प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १३ वें.
सेमेटिक संस्कृतीची जगदव्यापकता
निवडानिवड व जुळवाजुळव.- (१) निवडनिवड - आद्य ख्रिसतसंप्रदायप्रसारकांच्या काळांत ख्रिस्ती लोकांची अशी भावना होती कीं, आपण एका अतिमानवी चळवळीच्या प्रवाहांत पुढें चाललों आहोंत. या चळवळीस पेटिकॉस्टच्या दिवशीं म्हणजे यहुदी लोक मिसर देशांतून निघाल्यानंतर सात आठवड्यांनीं सुरूवात होऊन पहिल्या शतकाच्या अखेर पावेतों ती जोरांत चालू होती; आणि जेव्हां ती कमी होऊं लागली तेवहा देखील ती हळूहळूच कमी झाली. हा अवस्थांतराचा क्षण डायडॅचीमध्यें स्पष्टपणें दृग्गोचर होतो. तेथें पूर्वींच्या आद्य संप्रदायप्रसारकांची व प्रवक्त्यांची जागा हळू हळू बिशप, प्रेसबिटर, डीकन वगैरे चर्चचे कायम अधिकारी घेत असल्याचें दृष्टोत्पत्तीस येतें. ज्याला आपण हल्लीं नवा करार म्हणतों, तो टिकून राहण्याचें कारण, तें उपर्युक्त मोठ्या चळवळीच्या चांगल्या दिवसांतील वाङ्मय आहे अशी समजूत होती हें होय. या काळांत चर्चमध्यें ''पवित्र आत्म्याचा'' विशेषेंकरून जास्त संचार होता; आणि त्याच्या प्रेरणेंनेंच नव्या करारांतील लेख लिहिले गेले अशी लोकांची प्रामाणिक समजूत होती. उदाहरणार्थ, आपण जो कांहीं उपदेश करतों तो ईश्वराच्या प्रेरणेनेंच करीत असतों व म्हणून आपले शब्द ते ईश्वराचेच शब्द आहेत असा सेंट पॉल याचा पूर्ण विश्वास होता. (१ थेस्सली नीकेकरांस पत्र २.१३) पॉल प्रमाणेंच इतर उपदेशकांनांहि कमीजासत प्रमाणांत तसें वाटत होतें. उपदेशकांच्या मनांतील ही जाणीव आपोकालिप्स मध्यें स्पष्टपणें व्यक्त झाली आहे.
या आद्यकालीन लोकांनां आपल्या कार्याच्या महत्त्वाची व त्यासाठीं लागणारे गुण आपल्या अंगीं असल्याबद्दलची जाणीव होती हें जरी खरें आहे, तरी या काळांतील आज उपलब्ध असलेले सर्व लेख (कदाचित् यास आपोकालिप्स अपवाद असेल, किंवा सात चर्चनां लिहिलेल्या पत्रावरून दिसतें त्याप्रमाणें आपोकालिप्ससुद्धां) प्रसंगानुसार आणि स्वाभावीक रीत्या निर्माण झाले होते यांत शंका नाहीं. आद्य संप्रदायप्रसारकांचा व प्रवक्त्यांचा आयुष्यक्रम व त्यांचीं कृत्यें हीं एकंदरींत इतर लोकांहून भिन्न नव्हतीं; केवळ संप्रदायप्रसाराच्या विशिष्ट कार्यापुरतेंच या लोकांनां आपण कोणी दैवी शक्ति अंगीं संचरलेले असे मोठे पुरूष आहोंत असें वाटत होतें. आपण ईश्वरी प्रेरणेनें केव्हां बोलत आहोत व केव्हां नाहीं, हें स्वतः पॉलला देखील कळत होतें; आणि तें कांहीं अंशीं आपणांस त्याच्या पत्रांत देखील ओळखतां येतें. हाच नियम इतर लेखकांसहि लागू आहे असें म्हणावयास हरकत नाहीं. तिसरें शुभवर्तमान व प्रेषितांची कृत्यें यांसारख्या ऐतिहासिक पुस्तकांत लेखक इतर सामान्य माणसांप्रमाणेंच इतिहास देतांना दृष्टीस पडतो; व आपण कांहीं अधिक करीत आहोंत असें तो दाखवीतहि नाही (१.१-४). इतिहासलेखनाच्या शास्त्रीय पद्धतीशीं हे लेखक अपरिचित असल्यामुळें त्यांच्या ग्रंथांत इतिहासाच्या दृष्टीनें चुका राहणें अपरिहार्य होतें. स्वतः लेखकहि आपण अगदीं बिनचूक माहिती देत आहोंत या भावनेनें लिहीत असलेले दिसत नाहींत. आतांपावेतों वर्णन केलेले पूर्वकालीन लेखक व तदुत्तरकालीन लेखक यांच्या लेखांतील मुख्य फरक म्हटला म्हणजे, या पहिल्या काळांतील लेखकांचा ज्या चर्चचे आपण अंगभूत आहोंत त्याची एकंदर चळवळ ईश्वरीप्रेरणेनें चालली आहे असा विश्वास होता, तर तदुत्तरकालीन लेखकांचा तो तसा नव्हता.
तथापि पहिल्या काळांतील आधिदैविक प्रेरणा अमुक एका वेळीं नाहीशी झाली असें आपणांस नक्की सांगतां येत नाहीं. रोमचा क्लेमेंट (इ .स. ९७) आणि इग्नेशिअस [अजमासें इ .स. ११०] या दोघांचे लेख अवस्थांतराच्या काळांतील आहेत. उदाहरणार्थ इग्नेशिअस हा आपला दर्जा आद्य संप्रदायप्रसारकाइतका श्रेष्ठ नाहीं असें स्पष्ट सांगतो; तथापि त्याला देखील कधीं कधीं आपण ईश्वरी प्रेरणेनें बोलत आहों असें वाटत होतें. क्लेमेंटनें सुद्धां याचप्रमाणें दोन ठिकाणीं जणूं काय याच्या मार्फत ईश्वरच बोलत आहे अशा रीतीनें लिहिलें आहे.
(२) जुळवाजुळव.- अशा रीतीने उच्च दर्जाच्या व हलक्या दर्जाच्या लेखांत भेद करण्याच्या प्रवृत्तीबरोबरच उच्च दर्जाच्या लेखांच्या संहितीकरणाच्या कामास सुरूवात झाली. या प्रवृत्तीचें सर्वांत जुनें उदाहरण पॉलच्या पत्रांसंबंधांत दिसून येतें. मार्शिअन (अजमासें इ. स. १४०) याच्याजवळ पॉलच्या १३ पत्रांपैकीं दहांचीं संहिता होती. तथापि हे संहितीकरणाचें काम मार्शिअन याच्या एक पिढी अगोदर पासूनच होऊं लागलें असावें. पॉलिकार्प (पत्रगुच्छ) मधील लहान पत्रांत पॉलच्या १३ पत्रांपैकीं ९ पत्रांचा उल्लेख सांपडतो. याच्या किंचित् काळ अगोदर लिहिणारा इग्नेशिअस हा सहांचा स्पष्ट उल्लेख करतो. या दोन पुरूषांनीं उल्लेखिलेल्या पत्रांवरून त्यांनां सर्व तेराच्या तेरा पत्रांचा संग्रह पहावयास मिळत असावा असें अनुमान निघूं शकतें. पॉलिकार्पवरून मोठ्या लोकांचे लेख गोळा करण्याची लोकांना किती आवड होती हें स्पष्ट होतें.
पॉलच्या पत्राचें संहितीकरण करण्यांत आलें होतें यावरून ती पवित्र मानलीं जात होतीं असें मात्र अनुमान निघूं शकत नाहीं. त्यांच्याबद्दल लोकांच्या मनांत केवळ आदरयुक्त भावना होती एवढेंच कायतें.
इरिनिअसमधील एका प्रसिद्ध वचनावरून त्या वेळी चर्चमध्यें सामान्यतः फक्त ४ शुभवर्तमानेंच ठेवलीं जात असत असें दिसतें. तथापि त्या काळीं सुद्धां चौथें शुभवर्तमान न मानणारा एक पक्ष होता, व मार्शिअन हा तर फक्त लूकचें शुभवर्तमानच प्रमाणभूत मानतो. परंतु इरिनीअसच्या लिहिण्याचा रोंख असा दिसतो कीं, [अजमासें इ .स. १८५] त्याच्या आठवणींतल्या काळापासून चा-हीचीं चा-ही शुभवर्तमानें आधारभूत मानलीं जात आलीं होतीं. इ .स. १७० च्या सुमारास टेशिअन यानें या चार शुभवर्तमानांचा उपयोग करून आपला ग्रंथ लिहिला. त्यानें या चारांशिवाय दुस-या एखाद्या शुभवर्तमानाचा उपयोग केला असल्यास तो फारच थोडा असला पाहिजे. तेव्हां इरिनीअस व टेशिअन यांनीं उल्लेखिलेल्या चार शुभवर्तमानांचे श्रेष्ठत्व दुस-या शतकाच्या मध्यांत प्रस्थापित झालें होतें असें सामान्यत: मानण्यास हरकत दिसत नाहीं. अर्थात् या चारांशिवाय दुसरें एखादें शुभवर्तमान मधून मधून कोणी प्रमाणभूत मानीत नसेल असें नाहीं. ही निवडानिवड करण्याची क्रिया यानंतरहि पुढें चाल राहून दुस-या शतकाच्या अखेरीस ती संपूर्ण झाली असावी.
येणेंप्रमाणें चर्चनें केलेली निवड अगदीं पूर्णपणें बरोबर असेलच असें म्हणतां येत नाहीं. अस्सल म्हणून निवडलेले कांहीं भाग तसे नसतील तर उलट पक्षीं टाकून दिलेल्या पैकीं कांहीं भाग अस्सलहि असूं शकतील. परंतु सामान्यतः आद्यकालीन चर्चनें केलेली निवडच उत्तरकालांत कायम केली असें म्हणावयास हरकत नाहीं.
आतां उतारे घेऊन नव्या कराराच्या स्वरूपाचें स्पष्टीकरण करूं. शुभवर्तमानें तयार कशीं झालीं याचा वृत्तांत मागें दिलाच आहे. येशूचीं चरित्रें त्याच्या वधानंतर जर दोन पिढ्यानीं लिहिलीं गेलीं तर त्याचें विश्वसनीय चरित्र कमी स्पष्ट झालें आहे. शुभवर्तमानामध्यें येशूच्या ठायीं ईश्वर पुत्रत्व स्थापन झालें आणि अनेक चमत्कारांचे कर्तृत्व त्याच्या ठायी आरोपिलें गेलें. ते चमत्कार आपण वगळून व आख्यायिकाहि वगळून येशूचे उपदेश काय होते त्याच्याकडे लक्ष देऊं त्याच्या उपदेशांत प्राचीन प्रवक्त्यांपासून त्यांस निराळें पण आणणारें कांहीं तरी विशेष होतें असें दिसून येतें. त्याचें डोगरावरील प्रवचन फार प्रख्या आहे त्याचें प्रथम अवतरण करूं.
''तेव्हां लोकसमुदायास पाहून तो डोंगरावर गेला, व खालीं बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. २ आणि तो तोंड उघडून त्यांस शिकवूं लागला कीं, ३ जे आत्म्यानें ''दीन'' ते धन्य, कारण स्वर्गाचें राज्य त्यांचें आहे. ४ ''जे शोक करितात'' ते धन्य, कारण “ते सांत्वन पावतील.'' ५ ''जे सौम्य'' ते धन्य, कारण ''ते पृथ्वीचें वतन पावतील.'' ६ जे धार्मिकतेचे भुकेले व तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. ७ ''जे अंतःकरणानें शुद्ध'' ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. ९ जे शांति करणारे ते धन्य, कारण त्यांस देवाचे पुत्र म्हणतील. १० धार्मिकतेकरितां ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचें राज्य त्यांचें आहे. ११ जेव्हां माझ्यामुळें लोक तुमची निंदा व छळ करतील व तुम्हांविरुद्ध सर्व प्रकारचें वाईट लबाडीनें बोलतील तेव्हां तुम्ही धन्य. १२ आनंद व उल्हास करा, कारण स्वर्गांत तुमचें प्रतिफळ मोठें; कारण तुम्हांपूर्वीं जे प्रवक्ते होऊन गेले त्यांचा त्यांनीं तसाच छळ केला.
१३ तुम्ही पृथ्वीचें मीठ आहां; जर मिठाचा मीठपणा गेला तर त्याला मीठपणा कशानें येईल? तें बाहेर टाकिलें जाऊन माणसांच्या पायांखालीं तुडविलें जावें याशिवाय कोणत्याहि उपयोगाचें नाहीं. १४ तुम्ही जगाचा प्रकाश आहां; डोंगरावर वसलेलें नगर लपत नाहीं; ३५ दिवा लावून मापाखालीं ठेवीत नाहींत; दिवठणीवर ठेवितात, म्हणजे तो घरांतील सर्वांवर उजेड पाडितो; १६ त्याप्रमाणें तुमचा उजेड लोकांपुढें पडो, यासाठीं कीं, त्यांनीं तुमचीं चांगलीं कामें पाहावीं, आणि तुमच्या स्वर्गांतील बापाचें गौरव करावें.
१७ मी नियमशास्त्र व प्रवचनशास्त्र हीं रद्द करावयास आलों असें समजूं नका; रद्द करावयास नाहीं, तर पूर्ण करायास मी आलों आहें. १८ मी तुम्हांस खचीत सांगतों, कीं आकाश व पृथ्वी नाहींशीं होतपर्यंत सर्व गोष्टी पूर्ण झाल्यावांचून नियमशास्त्राची एक मात्रा किंवा एक बिंदु नाहींसा होणार नाहीं. १९ यास्तव जो कोणी या अगदीं लहान आज्ञांतील एक रद्द करील व तद्नुसार लोकांस शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यांत अगदी लहान म्हणतील, आणि जो कोणी त्या पाळीत व शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यांत मोठा म्हणतील २० मी तुम्हांस सांगतों कीं, शास्त्री व परूशी यांच्यापेक्षां तुमची धार्मिकता अधिक असल्यावांचून स्वर्गाच्या राज्यांत तुमचा प्रवेश होणारच नाहीं.
२१ ''मनुष्यहत्या करूं नको,'' आणि जो कोणी मनुष्यहत्या करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल असें प्राचीन लोकांस सांगितलें होतें, हें तुम्ही ऐकिलें आहे. २२ मी तर तुम्हांस सांगतों कीं, जो कोणी आपल्या भावावर रागें भरेल तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल; आणि जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा, असें म्हणेल, तो वरिष्ठ सभेच्या दंडास पात्र होईल, आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा, असें म्हणेल तो अग्निनरकाच्या दंडास पात्र होईल. २३ यास्तव तूं आपलें दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असतां, तूं आपल्या भावाचा अपराधी आहेस असें तेथें तुला स्मरण झालें, २४ तर तेथेंच वेदीपुढें आपलें दान तसेंच ठेव आणि जा , प्रथम आपल्या भावाशीं समेट कर, आणि मग येऊन आपलें दान अर्पण कर. २५ तूं आपल्या वाद्याबरोबर वाटेंत आहेतस तोंच लवकर त्याशीं समेट कर, नाही तर कदाचित् वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, व न्यायाधीश तुला शिपायाच्या हातीं देईल, व तूं बंदीशाळेंत पडशील. २६ मी तुला खचीत सांगतो, तूं दमडीन दमडी फेडशील तोंपर्यंत तींतून सुटणारच नाहींस.
२७ ''व्यभिचार करूं नको'' म्हणून सांगितलें होतें हें तुम्ही ऐकिलें आहे. २८ मी तर तुम्हांस सांगतों कीं, जो कोणी स्त्रीकडे कामदृष्टीनें पाहतो त्यानें आपल्या अंतःकरणात तिजशी व्यभिचार केलाच आहे. २९ तुझा उजवा डोळा तुला अडखळवितों तर तो उपटून टाकून दे, कारण तुझें संपूर्ण शरीर नरकांत टाकलें जावें यापेक्षां तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा यांत तुझें बरें आहे. ३० आणि तुझा उजवा हात तुला अडखळवितो तर तो तोडून टाकून दे, कारण तुझें संपूर्ण शरीर नरकांत पडावें यापेक्षां तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा यांत तुझें बरें आहे. ३१ ''कोणी आपली बायको टाकिली तर त्यानें तिला सूटपत्र द्यावें,'' हेंहि सांगितलें होतें. ३२ मी तर तुम्हांस सांगतों कीं, जो कोणी आपली बायको व्यभिचाराच्या कारणावांचून टाकितो तो तिला व्यभिचारिणी करितो, आणि जो कोणी अशा टाकिलेलीशीं लग्न करितो तो व्यभिचार करितो.
