प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

परिशिष्ट.

सहा छेदसूत्रे. - हीं जैन धर्मग्रंथांत मागाहूनच्या कालांत समाविष्ट झालीं असावींत, कारण नेहमीं ह्याचा धर्मग्रंथात समावेश करण्यात येत नाहीं. ह्यापैकीं अगदीं मूळ ग्रंथ ३-५ सूत्रें असून तो अत्यंत प्राचीन ग्रंथांत मोडतो. ह्या तीन सूत्रांना मिळून ''दसा-कप्प-ववहारा'' ही संज्ञा आहे. इतर विविध आख्यायिका धरून शिवाय ह्या छेदसूत्रमध्यें बौद्धाच्या ''विनय'' ग्रंथाप्रमाणें जैन जोगी व जोगिणी यांच्या आचाराचें ''नियम'' तपश्चर्येंचें वगैरे नियम, किंवा थोडक्यात सांगावयाचें म्हणजे जैनांची सांप्रदायिक सर्व माहिती आली आहे. ह्यापैकीं 'आयारदसाओ' किंवा ''दशश्रुतस्कंध'' ह्या नांवाने प्रसिद्ध असलेलें चवथें सूत्र ह्याचें कर्तृत्व दंतकथेप्रमाणें भद्रबाहु याजकडे देण्यांत येतें व ह्याचा ८ वा परिच्छेद ''भद्रबाहुकृत कल्पसूत्र'' ह्या नावानें पुष्कळ दिवस प्रसिद्ध आहे.

भद्रबाहु हा जैनांतील एक प्राचीन उपदेशक व मोठा ग्रंथकार म्हणून समजला जातो. महावीरानंतरचा तो सहावा थेर असून तो महावीरनिर्वाणानंतर १७० व्या वर्षी वारला असें समजतात. नष्टप्राय झालेलें पुव्व जाणणारा शेवटचा पुरुष भद्रबाहु हाच होय व नवव्या 'पुव्वा'तून तीन व चार हीं छेदसूत्रें त्यानेंच काढलीं अशी आख्यायिका सांगतात. कल्पसूत्रांमध्यें ज्या तीन निरनिराळ्या प्रकारच्या प्रकरणांचा एका ठिकाणी समावेश केलेला दिसतो. ती सर्व भद्रबाहूनें लिहिलीं असणें असंभवनीय आहे. पहिल्या परिच्छेदांत जिनचरित्र दिलें आहे. ह्या प्रकरणाचा मुख्य भाग महावीराचा जीवनवृत्तांत हा असून एकंदर कथाभाग सविस्तर रीतीनें बारिकसारिक गोष्टीसुद्धां अतिशयोक्तिपूर्ण पद्धतीनें काव्यमय भाषेंत लिहिलेला आहे व त्यावरून ललितविस्तर ह्या ग्रंथाची आठवण होते. महावीराचा गर्भवास, जन्म इत्यादि प्रसंग आयारंगसुत्ताप्रमाणेंच वर्णन केले आहेत. ह्यानंतर महावीरमाता देवानंदा हिला पडलेलीं १४ स्वप्नें व त्यांचा अर्थ, महावीराचें बाल्य, बाराव्या वर्षी त्यानें धारण केलेली तापसवृत्ति व तीस वर्षांच्या अवधींत त्यानें केलेली धार्मिक चळवळ इत्यादि गोष्टींचे वर्णन आहे. ह्याखेरीज महावीरापूर्वीच्या तीर्थंकराचीं व पूर्वीच्या पार्श्वनाथापर्यंतच्या जिनांची जीवनचरित्रें ह्या महावीरचरित्राच्या धर्तीवरच लिहिलेली आहेत व ती मुख्यत; साप्रदायिक उपयोगाकरितां आहेत.

कल्पसूत्राच्या दुसऱ्या परिच्छेदांत थेरावली, निरनिराळ्या गणांच्या याद्या, त्याच्या शाखा व त्याचे गणधर इत्यादि माहिती आहे. ही यादी भद्रबाहूच्या पुढील पुरुषांचाहि समावेश करते व त्यामळें ही भद्रबाहूची कृति नसावी. परंतु इ. सनाच्या पहिल्या शतकांत सापडलेल्या कोरीव शिलेखांवरून हीं यादींतील नावें केवळ दंतकथात्मक नसून ऐतिहासिक आहेत हें सिद्ध होतें.

