प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
जाती कुलें व वंश
जाती व कुलें (ॠग्वेद) |
१कुलाल- तैत्तिरीय संहितेंत ‘शतरुद्रीय’ नामक कर्मामध्यें (रुद्राध्यायांत) या शब्दाचा कुंभार या अर्थानें उल्लेख आला आहे.
२निषाद- ॠग्वेदानंतरच्या तैत्तिरीय व वाजसेनिय संहिताग्रंथांत व ब्राह्मण ग्रंथांत हा शब्द आला आहे. या शब्दावरून एखाद्या विशिष्ट जातीचा बोध होतो असें नाहीं तर शूद्र लोकांप्रमाणें जे लोक आर्याच्या अमलाखाली नव्हतें अशा अनार्य लोकांनां हें नांव होते कारण औपमन्यवाच्या मतान पांच प्रकारचे लोक (पंचजना) म्हणजे चार जाती (चत्वारोवर्णाः) आणि पांचवे निषाद (निषादःपंचमः) होत. वाजसनेयि संहितेंत हा शब्द आला आहे. तेथें टीकाकर महीधरानें त्याचा भिल्ल किंवा भील असा अर्थ दिला आहे. लाटयायन श्रौतसूत्रांत निषादांची वसति असलेल्या एका खेडेगांवाचा उल्लेख आला आहे. व निषादस्थपति या नांवाच्या एका निषादांच्या पुढा-याचा कात्यायन श्रौतसूत्रांत व त्याच सूत्रावरील टीकाकारानें उद्भृत केलेल्या एका ब्राह्मण ग्रंथांत उल्लेख आला आहे. वेबरच्या मतानें निषादलोक हे मूळचे वसति करून (नि-सद्) राहणारे लोक असावे. कारण या मताला एका गोष्टीचा आधार आहे. ती गोष्ट ही कीं विश्वजित् नामक यज्ञ करणाराला कांही दिव्स निषादाबरोबर राहावे लागे व त्यामुळें जे निषाद अशा आर्याला आपणांत राहूं देत त्यांच्यावर थोडी तरी आर्य संस्कृतीची छाप पडण्याचा संभव असे. पण आर्य लोकांच्या समाजव्यवस्थेच्या बाहेर असलेल्या मुळच्या सर्व लोकांनां ही निषाद पदवी लाविता येईल. व्हान श्राडर म्हणतो कीं, हे निषाद लोक नीशियन्स या लोकांशीं सदृश असावेत.कारण ग्रीक इतिहासकारांनीं असा उल्लेख केला आहे की अलेक्झांडर हा अश्वकांच्या देशांत असतांनां ‘नीशियस्’ लोकांनीं त्याच्याकडे एक वकील पाठविला होता. परंतु निषाद आणि हे नीशियन्स् लोक दोन्ही एकच की काय या बद्दल शंका आहे.
३पुंजिष्ठ- तैत्तिरीय संहिता व तदुत्तर ग्रंथ यांत हा शब्द आला असून त्याचा कोळी असा अर्थ आहे. परंतु वाजसनेयि संहिता १६.२७ येथें टीकेंत महीधर याचा पक्षी पकडणारा (पारधी) असा अर्थ घेतो.
४ब्रह्मन् -(नपुंसकलिंगी) हा शब्द क्षत्रिय व इतर लोकांहून वेगळा असा ब्राह्मणवर्ग दर्शवितो. अथर्व वेद व तदनंतरच्या ग्रंथांतून हा शब्द आढळतो.
५शूद्रा- तै. संहिता,अथर्ववेद व मागाहूनच्या ग्रंथांत हा शब्द शद्रेस्त्री या अर्थाने आलेला आढळतो.
६सूत- यजुर्वेद संहिता व पुढील ग्रंथांत ग्रामणी बरोबर उल्लेख असलेल्या एका राजदरबारांतील नोकराचें हें नांव आहे. पंचविंश ब्राह्मणांत जे आठ वीर आले आहेत व इतर सर्व संहितामध्यें जे अकरा रत्नी आले आहेत त्यापैकी सूत हा एक होय. याचा उल्लेख अथर्ववेदांत राजदूतापैकीं एक म्हणून आलेला आहे. त्याचप्रमाणें यजुर्वेदाच्या शतरुद्रीय अनुष्ठानामध्येंहि हा शब्द आला आहे. टीकाकारांच्या मतानें सूत याचा राजाचा सारथी असा अर्थ आहे. परंतु अनेक ठिकाणीं सूत शब्दाबरोबर संग्रृहीतृ हाहि शब्द आला आहे. तेव्हां टीकाकारांचा अर्थ येथें संभवत नाहीं. एगलिंग म्हणतो कीं ब्राह्मणकालांत तरी हा सूत राजदराबारांतील कवि होता. वेबरच्या मतानें या सूत शब्दाचा अर्थ राजाजवळ नेहमीं प्रवेश असतो तो असा आहे. महाभारत कालांत सूत म्हणजे राजाचा बंदीजन किंवा भाट असा अर्थ आहे. यजुर्वेदाच्या निरनिराळया संहितांतील शतरुद्रीय प्रकरणांत सूत याला अहन्ति, अहन्त्य, अहन्त्व असे शब्द लाविले आहेत यावरून सूत हा भाट व वादन करणारा असा दोन्ही प्रकारचा मनुष्य होता असें दिसतें. भाट व वादन हे दोन्ही गुण एकत्र असलेले अन्यत्र कोठेंहि आढळत नाहींत.
७अग- गंधारि, मूजवन्त आणि मगध या निरनिराळया लोकांसंबंधी जें अथर्ववेदांत वर्णन आहे त्यांत हें नांव आलेलें असून गोपथ ब्राह्मणांत ‘अंगमागथाः’ य सामासिक शब्दांतहि यांचा उल्लेख आहे. त्यांची वसती गंगा आणि शोण यांच्या काठीं असें यावरून पूर्वीपासून ते त्याच ठिकाणीं राहत असावेत असें दिसतें.
८कैरातिका- किरातलोकांची मुलगी. औषधाकरितां पाळें मुळें खणीत असलेली अशा संबंधांत हिचा अथर्ववेदांत उल्लेख आला आहे.