३३ ''खोटी शपथ वाहूं नको,'' तर ''आपल्या शपथा प्रभूपाशीं ख-या कर'' म्हणून प्राचीन लोकांस सांगितलें होतें, हेंहि तुम्हीं ऐकिलें आहे. ३४ मी तर तुम्हांस सांगतों कीं, शपथ म्हणून वाहूंच नको; ''स्वर्गाची'' नको, कारण ''तो देवाचें सिंहासन आहे''; ३५ ''पृथ्वीचीहि'' नको, कारण ''ती त्याचें पादासान आहे''; यरूशलेमेचीहि नको, कारण ''ती थोर राजाचें नगर'' आहे. ३६ आणि आपल्या मस्तकाचीहि शपथ वाहू नको, कारण तुझ्यानें एकहि केंस पांढरा किंवा काळा करवत नाहीं. ३७ तर तुमचें बोलणें होय होय, किंवा नाही नाहीं, एवढेंच असावें; याहून जें अधिक तें वाईटापासून आहे. ३८ ''डोळ्याद्दल डोळा'' व ''दांताबद्दल दांत'' असें सांगितलें होतें, हें तुम्हीं ऐकिलें आहे. ३९ मी तर तुम्हांस सांगतों कीं, दुष्टाला अडवूं नका; तर जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारील त्याकडे दुसरा गाल कर; ४० जो तुजवर फिर्याद करून तुझी बंडी घेऊं पाहतो, त्याला तुझा अंगरखाहि घेऊं दे; ४१ आणि जो कोणी तुला वेठीस धरून एक कोस नेईल त्याबरोबर दोन कोस जा. ४२ जो तुजजवळ मागतो त्याला दे, आणि जो तुजपासून उसनें घेऊं इच्छितो त्याला पाठमोरा होऊं नको.
४३ ''आपल्या शेजा-यावर प्रीति कर'', व आपल्या वै-याचा द्वेष कर असें सांगितलें होतें, हें तुम्ही ऐकिलें आहे. ४४ मी तर तुम्हांस सांगतों कीं, तुम्ही आपल्या वै-यावर प्रीति करा आणि जे तुमचा छळ करितात त्यासाठीं प्रार्थना करा, ४५ म्हणजे तुम्ही आपल्या स्वर्गांतील बापाचे पुत्र व्हाल; कारण तो वाईटांवर व चांगल्यावर आपला सूर्य उगवितो, आणि धार्मिकांवर व अधार्मिकांवरहि पाऊस पाडितो, ४६ जे तुम्हांवर प्रीति करितात त्यांवर तुम्ही प्रीति करितां तर तुम्हाला काय प्रतिफल ? जकातदारहि तसेंच करितात कीं नाहीं ? ४७ आणि तुम्ही आपल्या भाऊबंदास मात्र सलाम करितां तर तुम्ही त्यांत विशेष काय करितां विदेशीहि तसेंच करितात कीं नाही ? ४८ यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे, तसे तुम्ही पूर्ण व्हा.
मनुष्यांनीं पाहावें या हेतूनें तुम्ही आपलें धर्माचरण त्यांच्या समोर न करण्याविषयीं जपा; केलें तर तुमच्या स्वर्गांतील बापापाशीं तुम्हांस प्रतिफल नाहीं.
२ यास्तव तूं धर्म करितोंस तेव्हां ढोंगी जसे मनुष्यांनीं आपली कीर्ति वर्णावी म्हणून सभास्थानांत व रस्त्यांत आपणांपुढें करणा वाजवितात, तसें करूं नको, मी तुम्हांस खचीत सांगतों कीं, ते आपलें प्रतिफल भरून पावले आहेत. ३ तूं तर धर्म करितास तेव्हां तुझा उजवा हात काय करितों हें तुझ्या डाव्या हाताला कळू नये; ४ या साठीं कीं तुझें धर्म करणें गुप्तपणें व्हावें, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल.
५ आणि तुम्ही प्रार्थना करितां तेव्हां ढोंग्यासारिखे होऊं नका; कारण मनुष्यांनीं आपणांस पाहावें म्हणून सभास्थानांत व चवाठ्यांवर उभें राहून प्रार्थना करणें त्यांस आवडतें. मी तुम्हांस खचीत सांगतों कीं, ते आपलें प्रतिफल भरून पावले आहेत. ६ तूं तर प्रार्थना करितोस तेव्हां ''आपल्या खोलींत जा. व दार लावून'' आपल्या गुप्तवासी पित्याची ''प्रार्थना कर'' म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. ७ तुम्ही प्रार्थना करितां, तेव्हां विदेश्यांसारखी व्यर्थ बडबड करूं नका, आपल्या बहुभाषणामुळें आपलें मागणें मान्य होईल असें त्यांस वाटतें. ८ तुम्ही तर त्यांसारिखे होऊं नका, कारण तुम्हांस जें कांहीं अवश्य आहे तें तुम्हीं मागितल्यापूर्वीं तुमचा बाप जाणतो. ९ यास्तव या प्रकारें प्रार्थना करा; ''हे आमच्या स्वर्गांतील पित्या, तुझें नाम पवित्र मानिलें जावो. १० तुझें राज्य येवो. जसें स्वर्गांत तसें पृथ्वीवरहि तुझ्या इच्छेप्रमाणें होवो. ११ आमची प्रतिदिवसाची भाकर आज आम्हांस दे. १२ आणि जसें आम्हीं आपल्या ॠण्यांस ॠण सोडिलें आहे तशीं, तूं आमचीं ॠणें आम्हासं सोड. १३ आणि आम्हांस परिक्षेत आणूं नको; तर आम्हांस वाईटापासून सोडीव.'' १४ जर तुम्ही मनुष्यांच्या अपराधांची क्षमा करितां तर तुमचा स्वर्गींय पिता तुमची क्षमा करील; १५ परंतु जर तुम्ही मनुष्यांच्या अपराधांची क्षमा करीत नाहीं, तर तुमचा पिता तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाहीं.
१६ तुम्ही उपास करितां तेव्हां ढोंग्यासारिखे म्लानमुख होऊं नका, कारण आपणांस उपास आहे असें मनुष्यांस दिसावें, म्हणून ते आपलें तोंड विरूप करितात. मी तुम्हांस खचीत सांगतो कीं, ते आपलें प्रतिफल भरून पावले आहेत. १७ तूं तर उपास करितोस तेव्हां आपल्या डोक्याला तेल लाव, व आपलें तोंड धू; १८ यासाठीं कीं तूं उपास करितोस हे मनुष्यांस दिसावें म्हणून नव्हे, तर तुझा गुप्तवासी पिता याला दिसावें, म्हणजे तुला गुप्तदर्शी पिता तुला फल देईल.
१९ पृथ्वीवर आपणांकरितां संपत्ति सांठवूं नका, तेथे कसर व जंग खाऊन नाश करितात, आणि चोर घर फोडून चोरी करितात; २० तर स्वर्गांत आपणांकरितां संपत्ति सांठवा; तेथें कसर व जंग खाऊंन नाश करीत नाहींत, व चोर घर फोडून चोरी करीत नाहींत; २१ कारण जेथें तुमची संपत्ति आहे तेथें तुमचें चित्तहि असणार. २२ डोळा शरीराचा दिवा आहे, यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझें संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल. २३ आणि तुझा डोळा सदोष असला तर तुझें संपूर्ण शरीर अंधकारमय होईल; यास्तव तुझ्यांतील प्रकाश अंधार असला, तर तो अंधार केवढा? २४ कोणाच्यानें दोन धन्यांची चाकरी करवत नाहीं, कारण तो एकाचा द्वेष करील व दुस-यावर प्रीति करील; अथवा एकाशी निष्ठेनें वागेल व दुस-याला तुच्छ मानील. तुमच्यानें देवाची आणि धनाची सेवा करवत नाहीं. २५ यास्तव मी तुम्हांस सांगतों कीं, आपल्या जीवाविषयीं, म्हणजे आपण काय खावें व काय प्यावें; आणि आपल्या शरीराविषयीं, म्हणजे आपण काय पांघरावें अशी काळजी करूं नका. अन्नापेक्षां जीव वस्त्रापेक्षां शरीर विशेष आहे कीं नाहीं ? २६ आकाशांतील पांखरें पाहा, ती पेरीत नाहींत, कापीत नाहींत, व कोठारांत सांठवीत नाहींत; तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांस खावयास देतो, तुम्ही त्यांपेक्षां श्रेष्ठ आहां कीं नाहीं ? २७ तुम्हांतील कोण काळजी करून आपलें आयुष्य हातभर वाढवायास समर्थ आहे ? २८ आणि वस्त्राविषयीं कां काळजी करितां ? रानांतील भूकमलें कशीं वाढतात हें लक्षात आणा; तीं कष्ट करीत नाहींत व कांतीत नाहींत, २९ तरी मी तुम्हांस सांगतो कीं, शलमोन देखील आपल्या सर्व वैभवांत त्यांतल्या एकासारिखा सजला नव्हता. ३० जें रानांतलें गवत आज आहे व उद्या भट्टींत पडतें. त्याला जर देव असा पोषाक घालतो. तर अहो अल्प विश्वासी, तो विशेषेंकरून तुम्हांस पोषाक घालणार नाहीं काय ? ३१ यास्तव काय खावें, काय प्यावें, काय पांघरावें, असें म्हणत काळजी वाहूं नका, ३२ कारण हीं सर्व मिळवायास विदेशी लोक झटतात; या सर्वांची गरज तुम्हांस आहे, हें तुमच्या स्वर्गीय पित्यास ठाऊक आहे. ३३ तर तुम्ही प्रथम त्याचें राज्य व त्याची धार्मिकता मिळवायास झटा, म्हणजे यावर तींहि सर्व तुम्हास मिळतील. ३४ यास्तव उद्यांची काळजी करूं नका, कारण उद्यांची काळजीं उद्यां करील; ज्या दिवसाचें दुःख त्या दिवसाला पुरे. (मतय, अ. ५ व ६)
तुमचा न्याय करूं नये म्हणून तुम्ही न्याय करूं नका; २ कारण ज्या प्रकारचा तुम्ही न्याय कराल त्या प्रकारचा तुमचा न्याय होईल, आणि ज्या मापानें तुम्ही माप घालितां त्याच मापानें तुमच्या पदरीं पडेल. ३ तूं आपल्या डोळ्यांतलें मुसळ ध्यानांत न आणितां आपल्या भावाच्या डोळ्यांतलें कुसळ कां पाहतोस ? ४ अथवा तुझ्या डोळ्यांतलें कुसळ मला काढूं दे, असें तूं आपल्या भावाला कसें म्हणशील? पाहा, तुझ्या तर डोळ्यांत मुसळ आहे. ५ अरे ढोंग्या, तूं पहिल्यानें आपल्या डोळ्यांतलें मुसळ काढ, म्हणजे तुला आपल्या भावाच्या डोळ्यांतलें कुसळ काढावयास स्पष्ट दिसेल.
६ जें पवित्र तें कुत्र्यांस घालूं नका, आणि आपलीं मोत्यें डुकरांपुढें टाकुं नका; टाकाल तर तीं त्यांस पायाखालीं तुडवितील व उलटून तुम्हांस फाडितील.
७ मागा म्हणजे तुम्हांस दिलें जाईल, शोधा म्हणजे तुम्हांस सांपडेल, ठोका म्हणजे तुम्हांस उघडलें जाईल; ८ कारण जो कोणी मागतो, तो पावतो, व जो शोधितो त्याला सांपडतें, व जो ठोकितो त्यास उघडलें जाईल ९ आपल्या पुत्रानें भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल, १० आणि मासा मागितला तर त्याला साप देईल, असा तुम्हांमध्यें कोण मनुष्य आहे ? ११ यारतव तुम्ही वाईट असतां आपल्या लेकरांस चांगल्या देणग्या देण्याचें समजतां, तर तुमच्या स्वर्गांतील बापापाशीं जे मागतात त्यांस तो किती विशेषेंकरून चांगल्या देणग्या देईल ? १२ या करितां लोकांनीं जसें तुम्हांशीं वर्तन करावें म्हणून तुमची इच्छा आहे तसेंच तुम्हीं त्यांशीं वर्तन करा, कारण नियमशास्त्र व प्रवचनशास्त्र हेंच आहे.
१३ अरूंद दरवाज्यानें आंत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रूंद व मार्ग पसरट आहे, आणि त्यांतून आंत जाणारे बहुत आहेत, १४ कारण जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरूंद व मार्ग संकोचित आहे, आणि ज्यांस तो सांपडतो ते थोडके आहेत.
१५ खोट्या प्रवक्त्यांविषयीं जपा, ते मेंढराच्या वेषानें तुम्हांकडे येतात, तरी अंतरीं क्रूर लांडगे आहेत. १६ तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांस ओळखाल. कांटेरी झाडांवरून द्राक्षें, किंवा रिंगणीच्या झाडांवरून अंजीर काढितात काय ? १७ त्याप्रमाणें प्रत्येक चांगलें झाड चांगले फळ देतें, आणि नासकें झाड वाईट फळ देते. १८ चांगल्या झाडाला वाईट फळें येत नाहींत, आणि नासक्या झाडाला चांगलीं फळें येत नाहींत. १९ जें जें झाड चांगले फळ देत नाहीं तें तें तोडून अग्नींत टाकिलें जातें. २० यास्तव तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांस ओळखाल. २१ मला, हे प्रभू, हे प्रभू, असें म्हणणा-या प्रत्येकाला प्रवेश स्वर्गाच्या राज्यांत होईल असें नाहीं तर जो माझ्या स्वर्गांतील बापाच्या इच्छेप्रमाणें वर्ततो त्याचा होईल. २२ त्या दिवशीं मला बहुत म्हणतील, हे प्रभू, हे प्रभू, ''आम्हीं तुझ्या नांवानें प्रवचन सांगितलें,'' व तुझ्या नांवानें भूतें घालविलीं, व तुझ्या नांवानें बहुत अत कृत्यें केलीं नाहींत काय ? २३ तेव्हां मी त्यांस स्पष्ट सांगेन कीं, मला तुमची कधींच ओळख नव्हती. ''अहो अधर्म करणा-यांनो, मजपासून निघून जा.'' २४ यास्तव जो प्रत्येक माझीं हीं वचनें ऐकून त्यांप्रमाणें वर्ततो तो कोणी एका शहाण्या मनुष्यासारिखा ठरेल; त्यानें आपलें घर खडकावर बांधिले; २५ मग पाऊस पडला, तर आला, वाराहि सुटला, व त्या घरात लागला, तरी तें पडलें नाहीं, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. २६ आणि जो प्रत्येक माझी हीं वचनें ऐकून त्यांप्रमाणें वर्तत नाहीं तो कोणी एका मूर्ख मनुष्यासारिखा ठरेल, त्यानें आपलें घर वाळूवर बांधिलें २७ मग पाऊस पडला, पूर आला, वाराहि सुटला, व त्या घरास लागला; आणि तें पडलें, व तें पडणें भारी होतें. '' (मत्तय अध्याय ७).
