाजसनेयी-संहितेंत (अ. ३०) पुरुषमेधाच्या यादींत मठवासी, परिव्राजिका किंवा बुद्धभिक्षु यांपैकीं कोणाचाहि उल्लेख नाहीं, हें लक्षांत ठेवण्यासारखें आहे. ही यादी जुन्या ब्राह्मणांच्या मागाहूनच्या काळांतली आहे.}*{/kosh} पण बौद्धग्रंथांतून ब्राह्मणवाङ्मयाचा उल्लेख केलेला आढळतो. यावरून आपल्याला असें सप्रमाण म्हणतां येईल कीं, हीं ब्राह्मणें व यज्ञविषयक संहिता ज्या शतकांत तयार झाल्या, त्या शतकांचा काल ऋग्वेदसंहिता व स्तोत्रप्रबंध हीं पुरीं झाल्यानंतरचा व बौद्धधर्म प्रचारांत येण्यापुर्वींचा आहे.

ब्राह्मणग्रंथांतून कोणकोणत्या विषयांचें प्रतिपादन केलें आहे याची कल्पना येण्याकरितां,   त्यांतील कांहीं थोडीं उदाहरणें घेणें बरें. ब्राह्मणांतील विषयांचे दोन मुख्य वर्ग करण्यांत येतात, एक विधि व दुसरा अर्थवाद. विधि म्हणजे “नियम, निर्देश” व अर्थवाद म्हणजे “अर्थासंबंधीं विवेचन” आरंभीं ब्राह्मणांत एक एक विधि कसा करावयाचा याविषयीं नियम घालून दिले आहेत व नंतर यज्ञकर्म व मंत्र यांतील हेतु, अर्थ यांचें विवेचन व निरूपण त्यांपुढें जोडलें आहे. उदाहरणार्थ शतपथब्राह्मणांत सुरुवातीलाच, यजमानानें दर्शपूर्णमासेष्टीच्या आदल्या दिवशीं जें व्रत करावयाचें असतें त्याचें विधी सांगितले आहेत ते असेः-

व्रतमुपैष्यन् । अन्तरेणाहवनीयञ्च गार्हपत्यञ्च प्राड्तिष्ठन्नपऽउपस्पृशति तद्यदपऽउपस्पृशत्यमेध्यो वै पुरुषोयदनृतं वदति तेन पूतिरन्तरतो मेघ्या वाऽआपो मेध्यो भूत्वाव्व्रतमुपायानीति पवित्रं वाऽआपः पवित्रपूतो व्व्रतमुपायानिति तस्माद वा अपऽउपस्पृशति ।।१।। श. १.१, १.

“व्रत करणारा मनुष्य पूर्वाभिमुख होऊन आहवनीय व गार्हपत्य ह्या अग्नींच्या मध्यें उभा राहून पाण्यामध्यें आपले हात बुडवितो. त्याचें कारण असें कीं मनुष्य खोटें बोलतो म्हणून अपवित्र आहे आणि अपवित्र आहे म्हणून तो अंतःशुद्धि करतो, पाणी हें यज्ञाला योग्य (पवित्र) आहे. जयमान असा विचार करतो कीं, “मी यज्ञाला योग्य (पवित्र) झालों म्हणजे व्रत करीन. पाणी हें एक शुद्ध करण्याचें साधन आहे. ह्या साधनानें शुद्ध होऊन व्रत करीन. आणि म्हणून तो पाण्याला स्पर्श करतो.”

ह्या साध्या विधिनिर्देशाला कांहीं बाबातींत निरनिराळ्या आचार्यांची टीका जोडली आहे. कांहीं वादग्रस्त प्रश्नांचा या टीकेंत ऊहापोह केलेला आहे. उदाहरणार्थ, हें विशिष्ट व्रत आचरतांना यजमानानें उपवास करावा कीं नाहीं ह्याविषयीं वाद उत्पन्न झाला आहे, तो असाः

अथातोऽशनानशनस्यैव । तदु हाषाढः सावयसोऽनशनमेव व्रतं मेने मनो ह वै देवा मनुष्यस्याजानंति तऽएनमेतदव्रतमुपयन्तं विदुः प्रातर्न्नो यक्ष्यतऽइति तेऽस्य व्विधे देवा गृहानागच्छन्ति तेऽस्य गृहेषूपवसन्ति सऽउपवसथः ।।७।।
तन्न्वेवानवक्लृप्तम् । यो मनुष्येष्वनश्नत्सु पूर्वोऽश्नीयादथ किमु यो देवेष्वनश्नत्सु पूर्वोऽश्नीयात् तस्मादु नैवाश्नीयात् ।।८।।
तदु होवाच याज्ञवल्क्यः । यदि नाश्नाति पितृदेवत्यो भवति यद्युऽअश्नाति देवानत्यश्नातीति स यदेवाशितमनशितं तदश्नीयादिति यस्य वै हविर्न गृह्णन्ति तदशितमनशितंस यदश्नाति तेनापितृदेवत्यो भवति यद्यु तदश्नाति यस्य हविर्नगृह्णन्ति तेनो देवान्नात्यश्नाति ।.९।।
स वाऽआरण्यमेवाश्नीयात् । या वाऽरण्याऽओषधयो यद्वावृक्ष्यं.......................।। शत. ब्रा. १.१.१.

“आतां भक्षण व उपवास यांचा विचार आषाढसावयस नामक ऋषीचें भक्षण न करावें हेंच व्रत आहे असें मत आहे. कारण देवांनां मनुष्याचें मन कळतें. जो कोणी हे व्रत आचरितो तो दुस-या दिवशीं सकाळीं आपल्यास आहुती देईल हें देवांस माहीत असतें. म्हणून सर्व देव त्याच्या घरीं जतात व त्याच्याच घरीं राहतात (उपवसन्ति). यासाठींच या दिवसास उपवसथ (उपवास) असें म्हणतात.

आतां घरीं आलेल्या अतिथीच्या सुद्धां अगोदर जेवणें जर अगदीं अनुचित आहे, तर प्रत्यक्ष देव आपल्या घरीं आले असतां आधीं भक्षण करणें जास्तच अनुचित होईल. म्हणून काहीं झालें तरी व्रत करणारानें भक्षण करूं नये.

याज्ञवल्क्य ऋषि म्हणतात, जर त्या यजमानानें भक्षण केलें नाहीं तर पितर हेच आपले देव असें समजून त्यांची पूजा करणा-या मनुष्यसारखा तो होईल. परंतु जर त्यानें भक्षण केलें तर देवांच्या अगोदर भक्षण केल्याचा आरोप त्याजवर येतो. तेव्हां जें खाल्लें असतांना, न खाल्यासारखें होतें तेंच भक्षण करावें. ज्या जिनसांचा यज्ञाकडे अन्न म्हणून उपयोग करीत नाहींत अशा जिनसा खाल्ल्या असतां न खाल्ल्याप्रमाणेंच होतें. अशा भक्षणापासून तो पितृदेवत्य होणार नाहीं व देवांनांहि दुखवणार नाहीं कराण ह्याच्यापासून कोणचेंहि यज्ञिय अन्न तयार होत नाहीं. तेव्हां अरण्यांत उत्पन्न होणारे पदार्थ खावे. कंदमुळेंफळें कांहींहि चालेल.”

वरील “उपवसथ” शब्दासारख्या व्युत्पत्ती ब्राह्मणांतून पुष्कळ आढळतात. शिवाय, एखादी व्युत्पत्ति जर बरोबर नसली तर तें विशेष फायदेशीर आहे असें मानण्यांत येतें; कारण देवांनां जें गूढ असें असेल तेंच आवडतें. उदाहरणार्थ, असें सांगतात कीं, इंद्रदेवाचें नांव “इंध्” म्हणजे चेतवणें, प्रदीप्त करणें ह्या धातूवरून पडलें आहे; इंद्राचें पूर्वींचें खरें नांव इंध असें होतें पण पुढें त्याला इंद्र असें संबोधण्यांत आलें; कारण जेवढें प्रच्छन्न असेल तेवढें देवांना प्रिय. त्याचप्रमाणें “उलूखल” म्हणजे उखळ हा शब्द “उरु करोति ।“ ह्या वाक्यापासून अपभ्रंशानें झालेला आहे; “उरुकर” ह्या साध्या शब्दापासून ‘उलूखल” हा गूढव्यंजक शब्द तयार झाला, असें म्हटलें आहे. {kosh शत. ६.१.२, ७.५.१.२२.}*{/kosh} या व्युत्पत्तीकरणाप्रमाणें ब्राह्मणांतून यजुर्वेदसंहितांपेक्षांहि अधिक स्वैर समीकरण व संज्ञाकरण केलेलें आढळून येतें; म्हणजे यांत, नाना प्रकारच्या भिन्न गोष्टी एकत्र आणून त्यांची सांगड घालून देण्यांत आली आहे. खालील उतारे उदाहरणांदाखल दिले आहेत.

अथ तृणैः परिस्तृणाति । व्दन्व्दं पात्राण्युदाहरति शूर्पञ्चाग्निहोत्रहवनीञ्च स्फ्यञ्च कपालानि च शम्याञ्च कृष्णाजिनं चोलूखलमुसले दृषदुपले तदृश दशाक्षरा व्वैविराड्विराड्वै यज्ञस्तव्दिराजमेवैतद्यज्ञमभिसम्पादयत्यथयद् द्वन्द्व वै वीर्यं यदा वै द्वौ सरभेतेऽअथ तद्वर्थं भवति द्वन्द्व  वै मिथुनं प्रजननं मिथुनमेवैतव्प्रजननं क्रियते ।।
शत. १.१.१, २२.

“तो भूमीवर गवत पसरतो. प्रत्येकीं दोन दोन अशीं यज्ञपात्रें आणतो. सूप आणि अग्निहोत्रहवनीय (यज्ञांतील एका भांड्याचें नांव), लांकडी सुरी, खापरें, लांकडी दांडा, हरणाचें कातडें, उखळ, मुसळ, पाटा, वरवंटा, एकंदर सर्व मिळून दहा. विराट् हा दहा अक्षरांचा छंद आहे, यज्ञसुद्धां विराट् (तेजस्वी) आहे. तेजस्वीपणाच्या योगानें यज्ञ विराट्छंदासारखा होतो. तो तीं पात्रें जोडीजोडीनें आणतो, कारण जोडी ही वीर्याची द्योतक आहे. जेव्हां दोघेजण एखादें काम हातांत घेतात तेव्हां तें वीर्यशाली द्वंद्व म्हणजे मिथुन व प्रजोत्पत्ति तेव्हां हीं पात्रें जोडीनें आणल्यानें मैथुनास व प्रजोत्पत्तीस मदत होते.”

