प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.               

इतरकमें

कर्मनामें (ॠग्वेद) / इंद्रियकमें क्रियापदें (ऋग्वेद )/धंदेवाले (ऋग्वेद ) धंद्यांची साधनें (ऋग्वेद ) धंदेसूचक क्रियापदे (ऋग्वेद ) / धारणपोषणकरणें क्रियापदे (ऋग्वेद ) पाहणें क्रिया (ऋग्वेद ) / प्राप्तिवाचक क्रि (ऋग्वेद )
/ रक्षण पालन (ऋग्वेद ) / सेवा करणें (ऋग्वेद ) विनाशवाचक (ऋग्वेद )
/ हिंसाविशेषणें (अथर्ववेद ) / विनाशदर्शक क्रिया (ऋग्वेद )

उपलप्रक्षिणी- ह्या शब्दाचा फक्त ॠग्वेदांत एकदांच उल्लेख आहे. तेथें त्याचा अर्थ स्त्रीचा धंदा असून तिच्या मुलाचा धंदा कवीचा (कारू) होता, आणि मुलाच्या बापाचा म्हणजे त्या स्त्रीच्या नव-याचा धंदा वैद्याचा होता. यास्क याचा ‘सक्तुकारिका’ असा अर्थ करितो, आणि रॉथ ग्रासमन. झिमर व दुसरे ग्रंथकार, धान्य दळण्याच्या अर्थाकडे ह्या शब्दाचा उपयोग करितात. तथापि पिशेल म्हणतो कीं, ज्या अर्थी धान्य जात्यामध्यें दळलें जात नसून तें वरवंटयानें दगडावर वाटलें जात असें त्या अर्थी ह्या शब्दाचा अर्थ सोम कांडण्याकरितां जी स्त्री मदत करीत असे ती, असा असावा. व्हान श्रोडर म्हणतो कीं, उपल ह्या शब्दाचा अर्थ ज्यांत मुसळानें किंवा बत्त्यानें धान्य कांडलें जात असे असें उखळ किंवा खल असा करण्यास कोणताहि प्रत्यवाय नाहीं. शब्दशः अर्थ जो धान्यानें उखल भरतो तो-किंवा-ती असा आहे.
कर्मार- घडकाम्या. हा शब्द वैदिक संहिता मध्यें पुष्कळ वेळां आलेला आहे. अथर्ववेदांत घडक़ामे यांना कोळी (धीवानः) आणि रथकार ह्यांच्या जोडीला बसवून त्या सर्वांना मनीषिणः अशी संज्ञा दिली आहे. पहिल्यानें जी संघव्यवस्था अस्तित्वांत होती त्यापैकी ही एक ब्राह्मण घडकाम्यांची जातच होती. घडकाम्यांची काम करण्याची रीत आणि त्यांची हत्यारें या विषयीं फारशी माहिती उपलब्ध नाहीं. तो भट्टीत धातूचा रसकरीत असे (घ्मा) हें निर्विवाद आहे आणि म्हणूनच त्याला ‘रसकरणारा’ (ध्मात) असें म्हणत. त्याच्या पक्ष्यांच्या पंखाच्या केलेल्या भात्याचाहि (ॠ९.१२,२) उल्लेख आहे. तो अग्नीवर ठेवण्याकरितां धातूचीं पात्रें (५.३,१५) करीत असे. सोमपात्र देखील कधींकधीं धातू ठोकून (अयोहत्) तयार करीत असत (ॠ९.१.२)
तक्षनू- ह्या शब्दाचा अर्थ सुतार असा असून तो ॠग्वेदांत व तदनंतर पुढील ग्रंथात आलेला आहे. त्याला लाकडाची सर्व कामें उदाहरणार्थ रथ व अनस् (गाडी) करण्यास लोक सांगत असत. चांगलें नक्षीदार काम सुद्धां त्याला करिता येत असे. त्या कामीं हत्यारांचा उपयोग होई. त्यापैकी कुलिश, परशु, कु-हाड व भुरिज (ह्याचा अर्थ अनिश्चित आहे) ह्याचा उल्लेख आलेला आहे. ॠग्वेदामध्यें एके ठिकाणीं सुतार आपलें लाकडी काम करिताना लांकडास जो वाक देतो व तेव्हा त्याला जे श्रम पडतात त्याचा उल्लेख आलेला आहे. सुतार लोक हीन जातीचे होते किंवा त्यांचा एक निराळाच वर्ग होता असें वेदिक काळीं दिसून येत नाहीं.
त्सारिन् -ॠग्वेदामध्यें एका लेखांत ह्याचा अर्थ तक्व नांवाच्या एका अप्रसिद्ध जनावराची शिकार करण्यांत गुंतलेला रधी असा लुडविग व मॅक्समुल्लर ह्यांच्या मतें आहे. पण हें स्पष्टीकरण केवळ काल्पनिक आहे.
५द्रुहन् – ‘लांकूड कापणारा’ असा अर्थ ॠग्वेदांत आलेल्या द्रुहन्तर ह्या शब्दाचा होतोसें वाटतें. पण नेहमीचा अर्थ म्हणजे राक्षसाला जिंकणारा असा आहे. पण परशूवें जर हें विशेषण मानलें तर मोठी कु-हाड हाच अर्थ संभवनीय दिसतो.
घ्मातृ- ॠग्वेदामध्ये एके ठिकाणीं दोनदा हा शब्द आलेला आहे, व तो घ्माता (रस गाळणारा) व घ्मातरी (पदपाठाप्रमाणें घ्मातरि ह्याबद्दल हा शभ्द आलेला आहे व हा सप्तम्यंत प्रयोग आल्यामुळें ह्याचा अर्थ रस करण्याची भट्टी असा असावा) अशा दोन्ही रूपांत आलेला आहे. गेल्डनेर, बार्थोलोमे व ओल्डेनबर्ग ह्यांच्या मतें हा घ्मातरी शब्द सप्तमी विभक्तींक आलेला आहे व त्याचा अर्थ रस ओतण्याच्या कामांत असा आहे. लुडविग् व नीस्सर ह्यांचे मतें घ्मातरी हें पुल्लिंगी एकवचनीं प्रथमेचे रूप असून घ्माता हा अर्थानें हा शब्द वापरलेला आहे. धातू ओतणें ह्याचा ॠग्वेदांत स्पष्ट उल्लेख आहे व धातु ओतणारा पक्ष्यांचे पंख (पर्णेव शकुनानाम्) उपयोगांत आणून त्यांच्या योगानें ज्वाला पेटवितो असें त्याचें वर्णन आलेलें आहे. ह्या कलेचा विस्तृत प्रमाणांत उपयोग होत होता हें, ज्या अर्थी लोखंडाच्या (अयस) टोंकाचे बाण असत किंवा लोंखडाच्याच उदस्थाल्या केलेल्या असत व त्या चुलीवर ठेवीत असत किंवा घण मारलेल्या लोखंडाचींच (अयस्) सोमरसपानाचीं भांडीं असत असे उल्लेख आलेले आहेत. त्यावरून सिद्ध होतें.