येशूच्या उपदेशामुळें त्याच्या शिष्यांचें आचरण जुन्या आचारधर्माशीं सुटून निराळें होऊं लागले तेव्हां जुन्या नियम शास्त्राचा संरक्षक येशू आपल्या शिष्यांच्या आचरणाचें समर्थन करिता झाल्या तटिषयक उल्लेख येणें प्रमाणे:
''१४ त्या वेळेस योहानाचे शिष्य त्याकडे येऊन म्हणाले, आम्ही व परूशी पुष्कळ उपास करितों, तुझे शिष्य उपास करीत नाहींत, हें कां? १५ येशूनें त्यांस म्हटलें, व-हाड्याच्या बरोबर वर आहे तोपर्यंत त्यांच्यानें शोक करवेल काय ? परंतु त्यांपासून वराला नेतील असा काळ येईल, तेव्हां ते उपास करतील. १६ को-या कापडाचें ठिगळ जुन्या वस्त्राला कोणी लावीत नाहीं, कारण धड करण्याकरितां जें कोरें लाविलें तें जुन्याला फाडून घेते व भोंक अधिक मोठें होतें. १७ आणि नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांत कोणी घालीत नाहींत, घातला तर बुधले फुटून द्राक्षारस सांडतो, आणि बुधले नासतात; तर नवा द्राक्षारस नव्या बुधल्यांत घालितात व दोन्ही नीट राहतात. (मत्तय अ. ९).
येशू संप्रदायप्रवर्तक तयार करण्यासाठीं उपदेश कोणच्या प्रकारचा करी तो मत्तयाच्याच शुभवर्तमानांत दिला आहे. तो उपदेश येथें देतों
''५ या बारा जणांस येशूनें अशी आज्ञा करून पाठविलें कीं, विदेश्यांकडे जाणा-या वाटेंत जाऊं नका, व शोमरोनी यांच्या कोणत्याहि नगरांत प्रवेश करूं नका; ६ तर इस्त्राएलाच्या घरचीं जीं हरपलेलीं मेंढरें त्यांजकडे जा. ७ आणि जातांना असा उपदेश करा कीं, स्वर्गाचें राज्य जवळ आलें आहे. ८ रोग्यांस बरें करा, मेलेल्यांस उठवा, कुष्ट्यांस शुद्ध करा, भूतें काढा, तुम्हांस फुकट मिळालें आहे. फुकट द्या. ९ सोनें किंवा रूपें किंवा तांबें आपल्या कंबरकशांत घेऊं नका; १० वाटेसाठीं झोळणा, दुसरा अंगरखा, वाहणा, किंवा काठी घेऊं नका, कारण कामकरी पोषणास योग्य आहे. ११ ज्या ज्या नगरांत किंवा गांवांत तुम्ही जाल, त्यांत कोण कोण योग्य आहे हें शोधून पाहा; आणि तुम्ही निघून जाईपर्यंत त्याच्या येथें राहा. १२ आणि घरांत जातांना तुला शांति असो असें म्हणा; १३, आणि तें घर योग्य असलें तर तुमची शांति त्याला प्राप्त होवो; तें योग्य नसलें तर तुमची शांति तुम्हांकडे परत येवो. १४ आणि जो कोणी तुमचा स्वीकार करणार नाहीं, व तुमचीं वचनें ऐकणार नाहीं, त्याच्या घरांतून किंवा नगरांतून निघतांना आपल्या पायांची धूळ झाडून टाका. १५ मी तुम्हांस खचित सांगतों कीं, न्यायाच्या दिवशीं त्या नगरापेक्षा सदोम व गमोरा यांच्या देशाला सोपें जाईल.
''१६ पहा, मीं लांडग्यांमध्यें मेंढरासारखे तुम्हांस पाठवितों, यास्तव तुम्ही सापांसारिखे चतुर व खबुत्रांसारखे साळसूद व्हा. १७ मनुष्यांविषयीं जपा; कारण ते तुम्हांस न्यायसभांच्या स्वाधीन करतील, व आपल्या सभास्थानांत तुम्हांस फटके मारतील; १८ आणि देशाधिकारी व राजे यांस व विदेश्यांस साक्ष पटावी म्हणून तुम्हांस त्यांपुढें माझ्यामुळें नेतील. १९ आणि तुम्हांस स्वाधीन करतील तेव्हां कसें काय बोलावें याविषयीं काळजी करूं नका, कारण तुम्हीं काय बोलावें याची त्याच घटकेस तुम्हांस प्रेरणा होईल. २० कारण बोलणारे तुम्ही नाहीं, तर तुमच्या बापाचा आत्मा हाच तुम्हांमध्यें बोलणारा आहे. २१ भाऊ भावाला व बाप मुलाला जिवें मारण्यास धरून देईल, आणि 'मुलें आईबापावर उठून' त्यांस जिवें मारतील. २२ माझ्या नामामुळें सर्व लोक तुमचा द्वेष करितील; जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. २३ जेव्हां एका नगरांत तुमचा छळ करितील तेव्हां दुस-यांत पळून जा, मीं तुम्हांस खचित सांगतों, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्त्राएलाचीं नगरें तुम्हांस आटोपणार नाहींत.
''२४ गुरूपेक्षां शिष्य थोर नाहीं. २५ आणि धन्यापेक्षां दास थोर नाहीं. २५ शिष्य गुरूसारखा व दास धन्यासारिखा व्हावा, इतकें त्यांस पुरे, घरधन्यास बालजबूल म्हटलें तर घरच्या माणसांस किती विशेषेंकरून म्हणतील ? २६ यास्तव त्यांस भिऊं नका, कारण उघडें होणार नाहीं असें कांहीं झांकलेलें नाहीं; आणि कळणार नाहीं असें काहीं गुप्त नाहीं. २७ जें मी तुम्हांशीं अंधारांत बोलतों तें उजेडांत सांगा, आणि तुमच्या कानांत सांगितलेलें जें तुम्ही ऐकतां तें धाब्यांकरून गाजवा. २८ आणि जे शरीराला वधितात, पण आत्म्याला वधावयास समर्थ नाहीत त्यास भिऊं नका, तर, आत्मा व शरीर या दोहोचा नरकांत नाश करायास जो समर्थ आहे त्याला भ्या. २९ दोन चिमण्या दमडीला विकतात कीं नाहीत ? तथापि तुमच्या बापाच्या सत्तेशिवाय त्यांतून एकहि भूमीवर पडत नाहीं. ३० तुमच्या डोक्यावरले सर्व केंस देखील मोजलेले आहेत. ३१ यास्तव भिऊं नका; बहुत चिमण्यांहून तुमचें मोल अधिक आहे. ३२ जो कोणी मनुष्यांसमोर मला अंगीकारील त्याला मीहि आपल्या स्वर्गांतील बापासमोर अंगीकारीन. ३३ पण जो कोणी मनुष्यांसमोर मला नाकारील त्याला मीहि आपल्या स्वर्गांतल्या बापासमोर नाकारीन.
''३४ मीं पृथ्वीवर शांतता चालवावयास आलों असें समजूं नका, मी शांतता चालवावयास नव्हे, तर तरवार चालवावयास आलों. ३५ कारण 'पुत्र व बाप, कन्या व आई, सून व सासू, यांस विरोध' पाडण्यास मी आलों. ३६ आणि 'मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील.' ३७ जो माझ्यापेक्षां बापावर किंवा आईवर अधिक प्रीति करितो तो मला योग्य नाहीं; आणि जो माझ्यापेक्षां पुत्रावर किंवा कन्येवर अधिक प्रीति करितो तो मला योग्य नाहीं. २८ आणि जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागून येत नाही तो मला योग्य नाहीं. ३९ ज्यानें आपला जीव राखिला तो त्याला गमावील, आणि ज्यानें माझ्याकरितां आपला जीय गमाविला तो त्याला राखील.
४० जो तुम्हांस अंगीकारितो, तो मला अंगीकारितो, आणि जो मला अंगीकारितो, तो ज्यानें मला पाठविलें त्याला अंगीकारितो. ४१ प्रवक्त्याला प्रवक्ता म्हणून जो अंगीकारितो त्याला प्रवक्त्याचें प्रतिफल मिळेल; आणि धार्मिकाला धार्मिक म्हणून जो अंगीकार करितो त्याला धार्मिकाचें प्रतिफल मिळेल. ४२ आणि या लहानांतील एकाला शिष्य म्हणून जो कोणी गार पाण्याचा प्याला केवळ पाजितो तो आपल्या प्रतिफलाला मुकणारच नाहीं, असें मी तुम्हांस खचीत सांगतों'' (मत्तय अ.१०).
जुन्या आचार धर्माशीं भावनाप्रधान व नीतिप्रधान धर्माचा उडालेला खटका मत्तयानें वर्णन केला आहे तो असा.
''तेव्हां यरूशलेमहून परूशी व शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले, -२ तुझे शिष्य वडिलांचा संप्रदाय कां उलंघितात ? कारण भोजनसमयी ते हात धूत नाहींत. ३ त्यानें त्यांस उत्तर दिलें कीं तुम्हीहि आपल्या संप्रदायेंकरून देवाची आज्ञा कां उल्लंघितां ? ४ कारण देवानें असें म्हटलें कीं, तूं 'आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर; आणि 'जो बापाची किंवा आईची निदा करितो त्याला देहांत शिक्षा व्हावी.' ९ परंतु तुम्ही म्हणतां, 'जो कोणी बापाला अथवा आईला म्हणेल कीं, जे मी दिल्यानें तुझे हित मजकडून झालें असते तें अर्पण आहे' - ६ तो आपल्या बापाचा सन्मान करणारच नाहीं. या प्रकारें तुम्हीं आपल्या संप्रदायेंकरून देवाचें वचन रद्द केलें आहे. ७ अहो ढोंगी, तुम्हांविषयीं यशयानें प्रवचन ठीक सांगितलें कीं, ८ 'हे लोक ओठांनीं माझा सन्मान करितात, परंतु त्यांचें अंतःकरण मजपासून दूर आहे. ९ ते मनुष्यांचे नियम, शास्त्र म्हणून शिकवून माझी व्यर्थ भक्ति करितात.'' १० तेव्हां त्यानें समुदायाला आपणाकडे बोलावून म्हटलें, ऐका व समजून घ्या; ११ जें तोंडांत जातें तें मनुष्याला विटाळीत नाहीं; तर जें तोडांतून निघतें ते मनुष्याला विटाळळितें. १२ नंतर शिष्य येऊन त्याला म्हणाले, 'हें वचन ऐकून परूशी अडखळले हें तुला कळलें काय ?' १३ त्यानें उत्तर दिलें कीं, जे जें रोप माझ्या स्वर्गीय पित्यानें लाविलें नाहीं ते उपटलें जाईल. १४ त्यांस असूं द्या; ते आंधळे वाटाडे आहेत. आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेहि खांचेत पडतील. १५ पेत्रानें त्याला उत्तर दिलें, हा दाखला आम्हांस फोडून सांग. १६ तो म्हणाला, अजूनहि तुम्ही सुद्धां अज्ञानी आहां काय ? १७ जें कांहीं तोडांत जातें तें पोटांत उतरतें, व बाहेर शौचकूपांत टाकलें जातें हें तुम्ही समजत नाहीं काय ? १८ जें तोडांतून निघतें तें अंतःकरणांतून येतें व मनुष्याला विटाळवितें, १९ कारण अंतःकरणांतून दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चो-या, खोट्या साक्षी, शिव्यागाळी, हीं निघतात; मनुष्याला विटाळविणारीं तीं हींच आहेत, न धुतलेल्या हातांनीं जेवणें हें तर मनुष्याला विटाळवीत नाहीं.'' (मत्तय अ.१५)
आचरणानें अयोग्य पण उपदेश करण्यांत पटाईत अशा वर्गाशीं देखील येशूस अप्रिय व्हावें लागलें. त्यास उत्पन्नावर बसलेल्या लोकांची ढोंगें बाहेर काढावीं लागलीं; आणि प्रवक्त्यांचा लोकांनीं छळ केला त्याबद्दलहि येशूस बोलावें लागलें. त्या स्थितीचा निदर्शक उतारा मत्तयांस सांपडतो.
''तेव्हां येशू लोकसमुदायांस व आपल्या शिष्यांस म्हणाला, २ शास्त्री व परूशी हे मोश्याच्या आसनावर बसले आहेत, ३ यास्तव ते जें कांहीं तुम्हांस सांगतील तें अवघें आचरा व पाळा, परंतु त्यांच्या करण्याप्रमाणें करूं नका, कारण ते सांगतात पण करीत नाहींत. ४ ते जड व वाहायास कठिण अशी ओझीं बांधून लोकांच्या खांद्यावर देतात, परंतु तीं सारण्यास ते स्वतः बोटहि लावावयाचे नाहींत. ५ आणि मनुष्यांनीं पाहावीं म्हणून ते आपलीं सर्व कामें करितात, आणि आपलीं मंत्रपत्रें रूंद करतात, व आपले गोंडे मोठे करतात, ६ जेवणावळींत श्रेष्ठ स्थानें व सभास्थानांत श्रेष्ठ आसनें, ७ व चवाठ्यावर नमस्कार घेणें व लोकांकडून गुरूजी असें म्हणवून घेणें हीं त्यांस आवडतात. ८ तुम्ही तर आपणास गुरूजी असें म्हणवून घेऊं नका; कारण तुमचा गुरू एक आहे, व तुम्ही सर्व भाऊ आहां. ९ पृथ्वीवरील कोणाला बाप म्हणूं नका. कारण तुमचा बाप एक आहे, तो स्वर्गीय आहे. १० आणि आपणांस गुरू असें म्हणवून घेऊं नका, कारण तुमचा गुरू एक, तो ख्रिस्त आहे ११ जो तुम्हांमध्यें मोठा त्यानें तुमचा सेवक व्हावें. १२ जो कोणी आपणाला उंच करील तो नीच केला जाईल, आणि जो कोणी आपणाला नीच करील तो उच केला जाईल.
''१३ अहो शास्त्री व परूशी, अहो ढोंग्यांनो, तुम्हांस हाय हाय ! कारण तुम्ही स्वर्गाचें राज्य लोकांनीं आंत जाऊं नये म्हणून बंद करितां, तुम्ही स्वतां आत जात नाहीं व आंत जाण्या-यांसहि जाऊं देत नाहीं.
''१५ अहो शास्त्री व परूशी, आहे ढोंग्यानो, तुम्हांस हाय हाय ! कारण तुम्ही एक शिष्य मिळवायासाठीं समुद्र व भूमि फिरतां, आणि तो मिळाला म्हणजे तुम्ही त्याला आपणांहून दुप्पट नरकाचा पुत्र करितां.
''१६ आहे आंधळ्या वटाड्यांनों, तुम्हांस हाय हाय ! कारण तुम्ही म्हणतां, कोणीं देवळाची शपथ घेतली; तर त्यांत कांहीं नाहीं परंतु कोणीं देवळाच्या सोन्याची शपथ घेतली तर तो ॠणी आहे. १७ अहो मूर्ख व आंधळ्यांनो, मोठें कोणतें, तें सोनें किंवा ज्याच्या योगानें ते सोनें पवित्र झालें ते देऊळ ! १८ तुम्ही म्हणतां, कोणीं वेदीची शपथ घेतली तर त्यांत कांहीं नाहीं, परंतु तिजवरील अर्पणाची शपथ कोणीं घेतली तर तो ॠणी आहे. १९ अहो अंधळ्यांनो, मोठें तें कोणतें. अर्पण किंवा अर्पण पवित्र करणारी वेदि ? २० यास्तव जो कोणी वेदीची शपथ घेतो तो तिची व तिजवर जें कांहीं आहे त्याची शपथ घेतो. २१ आणि जो देवळाची शपथ घेतो तो त्याची व त्यांत राहणा-याची शपथ घेतो; २२ आणि जो स्वर्गाची घेतो तो देवाच्या सिंहासनाची व त्यावर बसणा-यांची शपथ घेतो.
२३ अहो शास्त्री व परूशी, अहो ढोंग्यांनो, तुम्हांस हाय हाय ! कारण पुदिना व शेपा व जिरें यांचा दशमांश तुम्ही देतां. आणि नियमशास्त्रांतील मुख्य गोष्टी, म्हणजे न्याय व दया व विश्वास ह्या तुम्हीं सोडल्या आहेत; ह्या करायाच्या होत्या, तरी त्या सोडिल्या पाहिजेत असें नाहीं. २४ अहो अंधळ्या वाटाड्यांनो, तुम्ही मुरकूट गाळून काढितां व उंट गिळून टाकितां.
२५ अहो शास्त्री व परूशी, अहो ढोंग्यांनो, तुम्हांस हाय हाय ! कारण ताटवाटी बाहेरून साफ करितां पण तीं आंतून जुलूम व असंयम यांनीं भरलीं आहेत. २६ अरे अंधळ्या परूशा, पहिल्यानें वाटी आंतून साफ कर, म्हणजे ती बाहेरूनहि साफ होईल.
