प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण २ रें.
विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यन्त.

 काकेशियन महावंश.- शरीराच्या ठेवणीतील सादृश्यावरुनच काकेशिअन महावंश म्हणून एक वंश गृहीत धरला आहे. यामध्यें सेमेटिक, आर्यन व हॅमेटिक असे तीन भाषासमुच्चय धरले आहेत. द्रविडांस शरीरलक्षणांवरुन कीन काकेशियनमध्यें घालतो आणि भाषाशास्त्रज्ञ त्यांस दूरचे समजतात. शरीरलक्षणांवरुन वर्गीकरण करुन नातीं जोडणें आणि भाषांवरुन नातीं जोडणें या दोन्ही क्रिया अर्वाचीन संशोधन करतांना दिसतात.

कीनचें असें मत आहे कीं कॉकेशियन मनुष्य प्रथम भूमध्य समुद्रांत जमीन होती तेथें विकास पावला व तेथून तो नील नदीचे खोरें व पश्चिम आशियांत गेला. तसाच तो स्पेन व पश्चिम यूरोपकडे गेला. या स्थानांतरास अनेक सहस्त्रकें लागली; तोपर्यंत त्याची सुधारणा चालूच होती. बास्क, केल्ट, गॉल, पिक्ट हे आयबेरियन लोकांपैकीच असून हे सर्व कॉकेशियन आहेत असें प्रो. -हाइस व ग्रे या शास्त्रज्ञांचे मत आहे.

यांत गोरा व काळासांवळा हे दोन मुख्य वर्ण असून कपिश अथवा तपकिरी रंगाचेहि कांही लोक आहेत. हॅमिटिक, सेमिटिक व द्राविड हे याच वंशांत मोडतात. यांचे मुख्य गुणधर्म: कातडीचा रंग बहुतेक श्वेतवर्णावर, क्वचित्  कृष्णवर्ण; केंस सफेत, पिंगट, भुर्के व काळे; मऊ सरळ किंवा थोडेसे कुरळे; दाढी विपुल, कवटीची लांबी मध्यम; लहान व अरुंद चेहरा व मध्यभागीं उन्नतत्व; नेत्रपुट मध्यम आकाराचें; नाक लांब व तरतरीत; जबडा पुढें न आलेला; दांत लहान.

हॅ मि टि क.- या लोकांतील बेजा, अफार, अगोस, सोमाली, गाला, मसाई हे सर्व लोक काकेशियन वंशाचे आहेत.  यांत शिद्दी वंशाचे मिश्रण दिसून येतें पण मुख्यत्वें हा नमुना कॉकेशियन पद्धतीचा आहे. अबिसिनिआंत सेमिटिक, हॅमिटिक व शिद्दी या सर्वांचें अतिशय मिश्रण झालें आहे. हॅमिटिक लोक व अरब, यहुदी इसेमिटिक लोक यांमध्ये वंशसाम्य आहे असें आधुनिक शोधाअंती सिद्ध झालें आहे. हॅमिटिक लोक आशियांतून आफ्रिकेत गेले कीं सेमिटिक आफ्रिकेंतून आशियांत आले याविषयीं मतभेद आहे. पण सेमिटिक आफ्रिकेमधून आले असावे व त्यांपैकी कांही विशेषतः अरब पुन्हा आफ्रिकेत गेले व कांही इराण, हिंदुस्थान, मॅलेशिया, मध्य आशिया येथपर्यंत गेले.

सेमिटिक:- यांचे पांच मुख्य भाग आहेत. (१) मेसापोटेमियांतील असुर राष्ट्रे. (२) सीरिया पॅलेस्टाइन येथीलऐरमियन. (३) हिब्रू, फिनिशियन व कार्थेजियन. यांस कॅनेनाइट म्हणत. (४) अरब. (५) अरबस्तान व अबिसिनिया यांमधील हिराइट; यांपैकीं बहुतेक लुप्त झाले आहेत. यांची चेहेरेपट्टी सुबक असून, तोंड गोल, नाक सरळ, लहान व टोंक असलेली हनुवटी, सरळ कपाळ, काळे बदामाच्या आकाराचे डोळे, नरम व काळेभोर केंस, पूर्ण वाढ होणारी दाढी वगैरे काकेशियन मानववंशाचे सर्व गुण यांच्यांत स्पष्ट दिसतात. यांतील सुंदर व्यक्तीचें सौंदर्य यूरोपीयांशी तुल्य असतें. या जातीच्या लोकांतूनच यहुदी, ख्रिस्ती व महंमदी हे संप्रदाय निघाले. यांच्या भाषा स्थैर्य व चिरकालिकता यांत प्रसिद्ध आहेत.

