प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.     
               
स्थान
[स्थान नामें आणि त्यांवरील टीपा प्राचीनांच्या राजकीय परिस्थितीच्या व शासनसंस्थेच्या अभ्यासास उपयुक्त आहेत. त्या जाणण्यासाठी ग्राम, पुर इत्यादि शब्दांवरील टीपा वाचाव्यात. प्रत्येक देशावरील टीपा अर्थात् अत्यंत महत्वाच्या आहेत. त्या प्रमाणें नद्यांवरील टीपा महत्वाच्या आहेत. हा शब्दसमुच्चय वेदकालीन भूगोलविद्येचा ज्ञापक आहे.]

 अंतिकनामें  / दूरनामें / आकाश नामें / ग्रामनामें / देशविशेष / द्यावापृथिवीनामें / नदी सामाम्यनामें / नदी विशेषनामें [ॠग्वेद]

ग्राम.-ॠग्वेद व तदुत्तर वाङ्मयांत हा शब्द आला असून ह्याचा मूळ अर्थ 'खेडे', 'गांव' असा असावा. वैदिक आर्य लोक बहुतेक खेडयांतच रहात असावेत, आणि ही खेडी सर्व देशभर पसरली असून कांही लांब व कांही जवळ असून तीं मोठमोठया रस्त्यांनी जोडली होती. नेहमीं गांवांत व अरण्यांत, आणि खेडयांतील झाडांत व प्राण्यांत आणि अरण्यांतील जंगली झाडांत व जंगली प्राण्यांत (ग्राम्य व अरण्य) फरक दाखविलेला आढळतो. गांवांत गुरेढोरें, घोडे आणि दुसरे माणसाळलेले प्राणी, त्याचप्रमाणें मनुष्यें रहात. तेथें धान्यसंचयहि असे. संध्याकाळी जंगलांतून ढोरें परत गांवांत येत. साधारणपणें गांवें मोकळींच असत, पण कधीं कधीं आंतल्या बाजूला किल्ला (पुर्) बांधीत असत. गांवांत पृथक् पृथक् घरें असून प्रत्येक घराला कांही तरी आवार असावें असें वाटतें. परंतु वैदिक वाङ्मयांत ह्याबद्दल कांही सविस्तर हकीकत नाहीं. मोठमोठी गांवंहि (महाग्रामा:) असत. गांवांतील लोकांचा एकमेकाशीं कसा संबंध असे हें बिनचूक सांगणें मोठें कठिण आहे. पुष्कळ ठिकाणीं हा शब्द 'मनुष्यसंघ' अशा साधित अर्थानें आला आहे. बहुतकरुन हा अर्थ त्या शब्दांच्या 'खेडयांतील मंडळी' ह्या अर्थाच्या उपयोगापासून निघाला असावा; कारण शतपथ ब्राह्मणांत शर्यात मानव हा आपल्या गांवासह (ग्रामेण) हिंडत असे असें म्हटलें आहे. झिमर म्हणतो कीं ॠग्वेदांत भरताचे लोक (जन) यांनां एका ठिकाणीं गाई शोधणारे लोक (गव्यन् ग्राम:) असें म्हटलें आहे, त्यावरुन वरील विवक्षित अर्थ निघत नाहीं. त्याच्या मतें ग्राम शब्दाचा कुटुंब आणि राष्ट्र जात (विश्) ह्यांच्यामधील अर्थ आहे. तथापि ग्राम याचा बरोबर अर्थ करावयाचा म्हणजे हल्लीं पुष्कळदां स्थिति दिसते त्याप्रमाणें एकाच राष्ट्रजातीच्या पुष्कळशा कुटुंबांचा जमाव असा करतां येईल.


वैदिक वाङ्मय खेडयांतील सामाजिक अंतर्व्यवस्थेसंबंधानें कांहीच सांगत नाहीं. खेडयांतील सर्व लोक मिळून समाईक मालकीनें जमिनीची लागवड करीत असतील असें वाटत नाहीं. जो थोडासा पुरावा उपलब्ध आहे त्यावरुन प्रत्येक मनुष्य किंवा कुटुंब निराळी शेती करीत असावें. परंतु कायद्यानें नसली तरी त्या वेळीं ही शेती प्रत्यक्ष वैयक्तिक नसून कौटुंबिक असावी. 'ग्रामकाम' हा संहितांमध्यें आढळणारा शब्द राजा आपल्या प्रीतींतील लोकांनां, खेडयांतील जमाबंदीसंबंधाचे राजकीय हक्क देत असे असें दर्शवितो. नंतर सर्व जमिनींचा मालक राजा आहे ही कल्पना उदयास आली, आणि याच कल्पनेबरोबर राजा ज्या लोकांनां असे हक्क देई त्यांनां जमीनदार-जमिनीचा मालक-असें म्हणण्याची चाल पडत गेली. परंतु वैदिक वाङ्मयांत ह्या मतांनां आधार म्हणजे फक्त ग्रामकाम हा शब्द होय. आणि हा शब्द ज्याप्रमाणें टयुटानिक तुल्य शब्द दर्शवितात त्याप्रमाणें प्रत्यक्ष जमिनीच्या देणगी पेक्षां राजचिन्हांची किंवा राजकीय हक्कांचीच देणगी दिली जात असावी असें दर्शवितो. अशा देणग्यांमुळें प्रत्यक्ष शेताची लागवड करणारे लोक दुस-याचीं कुळें बनत. परंतु प्राचीन काळीं अशीं उदाहरणें फारशी दिसत नाहींत. प्राचीन काळीं गांव म्हणजे काय देशीर किंवा राजकीय बाबतींत एक मूलमान होतें असें म्हणतां येत नाहीं. गांवांत प्रत्यक्ष शेती करणा-यांशिवाय इतर कामें करणारे रथकार, तक्षन् (सुतार), कर्मार (लोहार) वगैरे दुसरे लोक असत. परंतु ते ग्रामसंघाचे घटक असत असें मात्र नाहीं. शिवाय स्वत: लागवड न करणारे परंतु राजाची देणगी म्हणून किंवा परंपरागत वतन म्हणून ह्या खेडयांत कांहीतरी हितसंबंध असणारे क्षत्रिय आणि ब्राह्मणहि असत. मात्र वरील सर्व लोक राजाच्या ताब्यांत असत, आणि त्यांनीं राजाला खंडणी म्हणून अन्न किंवा नोकरी किंवा अशासारखें कांहींतरी द्यावें लागत असे. परंतु राजानें जर राजघराण्यांतील कोणाला तरी आपले हक्क दिले असतील तर मात्र राजाला हा कर देण्याची जरुरी नसे. अथर्व वेदामध्यें गांवाच्या उत्पन्नांतील राजाच्या भागाचा उल्लेख आहे. ॠग्वेद व तदुत्तर संहिता आणि ब्राह्मणें ह्यांत गांवांतील मुख्याला किंवा नेत्याला ग्रामणी असें म्हटलें आहे. ह्या नांवाचा बरोबर अर्थ संशयास्पद आहे. झिमरप्रमाणें ग्रामणीकडे फक्त लष्करी काम असे, आणि खरोखरच त्याचा सेनानी ह्याच्याशीं कित्येक ठिकाणीं संबंध दाखविलेला आहे. शतपथ ब्राह्मणांत तो सूत ह्याच्या खालच्या दर्जाचा असून तो राजपरिवारांतील रत्नांपैकीं एक रत्न आहे ही जागा वैश्यांस अतिशय मोठेपणाची वाटत असे आणि ती ज्याला मिळेल तो अभ्युदयाच्या शिखरावर चढला असें समजत असत. राजाशीं हा जो ग्रामणीचा संबंध आहे त्यावरुन असें वाटतें कीं हा मनुष्य सर्वानुमतें निवडला जात नसून राजाच त्याची नेमणूक करीत असावा. परंतु ह्या जागेवर कधीं पिढीजाद, कधीं नेमलेला तर कधीं निवडलेला मनुष्य असावा असें वाटतें. याबद्दल खात्रीलायक पुरावा मिळत नाहीं. ह्या शब्दाच्या एकवचनी उपयोगावरुन जराशी अडचण उत्पन्न होते. बहुतकरुन राजधानींतील किंवा राजग्रामांतील ग्रामणीला मोठा मान मिळत असून त्याचें वजनहि बरेंच असावें असें वाटतें. एकंदर राज्यांत अर्थात् बरेच ग्रामणी असले पाहिजेत, परंतु त्यांपैकीं राजपरिवारांत फक्त एकच असावा.

ऐतरेय ब्राह्मणांत (३.४४) 'पूर्वेकडील ग्रामसमूह बहुजनांनीं परिपूर्ण असतात; पश्चिमेकडील अरण्यवत् असतात' असें वर्णन आहे. छांदोग्य उपनिषदांत (८.६,२) 'महापथ दोन ग्रामांनां जातात,' असा उल्लेख आहे. ब-याच संहितांमधून ग्राम्य पशू असा उल्लेख आढळतो.

अथर्ववेदांत (३.३१,३)- ग्राम्य पशू अरण्यपशूंपासून वेगळे झाले आहेत असें म्हटलें आहे. तैत्तिरीय संहिता (७.२,२,१) या ठिकाणीं सात प्रकारचे ग्राम्य पशू व सात प्रकारचे अरण्यपशू सांगितले आहेत.
तै०.सं. (५.२,५,५; ७.३,४,१) येथें 'सप्त ग्राम्या औषधय: सप्त आरण्या:' असें वर्णन आहे.

बृहदारण्यकोपनिषदांत (६.३,१३) दहा प्रकारची धान्यें गांवांत असतात म्हणून म्हटलें आहे. तांदूळ, यव, तीळ, उडीद, मसुरा, गहूं, हुलगे इ० दिलेल्या सर्व ठिकाणी ग्राम म्हणजे लोकसंघ असाच अर्थ आहे. ग्रामकाम म्हणजे गांवाचा अधिकार अशा अर्थी तै. संहितेंत व मैत्रायणी संहितेंत हा शब्द आलेला आहे. ग्रामणी याचा अर्थ गांवांतील पुढारी, किंवा अधिकारी (पाटील); पुढें श्रेष्ठ असा अर्थ आला (श. ब्रा. ३.४,१,७) सूताच्या खालचा अधिकारी याला ग्रामणी असें म्हणत असत.

नार्मिणी.-ॠग्वेदांत 'पुर्' म्हणजे किल्ला याचें हें विशेषण म्हणून आलेलें आहे. या शब्दावरुन हें एका किल्याचें विशेषनाम तरी असलें पाहिजे किंवा 'नर्मिन् अथवा नर्मिण् नांवाच्या एका राजाचा' अशा अर्थानें तरी असावें.