नृतू- ॠग्वेदामध्यें हा शब्द एकदां आलेला असून त्याचा अर्थ नर्तकी असा आहे. दुसरे एके ठिकाणीं नृति हा शब्द हास (हांसणे) ह्या बरोबर अंत्यविधीच्या वर्णनाचे वेळीं आलेला आहे. तथापि आयरिश लोकांतील अंत्यविधीप्रमाणें किंवा स्कॉच लोकांमधील प्रेत पुरल्यानंतर जुन्या चालीप्रमाणें होणा-या मेजवानी सारखा जरी अंत्यविधीच्या वेळचाच हा एक प्रसंग होता तरी ह्या वेळी खरोखरच नृत्य होत होते किंवा काय हें समजत नाहीं. तथापि नृत्याचा उल्लेख ॠग्वेदामध्यें व ॠग्वेदोत्तर ग्रंथांत वारंवार आलेला आहे. नृत्यगीताचा उल्लेख जैमिनीय ब्राह्मणंत (१.४२) आलेला आहे असें मॅकडोनेल म्हणतो.
पथिकृत्.- मार्ग तयार करणारा. हें ॠग्वेदामध्यें व नंतरच्या ग्रंथांत वारंवार येणारें नांव आहे. ह्यावरून प्राचीन काळी रस्ते शोधून काढणे किती महत्त्वाचें होतें हे स्पष्ट दिसतें. हें नांव वारंवार अग्नीला लाविलेले आहे. त्यावरून पूर्वीच्या काळीं अरण्याचा नाश करून पुढें जाण्याचा मार्ग खुला करणा-या अग्नीचा संबंध व्यक्त होतो. पुषन् देव सुद्धां पथिकृत् आहे कारण तो कळप किंवा समुदायाचें रक्षण करतो. पथिकृत्(ॠषी) ह्यांची तुलना रोमन लोकांतल्या पांटिफिसेस् ह्यांच्याशीं करतां येईल.
पशुप- ॠग्वेदामध्यें ह्याचा अर्थ गुराखी असा असून लाक्षणिक अर्थाने हा शब्द पूषन्ला लाविलेला आहे.
१०पाशिन्- वागुरा असेलला. ॠग्वेद व अथर्ववेद ह्यामध्यें ह्याचा अर्थ पारधी असा आहे.
११बेकनाट- हा शब्द एक वेळ ॠग्वेदांत आला आहे. तेथें बेकनाटांचा व पर्णांचा इद्रानें पराभव केला असा उल्लेख आला आहे. याचा वास्तविक अर्थ यास्कांनीं दिल्याप्रमाणें व्याजबट्टा करणारा असा असावा. हा शब्द परकीय असावा. परंतु तो कुठला हे ठरविणे फार कठीण आहे. बाबिलोनियनाइतका तो प्राचीन असणें शक्य आहे. हिलेब्रँटच्या मताप्रमाणें ब्रुनहोफरचे बेकनाट म्हणजे बिकानेर हे म्हणणें बरोबर आहे. ॠणकोला एक नाणे देऊन मला परत दोन नाणीं दें असें म्हणणारे ते बेकनाट होत. बे हा शब्द मूळांत वे असून तो द्वेचा अपभ्रंश असावा, अशी सायण यांनीं बेकनाटची व्युत्पत्ति दिली आहे.
१२भिषज् - वैद्य. ॠग्वेद व तदनंतरचे ग्रंथ यांत हा शब्द पुष्कळ वेळां येतो. पूर्वीच्या ग्रंथांतून हा धंदा कमी दर्जाचा मानलेला कोठेहि आढळत नाहीं. अश्वीन, वरूण आणि रूद हे सारे वैद्य म्हणून प्रसिद्ध आहेत. परंतु धर्मशास्त्रांत हा धंदा अगदीं तुच्छ लेखिला आहे. यजुर्वेद संहितेसारख्या प्राचीन ग्रंथांतून देखील ही तुच्छता दृष्टीस पडते. तेथें अश्विनांनां लोकांत जास्त मिसळण्याबद्दल त्यांच्या धंद्याच्या दृष्टीने कमी प्रतीचे मानले आहे. ह्यावरून जातीची भेसळ होऊं नये म्हणून वर्णभिन्नता उघड दिसतें. वेदकालीहि वैद्यांनां कमी मानीत. परंतु जेव्हां यज्ञपुरुषाचे मस्तक तुटलें त्यावेळी तें अश्विनीकुमरांनीं सांधलें त्यावेळीं अश्विनीकुमारांनीं आपणास बरोबरचे मानलें पाहिजे अशी अट घातली व त्यावेळीं देवांनीं ती मान्य केली आणि अश्विनी- कुमारांस यज्ञांत हविर्भाग मिळूं लागला अशीं वेदांतील कथा वैद्यकांत वर्णिली आहे. ॠग्वेदांत एका ॠचेंत वैद्य आपल्या वनस्पती व त्यांचें बरें करण्याचें सामर्थ्य यांची फार स्तुति करीत आहे. शिवाय अश्विनांनीं आश्चर्यकारक व चमत्कारयुक्त इलाज केल्याचें वर्णन आलेले आहे. उदाहरणार्थ लोकांची दृष्टि आणणें किंवा लंगडणा-याला नीट करणें. तसेंच, पुरंधीचा नवरा व च्यवन यांनां पुन्हा तारुण्य आणणे व विश्पलेला लोखंडी पाय लावणें इ. पिशेलच्या मतानें जर विश्पला ही घोडी असेल तर खरोखर ही फार आश्चर्यकारक गोष्ट होय. वेदकालीन आर्याची शस्त्रविद्येंत प्रवीणता होती असें समजलें असतां ही मोठी चूक होईल असें यूरोपीय पंडित म्हणतात. कारण ते असें म्हणतात कीं साध्या जखमेवर औषधें बांधण्याची कला त्यांनां अवगत होती, परंतु त्यांचा शस्त्रकलेचें ज्ञान मात्र अगदीं जेमतम प्राथमिकच होतें. अथर्ववेदांत वैद्यकीसंबंधी जो मजकूर येतो त्यावरून वेदकालीन लोक औषधाबरोबर मंत्रतंत्रांची योजना करीत असत व त्याचप्रमाणें जलोपचार (जलाष) हि करीत असत. परंतु त्यांत कांही अर्थ नव्हता. ही जलोपचाराच पद्धत मात्र त्यांनीं इंडोयूरोपीय कालांतील म्हणजे जेव्हां युरोपीय व हिंदुस्थानांत आलेले आर्यन् लोकांचे पूर्वज एके ठिकाणीं होते तेव्हांची चालू ठेवलेली आहे. परंतु शारीरिक शास्त्रा (शरीरच्छेदन शास्त्रा) बद्दल त्यांनीं जरी अल्प माहिती दिली आहे तरी ती फार महत्त्वाची आहे. ही माहिती यज्ञियपशु फाडूनच झालेली असावी. वैद्यक हा पूर्वी ॠग्वेदकालीहि धंदा होता से ॠग्वेदांवरून दिसून येतें. यजुर्वेद संहितेंत दिलेल्या पुरुषमेधप्रसंगीच्या बळींच्या यादींत एका वैद्याच्या नांवाचा उल्लेख येतो. यावरून पूर्वी हा धंदा होता ही गोष्ट सिद्ध होते. ब्लूमफील्डच्या मताप्रमाणें अथर्ववेदाच्या एका ॠचेंत (५.३०,५) घरगुती इलाजाविषयांची नापसंती व वैद्याच्या धंदेवाईक ज्ञानावर भरवसा ठेवण्याविषयीची पसंती दर्शविली आहे.
