प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
नक्षत्रांचें मूळ.- हिंदुस्थानांतील लोकांनां नक्षत्रांचें ज्ञान कसें झालें याबद्दल प्रत्यक्ष पुरावा उपलब्ध नाही हें आपण पाहिलेंच आहे. ॠग्वेदाच्या पूर्व भागांत ही नक्षत्रें तारे म्हणून आलेलीं आहेत. ॠग्वेदसंहितेच्या मागाहून झालेल्या भागांत यांपैकी तिहीचींच नांवें आलीं आहेत. यजुर्वेद व अथर्ववेद यांमध्यें मात्र संपूर्ण नक्षत्रांची नांवें आली आहेत. वैदिक कालच्या आर्य लोकांनां ज्योतिषविषयक इतर गोष्टीची माहिती फार थोडी होती. यामुळें चंद्रगृहभूत सत्तावीस नक्षत्रांचा शोध या वैदिक ॠषीनां लागला असल्यास ती गोष्ट पाश्चात्त्यांस थोडीशी आश्चर्य करण्यासारखी वाटतें. परंतु ही नक्षत्रें ठरविणें फार सोपें आहे ज्या ता-यांची किंवा तारकसमूहाची चंद्राशी युति होते तो तारा किंवा तारकसमूह निवडून काढला म्हणजे झालें अशी स्थिति असल्यानें स्वत:च्या बुद्धीनें वैदिक ॠषीनी नक्षत्रे शोधून काढणें अशक्य आहे असें म्हणणें पुराव्याच्या अभावीं अयोग्य होईल पण अरबस्थान व चीन यांमध्यें अठ्ठावीस नक्षत्रांची अथवा नक्षत्रपुंजांची 'मनाझिल् अॅप्ड सिउ' या नांवाची नक्षत्रचक्रे होतीं ही गोष्ट मनांत आणली म्हणजे हा नक्षत्रज्ञानाचा प्रश्न भानगडीचा होऊन बसतो. 'मनाझिल्' चा उपयोग अरबी भाषेंत सुसंगतपणें केला जातो. या नक्षत्रांवरुन अरबी लोकांचे पंचांग तयार केलें जातें व या नक्षत्रांचीं ठिकाणें त्या लोकांनीं जी निश्चित केली आहेत तीं चंद्र राशिचक्रांतील नक्षत्रांची स्थानें जशीं असावीत तशीं आहेत. तेव्हां हिंदुस्थानांतील आर्य लोकांनी अरबी लोकांपासून हें नक्षत्रज्ञान घेतलें अशी कल्पना करतां येईल. पण ही कल्पना बरोबर होणार नाहीं. कारण, 'मनाझिल्' च्या अस्तित्वाचा पुरावा नक्षत्रांच्या अस्तित्वाच्या पुराव्याहून बराच मागाहूनचा आहे. जुन्या करारांतील 'मझॅराथ' किंवा मॅझॅलाथ हें कदाचित् चांद्र नक्षत्रचक्र असूं शकेल हें येथें लक्षांत ठेवलें पाहिजे. जर्गेस म्हणतो की अरबी नक्षत्रज्ञान हिंदुस्थानांतील लोकांपासूनच अरबी लोकांनी घेतलें. पण ही गोष्ट मुळींच शक्य नाही. बिओ नांवाचा एक चिनी पंडित होऊन गेला. त्यानें १८३९ सालापासून १८६१ पर्यंत कांही लेख लिहून त्यांत असें सिद्ध केलें आहे कीं आर्यलोकांनी नक्षत्रें चिनी लोकांच्या 'सिउ' वरुन घेतली. ही चिनी नक्षत्रें बिओच्या मतानें मूळची चांद्रनक्षत्रेच नव्हती. त्याचें असें मत होतें कीं, ही नक्षत्रें म्हणजे विषुववृत्तावरील तारे होत; व अर्वाचीन ज्योतिषांतल्याप्रमाणें हे तारे यांच्या भोंवतींच्या ता-यांची तुलना करण्याचें साधन म्हणून असत. अशा प्रकारचे चोवीस तारे इ.