९दाक्षायण- दक्षाचा वंशज. या दाक्षायण लोकांचा अथर्ववेद व कठक संहितेंत शतानीकाला सोने (अथवा अलंकार) दिल्याबद्दल उल्लेख आला आहे. शतपथ ब्राह्मणांत हा शब्द सोनें या अर्थानेंच आला आहे. याच ब्राह्मण ग्रंथांत दाक्षायण लोकांना राजे म्हटलें आहे. व दाक्षायण वशांतील पार्वति नामक कोणी मनुष्यानें दाक्षायण यज्ञ केल्यामुळें त्याला राज्यपद मिळाले व त्याच्या वंशाची पुढें भरभराट होत गेली.
१०द्विज- दोनदां जन्मलेला. हे विशेषण आर्यांना विशेषतः ब्राह्मणांनां लावलेलें असून अथर्ववेदांतल्या एका दुर्बोध सूक्तांशिवाय वैदिक वाङ्मयांत अन्यत्र कोठेंहि उल्लेख दिसत नाहीं.
११बाल्हिक- हें एका जातीच्या लोकांचे नांव अथर्ववेदांत येतें. त्यांत तापाला (तक्मन्) मूजवन्त, महावृष व बल्हिक वांच्याकडे जाण्यास सांगितले आहे. मूजवन्त लोक हे खात्रीनें उत्तरेकडे राहणारे लोक होते. ब्लूम फील्डच्या
मतानें बल्हिक हें नांव श्लेषार्थी (बाहेर राहणारे या अर्थानें) असावें. परंतु हा शब्द निःसंशय उत्तरेकडील कोणत्यातरी जातीवरून घेतला असला पाहिजे. रॉथ व वेबर यांचे मतें असें कीं, या बल्हिकांचा इराणी जातीकडे (बल्ख) संबंध असावा. हें मत झिमरनेंहि एकदां स्वीकारलें होतें परंतु पुढें तो म्हणतो कीं, फारशी जातीचा बल्हिकाशीं कांहीं संबंध होता असें मानण्याचें कांहीच कारण नाहीं.
१२महावृष- हें एका जातीचें नांव आहे. यांचा उल्लेख अथर्ववेदांत बाल्हिक याच्या बरोबर आला आहे व यांच्याकडे तक्मन् (तापाला)ला जाण्याची आज्ञा झाल्याबद्दलचा तेथें उल्लेख आहे. ब्लूमफील्ड म्हणतो कीं हें नांव विशेषतः आवाज आणि अर्थ याकडेच लक्ष देऊन दिलेलें असावे; त्याचा स्थलाशीं कांही संबंध नसावा (हे महावृष म्हणजे महाशक्तिमान=रोगाला तोंड देण्याला समर्थ) असावें परंतु हें मत फारसे संयुक्तिक नाहीं. महावृष देशांत रैक्पर्ण हें स्थान होतें असें छान्दोग्य उपनिषदांत म्हटले आहे. ‘हृत्स्वाशय’ हा महावृषांचा राजा होता असा जैमिनीय उपनिषद् ब्राह्मणांत उल्लेख असून महावृषांचा बौधायन श्रौतसूत्रांतील एकामंत्रांत आहे.
१३मूजवन्त- महावृष, बल्हिकांबरोबर उल्लेख आलेल्या लोकांचें नांव. यजुर्वेद संहितेंतहि दूर राहणारे लोक असाच या शब्दाचा अर्थ आहे. आणि त्याच संहितेंत रुद्राला त्याच्या धनुष्यासह या लोकांच्याकडे जाण्यास आज्ञा केली आहे. ॠग्वेदांत सोमाला ‘मौजबत’ (मूजवन्त लोकांकडून अथवा यास्कांच्या मताप्रमाणें मूजवान पर्वतापासून येणारा) म्हटलें आहे. हिंदी टीकाकारांनां मूजवान हें पर्वताचें नांव आहे हें यास्काचें मत मान्य आहे. काश्मीरच्या नैॠत्येस असणा-या एका पर्वतांचे नाव मूजवान होय या झिमरच्या मतास पुरावा नाहीं असें हिलेब्रँटचें मत जरी बरोबर असलें तरी मूजवन्त नांवाचा एक पर्वत होता त्यावरूनच या लोकांनीं मूजवन्त हें नांव धारण केलें हें म्हणणें गैरवाजवी होणार नाहीं. मूजवन्त आणि मूंजवन्त एकच असें यास्कांचे मत आहे आणि हिमलायच्या एका भागाचें किंवा त्यांतील एका पर्वताचें हें नांव आहे असें तहाभारतांत उल्लेखिलेलें आहे.
१४व्रात्य- युजर्वेदांत पुरुषमेधप्रसंगी बलि दिले जाणा-यांच्या यादींत हें नांव आलेलें आहे परंतु तेथें या नांवाबद्दल जास्त खुलासा नाहीं. तो अथर्ववेद व पंचविंशब्राह्मण या ग्रंथांत आढळतो. अथर्ववेदांत व्रात्यासाठी एका विधींचे सविस्तर वर्णन आलेलें आहे. (या विधीचा- व्रात्यस्तोमाचा- उल्लेख ज्ञानकोश विभाग दोन पृष्ट ६५ मध्यें आला आहे). पंचविंश ब्राह्मणांत बहिष्कृत् लोकांच्या चार वर्गांचा उल्लेख आला आहे ते चार वर्ग म्हणजे-हीन, (पापाचरणानें निंदित झालेली) निंदित; (बहिष्कृत लोकांत राहिल्यामुळें लहानपणींच बहिष्कृत झालेले) बहिष्कृत; व चवथे जे वृद्ध लोक पुरुषत्वहीनतेमुळें बहिष्कृत लोकांत राहत ते असे होत. पहिल्या तीन जाती इतक्या महत्त्वाच्या नाहींत परंतु चवथी जात बनण्याचा हेतु काय असावा हें समजत नाहीं. प्रो. राजारामशास्त्री भागवत यांच्या मतानें हे लोक देशांतील बायकांशी अयोग्य संबंध ठेवल्यामुळें आपली प्रकृति निःशक्त करून घेऊन व षंढ बनले. परंतु मुळांत या मतास आधार नाहीं. या चार जातींपैकी हीन हेच लोक महत्त्वाचे व बाकीचे दुय्यम प्रतीचे असावेत हें संभवनीय आहे. रा. भागवत शास्त्रांच्या मतें हीन लोकांचे आर्यनहीन व ‘अनार्यन्हीन’ असे दोन वर्ग असावेत. पण ही निवळ कल्पनाच आहे. या व्रात्यांचा एकच वर्ग असावा असें वाटतें ते अनार्य असतील हें शक्य नाहीं. कारण पंचविंश ब्राह्मणांत असा स्पष्ट उल्लेख आहे कीं जरी ते स्वतःअसंस्कृत होते तरी ते सुसंस्कृत लोकांचीच भाषा बोलत असत. यावरून ते आर्य असावे. या मताला पुढील वाक्याचा आधार आहे. जे बोलावयास सोपें ते सुद्धां ते लोक उच्चारण्यास अवघड असें समजतात.