१३वप्तृ- ॠग्वेद व तदुत्तर ग्रंथांत हजामत करणारा किंवा नापीक असा ह्याचा अर्थ आहे.
१४शस्तृ- ॠग्वेदांत व अथर्ववेदांत जनावराचा वध करणारा म्हणजे कसाई असा ह्याचा अर्थ आहे.
१५श्वघ्निन् - ॠग्वेद व अथर्ववेद ह्यांमध्यें स्पष्टपणें ह्याचा अर्थ खेळण्यांत अट्टल किंवा अट्टल धंदेवाला जुगार असा आहे ह्याचा मूळचा अर्थ पारधी असा असावा.
१६स्तेन- ॠग्वेदापासून पुढील ग्रंथांत चोर ह्याला हा नेहमीचा शब्द आहे.
१७त्वष्टृ- हा शब्द अथर्ववेदामध्यें एकदां त्वष्टृ देवाच्या नांवावर मुद्दाम कोटी करून सुतार या अर्थी आलेला आहे तेथं, लांकडांस चांगला आकार आणण्याकरितां रूपे सुकृतम् कु-हाडीचा (स्वधिति) उपयोग करीत असल्याचा उल्लेख आला आहे.
१८घीवन- अथर्ववेदामध्यें हा शब्द आलेला आहे आणि रॉथ. ब्लूमफील्ड व व्हीटने ह्यांच्या मताप्रमाणें त्याचा अर्थ ‘हुषार’ अशा रथकाराला लाविलेलें विशेषण असा आहे. टीकाकारांच्या मताप्रमाणें धीवर म्हणजे मासे धरणारा कोळी असा याचा अर्थ आहे. पैप्पलाद शाखेच्या प्रतींत सुतार (तक्षाणः) असा याचा अर्थ आहे.
१९मलंग- अथर्ववेदाच्या एक उता-यांत याचा अर्थ कपडे स्वच्छ करणारा परीट असा आहे. परंतु या शब्दाची व्युप्तत्ति मात्र निश्चयात्मक ठाऊक नाहीं.
२० महानग्नी- अथर्ववेदांत यांचा अर्थ गणिका, वारांगना सा आहे. महानग्न हा शब्द महानग्नी या शब्दावरून निघाला असावा. याचा अर्थ कन्याविट असा आहे.
२१मृगयु- मृगयु म्हणजे पारधी. हा शब्द अथर्ववेदांत व ब्राह्मणांत क्वचिंत प्रसंगी आलेला आहे. वाजसनेयि संहितेत आणि तैत्तिरीय ब्राह्मणांत पुरुषमेधाच्या प्रसंगी बळी दिल्या जाणारांची यादी आली आहे. तीमध्यें मार्गार, कैवर्त अथवा केवर्त, पौंजिष्ठ, दाश, मैनाल, बैन्द व आन्द यांचा कोळी म्हणून उल्लेख आहे. अशा मासे पकडून किंवा शिकार करून उपजीविका करणा-या लोकांचाहि त्यांत समावेश होतो. सर्वात जुन्या वैदिक कालीं देखील कोणत्याहि जातींचा ‘शिकार’ हा उपजीविकेचा मुख्य धंदा असणें असंभाव्य आहे. पशुपालवृत्ति आणि कृषि हेच निःसंशय जीवनाचे मुख्य धंदे होते. परंतु करमणुकीखातर किंवा पोटासाठी आणि हिंस्त्र पशूंपासून जनावरांच्या कळपांचे संरक्षण करण्यासाठीं शिकार मुळींच करीत नव्हतें असें मानणें अयोग्य होईल. स्वाभाविकपणें मुख्यतःॠग्वेदावरून मृगयेसंबंधी माहिती मिळते. मृगयेत बाणांचा उपयोग कधी कधी होत असे. परंतु अतिप्राचीन काळच्या मनुष्याच्या परिपाठाची अशीं जाळी, चोरखळी हीं जी सावज धरण्याची साधनें यांचाच उपयोग सर्वसाधारणतः होत असें. पक्षी नेहमीं जाळयांत (पाश, निघा, जाल) पकडले जात आणि पक्षी धरणारास निधापति म्हणजे जाळयाचा मालक असें म्हणत असत. जाळें खुंटीवर लटकवीत असत. जाळयाला दुसरें नांव मुक्षीजा असें आहे. काळवीट (ॠश्य) पकडण्याकरितां खड्डयांचा उपयोग केला जात असे, आणि म्हणूनच, त्या खड्डयांना ॠश्यद म्हणजे काळवीट धरणारे असें  म्हणत. ग्रीकांच्याप्रमाणें आर्य लोक कदाचित पाळीव हत्तींच्या माद्यांकडून हत्ती पकडीत असतील. कुत्र्यांच्या साहाय्यानें वराहांनांहि पकडीत असतील. परंतु ज्या उता-यांतून हें मत उद्भुत केलें आहे तो उतारा संशयित स्थळींच (रेडा (गौर) धरण्यासंबंधानें) आहे. परंतु त्यास बाणानें मारीत कीं, दोरानें, फासांत अगर जाळयांत पकडीत, हें तेथें स्पष्ट होत नाहीं. सिंहास मात्र खड्डयांत पकडीत नाहीतर पारध्यांकडून ठार मारीत. एका अस्पष्ट उता-यावरून सिंहांनां दबा धरून किंवा कदाचित गुप्त रीतीनें खड्डा करून पकडीत असतील असें दिसतें. मासे धरण्यासंबंधीच्या निरनिराळया तऱ्हांची माहिती फारच थोडी आहे. कारण यजुर्वेदांत उल्लेखिलेल्या निरनिराळ्या नांवाचा खुलासा हाच कायतो ह्याला पुरावा आहे. धैवर म्हणजे तळयाच्या दोन्ही बाजूंनी जाळें टाकून मासे धरणारा असा अर्थ सायणाचार्यांनी केला आहे.दास आणि शौष्कल हे गळानें (बडिश) मासे पकडीत. बैन्द, कैवर्त आणि मैनाल जाळें टाकून पकडीत आणि पर्णक पाण्यावर व मार्गार पाण्यामध्यें हात घालून पकडीत असेंहि सायण भाष्यांत म्हटलें आहे. पण ह्या सर्वांनाहि विशेष महत्त्व देतां येत नाहीं.