स. पूर्वी २३५७ च्या सुमारास विषुववृत्ता जवळ असल्यामुळें व या चोवीस ता-यांचे विषुवांश व ज्या ता-यांनीं चिनी ज्योतिष्याचें लक्ष वेधून घेतले त्या कांही सदोदित दिसणा-या ध्रुवाभोवतीच्या नक्षत्रांचें विषुवांश सारखेच होते म्हणून निवडले गेले. पुढें इ.स.पूर्वी ११०० साली त्या कालचे विषुवदिन व अयनदिन ओळखण्यासाठीं चार नवीन ता-यांची भरती करण्यांत आली. त्याचें असें मत होतें की ही ता-यांची यादी कृत्तिका (मा ओ) नक्षत्रापासून सुरु झाली. कारण हेंच नक्षत्र ख्रिस्ती शकापूर्वी २३५७ सालीं मेषविषुवाच्या वेळीं होतें. वेबरनें एका विस्तृत निबंधांत या मुद्दयावर टीका करुन असें प्रतिपादन करण्याचा प्रयत्न केला आहे की, 'सिउ' बद्दलचा चिनी वाङमयाचा पुरावा अलीकडचा आहे. तो ख्रिस्तपूर्व तिस-या शतकाच्या पूर्वीचाहि नाही. हें वेबरचें शेवटचें म्हणणें कदाचित् बरोबर नसेल, पण बिओच्या प्रमेयाविरुद्ध जे मुद्दे आहेत तेच मुद्दे व्हिटनेनें पुन्हां जोरानें मांडले असून तो असें म्हणतो कीं, 'सिओ' हे मुळांत चांद्र नक्षत्रांपासून निघाले नाहींत असें जें बिओ म्हणतो तें निराधार होय. हें म्हणणें हिंदी ज्योतिषज्ञान चिनी लोकांकडून आलें हें मत जोरानें प्रतिपादन करणा-या 'लिओपोल्ड डी सौसुरे' ला सुद्धां मान्य आहे. पण त्याचें 'हिंदी ज्योतिषांतील चांद्र नक्षत्रें चिनांतून आली' हें मत व त्यासंबंधाचें मुद्दे ओल्डेनबर्गनें खोडून काढले आहेत. त्यानें असें सिद्ध केलें आहे कीं, नक्षत्रमालेचा आरंभ 'मा ओ' म्हणजे कृत्तिका नक्षत्रापासून नाहीं. आतां शेवटी एकच मुद्दा राहिला तो हा की या तिहींचा म्हणजे नक्षत्रें, मनाझिल् व सिउ यांचा उगम बाबिलोनियामध्यें असेल. होमेलनें अलीकडील शोधावरुन असें सिद्ध केलें आहे कीं, कृत्तिकादि चोवीस नक्षत्रांचें चांद्रनक्षत्रचक्र बाबिलोनियामध्यें मानीत होते. पण थीबोनें जे शोध केले आहेत त्यांवरुन त्याचें असें मत झालें आहे की, हा होमेलचा शोध चुकीचा आहे. उलटपक्षीं वेबर, व्हिटनें, झिमर व ओल्डेनबर्ग या सर्वांचें असें मत आहे कीं, बाबिलोनियांत चांद्र नक्षत्रचक्राचा उगम आहे. हेंच मत तूर्त ग्राह्य धरलें पाहिजे. कारण बाबिलोनियन संस्कृतीची छाप वैदिक वाङ्मयांत सर्वत्र दिसून येते. उदाहरणार्थ. महापुराची कथा बाबिलोनियन कथेवरुन घेतली आहे, व 'वेदांतील' आदित्य व 'मना' हे शब्द देखील त्या वाङ्मयावरुनच घेतले असावेत असें मानण्यास आधार आहे.
५विधु.- वैदिक कालानंतरच्या ग्रंथांतल्या वाङ्मयाप्रमाणें ॠग्वेदांत (१०.५५,५) एका ठिकाणी याचा चंद्र असा अर्थ आला आहे. व त्या ठिकाणीं अनेकांमध्ये एकटा हिंडणारा असें त्याला म्हटलें आहे.
६वेन.- ॠग्वेदामध्यें (१०.१२३) लो. टिळकांच्या मतें याचा अर्थ शुक्रग्रह असा असावा. पण हा अर्थ मॅकडोनेलच्या मतें चुकीचा आहे. शंकर बाळकृष्ण दीक्षित यांनीं टिळकांचें मत आपलें मत न देतां उद्धृत केलें आहे (ज्योतिर्विलास).