कल्पसूत्रातील तिसरा परिच्छेद अत्यंत जुना असावा. ह्यामध्यें ''समाचारी'' अथवा तपस्व्यांनी पावसाळ्यांत पाळावयाचें नियम आहेत. ह्या कल्पसूत्रांचें पूर्ण नांव ''पज्जोसवणाकप्प'' (पर्युषणाकल्प) हें असून तें ह्याच भामास अन्वर्थक होतें व त्यावरून सांप्रतच्या कल्पसूत्रातील हाच भाग फार प्राचीन असावा ही गोष्ट संभवते. जिनचरित्र, थेरावली व सामाचारी हे भाग कल्पसूत्र ह्या नांवाखालीं मुळांत मोडत नव्हते, परंतु मागाहून देवर्द्धि यानें ''सिद्धांत' ग्रंथात त्याचा समावेश केला, ह्या जैन आख्यायिकेंत बराच सत्याश असावा असें दिसतें.

पाचव्या छेदसूत्रास अत्यंत प्राचीन व खरें कल्पसूत्र म्हणतां येईल. ह्या सूत्राचें नांव 'बृहत्कल्पसूत्र'' किंवा बृहत्साधुकल्पसूत्र असें आहे. जैन तपस्वी व तपस्विनी ह्यांचे आचरण कसें असावें ह्यावरील हा मुख्य ग्रंथ आहे. ह्याला पूरक असें ''ववहार'' नांवांचे तिसरे छेदसूत्र आहे. कल्पसूत्रामध्यें योग्य शासन केलें असतां शेवट परिणाम कसा गोड होतो हें दाखविलें असून व्यवहारामध्यें मिळालेल्या शासनाचा स्वीकार कसा करावा ह्याचा उपदेश आहे. 'निसीह' नांवाचें पहिलें छेदसूत्र उत्तरकालीन आहे. दैनिक आचारनियमाविरुद्ध घडून आलेल्या अनेक गुन्ह्याबद्दल कसें शासन करावें ह्याबद्दल ह्या ग्रंथांत नियम घालून दिले आहेत. पंचकल्प नांवाचें सहावें छेदसूत्र अद्यापि उपलब्ध झालेलें नाहीं. तथापि व्रतभंग केल्यामुळें योग्यतऱ्हेनें शिक्षा झालेल्यांची जिनभद्राने पद्यस्वरूपांत रचलेली जितकल्प नांवाची सविस्तर यादी हिलाच कधीं कधीं सहावें छेदसूत्र समजण्यांत येतें. ह्याचप्रमाणें पिण्ड व ओघनिज्जुत्ती ह्या आचारनियम विवरण करणाऱ्या ग्रंथांचाहि छेदसूत्रांत कधीं कधीं समावेश करण्यांत येत असतो. ह्या दोन्ही ''निज्जुती'' ग्रंथांच्या बराच मागाहूनच ''महागिसीह सुत्त'' नांवाचा ग्रंथहि दुसरें किंवा सहावें छेदसूत्र म्हणून समजण्यांत येतो. परंतु वस्तुत: जैन धर्मग्रंथांत ह्या ग्रंथांचा मोठ्या मुष्किलीनें समावेश करतां येणार आहे. सांप्रतचा ग्रंथ हा बहुतेक मूळ जुन्या नष्ट झालेल्या ''महानिसीह'' नामक धर्मग्रंथाच्या जागी रचून घातला असावा. निर्वाणाकडे नेणाऱ्या सोपानाच्या अत्यंत महत्त्वाच्या पायऱ्या ज्या पश्चात्ताप व तप त्या संबंधीं अनेक प्रकारच्या नियमाचें विवरण हाच ह्या ग्रंथाचा विषय होय. ह्यापैकीं नितीशास्त्राच्या भागामध्यें कर्मतत्त्वाप्रमाणें प्राण्यांस विविध प्रकारचीं सुखदु:खें कशीं भोगावीं लागतात ह्याबद्दल विवरण आहे. विशेषत: पावित्र्य वगैरे व्रतांचा भंग करण्याचें पातक, चांगले व वाईट तपस्वी ह्यांची लक्षणें इत्यादिकाबद्दल बरेच विवेचन ह्या ठिकाणीं आढळतें. त्याचप्रमाणें काहीं नवीन काढलेल्या व कांही जुन्या ग्रंथांतून घेतलेल्या कल्पित कथाहि ह्या ग्रंथामध्यें घुसडून दिल्या आहेत. ह्या ग्रंथाची भाषा व विषय, त्यातील तांत्रिक वाक्प्रचार, धार्मिकेतर ग्रंथांचे उल्लेख इत्यादि गोष्टींवरून सदर ग्रंथ बराच मागाहूनचा आहे ही गोष्ट सिद्ध होते. याखेरीज दुसरें ''मूलसूत्रें'' नांवाचे चार धर्मग्रंथ आहेत, त्यापैकीं पहिले तीन ग्रंथ वाङ्मयात्मक दृष्टीनें देखील अत्यंत महत्त्वाचे आहेत. ह्यापैकीं पहिले उत्तरझ्झयण किंवा उत्तराध्ययनसूत्र हें एक धार्मिक काव्य असून धर्मग्रंथाच्या बहुमोल भागांपैकीं हे एक आहे. ह्या काव्याचे ३६ परिच्छेद असून त्यांमध्यें नव्या जुन्या भागांचें संहितीकरण झालें आहे. ह्यांतील अत्यंत प्राचीन भाग म्हणजे उपदेशपर संवाद व कविता रूपकपूर्ण कथानकें व स्फुटप्रकरणें ह्या प्रकारचा असून तो प्राचीन भारतीय वैराग्यपर काव्यामध्यें गणला जातो व अशाच प्रकारचा भाग बौद्ध ''सुत्तनिपात'' वगैरेसारख्या ग्रंथांमधूनहि आढळतो. शिष्यांना उपदेशपर पाठ, स्फुट विषयाची मालिका वगैरे, त्याचप्रमाणें मुनीनें (१) मानवजन्म, (२) धर्मशिक्षण, (३) धर्मश्रद्धा व (४) आत्मदमन ह्या चार महत्त्वाच्या गोष्टींकरितां जे होतील ते हाल सोसले पाहिजेत अशीं वर्णनें पुष्कळ प्रकरणांत आहेत. त्याचप्रमाणें कर्मतत्त्व व पाप, सत्पुरुषाचें इच्छामरण व मूर्खाचे कुरकुरत मरणें, खरे व भोंदू तपस्वी इत्यादींबद्दल फार बहारीचीं वर्णनें आहेत. चित्ताकर्षक उपमा व जोरदार भाषा ह्यांनीं युक्त अशीं पुष्कळ सुभाषितेंहि ह्या ठिकाणीं सांपडतात ''सुत्तनिपात'' व 'धम्मपद' यांतील श्लोकांप्रमाणें या ग्रंथांतील कित्येक श्लोकांमध्यें एक सामान्य श्लोकार्ध आढळतो.