२७ अहो शास्त्री व परूशी, अहो ढोंग्यांनो तुम्हांस हाय हाय ! कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारिखे आहां, त्या बाहेरून सुंदर दिसतात, परंतु आंतून मेलेल्यांच्या हाडांनीं व सर्व प्रकारच्या मळानें भरल्या आहेत. २८ तसेंच तुम्ही बाहेरून लोकांस धार्मिक दिसतां, परंतु आंतून ढोंगानें व अधर्मानें भरलेले आहां.
२९ अहो शास्त्री व परूशी, अहो ढोंग्यांनो, तुम्हांस हाय हाय ! कारण तुम्ही प्रवक्त्यांच्या कबरा बांधितां व धार्मिकांची थडीं शृंगारितां; ३० आणि म्हणतां, आम्ही आपल्या वडिलांच्या दिवसांत असतों तर प्रवक्त्यांचा रक्तपात करण्यांत त्यांचे भागिदार झालों नसतों. ३१ यावरून तुम्ही प्रवक्त्यांचा घात करण्या-यांचे पुत्र आहां, अशी तुम्ही आपणांस साक्ष देतां. ३२ तर तुम्ही आपल्या वडिलांचें माप भरा. ३३ अहो सापांनो, सापांच्या पिलांनो, नरकदंड कसा चुकवाल ? ३४ यास्तव, पहा, मी तुम्हांकडे प्रवक्ते व ज्ञानी व शास्त्री यांस पाठवितों; तुम्ही त्यांतून कित्येकांस जिवें माराल वधस्तंभीं द्याल; आणि कित्येकांस आपल्या सभास्थानांमध्यें फटके माराल व नगरोनगरीं त्यांचा पाठलाग कराल; ३५ यासाठीं कीं धार्मिक हाबेल याच्या रक्तापासून, ज्याला तुम्हीं वेदी व पवित्र स्थान यांच्यामध्यें जिवें मारिलें तो बरख्याचा पुत्र जखर्या यांच्या रक्तापर्यंत जें सर्व धार्मिकांचें रक्त पृथ्वीवर पाडिलें तें तुम्हांवर यावें. ३६ मी तुम्हांस खचीत सांगतों, हें सर्व या पिढीवर येईल.
३७ यरूशलेमे, यरूशलेमे, प्रवक्त्यांचा घात करणा-ये व तुजकडे पाठविलेल्यांस धोंडमार करणा-ये ! जशी कोंबडी आपलीं पिलें पंखाखालीं एकवटते त्याप्रकारें तुझीं लेंकरें एकवटायाची कितीदां माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती ! ३८ पहा, 'तुमचें घर तुम्हांस ठेविलें आहे.' ३९ मी तुम्हांस सांगतों कीं आतांपासून 'प्रभूच्या नांवानें येणारा तो धन्यवादित' असें म्हणाल तोंपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणारच नाहीं.'' (मत्त्य अ.२३)
येशूच्या चरित्रांत ग्रीक तत्त्वज्ञान घुसडून त्याचा संप्रदाय यूरोपीयांस ग्राह्य करण्याचें श्रेय योहानाच्या शुभवर्तमानास देण्यांत आलें आहें योहानाच्या शुभवर्तमानाचें भिन्नस्वरूप त्याच्या ग्रंथारंभावरूनच व्यक्त होईल. तो म्हणतो.
''प्रारंभीं शब्द होता, आणि शब्द देवासहित होता, आणि शब्द देव होता. २ तोच प्रारंभीं देवासहित होता. ३ त्याच्या द्वारें सर्व झालें, आणि जें झालें, असें कांहीच त्यावांचून झालें नाहीं. ४ त्यांत जीवन होतें, व तें जीवन मनुष्यांचा प्रकाश होतें. आणि तो प्रकाश अंधारांत प्रकाशतो तरी अंधारानें त्याला ग्रहण केलें नाहीं. देवानें पाठविलेला एक मनुष्य प्रकट झाला; त्याचें नांव योहान. ७ तो साक्षीकरितां म्हणजे त्या प्रकाशाविषयीं साक्ष देण्याकरितां आला, यासाठीं कीं त्याच्याद्वारें सर्वांनीं विश्वास धरावा. ८ तो हा प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयीं साक्ष देण्याकरितां आलेला होता. ९ जगांत येणारा जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करितो तो होता. १० जगांत तो होता, व जग त्याच्याद्वारें झालें, तरी जगानें त्याला जाणिलें नाहीं. ११ तो आपल्या स्वकीयांपाशीं आला तरी त्याच्या स्वकीयांनीं त्याला अंगीकार केला नाहीं. १२ जितक्यांनीं त्याचा अंगीकार केला तितक्यांस, म्हणजे त्याच्या नांवावर विश्वास ठेवणा-यांस त्यानें देवाचीं लेंकरें होण्याचा अधिकार दिला. १३ त्यांचा जन्म रक्तापासून किंवा देहाच्या इच्छेपासून किंवा मनुष्याच्या इच्छेपासून नव्हे, तर देवापासून झाला. १४ शब्द देही झाला, आणि कृपा व सत्य यांनीं पूर्ण असून त्यानें आम्हांमध्यें वस्ती केली, आणि आम्हीं त्याचें गौरव पाहिलें, तें गौरव बापापासून आलेल्या एकुलत्याचें असें होतें. १५ त्याविषयीं योहान साक्ष देतो, आणि उच्च स्वरानें म्हणतो कीं, जो माझ्यामागून येतो तो माझ्या पुढें झाला आहे, कारण तो माझ्यापूर्वीं होता. असा जो मीं सांगितला तो हाच आहे. १६ कारण त्याच्या पूर्णतेंतून आम्हां सर्वांस मिळालें, होय, कृपेवर कृपा. १७ नियमशास्त्र मोश्याच्याद्वारें दिलें होतें; कृपा व सत्य हीं येशू ख्रिस्ताच्या द्वारें आलीं. १८ देवाला कोणीं कधीं पाहिलें नाहीं; जो एकुलता पुत्र बापाच्या उराशीं असतो त्यानें तो प्रकट केला. '' (योहान अ. १)
येशूचें श्रेष्ठत्व आणि देवत्व येशूकडूनच योहानानें वदविलें आहे.
''१२ यास्तव येशूनें पुन्हां त्यांशीं बोलत असतां म्हटलें, मी जगाचा प्रकाश आहें, जो मला अनुसरतो तो अंधारांत चालणारच नाहीं, तर त्याजवळ जीवनाचा प्रकाश असेल. १३ यावरून परूशी त्याला म्हणाले, तूं आपणाविषयीं साक्ष देतोस; तुझी साक्ष खरी नाहीं. १४ यावरून येशूनें त्यांस उत्तर दिलें की, जरी मी आपणाविषयीं साक्ष देतों तरी माझी साक्ष खरी आहे; कारण मी कोठून आलों व कोठें जातों हें मला ठाऊक आहे; मी कोठून येतों व कोठें जातों हें तुम्हास ठाऊक नाहीं. १५ तुम्हीं देहबृद्धीनें न्याय करतां मीं कोणाचा न्याय करीत नाहीं, १६ आणि जर मी न्याय केला तर माझा न्याय खरा आहे, कारण मी एकटाच नाहीं, तर मी व ज्यानें मला पाठविलें तो असे आहों. १७ तुमच्या नियमशास्त्रांत असें लिहिलें आहे कीं, दोन मनुष्यांची साक्ष खरी आहे. १८ मीं आपणाविषयीं साक्ष देणारा आहे, आणि ज्या बापानें मला पाठविलें तोहि मजविषयीं साक्ष देतो. १९ यावरून ते त्याला म्हणाले, तुझा बाप कोठें आहे? येशूनें उत्तर दिलें कीं, तुम्ही मला व माझ्या बापालाहि जाणत नाहीं; जर तुम्हीं मला जाणिलें असतें तर माझ्या बापालाहि जाणिलें असतें. २० तो देवळांत शिकवीत असतां हीं वचनें भांडारांत बोलला; तरी कोणी त्याला धरिलें नाहीं. कारण त्याचा समय तोपर्यंत आला नव्हता.
२१ यास्तव त्यांस तो पुन्हां म्हणाला, मी निघून जातों, आणि तुम्ही माझा शोध कराल आणि आपल्या पापांत मराल; जेथें मी जातों तेथें तुमच्यानें येववत नाहीं. २२ यास्तव यहूदी म्हणाले, जेथें मी जातों तेथें तुमच्यानें येववत नाही, असें तो म्हणतो, यावरून तो आपणास जिवे मारून घेणार आहे कीं काय ? २३ त्यानें त्यांस म्हटलें, तुम्ही खालचे आहां, मीं बरचा आहें, तुम्ही या जगाचे आहां, मी या जगाचा नाहीं. २४ यास्तव मी तुम्हांस सांगितलें कीं, तुम्ही आपल्या पापांत मराल; कारण मी तो आहें, असा जर तुम्ही विश्वास धरणार नाहीं तर तुम्ही आपल्या पापांत मराल. २५ यास्तव त्यांनीं त्याला म्हटलें, तूं कोण आहेस ? येशूनें त्यांस म्हटलें जें पहिल्यापासून तुम्हांस सांगत आलों तेंच २६ तुम्हांविषयीं मला बहुत बोलायाचें आहे व न्याय करायाचा आहे; ज्यानें मला पाठविलें तो खरा आहे. आणि ज्या गोष्टी मी त्यांपासून ऐकिल्या त्या मी जगास सांगतों. २७ तो आम्हांशीं बापाविषयीं बोलतो असें तें समजले नाहींत. २८ यास्तव येशूनें त्यांस म्हटलें, जेव्हां तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हां तुम्ही जाणाल कीं, मी तो आहें, आणि मी आपल्याआपण कांहीं करीत नाहीं तर बापानें मला शिकविल्याप्रमाणें मी या गोष्टी बोलतों. २९ आणि ज्यानें मला पाठविलें तो माझ्याबरोबर आहे. त्यानें मला एकटें सोडिलें नाहीं; कारण जें त्याला आवडतें तें मी सर्वदा करितों. ३० तो या गोष्टी बोलत असतां बहुत लोकांनीं त्यांवर विश्वास ठेंविला.
३१ यास्तव ज्या यहुद्यांनीं त्याचा विश्वास धरिला त्यांस येशूनें म्हटलें, जर तुम्ही माझ्या वचनांत राहिला तर खरोखर माझे शिष्य आहां; ३२ आणि तुम्ही सत्य जाणाल, व सत्य तुम्हांस स्वतंत्र करील. ३३ त्यांनीं त्याला उत्तर दिलें कीं, आम्ही अब्राहामाचा वंश आहों; व कधींहि कोणच्या दास्यांत नव्हतो, तर तुम्ही स्वतंत्र व्हाल असें तूं कसें म्हणतोस ? ३४ येशूनें त्यांस उत्तर दिलें की, मी तुम्हांस खचीत खचीत सांगतों, जो कोणी पाप करितो तो पापाचा दास आहे. ३५ आणि दास घरांत सर्वकाळ राहत नाहीं, पुत्र सर्वकाळ राहतो. ३६ यास्तव जर पुत्र तुम्हांस स्वतंत्र करील तर तुम्ही खरे स्वतंत्र व्हाल. ३७ तुम्ही अब्राहामाचा वंश आहां हें मला ठाऊक आहे, तरी तुम्हांस माझ्या वचनाची गति होत नाहीं म्हणून तुम्ही मला जिवें मारायास पाहतां. ३८ मी बापाजवळ जें पाहिलें ते बोलतों, तसेंच तुम्ही आपल्या बापापासून जें ऐकिलें तें करितां. ३९ त्यांनीं त्याला उत्तर दिलें कीं, आमचा बाप अब्राहाम आहे, येशूनें त्यांस म्हटलें जर तुम्ही अब्राहामाचीं लेकरें असतां तर तुम्हीं अब्राहामाचीं कृत्यें केलीं असता. ४० परंतु आतां ज्यानें देवापासून ऐकलेलें सत्य तुम्हांस सांगितलें त्या मला मनुष्याला आतां जिवें मारायास पाहतां. अब्राहामानें असें केलें नाहीं.
४१ तुम्ही आपल्या बापाचीं कृत्यें करितां. ते त्याला म्हणाले, आम्हीं व्यभिचारापासून जन्मलों नाहीं; आम्हांस एकच बाप. म्हणजे देव आहे. ४२ येशूनें त्यास म्हटलें, जर देव तुमचा बाप असतां तर तुम्ही मजवर प्रीति केली असती, कारण मी देवापासून निघालों व आलों आहे; मीं आपल्या आपण आलों नाहीं, तर त्यानें मला पाठविलें. ४३ तुम्ही माझें बोलणें कां समजत नाहीं ? याचें कारण असें कीं, तुमच्यानें माझें वचन ऐकवत नाहीं. ४४ तुम्ही सैतान बापापासून झालां आहां आणि आपल्या बापाच्या वासनांप्रमाणें करायास इच्छितां. तो प्रारंभापासून मनुष्यघातक आहे आणि तो सत्यांत टिकला नाहीं, कारण त्यामध्यें सत्य नाहीं; तो खोटें बोलतो, तें आपल्यांतूनच बोलतो. कारण तो लबाड व लबाडाचा बाप आहे. ४५ मीं तर तुम्हांस सत्य सांगतों म्हणून तुम्ही माझा विश्वास धरीत नाहीं. ४६ तुम्हांतील कोण मजवर पाप लागू करील? मी सत्य सांगत असतां तुम्ही माझा कां विश्वास धरीत नाहीं ? ४७ जो देवाकडला आहे तो देवाच्या गोष्टी ऐकतो; तुम्ही देवाकडले नाहीं याच कारणानें तुम्ही ऐकत नाहीं. ४५ यहूद्यांनीं त्याला उत्तर दिलें कीं, तूं शोमरोनी आहेस व तुला भूत लागलें आहे, हें आम्ही ठीक म्हणतों कीं नाहीं ? ४९ येशूनें उत्तर दिलें की मला भूत लागलें नाहीं तर मीं आपल्या बापाचा सन्मान करितों, आणि तुम्ही माझा अपमान करितां. ५० मी तर आपलें गौरव पाहत नाही, तें पाहणारा व न्याय करणारा कोणी एक आहे. ५१ मी तुम्हांस खचीत खचीत सांगतों, जर कोणी माझें वचन पाळील तर तो कधींहि मरण पावणारच नाहीं. ५२ यहूदी त्याला म्हणाले. तुला भूत लागलें आहे हे आतां आम्हांस कळलें. अब्राहाम व प्रवक्तेहि मेले आणि तूं म्हणतोस, जर कोणी माझें वचन पाळील तर त्याला कधींहि मरणाचा अनुभव होणारच नाहीं. ५३ जो आमचा बाप अब्राहाम मेला त्यापेक्षां तूं मोठा आहेस काय ? प्रवक्तेहि मेले, तूं आपणाला कोण म्हणवितोस ? ५४ येशूनें उत्तर दिलें कीं, मीं स्वतः आपलें गौरव केलें तर तें कांहीं माझें गौरव नाहीं, माझें गौरव करणारा माझा बाप आहे, त्याला तो आमचा देव आहे असें तुम्हीं म्हणतां. ५५ तरी तुम्ही त्याला जाणलें नाहीं; मी तर त्याला जाणतों; आणि मी त्याला जाणत नाहीं, असें जर म्हणेन तर तुमच्या सारखा लबाड होईन; तर मीं त्याला जाणतों व त्याचें वचन पाळितों. ५६ तुमचा बाप अब्राहाम माझा दिवस पाहण्याच्या उत्कंठेनें उल्लासित झाला व पाहून हर्ष पावला. ५७ यावरून यहुदी त्याला म्हणाले, तुला अजून पन्नास वर्षें झालीं नाहींत आणि तूं अब्राहामाला पाहिलें काय ? ५८ येशूनें त्यांस म्हटलें, मीं तुम्हांस खचीत खचीत सांगतों. अब्राहाम झाला त्यापूर्वीं मी आहे. ५९ यावरून त्यांनीं त्यावर फेंकण्याकरितां धोंडे उचलिले; परंतु येशू देवळांतून गुप्तपणें निघून गेला.'' (योहान अ. ८)
प्रेषितांचीं कृत्यें म्हणून जो नव्या करारांत भाग आहे त्यांत येशूच्या अवतारपणाविषयीं त्याच्या निकट शिष्याच्या साक्षी व त्याच्या निकट शिष्यांचे उपदेश आहेत. जे येशूंच्या विरूद्ध होते ते त्याचे पुढें निस्सीम शिष्य झाले. अशापैकीं जो पेत्र त्याची साक्ष आपण प्रथम अवलोकनार्थ घेऊं.