आर्यन्.- ही युरेशिया नांवाच्या खंडांत कोठेतरी रहात होती हें नि:संशय आहे. पण आर्यन् भाषा बोलणारे सर्व आजचे लोक एकच मानववंशांतले होते असें मानणें अशास्त्र आहे. आर्यन् लोक सर्वत्र पसरल्यामुळें त्यांत अनेक वंशांचें मिश्रण झालें. आर्यनपासून भिन्न अश अनेक कॉकेशियन जाती आर्यन् भाषा बोलतात. टयूटन, केल्ट, आर्मोनियन, अफगाण हे सर्व आर्यन् भाषा बोलतात पण ते आर्यन् नाहीत असें कीनचें मत आहे. व त्याच्या मतें 'मॅक्समुल्लर' इत्यादि ग्रंथकारांच्यामुळे प्रसिद्धीस आलेली ‘आर्यन् उपपत्ति’ आधुनिक शोधांच्या दृष्टीनें त्याज्य ठरते.

मू ल स्था न.- याचप्रमाणें आर्यन् लोकांचें मूलस्थान शोधण्याचाहि प्रयत्न विफल आहे असें ठरतें. आज जरी आर्यन् लोकांनी अनेक संस्कृतींवर आपली छाप बसविलेली दिसते तरी एका कालीं तेहि संस्कृतीच्या प्राथमिक अवस्थेंत होते, व पशुपालन हें त्यांचे उदरनिर्वाहाचें साधन असून त्यांस शेतकीची विशेष माहिती नव्हती, तांबे एवढीच धातु ज्ञात होती व कांहीं अडाणी चालीहि त्यांच्यांत होत्या. फ्रेंच मानवशास्त्रज्ञ, व रोट, व्हॉन डनझीन इत्यादि लोकांच्या मतें त्यांचे मूलस्थान आशियांत असलें पाहिजे. लो. टिळकांच्या मतें ते एका वेळीं उत्तरध्रुव प्रदेशावंर असावे.

प रि भ्र म ण.- यांच्या पशुपालवृत्तीस विस्तृत क्षेत्राची जरुर असल्यामुळें कांही जमाती डॅन्यूब नदीकडे, कांही स्वित्सर्लंडमध्यें, कांही  इराण, युफ्रेटिस नदी वगैरेकडे गेल्या. आर्यन् लोकांचीं परिभ्रमणें सुरु होण्यापूर्वी उत्तरआफ्रिकेंतील लोक स्कॅंडिनेव्हिया-पर्यंत पोचले होते, यूरोपांतहि आर्यन् जाण्यापूर्वी भिन्न लोक होते. फ्रान्समधील ओव्हर्न व सॅव्हॉय प्रांतांतील लोक व हिंदुकुश पर्वताजवळील गालचा हे आर्यविभिन्न वंशाचे आहेत.

व र्ण.- मूळ आर्य श्वेतवर्ण असावेत. श्वेतवर्ण व लांब डोक्याच्या सर्व लोकांमध्यें आर्यन् भाषा व आर्यन् संस्था प्रचलित आहेत, व या गोष्टी इतर लोकांत आढळत नाहींत हें प्रो. ला पूज यांनी सिद्ध केलें आहे. प्राचीन इराणी, हिंदू, ग्रीक, जर्मन, रोमन लोकांचे लॅटिन, एट्रुस्कन इत्यादी घटक हे सर्व लांब डोक्याचे व उजळ रंगाचे आहेत. इस्थोनिअन, लिव्होनियन, फिन, बास्क, आयबेरियन हे दुस-या वर्गांत येतात. आर्यन् लोकांचें इतर लोकांशी मिश्रण नूतन अश्मयुगाच्याहि पूर्वी सुरु झालें. आजहि असें मिश्रण चालू आहे.