सातवा परिच्छेद हा बहुतके रूपकांनीं भरलेला आहे. ह्या ठिकाणीं तीन व्यापाऱ्यांची एक रूपकपूर्ण गोष्ट आली आहे. तिजवरून बायबलमधील ''टेंलटस'' च्या कथानकाचें स्मरण होतें. ही गोष्ट पुढीलप्रमाणें:-

''तीन व्यापारी प्रवासास गेले व जातांनां त्या तिघांनी आपापलें भांडवल बरोबर घेतलें. त्यापैकीं एक व्यापारांत पुष्कळ नफा मिळवून आला, दुसऱ्यानें पूर्वी जितका पैसा नेला तितकाच त्यानें परत आणला, व तिसऱ्यानें सर्व भांडवलाची उधळपट्टी केली. आतां हेच रूपक धर्मास कसें लागू करावयाचें तें पहा. ह्यातील भांडवल म्हणजे मानवजीवित होय, नफा म्हणजे स्वर्गांतील पुण्यभोग होतें व ज्यानें आपलें भांडवल उधळले त्यास नरकात साध्या क्षुद्र प्राण्याप्रमाणें पश्चात्ताप करण्याची पाळी येईल. ''

''सुत्तनिपात'' ग्रंथाप्रमाणें ''उत्तरझ्झयण'' सूत्रामध्यें अनेक सुंदर ऐतिहासिक संवाद व वैराग्यपर काव्य वाङ्मयातील अनेक गीतें आढळतात. ह्याशिवाय ज्यामध्यें क्षत्रियधर्म व राजधर्म ह्याविरुद्ध त्यागाचे ध्येय मांडलें गेलें आहे, अशा बौद्ध आख्यायिकाहि 'नेमि' राजाच्या सुंदर कवनांत आल्या आहेत. त्याचप्रमाणें हरिकेशाच्या गीतांत एक गर्विष्ठ ब्राह्मण व नीच जातीतील एक तिरस्कृत  विरागी ह्याचा जो मजेदार संवाद आला आहे त्यामध्यें ब्राह्मणधर्मांतील औपचारिक दंभ व पोवळ डौल यांची जैनमुनींच्या इंद्रियदमन, पावित्र्य इत्यादि गोष्टीशी परिणामकारक रीतीने तुलना केली आहे. पुरोहित व त्याचे पुत्र ह्यांमधील उत्कृष्ट संवादामध्ये देखील ब्राह्मणाच्या ध्येयापेक्षां त्या विरुद्ध असणारे जैनमुनींचे वैराग्यपर ध्येयच सर्वोत्कृष्ट असे दाखविले आहे. ह्या संवादापैकी कांहीं भाग शब्दश: महाभारत, पुराणग्रंथ, जातककथा ह्यामध्यें आढळून येतो, ह्या गोष्टींवरून हा संवाद भारतीयाच्या सामान्य वैराग्यपर वाङ्मयापैकी असल्याचें सिद्ध होतें.