यावरून ते लोक सुसंस्कृत लोकांचीच परंतु त्यापेक्षां थोडी हलक्या प्रतीची भाषा बोलत असावे असें वाटतें. सूत्रामध्यें ब्राह्मण व क्षत्रिय यांनां सदृश अशा अर्हन्त व यौध (लढवय्ये) या वर्गाचा उल्लेख आला आहे. इतर अशा पुष्कळ गोष्टी आहेत की ज्यावरून हे ब्राह्मण संस्कृतीला पारखे असले तरी आर्यन् होते ही गोष्ट सिद्ध होईल. उदाहरणार्थ हे लोक व्यापार किंवा शेतकी करीत नव्हते(यावरून ते एकाच ठिकाणी वसती करून राहणारे लोक नसावेत)किंवा ते ब्रह्मचर्याचे नियम पाळीत नसत असें वर्णन आहे. या लोकांनीं एक विशिष्ट व्रताचरण केलें असतां त्यांनां ब्राह्मणसमाजांत प्रवेश करतां येत होता. यावरून ते अनार्यन् खास नसले पाहिजेत अशी कल्पना करण्यांत आली आहे. व्रात्याचा पोषाख व जीवनक्रम याविषयी कांही माहिती पंचविंश ब्राह्मणांत मिळते. त्यांची तत्त्वें ब्राह्मण लोकांच्या विरुद्ध होतीं. ज्यांनां सुधारता येणें शक्य नव्हतें त्यांनां ते मारीत असत. त्यांचा गृहपति डोक्यावर नेहमी उष्णीष (शिरस्त्राण, पागोटे) धारण करी, त्याच्या हातांत एक चाबूक व धनुष्य (ज्याऱ्होड) असें, ते कृष्ण वस्त्र, परिधान करी व त्याच्या अंगावर काळें व पांढरें कातडें पांघरलेलें असें. त्याची एक चौचाकी गाडी असून त्या गाडींवर चार फळया असत. एखाद्या पुढाराच्या अनुशासनाखाली असलेल्या लोकांची वस्त्रें तांबड्या काठांची असत व ते अंगावर घेत ते कातडे दोन ठिकाणी दुमडलेले असे तसेच त्या लोकांच्या पायांत जोडे (उपानह) असत व त्यांच्या पुढा-याला निष्क नामक अलंकार धारण करण्याची फार आवड असे. प्रो. राजारामशास्त्री यांच्या मतानें हें निष्क म्हणजे एक प्रकारचें रुप्याचें नाणें होतें. व्रात्यलोक सुसंस्कृत झाल्यावर त्यांनी आपली चीजवस्तू पुरोहिताच्या ताब्यांत द्यावी अशी रूढी असे. याशिवाय इतर बरीच माहिती सूत्रग्रंथांतून आली आहे (उदाहरणार्थ हे लोक जे जोडे वापरीत त्यांचा वर्ण काळसर असें व त्यांची टोंके पुढें आलेली असत.) पण या माहितीला पंचविंशब्राह्मणांत आधार नाहीं हे व्रात्यलोक कोठें राहत असत या विषयी नक्की माहिती सांगणें कठिण आहे. पण ज्या अर्थी ते नेहमी भटकत असत त्या अर्थी ते सरस्वती नदींच्या पलीकडे राहत असावेत अशी कल्पना आहे. कदाचित् ते पूर्वेकडेहि राहत असावे. या कल्पनेला सूत्रांत आधार आहे तो असा कीं, या व्रात्य लोकांच्या उपभोग्य वस्तूंचे (पोषाखाचें) दान देणारा ब्राह्मण (कदाचित् व्रात्यस्तोम विधीच्या वेळी) मगधांतील रहिवाशी असे. व्रात्यांचें राहण्याचें ठिकाण निश्चित करण्याच्या बाबतींत अथर्ववेदाची कांही मदत होऊं शकत नाहीं. कारण त्या वेदाची व्रात्याबद्दल अशी कल्पना आहे कीं ते सर्वत्र रहात असत. रॉथ म्हणतो कीं व्रात्याबद्दल पंचविंश ब्राह्मणकाराचें जें मत होतें तेंच अथर्ववेदांत प्रतिपादिलेलें होतें असें कोणी समजू नये. कारण अथर्ववेदांत व्रात्यांची स्तुति केलेली असून ते लोक ब्राह्मण लोकांतील परिव्राजकाप्रमाणें पूज्य होते असें म्हटलें आहे. परंतु रॉथचें हें मत सपशेल चुकीचें आहे. कारण अथर्ववेदांत व्रात्याजवळ विपथ (रथ), प्रतोद (चाबूक) व उपानह (जोडा) या वस्तू असल्याचें उल्लेखिलें आहे आणि या वस्तू परिव्राजकाजवळ असणें संभवनीय नाहीं. आंता ही गोष्ट शक्य आहे कीं अथर्ववेदांतील जें पंधरावें कांड गूढ म्हणून प्रसिद्ध आहे त्यांत ब्राह्मण झालेल्या व्रात्यांची खूप स्तुति केलेली असावी व त्याला पूर्णब्रह्मचारी समजून दैवी अंशाचा अतएव वंदनीय असा मान दिला गेला असावा.
