प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण ९ वें.
वेदकालीन इतिहास-वेदकालनिर्णय.

वैदिक वाङ्मयाचें त्याच्या अगदीं शेवट शेवटच्या शाखांपर्यंत आपण येथवर पर्यालोचन केलें. आतां ही सामान्य रुपरेखा समजल्यानंतर या अवाढव्य वाङ्मयाच्या कालनिर्णयाचा प्रश्न घेऊन त्यावर झालेल्या परिश्रमाचें फल थोडक्यांत दिलें पाहिजे. वेदकालनिर्णयावर थोर सामान्य आणि कनिष्ठ अशा सर्व प्रकारच्या लेखकांनीं लिहिलें आहे. त्यांतील महत्त्वाच्या लेखकांच्या परिश्रमाचा तेवढा आढावा येथें घेतला आहे. अत्यंत तुटपुंज्या परिश्रमानें हा विषय हातीं घेतात असे लोक पुष्कळ आहेत. त्यांनीं लहान तोंडी मोठा घास घेण्यापलीकडे कांहीं केलें नाहीं असें म्हणावें लागतें. अशा प्रकारचें एक अर्वाचीन उदाहरण म्हणजे पहिल्या प्राच्यविद्यापरिषदे (पुणें) पुढें वाचलेला डा. बूलनर याचा निबंध पहावा. ऋग्वेद किंवा अथर्ववेद यांतील अत्यंत प्राचीन सूक्तांचा काळ शतकांच्या अजमासांत जरी ठरवितां आला असता, कालनिर्णयाच्या संबंधांत थोड्याबहुत शतकांची जरी चूक राहिली असती तरी देखील या कालनिर्णयाचा प्रश्न बराचसा सुटला असें म्हणतां आलें असतें आणि या प्रश्नाला स्वतंत्र प्रकरण देण्याची जरुर नव्हती; परंतु असा ठोकळ अजमास सुद्धां करतां येणें अशक्य झालें आहे. अजमास करतां आला असता तर वेदाचा अजमासकाळ थोडक्या शब्दांत सांगून मोकळें होतां आलें असतें. परंतु कितीहि वाईट वाटलें तरी वस्तुस्थिति आहे ती सांगितली पाहिजे; व ती ही कीं, ऋग्वेदाच्या कालनिर्णयाचे बाबतींत विद्वान् संशोधकांच्या मतांत शेंकड्यांचाच नव्हे तर सहस्त्रांचा सुद्धां फरक पडलेला आढळतो. कोणी म्हणतात ऋग्वेदसूक्तें श. पू. १०००च्या अलीकडील नव्हत, तर कोणी म्हणतात हीं सूक्तें श. पू. ३००० ते २५०० च्या दरम्यान झालीं असावीं. विद्वान् संशोधकांत सुद्धां एवढा तीव्र मतभेद आढळतो त्या अर्थी अगदीं सामान्यंवाचकांकरितां लिहिलेल्या पुस्तकांत नुसता अजमासाचा वेदकाळ देऊन भागणार नाहीं. सामान्य वाचकांस देखील वेदकालनिर्णयाची इमारत निरनिराळ्या संशोधकांनीं कोणत्या आधारावर रचिलेली आहे हें समजणें जरूरीचें आहे. या कालनिर्णयाच्या प्रश्नाशीं इंडो-आर्यन संस्कृतीच्या उगमाचा प्रश्न निगडित झाला असल्यानें या कालनिर्णयाची माहिती होणें अधिकच जरूरीचें होतें; कारण, इंडो-आर्यन संस्कृतीच्या उगमाचा प्रश्न प्रत्येक इतिहासभक्तास, भाषाशास्त्रज्ञास व पुराणवस्तुसंशोधकास अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. शिवाय जगाचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करुन प्राचीन काळच्या सुधारलेल्या देशांतील लोकांचा परस्पर संबंध हुडकणा-या संशोधकास देखील, प्राच्यसंस्कृतीचीं मूळपीठें जीं बाबिलॉन, इजिप्त व चीन यांचा हिंदुस्थानाचा या बाबतींत संबंध कशा प्रकारचा आहे, याचें ज्ञान असणें कमी महत्वाचें नाहीं.

अशा स्थितींत, या प्रश्नाच्या चर्चेचा इतिहास सामान्य लोकांपुढें मांडणें जरूरीचें आहे व संशोधकांस आजपर्यंत ज्ञात अशा गोष्टी किती व अज्ञात अशा किती यांचा शक्य तेवढा खुलासा करुन घेणें अगत्याचें आहे.

हिंदु वाङ्मयाशीं प्रथमच परिचय झाल्याबरोबर त्या वाङ्मयांतला प्रत्येक ग्रंथ अत्यंत प्राचीन म्हणून ठरविण्यांत आला. फ्रेडरिक श्र्लेगेल यानें “आजपर्यन्त अज्ञात अशा जगाच्या संस्कृतीच्या इतिहासावर भारतीय वाङ्मय प्रकाश पाडील” असें म्हटलें आहे. जी. वेबर यानें १८५२ सालीं आपल्या ग्रंथांत लिहिलें आहे कीं “भारतीय वाङ्मय आज उपलब्ध असलेल्या जगाच्या वाङ्मयांत अत्यंत प्राचीन होय असें म्हणण्यांत येतें व त्यांत बरेंचसें सत्य आहे” व आपल्या ग्रंथाची त्यानें १८७६ सालीं जी आवृत्ति काढली त्या आवृत्तींत त्यानें वरील विधानास “जुन्या अवशिष्ट लेखांच्या बाबतींत इजिप्तमधील चर्मपत्रें किंवा नवीन सांपडलेलें असीरिअन वाङ्मय यांच्यामुळें कादाचित् बाध आला तर येईल” अशी पुस्ती जोडली आहे. “भारतीय वाङ्मयाचा बराचसा अवशिष्ट लेखी भाग आपणांस उपलब्ध आहे व त्यावरुन हिंदुवाङ्मय अत्यंत प्राचीन आहे असें म्हणणें अगदीं वाजवी होय” या विधानाच्या पुष्टयर्थ वेबरनें जीं प्रमाणें दिलीं आहेत तीं कांहीं भौगोलिक व धार्मिक इतिहासासंबंधींची आहेत. ऋग्वेदाच्या जुन्या जुन्या भागांच्या रचनेंच्या वेळीं हिंदी राष्ट्र पंजाबांत येऊन स्थित झालें होतें असें दिसतें. वैदिक वाङ्मयाच्या उत्तर भागांत, हे लोक क्रमाक्रमानें पूर्वेकडें गंगानदीकडे कसे आले याचें चित्र आहे. यानंतर पौराणिक वाङ्मयांत दक्षिणेकडे ब्राह्मणधर्माचा प्रवाह कसा वहात गेला याचें चित्र सांपडतें. असल्या अफाट प्रदेशांत, व विशेषतः तेथें राहणा-या आडदांड व सकस लोकांत, ब्राह्मणधर्माचा प्रसार होण्यास व त्याचा तेथें पगडा वसण्यास शतकेंचीं शतकें लागलीं असतील हें उघड आहे. ऋग्वेदांत सांपडणा-या नुसत्या सृष्टिपूजेपासून उपनिषदांतर्गत तत्त्वज्ञानात्मक विवेचनापर्यन्त व तेथून सुमारें ख्रि. पू. ३०० त मेग्यास्थिनीसला हिंदुस्थानांत आढळून आलेल्या निरनिराळ्या पंथांपर्यन्त व देवभक्तीपर्यन्त मजल गांठण्यास हिंदु परंपरेस कैक शतकें लागलीं असली पाहिजेत. वेबरनें वैदिकवाङ्मयाची निश्चित मर्यादा आंखण्याचा प्रयत्न केलेला नाहीं इतकेंच नव्हे, तर अशा तर्‍हेची मर्यादा घालतां येणें अशक्य आहे असें त्यानें स्पष्ट विधान केलें आहे.