७सूर्य.- वैदिक कथांमध्यें व धर्मामध्यें सूर्याचें बरेंच महत्त्व वर्णिले आहे. हें महत्त्व हिंदुस्थानांतील निसर्गस्थितीत सूर्याचे जे महत्त्व आहे त्याला अनुरुप असेंच आहे. ॠग्वेदामध्यें सूर्यांचें वर्णन तो परोपकारी आहे असें आलेलें आहे, व हिमालयाच्या थंड भागातूंन जे आर्यलोक आले त्यांनां सूर्य असा वाटणें ह्यांत अस्वाभाविक असें कांहीच नाहीं. त्यांच्या उष्णतेबद्दल ॠग्वेदांतील कांही सूक्तांत त्याचप्रमाणें अथर्ववेद व ब्राह्मण ग्रंथांत वारंवार उल्लेख आलेले आहेत. ॠग्वेदांतील एका कथेंत इंद्रानें सूर्याचा पूर्ण पराजय करुन त्याचें चक्र हरण केलें असें वर्णन आलेलें आहे. विजेच्या पावसानें सूर्याला जो प्रतिबंध होतो त्याला उद्देशून हें वर्णन असावें. ऐतरेय ब्राह्मणांत एक साधीभोळी कल्पना आलेली आहे. ती अशीं कीं, सूर्याच्या एकाच बाजूला प्रकाश आहे व तो जातो त्याच रस्त्यानें पश्चिमेकडून पूर्वेकडे परत येतो, पण असें करतांना तो आपली दुसरी बाजू पृथ्वीकडे करतो व त्यामुळें आकाशांतल्या ता-यांनां रात्रीं तेज:पुंज करितो. ॠग्वेदामध्यें सूर्य खालीं पडत नाहीं म्हणून आश्चर्य प्रकट केलें आहे. ॠग्वेदामध्यें ग्रहणाबद्दल अनेक उल्लेख आलेले आहेत. एका ठिकाणी असें म्हटलें आहे कीं, स्वर्भानुराक्षस हा सूर्याला अंधकारानें ग्रासून टाकतो व अत्रि सूर्याचा प्रकाश परत त्याला आणून देतो. दुस-या एका ठिकाणीं हेंच अद्भुत अत्रीच्या कुटुंबांतल्या मंडळींनी केलें असें म्हटलें आहे. अथर्ववेदामध्यें राहूचा सूर्याशी असलेल्या संबंधाचा प्रथमच उल्लेख आलेला आहे. इंद्रानें सूर्याचा पराजय केला अशी जी कथा आहे तिचा उलगडा ग्रहणाच्या गोष्टींनें करतां येईल. दुस-या दोन ठिकाणींहि असा उलगडा होणें शक्य आहे. लुडविगनें असें प्रतिपादिलें आहे कीं, ॠग्वेदाच्या वेळी सूर्याचें चंद्राकडून जें पिधान होतें त्यामुळें ग्रहण होतें ही गोष्ट ठाऊक होती. त्याचप्रमाणें सूर्य पृथ्वीभोंवती फिरतो ही गोष्टहि त्यांत नमूद केलेली आहे. इतकेंच नव्हे तर, तो असेंहिं प्रतिपादन करतो कीं, ख्रिस्तीशकापूर्वी १०२९ साली जें ग्रहण झालें त्याचाच उल्लेख ॠग्वेदामध्यें आलेला आहे. ही सर्व मतें व्हिटनेनें खोडून काढलेलीं आहेत. सूर्य हा कालकर्ता असून त्याच्या गतीनें ३६० दिवसांचे वर्ष ठरतें. वैदिक वाङ्मयांत हेंच सौरवर्ष (संवत्सर) व्यवहारांत प्रमाण गणलें आहे. या सौरवर्षाचे दोन भाग कल्पिले आहेत. एक उत्तरायण व दुसरें दक्षिणायन. ज्या वेळीं सूर्य उत्तरेकडे जावयास निघतो तें उत्तरायण व तो उत्तरायणांतून दक्षिणेकडे जावयास निघतो तें दक्षिणायन असें मानीत असत याबद्दल शंका नाहीं. कारण तसा उल्लेख स्पष्ट भाषेंत कौषीतकि ब्राह्मणांत आलेला आहे.