१५शकंभर- अथर्ववेदांत हा शब्द एका ठिकाणीं आला आहे व तेथें त्याचा अर्थ सन्दिग्ध आहे. लुडविग व ग्रिल यांच्या मतें याचा अर्थ एका जातींचें नांव असा आहे. ब्लूमफील्ड म्हणतो याचा अर्थ ‘हगवण’ असा आहे. परंतु व्हिटने म्हणतो कीं हा शब्द महावृष लोकांनां निंदासूचक अर्थाने लावला आहे. कारण महावृषांच्या देशांत लाकूड नसल्यामुळें जळणासाठीं त्यांनां वाळलेल्या शेण्या गोळा कराव्या लागत (शकं=वाळलेलें शेण, भर=भरणारे),
१६चण्डाल-चाण्डाल- वाजसनेयि संहितेंत उल्लेखिलेलीं हीं अस्पृश्य जातींच्या नांवाचीं दोन रूपें आहेत. मूळांत एक ही निराळी जातच असावी असें वाटतें परंतु ही जात म्हणजे ब्राह्मण आई व शूद्र बाप यांच्यापासून झालेली संतति होय. अशी कल्पना धर्मशास्त्रकारांनीं मांडली आहे. यजुर्वेद आणि उपनिषदें यावरून ही एक मांगासलेली जात आहे एवढीच माहिती मिळते.
१७पौंजिष्ठ- कोळी या अर्थी असेलल्या वाजसनेयि संहिता व तैत्तिरीय ब्राह्मण यांत आलेल्या पुंजिष्ठ शब्दाचें हें रूप आहे. कदाचित हें जातिवाचक नाम असावें. पुंजिष्ठाचे वंशज या अर्थी एखाद्या कामकरी जातीचें हें नांव असावें.
१८आन्ध्र- शुनःशेपास विश्वामित्राचा पुत्र व समजणा-या अशा ज्या लोकांनां विश्वामित्रानें घालवून दिलें त्या पैकी अन्ध्र हे आहेत. यांचा उल्लेख ऐतरेय ब्राह्मणांत आहे.
१९आजकेशिन्- इंद्राच्या विरुद्ध ज्या बकानें दाण्डगाई केली त्याच्या कुलाचें हें नांव आहे असें जैमिनीय उपनिदब्राह्मणांत उल्लेखिलें आहे.
२०आथर्वण- अतिप्राचीन अथवा काल्पनिक अथर्वन् पासून हें नांव चालत आलेलें आहे. या शब्दाचा अनेक वचनी नपुंसकलिंगी असा उपयोग केल्यास अथर्वन् यांनीं केलेल्या सूक्तांचाहि बोध होतो. अथर्ववेदाच्या एकोणिसाव्या काण्डांत अशा त-हेचा उपयोग केलेला आढळतो, व पंचविंश ब्राह्मणांतहि आढळतो. एकवचनी अथर्वण (वेद) हा शब्द जरी छांदोग्य उपनिषदापर्यँत आढळत नाहीं तरी तो ‘अथर्ववेद’ या शब्दाच्या अगोदरच आहे कारण ‘अथर्ववेद’ हा शब्द सूत्रांत आढळतो. व त्याच सूत्रांत आथर्वणिक अथवा अथर्ववेदाचे अनुयायी अशा अर्थाचा शब्द आहे. अथर्वन् याचे अनुयायी अथवा त्याच्या कुलांतील जुन्या परंतु निश्चित अशा लोकांचीं नांवें दध्यङ्, बृहद्दिव, भिषज्- कबन्ध व विचारिन् हीं आहेत.
२१उत्तरकुरू- महाकाव्यें आणि तदुत्तर वाङ्मयांत उत्तरकुरू हे काल्पनिक लोक असावेत असें दिसतें. ऐतरेय ब्राह्मणांवरून ते लोक ऐतिहासिक व हिमालयाच्या पलीकडे राहणारे होते असें दिसतें, ऐतरेय ब्राह्मणांतील दुस-या एका उता-यांत वासिष्ठ सात्यहव्य म्हणतो कीं उत्तरकुरूंचा देश देवक्षेत्र हा होता व अत्यराति जानंदपि हा तो देश जिंकणाच्या विचारांत होता. यावरून तो देश काल्पनिक होता असें म्हणतां येत नाहीं. उत्तरकुरू हे काश्मीरांत राहत असावें असें वाटतें. कुरुक्षेत्रांत मुख्यत्वेकरून काश्मीरांतून येणा-या लोकांच्याच टोळ्या आढळतात असें जें झिमरचें मत तें सकारण असून ग्राह्य आहे.
२२उत्तरमद्र- ऐतरेय ब्राह्मणांत हिमालयाच्या पलीकडे राहणा-या व उत्तरकुरूंच्या बरोबर असण-या एका जातीचा उल्लेख आहे. झिमर म्हणतो कीं वंशब्राह्मणांत उल्लेखिल्या प्रमाणें काम्बोज औपमन्यव हा मद्रगार याचा शिष्य होता आणि म्हणून काम्बोज आणि मद्र यांच्यात फारसें अन्तर नव्हतें. हें विधान काम्बोज यांची राहण्याची जागा पाहिली असतां अगदीं बरोबर दिसून येईल.
२३उदीच्य- उत्तर प्रान्तांतील ब्राह्मण कुरूपंचाल उद्दालक आरुणि याच्याशी वादाला गुंतले असतां स्वेदायन शौनक याला त्यांनीं आपल्या वतीनें बोलणारा नेमून प्रतिस्पर्ध्याचा वादांत पराभव केला असा उल्लेख शतपथ ब्राह्मणांत आहे, आणि त्याच ब्राह्मणांत कुरुपंचालांची भाषा उत्तरेकडील लोकांच्या भाषेषीं साम्य पावते असाहि उल्लेख आहे, यावरून त्यांचा आणि कुरुपंचालांचा संबंध असावा असें वाटतें, शुद्धपणाबद्दल उत्तरेकडील भाषेची प्रसिद्धि होती. म्हणून अध्ययनासाठीं ब्राह्मण लोक तिकडे जात असत असा कौषीतकी ब्राह्मणांत उल्लेख आहे, आणि बौद्ध ग्रंथांत तक्षशिला येथील पाठशाळेंत पुष्कळ विद्यार्थी अभ्यासासाठीं राहत असत असा उल्लेख आहे आणि म्हणूनच संस्कृत भाषा काश्मीरांत श्रेष्ठ पदास पोचली होती असें फ्रँकचे मत आहे.
२४ऊर्णनाभि, ऊर्णवाभि, ऊर्णवन्त- हीं सर्व नांवे कोळी (जात) या अर्थानें काठक संहिता, ब्राह्मणग्रंथ व उपनिषदग्रंथ यामध्यें आली आहेत.
२५कैकतीय- या नांवाचे लोक शाण्डिल्यापासून अग्निचयन शिकले असा शतपथ ब्राह्मणांत उल्लेख आहे. आपस्तंब श्रौतसूत्रांत कंकति ब्राह्मणांच्या पंथाच्या मूळग्रंथाचा उल्लेख आला आहे. बौधायन सूत्रांतील छागलेय ब्राह्मण आणि हे कंकति ब्राह्मण एकच असावेत.