प्राचीन हिंदुवाङ्मयाचा एक प्रकारचा कालनुक्रम बांधण्याचा प्रथम प्रयत्न मॅक्समूलर यानें आपल्या १८५९ सालीं प्रसिद्ध झालेल्या ‘प्राचीन संस्कृतवाङ्मयाचा इतिहास’ या पुस्तकांत केला आहे. बुद्धधर्माचा उदय, शिकंदर बादशहाची स्वारी, वगैरे जीं हिंदी वाङ्मयाच्या कालानुक्रमाचीं ठळक ठळक साधनें आज आपणांस उपलब्ध आहेत त्यांच्यापासून सुरुवात करुन पुढें त्यानें असा सिद्धान्त बांधला आहे कीं, बुद्धसंप्रदाय ही ब्राह्मणधर्माविरुद्ध सुरु केलेली एक मोहीम होय. बौद्धसंप्रदायाच्या उदयापूर्वीं सूक्तें, ब्राह्मणें, आरण्यकें, उपनिषदें वगैरे सर्व वाङ्मय अस्तित्वांत होतें ही गोष्ट मोक्षमूलर गृहीत घेऊन चालला आहे. त्याच्या मागें हें सर्व वाङ्मय बुद्धपूर्वकालीन असलें पाहिजे म्हणजे ख्रिस्तपूर्व ५०० च्या पूर्वीं उदयास आलें असलें पाहिजे. त्याच्या मतानें वेदांगवाङ्मय किंवा सूत्रवाङ्मय हें बुद्धवाङ्मयाशीं फार झालें तर समकालीन असूं शकेल. तो या सूत्रवाङ्मयाचा उगम ख्रि. पू. ६०० ते २०० या कालांत धरतो, या तारखा अजमासानें बसविलेल्या असल्याकारणानें यांतच मोक्षमूलरची चूक आहे.सूत्रवाङ्मय ब्राह्मणवाङ्मयाचें अस्तित्त्व गृहीत घेऊन चाललेलें आहे. पण ब्राह्मणांतहि कांहीं ब्राह्मणें प्राचीन व कांहीं अर्वाचीन असा भेद दिसतो व अर्वाचीन ब्राह्मणांत प्राचीन ब्राह्मणें ज्या परंपरेनें चालत आलीं ती गुरुपरंपराहि दिलेली आहे. या सर्व विकासाला अर्थात् दोनशें वर्षांपेक्षां अधिक काळ लागला नसावा असें धरून मोक्षमूलरनें अशी कल्पना केली कीं, या गद्यावाङ्मयाचा उदयकाळ ख्रि. पू. ८००-६०० पर्यंत धरिला पाहिजे. यानंतरची मोक्षमूलरची विचारसरणी येणेंप्रमाणेः- ‘ब्राह्मणवाङ्मयानें संहितावाङ्मय गृहीत घेतलेलें आहे. याच्या रचनेला ख्रि. पू. १००० ते ८०० एवढा काळ लागला असावा. तेव्हां हा सूक्तांची संहिता बनण्याचा काल म्हटल्यास हरकत नाहीं. परंतु या कालांत हीं सूक्तें अगोदरच पवित्र होऊन बसलीं होतीं, व सर्वमान्य अशीं यज्ञसूक्तेंहि झालेलीं होतीं. तेव्हां यांचा उदय लौकिक किंवा धार्मिक वाङ्मय या नात्यानें होण्याचा काल याच्याहि पूर्वीं असला पाहिजे, म्हणजे ख्रि. पू. १००० च्या मागें याचा काल जातो.” ब्राह्मणकालाला जशीं मोक्षमूलरनें २०० वर्षे दिलीं, व मंत्रकालाला जशीं २०० वर्षे दिलीं तशींच याहि कालाला-सूक्तांच्या उदयकालाला-२०० वर्षे देऊन मोक्षमूलर यानें इ. स. १२०० ते १००० हा सूक्तांचा उदयकाल ठरविला आहे. मात्र २०० या संख्येबद्दल मॅक्समूलरचा विशेष आग्रह नाहीं.

या सर्व विवेचनावरुन हें उघड आहे कीं, वैदिकवाङ्मयाचें जे निरनिराळे विभाग पडतात त्यांच्या रचनाकालाला प्रत्येकीं २०० वर्षांचा दिलेला काळ अगदींच अनमानधपक्क्याचा आहे व स्वतः मोक्षमूलर याचाहि उद्देश वेदविभागांच्या रचनेला किमानपक्षीं २०० वर्षे काल लागेल व ख्रि. पू. १००० च्या पूर्वी तरी निदान ऋग्वेदसंहिता पुरी झाली असली पाहिजे इतकेंच म्हणण्याचा आहे. त्यानें जो ख्रि. पू. १२०० ते १००० हा काल ठरविला आहे तो काल म्हणजे त्याच्या मतें ऋग्वेदाच्या अर्वाचीनत्वाची कमालमर्यादा होय, व १८९० सालीं “भौतिकधर्मा”वर त्याचीं जीं व्याखानें झालीं त्यांत त्यानें ऋग्वेदाच्या प्राचीनत्वाची कमालमर्यादा निश्चित होण्याची आशा नको असें स्पष्ट विधान केलें आहे. “वैदिकसूक्तें ख्रिस्तीशकापूर्वी १०००, १५००, २००० अगर ३००० वर्षें निर्माण झालीं याचा निश्चय करण्याचें सामर्थ्य पृथ्वीवरील कोणाहि माणसाच्या अंगी नाहीं” असें तो म्हणतो. शास्त्रीय विषयांत सुद्धां कल्पनांचा पगडा किती चालतो हें यावरुन चांगलें व्यक्त होतें. गृहीतकृत्याप्रमाणें घेऊन चाललेल्या व केवळ कल्पनामय अशा या मॅक्समूलरनें ठरविलेल्या वैदिककालाला कालगतीनें बरेंच महत्त्व आलें व तो एक शास्त्रीय शोध होऊन बसला, व पुराव्यावांचूनच त्याला शास्त्रसिद्ध सिद्धान्ताचें स्वरूप आलें. ख्रि. पू. १२०० ते १०००हा ऋग्वेदकाल म्हणून मॅक्समूलरनें सिद्ध केलें आहे असें म्हणण्याची संवयच पडून गेली आहे. व्हिटनें या गृहस्थानें या गोष्टीचा निषेध केला आहे. एल्. व्हान्. श्रॉडरसारख्या कांहीं कांहीं संशोधकांनीं मात्र १५०० किंवा २००० पर्यंत भीत भीत आपली मजल नेली आहे. कांहीं वर्षापूर्वी एच्. याकोबी यानें ख्रि.पू. तिस-या सहस्त्रकांत जेव्हां वेदकाल नेला व आपल्या म्हणण्याचा पुष्टयर्थ जेव्हां ज्योतिर्विषयक गणिताचा आधार दिला तेव्हां तर तज्ज्ञ पंडितांत मोठीच खळबळ उडाली व या कालनिर्णयपद्धतीला त्यांनीं वेडाच्या लहरींत काढलें. आजच्या काळांत देखील याकोबी या पंडितानें वेदकालासंबंधाचें असलें अतिशयोक्तिपूर्ण विधान करण्याचें साहस केल्याबद्दल व त्याचा त्या तर्‍हेबद्दल लोकांच्या अंगावर शहारे आल्यासारखें होते. आतांपर्यंत “शास्त्रीय सिद्धान्त” “शास्त्रीय सिद्धान्त” म्हणून इतक्या काळजीनें पोटाशीं बाळगिलेला आजपर्यंत चालत आलेला सिद्धान्त कसल्या शुष्क पायावर उभारलेला होता हें हे लोक अजीच विसरले ही आश्चर्याची गोष्ट होय.