८ॠक्षीका.- हा शब्द अथर्ववेदांतील अप्रसिद्ध अशा एका स्थलीं आलेला आहे. त्याचा अर्थ मुळींच लागत नाहीं. वेबर म्हणतो कीं, त्याचा अर्थ 'आकाशगंगा' असा असावा. परंतु या त्याच्या मताला कांहीच आधार नाहीं. व्हिटनेला तर याचा अर्थ लागण्याची मुळींच आशा वाटत नाही.
९काल-काञ्ज्.- अथर्ववेदांत (६.८०,२) कालकाञ्ज् हे आकांशांत असतात असें लिहिलें आहे. रॉथ आणि झिमर हे दोघेहि म्हणतात कीं 'कोणतातरी तारकापुंज' असा याचा अर्थ असावा. परंतु इंद्राच्या पराक्रमांपैकी कालकाञ्ज् यांचा पराभव हा एक आहे. म्हणून अथर्ववेदांतील ॠचेच्या वरील भाषांतरावर कोठपर्यंत भरंवसा ठेवावा हें कळत नाहीं. व्हिटने म्हणतो कीं मृगशीर्षाचे तीन तारे व ब्लूमफील्ड म्हणतो कीं आकाशगंगा किंवा तारका असा याचा अर्थ आहे.
१०चंद्र, चंद्र-मस्.- चंद्र (निशापति) या अर्र्थी चंद्रमस् हें नांव ॠग्वेदांत व इतरत्र आढळतें. चंद्र हें नांव मात्र अथर्व वेदांत प्रथम आलें आहे. ही दोन्ही चंद्राची नांवें आहेत. दुसरें ॠग्वेदांत व इतरत्र उपयोगांत आलें आहे, परंतु पहिलें पहिल्यानें या अर्थी अथर्ववेदानें उपयोगांत आणिलें आहे. वैदिक वाङ्मयांत, चंद्र सोमासारखा वाढत जातो व कमी होत जातो असाच फक्त उल्लेख आहे. चंद्रामध्यें सारखा फरक होत असतो, सूर्य व चंद्र हे आळीपाळीनें काम करितात, आणि सोम या नात्यानें चंद्राचें सूर्याशीं लग्न झालें आहे असें ॠग्वेदांत वर्णन आहे. तो अमावास्येला मुळींच दिसत नाहीं आणि त्याचा जन्म सूर्यप्रकाशामुळें आहे. अथर्ववेदांत राक्षस चंद्राला ग्रहण लावतात असें वर्णन आहे (ग्रहाश्चांद्रमासा:). चंद्रकलाविशिष्ट महिना हें कालाचें माप आहे.
११दिव्यशुन-दिव्यश्वा.- अथर्ववेदामध्यें एके ठिकाणीं हा शब्द आलेला आहे. त्याचा मूळचा अर्थ 'स्वर्गीय कुत्रा' असा असून या शब्दामुळें लुब्धक नांवाच्या ता-याचा बोध होतो. पण ब्लूमफील्डचें असें मत आहे कीं, मैत्रायणी संहिता व तैत्तिरीय ब्राह्मण यांमध्यें ज्या दोन स्वर्गीय कुत्र्यांचा उल्लेख आलेला आहे ते कुत्रे म्हणजे सूर्य व चंद्र हे होत. व अथर्ववेदामध्यें दिव्यश्वा म्हणजे सूर्य हा अर्थ असावा.
१२धूमकेतु.- अथर्ववेदामध्यें हें (धूर हें ज्याचें निशाण आहे) मृत्यूचें विशेषण म्हणून आलेलें आहे. झिमरच्या मतें हा धूमकेतूच असावा, पण व्हिटनें म्हणतो की हें बरेंच असंभवनीय आहे. लॅनमनचें म्हणणें कीं, या शब्दाचा चितेवरील अग्नीचा धूर असा अर्थ होतो. हा अर्थ बराच शक्य आहे.
*शकधूम.-अथर्ववेदाच्या एका सूक्तांत हा शब्द आलेला आहे. नक्षत्राचा राजा म्हणून ह्याची त्या ठिकाणी स्तुति आलेली आहे. त्या शब्दाचा अर्थ जळणा-या शेणीचा धूर किंवा गोवरीचा वर जाणारा धूर असा असावा. वेबर म्हणतो त्याप्रमाणें एखादे वेळीं हवा कशी असे याचा त्यावरुन बोध होत असे. ब्लूमफील्डचें असें मत आहे कीं, ह्या शब्दाचा अर्थ धुरावरुन हवेचें ज्योतिष वर्तविणारा असा करावा. पण ह्या अर्थाला व्हिटनेची हरकत आहे, व त्याला कारणहि आहे. रॉथ म्हणतो त्याप्रमाणें हा शब्द एखादा नक्षत्रगण, किंवा कदाचित् आकाशगंगा असा असणें अगदींच असंभवनीय नाहीं.