२६कंबोज, काम्बोज- निरुक्तार यास्क म्हणतात कीं इतर आर्य लोकांची भाषा आणि काम्बोज यांची भाषा यांत फरक आहे. काम्बोज हे सिंधुनदीच्या वायव्येस राहत असत आणि जुन्या पारशांच्या ग्रंथांत त्यांनां कंबुजीय असे म्हटलें आहे. मद्रगार याचा शिष्य काम्बोज औपमन्यव हा अध्यापक म्हणून वंशब्राह्मणांत आलेला आहे. यावरून पार्शी लोक व आर्यन् लोक यांच्याशीं सबंद्ध असणारे कम्बोज लोक यांचा मद्र अथवा विशेषतः उत्तरमद्र यांच्याशीं संबंध असावा असें वाटतें.
२७कारस्कर- बौधायन, आपस्तंब व सत्याषाढ या सूत्रांत एका राष्ट्राचें अथवा जातीच्या लोकांचे म्हणून हें नांव आलें आहे. रा.वि. का. राजवाडे यांनी कातकरी हेच कारस्कर असावेत असें मत व्यक्त केलें आहे. त्यास हरप्रसाद शास्त्री वगैरे मंडळींनीं आक्षेप घेतले आहेत.
२८कुन्ति- या लोकांनीं पंचाल यांचा पराभव केला असा काठक संहितेंत उल्लेख आहे.
२९कुरू- ब्राह्मण वाङ्मयांत कुरू लोकांनां फार महत्त्व दिलेलें आहे. ब्राह्मण जात अथवा लोक हे कुरू किंवा कुरूपंचाल या देशांत उत्पन्न झाले अशाबद्दल सबळ पुरावा जैमिनीय उपनिषद ब्राह्मणांत आहे. कुरूंचा स्वतंत्र उल्लेख फारच क्वचित आढळतो. त्यांचा पंचालाशींच निकट संबंध असल्यामुळें पंचालाबरोबरच त्यांचा उल्लेख केलेला आढळतो. कुरू पंचाल हें एकच राष्ट्र होतें असा पुष्कळ ठिकाणीं उल्लेख आहे. कुरुपंचालांची यज्ञ करण्याची पद्धतीहि उत्तम होती असें म्हणत. कुरुपंचाल राजे राजसूय यज्ञ करीत असल्याचा उल्लेख आहे. हे राजे हिवाळयांत स्वारीकरितां बाहेर पडत व उन्हाळयांत परत घरीं येत. बृहदारण्याकोपनिषदांत कुरू पंचालब्राह्मणांचे फार बहारींचे वर्णन आहे. वेबर आणि ग्रीअर्सननें कुरु व पंचाल या दोन राष्ट्रांत वैदिक कालीं तंटे होत असत असें सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. मागाहून जे लोक पश्चिमेकडून हिंदुस्थानांत आले आणि जे ब्राह्मण होते; ते पंचालांशीं वैरभावानें वागत असत; कारण ते ब्राह्मणद्वेष्टे होते, असें ग्रीअर्सन म्हणतो आणि या गोष्टीला दुजोरा देण्यासाठीं वेबर काठक संहितेतील पंचाल देशांत जन्मलेला बकदाल्भ्य व कुरुवंशांतील धृतराष्ट्र वैचित्रवीर्य यांच्या भांडणासंबंधीची गोष्ट देतो. परंतु त्याठिकाणीं वरील प्रकारच्या भांडणांचा उल्लेख नसून राजा आणि पुरोहित यांच्यांतील धार्मिक विधीसंबंधी झालेल्या थोडयाशा भांडणाचा उल्लेख आहे. शिवाय त्याठिकाणीं कुरुपंचालांच्या नैमिषीय यज्ञांचे वर्णन असून या दोन राष्ट्रांतील अतिनिकट संबंधांचाहि उल्लेख आहे. परंतु पुन्हा वेबर म्हणतो की वाजसनेयि संहितेंतील काम्पील येथील सुभद्रिकाहि त्या कुलाच्या आसपास राहणा-या जातींच्या राजाची पट्टराणी होती आणि त्याच राजांकरितां संहितेंत सांगितलेला अश्वमेध यज्ञ केला होता. परंतु वेबरचें हें म्हणणें जबर संशयाला करण आहे; आणि संहितेच्या काण्वशाखीय पाठातील राजसूयाकरितां उपयोगांत आणिलेल्या उता-यावरून कुरू व पंचाल यांचा एकच राजा होता असें वाटतें. शतपथ ब्राह्मणांत पंचालांचे जुनें नांव क्रिवि होतें असा उल्लेख आहे क्रिवि हा शब्द कुरू याचा अपभ्रंश असावा. परंतु झिमर म्हणतो कुरु व क्रिवि मिळून ॠग्वेदांत उल्लेखिलेली वैकर्ण ही जात उत्पन्न झाली कारण या दोन्ही लोकांचा सिन्धु व असिक्री या स्थलाशीं फार संबंध आढळतो. तसेंच कुरू आणि सृंजय लोक यांचा ‘देवभाग’ नांवाचा एकच पुरोहित असल्यामुळें याहि दोन्ही राष्ट्रांचे सख्य होतें असें दिसतें. छांदोग्य उपनिषदांत (४. १७,९) एका प्रसंगी कुरूंनं एका घोडीनें वाचविल्याचा व वादळामुळें त्यांच्यावर ओढवलेल्या संकटाचा नाश केल्याचा (१.१०,१) हि उल्लेख आहे. शांखायन श्रौतसूत्रांत कुरूंनीं केलेल्या वाजपेय यज्ञाचा उल्लेख असून ज्या शापामुळें कुरूंनां कुरुक्षेत्र सोडावें लागलें त्या शापाचाहि उल्लेख (१५,१६,११) आला आहे. हीच गोष्ट महाभारतांत उल्लेखिलेल्या कौरवांच्या दुर्भाग्याची कल्पना देते. ॠग्वेदांत कुरूंचा ‘लोक’ या अर्थाने उल्लेख नाहीं परंतु कुरुश्रवण, पाकस्थामा कौरयाण याचा उल्लेख आहे. अथर्ववेदांत परिक्षित् हा कुरूंचा राजा होता व शतपथ ब्राह्मणांत त्याचा मुलगा जनमेजय हा अश्वमेधयज्ञ कर्त्यांत श्रेष्ठ होता असें म्हटलें आहे. ॠग्वेदांत आणखी ज्या जातींचा उल्लेख येतो त्या सर्वांचा कुरूंमध्यें समावेश होतो असें ओल्डेनबर्गचें मत आहे. तुत्सु व भरत हे ॠग्वेदांत जे पुरूंचे शत्रू ते नंतरच्या वाङ्मयांत कुरुराष्ट्र बनविण्याकरितां एक झालेले आढळतात. ब्राह्मण ग्रंथांत भरत हे प्राचीन लोकांत प्रमुख होते पण नंतरच्या वाङ्मयांत राष्ट्रांच्या यादींत त्यांचा मागमूसहि सापडत नाही. यावरून पुढें ते कोणत्यातरी राष्ट्रांत समाविष्ट झाले असावेत असेंच अनुमान निघतें. पूर्वी ज्या देशांत भरत असत त्याच देशांत पुढे कुरूंची वसती