प्राचीन भरतीयवाङ्मयाचा कालानुक्रम बसविण्याच्या कामीं व त्याविषयीं सिद्धान्त बांधण्याच्या कामीं ज्योतिर्विषयक माहितीची मदत घेण्याचा प्रकार आजचा नवा नाहीं. लुडविग् यानें सूर्यग्रहणांच्या माहितीच्या आधारें असला प्रयत्न केलेला आहे. पूर्वीच्या काळीं ऋत्विज् लोकांनां यज्ञाच्या वेळा निश्चित करावयाच्या असत व ते रोमन पाँटिफिसेस् प्रमाणें पंचांगकर्तेच बनलेले होते. त्यांनां यज्ञाच्या वेळा नक्की ठरविण्यासाठीं वरचेवर आकाशांत पहावें लागे. म्हणून ब्राह्मणग्रंथ व सूत्रग्रंथ यांत सुद्धां आपल्याला ज्योतिषविषयक व पंचांगविषयक माहिती बरीच सांपडते. यांच्यांत नक्षत्रांचा भाग फार आहे. सर्व नक्षत्रांतून एक प्रदक्षिणा करण्यास चंद्रास २७ अहोरात्र लागतात, व प्रत्येक रात्रीं चंद्र निरनिराळ्या नक्षत्रांजवळ असतो. क्रांतिवृत्तापासून फारशा अंतरावर नसलेल्या या नक्षत्रांचें एक नक्षत्रचक्र बनविण्यांत आलें; हें नक्षत्रचक्र म्हणजे त्या त्या भागांत  असणा-या २७ नक्षत्रांची एक क्रमवार मालिकाच होय. या चांद्र नक्षत्रचक्राचा उपयोग विशिष्ट कालीं चंद्र कोठें आहे हें समजण्याकडे करण्यांत आला. उदाहरणार्थ, वैदिक वाङ्मयांत “अमुक नक्षत्राखालीं” म्हणजे “चंद्र अमुक नक्षत्राला असतांना” अमुक एक यज्ञिय क्रिया करावयाची असे अनेक उल्लेख सांपडतात. पूर्णचंद्राचा व नक्षत्रांचा विशिष्ट तर्‍हेनें संबंध जोडल्याचीं उदाहरणें तर अनेक आहेत. प्राचीन वाङ्मयांत २७ नक्षत्रांपैकीं बाराच नक्षत्रांचा संबंध अशा तर्‍हेनें पूर्ण चंद्राशीं जोडलेला आढळतो. बारा नक्षत्रांवरुन महिन्यांचीं नांवें जीं ठेविलेलीं आहेत त्यांचीहि उपपत्ति लागते. हीं महिन्यांचीं नावें प्रथमतः चांद्र महिन्यांनां लावण्यांत आलीं व नंतर हीं नांवें सौरवर्षाच्या बारा महिन्यांस लावण्यांत आलीं. चांद्रवर्ष व सौरवर्ष यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न वैदिक काळांत यापूर्वींच केला गेला आहे म्हणून कांहीं कांही चांद्र पौर्णमास्य नक्षत्रांच्या व ऋतूंच्या संबंधावरुन किंवा वर्षारंभ पद्धतीवरुन कांहीं सिद्धान्त बांधावे कीं नाहीं असा प्रश्न उपस्थित होतो. अशा तर्‍हेचे सिद्धान्त बांधण्याचा प्रयत्न १८९३ सालीं केला गेला आहे व याचीं फलितेंहि मोठीं आश्चर्यकारक आहेत. हा प्रयत्न एच्. याकोबी यानें बॉन (जर्मनी) येथें व बाळ गंगाधर टिळक यांनीं पुण्यास एकाच काळीं पण स्वतंत्र रीतीनें केला.

या दोघां विद्वान् संशोधकांनीं निरनिराळ्या पद्धतीनें असें मत स्थापित केलें आहे कीं, ‘ब्राह्मण’कालीं कृत्तिका हें नक्षत्रमालेंतील आद्य नक्षत्र होतें व कृत्तिकानक्षत्र (कार्तिक महिना) आणि मेषसंपात (वसंतारंभ) एका वेळीं येत असत; आणि वेदग्रंथांतहि त्या वेळच्या प्राचीन पंचागपद्धतीबद्दल जे आधार सांपडतात त्यावरुन त्या काळीं मेषसंपात मृगशीर्षनक्षत्रांत (मार्गशीर्षमासांत) येत असे. अयनचलनकाल ठरविण्याच्या गणितावरुन असें दिसतें कीं, मेषसंपात कृत्तिकांमध्यें इ. सनापूर्वीं २५०० चे सुमारास आणि मृगशीर्षामध्यें ४५०० चे सुमारास होता. परंतु इकडे टिळक कांहीं वेदग्रंथांचा काल इ. सनापूर्वीं ६००० वर्षे मागें नेतात; तर तिकडे याकोबी, ऋग्वेदांतील ऋचा ज्या आर्यसंस्कृतीच्या कालांत झाल्या त्याचा आरंभ इ. सनापूर्वीं ४५०० वर्षें होतो, इतकेंच मानतो. त्याच्या मतानें हा संस्कृतिकाल म्हणजे इ. सनापूर्वीं ४५०० ते २५०० वर्षे. आणि आपणांस उपलब्ध असलेला ऋचा-संग्रह ह्या कालाच्या उत्तरार्धांत झाला असें त्याचें मत पडतें.

याकोबीच्या या मताला ज्योतिषशास्त्रांतील दुस-या एका गोष्टीवरुन पुष्टि मिळालेली आहे. गृह्यसूत्रामध्यें प्राचीन हिंदुस्थानांतील विवाहकर्मांतील असा एक विधि दिलेला आहे कीं, वधूवरांनीं गृहप्रवेश केल्यानंतर एका वृषभचर्मावर स्वस्थ बसून रहावयाचें, आणि सायंकाळीं नक्षत्रें दिसूं लागलीं कीं, वरानें वधूस ‘ध्रुव’ तारा (अढळ तारा) दाखवावयाचा, आणि पुढील वाक्य म्हणावयाचें, “तूंहि माझ्या घरांत अशीच अढळ (पतिनिष्ठ) रहा व वैभवशाली हो”; आणि त्यावर वधूनें उलट सांगावयाचें कीं, “तुम्हीं अढळ (पत्नीव्रत) आहां, मीहि आपल्या पतीच्या गृहांत अढळ (पतिव्रता) राहीन.” ‘ध्रुव म्हणजे ‘अचल तारा’ असें जें विवाहविधींत या ता-याचें नांव दिलेलें आहे त्याचें विशेष महत्त्व आहे; या सर्व विवाहसंस्कारांत वैवाहिकनीति अथवा ब्रह्मचर्य याची ‘ध्रुवतारा’ ही प्रतिमाच मानीत, याचें कारण हें कीं, ध्रुवतारा अचल आहे अशी त्या काळीं समजूत होती; निदान त्याचें चलन झालेलें कोणींहि पाहिलेलें नव्हतें. ज्या कालीं खध्रुवाच्या अगदीं जवळचा एखादा तेजस्वी तारा पाहणाराला अगदीं अचल असा दिसे त्या कालापासून ध्रुव हें नामाभिधान आणि तो विधि चालत आलेला असला पाहिजे.