२२रथकार- याचा अर्थ रथ करणारा. अथर्ववेदांत हा असून औद्योगिक जातीतील राजाचा प्रजानन असा याचा अर्थ आहे. यजुर्वेद संहितेंत व ब्राह्मणांतहि ह्याचे उल्लेख आले आहेत. ह्या सर्व उता-यांत आणि बहुतेक अथर्ववेदाच्या उता-यांत सुद्धां रथकार ही एक जात आहे असे दिसतें. नंतरच्या वाङ्मयांत रथकार ही जात माहिष्य (क्षत्रिय बाप व वैश्य आई असलेला ) आणि करणी (वैश्य बाप व शूद्र आई असलेला) ह्यांपासून झालेली संतति असें म्हटलें आहे. परंतु ऐतिहासिक दृष्टीनें ह्यांची अशी उत्पत्ति मानणें बरोबर होणार नाहीं. यापेक्षां धंद्यावरून ही जात पडली असावी असें म्हणणें योग्य होईल. हिलेबँट म्हणतो कीं ज्या अर्थी अनु ही जात ॠभूची पूजा करीत असे त्या अर्थी हेच रथकारांचे पूर्वज असावे. पण ह्या तर्कास कांहीच पुरावा नाहीं.
२३शंबिन्-अथर्ववेदांतच फक्त एकदां हा शब्द आला असून त्याचा अर्थ नावाडी असा आहे. शब्दशः अर्थ कावडीवाला मनुष्य असा दिसतो. हा शब्द शंब ह्या शब्दापासून झालेला आहे. शंब शब्द ॠग्वेदांत आहे पण अर्थ संदिग्ध आहे. निरुक्तामध्यें याचा अर्थ बज असा केला आहे.
२४गोविकर्तन.- गोहन्तृ, खाटीक, वाजनेयि संहिता व शतपथांत हा शब्द आला असून याचा अर्थ व्याघ, पारघी, असा आहे.
२५शंखघ्म- याचा अर्थ शंख वाजविणारा. यजुर्वेद संहितेंत पुरुषमेधाच्या वेळीं बलि दिल्या जाणारांच्या यादींत हें नांव आलेलें आहे. बृहदारण्यकोपनिषदांतहि ह्याचा उल्लेख आलेला आहे.
२६शैलूष- नट किंवा नर्तक असा याचा अर्थ आहे. यजुर्वेदांत नरमेधांत बलि दिल्या जाणारांच्या यादींत हें नांव आलेलें आहे. सायणाचार्यांनीं ह्याचा अर्थ स्वतःच्या बायकोनें व्यभिचार कर्म करून  मिळविलेल्या पैशावर पोट भरणारा मनुष्य असा केला आहे.
२७शौष्कल- यजुर्वेदांत बलि दिल्या जाणा-यांच्या यादींत हें नांव आलेलें आहे. पीटर्सबर्ग कोशांत ह्याचा अर्थ सुकलेल्या माशावर अगर सुकलेल्या मांसावर पोट भरणारा असा आहे. पौर्वात्य टीकाकार ह्याचा अर्थ सुकलेले मांस विकणारा असा करितात. सायणभाष्यांत याचा अर्थ गळानें मासे पकडणारा मनुष्य, असा आहे.
२८कुसीदिन्- शतपथांत, निरुक्तांत आणि सूत्रांत व्याजबट्टा करणारा सांवकार या अर्थी हा शब्द आला आहे. तैत्तिरीय संहितेंत अनृण (कर्जमुक्त) शब्दाबरोबर कुसीद अप्रतीत (न फेडलेलें कर्ज) हे शब्द आले आहेत. येथें जॉली हा कुसीद शब्दाचा अर्थ कर्ज असा करितो, व तो बरोबर आहे. कारण सायणभाष्यांतहि हाच अर्थ आहे. पूर्वी व्याजाचा दर काय होता हें दिलेलें नाहीं.
२९चोर.- चोर हा शब्द मागाहून झालेल्या तैत्तिरीय आरण्यकाच्या शेवटल्या भागांत आढळतो. ह्या अर्थाचे वैदिक शब्द म्हणजें तस्कर, तायु, स्तेन व परिपंथिन् हे होते.
३०नापित- हा शब्द शतपथ ब्राह्मणांत व मागाहून झालेले ग्रंथ ह्यांमध्यें न्हावी या अर्थानें आलेला आहे. परंतु ह्या पेक्षांहि जुना शब्द वप्तृ (वप् म्हणजे श्मश्रु करणें ह्या धातूपासून) असा आहे. वप् धातूचीं रूपें ॠग्वेदापासून आलेलीं आहेत. मृतांनां पुरण्यापूर्वी  त्यांची स्मश्रु करीत असत असें मॅकडोनेल म्हणतो व त्याला अथर्व (५.१,९,४) ह्या ॠचेची पुष्टि देतो; पण तेथें ह्या म्हणण्याला अगदीं आधार नाहीं.
३१पारिकुट- हा दुर्बधि शब्द कदाचित्  अपभ्रष्ट असावा. हा शब्द ऐतरेय ब्राह्मणांत एका वाक्यांत आला असून त्याचा अर्थ परिचारक असा असावा.
३२प्रष्य- निरोप्या, हलक्या दर्जाचा नोकर किंवा दास या अर्थाने हा शब्द ऐतरेय ब्राह्मणांत शूद्राला लाविला आहे. अथर्ववेदांत प्रैष्य म्हणजे हलक्या दर्जाचा हें विशेषण आढळतें.