३४ तेव्हां पेत्रानं तोंड उघडून म्हटलें,
देव पक्षपाती नाहीं, हें मला पक्कें समजतें. ३५ तर सर्व राष्ट्रांपैकीं जो त्याला भितो व ज्याचीं कृत्यें धार्मिक आहेत तो त्याला मान्य आहे. ३६ येशू ख्रिस्त (तोच सर्वांचा प्रभु) याकडून देवानें शांतीचें सुवर्तमान गाजवितांना जे वचन इस्त्राएलाच्या संतानांस पाठविलें; ३७ तें कोणतें तर, योहानानें जो बाप्तिस्मा गाजविला त्यानंतर गालीलापासून प्रारंभ करून सर्व यहुदीयेमध्यें जी गोष्ट घडली ती तुम्ही जाणतां; ३८ नासोरी तो येशू ; त्याला देवानें पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला; तो सत्कर्म करीत, व सैतानाच्या सत्तेखालीं असलेल्या सर्वांस बरे करीत फिरत असे; कारण देव त्याच्याबरोबर होता. ३९ आणि त्यानें यहूद्यांच्या देशांत व यरूशलेमेंत जें कांहीं केलें त्या सर्वांचे साक्षी आम्ही आहों; त्यांनीं त्याला खांबावर टांगून मारिलें; ४० त्याला देवानें तिस-या दिवशीं उठविलें, व तो प्रगट व्हावा असें केलें, ४१ तरी सर्व लोकांस नव्हे, पण जे साक्षी देवानें पूर्वीं निवडलेल्या आम्हांस; त्या आम्हीं तो मेलेल्यांतून उठल्यानंतर त्याच्या बरोबर खाल्लें प्यालें. ४२ आणि त्यानें आम्हांस आज्ञा केलीं कीं, लोकांस उपदेश कराव साक्ष द्या कीं, देवानें नेमलेला जीवंतांचा व मेलेल्यांचा असा न्यायाधीश हाच आहे. ४३ त्याला सर्व भविष्यवादी साक्षी आहेत कीं, त्यावर विश्वास ठेवणा-या प्रत्येकाला त्याच्या नांवानें पापांपासून मुक्ति मिळेल.'' (प्रेषित, अध्याय १०).
२,३ अग्रिप्पा महाराज, जे आपण यहूद्यांच्या चाली, त्यांचे वादविवाद व धर्मविचार विशेष जाणते आहां त्या आपणापुढें यहूदी ज्यांविषयीं मजवर दोषारोप ठेवितात त्या सर्वांविषयीं मला आज प्रत्युत्तर द्यावयाचें आहे, यावरून मी आपणाला भाग्यवान मानितों; यास्तव मी आपणास विनंति करितों कीं सहनतेनें माझें ऐका.
४ तरूणपणापासूनचें जें माझें वर्तन पहिल्यापासून माझ्या लोकांमध्यें यरूशलेमेस होतें तें सर्व यहूद्यांस माहीत आहे. ५ ते पहिल्यापासून मला ओळखंतात म्हणून त्यांची इच्छा असली तर ते साक्ष देतील कीं, आमच्या धर्माच्या कडकडीत पंथाप्रमाणें मी परूशी होतों. ६ आणि आतां देवानें आमच्या पूर्वजांस जें वचन दिलें, त्याच्या आशेविषयीं माझा न्याय होण्याकरितां मी उभा आहे. ७ तें वचन प्राप्त होण्याची आशा आमचे बारा वंश, रात्रंदिवस एकाग्रतेनें देवाची सेवा करीत राहून बाळगितात; त्याच आशेचा, हे राजा, मजवर यहूद्यांनीं आरोप ठेविला आहे. ८ जर देव मेलेल्यांस उठवितो, तर हें तुम्ही अविश्वसनीय कां ठरवितां ! ९ मलाहि वाटत असे कीं, नासोरी येशूच्या नांवाविरूद्ध पूष्कळ करावें. १० आणि तसें मीं यरूशलेमेंत केलेंहि; मुख्य याजकांपासून अधिकार मिळवून बहुत पवित्र लोकांस बंदिशाळांत कोंडून टाकिलें, आणि त्यांच्या घातास मीं संमति दिली. ११ आणि प्रत्येक सभास्थानांत त्यांस वारंवार शासन करून दुर्भाषण करण्यास लावण्याचा प्रयत्न करीत असें, आणि त्यांवर अतिशय पिसाळून बाहेरच्या नगरांपर्यंत देखील मी त्यांच्या पाठीस लागें. १२ आणि अशा क्रमांत असतां मुख्य याजकांचा अधिकार व परवानगी घेऊन दिमिश्काकडे चाललों होतों, १३ तेव्हां हे राजा, वाटेवर दोनप्रहरीं सूर्याच्या तेजापेक्षां तेजस्वी असा आकाशाचा प्रकाश माझ्या व मजबरोबर चालणा-यांच्या सभोंवतीं चकाकतां मी पाहिला. १४ तेव्हां आम्हीं सर्व भूमीवर पडलों, इतक्यांत इब्री भाषेंत मजशीं बोलतां मीं अशी वाणी ऐकिली कीं, शौला, शौला, माझ छळ कां करितोस ? पराणीवर लाथ मारणें हें तुला कठीण. १५ मी म्हटलें, हे प्रभू, तूं कोण आहेस ? प्रभु म्हणाला, ज्या येशूचा तूं छळ करितोस तोच मी आहे. १६, १७ तर ऊठ, उभा राहा, ज्यांत तूं मला पाहिलें, व या लोकांपासून व विदेशी लोकांपासून तुझें रक्षण करितांना ज्यांत तुला दर्शन देईन त्या गोष्टींचा सेवक व साक्षी नेमावा या साठीं मी तुला दर्शन दिलें. १८ त्यांकडे मी तुला आतां पाठवितों, यासाठीं कीं त्यांनीं अंधारांतून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारांतून देवाकडे फिरावें, म्हणून तूं त्यांचे डोळे उघडावे, आणि त्यांनीं मजवरल्या विश्वासानें पापांची क्षमा व पवित्र झालेल्यांमध्यें वतन पावावें. १९ म्हणून हे राजा अग्रिप्पा, मीं तो स्वर्गीय दृष्टांत अवमानिला नाहीं. २० तर पहिल्यानें दिमिश्कांत व यरूशलेमेंत व अवघ्या यहूदीय देशांत व विदेशी लोकांत उपदेश केला कीं, पश्चात्ताप करा, आणि पश्चात्तापास शोभतील अशीं कर्में करून देवाकडे फिरा. २१ या कारणामुळें यहूदी मला देवळांत धरून वधायाला पाहत होते. २२ तथापि आजपर्यंत देवापासून साहाय्य पावून लहान मोठ्यांस साक्ष देत राहिलों आहे आणि ज्या गोष्टी होणार आहेत म्हणून भविष्यवाद्यांनीं व मोश्यानें सांगितलें, त्यांखेरीज मीं दुसरें कांहीं सांगितलें नाहीं; २३ त्या अशा कीं ख्रिस्त दुःख सोसणारा असावा व मेलेल्यांतून उठणारांपैकीं पहिला असून त्यानें आपमच्या लोकांस व विदेशी लोकांस उजेड दाखवावा. (प्रेषित, अ. २६).
पाल हा ख्रिस्ती संप्रदायाचा द्वितीय संस्थापक होय अशी त्याची ख्रिस्ती जगांत आख्या आहे. त्याचीं पत्रें जोरदार व नीतिमत्तेच्या आवेशानें परिपूर्ण आहेत त्यांतील कांहीं उतारे दिल्याशिवाय ख्रिस्ती वाङ्मयाच्या वर्णनाची परिपूर्णता होणार नाहीं. ख्रिस्ताचाच उपदेश त्यानें निराळ्या शब्दांनी मांडला पण त्यांत वैयक्तिक कांहींच आलें नाहीं असें नाहीं. ख्रिस्ती मंडळींत भांडणें बंद व्हावीं आणि सर्वांनीं सहकारितेनें कार्य करावें याबद्दल त्याचा प्रयत्न असे. त्यानें स्त्रियांनीं कसें वागावें यासबंधानें जे नियम केले त्यांस अर्वाचीनकाळीं स्त्रीवर्गाकडून आक्षेप घेण्यांत येत आहे. त्याचें स्त्रियांच्या समजास्थानाविषयीं विवेचन येथें प्रथम अवतरितों.
''प्रत्येक पुरूषाचा मस्तक ख्रिस्त आहे, आणि स्त्रीचा मस्तक पुरूष आहे, आणि ख्रिस्ताचा मस्तक देव आहे असें तुम्ही जाणावें, असें मी इच्छितों, जो पुरूष आपलें मस्तक आच्छादून प्रार्थना करितो तो आपल्या मस्तकाचा अपमान करितो. आणि जी स्त्री उघड्या मस्तकानें प्रार्थना करते किंवा प्रवचन करिते ती आपल्या मस्तकाचा अपमान करिते कारण ती मुंडलेल्या स्त्रीसारखीच होते. स्त्री जर आपलें मस्तक आच्छादित नाही तर तिनें आपले केश कातरावे. पुरूष देवाची प्रतिमा व गौरव असल्यामुळें त्याला मस्तक आच्छादन करणें योग्य नाहीं. स्त्री तर पुरूषाचें गौरव आहे. कारण पुरूष स्त्रीपासून झाला नाहीं. तर स्त्री पुरूषापासून झाली. आणि पुरूष स्त्रीसाठीं उत्पन्न केला नाहीं तर स्त्री पुरूषांसाठीं केली तरी प्रभूंत पुरूष स्त्रीपासून वेगळा नाहीं आणि स्त्री पुरूषापासून वेगळी नाहीं... स्त्रियांनीं मंडळ्यांत उगेंच रहावें कारण त्यांस बोलण्याची परवानगी नाहीं; नियमशास्त्रहि सांगतें त्याप्रमाणें त्यांनीं आधीन असावें. त्यांस कांहीं माहिती करून घेण्याची इच्छा असली तर त्यांनीं आपल्या नव-यांस घरीं विचारावें. कारण स्त्रीनें मंडळींत बोलावें हें लाजेचें आहे.'' (पालचें करिंथकरांस पत्र १).
पौलानें उर्फ पॉलनें ज्या अनेक गोष्टी केल्या त्यांतील एक महत्त्वाची गोष्ट म्हटली म्हणजे ख्रिस्ताचा उपदेश यहुदीमंडळीच्या बाहेर नेला आणि इतर राष्ट्रांच्या लोकांना या संप्रदायांत प्रवेश करून मुक्ति पावण्यास हरकत नाहीं असें शिकविलें. सुंता करणारे व सुंता न करणारे यांतील अंतर काढून टाकलें. तद्विषक वाक्यें इफिसकरांच्या पत्रांत आहेत.
''यास्तव पूर्वींची आठवण करा कीं, तुम्हीं जे देहानें विदेशी, जे सुंती म्हटलेल्यांकडून बेसुंती असें म्हटलेले, ते तुम्ही, त्यावेळेस ख्रिस्ताविरहित इस्त्राएलांच्या राष्ट्राबाहेरचे, व प्रतिज्ञेच्या करारास परके, आशाहीन, व जगांत देवहीन असे होतां. परंतु जे तुम्ही दूर होतां ते तुम्ही आंता ख्रिस्त येशूंत ख्रिस्ताच्या रक्तानें जवळ झला आहां. कारण आमचा समेट तो आहे. त्यानें दोघांस एक केलें, आणि मधली आडभिंत पाडली, त्यानें वैर, जें आज्ञाविधीचे नियमशास्त्र आपल्या देहानें नाहीसें केलें, यासाठीं कीं त्यानें समेट करून आपणांत दोघांचा एक नवा मनुष्य उत्पन्न करावा. आणि त्यानें वैर वधस्तंभावर जिवें मारून त्याच्या द्वारें देवाशीं एकशरीर अशा दोघांचा समेट करावा, आणि त्यानें येऊन जे तुम्ही दूर होतां त्या तुम्हांस, व जे जवळ होते, त्यांस शांतीची सुवार्ता सांगितली. कारण त्याच्या द्वारें एका आत्म्यांत आम्हां उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो तर आतांपासून तुम्ही परके व परदेशी नाहीं. तर पवित्रांचे एक राष्ट्र व देवाच्या घरचे आहां. प्रेषित व प्रवक्ते यांच्या पायावर तुम्हीं रचलेले आहां. व ख्रिस्त येशू हाच कोंप-याचा मुख्य धोंडा आहे.'' (२.११-२०)
ख्रिस्तीसंप्रदायांत सुंता शिरली नाहीं. सुंता ही दैहिक क्रिया नसून पालनें आध्यात्मिक क्रिया केली. पाल म्हणतो ''केवळ दैहिक सुंता झालेल्याविषयीं सावध असा जे आम्हीं देवाच्या आत्म्यानें सेवा करणारे व ख्रिस्त व येशूविषयीं आढ्यता बाळगणारे व देहावर भरंवसा न ठेवणारे ते आम्हीं सुंता झालेलेच आहों. (फिलिप्पैकरांस पत्र).
पालच्या विचारांत यहूदी प्रवक्त्यांची मान्यता पूर्णपणें असून अनेक पापांचा मूर्तिपूजेशीं संबंध आहे अशी भावना व्यक्त होते. या प्रकारच्या भावनेंमुळेंच ख्रिस्ती व मुसलमान संप्रदाय लोकांस पीडादायक झाले.
''१८ पण जीं मनुष्यें अनीतीनें सत्य दाबून ठेवितात त्यांचा अधर्म व अनीति यांवर देवाचा क्रोध स्वर्गांतून प्रकट होतो; १९ कारण देवाविषयींचें जे ज्ञान होत असतें तें त्यांच्या मनास व्यक्त आहे; कां तर देवानें तें त्यांस व्यक्त केलें आहे; २० कारण त्याचे अदृश्य गुण म्हणजे त्याचें सनातन सामर्थ्य व देवत्व हीं निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन सृष्टीच्या उत्पत्तिकालापासून स्पष्ट दिसत आहेत, यासाठीं कीं, त्यांनीं निरूत्तर व्हावें; (२१) कारण देवाला जाणत असतां त्यांनीं त्याला देव म्हणून गौरविलें नाहीं, व त्याचे उपकार मानिले नाहींत; तर ते आपल्या पोकळ कल्पनांनीं शून्यवत् झाले, आणि त्यांचें मूढ मन अंधकारानें व्याप्त झालें. २२ आपण ज्ञानी आहों असें म्हणवीत असतां ते मूर्ख झाले, २३ आणि त्यांनीं अविनाशी देवाच्या गौरवाचा नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद व सरपटणारे जीव यांच्या आकाराच्या मूर्तींशीं मोबदला केला.
२४ यास्तव देवानें त्यांस त्यांच्या मनांच्या वासनांत अमंगळपणाच्या स्वाधीन केलें असें कीं त्यांच्यामध्यें त्यांच्या शरीरांचा अवमान झाला. २५ त्यांनीं तर देवाच्या सत्याचा असत्याशीं मोबदला केला आणि जो उत्पन्न कर्ता युगानुयुग धन्यवादित, आमेन ! त्याला सोडून उत्पन्न केलेल्या पदार्थांची भक्ति केली.