१३सप्तसूर्या:- यांचा उल्लेख अथर्व आणि काठक संहितेमध्यें आलेला असून तैत्तिरीय संहितेमध्यें यांचीं नांवे आरोगभ्राज पटर, पतंग, स्वर्णर, ज्योतिष्मत् व विभास अशीं आहेत. पण ही नांवें उत्तरकालीन वाङ्मयांत सुद्धां फार विरळा आलेलीं आहेत. एके काळीं वेबरचें मत असें होतें कीं, या शब्दसमुच्चयानें सात ग्रहांचा बोध होत असावा. पण मागाहून ही कल्पना त्यानें सोडून दिली. कदाचित् ॠग्वेदांत (१.१०५,९) सात किरण असा उल्लेख आला आहे तोच या शब्दाच्या अर्थ असावा.
१४अर्यम्ण:पन्था.- 'अर्यमन्चा मार्ग' हा शब्द तैत्तिरीय व इतर ब्राह्मणांत आलेला आहे. वेबरच्या मताप्रमाणें त्याचा अर्थ 'आकाशगंगा' आणि हिलेब्रान्टप्रमाणें 'क्रांतिवृत्त' असा आहे.
१५इषुत्रिकाण्डा (तारकापुंज).- बहुतकरुन ऐतरेय ब्राह्मणाप्रमाणें मृगपुंज याचा हा द्योतक असावा. याचा उल्लेख मृग, मृगव्याध आणि रोहिणी यांच्या बरोबर केलेला आहे.
१६केतु.-मागाहूनच्या अद्भुत ब्राह्मणांत 'तुटणारा तारा' अथवा 'धूमकेतु' असा अर्थ आहे असें वेबर म्हणतो.
१७ग्रह.- (धरणें, पकडणें). हा शब्द शतपथ ब्राह्मणांत सूर्याला योजिला आहे; परंतु तेथें हा शब्द मागाहूनचा अर्थ जो ग्रह त्या अर्थी योजिला नसून जादूसारखा परिणाम करणारी शाक्त अशा अर्थी योजिला असावा. मैत्रायणी उपनिषदासारख्या उत्तरकालीन वाङमयांत हा शब्द ग्रह या अर्थी प्रथम योजिलेला सांपडतो. वैदिक आर्य लोकांनां ग्रहपरिचय होता किंवा नाही हें समजत नाहीं. ओल्डेनबर्ग म्हणतो कीं सात आदित्य हेच त्या वेळचें ग्रह होते; हे सात आदित्य म्हणजे सूर्य, चंद्र आणि पांच ग्रह होत. परंतु हें मत जरी अगदींच असंभवनीय नाहीं, तरी पण याला पुरावा मिळत नाहीं; हिलेब्रँट, पिशेल, व्हॉन श्रोडर, मॅकडोनेल आणि ब्लूमफील्ड आणि दुसरे कित्येकजण हें मत मुळीच ग्राह्य मानीत नाहींत. हिलेब्रँट म्हणतो की ॠग्वेदांत जे पांच अध्वर्यू सांगितले आहेत तेच ग्रह होत; परंतु हा फक्त तर्कच आहे. ॠग्वेदांत जे पांच बैल (उक्षाण:) तेच ग्रह असावेत असें मानलें आहे; परंतु हेंहि वरच्याइतकेंच संशयास्पद आहे. निरुक्तावरील टीकेंत दुर्ग म्हणतो कीं, भूमिज याचा अर्थ मंगळ हा ग्रह होय. वेदांत ग्रहांचा उल्लेख असल्याबद्दल संशय असणारा थीबो म्हणतो कीं त्यांत उल्लेखिलेला बृहस्पति म्हणजेच गुरु हा ग्रह होय. तैत्तिरीय संहितेंत बृहस्पतीला तिष्याचा कारभारी मानिला आहे. तथापि वरील मत (म्हणजे 'बृहस्पति हाच गुरुग्रह असावा' हें मत) चुकीचें दिसतें. तैत्तिरीय आरण्यकांत जे सप्तसूर्य आले आहेत त्यांत कदाचित् ग्रहांचा उल्लेख अभिप्रेत असेल. ॠग्वेदांत ज्योतिस् (१०.५५,३) आणि अश्वमेघांतील घोडयाच्या बरगडया (१.१६२,१८) यांच्या संबंधानें जी ३४ संख्या योजिली आह तिच्या द्वारा ॠग्वेदांतील २७ नक्षत्रें आणि सूर्य, चंद्र व पांच ग्रह ही ३४ मंडळी दाखविण्याचा हेतु असावा असें लुडविग म्हणतो. परंतु हा अर्थ करण्यांत मूळाची फार ओढाताण होते.