पुरुषो वै यज्ञः। पुरुषस्तेन यज्ञो यदेनं पुरुषस्तनुतऽएष वै तायमानो यावानेव पुरुषस्तावान्विधीयते तस्मात्पुरुषोयज्ञः ।।१।।
तस्येयमेव जुहूः । इयमुपभृदात्मैव ध्रुवा तद्वाऽआत्मनऽएवेमानि सर्वाण्यंगानि प्रभवन्ति तस्मादु ध्रुवाया एव सर्व्वोयज्ञः प्रभवति ।।२।।
प्राणऽएव स्त्रुवः । सोऽयं प्राणः सर्व्वाण्यंगान्यनुसञ्चरति तस्मादु स्त्रुवः सर्व्वाऽअनु स्त्रुचः सञ्चरति ।।३।।
तस्यासावेव द्यौर्जुहूः । अथेदमन्तरिक्षमुपभृदियमेव ध्रुवा तद्वा अस्याऽएवेमे सर्व्वे लोकाः प्रभवन्ति तस्मादु ध्रुवाया एव सर्व्वो यज्ञः प्रभवति ।।४।।
अयमेव स्त्रुवो योऽयं पवते । सोऽयमिमान्त्सर्व्वांल्लोकाना नुपवतेतस्मादु स्त्रुवः सर्व्वा अनु स्त्रुचः सञ्चरति ।।५।।
शत. ब्रा. १.३.२.

“यज्ञ हा पुरुषच होय. कारण पुरुषच (वेदीवर बसून) यज्ञाचीं साधनें पसरतो. ह्या तर्‍हेनें केला जाणारा यज्ञ मनुष्याच्याच आकाराचा होतो. म्हणून यज्ञ हा पुरुष होय.

ह्या यज्ञरूपी पुरुषाचा जुहू उजवा हात व उपभृत् हा डावा हात होय. ध्रुवा हा आत्मा होय. ह्या आत्म्यापासून सर्व अवयव उत्पन्न होतात आणि म्हणून सर्व यज्ञसुद्धां ध्रुवेपासूनच उत्पन्न होतो.

स्त्रुव (तुपाची पळी) हा प्राण होय. सर्व अवयवामध्यें प्राण सञ्चार करतो. म्हणून स्त्रुव एका यज्ञाच्या पळीकडून दुसरीकडे संचार करतो.

आकाश हें यज्ञरूपी पुरुषाची जुहू होय. आणि अंतरिक्ष (हवा, वातावरण) हें उपभृतू होय. ही पृथ्वी हीच ध्रुवा होय. सर्व जग हिच्यापासून उत्पन्न झालें. म्हणून ध्रुवेपासूनच सर्व यज्ञाचा उगम होतो.

हा स्त्रुव म्हणजे जो सर्वत्र वाहतो असा वायु होय. हा सर्व लोकांमध्यें वाहतो म्हणून स्त्रुव (तुपाची पळी) एका यज्ञिय पळीकडून दुसरीकडे जातो.”

ब्राह्मणांतून अनेक वेळां अनेक ठिकाणीं यज्ञाला विष्णु व प्रजापति यांच्या जोडीला बसविलें आहे. त्याचप्रमाणें संवत्सरालाहि प्रजापतितुल्य लेखिलें आहे. ह्याशिवाय, वेदी बांधण्याला एक संवत्सर लागतें म्हणून अग्नीला संवत्सर असें कल्पिलें आहे तें निराळेंच. “अग्नि हा संवत्सर आहे, व संवत्सर म्हणजे सर्व ब्रह्मांडें आहेत व ह्यापुढें लगेच “अग्नि हा प्रजापति आहे व प्रजापति संवत्सर आहे” अशा अर्थाचे श्लोक आहेत. आणखी “प्रजापति तर यज्ञ व संवत्सर आहे. अमावास्या हें त्याचें द्वार आहे व चंद्र ही त्या द्वाराची खिटी आहे” {kosh श. ८.२.२, १७-१८, ११.१.१,१.}*{/kosh} अशी एक ऋचा आहे.

ह्या ग्रंथांत संख्यांची सांकेतिक योजना प्रमुखत्वानें केलेली दिसून येते. जसेः-

चतुर्भिरपादत्ते । तद्ये चतुष्पादाः पशवस्तैरेवैनमेतत् सम्भरत्यथोऽअन्नं वै पशवोऽन्नेनैवैनमेतत् सम्भरति त्रिभिरश्यवहरति तत् सप्तसप्तचितिकोऽग्निः सप्तर्तवः संव्वत्सरः संव्वत्सरोऽग्निर्यावत्यस्य मात्रा तावत्तद्भवति ।।७।। श. ६.८.२.

“चार ऋचा म्हणून तो थोडीशी राख उचलतो. त्या योगानें तो यजमानाला सर्व चतुष्पाद पशूंचा पुरवठा करतो. पशू अन्न आहेत, म्हणून पशूंचा पुरवठा करण्यांत तो अन्नाचा पुरवठा करतो. तीन ऋचा म्हणून ती राख तो पाण्याजवळ आणतो. एकूण सात ऋचा म्हणतो; कारण सात थरांचीं यज्ञवेदी केली असते. सात ऋतू म्हणजे वर्ष आणि वर्ष म्हणजे अग्नि. अग्नीच्या आकाराच्या मोठेपणावर त्याचा मोठेपणा अवलंबून आहे. जेवढा अग्नि मोठा तेवढा तोहि मोठा आहे.”

कोठें कोठें अशा प्रकारचें रूक्ष निरूपण थोडें रसभरित झालेलें आहे. ज्या वेळीं ब्राह्मणकालांतील सामाजिक परिस्थिति व नैतिक दृष्टिह्यांवर वरील प्रकारचें निरूपण कांहीं प्रकाश पाडतें तेव्हां तें किंचित् चित्तवेधक होतें. ह्याला उदाहरण घ्यावयाचें म्हणजे, सोमयागाच्या वेळीं अग्नीला “पत्नीवत्” म्हणून जो सोम दिला जातो तत्संबंधीं निरूपण. या निरूपणांत असें सांगितलें आहे की, सदरील अर्पणद्रव्य इतर सोमरसाहून कांहीं बाबतींत वेगळें पडतें, व ह्या बाबतींत जें शास्त्रतिक्रमण होतें  त्याला कारण स्त्रीजातीचें दौर्बल्य आहे. {kosh श. ४.४.२, १३.}*{/kosh}

वाजपेय यज्ञांत बायकोचें नव-याशीं असणारें नातें बहारीनें वर्णिलेलें आहे. त्या ठिकाणीं असा एक विधि असतो कीं, यज्ञस्थाणूला लावलेल्या शिडीवर यजमान बायकोसह चढूं लागतो तेव्हां तो तिला कांहीं प्रश्न विचारतो व ती त्याला उत्तर देते.

स रोक्ष्यन् जायामामंत्रयते । जायऽएहि स्वो रोहावेति रोहावेत्याह जाया तद् यज्जयामामन्त्रयतेऽर्द्धो ह वा एष आत्मनो यज्जाया तस्माद्यावज्जायां न विन्दते नैव तावत् प्रजायतेऽसर्वो हि तावद्भवत्यथ यदैव जायां व्विंदतेऽथ प्रजायते तर्हि हि सर्व्वोभवति सर्व्व एतां गतिं गच्छानीति तस्माज्जायामामन्त्रयते ।। शतपथ ब्रा. ५.२.१,१०.

“स्वर्गामध्यें जातांना तो आपल्या बायकोला म्हणतो, ‘भार्ये’ इकडे ये आपण स्वर्गांत जाऊं या’. त्याची पत्नी ‘ठीक आहे चलावें’ असें उत्तर देते. वरील प्रश्न विचारण्याचें कारण असें कीं पत्नी हा त्याचा (स्वर्गारोहण करणाराचा) अर्धा भाग आहे. जोंपर्यंत त्याला पत्नी नाहीं तोंपर्यंत, तो प्रजोत्पत्ति करीत नाहीं व पूर्णहि होत नाहीं. जेव्हां तो भार्या संपादन करतो तेव्हां तो प्रजोत्पत्ति करतो व त्यायोगें तो पूर्ण होतो. मी पूर्ण व्यक्ति होऊन स्वर्गारोहण करावें असें त्याला वाटतें म्हणून तो पत्नीला पूर्ववत् प्रश्न विचारतो”.

ब्राह्मण संकेतपद्धतीतंत वेदी ही स्त्री म्हणून मानलें आहे व वेदीच्या प्रतिष्ठापनेसंबंधींच्या खालील सूचनांवरून, त्या काळीं स्त्री सौंदर्याविषयीं काय कल्पना होती हें चांगलें कळून येतें:-

सा वै पश्चाद्वरीयसी स्यात् । मध्ये सह्वारिता पुनः पुरस्ता दुर्व्येवमिव हि योषां प्रशसन्ति पृथुश्रोणिर्व्विमृष्टान्तरासा मध्यें शङ्गह्येति जुष्टामेवैनामेतद्देवेभ्यः करोति ।।

पश्चाद्भागीं ती बरीच रुंद असावी, मध्यें वक्र असावी आणि पुरोभागीं पुन्हां रुंद असावी. जघनांच्या ठिकाणीं जी पृथु, दोन्ही खांद्यांनीं व्याप्त केलेला प्रदेश जिचा बारीक, जिची कटि फारच बारीक, अशा स्त्रीची पुरुष प्रशंसा करतात. अशा तर्‍हेनें ती तयार करुन तो देवांनां संतुष्ट करतो.

एका ऋतुयागांत एक लाजिरवाणा व पशुतुल्य यज्ञविधि सांगितला आहे त्यावरुन त्या काळची वैवाहिक नीति कशी होती ह्याबद्दल चांगला उलगडा होतो; तो विधि असाः-

अथ प्रतिप्रस्थाता प्रतिपरैति । स पत्नीमुदानेष्यन् पृच्छति केन चरसीति व्वरुण्यं व्वाऽएतत् स्त्री करोति यदन्यस्य सत्यन्येन चरतीत्यथोनेन्मेऽन्तः शल्याजुहवदिति तस्मात् पृच्छति निरुक्तं व्वाऽएनः कनीयोभवति सत्यॐहि भवति तस्माद्वेव पृच्छति सा यन्न प्रतिजानीत ज्ञातिश्र्यो हास्यैतदहितॐस्यात् ।।
शत. ब्रा. २.५.२, २०.