३३भिषज्आथर्वण- काठक संहितेंत निर्दिष्ट केलेल्या एका पुरातन वैद्याचें नांव असें मॅकडोनेल म्हणतो. पण भिषज् आथर्वण हें एका विशिष्ट व्यक्तीचेंहि नांव आहे. अथर्ववेदांत सांगितलेल्या पद्धतीनें चिकित्सा करणारा वैद्य असाच या शब्दाचा अर्थ होऊं शकेल. चरक ह्या वैद्यक ग्रंथांत अथर्ववेदाविषयीं आदर दर्शविला असून वैद्यानीं आपलें शास्त्र अथर्ववेदावरून रचिलें आहे असें त्यानीं सांगावें म्हणून या ग्रंथांत सुचविलें आहे. ह्यावरून असें दिसतें कीं, चरककालीं स्वतःस आथर्वण म्हणवून घेण्यांत वैद्यांनां मोठेपणा वाटत असावा. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांचें साधन ह्या धंद्यानें होतें म्हणून हा धंदा श्रेष्ठ मानला आहे. द्रव्य न घेतां औषधें दिली तर याची मोठी योग्यता आहे. मोक्षमार्गाला लागलेल्यांनां व धर्मप्रचारक लोकांनां औषधें देऊन निरोगी ठेवणें हे वैद्याचें मुख्य कर्तव्य मानलें आहे. धार्मिक लोकांचे आरोग्य राखण्याकरितांच इंद्रानें मनुष्यास वैद्यक शिकविलें. असेंहि वर्णन आलें आहे.
३४मृगव्याध- याचा अर्थ व्याध किंवा पारधी. ऐतरेय ब्राह्मणांत आलेल्या प्रजापतीच्या मुलीच्या दंतकथेंत व्याध या अर्थी हा शब्द आहे. कामवासनेने अंध झालेला प्रजापति आपल्या रोहीणी नांवाच्या कन्येचा पाठलाग करीत असतांनां धनुर्विद्येत निपुण असलेल्या व्याधानें त्याला मारलें. प्रजापति म्हणजेच मृग नक्षत्र, त्याची कन्या रोहीणी म्हणजे रोहीनी नक्षत्र, आणि हा पारधी म्हणजे व्याधाचा तारा, असें जें ह्या दंतकथेचें स्वरूप आकाशांतील दृश्याला लागू केलें आहे तें गौण आहे असें मॅकडोनेल म्हणतो. मात्र मृग आणि व्याध ही कल्पना ह्या कथेला जुळती आहे इतकेंच, असें त्याचें म्हणणें आहे.
३५वणिज- ब्राह्मण ग्रंथांत हा शब्द आला असून ह्याचा अर्थ व्यापा-याचा उद्योग म्हणजे व्यापार असा आहे.
३६वयित्री- पंचविंश ब्राह्मणांत ह्याचा अर्थ कोष्टीण असा आहे.
३७वायोविद्यिक- याचा अर्थ पक्षी धरणारा पांखरेपारधी किंवा फासेपारधी. हा शब्द शतपथांत आला आहे.
३८वीणा- गाथिन्- ब्राह्मणग्रंथांत याचा अर्थ वीणावादक असा आहे. शतपथांत आलेल्या वीणागणगिन ह्या शब्दाचा अर्थ ‘टोळीचा नायक’ असा मॅकडोनेल करितो. परंतु शांखायन श्रौतसूत्रांत “वीणागणैर्गायन्ति ते वीणागणगिनः”। अशी व्याख्या केली आहे.
३९शिल्प.- ह्याचा अर्थ कला असा आहे व ही कला तीन प्रकारची आहे; नृत्य म्हणजे नाचणें, गीत म्हणजे गाणें व वादिन म्हणजे वाजविणें. हे तीन प्रकार कौषीतकी ब्राह्मणांत दिले आहेत.
४०श्रपयितृ- ह्याचा अर्थ आचारी. हा शब्द शतपथांत आलेला आहे.
४१सभाविन्- तैत्तिरीय ब्राह्मणांत हा शब्द स्पष्ट आला असून ह्याचा अर्थ द्यूतगृष्टा रक्षक असा सायण भाष्यांत आला आहे.
४२सेलग- ब्राह्मण ग्रंथांत ह्याचा लुटारू असा अर्थ दिला आहे.
४३अक्षु- हा शब्द ॠग्वेदांतील एका आणि अथर्ववेदांतील दोन वचनांत आढळतो. रॉथ याचें भाषांतर “जाळे” असें करितो परंतु बोथलिंक गाडीचा आंस असा अर्थ सुचवितो. गेल्डनेर त्याचा अर्थ कोळयाच्या जाळयाची काठी (जाल), गाडीचा दांडा आणि घराचा खांब असा करितो. मग तो खांब आडवा किंवा उभा हें कांहीच तो खात्रीलायक लिहीत नाही. ब्लूमफील्ड म्हणतो कीं, त्याचा अर्थ आढयावरून पसरलेल्या आणि दोन्ही बाजूला सोडलेल्या टहाळयांच्या कामाचें आच्छादन- गवतानें आच्छादिलेल्या छपराप्रमाणें असा करितो आणि हेंच भाषंतर सहस्त्राक्ष हा जो शब्द आहे तो सार्थ आहे असें दर्शवितें. अथर्ववेदांतील दुस-या वचनांत तो त्याचा अर्थ जाळें असा करितो आणि सायणाच्या मताप्रमाणें ॠग्वेदांतील शब्द विशेषणाप्रमाणें आहे किंवा काय अशी शंका येते.
४४ऊर्णा- लोकर ॠग्वेदानंतर ह्याचा बराच उल्लेख आलेला आहे. गंधार देश मेंढयाकरितां प्रसिद्ध होता तसा पुरुष्णी (नदीकांठचा) देशहि लोंकरीकरिता प्रसिद्ध होता. मेंढयांच्या अंगावरील लोकरीच्या गुच्छांना पर्वन् अथवा परूस्  हा शब्द योजीत असत. ‘लोंकरीसारखा मऊ’ (उर्णम्रदस्) हें विशेषण सर्वसाधारण आहे. मेंढीला ऊर्णावती असें म्हणत. संहिता, ॠग्वेदोत्तर ग्रंथ आणि ब्राह्मण ग्रंथ यांमध्यें वारंवार ऊर्णसूत्राचा उल्लेख केलेला आहे. ऊर्णा हा शब्द मेंढयाच्या लोंकरीलाच लावीत असत असें नाही तर बक-याच्या केंसालाहि योजित असत.
४५ओतु- वैदिक वाङ्मयांत हा शब्द विणकामांतील ‘आडवा बाणा’, आणि तंतु हा शब्द ‘उभाताणा’ असा अर्थ दर्शवितो. मूळ धातु वा ‘विणणें’, आणि तन् ‘ताणणें’, ओढणें, ह्यांच्यापासून हे दोन शब्द निघाले असून समान अर्थात त्यांचा उपयोग करितात. विणण्याच्या कामीं धोटया (तसर) चा उपयोग करीत असत. विणणा-याला ‘वाय’ आणि मागाला ‘येमन्’ असें म्हणत. ताणा ताणण्याकरितां लांकडी खुंटी (मयूख) आणि वजन म्हणून शिसें उपयोगात आणीत असत. विणण्याचे काम बहुतेककरून स्त्रियांच्या माथीं मारलेले असे. अथर्ववेदांतील रूपकालंकार, दिवस आणि रात्री ह्या दोन बहिणी वर्षाचा ताणा विणीत असून, रात्र ही उभाताणा आणि दिवस हा आडवाताणा, अशा अर्थी आहे.
