प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
नक्षत्र व कालविज्ञान.- (१) सध्याच्या महिन्यांच्या नांवांवरुन हीं नांवें पद्धतशीर रीतीनें प्रचारांत केव्हां आली तो काल ठरविण्याचा प्रयत्न कांही लोकांकडून झालेला आहे. सर वुइल्यम जोन्स याला ही कल्पना आली. बेंटलेनें श्रावण म्हणजे उदगयनारंभ काल होय अशी कल्पना करुन महिन्यांचीं नांवे ख्रिस्ती शकापूर्वी ११८१ वर्षांच्या पूर्वी प्रचारांत आलेली नसावीत असा तर्क बांधिला. पण त्याची मूळ कल्पना साधार नव्हती. वेबरचें असें मत होतें कीं अशा त-हेनें कालगणना करणें शक्य आहे पण व्हिटनेनें खात्रीलायक रीतीनें असें सिद्ध केलें आहे की, ही गोष्ट, म्हणजे महिन्यांच्या नांवावरुन त्यांचा उपयोग, केव्हां करुं लागले या कालाचा निर्णय करणें अगदीं अशक्य कोटींतील आहे. थिबोचेहि असेंच मत आहे. महिन्यांची बाराच नांवे ठरली याचें कारण ब्राह्मण ग्रंथांत व्यक्त झालेली लोकांची कसेंतरी करुन चांद्र व सौर मासांचा मेळ घालण्याची इच्छा होय. पण सत्तावीस नक्षत्रांतून पौर्णिमेच्या रात्रीशीं संबंद्ध असलेल्या बारा नक्षत्रांच्या निवडीला कालद्दष्टया बिलकुल महत्त्व नाहीं. कारण पौर्णिमा फक्त बारा नक्षत्रांतच पडत असे व इतर नक्षत्रांत येत नसे असें बिलकुल नाही. सत्तावीस नक्षत्रांपैकी प्रत्येक नक्षत्रांत पौर्णिमा कांही एका ठराविक क्रमानें पुन:पुन्हां येत असते.
(२) नक्षत्रांच्या ज्या याद्या संहिताग्रंथांतून आलेल्या आहेत त्या सर्वांचा आरंभ कृतिका नक्षत्रापासूनच झालेला आहे. तेव्हां फार तर एवढें म्हणतां येईल की कृत्तिकेलाच अग्रपूजेचा मान देण्यास कांही विशेष कारण असलें पाहिजे. पण मागाहून जी नक्षत्रांची यादी झालेली आहे तींत अश्विनी हें नक्षत्र सर्व नक्षत्रांच्या शिरोभागी आलेलें आहे. याचें कारण असें होते कीं ही यादी जेव्हां तयार झाली तेव्हां म्हणजे इ.स. च्या ६ व्या शतकांत वसंत संपात रेवती व अश्विनी यांच्याजवळ (ज्याला झीटापिशियम म्हणतात त्या ता-याजवळ) होत असे. यावरुन वेबरनें असें मत बनविलें की कृत्तिकाहि अशाच कारणाकरितां नक्षत्राच्या अग्रभागीं ठेविली गेली असली पाहिजे व ही कृत्तिकागत वसंत संपाताची वेळ ख्रिस्ती शकापूर्वी तीन हजार वर्षे ही असावी असें गणितानें ठरविलें आहे. मुख्य हरकत म्हणजे नक्षत्राशीं चंद्राचा संबंध नसून फक्त सूर्याचाच संबंध आहे अशी तेव्हांची कल्पना होती हें गृहीत धरावें लागतें ही होय. थीबो व ओल्डेनबर्ग हे दोघेहि वसंतसंपाताचा कृतिकेशी संबंध जोडण्याच्या अगदी विरुद्ध आहेत. याकोबीने असा एक मुद्दा पुढें आणला आहे की, ॠग्वेदांत (७.