“नंतर प्रतिप्रस्थाता यजमानाची पत्नी बसली असेल त्या जागेकडे जातो, आणि तिला आणतांना विचारतो कीं तूं कोणाबरोबर व्यभिचार करतेस ? कारण एकाशीं लग्न लागलेली स्त्री जर दुस-याबरोबर व्यभिचार करील तर ती वरुणाचा मोठा अपराध करील. असें विचारतांना प्रतिप्रस्थात्याचा उद्देश ‘मनामध्यें कोणतीहि गोष्ट जाचत असतां यज्ञ करणें दोषावह आहे’ हें तिला समजावें असा आहे. म्हणून तो असा प्रश्न विचारतो. आपलें पाप कबूल केलें असतां कमी होतें कारण मग तें सत्यच होतें. याच कारणास्तव तो तिला विचारतो. जें पाप ती कबूल करणार नाहीं त्याचे परिणाम तिच्या नातेवाईंकांस भोगावे लागतील.”

ब्राह्मणग्रंथांतून नीतीविषयींचा विचार फारच थोड्या ठिकाणीं उल्लेखित केलेला आहे, अशा ठिकाणांपैकीं हें एक होय. एरव्हीं, ह्या ग्रंथांचें धोरण, नीतिअनीतीचा  विचारच करावयाचा नाहीं असें दिसतें. अपरंपार धार्मिक गोष्टींची सांगड अत्यल्प नैतिक व्यवहाराशीं जी कधीं कधीं घालण्यांत येते त्याचीं फार चांगलीं उदाहरणें ह्या ग्रंथांतून जागजागीं आढळून येतात. धार्मिक कृत्यें, यज्ञ व विधी हेच कायते विषय अशा विशाल ग्रंथांतून विचारणेकरतां घेतलेले असतात; यांत नीतिविषयक गोष्टींनां अजीबात फांटा दिलेला दृष्टीस पडतो. {kosh या ग्रंथरचनेंत नीतिवषय असा मुळींच सांपडत नाहीं. ईश्वर व मनुष्य यांचा परस्परसंबंध जोडून देणारें यज्ञकर्म म्हणजे केवळ एक यांत्रिक कर्म होऊन बसलें होतें. तें मनुष्याच्या अंतःप्रभावास चलन देण्याकरितां असे. आचार्याच्या मंत्रप्रयोगानें सृष्टीच्या हृदयांत दडून बसलेला हा अंतःप्रभाव बाहेर पडे..... ब्राह्मणांतल्या अध्यात्मज्ञानापेक्षां दुसरें कांहीं अधिक अडाणी व पशुतुल्य असेल अशी कल्पनाहि करणें कठिण आहे; त्यांतील विचार-पुढें हे आचारांत आल्यावर सुसंस्कृत व नैतिक बनले ही गोष्ट निराळी-पाहून तेव्हांच्या लोकांच्या अडाणी वस्तुवादाविषयीं आश्चर्य वाटल्यावांचून राहत नाहीं.’ असें एका पाश्चात्त्य ग्रंथकार म्हणतो.}*{/kosh} यजमानाच्या भौतिक इच्छा देवांनीं तृप्त कराव्या म्हणूनच केवळ यज्ञकर्में. करण्यांत येत असें नाहीं तर पुष्कळ वेळां शत्रूचें निर्दलन करण्याकरतां म्हणूनहि हे यज्ञ होत. शिवाय ऋत्विजांकरितां अशा तर्‍हेचे मंत्र ह्या ब्राह्मणांत आहेत कीं, त्यांनां पुरेशी दक्षिणा किंवा दान न मिळाल्यास ज्या यजमानानें त्यांनां नेमलें असेल त्याच्या हातूनच त्याचा नाश व्हावा. अशा यजमाननाशाकरितां कांहीं फार दगदग पडत नसे; फक्त ठराविक विधि उलटीकडून करावयाचा किंवा ज्या ठिकाणचे मंत्र त्या ठिकाणीं न वापरतां दुसरीकडे मुद्दाम चुकीनें वापरावयाचे; एवढें झालें म्हणजे यजमानाचा पुरा नाश झाला.

येथवर भानगडीच्या यज्ञशास्त्राचें विवेचन झालें, ब्राह्मणांत असणारे महत्त्वाचे विषय यासंबंधींच आहेत. आपल्या सुदैवानें अर्थवादाच्या एका भागांत इतिहास, आख्यानें व पुराणें कांहीं विधींची उपयुक्तता दाखविण्याकरितां म्हणून दिलेलीं आहेत. ज्यू लोकांचा तलमुद हा धर्मग्रंथ व आमचीं ब्राह्मणें ह्यांच्यांत कांहींसें साम्य आहे. तलमुदच्या ‘हलचा’(Halecha) या भागांतलें पारमार्थिक गोष्टींचें हस्तलाघव कंटाळवाणें होतें तर त्याच्या “हगदा” या कथापुराणांच्या भागांत मनाचें रंजन होतें. तसेंच ब्राह्मणांत पारमार्थिक तर्कवितर्काच्या रुक्ष वाळवंटांतून आपण मार्ग आक्रमण करीत असतांना, मधून मधून जींत ऐतिहासिक किंवा सृष्टिरचनाविषयक गूढ काव्यपुष्पें बहरलीं आहेत अशी ओलवण दृष्टीस पडून आपलें मन प्रफुल्लित होतें.

ऋग्वेदगायकांच्या तोंडीं घातलेली जुनी पुरूरवा व उर्वशी यांची कथा शतपथब्राह्मणांत जी दिलेली आहे ती वर वर्णन केलेल्या ओलवणींपैकीं एक होय. उर्वशी अप्सरेचें राजा पुरुरव्यावर कसें प्रेम जडलें, पत्नीपदारुढ होतांना तिनें त्याला कशी अटी घातल्या व गंधर्वांनीं राजाला त्यांपैकीं एक अट कशी मोडायला लावली, हें सर्व त्या कथेंत सांगितलें आहे. ह्यापुढची कथा थोडक्यांत सांगावयाची म्हणजे, राजानें तिची एक अट मोडल्याबरोबर ती त्याला सोडून गेली; तेव्हां पुरुरव्यानें तिची येण्याची पुष्कळ वाट पाहिली, तिच्याबद्दल बराच शोक केला व शोकानें बहकून जाऊन सबंध कुरुक्षेत्रभर भटकतां भटकतां तो पद्मसरोवरावर आला. त्या सरोवरांत हंसांचीं रूपें घेऊन अप्सरा क्रीडा करीत होत्या. त्यांच्यांत उर्वशीहि होती. ह्या वेळीं त्या दोघांचें जें भाषण झालें तें ऋग्वेदाच्या आख्यानऋचांतून दिलेलें आपणांस पूर्वींच माहीत झालेलें आहे, तें असेः तिच्या ह्रदयांत त्याच्याविषयीं दया उत्पन्न होऊन ती म्हणालीः ‘आजपासून बरोबर एक वर्षानें तुम्ही (येथें) या, मग तुम्हांला एक रात्रपर्यंत मजजवळ राहतां येईल. तोंपर्यंत माझ्या गर्भांत असलेला तुमचा मुलगा जन्म पावेल.’ एक वर्ष लोटल्यावर पहिल्या रात्रीं राजा तेथें येऊन पाहतो तों तेथें एक सुवर्णमंदिर उभें. ‘येथें आंत शिरा एवढेंच सर्वांनी (?) त्याला सांगितलें. नंतर त्यांनीं उर्वशीला त्याच्याकडे धाडून दिलें. पण ती म्हणालीः ‘उद्यां गंधर्व कृपाळू होऊन तुम्हांला एक वर मागायला सांगतील, तेव्हां काय वर मागावयाचा तें ठरवा ।” तूंच माझ्याकरितां ठरीव’ असें राजानें उत्तर केलें. ‘मला तुमच्यासारखें व्हावेंसें वाटतें असें तुम्ही म्हणा ।” असें उर्वशीनें सुचविलें. दुस-या दिवशीं सकाळीं गंधर्वांनीं त्याला‘काय इच्छा आहे म्हणून विचारलें. तो म्हणालाः ‘मला तुमच्यासारखें व्हावेंसें वाटतें.’ नंतर, ज्याच्या योगानें मनुष्य गंधर्वरूप होतो असा एक विशिष्ट प्रकारचा अग्नियाग गंधर्वांनीं त्याला पढविला.

याच ब्राह्मणामध्यें एक जलप्रलयाची कथा आहे. ती एका सेमिटिक भाषेंतील कथेसारखी दिसतेः-

“हल्लीं ज्याप्रमाणें कोणी आपल्याला हात धुण्याकरितां पाणी आणून देतात त्याप्रमाणें सकाळीं ते मनूकडे पाणी घेऊन आले. तो हात धूत असतांना त्याच्या हातांत एक मासा आला व तो मनूला म्हणालाः ‘मला जीवदान द्या म्हणजे मीहि तुमचें रक्षण करीन.’ ‘तूं कशापासून माझें रक्षण करणार ?’ असें विचारलें असतां ‘एक मोठा जलप्रलय होऊन, तो सर्व प्राण्यांनां घेऊन जाईल; तेव्हां त्यापासून मी तुम्हांला वांचवीन’ असें माशानें उत्तर केलें. “मी तुला कोणच्या प्रकारानें जीवदान देऊं ?” असें मनूनें विचारिलें असतां तो मासा म्हणालाः ‘आम्ही जोंपर्यंत लहान असतों तोंपर्यंत आम्हांला मृत्यूचें फार भय असतें; कारण एक मासा   दुस-याला गट्ट करतो. तेव्हां प्रथम तूं मला एका भांड्यांत ठेव व मी त्यांत मावेनासा झाल्यावर एक खड्डा खणून मला त्यांत ठेव जेव्हां त्यांतहि माझा समावेश होईनासा होईल तेव्हां तूं मला समुद्रांत सोड, म्हणजे मग मला मृत्यूचें भय राहणार नाहीं.’ माशानें सांगितल्याप्रमाणें मनु त्याचें संगोपन करूं लागला. तो लवकरच झष मासा म्हणजे सर्वांत जास्त वाढीचा मासा झाला. नंतर तो मनूला म्हणालाः ‘अमुक अमुक वर्षी जलप्रलय होईल, म्हणून तूं एक नाव तयार कर व माझी वाट पाहत राहा. जेव्हां जलप्रलय होईल तेव्हां नावेंत चढ व पुढें मी तुझें रक्षण करीन.’ त्यानें सांगितल्याप्रमाणें मनूनें त्याचें संगोपन केलें व शेवटीं त्याला समुद्रांत सोडलें. माशानें सांगितलेल्या वर्षी मनूनें स्वतः नाव तयार केली व तो त्याची वाट पाहत बसला. जेव्हां जलप्रलय सुरु झाला तेव्हां तो नावेंत चढला व तो मासाहि त्याच्याकडे पोहत आला. त्यानें नावेची दोरी माशाच्या शिंगाला  (?) बांधली व त्याच्या साह्यानें झट्दिशीं ह्या (?) उत्तरेकडच्या टेंकडीवर येऊन पोंचला. नंतर मासा त्याला म्हणालाः ‘मीं तुला आतां वांचविलें. नाव एका झाडाला बांध. जोंपर्यंत तूं टेकडीवर आहेस तोंपर्यंत तरी पाण्यानें तूं वाहून जात नाहींस हें खास, पाणी उतरूं लागलें म्हणजे हळू हळू टेंकडीवरून खालीं उतर.’ त्याप्रमाणें तो सावकाश उतरला. उत्तरेकडच्या पर्वतांवरील ह्या विशिष्ट स्थानाला अद्यापीहि “मनूचा उतार” असें म्हणण्याचा प्रघात आहे. ह्या जलप्रलयानें एकंदर सर्व प्राण्यांचा संहार झाला, फक्त मनु बाकी राहिला.”