आर्यन् भाषांत विभक्तिप्रत्ययांनी रुपें बदलण्याची क्रिया पूर्णतेस पोंचली आहे. कॉकेशस पर्वताजवळ अद्यापि कांही मूलभूत भाषा आढळतात व तेथील कांही लोक कृष्णवर्णाचे पण सुंदर दिसतात, व कांही कुरुप आहेत. यावरुन येथील मूळचे श्वेतवर्ण आर्यन् इतरांशी मिश्रणानें भ्रष्ट झाले असावे.

द्राविड.- दक्षिण हिंदुस्थानांत द्राविड लोक आहेत. त्यांत तेलगू, तामिळ, कानडी, मल्याळी, कोडगू, राजमहाली, ओरागोन व गोंड हे येतात हे लोक आर्यन् लोकांच्या पूर्वी हिंदुस्थानांत होते व त्यांच्याहि पूर्वी हिंदुस्थानांत निग्रिटो होते. युरोपांतील मग्यार ज्याप्रमाणें आर्यन् लोकांशी संघटनानें सामिल झाले आहेत, त्याप्रमाणें द्राविडांचें हिंदुस्थानांतील आर्यन् लोकांशीं तादात्म्य झालें आहे. कांहीच्या मतें द्राविड हे मांगोलियन वंशाचे असून वायव्येकडून हिंदूस्थानांत आले व ब्राहुइ ही त्यांच्यापैकीं एक दूर राहिलेली जात आहे. परंतु द्राविड व मांगोलियन यांत साम्य दिसत नाहीं.

निलगिरीमधील तोड व जपानांतील ऐनु हे विपुलकेशत्वामुळें कॉकेशियन वंशांतीलच मानतात.

मनुष्याच्या विकासानंतरच्या काळाचे विभाग पाडण्याचें साहस अजून कोणी केलें नाहीसें दिसतें. भाषाविकासावरुन विभाग पाडावयाचे झाल्यास सर्व भाषांचा अगोदर इतिहास जुळवावा लागेल आणि त्यांतहि कालक्रम शोधावा लागेल.

आर्यन् महावंशाच्या भाषांचा जितका सूक्ष्म अभ्यास झाला आहे तितका दुस-या कोणत्याहि भाषांचा झाला नाहीं.

आज भाषांच्या दृष्टीनें जर भेद पाडावयाचें झाले तर

(१)    मूल आर्यनभाषेचा काल- उद्भवकाळापासून इंडोयूरोपीय पोटभाषा व पर्शुभारतीय पोटभाषा यांच्या उभ्दवकालापर्यंत.
(२)    पर्शुभारतीय काल.
(३)    संस्कृत व अवेस्ता यांचा काल.

असे काल पाडल्याशिवाय गत्यंतर नाहीं. आर्यन् भाषा व दुसरी कोणती तरी भाषा यांच्या पूर्वीच्या काळाकडे जाण्यास अजून कोणी धजलें नाहीं.

आर्यन् भाषेचा काल तरी कोणता असावा ? कांहीनीं दहा हजार वर्षापूर्वींचा असें स्थूल अनुमान केलें आहें. हेंच अनुमान लो. टिळकांनी आपल्या आर्यांचें मूलस्थान (Arctic Home in the Vedas) या पुस्तकांत स्वीकारलें आहे.

असुरसंस्कृतीच्या प्रारंभाचा काळ ९|१० हजार वर्षांपूर्वी असा धरतात.

भाषाशास्त्राच्या साहाय्यानें जर कोणी पूर्वीच्या काळाकडे जाण्याचा प्रयत्न केला तर तो त्या साहित्यानें इ. स. ८००० च्या पूर्वीच्या कालांत जाईल. कां की असुरसंस्कृतीच्या काळीं भिन्न भाषा ब-याच विकसित होत्या. असुर भाषेचें आणि संस्कृत भाषेंचें रुप त्या काळी कसें असावें याची आपणांस कल्पना होते आणि असुर भाषा आणि वेदभाषा यांचे पृथक्त्व आपणांस दिसतेंच.