४६कूट- ॠग्वेद, अथर्ववेद, आणि ब्राह्मण यांत हा अनिश्चित अर्थाचा शब्द सांपडतो. सर्व बाजूंनी विचार केला असतां प्रत्येक ठिकाणीं लागू पडणारा याचा अर्थ घण असा आहे. याचा सेंट पीटर्सबर्ग कोशांत शिंग असा अर्थ असून अथर्ववेदांत ज्या ठिकाणी हा शब्द आला आहे तेथे हाच अर्थ व्हिटने ह्यानें घेतला आहे. गेल्डनेर सांपळा किंवा पिंजरा असा याचा अर्थ करितो.
४७क्रय- ‘विक्री विकणें’. हा शब्द जरी ॠग्वेदांत नसला तरी ज्याच्यापासून हें नाम झालें ते क्रियापद ‘क्री’ हें मात्र तेथें आहे. मागाहूनच्या संहितांत नाम आणि क्रियापद हीं सामान्येंकरून आहेत. ॠग्वेदांतील क्रय शब्द म्हणजे शुद्ध अदलाबदल. भारलेली वस्तु अशा अर्थी उपयोगांत आणण्याकरिता इंद्राच्या मूर्तीची किंमत बहुत करून दहा गाई, परंतु इंद्राला विकत घेण्याची किंमत म्हणजे अगणीत गाई. अथर्ववेदाप्रमाणें साधारण अदलाबदलीच्या वस्तु म्हणजे वस्त्रें (दूर्श), पांघरण्याचे कपडे (पवस्त), आणि बक-यांची कातडीं (अजिन) ॠग्वेदकालीं खरेदीसंबंधी जिकीर, घिसघिस होतीच आणि व्यापारांत यश मिळावें म्हणून अथर्ववेदांत एक सूक्त लिहिलें आहे. किंमतीला वस्त्र आणि व्यापाराला वणिज् असें म्हणत आणि व्यापारी अतिलोभी (कृपण)असत हें प्रसिद्धच आहे. भाष्याकारांनी प्रमाणदर्शक नाणें असल्याबद्दल कांहीं पुरावा दिलेला नाहीं. आणि प्रमाणदर्शक नाण्याचा ज्याअर्थी स्पष्ट उल्लेख नाहीं त्याअर्थी गाय हेंच प्रमाण असावें असें वाटतें. हिरण्यम्  शत-मानम् हा जो शब्दसमुच्चय  ब-याच ठिकाणीं शतपथ ब्राह्मणांत आणि दुसरीकडे सांपडतो त्यावरून असें वाटतें की गाईशिवाय दुसरें प्रमाणदर्शक नाणें असावें, तरी वरील शब्दांचा अर्थ शंभर गाईच्या किंमतीचे सोनें असा करितां येईल. परंतु कृष्णल याचा वजनी मापासारखा उपयोग असें सुचवितो कीं त्याचा अर्थ शंभर (कृष्णल) भारसोनें; आणि हेंच स्पष्टीकरण शक्य आहे असें वाटतें. हें माप ॠग्वेदकालांत माहीत नव्हतें, आणि त्यावेळीं मना (ॠग्वेद ८.७८,२) ह्या एकदांच आलेल्या शब्दांचा अर्थ जरा गूढ होता, आणि सध्यां हिंदुस्थानांत ज्याप्रमाणें जडजवाहीर हें सुटसुटीत आणि लवकर नेतां येण्याजोगी संपत्ति आहे त्याप्रमाणे ॠग्वेद कालांत निष्काचा उपयोग होत असे आणि अदलाबदलीचे एक साधन असें.
४८तंत्र- तंतु ह्या शब्दाप्रमाणेंच तंत्र ह्याचा अर्थ विणलेल्या कापडाची उभी वीण किंवा अधिक प्रचाराचा
अर्थ म्हणजे जाळें हा होतो. हा शब्द ॠग्वेद व तदुत्तर ग्रंथ ह्यांत आलेला आहे.
४९तसर- हा शब्द ॠग्वेद व यजुर्वेद संहिता ह्यांमध्यें कोष्ठयाचा धोटा ह्या अर्थानें आलेला आहे.
५०मुक्षिजा- जनावरांना पकडण्याकरिता जाळें ह्या अर्थानें ॠग्वेदांतल्या एका उता-यांत हा शब्द सांपडतो.
५१वेशी- ॠग्वेदामधल्या एका लेखात सुई असा ह्याचा अर्थ आहे.
५२सूची- ॠग्वेद व तदुत्तर ग्रंथ ह्यामध्यें ह्याचा अर्थ सुई असा आहे.
५३तन्तु- याचा खरा अर्थ धागा असा आहे. विशेषतः विणलेल्या कापडाची उभी वीण (ओतु म्हणजे आडवी वीण याच्या उलट) असा याचा अर्थ आहे. हे शब्द वरील अर्थानें अथर्ववेदांत आले आहेत. शतपथ ब्राह्मणांत कापडाच्या  उभ्या धाग्यास अनुवाद; आडव्या धाग्यास प-यास आणि नुसत्या धाग्यास तन्तु हे शब्द दिले आहेत, (३.१,२,१८) तैत्तिरीय संहितेंत उभ्या ताण्याला प्राचीनतान आणि आडव्याला ओतु म्हटलें आहे. पर्यकाच्या नवारीचा कौषीतकी ब्राह्मणांत उल्लेख आहे. ॠग्वेदांत तन्तुया शब्दाचा अलंकारिकरित्या उपयोग केलेला आहे व ब्राह्मण ग्रंथातहि याच अर्थानें उपयोग केलेला आढळतो.
५४पण.- अथर्ववेदाच्या पैप्पलाद प्रतींत एका सूक्तांत पण, प्रपण, प्रतिपण हे शब्द आलेले आहेत. त्यांचा अर्थ सौदा व विक्रिचा प्रकार असा आहे.ज्या धातूपासून हे शब्द निघाले तो धातू पण हा आहे. व ते मागाहूनच्या संहिता व ब्राह्मणग्रंथ यांत आढळतो.
५५प्रकश- अथर्ववेदांत हा शब्द आला असून याचा अर्थ चाबकाची वादी अथवा चाबकाचा फटकारा असा आहे.