२६ यामुळें देवानें त्यांस निंद्य मनोभावनांच्या स्वाधीन केले; त्यांतल्या बायकांनीं स्वाभाविक व्यवहार सोडून विपरीत व्यवहार धरिला. २७ तसेंच पुरूषांनींहि स्त्रीशीं स्वाभाविक व्यवहार सोडून परस्परें कामसंतप्त होऊन पुरूषांनीं पुरूषांशीं अनुचित कर्म केलें, आणि त्यांच्या भ्रांतीचें योग्य प्रतिफल त्यांनीं आपल्या ठायीं भोगिलें. २८ आणि ज्याअर्थीं देवाचें पूर्ण ज्ञान प्राप्त करून घेण्यास ते मान्य झाले नाहींत, त्याअर्थीं देवानें त्यांस अनुचित कर्में करण्यास अवमान्य मनाच्या स्वाधीन केलें. २९ ते सर्व अनीति, दुष्ठपणा, लोभ वाईटपणा, यांनीं भरलेले असे होते; हेवा, हत्या, कलह, कपट, कुबुद्धि यांनीं पूर्ण असे होते. ३० ते चहाड निंदक, देवद्वेषी, उद्धट, गर्विष्ट, आत्मश्लाघी, कुकर्मकल्पक, मातापितरांचीं अवज्ञा करणारे, ३१ बुद्धिहीन, वचनभंग करणारे, ममताहीन, निर्दय असे होते. ३२ जे असें आचारण करितात ते मरणास योग्य आहेत. असा देवाचा नियम त्यांस ठाउक असतांहि, ते स्वतःतींच कर्में करितात इतकेंच केवळ नव्हे, तर तसें आचरण करणा-यांस त्यांची संमतिहि आहे.'' (रोमकरांस पत्र, अध्याय १).
''यास्तव हे मनुष्या, जो कोणी न्याय करणारा तो तूं निरूत्तर आहेस, कां तर ज्याविषयीं तूं दुस-याच्या न्याय करितोस त्याचविषयीं तूं आपणाला अन्यायी ठरवितोस, कारण न्याय करणारा तूं तींच कर्में आचरितोस. २ पण आम्हांस ठाऊक आहे कीं, जे अशीं कर्में आचरितात त्यांविरूद्ध देवाचा न्याय सत्यानुसार होतो. ३ तर हे मनुष्या, जो तूं तशीं कर्में आचरणा-याचा न्याय करीत असून तींच स्वतःकरितोस तो तूं देवाचा न्याय चुकविशील असें तुला वाटतें काय ? ४ किंवा देवाची दया तुला पश्वात्ताप करावयास लावणारी आहे, हें न समजतां, त्याचें दयालुत्व, क्षमा व सहन शीलता हीं विपुल असतां, त्यांस अवमानितोस काय ? ५ आणि आपला हट्ट व पश्चातापहीन अंतःकरण यांस अनुसरून तूं जो क्रोधाचा व देवाचा यथार्थ न्याय प्रगट होण्याचा दिवस त्या दिवसाचा क्रोध आपणासाठीं सांठवून ठेवितोस; ३ ''तो प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणें फळ देईल,'' सत्कर्माविषयींच्या धीराप्रमाणें जे गौरव सन्मान व अविनाशिता यांसाठीं झटतात त्यांस तो सार्वकालिक जीवन देईल, ८ परंतु जे तट पाडणारे आहेत व सत्याला न मानितां अधर्माला मानितात त्यांवर ९ म्हणजे दुष्कर्म करणारा मनुष्य, प्रथम यहूदी, आणि मग हेल्लेणी अशा प्रत्येकाच्या जीवावर (क्रोध व कोप संकट व क्लेश हीं येतील). १० आणि प्रत्येक सत्कर्म करणारा, प्रथम यहूदी आणि मग हेल्लेणी यांस गौरव सन्मान व शांति हीं होतील, ११ कारण देवापाशीं पक्षपात नाहीं. १२ नियमशास्त्र ज्यांस नाहीं अशा जितक्यांनीं पाप केले तितकेहि नियमशास्त्र नाहीं तरी नाश पावतील आणि नियमशास्त्र असतां जितक्यांनीं पाप केलें तितक्यांचा न्याय नियमशास्त्रानें ठरेल; १३ कां तर नियमशास्त्र श्रवण करणारे देवाच्या दृष्टीनें नीतीमान् आहेत असें ठरतील. १४ ज्यांस नियमशास्त्र नाहीं असे विदेशी लोक जेव्हां स्वभावतः नियमशास्त्रांत आहे तें करितात तेव्हां त्यांस नियमशास्त्र नाहीं तरी ते स्वतः आपणांस नियमशास्त्र आहेत; - (रोमकरांस पत्र अध्याय २).
''भावांनो, कोण मनुष्य एखाद्या अपराधांत सांपडला, तरी जे तुम्ही आत्मिक आहा, ते तुम्ही अशाला सौम्यतेच्या आत्म्यानें स्थितीवर आणाय तूंहि परीक्षेंत पडूं नये याविषयीं आपणाला संभाळ. २ एकमेकांचीं ओझीं वाहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. ३ कारण आपण कोणी नसतां कोणी आहों असें जो कल्पितो तो आपणाला फसवितो. ४ तर प्रत्येकानें आपापल्या कामाची परीक्षा करावी म्हणजे त्याला दुस-याला संबंधानें नव्हे, तर केवळ आपल्या संबंधानें आढ्यतेस जागा मिळेल. ५ कारण प्रत्येकानें आपापला भार वाहिला पाहिजे. ६ वचनाचें शिक्षण पावणारा व शिक्षण देणारा हे सर्व चांगल्या गोष्टींत एकमेकांचे भागीदार होवोत ७ फसूं नका; उपहास देवाचा होत नाहीं; कारण मनुष्य जें कांहीं पेरितो त्याचेंच त्याला पीक मिळेल. ८ कारण जो आपल्या देहासाठीं पेरितों त्याला देहापासून नाशाचें पीक मिळेल; आणि जो आत्म्यासाठीं पेरितो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवनाचें पीक मिळेल. ९ तर आपण बरें करण्यास थकूं नये, कारण आपण न खचलों तर यथाकालीं आपणाला पीक मिळेल. १० तर मग आम्हांला प्रसंग आहे त्याचप्रमाणें आम्हीं सर्वांचें व विशेषेंकरून विश्वासबंधूंचें बरें करावें.'' (गलती यांस पत्र, अ. ६).
प्रकटीकरण.- प्रकटीकरण म्हणून एक मौजेचा लेख आहे. ज्याप्रमाणें आपल्याकडे कांहीं लोक पाहूं लागतात व त्यांस अनेक अपूर्व गोष्टी दिसतात. त्याप्रमाणें येशूचें ईश्वरपुत्रत्व आणि ग्रंथांचें ईश्वरप्रणित्व योहानास दिसलें. अनेक सुशिक्षित ख्रिस्तीदेखील प्रकटीकरणासारख्या लेखास त्रिकालाबाधीत पण गूढ सत्त्यांचा अंश समजत. हें पाहून इतरांची बरीच करमणूक होतें. प्रकटीकरणांचें स्वंरूप लक्षांत येण्यासाठीं कांहीं उतारे दिले आहेत.
''यानंतर मीं पाहिलें, तों पहा, स्वर्गांत उघडलेलें आहे. आणि जी पहिली वाणी ऐकिली ती मजशीं बोलणा-या 'करण्याच्या' सारखी होती. ती म्हणाली इकडे 'वर ये,' म्हणजे जें यानंतर 'झालें पाहिजे' ते तुला दाखवीन. २ इतक्यांत मला आत्मावस्था प्राप्त झाली. तों पहा स्वर्गांत सिंहासन मांडलेलें आहे, आणि सिंहासनावर कोणी बसलेला आहे. ३ जो बसलेला तो दिसण्यांस यासफे व सार्दि या रत्नासारिखा आहे. आणि 'सिंहासनावरून' दिसण्यांस पाचेसारिखें 'वर्तुलाकार मेघधनुष्य आहे.' ४ आणि सिंहासनाभोंवतीं चोवीस सिंहासनें आहेत. आणि त्या सिंहासनांवर ते शुभ्रवस्त्रें ल्यालेले व डोक्यांवर सोन्याचे मुकूट घातलेले चोवीस वडील बसलेले आहेत असें दृष्टीस पडलें. ५ आणि सिंहासनाच्या आंतून 'विजा' व 'वाणी' व 'गर्जना' निघत आहेत, आणि सात अग्निरूप मशाली सिंहासनापुढें जळत आहेत, त्या देवांचे सात आत्मे आहेत. ६ आणि सिंहासनापुढें 'स्फटिकासारखा' जसा काय काचेचा समुद्र आहे, आणि सिंहासनाच्या मध्यभागीं सिंहासनाच्या चार बाजूंस पुढें व मागें 'डोळ्यांनीं भरलेले चार असे प्राणी' आहेत. ७ पहिला प्राणी 'सिंहा' सारखा व दुसरा गो-ह्यासारखा आहे, व 'तिस-याचें तोंड' मनुष्यासारखें आहे व 'चौथा' प्राणी उडत्या 'गरूडा' सारिखा आहे. ८ त्या चारहि प्राण्यांला 'प्रत्येकी सहा सहा पंख असून ते प्राणी सर्वांगींवरून' व पंखांखांलीहि 'डोळ्यांनीं भरलेले' आहेत. आणि 'पवित्र, पवित्र, पवित्र,' जो होता, आहे व येतो, 'प्रभु देव सर्वसत्ताधारी' हें म्हणतांना ते रात्रंदिवस थांबत नाहींत. ९ आणि 'सिंहासनावर बसलेला युगानुयुग जीवंत' याचे जेव्हां जेव्हां ते प्राणी गौरव व सन्मान व उपकारस्तुति करितात, १० तेव्हां तेव्हां ते चोवीस वडील सिंहासनावर बसलेला 'त्याच्या पायां पडतात,' आणि 'युगानुयुग जीवंत' याला नमस्कार घालतात आणि आपले मुकुट सिंहासनापुढें ठेवून म्हणतात,
११ हे आमच्या प्रभुदेवा, गौरव व सन्मान व सामर्थ्य तुझें आहे असें म्हणून घ्यावयास तूं योग्य आहेस. कारण, तूं सर्व उत्पन्न केलें आणि तुझ्या इच्छेनें तें झालें उत्पन्न झालें.'' (प्रकटीकरण अ. ४).
''सिंहासनावर बसलेला'' याच्या उजव्या हातावर 'पाठपोट लिहिलेली' व सात शिक्के मारून बंद केलेली अशी 'पुस्तकांची गुंडाळी' मीं पाहिली, २ आणि 'पुस्तकाचे शिक्के फोडून ती उघडायास कोण योग्य आहे असें मोठ्यानें ओरडणारा बलवान् दूत मीं पाहिला. ३ तेव्हां स्वर्गात व पृथ्वीवर व पृथ्वीखालीं कोणी हें पुस्तक उघडायास किंवा त्यांत पाहायास समर्थ नव्हता. ४ हें पुस्तक उघडायास व त्यांत पाहावयास योग्य असा कोणी आढळला नाहीं म्हणून मीं रडलों. ५ तेव्हां वडिलांपैकीं एकजण मला म्हणाला रडूं नको, पाहा, 'यहूदी' वंशाचा 'सिंह दाविदाचा 'अंकूर’ यानें जय मिळविला, तो त्याचे सात शिक्के फोडून पुस्तक उघडण्यास योग्य आहे. ६ तेव्हां सिंहासन व चार प्राणी हीं आणि वडील ह्यांमध्यें 'वधिला होता' असा 'कोंकरा' उभा राहिलेला मीं पाहिला, 'त्याला सात शिंगें व सात डोळे होते,' ते 'सर्व पृथ्वीवर' पाठविलेले देवाचे सात आत्मे आहेत. ७ त्यानें जाऊन 'सिंहासनावर बसलेला याच्या उजव्या हातांतून पुस्तक घेतलें. ८ आणि त्यानें पुस्तक घेतलें तेव्हा चार प्राणी व चोवीस वडील कोंक-याच्या पायां पडले, त्या सर्व वडिलांजवळ विणे व धुपानें भरलेलीं सोन्याची धुपाटणीं होतीं तीं पवित्रांच्या प्रार्थना आहेत. ९ ते 'नवें गीत गातात,' तें असें -
तूं पुस्तक घ्यायास व त्याचे शिक्के फोडायास योग्य आहेत कारण तूं वधिला होतास; आणि तूं आपल्या रक्तानें सर्व वंश व भाषा व लोक व राष्ट्रें यांतले आमच्या देवासाठीं विकत घेतले आहेत; १० आणि आमच्या देवासाठीं त्यांस राजे व याजक असें केले आहेत;
आणि ते पृथ्वीवर राज्य करीत आहेत. ११ तेव्हां मीं पाहिलें तों सिंहासन व प्राणी व वडील यांच्या भोंवतीं बहुत दूतांची वाणी ऐकुं आली; आणि त्यांची संख्या 'अयुतांचीं अयुतें व सहस्त्रांचीं सहस्त्रें होतीं.' १२ ते मोठ्यानें म्हणत होते- वधलेला कोंकरा सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व स्तुति हीं घेण्यास योग्य आहे. १३ आणि स्वर्गांत, व पृथ्वीवर व पृथ्वीच्या खालीं, व समुद्रावर जीं प्रत्येक सृष्ट वस्तु आहे ती आणि त्यांतील सर्व यांस असें म्हणतांनां ऐकिलें कीं, 'सिंहासनावर बसलेला' याला व कोंक-याला स्तुति, सन्मान व गौरव व सत्ता हीं युगानुयुग असोत. १४ तेव्हां चार प्राणी म्हणाले, आमेन; आणि वडिलांनीं पाया पडून नमस्कार केला'' (प्रकटीकरण अ. ५).
''८ हें ऐकणारा व पाहणारा मी योहान आहे. जेव्हां मी ऐकिलें व पाहिलें तेव्हां हें मला दाखविणा-या दूताला नमस्कार घालण्यास त्याच्या पायांपुढें पडलों, ९ परंतु तो मला म्हणाला, असें करूं नको; मीं तुझा व तुझे भाऊ प्रवक्तें व या पुस्तकांतील वचनें पाळणारे यांचा सोबतीचा दास आहे; नमस्कर देवाला घाल.
१० पुन्हां तो मला म्हणाला, या 'पुस्तकांतील' प्रवचनें 'शिक्का मारून' बंद करूं नको, कारण वेळ जवळ आली आहे. ११ अधर्मी अधर्म करीत राहो, मलिन आपणाला मलिन करीत राहो, धार्मिक धर्म आचरीत राहो, व पवित्र आपणाला पवित्र करीत राहो. १२ पहा 'मी' लवकर 'येतों आणि प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणें देण्यास माझ्याजवळ वेतन’ आहे. १३ ‘मीं’ अलफा व ओमेगा, ‘पहिला व शेवटला,’ प्रारंभ व शेवट असा आहे. १४ जे आपलीं ‘वस्त्रें धुतात’ ते धान्य, त्यांची ‘जीवनाच्या झाडावर’ सत्ता होईल, आणि ते वेशींतून नगरींत आंत जातील. १५ कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तिपूजक हे व लबाडीची आवड धरणारे, व लबाडी करणारे सर्व बाहेर राहतील” (प्रकटीकरण अ. २२).
“१८ या पुस्तकांतील ‘प्रवचनें’ ऐकणा-या प्रत्येकाला मीं खातरीनें सांगतों कीं, जो कोणी ‘त्यांत भर घालील’ त्यावर ‘ह्या पुस्तकांत लिहिलेल्या’ पीडा देव आणील. १९ आणि जो कोणी या प्रवचनाच्या पुस्तकांतील वचनांतून कांहीं ‘काढील’ त्याचा या पुस्तकांत वर्णिलेल्या ‘जीवनाच्या झाडांतून’ व पवित्र नगरींतून वांटा देव काढील” (प्रकटीकरण अ. २२).
प्रकटीकरणाचा सेमेटिक जगावर परिणाम.- हें प्रकटीकरण योहानास झालें अशी समजूत लोकांत प्रसृत करण्याचा प्रयत्न झाला त्यामुळें ईश्वर व्यक्तीच्या मार्फत ग्रंथ प्रकट करतो अशी कल्पना लोकांत पसरून महंमदास आपला सर्व उपदेश प्रकटी करणाच्या रूपानें मिळाला आहे अशी कल्पना प्रसृत करण्यास क्षेत्र मिळालें. ईश्वराचा पुत्र अशा त-हेची कल्पना मांडण्यापेक्षां प्रकटीकरणाची कल्पना मांडावी हें महंमदास सोइस्कर वाटलें असावें.