भाषारुपी साहित्याचा ऐतिहासिक अभ्यास कसा करावयाचा यासंबंधानें बरीच भिन्न मतें आहेत आणि निरनिराळया त-हेनें खटपटी झालेल्या आहेत. पहिल्या प्रथम जी खटपट झाली ती केवळ निरनिराळया भाषेंतील शब्द घेंऊन त्यांचे एकमेकांशी सादृश्य अगर विसादृश्य पहावयाचें या पद्धतीनें झाली. पुढें लवकरच या पद्धतींतील दोष अभ्यासकांच्या लक्षांत आले. दोन निरनिराळया भाषांतील शब्द वरवर सारखे दिसतील, परंतु प्रत्येक शब्दाचें पृथक्करण करुन पृथकृत झालेल्या अंगांचा अर्थ पाहिला व त्या दोन्ही भाषांतील मूल घटकांची तुलना करुन पाहिली म्हणजे कांहीच सादृश्य दिसून येणार नाहीं असे प्रकार पुष्कळ दृष्टीस पडतील, व त्यामुळें आणि एका भाषेमध्यें दुस-या भाषेंतील शब्द राष्ट्रांच्या आलेल्या संबंधामुळें जाणें शक्य असल्यामुळें शब्दसादृश्याचें महत्व दोन भाषांच्या मधील एकवंशसंबंध या दृष्टीनें कमी झालें. हॉवेलॅकनें {kosh Science of Language by Hovelacque London: 1877.}*{/kosh} या तौलनिक व्युत्पत्तिशास्त्राची सपाटून थट्टा उडविली आहे आणि या शब्दसादृश्याचें महत्व फारच कमी धरलें आहे. त्याचें म्हणणें असें आहे कीं, शब्दापेक्षां भाषेची अन्तर्घटना अधिक महत्वाची आहे. परके शब्द एखाद्या भाषेंत येतील आणि जातील परंतु भाषेची अन्तर्रचना बरीचशी कायम राहते.

ज्या अभ्यासकांनीं भाषांच्या अन्तर्रचनेकडे लक्ष दिलें आहे त्यांनी एक तत्व पाहून भाषांची जुळणी केली आहे, तें तत्व म्हटलें म्हणजे सर्व भाषा एका काळीं समासयुक्त होत्या म्हणजे जे सबंध आणि अर्थ आज आपण प्रत्ययांनी अगर शब्दयोगी अव्ययांनी दाखवितों ते सर्व पूर्वी निरनिराळया शब्दांच्या समासांनी व्यक्त होत असत, परंतु त्यांपैकी कांही शब्द पुढें प्रत्ययरुप झाले. हा जो फरक पडला त्या फरकास महत्व देऊन त्या फरकाच्या कमीजास्त प्रमाणानें भाषांची परंपरा आणि भाषांमधील भगिनीसंबंध त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांचें म्हणणें असें कीं, एखाद्या भाषेंत नवीन शब्द येणें ही किया लवकर होते, परंतु शब्दाचे प्रत्यय होण्याची क्रिया अधिक उशीरां होते; यामुळें भाषाभ्रष्टतेच्या पाय-या शब्दांचे प्रत्यय होणें या क्रियेनें मोजल्या पाहिजेत. या त-हेचें मत व्यक्त करणा-या लोकांनीं भाषांच्या अभ्यासाचें आणि त्यांत होणा-या फेरफारांचे महत्वाचें तत्व पुढें मांडले यांत शंका नाहीं, तथापि तौलनिक व्युत्पत्तिशास्त्रास ऐतिहासिक दृष्टीनें त्यांनी जें इतकें कमी महत्व दिलें तितकें कमी महत्व देणें चुकीचे होईल. त्यांनी आपली स्वतःची पद्धति वापरतांना अगदीं कमी महत्व दिलें असें मात्र नाहीं. कारण सामासिक भाषा, शब्दयोगी भाषा आणि प्रत्ययी भाषा उर्फ आदेशी भाषा एवढेंच वर्गीकरण करुन ते भाषाशास्त्रज्ञ थांबलें नाहींत. त्यांनी पुन्हां आर्यन् भाषावंश, सेमिटिक भाषावंश असे निरनिराळे भाषावंश प्रत्ययी भाषांमध्यें पाडलेच आहेत. हे भाषावंश त्यांनी कसे पाडले ? शब्दसमुच्चयावरुनच पाडले आहेत असें दिसतें. सर्वच भाषा ज्या एका काळीं सामाजिक स्वरुपाच्या होत्या त्या काळीं जर आजचें भाषाशास्त्र जन्मलें असतें तर त्यांस भाषांचें वर्गीकरण करतांच आलें नसतें काय ? सर्व भाषा एकच आहेत असें त्यांनी म्हटलें असतें काय ? शब्दादेशसंमुख जो अपभ्रंश होतो त्या अपभ्रंशाच्या प्रमाणावरुन भाषांचे वर्गीकरण करणें ही एकच किंवा मुख्य भाषावर्गीकरणाची म्हणजे त्यांचे वांशिक संबंध दर्शविण्याची कसोटी होती असें म्हणणें चुकीचें होईल. ज्या वेळेस सर्व भाषा सामासिक स्थितींत असतील अशा वेळेस भाषांतील शब्दसंग्रहावरुनच त्यांचें वर्गीकरण करावें लागेल. असो.