पुर्.-हा शब्द ॠग्वेद व तदुत्तर ग्रंथ यांमध्यें वारंवार आलेला असून त्याचा अर्थ तट, बळकट किंल्ला किंवा मायेचें ठिकाण असा आहे. हे तट, कांही प्रसंगी ब-याच मोठया आकाराचे असले पाहिजेत. कारण एका तटाला पृथ्वी व उर्वी (रुंद) अशीं विशेषणें दिलेलीं आहेत. इतर ठिकाणीं 'अश्वन्मयी' म्हणजे दगडाचा बांधलेला किल्ला असें म्हटलेलें आहे. कधीं कधीं ही मा-याचीं ठिकाणें आयसी म्हणजे लोखंडाचीं केलेली असत (ॠ,१.५८,८). पण हे शब्द लाक्षणिक दिसतात. गोमती (र्गाईनीं युक्त) किल्याचा उल्लेख अथर्व. ८.६,२३ मध्यें आलेला आहे व त्यावरुन ह्या किल्याचा उपयोग गाई ठेवण्याकडे होत असावा हें उघड दिसतें. शारदी (पावसाळयांतले) किल्ले दास लोकांच्या ताब्यांत असलेले म्हणून उल्लेख आलेला आहे. शंभर भिंती (शतभुजी) असलेल्या किल्यांचाहि उल्लेख (ॠ.१,१६६,८,७,१५,१४) आलेला आहे. युरोपमधील मधयुगांतील सरदार लोक जसे आपल्या तटबंदीच्या किल्यांत कायमचे राहत असत तसे वैदिक काळीं लोक ह्या किल्यांत राहत असत असें मानणें चुकीचें होईल. हे किल्ले म्हणजे हल्ला आला असतां बचावाच्या जागा होत, ह्या किल्यांनां टणक मातीचे तट, मेढेकोट व खंदक असत. पिशेल व गेल्डनर ह्यांचें उलट असें म्हणणें आहे कीं पूर्वी मिग्यस्थिनीझनें व पाली ग्रंथकारांनी वर्णन केल्याप्रमाणें पाटलिपुत्र शहरासारखी मेढेकोट व पुढें खंदक ह्यांनी युक्त शहरें असत. हें शक्य आहे. पण याला स्पष्ट पुरावा नाहीं. शिवाय नगर हा शब्द बराच नंतर प्रचारांत आला ही गोष्ट लक्षांत घेतली पाहिजे. वैदिक कालीं शहरांतील राहणी विशेष प्रचारांत येऊन प्रगत झाली होती असें दिसत नाहीं. महाभारतांत नगर, ग्राम, घोष हे शब्द आलेले आहेत. वैदिक वाङ्मयांत ग्राम ह्याच्या पलीकडे लोकांची फारशी मजल गेली नव्हती. ह्या ग्रामाची निरनिराळीं रुपें पुढें प्रचारांत आलीं असतील एवढेंच. संहिता व ब्राह्मण ग्रंथ ह्यांत किल्यांच्या वेढयांचा उल्लेख आलेला आहे. ॠग्वेदांत म्हटल्याप्रमाणें या हल्यांत अग्नीचा उपयोग होत असे.
४वृजन.- रॉथच्या मतानें ॠग्वेदामध्यें कित्येक ठिकाणी ह्याचा अर्थ वसाहत, खेडेगांव (जर्मन लोकांचें मार्क) व त्याचे रहिवाशी असा होतो. झिमरला हें मत ग्राह्य असून त्याच्या मतानें वृजनामध्यें सुरक्षित जागा (क्षितिध्रुवा) असा अर्थ अन्तर्भूत होतो. ही क्षितिध्रुवा म्हणजे एखादें ग्रामवासी अगर युध्दाकरितां एकीकृत झालेले कुल ज्या जागेंत सुरक्षिततेकरितां रहात असे ती जागा होय. गेल्डनर उलटपक्षीं वृजन ह्याचा जाळें असा शब्दश: अर्थ घेतो; व ह्या मूळार्थापासून पुढील अर्थ तो बसवितो. पण परंपरागत आलेलें मतच जास्त स्वाभाविक आहे.

क्रीकट.-प्रमगन्द ह्याच्या नेतृत्वाखालीं आणि इन्द्रभक्ताविरुद्ध असलेले असे हे लोक ॠग्वेदांत एके ठिकाणीं उल्लेखिलेले आहेत. यास्क म्हणतो कीं, हें एका देशाचें नांव होतें, आणि नंतर कीकट देशाला मगध म्हणूं लागलें. म्हणून झिमर म्हणतो कीं, कीकट हे अनार्य लोक असून मगध देशांत रहात असत. वेबर म्हणतो कीं, हे लोक मगध देशांत वस्ती करुन होते, परंतु ते आर्यच होते. परंतु इतर आर्यन् जाती आणि हे ह्यांच्यांत फरक होता. कारण ते नास्तिक मताचे असून बौद्ध धर्माचें मगध हें धर्मपीठ होते. परंतु ही साम्यता संशयास्पद आहे; आणि ओल्डेनबर्ग आणि हिलेब्रँट ह्यांनांहि खात्री नाही. राजवाडे कीकटांस कैकाडी समजतात आणि चांदोरकर तें म्हणणें ग्राह्य समजतात. आमच्या मतें आर्य आणि अनार्य यांविषयींच्या उल्लेखांवरुन आजकालच्या संशोधकांनीं त्यांस आर्यन् किंवा नॉनआर्यन् ठरविण्याच्या केलेल्या प्रयत्नास कवडीचीहि किंमत नाही.

गन्धारि.- ॠग्वेद आणि अथर्ववेद यांत गन्धारि नांवानें उल्लेखिलेल्या लोकांचें गन्धार हें मागाहूनचें नांव आहे. छांदोग्य उपनिषदांत गन्धार हे दूरचे म्हणून उल्लेखिलेले आहेत.

मगध.-ह्या लोकांचा वैदिक वाङ्मयांत वारंवार उल्लेख येतो. परंतु त्यांच्याबद्दल सर्वत्र तिरस्कार दाखविलेला आढळतो. हा शब्द जरी ॠग्वेदांत प्रत्यक्ष आढळत नाहीं, तरी तो अथर्ववेदांत सांपडतो. त्या ठिकाणीं गन्धारी व मूजवंत या उत्तरेकडील व अंग व मगध या पूर्वेकडील लोकांत ताप जावो अशी इच्छा प्रकट केली आहे. शिवाय यजुर्वेद संहितेंत पुरुषमेधप्रसंगी दिलेल्या बळींच्या यादींत मागध किंवा मगधदेशीय मनुष्य याचा समावेश केला असून, अतिक्रुष्ट 'मोठा आवाज' (?) याला तो अर्पण केला आहे. शिवाय अथर्ववेदांतील व्रात्यस्तोमांत मागध हा व्रात्याचा मित्र मंत्र, हास्य, व चारी दिशांस दुमदुमविणारी गर्जना होता असें म्हटलें आहे. श्रौतसूत्रांत असा उल्लेख आहे कीं एखाद्या व्रात्याला जेव्हां आर्यमंडळांत घेत तेव्हां एखाद्या वाईट मागध ब्राह्मणास (ब्रह्मबन्धु मगधदेशीय) त्या व्रात्याचा विशिष्ट पोषाख देत असत. परंतु ही गोष्ट पंचविंशब्राह्मणांत आढळत नाहीं. उलट कधीं कधीं तेथें चांगले नांवलौकिक झालेले ब्राह्मण रहात असत असें दिसतें. कारण कौषीतकि आरण्यकांत मध्यम, प्रातिबोधीपुत्र हे 'मगधवासी' 'मगधदेशांत राहणारे' म्हणून दिलें आहे. ओल्डेनबर्ग याच्या मतें हें अपवादात्मक दिसते. बौधायन व इतर सूत्रें, आणि तसेंच बहुधा ऐतरेय आरण्यक यांत मगधाचा एक राष्ट्र म्हणून उल्लेख आला आहे. तेव्हां यावरुन झिमरचें, यजुर्वेद व अथर्ववेद यांतील मागध हें मगधदेशीय मनुष्य नसून वैश्य पुरुष व क्षत्रिय स्त्री यांपासून झालेल्या मिश्र संततीचें वाचक असावें हें म्हणणें अप्रयोजक दिसतें. ही जातीची कल्पना एकंदरीत शंकास्पद तर आहेच, पण निदान मागधासारख्या जातिवाचक नांवाविषयीं स्पष्टीकरण देतांना तरी मुळींच विचारांत घेण्यालायक नाहीं. मागध हा पुढील काळांत भाट म्हणून समजला जात असे, यांत कांही विशेष नाहीं. कारण हा देश गाणा-या लोकांचे मूलस्थान होता हें उघड होतें, व या देशांतील भाट दूरदूरच्या पश्चिम देशीं जातहि असत. याच वर्गाला नंतरच्या ग्रंथांत जात म्हणून संबोधूं लागले; व नंतर यांच्या मिश्र उत्पत्तीची कल्पना निघाली.

कीकट आणि मगध मूळचे एकच असल्यामुळें, ॠग्वेदांत दिसून येणा-या मगध लोकांविषयींच्या तिरस्काराचें कारण बहुधा मगधांनी ब्राह्मणी संस्कृतीचा लवकर स्वीकार केला नसावा या गोष्टींत असावें, असें ओल्डेनबर्गचें म्हणणें आहे व तें अगदीं शतपथ ब्राह्मणाला धरुन आहे. कारण कोसल व विदेह हे सुद्धां बरेच दिवस पर्यंत पूर्णपणें ब्राह्मणी संस्कृतींत आले नव्हते; मग मगधाची तर गोष्ट राहोच. या स्थितीस वेबरच्या मतें आणखी दोन गोष्टी कारण झाल्या असल्या पाहिजेत. एक मूळ रहिवाशांचें रक्त व दुसरी बौद्ध संप्रदायाचा उदय. हें दुसरें कारण यजुर्वेद किंवा अथर्ववेद यांनां लागू पडत नाहीं; परंतु त्या ऐवजीं जर ओल्डेनबर्गच्या मताप्रमाणें अर्धवट ब्राह्मणी संस्कृति हें कारण घातलें तर या म्हणण्याला कांही तरी महत्व देतां येईल. यांपैकीं पहिलें कारणच जरी ओल्डेनबर्गला संशयास्पद वाटतें तरी तें मॅकडोनेल यास पूर्णपणें सयुक्तिक दिसतें. पार्गिटेर तर असेंहि म्हणण्यास धजतो कीं, मगधांत आर्यन् लोकांवर पूर्वेकडील समुद्रांतून कांही लोकांनीं स्वारी केली, व त्याच लोकांत हें मिसळून गेले. या म्हणण्याला जरी वेदांत आधार नाहीं तरी तें मॅकडोनेलच्या मतें कांहीसें युक्तिसिद्ध आहे. कारण तो म्हणतो कीं, जसजसे पूर्वेकडे आर्यन् लोक जास्त जास्त शिरत चालले, तसतसें त्यांचे वर्चस्व मूळच्या रानटी जातीवर कमी कमी पडल्याचें आढळून येतें. आधुनिक मानववंशशास्त्राच्या द्दष्टीनें पाहिलें असतां असें स्पष्ट सिद्ध होतें की, जसजसें पूर्वेकडे जावें तसतसें आर्यन् जातींशीं साद्दश्य फार कमी कमी होत जातें; व त्यामुळें याबद्दल पार्गिटेरचें म्हणणें बरोबर असावेंसें वाटूं लागतें. परंतु असल्या प्रकारचा पुरावा हिंदुस्थानांतील मिश्र जातीविषयीं बोलतांनां विशेष महत्वाचा नाहीं.

राजवाडे मगांनां धारण करणारे ते मगध असा पतंजलीच्या आधारें मगध शब्द व्युत्पादितात. पण 'मग' म्हणजे पाप असें पतंजलीचें मत न स्वीकारतां 'मग' म्हणजे इराणी लोकांचे उपाध्याय मगी नांवानें प्रसिद्ध असलेले लोक, असा घेऊन राजवाडे यांची मगध शब्दांची व्युत्पत्ति आम्हांस ग्राह्य आहे. आम्ही मगांचें अस्तित्व हिंदुस्थानांत ॠग्वेदकालीं होतें आणि तें वैदिक लोक येण्यापूर्वी पासून असावें असें म्हणतों. असें म्हणण्याचें कारण आम्ही सविस्तर पूर्वी दिलेंच आहे.

उशीनर.- ऐतरेय ब्राह्मणांत (८.१४) कुरुपंचाल, वक्ष आणि उशीनर असे मध्यदेशांत एके ठिकाणी रहात असत असें म्हटलें आहे. कौषीतकि उपनिषदांत देखील (४,१) उशीनर, कुरुपंचाल आणि वश हे एके ठिकाणीं रहात असत असा उल्लेख आहे. परंतु गोपथ ब्राह्मणांत (२.९) उशीनर व वश हे उत्तरेकडचे होते असा उल्लेख आहे. ॠग्वेदांत एके ठिकाणीं (१०.५९,१०.) राणी उशीनराणी हिच्या संबंधांत उशीनर ह्यांचा उल्लेख आहे. सायणांनीं उशीनराणी याचा अर्थ एक ओषधि असा केला आहे. कदाचित् ती त्या देशांत होणारी ओषधि असेल. झिमर म्हणतो कीं हे लोक पहिल्यानें वायव्येकडच्या बाजूला रहात असत. त्याच्या गताला आधार म्हणजे ॠग्वेदांतील अनुक्रमणींत शिबि औशीनर याला एका ॠचेचा द्रष्टा मानला आहे. आणि हे शिबी सिंधु आणि चिनाब ह्या नद्यांमध्यें राहात असत असें अलेक्झांडर याचे अनुयायी म्हणत हा होय, पण हा पुरावा निर्णायक आहे असें म्हणतां येत नाहीं. कारण, महाभारतकालीं शिबी हे कुरुक्षेत्राच्या उत्तर दिशेला रहात असत; आणि वैदिक काळी उशीनर हे मध्यदेशाहूनहि आणखी पश्चिमेकडे रहात असत असें गृहीत धरण्यास कांहीच पुरावा नाहीं.