५६विक्रय- अथर्ववेद व निरुक्त यांत विक्री या अर्थानें हा शब्द आला आहे. निरुक्तात स्त्रियांची विक्री केली जाते पुरुषांची विक्री होत नाहीं असे म्हटलें आहे. (३.४)
५७तोत्र- हा शब्द पराणी या अर्थानें शतपथ ब्राह्मणांत (१२.४,१,१०) आला आहे.
५८निधा- जाळें या अर्थानें हा शब्द निरुक्त (४.२) व ऐतरेय ब्राह्मण (३.१९) यांत आला आहे.

वर दिलेल्या शब्दांच्या याद्यांवरून व त्यांतील महत्त्वाच्या शब्दांवरील टीपावरूंन वेदकालीन लोकांचें निरनिराळया विषयाचें ज्ञान किती प्रगत झालें होतें याची वाचकांस साकल्येंकरून कल्पना येईल. वेदकालीन सामाजिक परिस्थितीचें चित्र वरील शब्दांवरून आनुमानिक पद्धतीनें काढून केवळ फलरूपानें वाचकांपुढे आम्हांस मांडतां आलें असतें व तसें केलें असतां आमचे श्रम व पुस्तकाचीं पृष्ठें यांचीहि बरीच काटकसर करतां आली असती परंतु वेदविद्या या विभागांत दाखविल्याप्रमाणें वाचकाला एखाद्या विषयाची केवळ सिद्धान्त रूपानें माहिती देण्यापेक्षां त्याचा त्या विषयांत प्रवेश करून देऊन त्याच्याच विचारांस चालन देऊन अभ्याससामुग्री त्याच्या कक्षेंत आणून देणें व विवेचन सुलभ करून त्यापासून सिद्धान्त काढण्यास त्यासच अवसर देणें ही विषय विवेचनाची पद्धति आम्हांस जास्त उपकारक वाटते. म्हणूनच आम्हीं वेदकालीन शब्दसृष्टि या रूपांत हें तीनशें पानांचे प्रकरण वाचकापुढें विस्तृत मांडलें आहे. यामुळें वेदाभ्यास प्रवृत्ति महाराष्ट्रात अधिक वाढेल व महाराष्ट्रीय वेदाभ्यासकांस या शब्दसृष्टीरूपी वेदकालीन वाङ्मयाच्या पृथक्करणाचा पुष्कळच उपयोग होईल असा आम्हांस दृढ भरंवसा आहे.
शब्दसृष्टीच्या वर्गीकरणपद्धतीचें स्पष्टीकरण आरंभी दिलेंच आहे. आपणांस अनेकार्थी शब्द ॠग्वेदांतच विशेष आढळतात. तर दुर्बोध शब्द अथर्ववेदाच्या वाटयास आले आहेत. यावरून अथर्ववेदीय संस्कृतीचें ॠग्वेदीय  संस्कृतीपेक्षां व अथर्ववेदाच्या भाषेचे ॠग्वेदीय व पाणिनीय भाषेपेक्षां भिन्नत्व स्पष्ट होते. देवसृष्टीमध्यें आपणांस देवतांचें आधिक्य ॠग्वेदापेक्षां तैत्तिरीय संहितेत आढळतें यावरून यजुर्वेदाचे कर्म अथवा उपासनाप्राधान्य दिसतें तर ॠग्वेदांत एक एकाच देवतेस जीं अनेक विशेषणें लाविलेलीं आढळतात त्यांवरून त्या वेदाचें स्तुतिप्राधान्य स्पष्ट होतें. जेव्हां देवतेची आपण केवळ शब्दांनीच उपासना करतों तेव्हा अर्थातच आपण आपल्या शब्दरूपी सामुग्रीचाच पुष्कळ उपयोग करून अलंकारिक वगैरे भाषा वापरून आपली उपासना अधिक रमणीय करण्याचा प्रयत्न करतों पण तीच आपली उपासना जेव्हां प्रत्यक्ष हवि वगैरे द्रव्यें अर्पण करून करावयाची असते तेव्हां वैचित्र्य भाषेपेक्षां कृतींतच जास्त आढळतें व त्यामुळें अनेक प्रकारें स्तुती करण्यापेक्षा अनेक प्रकारचे हवी व अनेक कामनांकरितां अनेक प्रकारची भिन्न भिन्न दैवतें या गोष्टी साहजिकच पुढें येतात. ही गोष्ट आपणांस, अगडबंब यज्ञविधी व त्यांतील अनेक संभार व अनेक प्रकारचे पशू व निरनिराळया काम्येष्टींच्या अनेक देवता यजुर्वेदात प्रतीत होतात यावरून स्पष्ट दिसतें. दवयोनींमध्यें आपणास उत्तरकालीन भारतीयास परिचित असलेले व विशेषतः जैन वाङमयांत आढळणारे विद्याधर आढळत नाहींत. भरतशब्दाप्रमाणें ज्या शब्दानें एका वर्षनामक भूखंडास नांव दिले आहे तो किंपुरुष शब्द वाजसनेयि संहितेपूर्वी आढळत नाहीं. असुरवाचक शब्द ॠग्वेदांत अधिक आढळतात व पिशाचवाचक शब्द बहुतेक सर्व अथर्ववेदांत आढळतात ही गोष्टहि लक्षात ठेवण्यासारखी आहे.

अजीवसृष्टिविषयक शब्दांवरून आपणांस असें दिसून येतें कीं भौतिक चमत्काराचें स्थूल ज्ञान तत्कालीन लोकांस होतें. पण त्यांचेबद्दल उपपत्ति लावण्याचा प्रयत्न करण्याऐवजी हें सर्व दैवी चमत्कार कल्पून त्यांचेबद्दल आदरयुक्त भीति वाटून त्यांची उपासना करून त्यांपासून आपणांस त्रास न होतां पर्जन्यादिकांचा आपणांस उपयोग व्हावा अशीच तजवीज त्यांनीं करण्याचा प्रयत्न केलेला आढळतो. धातूंपैकी सोनें, रूपें, लोखंड, तांबे, कांस्य इत्यादि धातु व त्यांचे उपयोग त्यांस ज्ञात होते हें स्पष्ट होतें. जमीनीचेंहि त्यांनीं स्थूल वर्गीकरण करून भिन्न प्रकारांस भिन्न शब्द योजले होते. जलाशयसंबंधी शब्दांत लहानमोठया सरोवरांस निरनिराळे शब्द व खोदलेले कालवे असल्याचें आढळतें. गतिवाचक क्रियापदावरून वैदिक भाषेतील शब्दबाहुल्य व गतीच्या निरनिराळया प्रकारांस निरनिराळीं नांवे आढळतात. ग्रहनक्षत्रादि शब्दांवरील टीपांत तत्कालीन ज्योतिःशास्त्रविषयक ज्ञानाचें विस्तृत विवेचन केलेंच आहे. संख्यावाचक शब्दांवरून दशमान पद्धतीचें ज्ञान व दशन् शब्दावरील टीपेवरून एकंदर संख्यावाचक ज्ञानाची कल्पना येईल. कालाचेहि तत्कालीन लोकांनी सूक्ष्म भेद पाडले असून चांद्र व सौर वर्षाचा मेळहि त्यानी घातला होता व यज्ञांगानें कालमापनपद्धतीहि विकास पावली होती ही गोष्ट स्पष्ट होते. तत्कालीन देश, नद्या व विशिष्ट स्थलवाचक नांवे यांवरून वैदिक संस्कृतीचा प्रसार कोठपर्यंत झाला होता याची कल्पना होते. यासंबंधी विवेचन त्या शब्दांवरील टीपांत व शेवटीं उपसंहारांत केलें आहे.