कोणत्या फरकांचे महत्व किती व अमुक भाषा कोणत्या वर्गांत घालावी याविषयी जो विचार करावयाचा तो विचार करतांना शब्दसमुच्चय व अपभ्रंशप्रमाण हीं दोन्ही तत्वें लाविली पाहिजेत आणि त्यावरुन वांशिक संबंध शोधिले पाहिजेत. सिंहली भाषेसंबंधानें जो संशोधकांचा घोंटाळा झालेला आहे त्याचें कारण, आपणांस काय पहावयाचें आहे इकडे दृष्टि न ठेवतां अपभ्रंशप्रमाणास महत्व देऊन भाषेचें वर्गीकरण करण्याचा मोह पडल्यामुळें सिंहली भाषेचें आर्यन् भाषांपासून पृथक्त्व स्थापन करण्याचा मोहपुष्कळांस पडला होता. त्या मोहामुळें जी गडबड उडाली ती गडबड आम्ही मार्गे (विभाग पहिला पृ. १३९) दिली आहे. हॉवेलॅकनें सिंहली भाषेस शब्दयोगी भाषांत टाकून आर्यन् भाषांपासून तीस वियुक्त केलें आहे.

शब्दसमुच्चय व अपभ्रंशांचें प्रमाण हीं दोन्हीं प्रमाणें धरुन भाषांचे वांशिक संबंध शोधले पाहिजेत. कधीं कधीं असें दिसून येईल कीं एका वंशांतील एक भाषा शब्दयोगी भाषांत मोडेल व दुसरी भाषा प्रत्ययी अगर सामाजिक भाषांत मोडेल. असो.

आतां आपणांस जे अनेक भाषासमुच्चय दृष्टीस पडतात त्यांच्याकडे लक्ष देऊं आणि त्यांच्या साहाय्यानें मनुष्यजातीचा इतिहास कोठपर्यंत मिळतो तें पाहूं. आपणांस जे मोठाले भाषा वंश दृष्टीस पडतात ते येणेंप्रमाणें.

(१)    आर्यन् भाषासंघ: यांमध्यें भारतीय, इराणी, यवनी, इटालिक, केल्टिक, स्लॅव्हॉनिक, लेटिक इत्यादि उपसंघ पडतात. आणि याशिवाय एट्रुस्कन, डेशियन, अल्बेनियन इत्यादि भाषा कोणत्या वर्गांत घालावयाच्या तें अजून अस्पष्ट आहेच.

(२)    द्राविडी भाषासंघ: यामध्यें हिंदुस्थानांतील तामिळ तेलगु इत्यादि दाक्षिणात्य भाषा, ब्राहुइ भाषा यांचा समावेश होतो.

(३)    सेमिटिक भाषासंघः यांत तीन उपसंघ दृष्टीस पडतात. ते अरमिओ-असुरियन, खनानी आणि अरबी होत.

(४)    हॅमिटिक भाषासंघ: यांत इजिप्शिअन, लिबियन आणि इथिओपियन भाषा येतात.

(५)    अमेरिकन भाषासंघ: अमेरिकेंतील इंडियन लोकांमध्ये शेंदीडशें भाषा दृष्टीस पडतात परंतु त्या सर्वांचें मूळ एकच आहे असें मानण्यांत येतें.

(६)    आफ्रिकन भाषासंघ: आफ्रिकेंतील निग्रोमध्यें अनेक भाषा दृष्टीस पडतात. त्यांच्या भाषांचें पद्धतशीर भाषाशास्त्र अजून चांगलेसें तयार झालें नाहीं. त्यांचे भाषासंघ येणें प्रमाणें: (१)हॉटेटॉट (२) बुशमन (३) बोलोफ (४) मन्डे (५) फेलुप (६) सोनराइ (७) हौसा (८) बोर्नु (९) कुह (१०) एवे किंवा इफे (११) बन्टु (१२) फुलु (१३) न्युबियन.