कुरुक्षेत्र- (कुरु ह्यांची जमीन) हें एक अति पवित्र स्थान मानिलें आहे. यांतून द्दषद्वती, सरस्वती व आपया ह्या नद्या वहात असत. तेथेंच शर्यणावत् नांवाचें सरोवर-शतपथ ब्राह्मणांतील अभ्यत:प्लक्षा - होतें. पिशेलच्या मताप्रमाणें ॠग्वेदांत कांही ठिकाणीं आलेला पस्त्या नांवाचा ओढाहि कुरुक्षेत्रांतच होता. तैत्तिरीय आरण्यकांतील कुरुक्षेत्राची मर्यादा दक्षिणेस खाण्डव, उत्तरेस तूर्घ्र आणि पश्चिमेस परीणह अशी आहे. साधारणपणें सध्यांच्या सरहिन्द प्रान्ताचीहि तीच मर्यादा आहे.

१०कोसल.- प्राचीन वैदिक वाङ्मयांत हें लोकांचें नांव म्हणून आलेलें नाहीं. आर्यसंस्कृतीच्या प्रसाराची शतपथ ब्राह्मणांत (१.४,१,१.) जी कथा आहे तींत विदेघ माथव ह्याची प्रजा कोसल विदेह, हे कुरु-पंचाल ह्यांच्या मागाहून ब्राह्मण  संस्कृतीखालीं आले असा उल्लेख आहे. आणि ह्याच ठिकाणीं सदानीरा ही दोन देशांची-कोसल व विदेह यांची- मर्यादा आहे असें वर्णिलें आहे. शतपथ ब्राह्मणांतच दुस-या एका ठिकाणीं (१३.५,४,४.) कौसल्य अथवा कोसल राजा पर आटणार हैरण्यनाभ ह्यानें एक अश्वमेध केला असें लिहिलें आहे. शांखायन श्रौतसूत्रावरुन (१६.२९,५.) काशी आणि विदेह यांचा संबंध असावा असें दिसतें. वेबर म्हणतो कीं, विदेहाचा होता (पुरोहित) अश्वल याचा वंशज बहुतकरुन आश्वलायन हा असावा व त्याला प्रश्नोपनिषदांत कोसल असें म्हटलें आहे. उत्तर आणि दक्षिण कोसल असा भेद वैदिक आणि बौद्ध वाङ्मयांत आढळत नाहीं.

कोसल हा देश गंगेच्या ईशान्येला असावा आणि तो सध्यांचा अयोध्या प्रांतच असावा असें वाटतें, कोसल देश हा ॠग्मंत्ररचनेपूर्वीच वसला गेला असून वेदोत्पादकांच्या परिचयाचा तो नंतर झाला असावा आणि दाशरथीराम हा ब्राह्मण जातीच्या विकासापूर्वीच-कदाचित् दाशराज्ञ युध्दा पूर्वीच-होऊन गेला असावा असें आमचें मत आहे.

११खाण्डव.- तैत्तिरीय आरण्यकांत (५.१,१.) कुरुक्षेत्राची ही एक मर्यादा आहे. महाभारतांतील खाण्डव वन आणि हें एकच आहे हें निर्विवाद आहे. पंचविंश ब्राह्मण आणि शाटयायनक यांतहि हें नांव आहे.

१२जनपद.- हा शब्द ब्राह्मण ग्रंथांत आलेला असून तेथें त्याचा अर्थ राजाच्या उलट लोक, व भूमि किंवा राज्य हे दोन्ही आहेत. जानपद या विशेषणानें राजाची प्रजा हा अर्थ सुद्धां ध्वनित होतो. ऐ.ब्रा. ८.१४. येथें सायणाचार्य जनपद म्हणजे ग्राम असा अर्थ करितात. हौगच्या भाषांतरांत 'लोक' (राजे नव्हत,) असा अर्थ दिला आहे. तैत्तिरीय ब्राह्मणांत (२.३,९,९.) जनपद म्हणजे जनपदवासी असा अर्थ भाष्यांत घेतला आहे. छांदोग्य (५.११,५.) व बृहदारण्यक (२.९,१८.) या उपनिषदांत जनपद याचा देश असा अर्थ आहे.

१३तूर्घ्र.- तैत्तिरीय आरण्यकांत (५.१.) कुरुक्षेत्राच्या उत्तरेकडील भाग म्हणून त्याचा उल्लेख आलेला आहे. पण हा नक्की कोणत्या ठिकाणीं होता हें निश्चित नाहीं. हा देश होता कीं नाहीं याबद्दलच मुळीं शंका आहे.

१४दक्षिणापथ.- (दक्षिकेकडील मार्ग.) ह्याचा अर्थ दक्षिण देश असा असून हा शब्द मराठींत ज्याला आपण सध्या 'दख्खन' असें म्हणतों त्या महाराष्ट्रास लागू आहे. हा शब्द सुराष्ट्र शब्दाबरोबर बौधायन धर्म सूत्रकालापासून महाराष्ट्रास लावलेला सांपडतो. अशा त-हेचा दुसरा शब्दसमूह म्हटला म्हणजे 'दक्षिणापदा' हा होय. हा शब्द ॠग्वेदामध्यें आलेला असून ज्या ठिकाणीं हद्दपार केलेला मनुष्य (परावृज) हद्दपार केला असतां जातो त्या जागेला लावलेला आढळतो. तेव्हां ह्याचा अर्थ इतकाच कीं, आर्यावर्तापलीकडला दक्षिणेकडील मुलुख. ह्या आर्यावर्ताची दक्षिणेकडील सीमा कौषीतकि उपनिषत्कालापर्यंत सुद्धां विंध्याद्रि पर्वत हीच गणली जात असे. दक्षिणापदा अशीं पदें पदपाठकार स्वीकारीत नाहींत; व सायणाचार्य यांचा अर्थहि निराळा करतात. परंतु ही हद्दपार केलेल्या लोकांनां पाठविण्याची जागा होती ही गोष्ट स्पष्ट आहे यांत शंका नाहीं. रामायणांतील रामाचें उदाहरणहि ह्या द्दष्टीनें लक्षांत ठेवण्यासारखें आहे.

१५देश- हा शब्द उपनिषदांच्या व सूत्रग्रंथांच्या कालापर्यंत प्रचारांत आलेला नव्हता; तो फक्त एकदांच ऐतरेय ब्राह्मणाच्या शेवटल्या भागांत व वाजसनेयि संहितेच्या (३५.११) एका विशेष वादविषयभूत मंत्रांत आलेला आहे. ह्या मंत्रांत सरस्वतीला मिळणा-या पांच नद्या आहेत असा उल्लेख आलेला आहे. ह्या मंत्रावरुन सरस्वती ही नदी म्हणजे सिंधूच होय असें जें मत कांही लोक प्रतिपादन करतात तें पूर्णपणें चुकीचें ठरतें. कारण या मंत्रांत 'देश' हा जो शब्द आलेला आहे त्यावरुन असें दिसतें कीं, ह्या मंत्राच्या द्रष्टयाच्या मतानें सरस्वती नदी मध्यदेशांतच होती व यजुर्वेदांतील भूगोलविषयक पुरावाहि हेंच सिद्ध करतो.
भूमीचा एक लहान भाग आणि मोठा भाग अशा दोन अर्थी हा शब्द असून त्या दोनहि तऱ्हांनीं त्याचा उपयोग आहे. 'देशीय' या ठिकाणीं प्रान्त अशा अर्थाचा हा शब्द आहे. परंतु हें सर्व 'देश' शब्दावर रचलेलें पांडित्य आहे. पांच नद्या कोणत्या हें निश्चित होत नाहीं. उवटानें आपल्या भाष्यांत पांच नद्यांची नांवें दिलीं आहेत. पण ती नांवें निश्चित ठरावयाचीं आहेत. सिंधु आणि सरस्वती ह्या भिन्न आहेत असें ठरणें योग्य होय आणि ॠग्वेदांतील नदीसूक्तावरुनहि सिंधु आणि सरस्वती भिन्न आहेत असें सिद्ध होतें.

१६नीच्च:- (खाली राहणारे.) हें पश्चिमेकडील कांही राष्ट्रांचें नांव आहे. ऐतरेंय ब्राह्मणांतील (८.१४.) ह्या नीच्यांच्या उल्लेखावरुन ते मध्यदेशांतील लोकाहून निराळे होते असें दिसतें. हे नीच्य लोक म्हणजे सिंधु नदी व पंजाब ह्या प्रांतांतले लोक होत.

१७पंचनद:- पांच नद्या असलेला. हें पंजाबचें नांव महाभारत कालापर्यंत कोठें आलेलें नाहीं. अलीकडील शोध पंजाब हें ॠग्वेदाचें घर (म्हणजे ॠग्वेदाचा जन्म पंजाबांत झाला) म्हणून त्याचें महत्त्व फार ही गोष्ट खोटी ठरवूं पहात आहेत. हॉपकिन्स, पिशेल, व गेल्डनर ह्या विद्वान् लोकांनीं निरनिराळें मुद्दे मांडून. असें सिद्ध केलें आहे कीं, ॠग्वेद-निदान त्याचा बराचसा भाग-पूर्वेकडे म्हणजे मध्यदेशांत लिहिला गेला. हिलेब्रँटच्या मतानें ॠग्वेदाचा कांही भाग पंजाब किंवा अ‍ॅराकोशिया यांत, व बाकीचा भाग मध्यदेशांत लिहिला गेला. आम्हांस ॠग्वेद पंजाबांत रचला गेला हें म्हणणें चुकलें आहे असें वाटत नाहीं.

१८परीणह:- अथर्व वेदामध्यें (१९,४८,१) या शब्दाचा पेटी किंवा अशा त-हेची एखादी वस्तु असा अर्थ आहे. पंचविंश ब्राह्मण, तैत्तिरीय आरण्यक व सूत्रग्रंथ ह्यांमध्यें आलेल्या व कुरुक्षेत्रांत असलेल्या एका स्थलाचें हें नांव आहे. अथर्व वेदाच्या पदपाठकारानें 'परिणहि' असें पद स्वीकारलें असून त्याचा गृह असा अर्थ घेतला आहे व त्याला आधार म्हणून तै,ब्रा, ३,२,४,७ हें स्थल दिलें आहे. 'परिण:' हें पद पडूं शकत नाहीं. तैत्तिरीय आरण्यकांत हा देशवाचक शब्द आहे असें उघड दिसतें. तो स्थलवाचक मानला तरी हरकत नाहीं; परंतु तें संशयास्पद आहे. लाटयायन सूत्रांत 'परीणं नाम स्थली' असें स्पष्ट म्हटलें आहे. शांखायन सूत्रांत 'परिणहि' असेंच आहे.

१९परिसारक :- हें ऐतरेय ब्राह्मण (२,१९) यांत आलेल्या एका गोष्टीवरुन सरस्वतीमुळें बनलेल्या एका बेटाचें नांव आहे असें निश्चित होतें.

२०मद्र:- या लोकांचा उल्लेख बृहदारण्यक या उपनिषदांत केला गेला आहे. काप्य पतंचल हा त्या वेळी त्यांच्यांत रहात होता. त्यांच्या 'औदीच्य मद्र' या शाखेचें नांव दुसरीकडे वैदिक वाङ्मयांतहि आलें आहे. ऐतरेय ब्राह्मणांत (८.१४,३) हे हिमालयाच्या पलीकडे (परेण हिमवन्तम्) व उत्तर कुरुंच्या जवळपास (म्हणजे झिमरच्या मताप्रमाणें बहुधा काश्मीरांत) राहणारे म्हणून उल्लेखिले आहेत. उपनिषदांत आलेले मद्र लोक कुरुंच्या प्रमाणें बहुधा मध्यदेशांत-कुरुक्षेत्रांत रहात असावेत. असें मॅकडोनेलला वाटतें.