१०३;१०,८५) वर्षाकालाचा आरंभ व उदगयन हे नवीन वर्षाचा आरंभ व जुन्या वर्षाचा शेवट दर्शवितात व नवीन वर्षाचा आरंभ फल्गुनी नक्षत्रांत उदगयनाच्या वेळी होत असे. शिवाय तैत्तिरीय ब्राह्मण ग्रंथांतील देवनक्षत्रें व यमनक्षत्रें यांतील भेद हा सूर्य व नक्षत्रें यांचा संबंध होता या प्रकारच्या आपल्या मतास पोषक आहे असें त्याचें म्हणणें आहे. पण हें मत फारसें ग्राह्य दिसत नाही. ज्या ॠग्वेदांतील वचनांचा याकोचीनें हवाला दिला आहे त्या वचनांचा याकोबी म्हणतो त्याप्रमाणें अर्थ होत नाहीं असें मॅकडोनेल म्हणतो व त्याला कारण देतो की, तसा अर्थ होण्यास द्वादश याचा बारा भाग म्हणजे एक वर्ष असा सर्वसंमत अर्थ न घेतां बारावा महिना असा अर्थ घ्यावा लागेल. शिवाय नक्षत्रांचा संबंध सूर्याशीं लावून नक्षत्रांच्या विभागणीचा समाधानकारक उलगडा करतां येत नाही. कृत्तिका नक्षत्र अग्रभागी ठेवण्याचें कारण त्या वेळीं वसंतसंपात होता हें जरी कबूल केलें तरी व्हिटने व थीबो यांच्या मतें माघांत दक्षिणायन होतें असें विधान करणा-या वेदांगज्योतिषावरुन येणारा जो काल तोच कृत्तिका नक्षत्राला नक्षत्रमालेच्या आरंभी घालण्याचा काल असावा. कृत्तिकेंत वसंतसंपाताची कल्पना चुकीनें केलेली असावी असें त्यांचें मत आहे.
(३) माघामध्यें दक्षिणायन सुरु होतें या म्हणण्याला ब्राह्मण ग्रंथाचा आधार आहे. कारण कौषीतकि ब्राह्मणांत (१९.३) हें दक्षिणायन माघांतील अमावास्येस सुरु होतें असें स्पष्ट म्हटलें आहे (माघस्यामावास्यायां). आतां हा दक्षिणायनाचा आरंभ टीकाकार म्हणतात त्याप्रमाणें तैष्याच्या पौर्णिमेनंतर सुरु होणा-या पूर्णिमांत महिन्याच्या मध्यंतरीं असलेल्या अमावास्येला असो किंवा अमांत महिना धरुन माघांतल्या पौर्णिमेच्या अगोदरच्या अमावास्येस (हें अधिक शक्य आहे) असो हा मुद्दा फारसा महत्वाचा नाही. परंतु माघांत दक्षिणायन होतें एवढया माहितीवरुन खालीं दिलेल्या त-हेनें वरील नक्षत्रकाल ठरविणें शक्य आहे. एके काळीं रेवतीच्या शेवटच्या भागांत हा वसंत संपाताचा बिंदु होता असें मानिलें तर विषुवचलनाचें गणित करुन ज्या दक्षिणायनप्रसंगी अयनबिंदु श्रविष्ठांत असे त्या माघांतील दक्षिणायनाशी जुळणारी अशी वसंतसंपाताची स्थिति कोणत्या वेळी होत असे हें आपणांस ठरवितां येते. केवळ शास्त्रीय उपपत्तीच्या द्दष्टीनें विचार केला तर हा वसंतसंपात भरणीच्या तृतीय चरणांतच येतो. कारण हा तृतीय चरण श्रविष्ठा नक्षत्रापासून सहा नक्षत्रें व तीन चरण इतक्या अंतरावर आहे. हा तृतीय चरण व अश्विनीचा आरंभ यांतील अंतर एक नक्षत्र व तीन चरण इतकें म्हणजे २३० २० इतकें आहे (२७ नक्षत्रें म्हणजे ३६०० ).