(७)    नेग्रिटो
(८)    आस्ट्रेलियन
(९)    पाप्युअन
(१०)    मलायो पॉलिनेशियन
(११)    जपानी
(१२)    कोरियन
(१३)    बास्क
(१४)    फिनोतार्तरि उर्फ उरल अल्ताइक
(१५)    उत्तरध्रुव भाषासंघ
(१६)    कॉकेशस भाषासंघ
(१७)    सामासिक भाषासंघ: चिंनी, अनामी, सयामी, ब्रम्ही, तिबेटी.
हे निरनिराळे भाषासंघ मनुष्यप्राणी चोहोंकडे पसरल्यानंतरच विकसित झालेले असणार तथापि कालानुक्रमानें पहातां यांपैकी कांही संघ बरेच उत्तर कालीं पृथक् झाले असतील आणि कांही ब-याच जुन्या काळीं पृथक् झाले असतील.

काल व भाषासंघ यांस जोडणारें एक तत्व सर्वसमंत आहे तें हें की, जेव्हां दोन भाषा दिसतात आणि त्या एका विशिष्ट वंशांत त्यांच्या सादृश्यावरुन घालतां येतात तेव्हां एक काल्पनिक संघ आपण तयार करतों व तो समाविष्ट भाषांपेक्षां एका प्राचीन भाषेचा घोतक समजतों. असे अनेक संघ एकांत एक घालतां आले तर त्यांचे अस्तित्व कालाचे भाग पाडण्यास योग्य मर्यादा आहेत.

या त-हेच्या विधानास एका दृष्टीनें थोडेसें मर्यादित केंलें पाहिजे .

भाषा प्रथमत: मोठा प्रदेश व्यापीत नाहीं. ती थोडका प्रदेश व्यापिते. एखादी भाषा त्या भाषेच्या आसपास जो प्रदेश असेल त्या प्रदेशांतील भाषा सदृश असल्यास आपलें वर्चस्व स्थापन करते. कालांतरानें त्या सर्व प्रदेशांतील भाषा एकवटते.

या कियेमुळें आपणांस भाषाविस्ताराचें खरें साहित्य उपलब्ध होत नाहीं. आपणांस एखादी भाषा शिष्टत्व पावून इतरांवर ताबा गाजवीत आहे अशा स्थितीत सांपडते आणि तिच्या आसमंतांतील भाषा पोटभाषांच्या स्वरुपांत दृष्टीस पडतात. ही क्रिया लक्षांत घेऊन भाषांकडून प्रदेशव्याप्ति कितपत झाली याविषयींची आपली कल्पना नियमित केली पाहिजे.