२१मध्यदेश - (मधला देश.) मानवधर्मशास्त्राप्रमाणें उत्तरेस हिमालय, दक्षिणेस विन्ध्य, पश्चिमेस विनशन आणि पूर्वेस प्रयाग (अलाहाबाद) असलेला हा प्रदेश (म्हणजे जेथें सरस्वती अरण्यांत गुप्त होते आणि गंगायमुनांचा संगम होतो तेथपर्यंत पूर्वसीमा असलेला प्रदेश) होय. त्याच ग्रंथांत ब्रह्मर्षि देशांत कुरुक्षेत्र, मत्स्यदेश, पंचाल देश व शूरसेनक देश यांचा व ब्रह्मावर्तींत सरस्वती व द्दषद्वती यांमधील अत्यंत पवित्र भूमीचा समावेश होतो म्हणून दिलें आहे. बौधायन धर्मसूत्रांत आर्यावर्त हा प्रदेश विनशनाच्या पूर्वेस, कालक वनाच्या पश्चिमेस (कालक वन = काळें जंगल अथवा हरिद्वार जवळचें कनखल), हिमालयाच्या दक्षिणेस व पारियात्र अथवा पारिपात्र पर्वताच्या उत्तरेस आहे असें दिलें आहे. शिवाय त्याच ग्रंथांत आणखी असेंहि म्हटलें आहे कीं कांहीच्या मताप्रमाणें हा प्रदेश यमुना व गंगा या नद्यांमधील होय; परंतु भाल्लवींच्या मताप्रमाणें ती सीमा नदी (बहुधा सरस्वती) व सूर्य जेथें उगवतो तो प्रदेश यांच्यामधील आहे. मानवधर्मसूत्र व वसिष्ठ धर्मसूत्र यांच्या अन्वयें आर्यावर्त हा देश विंध्य आणि हिमालय यांच्यामधील होय असें दिसतें. या दोन मर्यादा कौषीतकि उपनिषदांत आलेल्या आहेत. मध्यदेश हा शब्द वैदिक नाहीं; परंतु ऐतरेय ब्राह्मणांत (८,१४,३) या करितां 'मध्यमा प्रतिष्ठा दिश्' (मधला स्थापित देश मधला पक्का कायमचा देश) असा प्रयोग केला आहे. या प्रदेशांत कुरु, पंचाल, वश व उशीनर हे लोक राहतात म्हणून दिलें आहे. यांपैकीं वश व उशीनर मागाहून अगदीं बेपत्ता झाले. मध्यदेश हा कुरु पंचालांचा देश होता व याच देशांत ब्राह्मणें व उत्तरकालीन संहितामंत्र रचिले गेले. संहितीकरणेंहि येथेंच झालीं असावींत. ह्याच्या पूर्वेस कोसल-विदेह असून पश्चिमेस ओसाड प्रदेश होता. शतपथ ब्राह्मण आणि ऐतरेय ब्राह्मण यांत पश्चिमेकडील जातीचा निषेधपूर्वक उल्लेख आला आहे. शिवाय कोसल व विदेह यांचें ब्राह्मणवर्चस्वाखालीं येणें याबद्दलची कथाहि शतपथ ब्राह्मणांत दिलेली आहे.

बुल्लर असें म्हणतो कीं, पारियात्र पर्वत हा विंध्याद्रीचा एक भाग आहे व मध्यदेशाची पश्चिम मर्यादा प्रथम आदर्श पर्वत ही असावी. कारण शतपथ ब्राह्मणाच्या एका पाठांत व कृष्ण पंडिताच्या टीकेंत 'प्रागादर्शनात्' असा पाठ असून 'अदर्शनात्' असा नाहीं. पाणिनीवरील महाभाष्यांत 'प्रागादर्शनात्' असें आहे. ह्वीस डेव्हिड्स व मॅक्समुल्लर वगैरेंनीं आर्य द्राविडयुध्दाच्या कल्पनेवर फिदा होऊन अशी एक विचित्र कल्पना पुढें मांडली आहे कीं, आर्यन् लोकांची एक टोळी चित्रळ व गिलजितच्या बाजूनें मध्यदेशांत आली. त्यांच्या बरोबर स्त्रिया नसल्यामुळें त्यांनीं द्रविडस्त्रियांशीं लग्नें केली; व त्यापासून आर्यद्रविड जात उत्पन्न झाली. या कल्पनेस वैदिक वाङ्मयांत आधार सांपडणे अशक्य आहे. वैदिक वाङ्मयांत वैदिक लोक कोणत्या मार्गानें आले याचा उल्लेख नाही असें म्हणणें वेडगळपणाचें आहे. वरील कल्पना पुढें निघालेल्या पोटभाषांवरुन बसविलेली आहे. ही कल्पना कोणत्याहि काळाला जुळेल अशी नाहीं.

२२मरु -(अनेकवचनी) तैत्तिरीय आरण्यकांत हा कुरुक्षेत्राचा उत्कर म्हणून आला आहे. उत्कर म्हणजे वेदी खणल्यावर ती माती टाकण्याची जागा किंवा उकिरडा. कुरुक्षेत्र हा प्रदेश जर यज्ञांतील वेदी कल्पिली तर मरुदेश हा त्या वेदीचा उत्कर होईल. मारवाडास मरुदेश हें नांव उत्तरकालीन संस्कृत ग्रंथांत स्पष्ट दिलेलें आहे.

२३मष्णार.- हें एका जागेचें नांव आहे. ऐतरेय ब्राह्मणाप्रमाणें कुरु राजाला येथें जय मिळाला.

२४वंग.- हें बंगालप्रांताचें नांव आहे, पण पूर्वकालीन वैदिक ग्रंथांत तें सांपडत नाहीं. ऐतरेय आरण्यकांत 'वंगावगधा:' असा शब्द आला आहे. तो बहुधा वंग-मगधा: या शब्दाचा अपपाठ असावा. वंग-मगधा: म्हणजे शेजारशेजारचे वंग व मागध लोक. बौधायन धर्मसूत्रांमध्यें हा शब्द आलेला आहे. ऐ. आ. वरील भाष्यांत सायणाचार्य वंग व अवगध हीं वृक्षांचीं नांवें आहेत असें म्हणतात.
२५विदर्भ.- पूर्वकालीन वैदिक वाङ्मयांत फक्त जैमिनीय उपनिषद् ब्राह्मणांतच हें एका जागेचें नांव म्हणून आलेलें आहे. ह्या ठिकाणीं येथील माचलजातीचे कुत्रे वाघास ठार मारीत असा उल्लेख आलेला आहे. विदर्भ हाच व-हाड प्रांत असावा असें पुष्कळ विद्वानांचें मत आहे.

२६विदेह.- हें एका लोकांचें नांव असून ब्राह्मण कालाच्या अगोदर तें कोठें आलेलें नाहीं. शतपथ ब्राह्मणांत विदेघ माथवाची जी कथा दिलेली आहे तिजवरुन विदेहांत संस्कृति आली ती पश्चिमेकडील ब्राह्मण लोकांनी आणली व विदेहाच्या पूर्वीच कोसल देश ब्राह्मण संस्कृतिमय झालेला होता असा जो जनप्रवाद आहे तो खरा असल्याचें दिसतें. विदेहांतल्या लोकांनां पुढें जी प्रसिद्धि मिळाली तिचें कारण त्यांचा राजा जनक ह्याची संस्कृति होय. बृहदारण्यक उपनिषदांत हा जनक राजा ब्रह्मविद्येचा प्रमुख पुरस्कर्ता होता असें म्हटलेलें आहे. कौषीतकि उपनिषदामध्यें विदेहांचा संबंध काशीच्या लोकांशी आलेला आहे. ऐतरेय ब्राह्मणांत निरनिराळया लोकांची जी यादी आलेली आहे तीमध्यें विदेह लोकांचें नांव वगळलेलें आहे. कारण कोसल व काशी लोकांबरोबर त्यांचा प्राच्य (पूर्वेकडील) लोकांमध्येंच अंतर्भाव होत असे. शांखायन श्रौतसूत्रामध्यें असें म्हटलें आहे कीं, काशि, कोसल व विदेह ह्या तीन राष्ट्रांपैकीं प्रत्येक राष्ट्राला एक 'जल जातुकर्ण्य' नांवाचा पुरोहित होता, व त्याच ग्रंथांत दुस-या एका ठिकाणीं विदेह लोकांचा राजा 'परआट्णार' व कोसल लोकांचा राजा हिरण्यनाभ ह्यांच्या निकट संबंधाचें स्पष्टीकरण केलेलें आहे. शतपथ ब्राह्मणाप्रमाणें परआट्णार हा हिरण्यनाभाचा वंशज असून कोसल देशाचा राजा होता. पंचविंश ब्राह्मणांत उल्लेखिलेला नमीसाप्य नांवाचा दुसरा एक विदेहाचा राजा होऊन गेला. यजुर्वेद संहितेंमध्यें 'विदेहाच्या गायी' असा उल्लेख आलेला आहे. पण तैत्तिरीय संहितेवरील टीकाकार असें म्हणतो कीं, वैदेही हें नुसतें विशेषण आहे व त्याचा अर्थ सुंदर शरीर असलेली (विशिष्ट देहसंबंधिनी) असा आहे. बौधायन श्रौतसूत्रामध्यें ब्राह्मणी संस्कृतीच्या लोकांत विदेह लोकांचें नांव आलेलें आहे. कोसल व विदेह या देशांची मर्यादा सदानीरा म्हणजे अर्वाचीन गंडकी (ग्रीक भूगोल वेत्ते हिला कोंडोचेटीझ असें म्हणत असत) ही नदी होती. ही नदी नेपाळमधून निघून पाटणाच्या समोर गंगा नदीस मिळते. विदेह देश म्हणजे हल्लीचा जवळ जवळ तिरहुत देश होय.

*नदी.- ॠग्वेदामध्यें व मागाहून झालेल्या ग्रंथांत याचा अर्थ पाण्याचा प्रवाह असा आहे. नदीच्या पात्रांत ज्या उथळ जागा (गाध) असतात त्यांचा, त्याचप्रमाणें नदीच्या पलीकडील तीराचा (पाराचा) व नदींतील घोडयांच्या स्नानाचा असे उल्लेख आलेले आहेत. नद्यांचा पर्वतांशी निकट संबंध दाखविलेला आढळून येतो. नदीपति ही पदवी समुद्राला किंवा त्याच्या पाण्याला एकदां दिलेली आहे.'यथा सिन्धुर्नदीनां' हें अथर्ववेदा (१४.,१,४३) मधील वाक्य समुद्राच्या 'सरित्पति' या नांवाच्या ज्ञानाची ग्वाही देत आहे.

+ नाव्या.-ॠग्वेदामध्यें अनेक वेळां व मागाहून झालेल्या वाङ्मयांत होडीनें ओलांडण्यास योग्य अशी नदी या अर्थी हा शब्द आलेला आहे (पा.सू. ४.४,९१ पहा). तार्य अशा अर्थीच फक्त हें नाव्य असें रुप होतें.
§ वक्षणा.- हा शब्द स्त्रीलिंगी व अनेकवचनी असून ॠग्वेदाच्या एका ॠचेंत 'नदीचें पात्र' असा ह्याचा अर्थ आहे. 'वक्षणाम्ह० कुल्या' (कालवा) असा अर्थ सायणाचार्य वगैरे करितात. निघंठुकारानें मात्र नदी नामांत याचा पाठ केला आहे.

२७असिर्क्न:- 'काळी'  हें ॠग्वेदांत एका नदीचें नांव आहे. हिला नंतर चंद्रभागा म्हणूं लागलें आणि ग्रीक लोक तिला अकेसिनीझ म्हणत असत. आतां पंजाबांत जी चिनाब म्हणून नदी आहे ती हीच होय.