असल्याचा पुरावा आढळतो. शतपथ ब्राह्मणांत एका भरत राजानें काशिराजावर जय मिळविल्याचा आणि एकाने गंगा आणि यमुना यांचे अर्चन केल्याचा उल्लेख आहे. ऐतरेय ब्राह्मणांत भरताच्या ‘सत्वत’ नामक राजांवर स्वा-या होत असत असा उल्लेख आहे. वाजसनेयि संहितेंत (११,३) भरत हें कुरुपंचालांचेच दुसरें नांव आहे असें लिहिलें आहे आणि अश्वमेध करणारांच्या मोठमोठया यादींत एक कुरू व दोन भरत राजांची नांवे आलीं असून ते कोणत्या राष्ट्रांचे राजे होते हें मात्र दिलें नाहीं. परंतु ही माहिती दुसरीकडे दिली आहे असें ओल्डेनबर्ग म्हणतो. ऐतरेय ब्राह्मणांत कुरुपंचाल मध्यदेशांत राहत असत असे. म्हटलें आहे. पण कुरु लोकांची आणखी एक टोळी उत्तरेकडे उत्तरकुरू हिमालयाच्या पलीकडे रहात असे. कुरुपंचालांचा देश म्हणजे ब्राह्मण संस्कृतीचें उगमस्थान होय व मागाहून ते चारी दिशेस पसरले यांत मुळींच संशय नाहीं. पंचविंश ब्राह्मणांतील व्रात्यस्तोम प्रकरणांत व शांखायन आरण्यकांत मगध देशांत ब्राह्मणांने वसती करणें म्हणजे अब्राह्मण्य होय असें जें म्हटलें आहे त्याचा वरील गोष्टीमुळें उलगडा होतो. कुरुपंचाल ब्राह्मणांचा वरेचवर उल्लेख येणें हें त्यांच्या धर्मप्रसारक चळवळीचें द्योतक होय. कुरुपंचालांच्या भौगोलिक स्थानांवरून ते कोसल, विदेह अथवा काशि यांच्या मागून हिंदुस्थानांत आले असावेत आणि पश्चिमेकडील नवीन आर्यन् लोकांच्या लाटेनें आणखी पूर्वेस ढकलले गेले असावेत. ही जी नवील लाट आली तिचा आणि त्यांच्या पश्चिमेकडील शेजा-यांचा हिंदुस्थानांत येण्याचा कालदृष्टया काय संबंध होता. म्ह. किती कालाच्या अंतरानें या लाटा उसळत असत. याबद्दल वैदिक वाङमयांत कांही आधार सांपडत नाहीं. नंतर वैदिकवाङ्मयदृष्टया ज्यांचे कांहीच महत्त्व नाहीं असे जें भाषेंत कांही चमत्कार घडून आले त्यांवरून पाहतां कुरूंनीं नवीन मार्गानें येऊन पूर्वपश्चिम देशांत वसती करणा-या मूळ आर्यन् लोकांत आपलें घोडें ढकलले असावें.
३०कुल,कुलपा- कुल हा शब्द स्वतंत्रपणें ब्राह्मणकालाच्या पूर्वी आला नाहीं. गृह अथवा कुलगृह असा याचा अर्थ असून रुपकदृष्टया घरांतील कुटुंब यालाच हा शब्द लाविला आहे. कुलपाः (अक्षरशः गृहरक्षणकर्ता अथवा कुटुंबांतील मुख्य) हा ॠग्वेदांत आला असून लढाईतील वाजपतीचा सेवक त्याच्यापेक्षां कमी दर्जाचा असतो आणि वाजपति हा ग्रामसेनेचा नेता समजत असत. अथर्ववेदांत मुलीला उपरोधिकपणें कुलपा असें म्हटलें आहे. कारण ती जगांत भर्तृहीना असून तिचा प्रति म्हणजे यम (मृत्युपति) होय. कुल या शब्दाचा उपयोग विभक्त कुटुंबपद्धती होती असें दाखवितो. एका कुटुंबात मात्र बापाच्या किंवा वडील भावाच्या नेतृत्वाखाली पुष्कळशीं माणसें असूं शकतील. आणि याचें कुल म्ह. निवासस्थान. गोत्र शब्दापासून कुल शब्द निराळा आहे. त्याचा अर्थ एका घरांत राहणारे- सर्व मंडळी, अविभक्त कुटुंबा असा आहे.
३१केकय- बहुतकरून वैदिक व तदुत्तर काळांत ही जात वायव्येकडे सिंधु आणि वितस्ता या दोन नद्यांमध्यें राहत असे. वैदिक ग्रंथांतील अश्वपति कैकेय या नावांवरून केकय या जातीचा अप्रत्यक्षपणें अर्थबोध होतो.
३२केशिन्- शतपथ ब्राह्मणांत येणा-या एका लोकांचे हें नांव आहे.त्यांत त्यांचा राजा यज्ञाच्या वेळीं अशुभ गोष्ट घडली तर तिच्या शुद्धीकरितां खण्डिक यांच्यापासून प्रायश्चित घेत असे असा उल्लेख आहे.
३३कैशिनी- ‘कैशिन्यःप्रजाः’ म्ह. वेशिन यांची मुलें अथवा प्रजा असा शतपथ ब्राह्मणांतील एका अप्रसिद्ध ठिकाणी उल्लेख सून ती प्रजा शतपथ ब्राह्मणांच्या काळांत कदाचित् अस्तित्वांत असेल अगर नसेल.