२३व्या अध्यायांतील संभाषण जैनसंप्रदायाच्या इतिहासास अत्यंत उपयुक्त आहे. ह्यामध्यें पार्श्व व महावीर ह्यांचे दोन शिष्य आपापसांत आपआपल्या संप्रदायांतील भेद व त्यांपासून मिळणारे फायदे ह्यांबद्दल वाद करतांना दाखविले आहेत. एकंदर संवाद कांहींसा ब्रह्मोद्यासारखा गूढार्थपूर्ण प्रश्नोत्तररूपांत दाखविला आहे. बहुतेक सर्व गीत मध्यें संवाद हेच प्रमुखत्वानें दिसतात. फक्त २२व्या अध्यायांतील गीतांमध्यें कथानकांचा भाग. आंतील कृष्णविषयक आख्यायिकेमुळें व इतर कथानकातील गोष्टींमुळें अत्यंत मनोरंजक झाला आहे. तो थोडक्यात पुढील प्रमाणें:-

शायैपुंर नगरामध्यें दोन बलाढ्य राजे रहात असत. त्यापैकीं वसुदेवास त्याच्या रोहिणी व देवकी ह्या दोन बायकांपासून राम व केशव असे दोन पुत्र झाले होते. दुसऱ्या समुद्रविजय नामक राजास त्याच्या शिवा नामक स्त्रीपासून अरिष्टनेमि नावांचा पुत्र झाला होता. केशव यानें अरिष्टनेमि याजकरितां राजिमती नांवाच्या राजकन्येबद्दल मागणी घातली, व लग्नास अनुमति मिळवली. ह्याप्रमाणें अरिष्टनेमि आपल्या भावी पत्नीस आणण्याकरितां मोठ्या थाटानें निघतों; परंतु मार्गांत अनेक प्राणी पिंजऱ्यांत किंवा दुसऱ्या बंदिस्त ठिकाणी कोंडून ठेवलेले त्यास आढळतात. व त्यास असें कळून येतें कीं हे सर्व प्राणी त्याच्या विवाहप्रसंगी मारावयाचे आहेत. ह्या बातमीनें त्याचे मन इतकें उद्विग्न होतें कीं, तो अरिष्टनेमि सरतेशेवटीं वैराग्याचें व्रत धारण करतो. राजिमती राजकन्येस ज्या वेळीं ही बातमीं कळते त्यावेळीं ती शोक करूं लागते, परंतु मागाहून मनाचें सांत्वन करून तोहि जोगिणीचें व्रत घेण्याचें ठरवितें. अशा रीतीनें जोगिणीचे वेषांत इकडे तिकडे फिरत असातं पावसाच्या जोरदार सरीपासून आपला बचाव करण्याकरितां ती एका गुहेत शिरते, व त्या ठिकाणीं आपण एकटेच आहों असें वाटून अंगावरील कपडे वाळविण्या करितां ही नग्न होते. परंतु त्याच वेळी अरिष्टनेमीचा थोरला भाऊ रथनेमि हा त्याच गुहेंत येऊन बसलेला असतो व तो जेव्हां राजिमतीचें नग्नावस्थेंतील सौंदर्य पाहतो, तेव्हां त्याच्या अंत:करणांत काम वासना उत्पन्न होऊन तो आपलें तिजवरील प्रेम जाहीर करतो. तथापि राजिमती त्याचा धिक्कार करते व ''दुसऱ्यांनी थुंकून टाकलेलें (अधरामृत) प्राशन करण्याकरितां'' मागण्याचा हट्ट न करण्याबद्दल सांगते. तिच्या ह्या जोरदार भाषणानें त्याला आपल्या व्रताचें स्मरण होऊन, अंकुशानें पतरवलेंल्या हत्तीप्रमाणें, पुन: त्याचें चित्त धर्माकडे वळतें.

ह्या काव्यमय भागास विरोधी म्हणूनच कीं काय ह्या ग्रंथाच्या २४, २६ व ३६ ह्या अध्यायांमध्यें जैनाच्या संप्रदायाची माहिती व आचारसंबंधी रुक्ष नियन हीं आलीं आहेत.