२८आपया:- द्दषद्वती आणि सरस्वती ह्यांच्यामध्यें या नदीच्या नांवाचा ॠग्वेदांत फक्त एकदांच उल्लेख आहे. लुडविगच्या मनाचा कल ही नदी आणि आपगा म्हणजे गंगा ह्या एकच होत असें म्हणण्याकडे आहे; परंतु झिमर म्हणतो कीं ती सरस्वती नदीची ठाणेश्वरावरुन वाहणारी शाखा अथवा पश्चिमेकडील आधुनिक इंद्रमती असावी, व पिशेल म्हणतो कीं कुरुक्षेत्रावरुन वाहणारी महाभारतांतील आपया नदी ती हीच असावी. येथें पुढें दिल्याप्रमाणें एक विशेष कल्पना करणें शक्य व युक्त आहे. कीं सध्यां सरस्वती गुप्त म्हणजे जलरहित आहे असें म्हणतात त्याचप्रमाणें ॠग्वेदकालीहि मानण्याची पद्धति असावी असें अनुमान काढण्यास या पदाचा विशेष आधार आहे. ह्या ठिकाणी तीन नद्या घेण्यास समुच्चयार्थक असें कांहीहि नाहीं, हेंहि लक्षांत ठेवण्यासारखे आहे. 'आपया' या ऐवजी 'अपया' असा पाठ असल्यास बरा, व तोच मूळ असावा असें धरुन वरील अनुमान आहे. महाभारत वगैरेमध्यें सुद्धां अशा चुकीनेंच उल्लेख असावा.

२९आर्जीक, आर्जीकीय (पु.), आर्जीकीया (स्त्री·).- बहुत- करुन दोन्ही पुल्लिंगी शब्द राष्ट्र किंवा लोक दर्शवितात आणि स्त्रीलिंगी शब्द त्या देशांतील नदी दर्शवितो. हिलेब्रँट म्हणतो कीं, हा देश काश्मीर प्रांतांत किंवा काश्मीरजवळ असावा. कारण अभिसारीझ याचा भाउफ् आर्सेसीझ, ह्यानें आपलें नांव आपल्या लोकांच्या नांवावरुन धारण केलें आणि अभिसार काश्मीरच्या जवळ आहे असें अ‍ॅरिअन म्हणतो. पिशेल आर्जीक हा देश आहे हें कबूल करतो, परंतु तो देश कोणता हें सांगतां येत नाहीं असें तो म्हणतो. परंतु रॉथ अथवा झिमर ह्यापैकीं कोणीच तें विशेषनाम आहे असें कबूल करीत नाहीं. उलटपक्षीं सर्व ग्रंथकार आर्जीकीया हें नदीचें नांव आहे असें कबूल करतात. रॉथ हा फक्त एकाच उता-यांत वरील म्हणणें कबूल करतो, परंतु इतर ठिकाणीं तो शब्द सोमरसाच्या भांडयांनां लागू पडतो असें म्हणतो; परंतु तो शब्द सर्व उता-यांमध्यें एकाच अर्थी आलेला आहे असें गृहीत धरणें जरुर आहे. झिमरच्या मतें या नांवाची नदीच नाहीं; आणि पिशेलच्या मतें या नांवाची नदी आहे पण ती ठरवितां येत नाही. हिलेब्रँट म्हणतो कीं ती उत्तरसिंधु अथवा वितस्ता (झेलम) अथवा दुसरी एखादी नदी असावी. ग्रासमन हा यास्कावरुन ती नदी विपाश् (बिआस) हीच होय असें प्रतिपादन करतो. परंतु नदीस्तुतिपरसूक्तांतील ह्या नदीच्या नांवाच्या स्थानावरुन हें अशक्य वाटतें. ब्रुन्होफर म्हणतो कीं ही नदी म्हणजे अर्वनाब नदीला येऊन मिळणारी अर्घेसन नदी आहे.

३०उर्णावती.-ॠग्वेदांत ज्या सूक्तांत नद्यांची स्तुति आहे त्यांत लुडविगला सिन्धूला येऊन मिळणा-या उर्णावती नामक नदीचा उल्लेख आलेला आढळतो. परंतु ही गोष्ट मॅकडोनेल यास चुकीची वाटते. रॉथ म्हणतो कीं या शब्दाचा अर्थ 'लोंकरीचा' असा आहे. उलटपक्षीं झिमर हा लुडविगचा अर्थ कबूलना करतो. कारण तो म्हणतो कीं, त्यामुळें सर्व सूक्ताच्या अन्वयांत घोटाळा होतो. पिशेल म्हणतो कीं तें सिंधुनदीचें विशेषण असून त्याचा अर्थ 'जेथें मेंढया पुष्कळ आहेत' असा असावा.

३१कुभा.- ह्या नदीचे नांव दोन वेळ ॠग्वेदांत आलें असून अर्वाचीन काबुलनदी आणि ही ह्या एकच आहेत. सायणाचार्यांनीं प्रथमस्थळीं (५.५३,९) हा शब्द विशेषणात्मक धरला असून दुस-या स्थळीं (१०.७५,६) मात्र त्याचा नदी असा अर्थ स्वीकारला आहे.

३२क्रुमु.- हें एका ओढयाचें नांव ॠग्वेदांतील पांचव्या मंडलांत एकदां आणि शेवटल्या मंडलांत एकदां नदीस्तुतीत आले आहे. सिन्धु नदीला पश्चिमेकडून मिळणारी अर्वाचीन कुरुम नदी आणि ही नदी एकच ह्यांत मुळींच संशय नाहीं. सायणाचार्यांनीं ॠ० ५.५३,९ येथें 'क्रुमु' हें समुद्र या पदाचें विशेषण घेतलें आहे. परंतु तेथें तें नदीचें नांव घेतलें असतां जुळतें. ॠ० १०.७५,६ येथेंहि सायणाचार्यांनीं क्रुमु हें गोमतीचें विशेषणच केलें आहे 'क्रुमुं गोमतीम्'.

३३गंगा.- ॠग्वेदांतील नदीस्तुतींत हें आधुनिक गंगा नदीचें नांव एकदांच आले आहे. उरु:कक्ष ह्याचें विशेषण गांग्य ह्यांतहि या नदीचा उल्लेख आहे. दुस-या संहितांमध्यें ह्या नदीचें नांव कोठेंहि आढळत नाही. परंतु शतपथ ब्राह्मणांत (१३.५,४,११) हें नांव आलें आहे. तेथें गंगा आणि यमुना या नद्यांच्या कांठी भरत दौ:षन्ति ह्यानें मिळविलेले विजय उल्लेखिलेले आहेत, आणि तैत्तिरीय आरण्यकांतील मंत्रांत (२.२०) गंगा यमुना ह्या नद्यांमध्यें (येथेंच उपर्युक्त मंत्र रचला गेला असला पाहिजे) राहाणा-या लोकांचा मोठा सन्मानपूर्वक उल्लेख केलेला आहे. गंगा आणि आपया या नद्यांचें जें लुडविग यानें अभिन्नत्व दर्शविलें आहे तें बरोबर नाहीं. कक्षाचें विशेषण जें 'गांग्य' असें आलें आहे तेथें त्याचा 'गंगाया: जात:' असा सरळ अर्थ दिसतो व 'गंगा नदी' प्राचीन आर्यांनां माहीत होती हें स्पष्ट होतें.

३४गोमती.- (गाई असणारी.) ॠग्वेदाच्या दहाव्या मण्डलांत नदीस्तुत (१०.७५,६.) ही एक नदी आहे. त्या ॠचेवरुन ही सिन्धुनदीस मिळणारी नदी असली पाहिजे, आणि सिन्धूला पश्चिमेकडून मिळणारी नदी जी गोमल तीच ही असावी ह्याबद्दल संशय रहात नाहीं. ॠग्वेदांत दुस-या एका ठिकाणीं (८.२४,३०.) गोमती शब्दांतील स्वरोच्चारावरुन ही नदीच असली पाहिजे असें वाटतें. गेल्डनर म्हणतो कीं वरील दोन उता-यांत गोमती अथवा अधिक बरोबर बोलावयाचें म्हणजे तिच्या चार शाखा (व म्हणून अनेक वचनी उपयोग) च उल्लिखित आहेत. ह्यावरुन ती नदी कुरुक्षेत्रांत- म्ह० वैदिक सुधारणेच्या मध्यबिंदू पाशी-होती असें दिसतें. सिन्धु आणि तिला मिळणा-या या नद्या हा सिद्धान्त स्वीकारला म्हणजे सायणभाष्यांत हिमवान् पर्वताचा संबंध या नद्यांकडे-निदान गोमती नदीकडे-जोडण्यांत आला आहे तो बरोबर नाहीं असें म्हणावें लागतें.

३५तृष्टामा.- ॠग्वेदामध्यें नदीस्तुतींत ही एक नदी म्हणून हिचा उल्लेख आलेला आहे. पण ही नदी कोणती हें ओळखण्यास साधन नाहीं. हीं सिंधूला मिळणारी नदी होती ही गोष्ट तेथें उघड होत आहे, परंतु हिचें स्थान निश्चित होत नाहीं.

३६दृषद्वती.- 'दगडांनी भरलेली' अशा अर्थाचें हें एका नदीचें नांव असून ही नदी कांही वेळ सरस्वती नदीला समांतर वहात जाऊन शेवटीं तिला मिळतें. हिचें नांव ॠग्वेदामध्यें सरस्वती व आपया ह्यांच्या बरोबर भरत राजांचें कार्यक्षेत्र म्हणून आलेले आहे. पंचविंश ब्राह्मण व मागाहून झालेले ग्रंथ ह्यांमध्यें दृषद्वती व सरस्वती ह्या नद्यांजवळ मोठे यज्ञ झाले असा उल्लेख आलेला आहे. या दोन नद्या ही मध्यदेशाची पश्चिम मर्यादा होती असें मनस्मुति २.१७ येथें उल्लेखिलें आहे असें मॅकडोनेल म्हणतो. परंतु सदरहु ठिकाणीं वस्तुत: या दोन नद्यांमधील प्रदेशास ब्रह्मावर्त म्हणत एवढें म्हटलेंलें आहे. ब्रह्मार्वत हा मध्यदेशाचा केवळ एक भाग होता.

३७परुष्णी.- हें एका नदीचें नांव असून तें नदीस्तुतींत व दहा राजांवर सुदासनें जो जय संपादिला त्याबद्दलच्या सूक्तांत आलें आहे. ह्या नदीचें पाणी चढून पळणारे राजे बुडून मेले आणि त्यामुळें सुदासला कायमचा जय मिळाला, म्हणून ह्या नदीचें नांव त्या सूक्तांत आलेलें आहे. ह्या ठिकाणीं व ॠग्वेदांतील आठव्या मंडलांत एका ठिकाणीं (येथें या नदीला 'महेनदि' असें म्हटलेलें आहे.) आलेले हें नांव, मागाहून जिला रावी 'इरावती (रावी)' असें नांव मिळालें असें यास्क म्हणतो तिचेंच असावें. पिशेलच्या मतानें ॠग्वेदामध्यें आणखी दोन ठिकाणीं (४.२२,२; ५.५२,९.) या नदीचा उल्लेख आलेला आहे. त्या ठिकाणी लोंकरी (ऊर्णा) चा संबंध परुष्णी शब्दाशीं जोडलेला आहे. मॅक्समुल्लर व ओल्डेनबर्ग यांनांहि पिशेलचें म्हणणें मान्य आहे पण ज्या ठिकाणीं हा संबंध निर्दिष्ट केलेला आहे त्या वचनांचा निश्चित अर्थ काय आहे याबद्दल त्यांच्यांत मतभेद आहे. पिशेल म्हणतो कीं, परुष्णी हें नांव बारीक बारीक केलेल्या लोंकरीच्या भुग्या (परुस्) पासून बनलेलें आहे; निरुक्तांत म्हटलें आहे त्याप्रमाणें नदीच्या वळणापासून किंवा रॉथ म्हणतो त्याप्रमाणें नदींतल्या वेतापासून तें बनलेलें नाहीं. सुदासविजयविषयक सूक्तांत पुरुष्णी व यमुना ह्यांचा एकत्र उल्लेख आला आहे त्यावरुन हॉपकिन्सनें असा तर्क केला आहे कीं, त्या सूक्तांतील आलेलें यमुना हें परुष्णीचेंच दुसरें नांव आहे व गेल्डनर असें म्हणतो कीं, परुष्णी ही यमुनेस येऊन मिळणारी एक नदी असावी. पण हे दोन्ही तर्क अनावश्यक व असंभाव्य आहेत. हें सूक्त संक्षिप्त आहे व यांत सुदासच्या दोन विजयांचें वर्णन आलें असावें असें मानण्यास हरकत नाहीं. अथर्ववेदामध्यें परुष्णीबद्दल संशयास्पद उल्लेख आलेला आहे (६.१२,३.)