आतां अयन-चलनाचा आणखी असा परिणाम होतो कीं, खमध्यरेषेच्या हळूहळू होणा-या फरकाबरोबर त्याचा उत्तरध्रुवहि फिरत असतो, आणि त्याची वस्तुतः सुमारें २६००० वर्षांनीं २३ १\२ अंशाच्या त्रिज्येची क्रांतिवृत्ताच्या अचलध्रुवाभोंवतीं एक वर्तुलप्रदक्षिणा होते. यामुळें एकामागून एक असा एकेक तारा उत्तरध्रुवासमोर येतो व उत्तरतारा अथवा ध्रुवतारा बनतो; परंतु एक विशिष्ट तेजस्वी तारा पुन्हां पुन्हां इतका ध्रुवाजवळ येतो कीं, सामान्य व्यवहारांत त्यालाच ध्रुवतारा असें मानतां येतें. सांप्रत ध्रुवपुच्छांतील (Little Bear) दुस-या नंबरचा ‘आल्फा’ याला उत्तरगोलार्धात ध्रुवतारा असें मानतात. आतां अर्थात् वेदकालीन ध्रुवतारा म्हणजे हा ‘आल्फा’च असणें शक्य नाहीं, कारण फक्त २००० वर्षांपूर्वींच हा तारा ध्रुवापासून इतका दूर होता कीं, त्याला ‘अचल’ (ध्रुवतारा) असें नांव पडणें हें बहुतेक शक्यच नव्हतें. इ. सनापूर्वीं २७८० मध्यें ‘अचल’ या नांवास पात्र असा दुसराच एक ध्रुवतारा आपणांस आढळतो. त्या कालीं ५०० वर्षेपर्यंत आल्फा ड्रेकॉनीस हा तारा इतका ध्रुवाजवळ होता कीं नुसत्या डोळ्यानें (दुर्बिणीशिवाय) पाहणारांनां तो अचल वाटत असला पाहिजे. तेव्हां ‘ध्रुव’ या नांवाचा आरंभ व तसेंच विवाह-दिन-सायंकालीं वधूला वैवाहिक व्रताची प्रतिमा म्हणून ‘अचल’ (ध्रुव) तारा दाखविण्याच्या विधीचा आरंभहि ज्या काळीं आल्फा ड्रेकानीस हा ध्रुवतारा होता त्या  काळीं म्हणजे इ. सनापूर्वी तिस-या सहस्त्रकाच्या पूर्वार्धांत झाला असें आपणांस मानतां येतें. आतां ऋग्वेदांतील विवाहमंत्रांत हा विधि कोठेंहि आलेला आढळत नाहीं यावरुन याकोबीचें मत असें झालें आहे कीं, “विवाहसंस्कारातं ध्रुवाचा उपयोग ऋग्वेदकालीं करीत नसत, तर त्यानंतरच्या कालांत हा विधि सुरु झाला; आणि यावरुन आर्यसंस्कृतींतील ऋग्वेदकाल हा इ. सनापूर्वी तिस-या सहस्त्रकाच्या पूर्वींचा आहे.”

मागें सांगितलेंच आहे कीं, याकोबीच्या या सिद्धांतावर जोराचे हल्ले झाले; आणि ते हल्ले विशेषतः ज्योतिःशास्त्रविषयक पुराव्याच्या पहिल्या भागावर झाले. निरनिराळ्या सहस्त्रकांतील वर्षारंभकालाच्या प्रश्नाचा हा विषय मोठा भानगडीचा आहे; आणि हा प्रश्न सोडविणें विशेषच अवघड जाण्याचें कारण हिंदुस्थानांत अगदीं पुरातनकाळापासून निरनिराळे वर्षारंभ प्रचलित होते हें होय. वर्षारंभ केव्हां वसंतऋतूंत, केव्हां हिंवाळ्यांत, केव्हां पावसाळ्यांत {kosh शतपथब्राह्मणांत (१२,८,२,३५) म्हटलें आहेः- ‘सर्व ऋतु पहिले, सर्वच मधले, सर्वच शेवटले.”}*{/kosh} धरीत असत. तसेंच प्राचीन काळीं भारतीय लोकांनां संपातांबद्दलची माहिती होती कीं नाहीं, याबद्दलहि वाद आहे. दुसरे पक्षीं, ध्रुवता-याच्या आधारानें जो दुसरा पुरावा पुढें मांडला आहे तो खोडण्याकरितां परीक्षणांत टिकेल असें थोडेंच पुढें मांडण्यांत येते. तथापि या प्रश्नाचा यापक्षीं अगर त्यापक्षीं कायम निकाल लागला असें मात्र म्हणतां येत नाहीं. आतां पुढें प्रश्न असा आहे कीं, प्राचीन भारतीय ज्योतिःशास्त्र व वैदिकपंचांग या विषयांतील नवीन शोधांनीं याकोबीच्या सिद्धांतांनां पुष्टि मिळते कीं नाहीं ?

या बाबतींत एक गोष्ट निश्चित आहे. हिंदुस्थानच्या इतिहासाच्या दृष्टीनें पाहतां वैदिक वाङ्मय हें ख्रिस्तपूर्व तिस-या सहस्त्रकांतलें आहे, आणि प्राचीन आर्यसंस्कृति ही चवथ्या सहस्त्रकांतील आहे याबद्दल वाद नाहीं; उलटपक्षीं वेदकाल म्हणजे इ. स. पूर्वी १२०० किंवा फार तर १५०० वर्षे हें मोक्षमुल्लरादि विद्वानांचें मत, प्राचीन हिंदुस्थानाबद्दलच्या राजकीय, वाङ्मयीन आणि धार्मिक इतिहासाबद्दलच्या आजच्या आपल्या माहितीशीं मुळींच सुसंगत नाहीं, याबद्दलहि वाद नाहीं. हे आतां जी. बुल्हरनें व इतर पंडितांनीं अगदीं खात्रीलायक सिद्ध केलें आहे.

इ. पू. तिस-या शतकांत उत्तरेकडील भारतीयांनीं दक्षिण हिंदुस्थान जिंकला, आणि तेथें ब्राह्मणसंस्कृतीनें चढाई केली, असें शिलालेखांवरुन सिद्ध होत आहे, तथापि बौधायन आणि आपस्तंब अशा कांहीं वेदशाखा दक्षिण हिंदुस्थानांत निघाल्या या गोष्टीवरुन असें दिसतें कीं, आर्यन् लोकांचा दक्षिणविजय पुष्कळ आधीं म्हणजे इ. पू. ७ व्या किंवा ८ व्या शतकांत किंवा त्यापूर्वीं झाला असला पाहिजे. कारण विजयानंतर ताबडतोब सर्व प्रदेशांत आर्यन् लोकांची वसाहत होऊन दक्षिणेंत वेदशाखा उत्पन्न होण्याइतकें ब्राह्मणांचें महत्व प्रस्थापित झालें असें मानणें सयुक्तिक दिसत नाहीं.

तसेंच इ. पू. १२०० चे किंवा १५०० चे सुद्धां सुमारास भारतीय आर्यन् हिंदुस्थानच्या अगदीं वायव्य कोंप-यात (पंजाबांत) आणि पूर्व अफगाणिस्तानांत रहात असत या मताचा त्यांनीं दक्षिण-हिंदुस्थान इ. पू. ६०० किंवा ७०० चे सुमारास जिंकला या म्हणण्याशीं मेळ मुळींच घालतां येत नाहीं. बुल्हर म्हणतोः “ज्यांच्यामध्यें अनेक जाती होत्या व नेहमीं आपआपसांत ज्यांचीं युद्धें चालू असत अशा वेदकालीन भारतीय आर्यन् वंशानें पांचसहा किंवा फारतर आठ शतकांत हिंदुस्थानांतील (पंजाब, आसाम व ब्रह्मदेश खेरीजकरुन) सुमारें १२३,००० चौरस मैल इतका प्रदेश जिंकला असावा व तेथें राज्यें स्थापन करुन एकाच नभुन्यावर सर्वत्र व्यवस्था केली असावी, ही कल्पनाच अगदीं हास्यास्पद दिसते, आणि शिवाय ह्या प्रदेशांत सर्वच रानटी जातींची वस्ती नव्हती, तर जेत्या आर्यन् लोकांच्या पेक्षां सुधारणेंत फारसे कमी नाहींत अशा कांहीं लोकांचीहि तेथें वस्ती होती, ही गोष्ट लक्षांत घेतली म्हणजे तर वरील कल्पना अधिकच हास्यास्पद ठरतें.”