३४कोष- शतपथ ब्राह्मणांत कोषस् हें एक उपाध्यायाचें कुल होतें आणि त्यांच्यापैकी एक सुश्रवस याचें नांवे आले आहे.
३५कौरव्य- (कुरुस यांच्यापैकी) कुरु लोकांपैकी एक मनुष्य आपल्या बायकोसह परिक्षित राजाच्या अमलांत चैन भोगीत आहे असें अथर्ववेदांत लिहिले आहे. कौरव्य राजा बल्हिक प्रातिपीय हा शतपथ ब्राह्मणांत आला आहे आणि आर्ष्टिषेण व देवापि हे कौरव्य होते असें नंतरची दंतकथा म्हणते.
३६कौरु-पंचाल- कुरुपंचाल यांपैकी. शतपथ ब्राह्मणांत हें आरुणि याचें विशेषण आहे आणि त्याच ग्रंथांतील या शब्दानें त्या जातीच्या लोकांच्या संवयीचा अर्थबोध होतो.
३७क्रैव्य- क्रिवींचा राजा पांचाल यानें परिवक्रा नदीवर अश्वमेध यज्ञ केला असें शतपथ ब्राह्मणांत आहे, तथापि एगलिंग म्हणतो कीं,तें विशेषनाम असून त्याचा अर्थ क्रैव्य पांचाल राजा असा आहे.
३८गोत्र- याविषीं सविस्तर विवेचन पुढें केलेलें आहे.
३९गौपायन- गोपवंशज, ब्राह्मणांत आसमाति, किरात आणि आकुलि यांची जी दंतकथा आहे त्यांत गौपायन हें नांव आले आहे.
४०जाति- जाति हा शब्द पालि ग्रंथांत जाति अशा अर्थी आलेला आहे. पण पूर्वीच्या वैदिक ग्रंथांत हा शब्द बिलकुल आलेला नाहीं. परंतु कात्यायन श्रौतसूत्रासारख्या ग्रंथांत जेथें जेथें हा शब्द आलेला आहे तेथे त्याचा अर्थ घराणें किंवा कुटुंब असा आहे.
४१त्रिखर्व-पंचविंश ब्राह्मणांत यशस्वीरीतीनें एक विशिष्ट यज्ञ करणारे जे पुरोहित होते त्यांच्या वर्गाचे हें नांव आहे.
४२निष्किरीय- पंचविंश ब्राह्मणांत सत्र चालविणा-या उपाध्यायांच्या शाखेचें नांव आलेलें आहे.
४३नैषाद- कौषीकती ब्राह्मण व वाजसनेयि संहितेमध्यें हें नांव आलें आहे.
४४पंचाल- ॠग्वेदांत क्रिवी नांवाच्या लोकांचें हें मागाहून प्रचारांत आलेले नांव आहे. कुरु या शब्दाशिवाय इतरत्र या शब्दाचा उल्लेख क्वचितच येतो. कुरुपंचालांच्या राजांचा उल्लेख ऐतरेय ब्राह्मणांत आलेला आहे. काठक संहितेंत पंचाल म्ह. केशी दाल्भ्य याचे लोक असें म्हटलें आहे. उपनिषदें व उत्तरकालीन ग्रंथांत पंचाल देशच्या ब्राह्मणांचे तत्त्वज्ञानविषयक व भाषाविषयक वादविवादांत प्रमुख अंग होतें असा उल्लेख आला आहे. संहितोपनिषद्ब्राह्मणांत प्राच्य पंचालांचा उल्लेख आलेला आहे. या पंचाल लोकांत क्रिवी लोकांखेरीज इतर जातींचाहि समावेश होतो. हें नांव पंच जनांनां लाविलेलें असून हे पंचाल म्ह. ॠग्वेदांतले पंचजन होत अशी एक कल्पना पुढें आलेली आहे. पण ती फारशी खरी दिसत नाहीं. वैदिक वाङ्मयांत व महाभारतांत पंचालांची उत्तर व दक्षिण पंचाल अशी विभागणी केलेली असल्याचा उल्लेख नाहीं. शतपथ ब्राह्मणांत या लोकांचे परिचक्रा असें नांव आलेलें आहे. ज्यांचा उल्लेख आला असें वाटतें तीं शहरें म्हणजे कांपील व कौशांबि ही होत. कुरुपंचाल यांच्या राजाहून निराळे असे पंचालांचे राजे व सरदार म्हणजे क्रैव्य,दुर्मुख, प्रंवहणजैवलि व शोण हे होत.
४५पुंड्र- ऐतरेय ब्राह्मणांत बहिष्कृत मानलेल्या लोकांचें हें नांव आलेलें आहे. हें नांव सूत्रग्रंथांतहि आलेलें आहे. महाभारतांत या पुंड्र लोकांचा देश म्हणजे हल्लीचा बहार व बंगाल हे प्रांत होत.
४६पुलिंद- ही एक बहिष्कृत जात असून इचा निर्देश ऐतरेय ब्राह्मणात केलेला आहे. परंतु शांखायन श्रौतसूत्रांत शुनःशेपाच्या गोष्टीच्या संबंधांत यांचा उल्लेख येत नाहीं. पुलिंदांचा आंध्रांशी पुनः एकदां अशोकाच्या वेळीं संबंध येतो.
४७प्रौश्चलेय- तैत्तिरीय ब्राह्मणांत हा एक दासीपुत्र कळवन्तिणीचा मुलगा असा अर्थदर्शक शब्द आहे.
४८प्राच्य- याचा अनेकवचनी उपयोग केला असतां पूर्वेकडील राहणारे हा अर्थ होतो. याचा ऐतरेय ब्राह्मणाच्या यादींत उल्लेख केलेला आढळतो. ओल्डेनबर्गच्या मताप्रमाणें बहुधा ते काशीचे, कोसलचे, विदेहाचे आणि कदाचित् मगधाचे लोक असावेत. शतपथ ब्राह्मणांत अग्नीला पूर्वेकडील लोक शर्व या नांवाने पाचारण करीत असत व त्याच ग्रंथांत त्यांच्या थडगीं बांधण्याच्या चालीचा उल्लेख आला असून त्याबद्दल तेथें तिरस्कार दाखविला आहे. लाठयायन श्रौतसूत्रांत विपथ (ओबडधोबड गाडी) या पंचविंश ब्राह्मणांतील शब्दाचा अर्थ देताना तो रथ पूर्वेकडील लोकांचा होता असें म्हटले आहे (प्राच्य. रथ) संहितोपनिषद् ब्राह्मणांत प्राच्य पांचालांचा उल्लेख आलेला आहे.