३८पुरीषिणी.- ॠग्वेदांत एका सूक्तांत हें नांव आलें असून, तें एखाद्या नदीचें नांव असावें; किंवा बहुधा त्याचा जलमय किंवा पूर आलेली किंवा पाण्यानें झिजलेले दगड घेऊन जाणारी नदी असा अर्थ असून तें सरयूचें विशेषण असावें. सायणाचार्य त्याचा उदकवती असाच अर्थ करतात. यास्कानेंहि उदक नामांमध्यें 'पुरीष' शब्दाचा पाठ केला असून (यास्क २,२२.) पुरीष हें उदकवाचक 'नूक' पदाचें विशेषणहि घेतलें आहे. अर्वाचीन संस्कृतमध्यें 'पुरीष' व 'पुरीषिणी' या शब्दांचे अर्थ अगदींच भिन्न झाले आहेत.

३९मरुद्वृधा.- हें एक नदीचें नांव ॠग्वेदांत नदीस्तुतीमध्यें आलें आहे. त्याच ठिकाणी असिक्रि व वितस्ता यांचा उल्लेख आला आहे. रॉथच्या मतें या दोन नद्या मिळून एक झालेल्या प्रवाहाला पुढें परुष्णीला मिळेंपर्यत मरुद्वृधा हें नांव आहे. झिमर याच मताचा आहे. पण लुडविगच्या मतें असिक्री व वितस्ता यांचा एक झालेला प्रवाह परुष्णीला मिळाल्यानंतर परुष्णीचेंच पुढें मरुद्वृधा हें नांव पडतें. परंतु हें मत बरोबर वाटत नाहीं. 'असिक्री' ही मरुद्वृधेची अवयवभूत व वितस्ता आणि सोमा या आर्जीकीया नदीच्या शाखाभूत होत असें सायणाचार्यांचें मत आहे.

४०मेहत्नू.- ॠग्वेदांतील नदीस्तुतींतल्या एका नदीचें नांव. क्रुमु आणि गोमती या नद्यांच्या अगोदर सिंधु नदीला मिळणारी नदी. कदाचित् ती क्रुमु नदीला मिळणारी नदी असण्याचाहि संभव आहे.

४१यमुना.- हें जुळी मुलगी या अर्थाचें नांव त्या नदीस ती गंगानदीच्या बाजूनें बरोबर वहात जात होती म्हणून पडलें. हिचा ॠग्वेदांत तीनदां उल्लेख आलेला आहे. आणि उत्तरकालीन वाङ्मयांतहि बरेच वेळां आलेला आहे. ॠग्वेदाप्रमाणें तृत्सु आणि सुदास यांनीं यमुनेवर त्यांच्या शत्रूंविरुद्ध एक लढाई जिंकली होती. येथें यमुना हें परुष्णी (रावी) नदीचेंच एक नांव आहे हें हॉपकिन्सचें मत खरें मानण्यास कांही आधार नाहीं असें मॅकडोनेल म्हणतो. अथर्ववेदांत यामुन आञ्जनाचा त्रैककुद आञ्जनाबरोबर उपयुक्त म्हणून उल्लेख केलेला आहे. ऐतरेय आणि शतपथ ब्राह्मणांत भरत यमुनेवर यशस्वी झाल्याबद्दल उल्लेख आहे. इतर ब्राह्मणांतहि या नदीचा उल्लेख आहे. मंत्र पाठांत साल्व लोक तिच्या कांठीं रहात होते म्हणून म्हटलें आहे. सायणमतानें 'अजास' 'शिग्रु' आणि 'यक्षु' हे देश यमुनेच्या कांठी असावयास पाहिजेत. तिला 'त्रिककुद पर्वतासंबंधी' आणि 'यामुन' असेंहि म्हणतात.

४२यव्यावती.- या शब्दाचा ॠग्वेदांत आणि पंचविश ब्राह्मणांत नदीचें नांव म्हणून उल्लेख आहे. हिलेब्रँटच्या मतें ती नदी इराणांत आहे; पण त्याच्या मतास आधार नाहीं. यव्यावती व हरियूपीया या एकच असाव्यात असें सायणाचार्यांतें मत आहे. ती इराणापेक्षा हिंदुस्थानांतच असणें जास्त संभवतें.

४३रसा.- वैदिक प्रदेशाच्या वायव्येस असलेल्या नदीचें नांव म्हणून या शब्दाचा ॠग्वेदाच्या तीन मंत्रांत उल्लेख आलेला आहे. इतरत्र त्याचा पृथ्वीच्या शेवटास असणारी काल्पनिक नदी या अर्थानें उल्लेख येतो. ही पृथ्वीला व त्याचप्रमाणें अन्तराळाला आवेष्टून आहे अशी समजूत आहे. सरस्वतीप्रमाणेंच हिच्या संबंधांतहि ही मूळची खरोखरीची नदी असावी असें मानणें सयुक्तिक होईल. कदाचित् ही मूळची अरॅक्सीझ किंवा जक्झार्टीझ असावी. कारण रसाचें अवेस्ती रुप 'रडहा' वेंदिदादमध्यें आढळतें. हा शब्द मूळ 'रस' म्हणजे 'पाण्याची चव' यावरुनच आलेला असावा आणि म्हणून सरस्वतीप्रमाणें तो कोणत्याहि नदीला लावतां येईल. ही कुभा, क्रुमु, सिंधु आणि सरयु या नद्यांबरोबर अवर्षणामुळें कोरडी पडली असा उल्लेख आहे (५.५३,९). ॠ० १.११२,१२ येथेंहि (कोरडी पडलेली) नदी पाण्यानें भरुन टाकली असाच उल्लेख आहे. ॠ.१०.७५,६ येथें ' हे सिन्धु, गतियुक्त तूं कुभेसहित गोमती आणि मेहत्नूसहित क्रुमू यांच्याप्रत जाण्याकरितां प्रथम तृष्टामा, सुसर्तु, रसा व श्वेती यांच्यासह जातेस,' असे म्हटलें आहे. सायणाचार्य क्रुमु ही नदीच मानीत नाहींत. वेदार्थयत्नकार या नदीस तृष्टामा, प्रथम मिळाल्यानंतर ही सुसर्तु, रसा आणि श्वेती या नद्यांस मिळते आणि मग कुभा, गोमती, क्रुमु व मेहत्नू या नद्यांस बरोबर घेऊन चालतें असें म्हणतात. यांपैकी कुभा (काबुल) व क्रुमु (कुरुम) या नद्या सध्यांच्या नकाशांत उपलब्ध होतात. गोमती (सिन्धूला मिळणारी) उपलब्ध नाहीं. बाकीच्या कोणत्याहि सध्यां निश्चित किंवा नामसाद्दश्य प्राप्त नाहींत. ॠ.५.५३,९. येथें रसा, अनितभा, कुभा, क्रुमु, सरयु व पुरीषिणी या नद्यांचा उल्लेख आहे. सायणाचार्य अनितभा, क्रुमु व पुरीषिणी या नद्या आहेत असें मानीत नाहींत, परंतु महाभारतांत या नद्या मानल्या आहेत. ५.४१,१५. येथें 'रसा' म्हणजे 'पृथ्वी' असा अर्थ आहे तो अर्वाचीन संस्कृतशीं जुळता आहे. ॠ. ९.४१,६ येथें रसा ही नदी किंवा रस असा अर्थ सायण घेतो ॠ. ४.४३,६ व ८.७२,१३ येथें रसा याचा पाणी असा अर्थ आहे; परंतु हें पद प्रत्येक नदीला लावतां येत नसून ही एक विशेष नदी असावी यांत बिलकुल संशय नाहीं. तथापि पुढल्या ग्रंथांत (भारत वगैरेंत) हें नांव आलेलें नसावें.

४४वितस्ता:- पंजाबांतल्या पांच नद्यांपैकी सर्वांत पश्चिमेकडील ही नदी असून हिचा उल्लेख ॠग्वेदांत नदीस्तुतींत आलेला आहे. अलेक्झांडरच्या इतिहासकारांनीं जिला हायडॅस्पीझ असें नांव दिलें होतें तीच ही नदी होय, व हिलाच टॉलेमी हा बिडॅस्पीझ असें अधिक शुद्ध नांव देतो. मुसुलमानी इतिहासकार हिला बिहत् किंवा विहत् असें म्हणत असत. या नांवाची स्मृति हल्लीं काश्मिरी वेथ् ह्या नांवांत अजूनहि ह्यात आहे. ज्या पांच नद्यांमुळें पंजाबला पंचांबु हें नांव मिळालें त्या पांच नद्या: १ सिंधु, २वितस्ता (झेलम), ३ इरावती, ४चंद्रभागा (चिनाब) व ५ विपाशा (बियास) या असाव्यात शुतुद्रि (सतलज) हेंहि प्रसिद्ध नद्यांपैकींच एक नांव आहे. ह्या पांच किंवा सहाहि नद्या सध्यां पंजाबमध्यें आहेत. सध्यां झेलम व चिनाब यांचा संगम झाल्याचें दिसतें. व वियत् ही नदी अगदीच वेगळी दाखविली जाते. आधुनिक सिंधूइतका प्राचीन मोठा नसावा. आरंभांचें नांव कांही तरी वेगळें असून पुढें त्याच प्रवाहास सिंधु असें नांव पडलें असावें.

४५विपाश्.-म्ह. पाशरहित. ॠग्वेदामध्यें दोन वेळां उल्लेखिलेल्या एका नदीचें हें नांव आहे. याच नदीला ग्रीक लोक हिफासिस, हिपानिस किंवा बिपासिस म्हणत व हल्लींच्या काळीं पंजाबांत हिला बिआसनदी असें म्हणतात. ॠग्वेदेतर वैदिक वाङ्मयांत तर हिचा कोठेंहि उल्लेख नाहीं. यावरुन वैदिक काळच्या आर्य लोकांना या नदीचें फारसें महत्व वाटत नव्हतें ही गोष्ट सिद्ध होते असें मॅकडोनेल म्हणतो. या नदीला पूर्वी उरुंजिरा असें म्हणत असत. ह्या गोष्टीची नोंद निरुक्तांत अजून आहे. गोपथ ब्राह्मणांत असें म्हटलेलें आहे कीं, या नदीच्या मध्यभागीं वसिष्ठशिला होती. पाणिनीनें या नदीचा उल्लेख केलेला आहे, व याच नदीला वैदिक वाङ्मयानंतरच्या वाङ्मयांत विपाशा असें नांव मिळालें आहे. प्राचीन कालापेक्षां या नदीचा ओघ आतां बराच बदलेला आहे ॠ. ३.३३,१ या ठिकाणीं या नदीचा उल्लेख आहे. तेथें शुतुद्रि आणि विपाश् यांच्या संगमावर विश्वामित्र आला असून तो नदीशीं संवाद करतो आहे व त्या नद्यांचा पुढें सिंधु नदीशीं संगम झाला आहे असें वर्णन आहे. निरुक्त आणि पदपाठकार (ॠग्वेद). यांचा मतभेद येथें लक्षांत ठेवण्यासारखा आहे. विश्वामित्र विपाश् व शुतुद्रीच्या संगमावर आला व वाट देण्यास त्यांची प्रार्थना करुं लागला (नि. २०,२४). विपाश् आणि आर्जीकिया या नद्या एकच आहेत असें यास्क म्हणतो.