इसवी सन ४९९ हें वर्ष सुरुवातीचा काल म्हणजे रेवतींत वसंत असल्याचा काल धरुन (हाच वराहमिहिराचा निश्चित काल होय) जोन्स यानें माघांतल्या दक्षिणायनाशीं जुळता असलेला वसंतसंपात इसवी सनापूर्वी ११८१साली येतो असें ठरविलें (हें अर्थात् एका अयनांशाबरोबर ७२ वर्षे असें प्रमाण धरुन ठरविलें). प्रॅट यानें अयनांशाचें हेंच प्रमाण धरुन व ज्योतिषविषयक सिध्दांतांत निश्चित केलेली मघा नक्षत्रांतील योगता-याची स्थिति आधारभूत धरुन ठरविलेला काल वरीलप्रमाणेच आहे. डेविस व कोलब्रूक यांनीं चित्रांतील योगतारा (या ता-याची स्थिति निश्चित नसून निरनिराळया ग्रंथांत तीन अंशांपर्यंतचा फरक आहे) आधारभूत धरुन गणित केलें व या गणितानें इसवी सनापूर्वी १३९१ हा काल आला. परंतु ख्रिस्तपूर्व बारावें शतक हें वेदांगज्योतिषग्रंथांमधील वेधाचा काल म्हणून जरी ब-याच जणांनां मान्य झाले आहे तरी या गणिताला किती महत्व द्यावें याबद्दल शंकाच आहे. व्हिटनेनें हें दाखविलें आहे की पूर्वीच्या नक्षत्रांची स्थानें व मागाहून ठरविलेल्या प्रत्येकी १३० ⅓ प्रदेश व्यापणा-या नक्षत्रांची स्थानें आकाशांत एकच आहेत असें म्हणतां येणार नाही. पूर्वी नक्षत्रांची निवड झाली ती आकाशाचे सारखे विभाग करण्यासाठी नसून चंद्राशीं ज्यांचा संयोग होतो तेच नक्षत्रसमूह निवडले गेले. आणि मागाहून या नक्षत्रांचे सारखे विभाग करण्याचा जो प्रयत्न झाला त्याचा असा परिणाम झाला कीं मागाहूनच्या नक्षत्रसमूहांत मुख्य धरलेले तारे त्यांच्या पूर्वीच्या नक्षत्रांतून अजीबात काढले गेले. शिवाय असेंहि म्हणतां येत नाही की उत्तरकालीन व्यवस्थेंत रवतीनक्षत्राच्या पूर्वमर्यादेवर असणारा तारा पूर्वीच्या व्यवस्थेतहि तेथेंच होता. कदाचित् त्या नक्षत्रपुंजांत पूर्वी तो तारा मुळींच नसेल. कारण जुन्या रेवतीशीं जुळणा-या चिनी व अरबी नक्षत्रपुंजांपासून तो फारच दूर आहे. तसेंच सुरुवातीचा काल अनिश्चित म्हणजे इसवी सन ४९९, इ.स. ५८२, इ.स. ५६० किंवा इ.स. ४९१ या चार प्रकारचा मानला जातो. शिवाय ही गोष्टहि लक्षांत ठेवली पाहिजे की संपातबिंदूची जागा केवळ निरीक्षणानें ठरवितां येण्यासारखी नाही व वैदिक कालच्या हिंदू ज्योतिष्यांचें निरीक्षण फारसें बरोबर होतें असेंहि म्हणतां येत नाहीं. कारण वर्षाचे दिवसहि त्यांनी बिनचूक ठरविलेले नसून वेदांगज्योतिषांत सुद्धां हे दिवस मोघम ३६० धरले आहेत, व सूर्यसिध्दांतकर्त्याला सुद्धां संपातचलनाची माहिती होती असें दिसत नाही. या सर्व कारणांनी अजमासें एक हजार वर्षांची चूक होण्याचा संभव आहे. ती चूक लक्षांत घेतां कौषीतकिब्राह्मणांत दिलेल्या माहितीवरुन एवढेंच अनुमान निघतें कीं त्यांत ग्रथित केलेलें निरीक्षण इ.स. च्या पूर्वी कांही शतकें असावें. हे अनुमान ब्राह्मणग्रंथांच्या संभाव्य कालाशी (इ.स. पूर्वी ८००-६००) जुळतें.