सातशें वर्षांचा काल इतक्या पुष्कळ उलाढालींनां पुरेसा आहे हें ओल्डेनबर्गचें मत ग्राह्य आहे असें म्हणतां येत नाहीं. ओल्डेनबर्ग म्हणतोः “उत्तर व दक्षिण अमेरिकेंतील अफाट मैदानांत केवळ चारशें वर्षांत केवढें मन्वतंर झालें आहे हें लक्षांत घ्यावें.” तथापि ही केलेली तुलना पोकळ आहे. अमेरिकेंत ज्या जातींचा आणि संस्कृतींचा एकमेकींशीं संबंध आला त्यांमध्यें आणि हिंदुस्थानांतील ज्या जाती व संस्कृतींबद्दल आपणांस विचार करावयाचा आहे त्यांच्यामध्यें फार फरक आहे. प्राचीन हिंदुस्थानांतील राजकीय परिस्थितीचा विचार करतां ऋग्वेदांतील व आर्षकाव्यांतील कांहीं श्लोकांवरुन आपणांस अशी माहिती मिळते कीं, हिंदुस्थानच्या अर्वाचीन इतिहासांत जसा प्रकार आढळतो, तसाच सतत आपसांत लढाया चालू असण्याचा प्रकार प्राचीन आणि अत्यंत प्राचीन काळींहि निरनिराळ्या आर्यन जातींमध्ये चालू असे. अशा परिस्थितींत देशभर आर्यन् भाषा, लोक, आणि संस्था यांच्या प्रसाराचें काम क्रमाक्रमानें अत्यंत सावकाशच चाललें असलें पाहिजे. तसेंच हिंदी वाङ्मयांतील दोन अगदीं जुन्या भागांची एकमेकांशीं जर आपण तुलना केली तर आपणांस प्रत्यक्ष असें दिसतें कीं, आर्यनांची पुढें पूर्वेकडे व दक्षिणेकडे चाल फार आस्तेआस्ते झाली. ऋग्वेदांतील ऋचांवरुन आपणांस असें दिसतें कीं, हिंदी आर्यन् लोक त्या काळीं हिंदुस्थानच्या अगदीं वायव्य कोंप-यांत (पंजाबांतच) फक्त राहत असत, आणि ज्या काळांत ऋग्वेदांतील ऋचा मूळ तयार झाल्या तो काळ ब-याच शतकांचा असला पाहिजे.

ऋग्वेदांतील ऋचांचे प्राचीनतम आणि प्राचीन असे जे निरनिराळ्या प्रकारचे विभाग पडतात त्यांवरून हें सिद्ध होतें; आणि अनुक्रमणींमध्येंच फक्त नव्हे तर ब्राह्मण ग्रंथामध्येंहि ज्या ऋषींनां ‘मंत्रद्रष्टे’ असें म्हटलें आहे त्यांनांच इतिहासपूर्वकालीन ‘द्रष्टे’ असें खुद्द ऋचांमध्येंहि मानलें आहे आणि ऋचांच्या कर्त्यांनीं ‘जुन्या ऋचा, ‘जुन्या पद्धतीनुसार केलेल्या ऋचा’ असा पुष्कळ वेळां उल्लेख केलेला आहे, जणूं काय अशा ऋचांचा प्रचार अनादि कालापासूनच चालू आहे. परंतु वेदवाङ्मयांतील इतर ग्रंथांपेक्षां ऋग्वेद हा किती जुना आहे हें आपण या भागांत पुनः पुन्हां पाहिलेंच आहे. तसेंच वेदांतील गद्यग्रंथांच्या भाषेपेक्षां ऋचांची भाषा फारच आर्ष आहे. धार्मिक विधि व सांस्कृतिक स्थिति हींहि अगदीं निराळीं आहेत. ब्राह्मणांत, आरण्यकांत आणि उपनिषदांत ऋग्वेदांतील ऋचांनांच केवळ नव्हे तर इतर वेदसंहितांतील स्तोत्रमंत्रांनांहि आद्यपवित्र ग्रंथ असें गृहीत धरलें आहे. इतकेंच नव्हे तर त्या जुन्या ऋचा-मंत्रांचा अर्थहि पुष्कळ वेळां कळत नसे. जुन्या दंतकथाहि विसरुन गेल्या होत्या. ऋग्वेदांतील ऋचा आणि ऐतरेय ब्राह्मणांतील शूनःशेपाची कथा यांच्यामध्यें देखील कालाचें अंतर फार मोठें आहे.

हे ग्रंथ लेखी असते तर जो काल लागला असता त्यापेक्षां पाठपद्धतीमुळें बराच मोठा काल मध्यंतरीं गेला, असें गृहीत धरलें पाहिजे. निरनिराळ्या वेदशाखांतील आज अस्तित्वांत असलेल्या व पुष्कळ नष्ट झालेल्या ग्रंथांनां त्यांचें विशिष्ट स्वरुप प्राप्त होईपर्यंत मध्यन्तरीं शिष्य आणि आचार्यांच्या कित्येक पिढ्या होऊन गेल्या असतील. म्हणून भाषा, वाङ्मय आणि संस्कृति या सर्वांच्या आधारें पाहतां आपणांस असेंच मानलें पाहिजे कीं, अगदीं जुन्या ऋचांचा काल आणि संहिता अथवा ‘संग्रह’ ग्रंथांमध्यें त्या ऋचा एकत्र केल्या गेल्या तो काल-कारण ऋग्वेदसंहितेनेंहि लांबच्या एका गत कालाचा शेवट दर्शविला जातो-यांच्यामध्यें, आणि तसेंच ऋग्वेदसंहिताकाल आणि ब्राह्मणकाल यांच्यामध्यें बरींच शतकें गेलीं होती. त्याचप्रमाणें ब्राह्मणग्रंथ त्यांतील अनेक शाखा व उपशाखा आणि त्यांतील असंख्य गुरुपरंपरा व आद्य गुरुंचा उल्लेख ह्या सर्व गोष्टी अस्तित्वांत येण्यासहि कित्येक शतकांचा काल लागला असला पाहिजे. हें सर्व वाङ्मय, आणि तसेंच ब्राह्मणी संस्कृतीचा प्रसार आणि त्याजबरोबर प्रस्थापित होणारें भिक्षुकवर्गाचें वर्चस्व या सर्व गोष्टींनांहि कांहीं शतकांचा काल लागला असला पाहिजे. तसेंच उपनिषदांकडे पाहिलें तर तीहिं निरनिराळ्या काळांतील असून त्यांतहि मोठी लांब परंपरा व आचार्यांच्या पिढ्या होऊन गेल्याचें दिसतें. त्याप्रमांणें असेंहि दिसतें कीं, एवढ्या मोठ्या कालांत म्हणजे वेदवाङ्मयाच्या सुरुवातीपासून तों  त्याच्या सर्व शाखा उपशाखा पडेपर्यंतच्या एकंदर कालांत भारतीय आर्यन् लोकांनीं त्या मानानें अगदींच लहान प्रदेश म्हणजें सिंधुनदीपासून गंगानदीपर्यंतचा उत्तर हिंदुस्थानचा प्रदेश जिंकून घेतला होता. जर हिंदुस्थानच्या वायव्य कोंप-यापासून पूर्वेकडील गंगानदीच्या प्रदेशापर्यंत मुलुख काबीज करण्यास इतका मोठा काल लागला तर सर्व मध्य व दक्षिण हिंदुस्थान जिंकून घेण्यास कितीतरी शतकें लागलीं असलीं पाहिजेत. आणि याप्रमाणें आपण विचार केला तर ७०० वर्षांचा काल म्हणजे फार मोठा असें मुळींच वाटणार नाहीं.