४६विबाली.- ॠग्वेदामध्यें एकदांच हा शब्द आलेला आहे व त्याचा तेथें एका अप्रसिद्ध ओढयाचें नांव असा अर्थ असावा असें मॅकडोनेल म्हणतो. परंतु हें मत सायणाचार्य व वेदार्थयत्नकार वगैरेंच्या मतास जुळत नाहीं.

४७शिफा.- ॠग्वेदामध्यें एके ठिकाणीं हा शब्द आलेला आहे. सायण ह्याचा अर्थ एका नदीचें नांव असा करितात व तो पूर्णपणें संभवनीय आहे.

४८शुतुद्रि.- ॠग्वेदांत हा शब्द दोनदां आलेला असून या शब्दावरुन पंजाबमधल्या अगदीं पूर्वेकडील भागांत असलेल्या नदीचा बोध होतो. या नदीला हल्लींच्या कालांत सतलज म्हणतात, व टॉलेमी व अ‍ॅरियन यांच्या काळांत झरॅड्रॉस असें म्हणत असत. वैदिक कालाच्या नंतरच्या कालांत या नदीचें नांव बदलून तिला शतद्रु (शंभर मार्गांनीं वाहणारी) असें नांव मिळालें. ऐतिहासिक कालांतहि या सतलज नदीचा मार्ग अनेकदां बदललेला आहे. विपाश् व शुतुद्रि यांचा संगम झाला तेथें विश्वामित्र आला होता व तेथें त्यानें नदीसूक्त केलें असें निरुक्तांत सांगितलें आहे (९.२६.) शुतुद्रि आणि सरस्वती यांचा कांही तरी संबंध असला पाहीजे. शुतुद्रि (सतलज) ही पूर्वी कच्छच्या आखातास मिळत असे पण पुढें ती सिन्धूस मिळूं लागली असें दिसतें. कदाचित् कच्छच्या अखातास मिळणा-या भागास 'सरस्वति' व सिन्धूस मिळणा-या भागास 'शुतुद्रि' (सतलज) असें म्हणूं लागलें असावेत.

४९सप्तसिंधव:- म्ह० सात नद्या. हा शब्द एकदांच ॠग्वेदामध्यें एका विशिष्ट देशाचें नांव म्हणून आलेला आहे. इतरत्र मात्र तो सात नद्या अशाच अर्थानें आलेला आहे. मॅक्समुलरच्या मतानें त्या, पंजाबमधल्या पांच नद्या, सिंधु व सरस्वती अशा या सात नद्या असाव्यात. इतर लोकांच्या मतानें सरस्वतीच्या ऐवजीं कुभा घ्यावी किंवा कदाचित् आक्सस नदी ही या सात नद्यांत असावी. झिमरच्या मतानें या नद्या आमक्याच होत हें ठरविणें निष्फळ आहे, व हेंच मत मॅकडोनेल यास ग्राह्य दिसतें. सात हा शब्द ॠग्वेद व तदुत्तर ग्रंथ यांमध्यें लेखकांचा फार आवडता आहे. सायणाचार्यांच्या मताप्रमाणें गंगा, यमुना, सरस्वती, शुतुद्री, परुष्णी, असिक्री आणि वितस्ता या त्या सात नद्या होत. ह्या सात नद्या 'इमं मे गंगे यमुने (१०.७५,५.) या ॠचे प्रमाणें घेतल्या आहेत, परंतु सिंधूला मिळणा-याहि सात नद्या असूं शकतील. कांही सरस्वतीऐवजीं कुभा घेतात. 'सप्तसिंधु शब्दाचा विचार करतांना एक गोष्ट केव्हांहि विसरुन चालणार नाही व ती ही कीं सध्या जो पंजाब शब्दानें ओळखला जाणारा प्रान्त आहे. त्यांत सातच मोठमोठाल्या नद्या आहेत. म्हणूनच पंजाबला पूर्वी सप्तसिंधु म्हणत असावेत.

५०सरयु:-ॠग्वेदामध्यें तिनदां हा शब्द नदीचे नांव म्हणून आलेला आहे. सरयु नदी ओलांडून तुर्वश व यदुलोक यांनीं चित्ररथ व अर्ण यांचा पराजय केला असें वर्णन आलेलें आहे. एके ठिकाणीं सरयु हा शब्द सिंधु व सरस्वती या शब्दांबरोबर आलेला आहे, व दुस-या एका ठिकाणीं रसा, अनितभा व कुभा या नांवांबरोबर तो आलेला आहे. वैदिक कालानंतरच्या वाङ्मयांत सरयू व क्वचित् प्रसंगी सरयु हें नांव अयोध्या प्रांतांतील जिला हल्लीं सर्जु म्हणतात तिचेबद्दल आलें आहे. झिमर म्हणतो कीं हीच सर्जु नदी वैदिक वाङ्मयांत आलेली सरयु समजली पाहिजे. ॠग्वेदांतील ज्या एका ॠचेवरुन (५.५३,९) सरयु ही पंजाबांतील नदी होती असें प्रतिपादण्यांत येतें तींत नैर्ॠत्य व ईशान्य हे पावसाळी वारे अभिप्रेत आहेत असें तो म्हणतो. हॉपकिन्सचें असें मत आहे कीं, ही नदी पश्चिमेकडे असावी व लुडविग म्हणतो कीं, ती व कुरुम (क्रुमु) या दोन्ही एकच आहेत. व्हिव्हिएन डी सेंट मार्टिनच्या मतें ही नदी व शुतुद्री व विपाश् (सतलज व बिआस) ह्या नद्या मिळून झालेली नदी या बहुधा एक असाव्यात. सरयु किंवा सर्जु म्हणजे सुप्रसिद्ध शरयु नदी होय. ही अयोध्येवरुन पुढें गंगेस मिळते. परंतु सरयु ही नदी पंजाबच्या बाजूस असावी हेंच जास्त संभवनीय आहे. कारण ॠग्वेदांत पंजाबाशिवाय इतरं भागांतील नद्यांचा उल्लेख नाहीं म्हटलें तरी चालेल. शिवाय त्या नदीचा उल्लेख ज्या स्थली आला आहे त्यावरुनहि सामीप्यानें उच्चारलेल्या नद्यांच्या आसपासच ती कोठें तरी असली पाहिजे. झेंद ग्रंथांतहि एक हरयू नदी आलेली आहे, व ती आणि ही एकच असावी. 'स' चा ह होणें ही गोष्ट प्रसिद्धच असून पूर्वपरिचित नांवें ठेवण्याची पद्धति मनुष्यस्वभावसिद्ध आहे.

५१सरस्वती.- ॠग्वेद व उत्तरकालीन ग्रंथ यांमध्यें हें एका नदीचें नांव म्हणून आलेलें आहे. उत्तरकालीन संहिताग्रंथांत कित्येक ठिकाणीं ही नदी म्हणजे सध्यां पत्याळा संस्थानच्या वाळवंटामध्यें जी अद्दश्य होते ती सरस्वती नदीच होय हें निश्चित आहे. रॉथचें सुद्धां असें मत आहे कीं ॠग्वेदामध्यें कांही ठिकाणीं (३.२३,४) हीच नदी अभिप्रेत असावी. द्दषद्वती व ही नदी या ब्रह्मावर्ताची पश्चिममर्यादा झाल्या होत्या. ही नदी वैदिक काळीं फार पवित्र मानली जात होती. या नदीतीरावर केलेले यज्ञ फार महत्वाचे व पावित्र्ययुक्त असत असें सूत्रांतहि म्हटलेलें आहे. परंतु ॠग्वेदांतील दुस-या अनेक सूक्तांत (उ.१,८९,३.) व उत्तरकालीन ग्रंथांतहि (उ. अथर्व ४.४,६; तै.सं. १.८,१३,३ बृहदारण्यकोपनिषद् ६.३,८) ही नदी म्हणजे सिंधूच होय असें रॉथचें म्हणणें आहे. असा अर्थ सरस्वतीचा घेतला तरच या सरस्वतीला नदीतमा (सर्व नदींत श्रेष्ठ) असें नांव कां दिलें गेलें, ती समुद्राला मिळते असें कां म्हटलें आहे व ही नदी मोठी असून हिच्या तीरावर अनेक राजे व पांच प्रकारचे लोक कसे वसाहत करुन राहिले होते याचा खुलासा होतो असें त्याचें म्हणणें आहे. हें मत झिमर व इतर लोक यांनां संमत आहे. उलटपक्षीं लॅसेन व मॅक्समुल्लर यांचें असें मत आहे कीं, वैदिककाळची सरस्वती नदी व मागाहून प्रसिद्धीस आलेली सरस्वती नदी या एकच होत. मॅक्समुल्लरच्या मतें वैदिककाळीं सरस्वती ही सतलज नदीप्रमाणें मोठी नदी होती; व ती सिंधुनदीला मिळाल्यानंतर किंवा एकाकीच समुद्राला मिळाली असेल. मॅक्समुल्लरच्या मतें ही नदी एके काळीं ब्रह्मावर्ताची पश्चिमेकडील अंतिम मर्यादा असून तिचा एखाद्या भक्कम किल्ल्याप्रमाणें संरक्षणाच्या कामीं उपयोग होऊं शकला असता. कारण, तो म्हणतो कीं वैदिक काळीं हिचा प्रवाह सतलज इतकाच मोठा असून ती स्वतंत्रपणें किंवा सतलजशीं संयोग पावून समुद्राला मिळत होती; व अशा रीतीनें ती पंजाब प्रांत व बाकीचा हिंदुस्थान यांमधील सरहद्द झाली होती. सरस्वती नदीच्या आकारांत किंवा मार्गांत पुढें कांही विशेष फरक पडला असल्याचा खात्रीलायक पुरावा उपलब्ध नाहीं; पण या नदीच्या आकारांत फरक पडला नसेल असें म्हणणें धाडसाचें आहे. तथापि वैदिक काळची सरस्वती व तदुत्तरकालीन सरस्वती या एकच आहेंत असें मानण्यास सबळ पुरावा आहे. या नदीचें स्वरुप दैवी आहे असें वर्णन जेथें ती पांच प्रकारच्या लोकांनां आधारभूत आहे असें म्हटलें आहे त्याच सूक्तांत आहे; व हें वर्णन पुढें जो तिला पवित्रपणा आला त्या वर्णनाशीं तंतोतंत जुळतें. शिवाय त्याच सूक्तांत पारावतांचा उल्लेख आलेला आहे. पंचविंश ब्राह्मणांत आलेल्या उत्तरकालीन पुराव्यावरुन हे पारावत लोक पूर्वेकडे रहात असत असें सिद्ध होतें; व सरस्वती जर सिंधु नदी मानली तर हा पूर्वेकडील देश या पारावतांच्या मूळच्या राहण्याच्या ठिकाणापासून फार दूर होतो. शिवाय सरस्वती नदीवर रहात असलेले पुरु (पूरु) लोक हे फार दूर अशा पश्चिमेकडील मुलुखांत राहात होते असें मानणें जरा कठिणच आहे. त्याचप्रमाणें ज्या अर्थी पश्चिमेकडील पांच जाती या कुरुक्षेत्रांतील भरतांच्या शेजारी होत्या त्या अर्थी त्या सरस्वतीवर रहात होत्या असें मानावयास कांही हरकत येत नाहीं, व मग सरस्वती नदी या उपर्युक्त अर्थानें पंजाबची मर्यादा होती हें उघडच होतें. पुन्हां एके ठिकाणीं 'सप्तसिंधु' असा जो उल्लेख आलेला आहे त्यावरुन एका जिल्ह्याचा बोध होतो. या सप्तसिंधू म्हणजे पंजाबांतल्या पांच नद्या, सिंधु व कुभा (काबुल नदी) अशा सात नद्या नव्हेत, तर पंजाबांतल्या पांच नद्या, सिंधु व सरस्वती अशा सात नद्या होत. सरस्वती नदी समुद्राला मिळतें असें कां म्हटलें आहें हें सांगणें अवघड नाहीं. एकतर वैदिक ॠषीनीं या नदीच्या समुद्राजवळील मुखापाशीं कधीं गमन केलें नसेल, किंवा ही नदी सिंध प्रांतांतल्या वालुकायम प्रदेशांत पूर्णपणें किंवा हिचा बराचसा भाग शिरला असेल; आणि ती वालुकामय प्रदेशांत लुप्त झाली आहे हा शोध ब्राह्मणकालांतच लागला असेल. आतां वाजसनेयि संहितेंत असें म्हटलें आह कीं, पांच नद्या सरस्वती नदीला मिळतात. पण हा लेख एकतर मागाहून लिहिलेला असून (देश शब्दावरुन ही गोष्ट सिद्ध होते) या नद्या पंजाबमधल्या आहेत कीं काय हें समजत नाहीं; व दुसरें असें की, या लेखाला दुस-या कोणत्याहि संहिताग्रंथांतल्या तत्सद्दश लेखाचा आधार नाहीं किंवा तो प्राचीन काळांतला लेख आहे असेंहि मानतां येत नाहीं. तो जर उत्तरकालीन असेल तर तो मागाहून प्रसिद्धीस आलेल्या सरस्वती नदीसंबंधानें असावा. हिलेब्रँटला एकंदरीत सरस्वतीबद्दलची ही विचारसरणी पसंत आहे. पण त्याचें असेंहि मत आहे कीं, या नदीवरुन जिला पुढें वैतरणी नदी असें लोक म्हणूं लागले त्या पौराणिक नदीचा व त्याचप्रमाणें अ‍ॅराकोशियामधील अर्धेदव नदीचा बोध होतो. हें मत कबूल करावयाचें म्हणजे ॠग्वेदाच्या सातव्या मंडलाच्या उलट, ॠग्वेदांतल्या सहाव्या मंडलांतील गोष्टी इराणी देशांत घडल्या ही हिलेब्रँटची उपपत्ति स्वीकारावी लागेल. पण हें उपर्युक्त मत व हिलेब्रँटची उपपत्ति हीं दोन्हीहि अग्राह्यच  आहेत. व्रूनहोफर एके काळी हिलेब्रँटच्या मताचा होता. पण पुढें सहाव्या मंडलांतील गोष्टी ऑक्सस नदीवर घडल्या असाव्या असें त्याचें मत झालें. पण हें तर अगदींच चुकीचें आहे. सरस्वती व सात नद्या यांचा संबंध जरा संदिग्ध आहे. ॠग्वेद ८.५४,४ मध्यें सरस्वती आणि सात नद्या यांची वेगवेगळी प्रार्थना केलेली आहे. व ॠ.६.६१,१०; १२ मध्यें हिला सात बहिणी असलेली (सप्तस्वसा) असें म्हटलें आहे. ॠ.७.३६,६ मध्यें तिला सातवी असें म्हटलें असल्यामुळें तेथें ती सातांपैकीं एक होते. पूर्वीचें लेख जर अगदीं बरोबर मानले तर सप्तस्वसा शब्दावरुन ती सरस्वती सात नद्यांहून निराळी होती असें सिद्ध होतें व मग सिंधु, कुभा व पंजाबांतल्या पांच नद्या अशा सात नद्या मानाव्या लागतात. पण या 'सप्तस्वसा' चा अर्थ सात बहिणींपैकीं एक असाहि चुकीनें करतां येईल.
वरील बहुतेक ॠग्वेदांतील स्थळें यांत सरस्वती शब्दाचा देवता असा अर्थ आहे. व इतर वेदांतील उतारे यांतहि निश्चित 'सरस्वती देवता' असाच अर्थ आहे. ॠग्वेद ८.५४,४ येथें सरस्वती व सप्तसिंधु असे वेगवेगळें उल्लेख आले आहेत. यावरुन सप्तसिंधु हें विशेषनाम आहे असें सिद्ध होतें.