अशा तर्‍हेची जूनी कथा आहे. मनूपासून पुढें मानववंश कसा वाढला ह्याविषयींचें कथानक शतपथब्राह्मणांत असें दिलें आहे कीं, वंशविस्तार होण्यासाठीं मनूनें एक यज्ञ केला. या यज्ञांतून एक स्त्री वर आली व तिच्यापासून मानवी वंशविस्तार झाला. ह्या मनूच्या कन्येचें इडा असें नांव आहे; व इडा नांवाचें यज्ञदान व त्याचें माहात्म्य कळून येण्यासाठीं हा इतिहास ह्या ग्रंथांत गोंविला आहे.

उपलब्ध असलेल्या भारतीय गद्य इतिहासांचीं फार जुनीं उदाहरणें या नात्यानें वरील प्रकारच्या वृत्तांतांचा फार उपयोग व महत्त्व आहे.

प्राचीन आर्ष काव्यांत गद्याबरोबर पुष्कळ वेळां पद्यरचनाहि असते. पुरूरवा व उर्वशी यांच्या कथानकांतलीं पद्यें ऋग्वेदसंग्रहांत असलेलीं दिसून येतात. त्यांची भाषा व छंद हीं अतिशय जुन्या वैदिक प्रबंधांसारखीं आहेत. शूनःशेपाच्या ऐतरेयब्राह्मणांतील आख्यानांत, गद्य व गाथा (पद्य) हीं दोन्हीहि असून, त्याची भाषा व छंद हीं वरील पुरुरवा व उर्वशी ह्या कथानकासारखीं आहेत. हें {kosh ऐतरेय ब्राह्मण ७.१३.१८.}*{/kosh} शुनःशेपाचें आख्यान अनेक प्रकरें चटकदार झालें आहे. तें आख्यान असेः “इक्ष्वाकु वंशांतील वेधसाचा पुत्र हरिश्चंद्र हा अपत्यरहित होता. त्याला शंभर स्त्रिया होत्या तरी एकीपासूनहि त्याला संतति झाली नाहीं. एके दिवशीं नारद व पर्वत हे दोघे त्याला भेटावयास आले असतां राजानें नारदाला विनंति केलीः “नारदा। शाहणे व त्याचप्रमाणें मूर्ख असे सर्व लोक पुत्रप्राप्तीची इच्छा करितात; तेव्हां पुत्रप्राप्ति कशानें होईल हें मला सांगा.’ असें एका श्लोकांत राजानें विचारलें असतां, नारदानें त्याचें उत्तर दहा श्लोकांत दिलेः ‘जिवंत जन्म पावलेल्या पुत्राचें मुखावलोकन ज्या पित्याला होतें, त्याचें (पितृ) ऋण फिटून, तो पुत्ररूपानें अमर होतो. {kosh तै.सं. ६.३.१०, ५. तै. ब्रा. १.५.५, ६.}*{/kosh} पुत्राच्या योगानें पित्याला सर्व दुःखांचें निवारण करतां येतें; पुत्राच्या रुपानें स्वतः तो नवीन जन्म घेतो व तो पुत्र म्हणजे संकटसमयीं त्याला नदी तरून जाण्याला उपयोगी अशा नावेप्रमाणें आहे. मलापासून (गृहस्थाश्रमापासून) तुम्हांला काय सुख आहे, अजिना (ब्रह्मचर्याश्रमाचें द्योतक) पासून तुम्हांला काय फायदा आहे, दाढी वाढवून (वानप्रस्थाश्रम स्वीकारून) कोणचा पुरुषार्थ आहे, किंवा तप आचरून (परिव्राजक होऊन) कोणती सिद्धि मिळेल? तेव्हां विप्रांनों (क्षत्रियादि लोक हो) । पुत्राची इच्छा धरा; तोच तुमचा मोक्ष आहे. अन्न हा प्राण आहे, घर ही निवा-याची जागा आहे, सोन्याचे अलंकार म्हणजेच रूप, विवाह हा गोधनदायी {kosh मुलीबरोबर पूर्वी गायी आंदण देत. प्राचीन ग्रीक लोकांतहि अशी चाल होती.}*{/kosh} आहे, स्त्री हा मित्र आहे, {kosh When a Danghter is born, all the four walls weep”
संभवे स्वजनदुःखकारिका संप्रदानसमयेऽर्थहारिका ।
यौवनेंऽपि बहुदोषकरारिका दारिका हृदयदारिका पितुः।।}*{/kosh}
दुहिता ही केवळ दुःखकारिका आहे पण पुत्र हा उंच आकाशांतली एक ज्योति होय. पति स्त्रीमध्यें प्रवेश करतो, व तिच्या पोटांत गर्भरूपानें राहतो; ती त्याला दहाव्या महिन्यांत पुन्हा या जगांत आणून सोडते, जन्म देते’............... अशा तर्‍हेनें पुत्रमाहात्म्य वर्णन केल्यावर तो राजाला म्हणालाः “तूं वरुण राजाकडे जा व ‘मला पुत्रप्राप्ति होऊं दे, मी तुला तो पुत्र यज्ञांत अर्पण करीन.’ असें म्हण.” ‘बरें तर’ असें बोलून राजा वरुणाकडे गेला व त्यानें त्याची अशी प्रार्थना केलीः मला पुत्रपाप्ति होऊं दे. मी तुला तो पुत्र यज्ञांत अर्पन करीन.’ ‘तथास्तु’ असें वरुण म्हणाला. पुढें राजाला रोहित नांवाचा पुत्र झाला. तेव्हां वरुण त्याला म्हणाला ‘आतां’ तुला पुत्र झाला आहे, तर तो मला यज्ञांत अर्पण कर.’ त्यावर राजानें उत्तर केलेः ‘दहा दिवसांचा झाल्याखेरीज पशु यागयोग्य होत नाहीं. तेव्हां माझ्या पुत्राला दहा दिवस होऊं देत म्हणजे मग तुला तो यज्ञांत अर्पण करीन ‘बरे  तसें कर’ असें वरुण म्हणाला. तो दहा दिवसांचा झाला तेव्हां वरुण पुन्हा त्याला म्हणालाः ‘आतां हा दहा दिवसांचा होऊन गेला आहे, तर आतां तो मला यज्ञांत अर्पण कर.’ पण ह्यावर राजानें उत्तर दिलेः ‘पशूला दांत येईपर्यंत तो यागयोग्य असत नाहीं. ह्याला दांत येऊंदेत म्हणजे मी तुला त्याचा यज्ञ करीन.’ ‘बरें, तसें होऊं दे’ असें वरुण म्हणाला. ह्याप्रमाणें रोहित मोठा होईपर्यंत हरिश्चंद्रानें वरुणाला दाद दिली नाहीं. पुढें एकदां त्यानें यज्ञ करण्याचा विचार केला, पण या वेळीं रोहित रानांत पळून गेला व तिकडेच एक वर्षभर भटकत राहिला. तेव्हां वरुणानें राजाला शिक्षा करण्याकरितां म्हणून जलोदर नांवाचा रोग त्याच्या ठिकाणीं उत्पन्न केला. रोहितानें जेव्हां हें ऐकिलें तेव्हां तो परत येण्यास निघाला, पण ब्राह्मणरूपानें इंद्र आडवा आला व त्यानें त्याच्याजवळ पर्यटनापासून काय काय फायदे असतात, प्रवासी मनुष्याला कोणकोणचीं सुखें मिळतात वगैरे वर्णन करून त्याला पूर्वीप्रमाणेंच फिरत राहण्याचा उपदेश केला. दुस-या, तिस-या, चवथ्या, पांचव्या वर्षी तो तसाच अरण्यांत भटकत राहिला व जेव्हां जेव्हां म्हणून तो परत राजधानीस फिरण्याचा विचार करी, तेव्हां तेव्हां इंद्र पुन्हा त्याला आडवा येऊन आणखी तसाच फिरत राहण्याविषयीं आग्रह करी. फिरावयाला लागल्यापासून सहाव्या वर्षी एके दिवशीं त्याला अजीगर्त ऋषि भेटला. तो क्षुधेनें व्याकुळ होऊन अरण्यांत इकडे तिकडे हिंडत होता. शुन:पुच्छ, शुनःशेप व शुनोलाड्गूल असे त्याला तीन पुत्र होते. त्यांतील एक वरुणाला आपल्याबद्दल दान करुन आपली सुटका करून घ्यावी अशा हेतूनें त्यानें अजीगर्ताला शंभर गायी देऊन त्यांच्या बदला त्याचा मधला मुलगा-कारण सर्वांत मोठा जो होता त्याला बापाच्या मनांतून दूर करावयाचा नव्हता व सर्वांच्या धाकट्याला आईच्या मनांतून दूर करावयाचा नव्हता, तेव्हां राहिला मधला-शुनःशेप विकत घेतला. त्याला बरोबर घेऊन रोहित आपल्या पित्याकडे गेला. शुनःशेपाच्या बळी आपल्यास कबूल आहे असें वरुणानें म्हटलें; कारण त्यानें असें पाहिलें कीं, क्षत्रियापेक्षां ब्राह्मण जास्त चांगला. तेव्हां राजसूय यज्ञाच्या वेळीं पशूच्या जागीं शुनःशेपाला बळी द्यावयाचें ठरलें. यज्ञाची सर्व कांहीं तयारी झाली पण यज्ञबळी यूपाला बांधून टाकण्यास कोणी मिळेना. तेव्हां अजीगर्त म्हणालाः “मला आणखी शंभर गायी द्या म्हणजे मी याला बांधून टाकीन.” त्याप्रमाणें आणखी शंभर गायी दिल्यावर त्यानें मुलाला यूपाशीं बांधलें. आणखी शंभर गायी घेऊन मुलाला ठार करण्यास तो उद्युक्त झाला व एक तीक्ष्ण खड्ग घेऊन पुढें सरसावला. तेव्हां शुनःशेपानें विचार केलाः “मला मानुषेतर समजून हे मला ठार करण्यास उद्युक्त झाले आहेत; बरें तर, आतां देवांनां शरण जावें. त्यानें ओळीनें वेदकाळांतल्या प्रमुख देवातांचीं अनेक स्तोत्रें म्हणून प्रार्थना केली. (हीं स्तोत्रें ऋग्वेदसंहितेंत दिलीं आहेत.) सरतेशेवटीं त्यानें उषेची करुणा भाकली व तीन स्तोत्रें म्हणून तिची चांगली प्रार्थना केली. ही प्रार्थना करीत असतां एका मागून एक त्याचे पाश गळूं लागले व हरिश्चंद्राचें उदर लहान लहान होऊं लागलें. शेवटचें स्तोत्र पुरें झाल्याबरोबर तो पुरा बंधमुक्त झाला व हरिश्चंद्राचा रोग (जलोदर) पार नाहींसा झाला. इतकें झाल्यावर ऋत्विजांनीं त्याला आपल्या राहिलेल्या यज्ञकृत्यांत घेतलें व शूनःशेपानें त्या वेळीं एक विशिष्ट प्रकारचा सोमयाग अवलोकन केला. ह्या हरिश्चंद्राच्या यज्ञांत विश्वामित्र होत्याच्या कामावर होता; त्यानें आपल्या औरस शंभर मुलांनां बाजूस ठेऊन या शुनःशेपाला दत्तक घेऊन आपला वारस केला.”