१८देवनक्षत्र.- 'देवांचे नक्षत्रपुंज हें नांव तैत्तिरीय ब्राह्मणांत पहिल्या चौदा नक्षत्रांस दिलेलें आहे. ही सर्व दक्षिणेस आहेत. व बाकीच्यांस यमनक्षत्रें असें नांव आहे व ती उत्तरेस आहेत.
१९ध्रुव.-सूत्रांमध्यें ध्रुव शब्द ता-याबद्दल आला असून विवाहसंस्कारांत अढळत्वाची खूण म्हणून वधूला हा तारा दाखवितात असा उल्लेख आहे. त्याच्या मागून झालेल्या मैत्रायणी उपनिषदांत, ध्रुवाच्या गती (ध्रुवस्य प्रचलनम्) संबंधानें उल्लेख आहे. पण याचा अभिप्राय ध्रुवता-याची प्रत्यक्ष अवलोकन केलेली गति असा घेतां येत नाहीं, तर कॉवेल म्हणतो त्याप्रमाणें, जगाच्या नाशासारखी एखादी अद्भुत गोष्ट दर्शविण्याचा तेथें अभिप्राय असावा. ध्रुवाच्या गतीवरुन याकोबीनें काल ठरविण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण काय तर ज्या ता-याला अचल असा ध्रुव तारा म्हणतां आलें असतें तसा तारा ख्रि. श. पूर्वी तीन हजार वर्षांच्या सुमारास होता. पण अशा त-हेनें ता-याच्या नांवावरुन कालनिर्णय करण्याची रीति अशास्त्रीय व निरुपयोगी आहे.
२०मृग.- सायणाच्या टीकेप्रमाणें याचा ' मृगशिरस् नांवाचा नक्षत्रसमूह' असा अर्थ ऐतरेय ब्राह्मणांत निघतो. परंतु वरील ठिकाणीं 'मृग' शब्दांत सर्व मृगपुंजाचा अन्तर्भाव होतो. म्हणजे या शब्दानें निवळ मृगपुंजाचें शिरच दाखविलें जातें असें नव्हे, तर त्याच्या खांद्यावरच्या 'आल्फा' (α) या ता-याचा आणि डाव्या खांद्यावरच्या 'गॅमा' (γ) या ता-याचाहि मृगांत समावेश होतो असें वाटतें. हा दुसरा अर्थ अधिक संभवनीय आहे. टिळकांच्या मतें मृग अथवा मृगशिरस् हा एक निराळाच समूह आहे व त्याच्यांत, त्याच्या मृगपुंजाच्या पटयाचा आणि गुडघ्यांतील दोन तारे व डाव्या खांद्यावरील एक तारा यांचा अंतर्भाव होतो. मृग अथवा मृगशिरस्, मधून बाण गेलेल्या हरणाच्या डोक्यासारखा आहे अशी टिळकांची कल्पना आहे.
२१सूर्यनक्षत्र.- शतपथ ब्राह्मणांत, एके ठिकाणी हा शब्द आलेला असून याचा अर्थ सायणाचार्यांच्या मतानें सूर्याप्रमाणें प्रकाश देणारें नक्षत्र असा आहे. पण सदरील शतपथ ब्राह्मणांतील वाक्याचा खरा अर्थ कण्वप्रतीवरुन असा दिसतो कीं, यज्ञ करणा-यानें नक्षत्रांची पर्वा न करतां सूर्य हेंच नक्षत्र समजून चालावें.