ह्याच्याबरोबरच दुस-याहि गोष्टींचा विचार केला पाहिजे. इ.पू. ५०० वर्षांच्या सुमाराच्या बौद्धसांप्रदायिक वाङ्मयांत वेदवाङ्मय पूर्णपणें अस्तित्वांत असल्याचें गृहीत धरलें आहे ही गोष्ट निर्विवाद रीतीनें दाखवून दिल्याबद्दलचें श्रेय मोक्षमुल्लर साहेबांनां आहे. आतां तर आपणांस बौद्धवाङ्मयाबद्दल पुष्कळ माहिती झालेली आहे; आणि त्यावरुनहि बौद्धांनां वेदांचीच काय पण वेदांगें व ब्राह्मणीय वाङ्मय व शास्त्रें यांच्या विस्तृत वाढीबद्दलचीहि माहिती होती असें दिसतें. तीस चाळीस वर्षांपूर्वीं अशी समजूत होती कीं, बौद्धधर्माच्या सुरुवातीपर्यंतच्या हिंदुस्थानांतील धार्मिक इतिहासाची संपूर्ण वाढ सातशें वर्षांच्या अवधींतच झालेली आहे. परंतु प्राचीन हिंदुस्थानांतील धार्मिक इतिहासाच्या स्थितीबद्दल तीसचाळीस वर्षांपूर्वी जी माहिती होती त्यापेक्षां आज बरीच अधिक माहिती आपणांस उपलब्ध झालेली आहे. बौद्धसंप्रदाय निघण्याच्या पूर्वींहि हिंदुस्थानांत वेदांनां पवित्र ग्रंथ न मानणारे कांहीं पंथ होते, असें बुल्हरनें जोरानें प्रतिपादन केलें आहे. अशा पंथांपैकीं एका म्हणजे जैनपंथाची आजपर्यंतची परंपरा सनावलीवरुन इतकी विश्वसनीय ठरली आहे कीं, या पंथाचा आद्यप्रवर्तक गुरु इ. पू. ७०० च्या सुमारास होऊन गेला, ही गोष्ट खरी असें आपणांस बहुतेक मानण्यास हरकत नाहीं. तसेंच बुल्हरला असेंहि वाटत होतें कीं, वेद आणि ब्राह्मणधर्म यांच्या विरुद्ध असलेले इतर पंथहि, आजपर्यंत मानीत असत त्यापेक्षांहि ब-याच मागील काळापासून चालत आलेले आहेत, असें सिद्ध करतां येईल. परंतु दुर्दैवानें असा सिद्धान्त पुढें मांडण्यास त्यास सवड मिळाली नाहीं.

आतांपर्यंत केलेल्या विवेचनाचें तात्पर्य असें कीं, कालनिर्णयाच्या प्रश्नाची स्थिति नुकतीच पूर्वी सांगत असत तितकी बिकट नाहीं. वेदांतील अगदीं जुन्या ऋचांचा काळ म्हणजे इ. पू. १२०० किंवा १५०० वर्षे, या विधानास टिळक व याकोबी यांचा विरोध आहे. तथापि वेदकाल म्हणजे अनादिकालापासून इ. पू. ५०० पर्यंत हा होय, यापेक्षां अधिक माहिती खरोखर कोणासच नाहीं. वेदविषयाच्या वाङ्मयांत बहुतेक ठिकाणीं दिलेले वेदकालाबद्दलचे सन म्हणजे इ. पू. १२००-५०० किंवा १५००-५०० किंवा २०००-५०० यांपैकीं कोणताहि खरा मानण्यास आधार नाहीं. फक्त इ. पू. ५०० हा अंतिमकालाचा सन असें मानतां येतें आणि गेल्या दहा वर्षांतील शोधांचें तात्पर्य असें कीं, या इ. पू. ५०० वर्षे सनाबद्दल इ. पू. ८०० वर्षे असें म्हणावें लागेल, आणि आरंभकाल दुस-या सहस्त्रकाऐवजीं तिस-या सहस्त्रकांत जातो, हें म्हणणें अधिक सयुक्तिक होईल. परंतु विषयाच्या स्वरुपानुसार जेथें नक्की सन सांगतां येणें शक्य नाहीं, तेथें कोणतेंहि नक्की विधान न करण्याबद्दल आपण खबरदारी घेतली पाहिजे.

येथपर्यंतचें विवरण विंटर्निट्झ याच्या मतानुरोधानें केलेलें आहे. विंटर्निट्झशीं आमचा कांहीं मतभेद आहे तो पुढें स्पष्ट करूं.

वेदकालनिश्चयाला कांहीं मदत करुन, प्राचीन आर्यसुधारणेवर जास्त प्रकाश पाडावा या उद्देशानें कै. लोकमान्य टिळकांनीं ओरायन नांवाचा ग्रंथ लिहिला आहे. त्यांत ते म्हणतातः-

मॅक्स मुल्लरसारख्या पंडितांनीं भाषाशास्त्रपद्धतीचा उपयोग करुन देनशें वर्षांचा एक, असे छंदमंत्रकालादि वेदकालाचे चार विभाग केले आहेत. तेव्हां त्यांच्या मतें वेदकाल बुद्धकालापूर्वी ८०० वर्षे, म्हणजे इ. स. पू. १२०० हा आहे.

या कालनिर्णयाच्या पद्धतीवरून अनेक निरनिराळी विसंगत अनुमानें निघत असल्यानें ही पद्धति चुकीची आहे.

ज्योतिषपद्धतीला कांहीं संस्कृतज्ञ पंडितांनीं निरर्थक ठरविलें आहे तें वास्तविक बरोबर नाहीं. या पद्धतींत ब-याचशा अडचणी आहेत तरी योग्य प्रयत्न झाल्यास तिचा चांगला उपयोग होईल. नुसता पुराणांतील गोष्टींवर व शब्दव्युत्पत्तीवर भर न ठेवतां, ऋग्वेदसंहिता व ब्राह्मणें यांतील ऐतिहासिक व भौगोलिक आधारांवरून भारतीय वाङ्मयाचें प्राचीनत्व पूर्णपणें स्थापितां येतें.

वेदकालीं कालमापनाची व्यवस्था कशी होती हें पाहूं जातां, चंद्राचे वृद्धिक्षय, ऋतूंचे बदल, सूर्याचीं दक्षिणोत्तर अयनें, हीं त्यांचीं साधनें असावींतसें दिसतें. सत्रें सूर्याच्या सांवत्सरिक गत्यनुरोधानें बसविलीं असल्याकारणानें, सत्रें आणि संवत्सर यांतील मुख्य गोष्टी एकच असत; सत्राचा अंत तोच संवत्सराचा अंत; म्हणून सत्र किंवा यज्ञ आणि संवत्सर हे शब्द समानार्थी बनले होते. जसेः “संवत्सरः प्रजापतिः। प्रजापतिर्यज्ञः ।” {kosh ऐ. ब्रा. २.७;४.२२.}*{/kosh}
“ यज्ञो वै प्रजापतिः । संवत्सरः प्रजापतिः ।” {kosh तै.सं.२.५,७,३; ७.५.७,४;७.२.१०,३.}*{/kosh} इ.

चांद्र व सौर वर्षांचा मिलाफ करण्यासाठीं अधिक मास धरण्याची पद्धत ऋग्वेदकालापासूनची आहे; “वेद मासो धृतव्रतो द्वादश प्रजावतः । वेदा य उपजायते ।” असें ऋग्वेदांत (१.२५, ८) म्हटलें आहे. त्यावेळीं वर्षमान नाक्षत्र होतें व ऋतुचक्राशीं मेळ ठेवण्यासाठीं सुमारें दर २००० वर्षांनीं वर्षारंभ बदलीत असत. आतां वर्षारंभ केव्हां धरीत याविषयीं शोध लावितां असें दिसतें कीं, वैदिककाळीं वसंतसंपातीं वर्षारंभ होत असे पण पुढील काळांत तो मकरसंक्रमणीं होऊं लागला. या फरकाबरोबर उत्तरायणाचा मूळ अर्थ जो वसंतसंपातापासून शरत्संपातापर्यंत होणा-या वसंत, ग्रीष्म, व वर्षा या ऋतूंच्या सहा महिन्यांचा काळ, तो बदलून वर्षाच्या आयनिक विभागाचा तो दर्शक झाला. या नवीन वर्षारंभाबरोबर वार्षिक सत्रांचा आरंभहि मकरसंक्रमणीं होऊं लागला. तथापि पूर्वीचा वर्षारंभ अजीबात न टाकतां, त्याचा यज्ञकर्मांत उपयोग करीत व इतर व्यवहाराला नवीन वर्षारंभ धरीत असत.