शेवटीं या कथेंत असें म्हटलें आहे. “शूनःशेपाचें आख्यान असें आहे. याचीं शंभरांहून अधिक ऋग्वेद-स्तोत्रें व गाथा आहेत. राजसूय यज्ञांत राजाला अभिषेक केल्यानंतर होता ही कथा राजाला निवेदन करतो. सुवर्णतंतूंनीं विणलेल्या गादीवर (कशिपूवर) बसून होता हें आख्यान सांगतो व अध्वर्यूहि सुवर्णकशिपूवर बसून हें श्रवण करतो. सुवर्ण हें यशाचें द्योतक आहे, म्हणून तें राजाचें यश वृद्धिंगत करतें. अध्वर्यूनें ऋचेला अनुमोदन “ओम्” असें म्हणून द्यावयाचें व गाथेला “तथा” असें म्हणून द्यावयाचें ‘ओम्’ हें दैवी आहे व ‘तथा’ हें मानुषी आहे. अशा रीतीनें हें अध्वर्यूचें अनुमोदन त्याला देवलोक व मनुष्यलोक यांतील पाप व अरिष्टें यांपासून मुक्त करितें. ज्या राजाला विजयी व्हावेसें वाटतें त्यानें-मग तो यजमान किंवा राजसूयक्रतुपति नसला तरी चालेल-हें शुनःशेपाचें आख्यान श्रवण करावें; म्हणजे त्याच्या ठिकाणीं पापाचा लवलेशहि राहणार नाहीं. आख्यात्याला म्हणजे होत्याला एक हजार गायी द्याव्या, अध्वर्यूला म्हणजे प्रतिगर (अनुमोदन) देणा-याला शंभर द्याव्या व प्रत्येकाला त्यांचीं सुवर्ण आसनेंहि द्यावींत, ह्याशिवाय होत्याला खेंचरें जोडलेला एक रौप्यरथ अर्पण करावा. ज्यांनां पुत्रप्राप्तीची इच्छा असेल त्यांनीं हें आख्यान श्रवण करावें म्हणजे त्यांनां निःसंशय पुत्रलाभ होईल.”

हें शूनःशेपाचें आख्यान ऐतरेय ब्राह्मणाच्या संपादकांना किंवा संग्राहकांनां पुरातन कथा म्हणून विशेष माननीय होतें व राज्याभिषेकाच्या वेळीं ह्या कथेचें निवेदन अभिषेकसंस्काराचा एक आवश्यक भाग म्हणून गणला जात असे यावरुन ही कथा कितीतरी जुनी असली पाहिजे हें सिद्ध होतें. ही कथा फार पुरातन काळची असली पाहिजे ह्याला आणखी पुरावा म्हणजे ह्यांत मनुष्ययज्ञाचें स्मृतिचित्र काढलेलें आहे हा होय. श्रौतसूत्रें व ब्राह्मणें यांतून राज्याभिषेकाच्या वेळीं मनुष्ययज्ञ करीत असल्याचा उल्लेख जरी नाहीं तरी प्रागैतिहासिक काळांत राजसूय यज्ञाच्या वेळीं मनुष्य बळी देत असले पाहिजेत असें दिसतें. ही शूनःशेपाची कथा, ऋग्वेदाशीं ताडून पाहतां, त्यापेक्षां अर्वाचीन असावी असें दिसून येतें. कारण, ऐतरेयब्राह्मणांत जीं {kosh ऋग्वेद १.२४-३०;९.३}*{/kosh} सूक्तें शूनःशेपाला “दिसलीं” असें म्हटलें आहे तीं कांहीं अंशीं अशीं आहेत कीं, तीं एखाद्या शूनःशेप नांवाच्या ऋषीनें दुस-या एखाद्या ऋषीप्रमाणें केव्हांहि तयार केल्यासारखीं दिसतात; पुन्हां त्यांत प्रस्तुत कथेशीं जुळेल असा भाग अगदीं थोडा आहे; शिवाय कांहीं अंशीं हीं सूक्तें अशीं आहेत कीं, आपल्या या कथेंतल्या शुनःशेपाच्या तोंडीं तीं मुळींच शोभणार नाहींत. उदाहरणार्थ, ऋग्वेदांतील १.२९ हें सूक्त. ह्यांत प्रत्येक ऋचेचें पालुपद “आतून इंद्र शंसय गोष्वश्वेषु शुभ्रिषु सहस्त्रेषु तुवीमघ।” (हे उदार इंद्रा । आम्ही एक हजार पाणीदार घोडे व बैल मिळण्याची अपेक्षा करतों), असें आहे. तसेंच ऋग्वेद १.२४ हें सूक्त. या सूक्ताच्या ऋचा ऐतरेयब्राह्मणांतल्या शुनःशेपानें म्हणणें शक्य नाहीं. कारण या सूक्तांत असें म्हटलें आहे कीं, शुनःशेपाला बांधलें तेव्हां त्यानें ज्याला राजा वरुण अशी हांक मारीली. तो आम्हांला सोडवो. “शुनःशेपानें त्याला जेव्हां धरुन तीन यूपांनां बांधण्यात आलें तेव्हां आदित्याचा धांवा केला” असेंहि या सूक्तांत आहे. ह्या ऋचा दुस-याच निराळ्या प्राचीन शुनःशेपाच्या आख्यानासंबंधींच्या असल्या पाहिजेत. हीं सूक्तें ऐतरेयब्राह्मणांतल्या शुनःशेपाच्या तोंडीं घातलीं आहेत यावरुन फक्त असें म्हणतां येईल कीं, शुनःशेपाची कथा मुळींच विश्वसनीय नाहीं. ऐतरेयब्राह्मणांतल्या अनुक्रमणिकेंत हीं सूक्तें कोणा शुनःशेप नांवाच्या ऋषीनें केलेलीं आहेत असें आरंभींच दिलें आहे. तेव्हां कालानुक्रमाप्रमाणें पाहतां, वेदांतल्या इतर कोणत्याहि प्रबंधापेक्षां ऋग्वेदसूक्तें हीं फार अगोदरचीं आहेत याचें पुन्हां येथें प्रत्यंतर येतें.

दुर्दैवानें, ब्राह्मणांतलीं फार थोडीं कथानकें ह्या शुनःशेपाच्या कथानकाइतकीं समग्र व परिपूर्ण अशीं आहेत. बहुतेक सारीं यज्ञविधींचें निरूपण व दोषमुक्ति करण्याकरितांच जुळविलेलीं असतात, व पुष्कळ वेळां त्यांतील जुन्या कथापुराणांचें बीज कोणतें हें समजण्यास फार प्रयास पडतात. याशिवाय, ब्राह्मणांत आलेल्या सर्व कथानकांनां मूळ जुन्या कथापुराणांचा आधार असतोच असें नाहीं. पुष्कळ वेळां कांहीं यज्ञविधींचें निरूपण अथवा समर्थन करण्यासाठीं म्हणून अशीं कथानकें नवीन जुळविलेलीं असतात. कांहीं कांहीं वेळां या नवीन रचलेल्या कथा फार मजेदार असतात. उदाहरणार्थ, प्रजापतीला यज्ञदान करण्याच्या वेळीं मंत्र हळू कां म्हणावे, याचें निरूपण करण्यासाठीं म्हणून खालील लाक्षणिक कथा दिली आहेः-

एकदां, मन आणि वाचा यांच्यांत आपणां दोघांत श्रेष्ठ कोण ह्याविषयीं भांडण उत्पन्न झालें. “मी श्रेष्ठ आहें” असें दोघेंहि म्हणूं लागलीं. मन म्हणालेः खरोखर पाहतां, मी तुझ्यापेक्षां श्रेष्ठ आहे, कारण मीं जें आधीं योजून ठेवतें तेंच तूं बोलतेस, पदरचें कांहीच नाहीं; माझ्या कृतीचें तूं फक्त अनुकरण करतेस, तूं फक्त मला अनुसरतेस; तेव्हां, केव्हांहि मी तुझ्यापेक्षां श्रेष्ठच आहे.” यावर वाचा बोललीः “असें आहे तरी मीच तुझ्यापेक्षां श्रेष्ठ आहे; कारण तुला जें कळतें, तें मी प्रथम कळवितें, निवेदन करतें.” हें भांडण मिटावें. या उद्देशानें दोघें प्रजापतीकडे गेलीं. प्रजापति मनाच्या बाजूनें निकाल देतांना वाचेला म्हणालाः “मन तुझ्यापेक्षां श्रेष्ठ आहे, कारण तूं त्याची केवळ कृतानुकरी व अनुचरी आहेस.” आपल्या विरुद्ध निकाल झाल्यामुळें वाचा भग्नवीर्य झाली, ह्या क्षोभाचा तिच्यावर परिणाम होऊन तिचा गर्भपात झाला. ती प्रजापतीला बोलली कीं. “तूं माझ्या विरुद्ध निकाल दिला आहेस तेव्हां मी कधींहि तुझ्या हव्यवहनाला हेतुभूत होणार नाहीं.” म्हणून यज्ञांत प्रत्येक प्रजापतिदेवताकर्म मुकाटयानें करतात, कारण प्रजापतीच्या हव्याचें वहन वाचा करीत नाहीं.