५२सिंधु.- ॠग्वेद व अथर्ववेद यांमध्यें याचा अर्थ नुसता ओढा किंवा नदी असा असून सर्वांत श्रेष्ठ नदी सिंधु असाहि अर्थ या शब्दाचा आहे. हा शब्द सिंधु नदी अशा अर्थानें संहिताग्रंथानंतर क्वचितच येतो. व जेव्हां येतो तेव्हां त्याचा अर्थ अंतर असा आहे. सिंधुनदीकाठचे घोडे (सैधव) प्रसिद्ध होते.

५३सीलमावती.- ॠग्वेदामध्ये (१०.७५,८) ल्युडविगचे मतानें एका नदीचें हें नांव आहे. पण हें अगदी अशक्य दिसतें. सायणाचे मतानें याचा अर्य 'अंबाडीयुक्त' असा आहे. ज्या दोरीसारख्या वल्लीनें नांगर बांधला जातो, ती वनस्पति पुष्कळ जीमध्यें आहे, असें सिंधूचें वर्णन आहे असें सायणाचें मत आहे. सीलमावती (सीलमा=वल्ली) हें सिंधूचें विशेषण असावें. सायणानीं निश्चित अर्थ केला नाहीं. सायणाच्या मतानें ज्या दोरीनें नांगर बांधला जातो ती दोरी किंवा वनस्पति असा अर्थ होईल.

५४सुवास्तु.- ॠग्वेदामध्यें हें एका नदीचें नांव आलेलें आहे. ही नदी म्हणजे अ‍ॅरियनची सोएस्टॉस होय हें स्पष्ट आहे व हिलाच स्वात् हें नांव असून ती कुभा (काबूल नदी) नदीला मिळणारी नदी आहे. ही कुभा नदी सुद्धां सिन्धु नदीला मिळणारी उपनदी आहे.

५५सुषोमा.- ॠग्वेदामध्यें (१०.७५,५) नदीस्तुतींत एका नदीचें हें नांव आहे. इतर दोन ठिकाणीं हें विशेषनाम आहेसें दिसतें. एकदां पुल्लिंगी रुप असलेलें लोकांचें नांव व एकदां स्त्रिलिंगी नदीचें नांव आहे. रॉथच्या मतें हें एका सोमपात्राचें विशेषण आहे. ही नदी कोणची हें निश्चित नाहीं, पण मेगॅस्थिनीसच्या वेळची सोअ‍ॅनॉस किंवा अर्वाचीन सुवान् नदी ही असावी असें कांहीचें मत आहे. सायणाचार्यांचें मतानें हें विशेषण आहे. ॠ. ८.६४,११ येथें ही नदी आर्जीकीय नांवाच्या देशांत आहे असें म्हटलें आहे. सुषोम आणि आर्जीक यांचा संबंध स्पष्ट आहेंच परंतु सुषोम शब्द पुल्लिंगी आहे (ॠ. ८.७,२९).

५६सुसर्तु.- ॠग्वेदामध्यें नदीस्तुतीमध्यें एका नदीचें हें नांव आलेलें आहे. ही सिंधुनदीला मिळणारी उपनदी होती याबद्दल संशय नाहीं, पण ही कोणती उपनदी हें समजत नाहीं.

५७हरियूपीया.- ॠग्वेदामध्यें एका सूक्तामध्यें वृचीवंतांचा अभ्यावर्तिन् चायमानाकडून झालेल्या पराभवाचा प्रसंग म्हणून वर्णिलेला आहे. याचा अर्थ एकादें ठिकाण किंवा नदी असाहि होईल. कारण, पुष्कळ लढाया नद्यांच्या तीरांवर झालेल्या दिसतात. लुडविगच्या मतानें यव्यावती नदीवरील शहराचें हें नांव असावें व सायण आपल्या भाष्यांतहि असेंच म्हणतात. हिलेब्रँट म्हणतो कीं, ही इर्याब नदी कुरुम् (क्रुमु नदी) नदीला मिळणारी आहे; पण हें शक्य दिसत नाहीं. सायणाचार्य 'हरियूपीया' -'नगरी किंवा नदी' असें म्हणतात.

५८वरणावती.- अथर्ववेदामध्यें एके ठिकाणीं हा शब्द आला आहे. रॉथ म्हणतो त्याप्रमाणें हें नांव एका नदीचें असावें व लुड्विगच्या मतें ही नदी गंगा असावी. सायणाचार्याप्रमाणें ब्लूमफील्डला ही वल्ली असावी असें जरी वाटतें तरी नदीचें हें नांव असणें संभवनीय आहे हेंहि त्याला वाटतें. सायणाचार्याप्रमाणें नदी हा अर्थच विशेष संभवतो. वाराणशी शब्द वरणावतीपासून झाला असावा असें अनुमान करण्यास जागा आहे.

५९शीपाला.- हा शब्द अथर्ववेदामध्यें एकदां आलेला आहे व त्याचा अर्थ शीपालयुक्त तळें किंवा शीपाल नांवाची नदी किंवा सरोवर असा आहे. 'शेवाळयुक्त' असें सायणाचार्य विशेषण मानितात.

६०कारोती.- शतपथ ब्राह्मणांत (९.५,२,१५,) तुर:कावषेय यानें ज्या ठिकाणीं, किंवा नदीच्या काठीं, अग्निकुंड-म्हणजे अग्निहोत्राचें परम पवित्र स्थान-तयार केलें ती जागा किंवा ती नदी.

६१कौसित.- मैत्रायणी संहितेंत (२.१,११) कुसितायि निशाचराच्या संबंधांत हें एका सरोवराचें नांव आलें आहे. काठक संहितेंत (१०.५) याबद्दल कौसिद असा उल्लेख आहे. 'कुसितायी, कौसित, कुसितायिन्' हें हि शब्द तेथें आले आहेत. पाणिनी सूत्र (४.१,३७.) येथेंहि 'कुसित' 'कुसती' हे शब्द आले आहेत.

६२महार्णव - मोठा समुद्र हा समासघंटित शब्द-मागाहूनच्या मैत्रायणी उपनिषदा (१.४) पूर्वी आलेला आढळत नाहीं. मैत्रायणी उपनिषदांत मात्र ''महार्णवाचें कोरडें होणें'' हा एक मोठा चमत्कार म्हणून गणिला आहे.

६३सदानीरा.- 'सदाजलयुक्त असलेलीं' हें एका नदीचें नांव असून शतपथ ब्राह्मणाचे मतानें कोसल व विदेह या दोन देशांमधील ही मर्यादा होती. ऐतद्देशीय हिंदू कोशकारांचे मतानें ही नदी म्हणजे करतोया होय; पण ही नदी बरीच पूर्वेकडे आहे. वेबरच्या मतानें ही नदी म्हणजे गंडकी होय; व हें मत बहुतकरुन बरोबर असावें. कारण जरी महाभारतांत (२.७९४) या नद्या निरनिराळया आहेत असें म्हटलें आहे तरी याला कांही परंपरेचा किंवा दंतकथेचा आधार आहे असें दिसत नाहीं. शतपथ ब्राह्मणाप्रमाणें उत्तरगिरीपासून (हिमालय) वहात येणारी व तिला तरुन पूर्वी लोक गेले नव्हते, पण पुढें जाऊं लागले असा उल्लेख आहे. हीच जर 'करतोया' असेल तर तिला उल्लंघिलें असतां पुराणांत प्रायश्चित्त वर्णित आहे. शतपथ ब्राह्मणांत तें स्थल शुद्ध मानूं लागलें. असें असतां पुराणांतील प्रायश्चित्त कायमच आहे हें लक्षांत ठेवण्यासारखें आहे. 'करतोया सदानीरा बाहुदा सैतवाहिनी' निघण्टु:; असा सायणाचार्यानें उध्दृत केलेला निघन्टु आहे. परंतु अंग देशाच्या मर्यादा म्हणून सदानीरा व करतोया या दोन वेगळया नद्या भारतांत वर्णित आहेत व सध्याहि तशाच त्या दोन नद्या उपलब्ध आहेत असें रा. वैद्य म्हणतात. गण्डकी आणि सदानीरा एकच असावी हें विचारणीय आहे. तथापि सध्या या वेगळया आहेत व भारतांत वेगळया वर्णित आहेत.