(४) दुसरें एक कालगणनाविषयक अनुमान आहे. फाल्गुन हा महिना वर्षारंभीं गणला जाई असें 'फाल्गुनाची पौर्णिमा हें वर्षाचें मुख आहे' असें जें अनेक स्थलीं वर्णन आहे त्यावरुन ह्मणतां येतें. याकोबीचें वरील गोष्टीवरुन असें मत आहे कीं त्या काली वर्षाची गणना दक्षिणायनापासून होत असावी. फाल्गुनांत दक्षिणायन ही स्थिति सुमारें चार हजार वर्षापूर्वी येऊं शकते. ओल्डेनबर्ग व थीबो यांचे असें मत आहे की वर्षारंभ फाल्गुन महिन्यापासून व्हावा असें ठरण्याचें कारण फाल्गुन महिना वसंत ॠतूचा आरंभीचा महिना होता हें होय. फाल्गुन व वसंत ॠतूचा आरंभ हे एकत्र असतात याबद्दल स्पष्ट पुरावा मिळतो ही गोष्ट वरील मताला पोषक आहे. आपणांला कौषीत कब्राह्मणांत ही गोष्ट दिसून आली आहे कीं माघांतील अमावास्या दक्षिणायनांत पडत होती. यावरुन फाल्गुनी पौर्णिमा दक्षिणायनानंतर दीड महिन्यानें किंवा फेब्रुआरी महिन्याच्या पहिल्या आठवडयांत पडते. म्हणजे पूर्वी माघदक्षिणायनाचा ठरविलेला जो काल तोच फाल्गुनवर्षारंभाचा काल असें दिसतें. हा काल शकापूर्वी सुमारें ८०० वर्षे होय हें वर सांगितलेंच आहे. रोमन पंचांगाच्या 'व्हेरिस इनिशियमच्या' फेब्रुआरी ७ तारखेशीं हा काल जुळतो वर्षाचे चार चार महिन्यांचे तीन भाग स्वाभाविकपणे पडतात व या स्वाभाविक विभागणीशीं वरील कल्पना जुळते. कारण वर्षाॠतु जून सात किंवा दहा तारखेस सुरु होऊन अक्टोबर सात किंवा दहा तारखेपर्यंत संपतो. म्हणजे चार महिने वर्षाॠतु असतो व पावसाळयाच्या आरंभापासून त्रिविभागात्मक वर्षाच्या दुस-या विभागाला आरंभ होतो ही गोष्ट नि:संशय आहे. उलटपक्षी लोकमान्य टिळक असें म्हणतात कीं तैत्तिरीय संहिताकाली (ख्रि.श.पूर्वी २३५०) दक्षिणायन माघी पौर्णिमेला होई व पूर्वीच्या काली (ख्रि.श पूर्वी ४०००-२५०० व ख्रि.श.पूर्वी ६००० ४००० वर्षांच्या कालांत) तें (अनुक्रमें) फाल्गुनी व चैत्री पौर्णिमेस होत असे.