 

पुष्कळ कथानकांतून वाचेचा प्रामुख्यानें उल्लेख आलेला आहे. त्यांतून तिला स्त्रियांचा नमुना असें मानण्यांत आलें आहे. ह्याचें उदाहरण ब्राह्मणांतून वारंवार येणा-या सोम-चौर्याच्या कथानकांत सांपडेल. हें कथानक येणेंप्रमाणेः पहिल्यानें सोम स्वर्गांत असे. गायत्री पक्षिरूप होऊन त्याला पृथ्वीवर घेऊन येऊं लागली, तेव्हां वाटेंत एका गंधर्वानें तिच्यापासून त्याला पळविलें. तेव्हां देवांनीं एकत्र जमून चोरून नेलेला सोम परत मिळविण्याचा विचार चालविला. त्यांनीं असें ठरविलें कीं, गंधर्व हे बायकांचे लोभी आहेत, तेव्हां वाचेला त्यांच्याकडे धाडून द्यावी म्हणजे ती सोम पुन्हां परत घेऊन येईल. त्याप्रमाणें देवांनी तिला गंधर्वांकडे पाठविली व तिनें सोम परत आणला. पण गंधर्व तिच्यामागें आले व म्हणालेः “तुम्ही सोम घ्या पण वाचेला आमच्या ताब्यांत द्या.” यावर देवांनीं उत्तर केलेः “बरें, तुमच्या म्हणण्याप्रमाणें करूं; पण ती होऊन जर आमच्याकडे परत आली तर मात्र तुम्हांला तिला बळजबरीनें नेतां येणार नाहीं. आपण चढाओढ लावून तिला कोण वश करतो तें पाहूं या.” नंतर त्यांनीं वाचेला वश करण्यासाठीं चढाओढ सुरु केली. गंधर्वांनीं तिच्यापुढें वेदपठण केलें व “हो, आम्ही हें जाणतों” तें जाणतों वगैरे वेदघोष सुरु केला. इकडे देवांनीं वीणा निर्माण करुन ते वाजवीत व गात बसले आणि त्यांनीं वाचेला “आम्ही असें तुला गावून दाखवूं, अशा रीतीनें तुला तुष्ट करूं.” अशा रीतीनें बोलून खूष केलें, तेव्हां ती देवांकडे वळली. ती निरर्थक गोष्टीला भुलली. जे प्रशंसना व स्तवन करीत होते त्यांनां धिक्कारुन, जे गात होते, नाचत होते त्यांच्याकडे ती गेली. म्हणून अजून देखील स्त्रियांचा निरर्थक व क्षुल्लक गोष्टींकडे धांव घेण्याचा स्वभाव कायम आहे. तेव्हां या गोष्टीचें सार काय कीं, स्त्रिया, जो चांगला गातो व नाचतो त्याला भुलतात व त्याच्या आधीन होतात.” {kosh शत.ब्रा. ३.२.४,२-६;३.१.१९.}*{/kosh}

ही लहानशी गोष्ट ज्याप्रमाणें स्त्रियांचा एक स्वभावधर्म निरूपण करण्याकरितां मुद्दाम योजिली आहे, त्याप्रमाणें पुष्कळ कथा एखाद्या गोष्टीचें किंवा संप्रदायाचें ‘मूळ’ कशांत आहे हें दाखविण्याकरितां घातल्या आहेत. अशा मूळविषयक कथांत उत्पत्तिविषयक कथाहि येतात, व इतिहास किंवा आख्यानें ह्यांपासून या कथा भिन्न आहेत हें दाखविण्याकरितां, प्राचीनांनीं यांनां पुराणें {kosh पुराण म्हणजे “जुनें”, त्यापासून “जुनी कथा”,  “जुना इतिहास” (विशेषतः जगदुत्पत्ति व जगच्छस्त्रविषयक) असा अर्थ निघाला. पुढें कांहीं विशिष्ट ग्रंथांनां “पुराणें” अशी संज्ञा प्राप्त झाली.}*{/kosh} अशी संज्ञा दिली आहे. 

या ‘पुराणां’पैकीं, कांहीं पुराणें अध्यात्मज्ञान्यांनीं रचलीं आहेत, कांहीं अगदीं प्राचीन कथापुराणांपैकीं आहेत, तर कांहीं यज्ञशास्त्राला जोडून असलेल्या दंतकथांचा आधार घेऊन तयार केलेलीं आहेत.

ब्राह्मणांत चारी वर्णांचा मूळ इतिहास वारंवार दिलेला आढळतो. ऋग्वेदांतील पुरुषसूक्तासारख्या {kosh ऋ १०.९०,१२.}*{/kosh} तत्त्वज्ञानविषयक सूक्तांतून, देवांनीं यज्ञांत बळी दिलेल्या पुरुषाच्या मुखापासून ब्राह्मण कसे उत्पन्न झाले, बाहूंपासून क्षत्रिय, मांडयांपासून वैश्य व पायांपासून शूद्र कसे आले या विषयीं वर्णन दिलें आहे. पण ब्राह्मणांत, प्रजापतीनें आपल्या मुखापासून ब्राह्मण व त्याबरोबर अग्निदेव उत्पन्न केला, आपल्या हृदयापासून व बाहूंपासून क्षत्रिय व इंद्र, शरीराच्या मध्यभागापासून वैश्य व इतर सर्व देव, व पायांपासून शूद्र निर्माण केले अशी कथा आहे. शूद्रांबरोबर कोणीहि देव निर्माण झाला नसल्यानें, त्यांनां यज्ञाचा अधिकार नाहीं. वरील प्रकारांनीं उत्पत्ति झाली असल्यानें, ब्राह्मणवर्ण आपलें धार्मिक कृत्य मुखानें करतो; क्षत्रिय बाहूंनीं; वैश्यवर्ण, ब्राह्मण व क्षत्रिय हे त्याच्यापासून आपला वाटेल तितका फायदा करुन घेत असतांहि, कांहीं एक करीत नाहीं; शुद्राला फक्त उच्च वर्णांतील लोकांचे पाय धुणें एवढेंच धार्मिक कृत्य करण्याचा अधिकार पोहोंचतो, कारण तो पायापासून उत्पन्न झाला आहे. {kosh तै. सं. ७.१.१,४-६. ताण्ड्य ब्रा.६.१,६-११}*{/kosh}

मैत्रायणी संहितेमधील रात्र व पक्षधारी पर्वत यांच्या उत्पत्तिविषयक दोन कथा मौजेच्या आहेत. {kosh Indiens Literatur und Kultur P. १४२. by L Von Schroeder.}*{/kosh}  त्या खालीलप्रमाणेः

यमो वा अभ्रियत ते देवा यम्या यममपाब्रुवस्ता यदपृछन्त्साब्रवीदद्यामृतेति तेऽब्रुवन्नवा इयमिममित्थं मृष्यतें रात्रिसृजावहा इत्यहर्वाव तर्ह्यासीन्न रात्रिस्ते देवा रात्रिमसृजंत ततः श्वस्तनमभवत्ततः सा तममृष्यत तस्मादाहुरहोरात्राणि वावाघं मर्षयंतीति. मै.सं. १.५, १२.
“यम जेव्हां वारला, तेव्हां देवांनीं त्याची सावत्र बहीण यमी हिची पुष्कळ समजूत घातली. तरी तिला त्याचा विसर म्हणून पडेना. देवांच्या पृच्छेला ती यम आजच वारला असें म्हणत दुःख करीत राहिली, तेव्हां देवांनीं विचार केलाः “अशा रीतीनें तिला विसर पडणें शक्य नाहीं, तर आपण रात्र उत्पन्न करूं.” त्या वेळीं फक्त दिवस असे, रात्र म्हणून नसे. देवांनीं रात्र निर्माण केली; तेव्हां अर्थातच दुसरा दिवस अस्तित्वांत आला; व नंतर तिला त्याचा विसर पडला. म्हणून म्हणतात कीं, “दिवस व रात्र हीं दुःख विसरवितात” (मैत्रा. सं. १.५, १२.)

प्रजापतेर्वा एतत् ज्येष्ठं तोक यत्पर्वतास्ते पक्षिण आसस्ते परापातमासत यत्र यत्राकामयन्ताथ वा इयं तर्हि शिथिरासीत्तेषामिंद्रः पक्षानछिनत्तैरिमामदृहद्ये पक्षा आसस्ते जीमूता अभवस्तस्मादेते सपदि पर्वतमुपप्लवतें.
मै.सं. १.१०, १३.

“पर्वत हे प्रजापतीचीं पहिलीं मुलें होत. तेव्हां त्यांनां पंख असत {kosh ही पक्षधारी पर्वतांची कथा ऋग्वेदगायकांनां अगोदरच माहीत आहे व त्या पुढील काळांतील कवींचा हा एक आवडता विषय होऊन राहिला आहे. Cf. Pischel Vedishe Studien I,१७४}*{/kosh} म्हणून ते लागेल तेथें उडून जात, लागेल तेथें मुक्काम करीत. त्या वेळीं पृथ्वी ही स्थिर झाली नव्हती, ती इकडे तिकडें फिरत असे. इंद्रानें त्या पर्वतांचे पंख छेदिले व त्यांच्या (पर्वतांच्या) साधनानें ही पृथ्वी अचल केली. मग ते पंख ढग होऊन पर्वतांवर नेहमीं लोंबत राहूं लागले.” (मैत्रा. सं. १.१०, १३).