शरीरलक्षणांशिवाय व भाषांशिवाय तिसरें इतिहाससाहित्य म्हटलें म्हणजे संस्कृति होय. संस्कृति म्हणजे जातिराष्ट्रादि संघाच्या सामुच्चयिक जीवितक्रमाचें साकल्य. संस्कृतीचा दर्जा आर्थिक, वैज्ञानिक आणि वाड्·मयविषयक विकासानें मोजला जातो. भूपृष्ठाच्या प्रत्येक भागामध्यें जेथे जेथें मनुष्याच्या अत्यन्त प्राचीन वस्तीचा पत्ता लागला आहे तेथें मनुष्य दगडाचीं हत्यारें वापरतांना दिसत आहे. म्हणजे मनुष्याचा प्रसार चोहोंकडे झाला तो मनुष्य प्राणी अश्मायुध संस्कृतींत किंवा तिच्या पूर्वीच्या संस्कृतींत असतां झाला हें उघड आहे. याच्यापुढील जो सांस्कृतिक इतिहास आहे तो प्रत्येक स्थानाचा स्वतंत्र आहे. म्हणजे ज्या काळीं मनुष्य चोहोंकडे पसरला त्या काळाच्या पुढें जें आपणांस सातत्य पहावयाचें तें भाषाविकासाचें, संस्कृतिविकासाचें आणि कदाचित् शरीरलक्षणविकासाचें होय. आपणांस जो संबंध जोडावयाचा तो शरीरलक्षणविकास व इतर संस्कृति या दोहोंचा. अश्मायुधकालोत्तर संस्कृतीचा इतिहास लिहितांना म्हणजे महावंशांच्या उपवंशांचा इतिहास लिहितांना जे भाग पडतील त्या वेळेस प्रत्येक काळची संस्कृति नोंदली पाहिजे.  ती नोदतांना प्रत्येक राष्ट्र कितपत प्रगत झालें होतें याचा हिशोब घेण्यासाठीं त्या त्या ठिकाणची भौतिक स्थिति पहावी लागेल आणि संस्कृतीच्या वैशिष्टयाचें स्पष्टीकरण करावें लागेल. जेव्हां आपण विशिष्ट समुच्चयाकडे लक्ष देऊं तेव्हां त्या समुच्चयाच्या संस्कृतिवैशिष्ट्याविषयीं व विशिष्ट संस्कृतींतील विकासाच्या अनुक्रमाविषयीं लिहितां येईल. सामान्य क्रिया जी चोहोंकडे दिसते ती ही कीं, प्रथम ओबडधोबड दगडी हत्यारांचा काळ येतो. मग अधिक घडणीच्या हत्यारांचा काल येतो व शेवटीं धातूंच्या उपयोगाचा काल येतो. धातुपूर्व संस्कृति म्हणजे प्रागैतिहासिक संस्कृति नव्हे. इजिप्तच्या ऐतिहासिक संस्कृतींत देखील धातु अगदीं पहिल्या प्रथम येंत नाहींत. अश्मायुध स्थितींत असतां देखील राजांची कारकीर्द व तींत घडलेल्या गोष्टी यांची आठवण ठेवण्याचा प्रयत्न करण्याइतकी भावना तत्कालीन मनुष्यामध्यें वाढली होती. इजिप्तची संस्कृति आणि असुरांची संस्कृति या दोन प्राचीन संस्कृती होत. यांचा प्रारंभ कांही अंशी अश्मायुध स्थितींत व कांही अंशी तदुत्तर संस्कृतीच्या कालांत असा दिसतो.

मानवशास्त्रज्ञांनीं इतिहासपूर्वकालाचे संस्कृतिदृष्ट्या विभाग पाडले आहेत ते येणेंप्रमाणे:-

अ श्मा यु ध यु ग प्र थ म का ल.- ओबडधोबड दगडी हत्यारें किंवा आउत मनुष्य प्राणी वापरीत होता तो काल.

अ श्मा यु ध यु ग द्वि ती य का ल.- या कालांत दगडाचींच पण जरा नीटनेटकीं व कांही सूक्ष्म हत्यारें मनुष्य वापरीत होता.

आ य स यु ग.- लोखंडी हत्यारांचा काल. पुष्कळ राष्ट्रांमध्यें अश्मायुध युगाच्या द्वितीय कालानंतर आणि आयस युगाच्या आरंभापूर्वी कांस्यकाल किंवा ताम्रकाल येतो.

सर्वच संस्कृतींचा विकास एकसारखा होत नाही. शिवाय सर्व संस्कृतीत ही युगें एककालीन नाहीत. म्हणजे एका राष्ट्रांत ज्या काली अश्मायुधयुग असेल तेव्हां दुस-या राष्ट्रांत आयसयुग असेल.

संस्कृतीच्या इतिहासकालाचे हे विभाग पुष्कळसे सोयीसाठी पाडलेले आहेत. जगद्विकासाच्या आणि मनुष्यप्रसाराच्या कोणत्याहि क्रिया किंवा पाय-या यांचे निदर्शक हे भाग मुळींच नाहींत. शास्त्रज्ञ स्थानिक साहित्य घेऊन कसाबसा अभ्यासास सुरुवात करतो, त्या ज्ञानस्थितीतील हे विभाग आहेत. या अभ्यासानें बराचसा मनुष्येतिहास अवगत झाल्यानंतर पाडलेले हे कालविभाग नाहीत.

असुरांची संस्कृति व इजिप्तची संस्कृति या दोन संस्कृती हिंदुस्थानी संस्कृतीच्या अगोदरच्या आहेत की नंतरच्या आहेत हें निश्चयानें सांगतां येत नाहीं. आपण भारतीय संस्कृती कडेसच प्रथम वळूं . आणि भारतीय संस्कृतीचा आणि इजिप्त इत्यादि जुन्या संस्कृतीचा आपल्या संस्कृतीशीं संबंध कसा काय येतो तें नंतर पाहूं.