४९बाहीक- हा शब्द शतपथ ब्राह्मणांत पश्चिमेकडील लोकांस, (पजाबांतील लोकांस) लाविलेला आहे व त्याचा प्राच्य याच्या विरुद्ध उपयोग होतो. ते अग्नीला भव या नांवानें बोलावीत असत.
५०भरन्त- भरणारी. सायण मताप्रमाणें बोथलिंग या शब्दाच्या पंचविंश ब्राह्मणांत एका ठिकाणीं आलेल्या बहुवचनी रुपाचा अर्थ लढवय्ये लोकांची जात असा करतो, परंतु हा अर्थ बरोबर आहे किंवा नाहीं याबद्दल खात्री नाहीं. जरी शब्दाचें रूप वर्तमानकालवाचक धातुसाधित असें आहे तरी वेबरच्या मतें हा शब्द भरतांनां उल्लेखून लिहिला आहे.
५१मागधदेशीय- हें सूत्रांत मगधदेशीय एका ब्राह्मणांचे नांव आलें आहे. मगधदेशांत राहणारा असा याचा अर्थ आहे.
५२मूचीप अथवा मूवीप- हें ऐतरेय ब्राह्मणांतल्या मूतिबाचें व शांखायन श्रौत सूत्रांतल्या रानटी नागवाचक जातीचें दुसरें नांव आहे.
५३मूतिब- विश्वामित्राची बहिष्कृत संतति म्हणून गणिलेल्या रानटी जातींतल्या एकींचे ऐतरेय ब्राह्मणांत आलेलें नांव शांखायन श्रौतसूत्रांत मूचीप अगर मूवीप असें नांव येतें.
५४म्लेच्छ- हा शब्द शतपथांत अशुद्धभाषी या अर्थी आहे. म्लेच्छी भाषा बोलण्याला ब्राह्मणाला बंदी केलेली आहे. असल्या भाषेचें उदाहरण ‘हेलवो’ असें दिलें आहे. त्याचा अर्थ सायणानें ‘हेऽरयः’ ‘म्हणजे हें शत्रु’ असा केला आहे. काण्वशाखीय ग्रंथांत येथें निराळा पाठ आहे.येथें उल्लेखिलेले अशुद्धभाषी लोक आर्यच होते., पण ते संस्कृत भाषा न बोलतां एखादी प्राकृत भाषा बोलत असावे.
५५शबर- ऐतरेय ब्राह्मणांत एका जातीचें हें नांव दिलेलें आहे. ह्या जातीच्या लोकांना दस्यु हें नांव दिलेलें आहे व हें लोक अंध्र, पुलिंद मूतिब व पुंड्र ह्यांच्या तोडीचे आहेत असें म्हटलेलें आहे.
५६शाल्व- गोपथ ब्राह्मणांत मत्स्य लोकांबरोबर एका जातीच्या लोकांचें हें नांव आलेलें आहे.
५७श्विक्र- शतपथ ब्राह्मणांत ह्या नांवाच्या लोकांचा उल्लेख त्यांचा राजा जो ॠषभ याच्या संबंधात आला आहे.
५८सत्वन्त- ऐतरेय ब्राह्मणांत दक्षिणेकडे राहणा-या लोकांचें हें नांव आलेले आहे. शतपथ ब्राह्मणांत सत्वतांचा भरताकडून झालेला पराजय व भरतानें सत्वतांचा अश्वमेधांतील घोडा बळजबरीनें नेणें ह्या गोष्टींचा उल्लेख आलेला आहे. ह्यावरून हे सिद्ध होते कीं, ऐतरेय ब्राह्मणांतील एका ठिकाणी ‘सत्वनाम्’ ह्याचें ऐवजी ‘सत्वताम्’ अशी दुरुस्ती केली पाहिजे असें मॅकडोनेल सुचवितो. परंतु ऐतरेय ब्राह्मणांत इतर सर्वत्र ‘सत्वताम्’ असाच पाठ आहे. या सत्वत लोकांवरच भरत लोकांनीं वारंवार हल्ले केले असें दिसतें. सेंटपीटर्सबर्ग कोश, कोवेल व मॅक्समुल्लर ह्यांनीं कौषीतकी उपनिषदांत यांचा उल्लेख असल्याचें लिहिलें आहे. पण ह्या ब्राह्मणांत सत्वन्-मत्स्येषु असा पाठ नसून स-वश- मत्स्येषु असा पाठ आहे.
५९सल्व- शतपथ ब्राह्मणांत एके ठिकाणीं एका जातीच्या लोकांचें हें नांव आलेले आहे. ह्या ब्राह्मणांत श्यापर्ण सायकायनाची एक प्रौढी वर्णिली आहे ती अशीः- तो म्हणतो जर मी एक व्रत संपूर्ण केलें असतें तर आपली जात ही क्षत्रिय सरदार, ब्राह्मण व कृषिकर्मकार बनली असती. व जरी आपली जात आहे त्या स्थितींत आहे तरी ती सल्वापेक्षां श्रेष्ठ आहे. मंत्रपाठामध्यें ह्याच लोकांचा ‘साल्वी’ (प्रजाः) असा उल्लेख आलेला आहे. व ह्या लोकांनीं असें म्हटल्याचा उल्लेख आहे कीं यौगंधरी हा ज्यावेळी आम्ही आपले रथ यमुनेच्या तीरावर थांबविले त्यावेळीं आमचा राजा होता. हे साल्व किंवा शाल्व लोक ह्यांचा कुरुपंचाल लोकांशी निकट परिचय होता अशाबद्दल मागाहून झालेल्या ग्रंथांत पुरावा मिळतो. त्यांपैकी कांहींना यमुनेच्या तीरावर जय मिळाला असावा. वैदिक काळी हे लोक वायव्येकडे राहत असत ह्याबद्दल बळकट पुरावा नाहीं.
६०स्पर्षु- बौधायन श्रौतसूत्रामध्यें (२१,१३) पश्चिमेकडील लोकांचे म्हणून हें नांव आहे.