महंमदीय चळवळी, त्यांची जगद्व्यापकता व संकोच.- इसवीसनाच्या सहाव्या शतकांत सेमेटिक महावंशांतील अरब लोकांमध्यें कांहीं विशिष्ट पारमार्थक आणि सामाजिक भावना प्रदीप्त होऊन त्या भावनेनें जगांतील अनेक राष्ट्रांवर परिणाम घडविला, अनेक दुर्लक्ष करण्याजोगी राष्ट्रें रणोत्सुक केलीं, जुन्या पुष्कळशा प्राचीन समजुतींचा उच्छेद करून त्यांबरोबर कांहीं अंशीं प्राचीन ज्ञानाचाहि उच्छेद केला आणि जगाच्या एका मोठ्या भागास कांहीं काल प्रगतीच्या रस्त्यावर आणलें तर कांहीं काल हट्टी अज्ञानानें कुंठितमार्ग केलें. ही महत्त्वाची शक्ति म्हटली म्हणजे इस्लाम ही होय. या चळवळीचा परिणाम यूरोपरवर होऊन स्पेनला ब-याच काळपर्यंत इस्लामी सत्तेखालीं रहावें लागलें; व्हिएन्नापर्यंत यूरोपांतील मूलूख मुसलमानी सत्तेखालीं कांहीं काळपर्यंत आला; आणि अनेक शतकें जरी यूरोपनें ही सत्ता आपल्या किना-यावरून काढून टाकण्याचा प्रयत्न केला तरी यूरोपचा हा प्रयत्न अजून पूर्णपणें यशस्वी झाला नाहीं. आशियाखंडांत या शक्तीनें मोठीच क्रांति घडवून आणून भारतीय संस्कृतीचा विकास आणि तिचा जगद्व्यापी प्रयत्न बंद पडला, आणि चीनपासून फिलिपाइनपर्यंत या संप्रदायाचा विस्तार करविला. या संप्रदायाचा इतिहास म्हणजे त्या संप्रदायाच्या राजकीय शक्तीचा आणि भावनाशक्तीचा इतिहास होय. या संप्रदायाचे सर्व धागे लक्षांत येण्यासाठीं महंमदाचें चरित्र आणि खिलाफतीचा इतिहास हीं तर अवलोकिलीं पाहिजेतच, पण आधुनिक जगांतील या संप्रदायाच्या परिणामांचें विहंगमदृष्टीनें अवलोकन केलें पाहिजे. प्रथम इस्लामाचा संस्थापक जो हजरत महंमदपैगंबर त्याच्या चरित्रांकडे वळूं.
महंमद पैगंबर.- महंमदाच्या आयुष्याचे चार विभाग पडतात. (१) वयाचीं पहिलीं चाळीस वर्षें तो मक्का येथें जुना मूर्तिपूजकांचा धर्म आचरीत राहिला होता. वयाच्या पंचविसाव्या वर्षीं त्यानें आपल्यापेक्षां वयानें ब-याच मोठ्या अशा एका स्त्रीबरोबर लग्न केलें. तिच्यापासून त्याला कांहीं पुत्र व चार कन्या झाल्या. यांपैकीं सर्वच पुत्र लहानपणीं वारले. चाळिसाव्या वर्षीं त्याल प्रकटीकरण म्हणजे ईश्वरी साक्षात्कार होऊं लागला. त्याची प्रकटीकरण क्रिया सामान्यत: येणेंप्रमाणें होती. महंमद बेशुद्ध होई, व बेशुद्ध असतांना तो जीं वाक्यें वदे तीं वाक्यें अंतेवासी लिहून ठेवीत. हीं ईश्वरी वाक्यें समजलीं जात, अशा रीतीनें त्याच्या द्वारें परमेश्वर नवीन धर्म प्रकट करूं लागला, व त्यामुळें त्याला ज्ञानी, भविष्यवादी महात्मा म्हणून लोक मानूं लागले. (२) प्रथम तीन वर्षें त्यानें आपलें संप्रदायप्रसाराचें काम खाजगी रीतीनेंच चालविलें होतें. या काळांत त्याच्या कुटुंबांतील कांहीं नातेवाईक, कांहीं मित्र व मक्का शहरांतील हलक्या स्थितींतील लोक त्याचे अनुयायी बनले. (३) नंतर पुढें दहा वर्षें त्यानें मक्केंतच सार्वजनिक रीत्या संप्रदायप्रसाराचें काम केलें. या काळांत अबु तालीब नांवाच्य त्याच्या चुलत्यानें त्याची स्वत:ची नव्या महंमदी संप्रदायावर श्रद्धा नसतांहि, महंमदाचें संरक्षण केलें. हा चुलता वारल्यावर कांहीं काळ ताइफनें त्याला आश्रय दिला; व नंतर मक्केमधीलच एका थोर रहिवाशानें त्याचा सांभाळ केला. परंतु मध्यंतरीं त्याच्या अनुयायांना मात्र मक्केंत फार छळ होऊं लागल्यामुळें ख्रिस्तसंप्रदायी हवसाण (आवीसीनिया) देशांत जाऊन राहावें लागलें. या त्याच्या आयुष्यांतील तिस-या भागाच्या अखेरीला मदीना शहरांतील रहिवाशांमध्यें आपसांत दुही माजून लढाई चालू झाली होती, ती थांबवून तंटा मिटविण्याकरितां महंमदाला मध्यस्थ नेमण्यांत आलें. तदनुसार महंमदाला बोलावणें येऊन तें काम त्यानें पतकरलें. तथापि त्यानें धूर्तपणानें आपले कांहीं अनुयायी शरीरसंरक्षक म्हणून मदीनाला आधीं पाठविले; व नंतर स्वत: तो मक्केमधून मोठ्या प्रयासानें बाहेर पडला. (४) मदीना शहरांत गेल्यावर त्यानें आपले अनुयायी एकत्र करून एक सैन्य तयार केलें, शहरांतील बंडाळी मोडून टाकली व आसपासच्या अरब लोकांच्या टोळ्यांशीं स्नेह जोडून मक्केकडे जाणा-या कारवान लोकांवर तो हल्ले करूं लागला. याप्रमाणें पूर्वींच्या नगरसंबंधूंबरोबर त्याचें युद्ध सुरू होऊन त्यांचा त्यानें अनेक वेळा पराभवहि केला; आणि शेवटीं मक्केतून पळून गेल्यापासून आठव्या वर्षीं तें शहर त्यानें हस्तगत केलें, पुढें आयुष्याच्या अखेरीपर्यंत त्यानें संप्रदायप्रसाराचें काम सतत चालवून सर्व अरबस्थान देश मुसुलमानी करून टाकला; कांहीं थोडे अपवाद खेरीज करून सर्व यहुदी संस्कृतीचे लोक नाहींसे केले; ख्रिस्ती लोकांनां खंडणी देण्याच्या अटीवर राहूं दिले; आणि मूर्तिपूजकांचा तर समूळ उच्छेद केला.
महंमदाचे गुणदोष.- मोठा धाडसी लढवय्या व राजकारणी पुरूष एवढ्याच दृष्टीनें महंमदाच्या चरित्राकडे पाहिल्यास त्याच्या तोडीचे पुरूष इतिहासांत अनेक सांपडतील. भोंवतालचे लोक जमा करून त्यांनां लष्करी शिक्षण देऊन त्या सैन्याच्या मदतीनें मोठाले विजय संपादन करण्याचें कर्तृत्व व शौर्य अंगीं असलेला कोणीहि मनुष्य अगदीं हीन स्थितींतून चढत जाऊन श्रेष्ठ व स्वतंत्र अधिकार गाजवूं लागण्याइतका मोठा होऊं शकतो. अब्बासिद, फातिमिद, बुबैहिद, सेलजुक व आटोमन ही घराणीं अशाच त-हेनें उदयास आलेलीं आहेत. या सर्वांच्या शौर्याला संप्रदायप्रसाराच्या पवित्र उद्देशाची जोड मिळालेली होती. तथापि या सर्व मुसुलमानी संप्रदायप्रसारकांच्या कार्याला जें यश आलें तें त्या संप्रदायांतील तत्वांच्या श्रेष्ठपणामुळें आलेलें नसून त्याचें खरें श्रेय सदरहू पुरूषांच्या अंगच्या लष्करी गुणांकडेच आहे. असले गुण महंमदाच्या अंगीं तर विशेष प्रमाणांत होते. दुस-यांच्या अंगांतील गुणांची परिक्षा त्याला फार उत्कृष्ट असे. त्यानें निवडून हाताखालीं घेतलेला एकहि मनुष्य पुढें नालायक किंवा बेइमान निघाला नाहीं. अरब लोकांच्या स्वभावांतील दोष व कर्में त्याला पूर्ण अवगत होतीं आणि त्यांचा त्यानें स्वत:च्या कार्यांत अत्यंत उपयोग करून घेतला. इबन इशाकनें महंमदाविषयींच्या सांगितलेल्या गोष्टींवरून महंमदाच्या मनांत नीत्यनीतिविचारांचा पूर्ण अभाव असल्याचें दिसतें; पण त्यांवरूनच त्याच्या अंगीं चिकाटी, धैर्य, धूर्तपणा, प्रसंगावधान व राजनिष्ठेच्या भावनेचा अभाव वगैरे त्याच्या कार्याला अत्यंत आवश्यक असे सर्व गुण होते असें ठरतें. महंमदाविषयीं दुसरी विलक्षण गोष्ट म्हणजे त्यानें आयुष्यांतील मुख्य कामगिरीला पन्नासाव्या वर्षीं आरंभ केला. पण अशीं क्रॉसवेल सारख्यांचीं दुसरी उदारणें आहेत. मुसुलमानी संप्रदायप्रसारांतील मुख्य मुद्दयाची गोष्ट म्हणजे ही कीं, महंमदानें जेव्हां तरबार उपसली तेव्हांच त्याच्या कार्याला खरें यश आलें त्याच्या आयुष्यांतील प्रसंगहि त्याच्या कार्याला हितकर असेच येत गेले. आतां समाजांतील एखाद्या विशिष्ट व्यक्तीलाच इतरांपेक्षां गुणांचा लाभ अधिक कां व्हावा व त्याच्या अंगांतील उपजत गुणांची वाढ उत्तम होत जाईल असेच प्रसंग त्याला कां प्राप्त व्हावें, हें इतिहासांत आढळणारे कोडें महंमदाच्या बाबतींतहि लागू असून तें अजून सुटले नाहीं.
महंमदाला लिहितांवाचतां येत होतें कीं नाहीं, याबद्दल बराच वाद आहे. एकंदर पुराव्यावरून त्याला दोन्ही गोष्टी येत होत्या पण चांगल्या यत नव्हत्या असें दिसतें. त्याचा पोटाचा धंदा काय होता हेहि नक्की माहीत नाहीं. कुराणांतील कांहीं उल्लेखांवरून तो व्यापारी असावा असा तर्क करतात. कुराणांतील स्थलविषयक वर्णनांवरून, त्यानें बराच प्रवास केलेला होता, हें मात्र नक्की ठरतें.
मुसुलमानी संप्रदायाचा उदय व वाढ.- नवीन संप्रदायसंस्थापकाचा अवतार होणार, असें मक्केतील कित्येकांनीं भविष्य केलें होतें असें सांगतात. त्यांत महंमदा च्या बायकोचाच एक नातेवाईक असून त्यानें बायबलच्या कांहीं भागांचें भाषांतर केलेलें होते. अरबस्थानच्या दक्षिण व उत्तर भागांत ख्रिस्ती संप्रदाय पसरलेला होता, तेव्हां मध्यअरबस्थानांत ख्रिस्ती प्रचारकांच्या उद्योगामुळें तेथील लोक ख्रिस्ती विचारांबद्दल जिज्ञासेनें चौकशींत असल्यास नवल नाहीं. प्रत्यक्ष कुराणावरून मात्र त्यांतील कोणताहि भाग दुस-या ग्रंथांतून उतरून घेतलेला किंवा त्याच्या आधारें लिहिलेला असा दिसत नाहीं. बायबलांतील कांहीं गोष्टी कुराणांत सांपडतात, पण त्या ऐकींव माहितीवरून दिलेल्या दिसतात. कुराणांत आलेलीं विशेषनामें, व संप्रदायांतील पारिभाषिक शब्द, इथिओपिक, ग्रीक, सिरिअक, हिब्रू वगैरे अनेक भाषांतील शब्दावरून बनलेलें आहेत.
महंमदाला प्रत्यक्ष साक्षात्कार होऊं लागण्यापूर्वीं तो कांहीं काळ हिरा नामक प्रर्वतावर प्रपंच सोडून विरक्त स्थितींत जाऊन राहिला होता असें सांगतात. कुराणांत जे परमेश्वराचे संदेश म्हणून दिलेले आहेत ते महंमदाला प्रथम मिळाले तेव्हां तो अंगांत आलेल्या माणसाप्रमाणें बोलत असे. व यावेळीं तो स्वत:च्या भोंवतीं एक घोंगडी गुंडाळून घेऊन घामानें चिंब भिजून जात असे. त्याच्या तोंडांतून बाहेर पडणारा मजकूर कित्येक वेळां पद्यमय असे. परंतु या गद्यपद्यमय भाषेचा उत्तम अरबी गद्यपद्यात्मक भाषेशीं संबंध कसा जोडावयाचा, हें एक मोठें कोडें असून तें अद्याप सुटलेलें नाहीं. मक्केंतील अरब लोक तर अशिक्षित व अडाणी असल्याचा कुराणांत उल्लेख आहे. शिवाय यहुदी ख्रिस्ती लोकांनां आपआपल्या धर्मानुसार आचरण करण्यास अडथळा करूं नये, अशी खुद्द महंमदानें इच्छा प्रदर्शित केलेली आहे; त्यावरून स्वत:च्या अज्ञानाची जाणीव व दुस-यांच्या ज्ञानाबद्दल आदर या दोन्ही गोष्टी महंमदाच्या अंगीं होत्या, हें उघड आहे. तात्पर्य, महंमदाचे पूर्वकालीन अरब फारसे विद्वान् नव्हते त्यांची पद्यरचना फारशा चांगल्या वृत्तांत असणें शक्य नाहीं. अर्थात कुराणाची म्हणजे महंमदाच्या धर्मापदेशाची भाषा अशाच अर्धवट स्वरूपाची असल्यास त्यांत नवल नाहीं. शिवाय कुराणाला मूळ वृत्तपत्राचें स्वरूप असून नंतर त्याला ग्रंथाचें स्वरूप देण्यांत आलें, हेंहि लक्षांत ठेविलें पाहिजे.
देवाला कौल लावून भविष्यसूचक माहिती मिळविण्याची चाल महंमदापूर्वीं अरबांत होतीच. महंमदासारखे भविष्यवादी दैवी शक्ति अंगांत संचरल्यावर जे बोलत त्यांत भावी संकटाच्या सूचनाहि लोकांनां दिलेल्या असत; कारण, संकटनिवारणार्थ लोकांनां मदत करणें हें महंमद आपलें कर्तव्य समजे. स्प्रेंगर वगैरे कित्येकांनीं महंमदाला अपस्माराचे झटके येत असत असें म्हटलें आहे. परंतु महंमद हा शरीरानें चागला बळकट होता, व त्याच्या उत्तर वयांत देखील तो बहुतेक लष्करी स्वा-या व लढाया यांत गुंतलेला असे. त्याचा नवा मुसुलमानी पंथ संख्याबलानें एकसारखा वाढत होता, व त्या वाढत्या समाजाला धर्मापदेश करणें, त्यांच्यासाठीं कायदे करणे, त्यांची अंमल बजावणी करणें व न्याय देणें वगैरे सर्व गोष्टी त्याला एकट्याला कराव्या लागत. इतका कामाचा बोजा असतांहि त्याची शरीरप्रकृति अखेरपर्यंत चांगली होती. तेव्हां त्याला वायूचे झटके वगैरे प्रकटीकरणानिमित्त येत असावेत, त्यांचा त्याच्या आरोग्याशीं कांहींएक संबंध नसावा असें मुसुलमान ग्रंथकार म्हणतात. महंमद पुढें जेव्हां मुसुलमानी राज्याचा मालक बनला. तेव्हां कुराण हें एक सरकारी बातमीपत्र होऊन बसलें, व त्यांत राज्यकारभाराच्या दृष्टीनें महत्त्वाची अशी सर्व हकीकत व हुकूम येऊं लागले. परमेश्वराच्या दूताच्या संदेशावरहुकूम वागणें किती अगत्याचें आहे हेंहि त्यांत वरचेवर प्रतिपादन केलेलें असे.