ब्राह्मणांतून उत्पत्तिविषयक कथा फार आहेत. साध्या यज्ञकर्मविषयक सूचना देतांना आध्यात्मिक विचारहि त्यांत प्रकट केले आहेत. मोठमोठ्या महत्त्वाच्या यज्ञकर्मांपैकीं अग्निहोत्र हें एक आहे. त्यांत अग्नीला दररोज सकाळ-संध्याकाळ दूध अर्पण करावें लागतें. या यज्ञकर्माची उत्पत्ति व महत्त्व शतपथब्राह्मणांत खालीलप्रमाणें दिलें आहेः-

“मुळारंभीं फक्त प्रजापतीच काय तो एकटा होता. प्रजा कशी उत्पन्न करावी ?”हा त्याला विचार पडला. त्यानें तपाचरण केलें, शरीराला पुष्कळ कष्ट दिलें. {kosh ब्राह्मणांतील बहुतेक उत्पत्तिविषयक कथांचा असाच प्रारंभ असतो. ज्याप्रमाणें देहदंड करून व तप आचरून मांत्रिकाला मंत्र हस्तगत करुन घ्यावयाचें असतात व याज्ञिकाला यज्ञाची सिद्धि प्राप्त करून घ्यावी लागते, त्याचप्रमाणें प्रजापतीला सुद्धां सृष्टिकर्मासाठीं अशी तयारी करावी लागते. श्रम् ह्या धातूपासून श्रमण म्हणजे तपस्वी हा शब्द आला. हा बौद्ध वाङ्मयांत जागजागीं येतो. तपस् ह्याचा मूळ अर्थ ताप. पुढें तपश्चर्येसाठीं ताप करून घेणें व शेवटीं, तपश्चर्या हा अर्थ त्यास प्राप्त झाला. तपस् ह्या शब्दांत तपश्चर्येचे पुष्कळ प्रकार असा अर्थ ध्वनित आहे; पण पुरातन काळीं व आजहि तपश्चर्या म्हणजे ताप (तपस्) हाच अर्थ प्रामुख्यानें पुढें येतो. Cf. The excellent dissertations on Tapas by Oldenberg, Religion des Veda, p. ४०२.      शतपथ ब्रा. १०.४.४, १ इ. वरून पाहतां, प्रजापतीनें एकदां १००० वर्षेंपर्यंत तप आचरलें व शेवटीं त्या तपश्चर्येच्या “तापा” पासून असें झालें कीं, त्याच्या रोमरंध्रांतून प्रकाशकिरण निघाले यांच्याच चांदण्या झाल्या.}*{/kosh} आपल्या मुखापासून त्यानें अग्नि निर्माण केला. अग्नीला त्यानें मुखापासून उत्पन्न केलें म्हणून अग्नि हा अन्नाद म्हणजे अन्न भक्षण करणारा झाला. ज्याला खरोखरीच अग्नि हा अन्नाद म्हणून माहीत आहे, तो स्वतःच अन्नाद होतो. सर्व देवांत त्याला पहिल्यानें उत्पन्न केलें म्हणून त्याला अग्नि-अग्नि (अग्रे जातत्वात् अग्निः)-असें नांव दिलें. यानंतर प्रजापतीला असा विचार पडला “मीं अग्नीला अन्नाद म्हणून उत्पन्न केलें. पण येथें माझ्याखेरीज दुसरें अन्न नाहीं, तेव्हां तो मलाच खाणार नाहीं का ।” कारण त्या वेळीं पृथ्वीवर कांहीं एक नव्हतें. झाडें वनस्पति वगैरे कांहीं नव्हतें. म्हणून प्रजापतीला मोठें संकट पडलें. अग्नि तर इकडे आ वासून त्याच्या अंगावर आला, तेव्हां प्रजापतीला भय वाटलें व त्याचा महिमा त्याला सोडून गेला. पण त्याचा महिमा म्हणजे त्याची वाणी, तेव्हां त्याची वाणी नाहींशी झाली. (ह्यापुढें असें सांगितलें आहे कीं, प्रजापतीला स्वतःच्या शहरीरांतच आहुति देण्याची इच्छा झाली व हातावर हात घांसून त्यानें घृत, पय निर्माण केलें. यापासून ओषधी झाल्या. दुस-यांदा जेव्हां हात घांसून घृत किंवा पय निघालें, तेव्हां या द्रव्यापासून सूर्य व वायु उत्पन्न झाले).

अशा रीतीनें हवन करण्यांत एक तर त्यानें प्रजा उत्पन्न केली व दुसरें, त्यानें आपल्याला गिळंकृत करण्याच्या बेतांत असलेल्या मृत्यूपासून म्हणजे अग्नीपासून आपलें संरक्षण केलें. जो हें जाणून अग्निहोत्राहुती देतो, तो प्रजापतीप्रमाणें प्रजा उत्पन्न करतो व खाण्याला टपलेल्या काळापासून आपलें संरक्षणहि करुन घेतो. तो जेव्हां मरण पावतो व त्याला चितेवर ठेवण्यांत येतें तेव्हां तो अग्नीपासून पुन्हां जन्म घेतो. अग्नि फक्त त्याचें शरीर दहन करतो, {kosh अशा प्राकरचें मृत्यूनंतर नवीन जन्माचें वर्णन ब्राह्मणांत फारच थोड्या ठिकाणीं आलेलें आहे.}*{/kosh} व आईपासून किंवा बापापासून जसा जन्म घ्यावा तसा तो या ठिकाणीं अग्नीपासून जन्म पावतो. जो अग्निहोत्रहोम करीत नाहीं त्याला पुन्हां नवीन जन्म मिळत नाहीं. म्हणून प्रत्येकानें अग्निहोत्र करावें.” (यापुढें, प्रजापतीनें उत्पन्न केलेले अग्नि, वायु व सूर्य ह्या देवांनीं कसें अग्निहोत्र केलें व गाईला कसें निर्माण केलें याविषयीं सविस्तर वर्णन आहे). “या गाईची इच्छा धरुन अग्नीनें असा विचार केला कीं आपण हिच्याशीं गमन करावें. त्याप्रमाणें तिच्याशीं गमन करून त्यानें आपलें बीज (रेत) तिच्या ठिकाणीं घातलें. त्यापासून दुध झालें. म्हणून गाय थंड असते तरी दूध ऊन ऊन असतें. कारण कीं दूध हें अग्नीचें रेत आहे; व म्हणून दूध काळ्या किंवा तांबड्या गाईचें असलें तरी सुद्धां तें नेहमीं पांढरें व अग्नीसारखें तकतकीत असतें; कारण हेंच कीं तें अग्नीचें रेत आहे; व म्हणून तें धार काढतांनाच ऊन असतें, कारण तें अग्नीचें रेत आहे.”

ज्याप्रमाणें ह्या उत्पत्तिविषयक क्रियांचा आरंभ प्रजापतीच्या तपश्चरणांत व देहदंडनांत झालेला आपणांस दिसतो त्याच प्रमाणें आपणांस असें आढळून येतें कीं, उत्पत्ति केल्यानंतर तो अगदीं अशक्त होतो, दमून जातो व पुढें त्याला अवसान रहात नाहीं. म्हणून त्याच्या वीर्यवर्धनासाठीं कांहीं यज्ञ सांगितला आहे. एकदां देवांनीं हा यज्ञ केला तर दुस-या वेळीं अग्नीनें हा यज्ञ करुन प्रजापतीवर उपकार केला व आणखी एका वेळीं प्रजापतीनें स्वतःच सूक्तें गाऊन व तप आचरून यज्ञपशू निर्माण केले व त्यांनां यज्ञांत बळी दिले. {kosh शत. ब्रा. ४.६.४,१;७.४.१,१६;६.१.२,१२;३.९.१.}*{/kosh} त्यांतल्या त्यांत आश्चर्य हें, कीं, हा विश्वस्त्रष्टा प्रजापति, जो ब्राह्मणांत सर्वश्रेष्ठ देव म्हणून मानला आहे, त्याच्या ठिकाणीं श्रेष्ठपणा तर मुळींच आढळून येत नाहीं; उलट कांहीं कांहीं वेळां त्याची करुणाजनक स्थिति मात्र होते. एकदां तर देवांनीं खुद्द त्यालाच यज्ञांत बळी द्यावयास काढला होता । {kosh शत. ब्रा. १०.२.२.}*{/kosh} एका कथेंत, (ही कथा पुष्कळ ठिकाणीं आलेली आहे) त्याच्यावर व्यभिचाराचा आरोप केला आहे, कारण त्यानें उषा व द्यौ या आपल्या कन्यांशीं गमन केलेलें आहे. या अपराधाला शिक्षा म्हणून देवांनीं आपल्या उग्र रूपांपासून रुद्र देव निर्माण केला. त्यानें आपल्या बाणानें प्रजापतीला विद्ध केलें, तेव्हां मृग व इतर राशिनक्षत्रें उत्पन्न झालीं. {kosh ऐत. ब्रा. ३.३३ cf. शत. ब्रा. १.७.४,१;२.१.२,८;१.३,८}*{/kosh} यूरोपांत ज्याप्रमाणें बायबलमधील कथानकांनां लोकांची थोडीबहुत मान्यता मिळते त्याप्रमाणें ब्राह्मणांतील व वेदांतील सुद्धां उत्पत्तिविषयक कथापुराणांनां उत्तरकालीन ग्रंथांत मान्यता नाहीं. वरील प्रकराचें एकहि कथानक सर्वमान्य नसावें, हें विशेष आहे. अशा पुष्कळशा कथानकांतून विचित्र कल्पना व एकमेकांशीं न जुळणारीं मतें ग्रथित केलेलीं दृष्टोत्पत्तीस येतात. ह्याचें उदाहरण द्यावयाचें म्हणजे, शतपथब्राह्मणांत वर दिलेल्या कथानकाच्या लगेच पुढें वेगळ्याच तर्‍हेची उत्पत्तिकथा दिलेली आहे. या ठिकाणींहि असेंच म्हटलें आहे कीं, {kosh शत. ब्रा. २.५.१, १-३.}*{/kosh} प्रजा निर्माण करण्याकरितां प्रजापतीनें उग्र तपश्चर्या केली. त्यानें प्रथम पक्षी, नंतर सरपटणारे प्राणी, नंतर सर्प अशा प्रकारें प्राणी उत्पन्न केले. पण त्यांनां उत्पन्न करुन थोडा वेळ झाला नाहीं तोंच ते पुन्हां नाहींसे झाले, व प्रजापति पहिल्यासारखाच एकटा राहिला. असें होण्याचें कारण काय असावें ह्याचा बराच विचार केल्यावर त्याच्या असें लक्ष्यांत आलें कीं हे प्राणी अन्नान्न करून मेले. तेव्हां त्यानें पुन्हां नवीन प्राणी उत्पन्न करुन त्यांच्या स्तनांत दूध निर्माण केलें, व म्हणून ते जिवंत राहिले. याच ब्राह्मणांत दुस-या एका ठिकाणीं {kosh शत. ब्रा. ७.५.२,६.}*{/kosh} प्रजापतीनें आपल्या प्राणांपासून (प्राण असणा-या अवयवां पासून) पशू निर्माण केल्याचें सांगितलें आहेः मनापासून पुरुष, डोळ्यापासून अश्व, प्राणापासून (श्वासापासून) गाय, कानापासून मेष, वाचेपासून अज. पुरुष प्रजापतीच्या मनापासून उत्पन्न झाला आहे व मन हें सर्व प्राणांमध्यें श्रेष्ठ (पहिलें) आहे म्हणून पुरुष हा सर्व पशूंमध्यें श्रेष्ठ व पराक्रमी आहे.