वैदिक ऋषींनीं क्रान्तिवृत्ताचे २७ भाग गणिताप्रमाणें केले असतील हें संभवत नाहीं; ते मुख्य मुख्य तारांच्या खुणांवरुन ढोबळ प्रमाणावर केले असावेत. म्हणून नक्षत्रें समविभागात्मक न समजतां, त्या नांवांचे नक्षत्रपुंज समजले पाहिजेत.

वेदांगज्योतिष सोडून तैत्तिरीयसंहिता व ब्राह्मण यांत आढळणा-या चार निरनिराळ्या वचनांवरून वसंतसंपात कृत्तिकांमध्यें होता हें स्पष्ट दाखवितां येतें. तीं चार वचनें येणेंप्रमणें. एक, {kosh तै. सं. ४.४.१०. तै. ब्रा., ३.१.१, ६; १.१, २.}*{/kosh} नक्षत्रचक्रास व तदधिष्ठित देवतांस कृत्तिकांपासून आरंभ केला आहे असें सांगणारें वचन. दुसरें, {kosh तै. ब्रा. १.१.२, १, १.१.२, ६.}*{/kosh} कृत्तिका नक्षत्रांचें मुख आहे असें स्पष्ट वचन. तिसरें, {kosh तै. ब्रा. १.५.२, ७.}*{/kosh} कृत्तिका देवनक्षत्रांचा आरंभ आहे हें वचन. व चवथें, {kosh तै. सं. ७.४, ८.}*{/kosh} माघपौर्णिमेला उदगयनारंभ होत असे असें स्पष्ट सांगणारें सत्रारंभदिवसाविषयींचें विवेचन.

कृत्तिका नांवाचा तारकापुंज वर्षाचें आरंभस्थान धरून तैत्तिरीयसंहितेचा काळ इ.स.पू. सुमारें २३५० वर्षे इतका येतो.

वर्षारंभ माघांत होत होता असें मानलें तर त्याशीं क्रान्तिवृत्तांतील अयनादि प्रधान बिंदूचीं नक्षत्रासंबंधीं स्थानें बरोबर जुळतात. आतां वैदिककाळीं फाल्गुंनी पौर्णिमेला उदगयनारंभीं वर्षारंभ होत असे कीं काय हें पाहूं. उदगयनारंभ जर माघांत न होतां फाल्गुनांत झाला तर वसंतसंपातहि कृत्तिकांच्या पुढें दोन नक्षत्रें (ऋतु एक महिना मागें यावयास वसंतसंपात दोन नक्षत्रें मागें आणला पाहिजे) म्हणजे मृगशीर्षात येईल. मृगशीर्षाचें दुसरें नांव आग्रहायणी. आग्रहायणी नक्षत्रांचें मुख होतें असें कोठें कोठें वैदिक ग्रंथांत म्हटलें आहे. मार्गशीर्षीं पौर्णिमेला पूर्वी एकदां वर्षारंभ होत असे व त्या पौर्णिमेच्या नांवावरुन मृगशीर्षाला आग्रहायणी हें नांव पडलें अशी पुष्कळांची कल्पना आहे. पण ती निराधार दिसते. मार्गशीर्ष पौर्णिमेला पौर्णिमेला वर्षारंभ होत असे असें धरल्यास, त्याल “ {kosh भ.गी.१०-३५.}*{/kosh} मासानां मार्गशीर्षोऽस्मि ऋतूनां कुसुमाकरः।“ या गीतावचनाखेरीज दुसरा आधार दिसत नाहीं. हें वचन आग्रहायणी शब्दाच्या चुकीच्या व्युत्पत्तीवर लिहिलें गेलें असावें व त्याचाच अनुवाद सर्व विद्वानांनीं केलेला दिसतो. या चुकीच्या कल्पनेमुळें ज्योतिषसिद्धांत चुकीचे निघूं लागले व त्यांनां संगति आणण्यासाठीं दुस-या नवीन कल्पना लढवाव्या लागल्या. यावरुन आग्रहायणीं याचा सध्यां प्रचलित असलेला अर्थ घेऊन चालावयाचें नाहीं हें उघड दिसतें. या नांवाच्या नक्षत्रामध्यें सूर्य असतांना वर्षारंभ होत असे असें मानल्यास बराचसा उलगडा होणार आहे; मग त्या नक्षत्राचें नांव आग्रहायणी असो कीं, अग्रहायण असो. तें नक्षत्र वर्षामध्यें पहिलें एवढाच मुद्दयाचा प्रश्न आहे. अग्रहायण म्हणजे मृगशीर्षनक्षत्र असें धरून चालूं या. उदगयन फाल्गुनी पौर्णिमेला झालें म्हणजे अर्थात् दक्षिणायन किंवा पितृयान भाद्रपदी पौर्मिमेला येणार हें उघड आहे. तेव्हां भाद्रपदाचा कृष्णपक्ष हा पितृयानाचा पहिला पंधरवडा किंवा पितृपक्ष झाला. पारशी लोकांचाहि पितृपक्ष याच वेळेस होतो. पारशांचें व आपले सर्व बाबतींत उलटें असल्यानें आपला वर्षारंभ उत्तरायणीं झाला तर त्यांचा दक्षिणायनीं होतो; पण पितृपक्ष मात्र पवित्रं गोष्ट म्हणून स्थानभ्रष्ट केली गेली नाहीं.

याप्रमाणें तैत्तिरीयसंहिता व ब्राह्मणें यांत असलेल्या “फाल्गुनीपूर्णमास वर्षाचें मुख होतें” या वचनाचा स्वाभाविकपणें संदर्भावरून होणारा – म्हणजे त्या दिवशीं उत्तरायण होत असे – असा अर्थ घेतल्यास, व मृगशीर्षवाचक अग्रहायण शब्दाचा “वर्षारंभ करणारें” असा खरा अर्थ घेतल्यास, त्या नक्षत्रामध्यें एकदां वसंतसंपात होता हें उघड दिसतें. पितृपक्षाच्या काळावरूनहि असेंच दिसतें. कृत्तिकामध्यें वसंतसंपात होता ही गोष्ट अशाच पुराव्यावरुन सिद्ध केली आहे. मृगशीर्षपुंजांत व्याधासह पांच पहिल्या प्रतीचे तारे आहेत, दुस-या प्रतीचे बरेच आहेत व बाजूला आकाशगंगा आहे. यांतील ता-यांचे अनेक आकार कल्पिलेले असून त्यांवर बरीच रूपकें बसविलीं आहेत. या पुंजांत सबंध मृगाची आकृति न पाहतां फक्त त्याचें शीर्षच कल्पिणें बरोबर होईल. कॅनिस, ओरायन व अर्सा हे तारकापुंज मूळचे आर्यन् लोकांचेच आहेत व आर्यन् जातीच्या तीनहि शाखांमध्यें या पुंजांविषयीं सारख्या गोष्टी आढळतात. स्वर्गद्वाराचें श्वानांकडून रक्षण, यमलोकाच्या वाटेंत असलेली (वैतरणी) नदी, ती तरुन जाण्याकरितां असलेली नाव, आकाशगंगा वगैरेंच्या कथा ग्रीक, पर्शु व भारतीय या तीनहि आर्यन् शाखांतून आढळतात व वसंतसंपात मृगशीर्षांत होता असें मानल्यानें या रूपकांचा चांगला मेळ बसतो, व आपल्या पुराणांतील मुख्य मुख्य देवतांचें मूळ व स्थान त्या तारकापुंजांत किंवा त्याचा आसपास असलेलें स्पष्ट दिसून येतें.