मानवेतर जीवसृष्टिविषयक शब्दांवरून वैदिक लोकांचे निरनिराळया प्राण्यांसंबंधी व वनस्पतीसंबंधींचे ज्ञान, त्यांची वर्गीकरणपद्धति वगैरे गोष्टी स्पष्ट होतात. या शब्दांवरहि विस्तृत टीपा दिल्या आहेत.

मानवसृष्टीमध्यें प्रथम आपणांस मनुष्यवाचक सामान्यनामें निरनिराळीं आढळतात. ज्या विशिष्ट पुरुषांची नावें तेथें दिली आहेत त्यांची माहितीहि पूर्वीच्या एका प्रकरणांत दाशराज्ञयुद्धांत व कांहीची तेथेच टीपारूपानें दिली आहे. शरीरावयववाचक शब्दांवरून वैदिक लोकांच्या शारीरशास्त्राच्या ज्ञानासंबंधी कल्पना येईल. त्या विषयीं त्यांस स्थूल गोष्टीचें ज्ञान असून बहुतेक अवयवांचें ज्ञान त्यांस होतें. शरीर या शब्दावरील टीपेंत ही माहिती दिलीच आहे. वैद्यक व औषधी या सदरांतील शब्दांवरून पाहतां सामान्य रोगांचे ज्ञान त्यांस होतें. पण औषधींबरोबर जादूटोणा, मंत्रतंत्र इत्यादिंचेहि प्राबल्य विशेष होत व कांहीं रोगांस देवतेचें स्वरूप प्राप्त झाल्याचें दिसतें. अन्न व खाद्यपेय यांतील शब्दांवरून त्यांचें पाकशास्त्रनैपुण्य वखाण्याचे निरनिराळे प्रकार यांची माहिती होते. धान्यनामांवरून तत्कालीन शेतकीची व नातेंगोतें या सदरांतील शब्दांवरून व टीपांवरून तत्कालीन सामाजिक स्थिति व कुटुंबव्यवस्थेची कल्पना येते. यासंबंधी विवाह या शब्दावरील विस्तृत टीपेंत बरेंच विवेचन केलें आहे. यज्ञसंबंधी शब्द ॠत्विज, यज्ञनामें, यज्ञपात्रें इत्यादि चारपाच सदरात दिले आहेत त्यावरून व त्यांतील महत्त्वाच्या शब्दांवरील टीपांवरून यज्ञासंबंधी सामान्यतः बरीच माहिती होईल. दुस-या विभागांत यजुर्वेदावरील विवेचनांत व इतरत्रहि यज्ञासंबंधी पुष्कळच माहिती दिली आहे. युद्धसंबंधी शब्दांवरून आर्याचें युद्धकलेचें ज्ञान व गृहसंबंधीं शब्दांवरून व त्यावरील टीपांवरून आर्याचां जीवितक्रम यासंबंधी बरेंच ज्ञान होईल. जाति, कुलें व वंश हें सदर बरेंच महत्त्वाचें आहे. कारण यावरून त्या वेळी कोणकोणतीं राष्ट्रें होतीं याचें ज्ञान होतें. महत्त्वाचीं राष्ट्रें व लोक यासंबंधी माहिती दाशराज्ञयुद्ध या प्रकरणांत येऊन गेलीच आहे. पण या शब्दांवरील टीपा त्या माहितीच्या पूरक आहेत. सामाजिक हें सदरहि बरेंच महत्त्वाचें आहे. या शब्दांवरील टीपांत गोष्टीचें स्पष्टीकरण होतें व वैदिक जीवितक्रमावर प्रकाश पडतो. भाषाविषयक शब्द अर्थातच वैदिक भाषेचें स्वरूप विशद करतात. वस्त्रें, भूषणें, व्यापार व कृषि, दळणवळण या सदरांतील शब्द सार्वजनिक जीवनक्रम स्पष्ट करतात. या शब्दांवरील टीपाहि ब-याच महत्त्वाच्या आहेत. विचार या शब्दांत तत्त्वज्ञानासबंधी माहिती आढळेल. ॠषि या सदरातील शब्द व टीपा पुढील ब्राह्मण्याच्या इतिहासाचें साहित्य पुरवितात. राजकीय हें सदर बरेंच महत्त्वाचें असून तत्कालीन राज्यव्यवस्थेचें ज्ञान करून घेण्यास अत्यंत उपयोगी आहे. तितक्याच, महत्त्वाचें इतरकर्में हें सदर आहे. या दोन्ही सदरातील शब्दांचा व टीपाचा वेदकालीन सार्वजनिक आयुष्यक्रमाचें ज्ञान करून घेण्यास फार उपयोग होईल.

येणेंप्रमाणें सर्व वैदिक शब्दमहोदधि मंथन करून त्याचें फल या प्रकरणांत वाचकापुढें ठेवलें आहे. तें अर्थात् अद्यापि साहित्यरूपीच असून सिद्धांतरूपी नाहीं हें प्रथम सांगितलेंच आहे. परंतु वैदाभ्यासी महाराष्ट्रीयांस ते अत्यंत उपयुक्त होईल यात शंका नाहीं. असो.

येथपर्यंत वेदकालीन संस्कृतीच्या अनेक अंगाचा उहापोह केला आहे. दैवतेतिहास, यज्ञसंस्थेतिहास, राजकीय इतिहास, सामाजिक जीवनक्रम वगैरे गोष्टीवर आतापर्यंत विवेचन केलें आहे. आतां या वैदिक वाङमयाचे उत्पादक व संरक्षक असे जे ब्राह्मण त्या वर्गाचा इतिहास व पुढें वैदिक व भरतखंडातील देश्य संस्कृती याचें एकीकरण यासंबंधी विवेचन करावयाचें राहिले आहे.तरी आतां ब्राह्मण्याच्या इतिहासाकडे प्रथम लक्ष देऊं.