बहुतेक कथांतून प्रजापति नुसता स्पष्टा म्हणजे निर्माण करणारा असें मानण्यांत येतें. त्याच्यापासून विश्व व प्राणी निर्माण झाले आहेत. पण ब्राह्मणांत कांहीं कांहीं जागीं असेंहि दिलें आहे कीं, प्रजापति हा देखील सृष्ट वस्तूंपैकींच आहे व आद्य सृष्टि म्हणजे जल किंवा असत् किंवा ब्रह्मन्. शतपथ ब्राह्मणांत (११.१, ६) अशी कथा आहेः

“प्रथम या विश्वांत, जलांखेरीज कांहीं एक अस्तित्वांत नव्हतें. या जलांनां आत्मसदृश असें कांहीं  निर्माण करण्याची इच्छा होऊन त्यांनीं देहदंडनाला व {kosh तपस् म्हणजे तपाचरण किंवा उष्णता. तेव्हां “जलांनीं तपाचरण केलें” याचा अर्थ “त्यांच्या ठिकाणीं उष्णता उत्पन्न झाली” असाहि होऊं शकेल. ह्या ठिकाणीं शब्द मुद्दाम बह्वर्थी वापरले आहेत.}*{/kosh} तपा-चरणाला सुरुवात केली. त्याचें फळ म्हणून त्यांच्या ठिकाणीं एक सुवर्णाचें अंडें उत्पन्न झालें. त्या काळीं संवत्सर अशी कालगणना नव्हती; तरी पण जवळ जवळ वर्षभर हें अंडें पाण्यावर तरंगत राहिलें. एका वर्षानंतर त्याच्यांतून एक पुरुष बाहेर आला. तो प्रजापति होय. म्हणून स्त्री, किंवा गाय, किंवा घोडी एक वर्षात बाळंतीण होते, कारण प्रजापति एक वर्षांत जन्म पावला. त्यानें जेव्हां ते अंडें फोडलें तेव्हां त्याला बाहेर उभें रहावयाला जागा नव्हती. म्हणून तो ज्या अंडयांत उत्पन्न झाला, तें वर्षभर तसेंच पाण्यावर तरंगत राहिलें. वर्षानंतर तो बोलूं लागला व त्यानें “भूः” असा उच्चार केल्याबरोबर पृथ्वी निर्माण झाली; “भुवः” म्हटल्याबरोबर सभोंवतालीं वातावरण उत्पन्न झालें, व “स्वर” या उच्चाराबरोबर आकाश झालें. म्हणून वर्षानंतर मूल बोलूं लागतें, कारण प्रजापति वर्षानंतर बोलूं लागला. प्रजापतीनें प्रथम एक अक्षरी, दोन अक्षरी शब्द म्हणण्यास सुरुवात केली, म्हणून मूल जेव्हां बोलूं लागतें तेव्हां प्रथम प्रथम एकअक्षरी शब्द, दोनअक्षरी शब्द म्हणण्यास सुरुवात करतें, भूः, भुवः, स्वर ह्यांपासन प्रजापतीनें वर्षाचे पांच ऋतू केले, म्हणून पृथ्वीवर पांच ऋतू असतात. अशा प्रकारें निर्माण केलेल्या सृष्टीवर तो एक वर्षानें उभा राहिला; म्हणून, एक वर्षानें मूल उठून उभें राहतें, कारण प्रजापति उठून उभा राहूं लागला. हजार वर्षे आयुष्य बरोबर घेऊन तो जन्मला. ज्याप्रमाणें आपणाला लांबून नदीचें पलीकडचें तीर दृष्टीस पडतें त्याप्रमाणें त्याला आयुष्याची दुसरी कड दृष्टीस पडत होती. प्रजापतीनें जन्म घेतला, तेव्हां मृत्यु हा त्याच्या पाठीमागें आहेच. त्याला प्रजा उत्पन्न करण्याची इच्छा होती. तेव्हां तो स्तोत्रें म्हणत व तप आचरीत काळ घालवूं लागला.प्रजननशक्ति आपणांत आणून त्यानें मुखानें देव उत्पन्न केले....... देव उत्पन्न केल्यावर त्याला दिनप्रकाश (दिवा) दिसूं लागला व देवांतील देवपणा तो हाच कीं, प्रजापतीनें त्यांनां निर्माण केल्यावर त्याला दिन-प्रकाश दिसला. नंतर, त्यानें आपल्या प्राणवायूपासून असुर निर्माण केले.......त्यांनां निर्माण केल्यावर, त्याला अंधार दिसूं लागला. त्यानें ओळखलें कीं, “आपण आपल्याकरितां अरिष्ट उत्पन्न केलें आहे; कारण ह्यांना उत्पन्न केल्याबरोबर अंधार झाला.” तेव्हां या पूर्वावस्थेंत देखील त्यानें असुरांवर अरिष्टें आणून त्यांचा बींमोड केला व त्यावेळींच त्यांची गति खुंटली. म्हणून असें म्हणण्याची वहिवाट आहेः “अन्वाख्यानांत व कांहीं इतिहासांत देव व असुर यांच्या मधील लढायांचें जें वर्णन केलें आहे तें खरें नाहीं, कारण मागेंच प्रजापतीनें ज्या वेळीं त्यांचा पार बींमोड केला त्याच वेळीं त्यांचा ऊर्जित काळ संपला.” ..... देवांनां उत्पन्न केल्यावर जो प्रकाश पडला, त्याचा दिवस केला व असुरांनां उत्पन्न केल्यावर जो अंधार पडला, त्याची रात्र केली. तेव्हांपासून दिवस व रात्र असा कालक्रम अस्तित्वांत आला.” (शतप. ब्रा. ११.१.६, १-११.)

यापेक्षांहि विलक्षण व बरीच दुर्बोध अशी दुसरी एक उत्पत्तिविषयक कथा आहे (शतपथ. ब्राह्मण ६.११, १) तिची सुरुवात अशी आहेः-

“असद्वाऽइदमग्रऽआसीत् ।” “प्रथम येथें फक्त ‘असत्’चें अस्तित्व होतें” पण लागलेंच पुढें असें म्हटलें आहे कीं, हें ‘असत् म्हणजे ऋषी होते. ह्या ऋषींनीं देहदंडन व तप करुन सर्व कांहीं निर्माण केलें. हे ऋषी म्हणजे दुसरे कोणी नसून प्राण होते. त्यांनीं पहिले सात पुरुष निर्माण केले-कसे केले तें माहीत नाहीं-व त्यांचें एकीकरण करुन एक पुरुष प्रजापति निर्माण केला.

“ह्या पुरुषाला म्हणजे प्रजापतीला प्रजा उत्पन्न करण्याची इच्छा झाली. त्यानें देहदंड व तपश्चर्या केली. हीं केल्यावर, त्यानें त्रयी विद्या (ब्रह्म) उत्पन्न केली. हा त्याचा (पुढील सृष्टीचा) पाया (प्रतिष्ठा) झाला. म्हणून असें म्हणण्यांत येतें की, “ब्रह्म ही सर्वांची प्रतिष्ठा आहे.” या कारणानें वेदाभ्यास झाल्यावर मनुष्याचा पाया भक्कम होतो, कारण ब्रह्म (वेद) हाच मूळ पाया आहे.”

पुढील कथा अशी आहे कीं, ह्या ब्रह्मप्रतिष्ठेवर उभें राहून प्राजपतीनें तपाचरण केलें व प्रथम जल निर्माण केलें. नंतर वेदाच्या साह्यानें त्यानें एक अंडें उत्पन्न केलें; त्यापासून अग्नि झाला व त्याची कवची जी होती तिची पृथ्वी झाली व पुढें अमुक अमुक झालें इत्यादि वर्णन आहे. त्यांत फार पाल्हाळ व गोंधळ आहे. यांत महत्त्वाचा भाग हा कीं, ब्रह्माचा मूळ अर्थ स्तोत्र किंवा मंत्र असा होता; पुढें त्याला पवित्र ज्ञान किंवा वेद असा अर्थ आला, व या ठिकाणीं तर त्याचा अर्थ अस्तित्वांत असलेल्या सर्व वस्तूंची प्रतिष्ठा असा केलेला आहे. ह्याच्या पुढचीच पायरी म्हणजे, ब्रह्म हेंच उत्पत्तिकारण आहे या ब्रह्मवादाची. हें मत (शतप. ब्राह्मण ११.२.३, १) यापूर्वीच आलेलें आहे; त्या ठिकाणीं असें म्हटलें आहेः-

“विश्वाच्या आरंभीं, फक्त ब्रह्मच काय तें होतें. त्यानें पुढें देव निर्माण केले व तदनंतर त्यानें त्यांस राहण्याकरितां ह्या सृष्टी वांटून दिल्या – अग्नीला पृथ्वी दिली, वायूला अंतरिक्ष व सू-याला स्वर्ग दिला.”

अशा रीतीनें, ज्या कल्पनांचा आरण्यकें व उपनिषदें यांत पहिल्याप्रथमच पूर्ण विकास झालेला आहे अशा सर्व कल्पनांची ब्राह्मणग्रंथांतून, अगोदरच सिद्धता होती, हें आपल्या चांगलें दृष्टोत्पत्तीस येतें, भारतीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासांत ब्राह्मणांनां जें फार महत्त्व आहे तें या कारणामुळेंच आहे. शांडिल्यानें म्हटल्याप्रमाणें, उपनिषदांचें मूलतत्त्व जें आहे तें शतपथब्राह्मणांत अगोदरच आलें आहे.