'आवश्यक' किंवा 'षडावश्यकसूत्र' हें दुसरें मूलसूत्र असून त्यामध्यें जैनांनीं रोज पाळावयाच्या सहा आवश्यक गोष्टी:-(१) पापनिवृत्ति, (२) २४ जिनांची स्तुति, (३) गुरुविषयीं आदर, (४) पश्चाताप (५) तप (६) पापांचा तिरस्कार ह्यांजबद्दल विवेचन आहे. ह्या विवेचनाबरोबर कांहीं कथानकेंहि वर्णन केलीं आहेत व ती टीकांमध्ये उल्लेखिली आहेत.

'दसवेयालिय' तिसरें मूलसूत्र असून ते शय्यंभव किंवा सजंभव ह्या ग्रंथकारानें रचलें असल्याबद्दल आख्यायिका आहे. ह्यामध्यें मठवासाच्या आयुष्याबद्दल सुभाषितें आहेत, त्यावरून 'धम्मपद' या ग्रंथाचें स्मरण होतें. ह्या सूत्राच्या दुसऱ्या अध्यायांत उत्तरझ्झयनांतील राजिमतीच्या कथानकांस पुरक म्हणून कांहीं जास्त कविता घातलेल्या आहेत व त्यामध्यें राजिमतीनें, तिला भ्रष्ट करण्यास सज्ज झालेल्या रथनेमीची खरडपट्टी काढली आहे. ह्या सूत्राला पूरक अशा टीकाग्रंथामध्यें बरेच कथावाङ्मय आहे.

ह्या धर्मग्रंथसमहाबाहेरील परंतु धर्मग्रंथांपैकीच असे 'नंदी' व 'अणुरोगधार' हें विश्वकोषात्मक दोन ग्रंथ असून त्यांमध्यें प्रत्येक जैनास अवश्यक असलेल्या माहितीचा संग्रह केला आहे. तथापि ह्यांमध्यें केवळ धार्मिक विषयांचेच विवेचन आहे असें म्हणतां येत नाहीं, तर त्यामध्यें काव्याचा आत्मा 'रस' व काव्याच्या 'रीति' इत्यादिबद्दल माहिती आहे. शास्त्रीय ग्रंथामध्यें कौटिल्यअर्थशास्त्र व घोटकमुखाचे कामशास्त्र ह्याचे उल्लेख आहेत.

ह्याप्रमाणें थोडक्यांत श्वेतांबर जैनांच्या धर्मग्रंथासंबंधीं हकीगत आहे. तथापि दिगंबरांच्या सिद्धांताबद्दल अद्याप फार थोडी माहिती उपलब्ध आहे. दिगंबर जैनहि १२ अंगे मानतात. सहाव्या अंगाचें नाव ''ज्ञातृधर्मकथांग'' आहे व दिगंबर जैन १२ व्या अंगाच्या ५ भागांत १४ पुव्वांचा समावेश करतात. 'दृष्टिवाद' नामक पहिल्या भागांत चंद्रप्रज्ञाप्ति, सूर्यप्रज्ञाप्ति व जंबुद्वीपप्रज्ञाप्ति ही प्रकरणें मोडतात. ज्या धर्मग्रंथांचा अंगांमध्यें समावेश होत नाहीं त्यांस ''गाही'' संज्ञा आहे. हे ''अंगबाह्य''किंवा प्रकीर्णक १४ असून ''अज्ञ जनांच्या कल्याणाकरितां'' रचले असल्याबद्दल जैनांत अख्याइका आहे. पहिले चार अंगबाह्य' संज्ञेवरून २ऱ्या मूलसूत्राच्या प्रकरणाशीं जुळतात. ह्या खेरीज श्वेतांबरांच्या धर्मग्रंथापैकीं फक्त ''दश वैकालिक'' ''उत्तराध्ययन'' व ''कल्पव्यवहार'' ह्यांचा दिगंबरांच्या अंगबाह्यांत समावेश होतो. ह्यावरून एवढें मात्र नि:संशय म्हणतां येतें कीं ह्या दोन्ही जैन पंथांनां जे सामान्य धर्मग्रंथ मान्य आहेत ते अत्यंत प्राचीन होत, परंतु ह्यासारखीं नांवें असलेल्या दोन्ही पंथांच्या धर्मग्रंथामध्ये अंतर्गत विषयसाम्य किती आहे ह्याची मात्र नीट छाननी झाली पाहिजे. जैनांच्या इतर ग्रंथांचा विचार शरीरखंडांत सांपडेल.