अमरकोशकारानें दिलेल्या मृगशीर्षवाचक आग्रहायणी शब्दाची परंपरा पाणिनीच्या पूर्वीं वैदिककालापर्यंत म्हणजे आग्रयणी या वैदिक शब्दाशीं लावितां येते. मृगशीर्षाला पूर्वीं यज्ञकर्मांत आग्रयण म्हणत असावे असा बराच संभव दिसतो. मूळ आग्रयणेष्टि या प्रत्येक अयनारंभदिवशीं करावयाच्या असत, परंतु संपातचलनामुळें ऋतु मागें मागें येऊन या इष्टी अयनारंभीं न होतां कोणत्यातरी दुस-या वेळीं होऊं लागल्या. तेव्हा आग्रयणेष्टींचा खरा अर्थ लोपल्यावर आग्रहायण किंवा आग्रयण या शब्दाचा अयनारंभीचें नक्षत्र असा अर्थ जाऊन तो शब्द ज्या महिन्यांत ती इष्टि होते त्या महिन्याचा वाचक झाला व त्यावरुन “मासानां मार्गशीर्षोंहम्” वगैरे कल्पना निघाल्या.

आर्यन् लोकांच्या शाखांतील ओरायनसंबंधाच्या विलक्षण कथासाम्यावरुन, या कथा उत्पन्न झाल्यावर व आग्रयण उर्फ ओरायन याचें स्वरूप ठरून गेल्यावर या शाखा एकमेकांपासून विभक्त झाल्या असाव्यात असें निश्चित दिसतें.

ऋग्वेदांत पहिल्या मंडळांत (१.१६१, १३) एक ऋचा आहे; तींत “एक श्वान ऋभूंनां संवत्सराच्या शेवटीं जागे करी” असा मजकूर आहे. या ठिकाणीं ऋभु म्हणजे ऋतु व श्वान म्हणजे मृगपुंजाजवळील श्वानपुंज असा अर्थ घेतल्यास, या तराकापुंजाशीं सूर्य आला म्हणजे ऋतुदेवता जाग्या होऊन नव्या वर्षास सुरुवात होते, असा वरील ऋचेचा चांगला अर्थ निघतो. म्हणजे वसंतसंपात त्या वेळीं श्वानपुंजाजवळ होता, अर्थातच उत्तरायणारंभ फाल्गुनी पौर्णिमेला होत असे व मृगशीर्ष नक्षत्रमालेच्या आरंभीं असे. वसंतसंपात मृगांत होता हें तैत्तिरीय संहिता व ब्राह्मण यांतील वचन सिद्ध करुन दाखविण्यास ऋग्वेदांतील हे स्थान योग्य आहे. असेंच दुसरें एक स्थान म्हणजे दहाव्या मंडळांतील वृषाकपीचें सूक्त. {kosh क्र. १०.८६.}*{/kosh} या ठिकाणीं वृषाकपीचा अर्थ मृगशीर्षांत वसंतसंपात असतांना शरत्संपातीं असलेला सूर्य असा घेतला म्हणजे हें सूक्त चांगलें समजतें. या सूक्तांत मृगशीर्ष व श्वानपुंज यांचेंच केवळ वर्णन आहे असें नाहीं, तर सूर्य ज्यावेळीं विषुव वृत्ताच्या दक्षिणेस किंवा उत्तरेस येऊं लागतो तेव्हांची त्याची स्थितीहि स्पष्टपणें त्यांत वर्णिली आहे. या गोष्टीशीं ऋभूंची गोष्ट जोडली म्हणजे आपणांला या गोष्टी केव्हां रचल्या गेल्या तो काळ निश्चित करतां येतो.

चित्रापूर्णमासीं वर्षारंभ होत असें असें तैत्तिरीय संहितेंत दुसरें एक स्पष्ट वचन आहे. फाल्गुनी पौर्णिमेला दक्षिणायन झाल्यास वसंतसंपात ज्याप्रमाणें मृगशीर्षात येतो, त्याचप्रमाणें चैत्रीपौर्णिमेला जर दक्षिणायन झालें तर वसंतसंपात पुनर्वसूंत होईल. हा काळ फार प्राचीन आहे, वेदांमध्यें याला स्पष्ट पुरावा फारसा आढळत नाहीं; इतर आर्यन् शाखांतून तर याविषयीं कांहींच सांपडत नाहीं. यज्ञग्रंथांत पुनर्वसूंच्या प्राचीन स्थितीच्या कांहीं खुणा आहेत. अदिति ही पुनर्वसूंची अधिष्ठात्री देवता. यज्ञ देवांपासून निघून गेला असतांना तिनें यज्ञारंभ करुन दिला. याचा अर्थ असा दिसतो कीं, या काळापूर्वी यज्ञ वाटेल तेव्हां करीत परंतु तेव्हांपासून ते अदितीपासून करावे असें ठरलें. म्हणजे अदिति ही यज्ञाची उर्फ संवत्सराची आरंभक झाली. तिचें अधिष्ठान वसंतसंपातीं आहे. तेव्हां* सूर्याचा वार्षिक क्रम अदितीपासून सुरु होत असे. यावरून पुनर्वसूंमध्यें वसंतसंपात असतांना वर्षारंभ मानणारें पंचांग होतें हें निश्चित ठरतें.

आतांपर्यंत तीन प्रकारच्या प्राचीन पंचांगकालांसंबंधीं विवेचन केलें. त्यापैकीं अगदीं पहिला काल तो अदितिकाल किंवा मृगशीर्षपूर्वंकाल. याची मर्यादा अजमासें इ.स. पूर्वीं ६००० ते ४००० पर्यंत. या कालीं ऋचा पूर्ण झाल्या नव्हत्या. या कालाविषयींचें स्मारक फक्त भारतीयांत आढळतें.

दुसरा, मृगशीर्षकाल. याची मर्यादा इ. स. पूर्वी ४००० ते २५०० पर्यंत. या कालांत ऋग्वेदाचीं बरींच सूक्तें झाली व इतर गोष्टी रचल्या गेल्या. या कालाच्या उत्तरभागांत आर्यशाखा विभक्त झाल्या.

तिसरा, कृत्तिकाकाल. याची मर्यादा इ. स. पूर्वीं २५०० ते १४०० पर्यंत. हा तैत्तिरीयसंहिता व ब्राह्मणांचा काल होय. ऋक् सूक्तें या कालीं समजत नाहींशीं झालीं होतीं.

चवथा, प्राचीन संस्कृत वाङ्मयाचा काल. इ. स. पूर्वीं १४०० ते ५०० पर्यंत. याला बुद्धकाल म्हणतांत. सूत्रें व षड्दर्शनें या कालांत झालीं.
हे वर दिलेले काल स्थूलमानानें बरोबर आहेत. सर्वांत जुना जो अदितिकाल, त्या वेळीं आर्यसुधारणेचा आरंभ नसून ती यापूर्वीं किती तरी काल सूरु झाली होती हें त्या वेळच्या पंचांगाच्या आवश्यकतेवरुन उघड होतें.

पंचांगांत फेरफार अर्वाचीन कालापर्यंत चालू आहेत. याच्या खुणा त्या त्या वेळच्या ग्रंथांतून आढळून येतात. हा इतक्या प्रमाणांवरुन ठरविलेला वेदकाल प्राचीन व अर्वाचीन विद्वानांच्या मतांशीं विरुद्ध नाहीं.

याप्रमाणें वेदकाल इ. स. पूर्वीं ४००० वर्षांच्या सुमारास जर निश्चित केला तर वेदासंबंधींच्या सर्व गोष्टींचा समाधानकारक उलगडा होतो.

(टिळकांच्या वेदकालाच्या समर्थनार्थ आणखी पुरावे रा. व्यंकटेश बापूजी केतकर यांनीं आणले आहेत (परिशिष्ट पहा)).