(५) तैत्तिरीय संहिता व पंवविंश ब्राह्मण यांमध्यें फाल्गुन महिन्यांतील पौर्णिमा हा वर्षारंभाचा काल होय असें ज्या ठिकाणी म्हटलें आहे तेथेंच चैत्रांतील पौर्णिमेलाहि विकल्पानें वर्षारंभ धरतात असें म्हटलें आहे. हा चैत्र महिना निवडण्याचें हेंहि कारण असेल की वर्षारंभाचा दिवस वसंतॠतूंत असावा. याकोबी म्हणतो कीं ज्या वेळी दक्षिणायन चैत्रांत सुरु होत असे त्या वेळचा हा अवशेष आहे; परंतु हें याकोबांचे म्हणणें बरोबर दिसत नाही. दुसरा एक विकल्प एकाष्टका हा होय. या एकाष्टकेचा अर्थ टीकाकारांच्या मतानें माघांतील पौर्णिमेनंतरची अष्टमी होय. हा काल जुन्या वर्षांच्या चन्द्रक्षय होत जाणा-या मासाधीचा शेवटला चतुर्थभाग असल्यामुळें वर्षाचा अंतसूचक मानला गेला असावा. चवथा विकल्प म्हणजे पौर्णिमेच्या चार दिवस अगोदरचा दिवस होय. ही पौर्णिमा म्हणजे आपस्तंब सूत्रांत उल्लेखिलेल्या आलेखनाच्या मताप्रमाणे चैत्री पौर्णिमा होय आश्मरथ्य, लौगाक्षि, मीमांसक व लोक. टिळक म्हणतात त्याप्रमाणें माघां पौर्णिमा नव्हे.
(६) दुसरे कांही लोक गृह्यसूत्रांनां अनुसरुन असें म्हणतात की वर्षारंभ मार्गशीर्ष महिन्यांत होत असे व ही गोष्ट मार्गशीर्षालाच आग्रहायण (वर्षाच्या आरंभासंबंधीचें) असें म्हणत असत यावरुन सिद्ध होतें. याकोबी व टिळक म्हणतात की यावरुन फल्गुनीमधल्या दक्षिणायनाशीं जुळणारा मृगशीर्षातल्या शरत्संपाताचा बोध होतो; पण थीबोनें असें सिद्ध केलें आहे की ज्याप्रमाणें फाल्गुनाच्या ऐवजी चैत्र महिन्यांत वसंत ॠतूचा प्रारंभ कांहीनीं कल्पिला त्याप्रमाणें वर्षारंभापासून वर्षारंभ कल्पून या आरंभाचा महिना मार्गशीर्ष धरला गेला.
(७) याकोबीनें बुह्लरच्या मदतीनें वेदांच्या अभ्यासाकरितां गृह्यसूत्रांत जे काल दिले आहेत त्यावरुन एक मुद्दा काढला आहे. वेदांचा अभ्यास उत्तरायणाच्या वेळीं असणा-या पावसाळयांत होत असे हें गृहीत धरुन याकोबी असा सिध्दांत करतो की कांही संहिताग्रंथांत भाद्रपद महिना हा वेदाभ्यासास सुरुवात करण्यास योग्य आहे असें जें म्हटलें आहे त्याचें कारण एके काली प्रोष्ठपदा (भाद्रपदांचें अगोदरचें नांव) उत्तरायणांत येत असत हें होय. ज्या वेळी दक्षिणायन हें फाल्गुनांत सुरु होत असे त्या वेळी प्रोष्टपदांत उत्तरायण येई. पण व्हिटनेनें हें सिद्ध केलें आहे की हें अनुमान सर्वस्वी चुकीचें आहे. विद्या शिकणें व पावसाळा यांचा आवश्यक असा कांही संबंध आहे असें आपणांस म्हणतां येणार नाही. हा संबंध कल्पावयाचा तर श्रावण महिन्याचा संबंध श्रवण म्हणजे कान याच्याशी आहे म्हणून तो अभ्यासासाठी पसंत केला जाणें योग्य होईल. अयनगति लक्षांत घेतां भाद्रपद महिनाच अभ्यासाला आरंभक म्हणून ठरविण्याचें कारण भाद्रपद महिना व पावसाळा एकाच वेळी येणें ही स्थिति खरोखर नाहींशी झाल्यावर पूर्वी एके काली ही स्थिति होती म्हणून ती परंपरा राखण्यासाठी भाद्रपद महिनाच अभ्यासासाठीं ठेवणें ही समजूत होय असें दिसतें.