म हं म दा चा उ प दे श व आ च र ण यां ती ल व सं ग त ता.- महंमदाला एकेश्वर मताशिवाय कोणतेंहि एखादें विशिष्ट तत्त्व लोकांनां शिकवावयाचें होतें असें दिसत नाहीं. कारण तो आपल्या कोणत्याहि तत्त्वाचें, तसा राजकीय प्रसंग आल्यास उल्लंघन करण्यास तयार असे. मुसुलमानी संप्रदायाची एकंदर परंपरा पाहिल्यास मुसुलमानी संप्रदायांतील तत्त्वें खुद्द महंमदापेक्षां त्याचे अनुयायीच अधिक एकनिष्ठेनें पाळीत आले आहेत, असें दिसून येतें. प्रथमारंभींच्या उपदेशांत महंमद (१) परलोक व पुनरूत्थान. (२) एकेश्वरत्व आणि (३) मूर्तिपूजेच्या तत्त्वांतला मूर्खपणा, या गोष्टींबद्दल मुख्यत्वेंकरून सांगत असे. मक्केंतील कृष्णपाषाणासंबंधींचे चुंबनादि प्रकार त्यानें शेवटीं धर्मसंमत ठरविले, यावरून मूर्तिपूजेविरूद्ध त्यानें उठविलेलें बंड निष्ठामूलक होतें असें मानणें पुष्कळांस कठिण होतें. पुनरूत्थानाच्या भविष्यत्कालीन अंत व त्या वेळीं होणारा सर्वांच्या पापपुण्याचा न्यायनिवाडा या गोष्टी अनुयायांच्या मनावर बिंबविण्याचा त्याचा उद्देश होता. परंतु पुढें संप्रदायप्रसाराच्या युद्धांत जेव्हां स्वत:च्या संप्रदायाचे लोक बळी पडूं लागले. तेव्हां त्यांचा तत्काल नंदनवनांत प्रवेश होतो व शत्रुपक्षी यांनां नरकवास घडतो असे महंमद प्रातपींदूं लागला. या दोन परस्परविरोधी गोष्टींचो मेळ घालणें कठिण आहे. तावरी ग्रंथांत असें सांगितलें आहे कीं, एकेश्वरमतवादी महंमदानेंच एका अडचणीच्या प्रसंगीं मक्केंतील अनेक देवता आपल्या संप्रदायांत सामील करण्याबद्दल ईश्वरी संदेश झाल्याचें जाहीर केलें होते. हा विशिष्ट भाग कोणी दुष्टानें मागाहून घुसडलेला असल्याचें ठरवून तो नंतर कुराणग्रंथांतून काढून टाकण्यांत आला हें खरें. तथापि या व कुराणांत वर्णिलेल्या आणखी कित्येक प्रकारांवरून वरील तिन्ही प्रमुख तत्त्वांचा व्यवहारांत कच्चेपणा दिसून येतो. परंतु यावरून महंमदाचा त्यानें स्वत: उपदेशिलेल्या तत्त्वांवर अविश्वास होता असें म्हणतां येत नाहीं. ही विसंगतता उत्पन्न होण्याचें कारण संस्थाचालकत्व आणि पदेशकत्व हे दोन भिन्न धंदे एकट्या महंमदासच करावे लागत हे हें होय.
महंमदाच्या धर्माज्ञा.- दुस-या कित्येक महत्त्वाच्या धर्माज्ञा- मक्केची यात्रा, महिनाभर उपवास व जकात नामक कर-महंमदानें मदीना येथें असतां केलेल्या आहेत. यांपैकीं पहिली आज्ञा मक्का व मदीना येथील लोकांचा सलोखा करण्याकरितां, दुसरी युद्धप्रसंगांत शिपायांनां उपासमारीचा त्रास वाटूं नये म्हणून व तिसरी गरिबांच्या मदतीकरितां द्रव्य निधि जमविण्याच्या उद्देशानें केलेली आहे. मद्यपानाचीहि त्यानें बंदी केलेला होती, व तिचा हेतूहि, लष्करी शिस्त चांगली पाळली जावी हाच दिसतो. शिवाय यावरून असेंहि ठरतें कीं, व्यावहारिक धर्माबद्दलच्या आज्ञा महंमदानें मदिनेस गेल्यानंतर तेथें प्रचलित असलेले यहुदी आचार पाहून केल्या आहेत.
परसंप्रदायांतील गोष्टी उसन्या घेतांना उसनेपणा उघडकीस न येऊं देण्याची तो खबरदारी घेत असे व त्यांत कित्येक महत्त्वाचे फरकहि करीत असे. आठवड्यांतील सुट्टीचा दिवस व खाद्यपेयांसंबंधाचे निर्बंध त्यानें थोड्या फार फरकानें यहुदी धर्मग्रंथातून घेतलेले आहेत असें कित्येक म्हणतात. पण असेंहि शक्य आहे कीं तो अरब आणि यहुदी यांच्या सामान्य परंपरेचाच भाग असेल. ख्रिस्ती संप्रदायांतील तत्त्वें किंवा आचार यांतून त्यानें फारसें कांहींच घेतलेलें दिसत नाहीं. ख्रिस्ती लोकांशीं तो प्रथमपासून सलोख्यानेंच वागत होता. व अखेर प्रबल सत्ताधीश झाल्यावरहि केवळ खंडणी घेऊन त्यानें त्यांना निर्धास्तपणें स्वतंत्र राहूं दिलें होतें हें मात्र खरें आहे.
अरबस्तानांतील ख्रिस्ती नसलेल्या लोकांच्या जुन्या धर्माशीं तुलना करण्याकरितां जरूर तितकी माहिती उपलब्ध नाहीं. तेथील निरनिराळ्या अरब लोकांच्या टोळ्यांत निरनिराळीं दैवतें होतीं; तेव्हां सर्व अरबस्तानची राजकीय दृष्ट्या एकी करण्याकरितां सर्वांचा मिळून एक दैवतसंप्रदाय असण्याची आवश्यकता महंमदास वाटली असावी हें उघड आहे. मदीना येथें महंमदाला जे मोठमोठे अरब वीर येऊन मिळाले ते केवळ मुसुलमानी संप्रदायाकरितां नसून महंमदाच्या लष्करी व राजकारणी गुणांमुळेंच मिळाले असावेत. दुसरे कित्येक, महंमदाला ईश्वरी साक्षात्कार घडतात, येवढ्याच श्रद्धाबुद्धीनें मिळाले. महंमदाची राजकीय सत्ता जसजशी वाढत गेली तसतसें त्याच्या मूळ संप्रदायतत्त्वाचें महत्त्व कमी होऊन आसपासच्या पारमार्थिक संप्रदायांतील आचारांचा महंमद आपल्या संप्रदायांत समावेश करून घेऊं लागला. त्याच्या उद्देश अर्थात् शक्य तितकी दुही मोडून सर्व अरबांचें एक राष्ट्र बनवावें हा होता.
महंमदाच्या द्वारें होणा-या प्रकटीकरणासंबंधाच्या खरेपणाविषयीं पुष्कळांनीं संशय घेतले आहेत. स्प्रेंगरचे अपस्माराच्या झटक्याविषयीचें मत वर दिलेलेच आहे व त्यांतील अयथार्थताहि वर दाखविली आहे. दुसरें केटनांचें मत असें आहे कीं महंमद प्रत्येक प्रकटीकरणांतील मजकुराची आगाऊ तयारी करून ठेवीत असे. पणें ह्या मतांतहि तथ्य नाहीं; कारण महंमदानें हीं प्रकटीकरणें जपून ठेवण्याची काळजी घेतल्यानें मुळींच दिसत नाहीं. तीं त्याच्या अनुयायांनीं एकत्र करून जपून ठेवलीं आहेत. इतर अत्यंत बुद्धिमान व कर्तृत्वमान माणसांप्रमाणें महंमदालाहि, आपल्या हातून परमेश्वर सर्व गोंष्टी करवीत आहे अशा प्रकारची श्रद्धा वाटत होती हे मात्र खरें.
नैतिक सुधारणा.- महंमदानें केलेली मोठी नैतिक सुधारणा म्हणजे लहान अर्भकें बली देण्याची चाल त्यानें बंद केली ही होय. ही चाल अरबस्तानांत त्यापूर्वीं होती, असें कुराणावरून स्पष्ट दिसतें. पण घेतलेली शपथ कांहीं प्रायश्चित्त घेऊन मोडण्यास हरकत नाहीं असेहि त्यानें ठरविलें. नीतिनियमाविषयींचें तात्त्विक विवेचन कुराणांत कोठेंच केलेलें नाहीं; तथापि मनुष्यानें आचरणांत कोणत्याहि प्रकारचा अतिरेक होऊं देऊं नये हा उपदेश मात्र केलेला दिसतो. अनेक भार्या करण्याला तसेच यथेच्छ वेश्यागमन करण्याला त्यानें परवानगी दिलेली आहे. इतकेंच नव्हे तर गुलाम करण्याची पद्धतीहि त्यानें मान्य केलेली आहे; खासगी मालमत्ता व द्रव्यसंचय करण्याच्या तो विरूद्ध नव्हता. सर्व गुणांत श्रेष्ठ मान धैर्यगुणाला तो देत असे. धाडसी शुरांना स्वर्ग मिळतो असें वारंवार सांगून तो अनुयायांना उत्तेजन देत असे. विरक्त संन्याशाचा आचारधर्म त्यानें कधींच उपदेशीला नाहीं; व तो त्याला मान्यहि नव्हता हें त्याच्या अखेरपर्यंतच्या आयुष्यक्रमावरून स्पष्ट दिसतें. खाजगी कौटुंबिक बंधनांपेक्षां एकंदर मुसुलमानी समाजाच्या हिताचीं बंधनें तो अधिक श्रेष्ठ मानीत असे, हें कुराणांतील अब्राहामच्या कथेच्या स्वरूपावरून स्पष्ट दिसतें. मुसुलमानी समाजांत आपसांत मारहाण, दंगेधोपे वगैरे कांहीं न होतां सर्वांनीं बंधुभावानें रहावें अशी त्याची फार इच्छा होती, पण ती सफळ झाली नाहीं. कारण त्याच्या मृत्यूनंतर लवकरच मुसलमानांमध्यें आपसांत युद्धें होऊन शेंकडों लोक बळी पडले हें इतिहासप्रसिद्धच आहेत.
परधर्मसहिष्णुतेबद्दल विवेचन कुराणांत ब-याच वेळां आलेलें आहे. कालदृष्ट्या आरंभींच्या भागांत मुसुलमानाप्रमाणें यहुदी, सेबियन व ख्रिस्ती या लोकांनाहि मुसलमानांचा देव अल्ला व अंतिमन्यायदिन यावर विश्वास असल्यास सद्गति मिळते स्पष्ट सांगितले आहे; पण उत्तरकालीन एका वचनांत वरील तिन्ही समाजांना सद्गति मिळण्याचा संभव कमी असल्याचें म्हटलें आहे. इतर कित्येक ठिकाणीं तर मुसुलमानांनीं परधर्मी समाजांशीं ते मुसुलमानी धर्म स्वीकारीपर्यंत किंवा खंडणी देण्याचें कबूल करीपर्यंत यत्किंचितहि दयामाया न ठेवतां लढथ सुटावें अशी स्पष्ट आज्ञा केलेली आहे. परधर्मींयांशीं मैत्री करण्याची सक्त मनाई केलेली आहे. उलट तसा जिवावरचा प्रसंग आल्यास आपण मुसुलमानी संप्रदायांतील आहों हेहि लपवून ठेवण्यास कुराणांत परवानगी दिलेली आहे. यावरूनहि कुराण ग्रंथ हा पवित्र धार्मिक हेतूपेक्षां राजकीय हेतूंनीं प्रेरित होऊन लिहिलेला असावा असे म्हणावें लागते. महंमदाचे अखेर अखेरचे उद्गार तर फारच असहिष्णुतापूर्ण आहेत. तथापि शेवटीं त्यानें परधर्मीयांपासून कर घेऊन त्यांना जिवंत राहूं देण्यास परवानगी दिली आहे.
तात्पर्य, धर्माज्ञा व सामाजिक व राजकीय कायदेकानू नवे व सर्वमान्य होण्यासारखे महंमदानें फारसे केले नाहींत; बहुतेक परंपरागत चालीरीतींवर व रूढींवरच त्यानें भागाविलें आहे. म्हणून कायदेग्रंथ या नात्यानें कुराणाला फाशी किंमत नाहीं. त्यांत आलेल्या कायदेविषयक विवेचनांत अपूर्णता व परस्पराविरोध व अव्यवस्था हे तिन्ही दोष भरलेले आहेत. वारसाहक्कासंबंधाचे नियम एकत्र व व्यवस्थित दिलेले आहेत हें खरें आहे; पण त्यांतहि पूर्वचिंतन व दूरदृष्टी फारशी दिसत नाहीं. साध्या चोरीच्या गुन्ह्याला हा तोडण्याची शिक्षा म्हणजे तर शुद्ध कठोरपणा दिसतो. असें सांगतात कीं, महंमद मृत्युशय्येवर पडला असतां त्यानें कायद्यांचा नवा ग्रंथ रचण्याची इच्छा दर्शविली होती. परंतु ज्यांनां कुराण म्हणजे प्रत्यक्ष देववाक्य असें वाटते अशा मुसुलमानांनां, महंमदाची ती वातांतली बडबड होती, असें साजिकच वाटतें. तथापि राज्याला अधिकारी कोण समजावा याचे नियम नीट घालून न दिल्यामुळें पुढें मुसुलमानी राज्यांत किती अनर्थ माजले याची साक्ष इतिहास देत आहेच. शिवाय प्रत्येक बाबतींत कुराण प्रमाम-त्याबाहेर नवे कायदेकानू करण्याचा कोणास कधींत अधिकार नाहीं- या समजुतीमुळें एकंदर मुसुलमानी समाज सुधारणेला सर्वस्वीं कसा पारखा होऊन बसला हेंहि सुप्रसिद्धच आहे.
तत्त्वज्ञान.- अतींद्रिय गोष्टींविषयीं तात्त्विक चर्चा करण्याची आवड महंमदाला होती, असें बहुधा दिसत नाहीं. पण संप्रदायस्थापक या नात्यानें त्याला कांहीं तत्त्वज्ञानात्मक गोष्टींचा विचार करणें भाग पडलें, व त्यामुळेंच ईश्वरविषयक कांहीं गोष्टींचें विवेचन कुराणांत आलेलें आहे; पण ते निश्चयात्मक स्वरूपाचें नाहीं. कुराणांतील अल्लाचें वर्णन महाबलाढ्य अशा एखाद्या अनियंत्रित सत्ताधीशाप्रमाणें आहे. त्याचा दरबार देवदूतांचा बनलेला असून त्यांपैकीं जिब्रिल हा महंमदाला देवाचे संदेश पोंचवीत असे. महंमदाला युद्धांत मदत करण्याला कित्येक देवदूतांना घोडेस्वार करून पाठविले होते असेंहि वर्णन आहे. दुसरी आधिदैविक कोटी जिन्न किंवा सैतानांची. इब्लिस हा त्यांचा राजा. सैतान ईश्वराच्या परवानगीनेंच कांहीं काळ मनुष्याला कुमार्गाला लावीत असतो, व पृथ्वीवरील सर्व अनर्थांचें मूळ तोच होय. कुराणाला दैववाद एकंदरीनें मान्य असल्याचें दिसतें. त्यांत आत्म्याविषयींचा विचार फारसा केलेलाच नाहीं. सृष्ट्युत्पत्तीविषयींचें वर्णन बायबलांतल्याप्रमाणेंच थोडीशी माहिती अधिक घालून दिलेलें आहे.
महंमदाचें खाजगी वर्तन:- इबन इशाकनें लिहिलेल्या महंमदाच्या चरित्रावरून महंमदाचें आचरण अगदीं वाईट होतें असें दिसतें. स्वत:चा हेतु साधण्याकरितां तो वाटेल ती युक्ती योजण्यास कचरत नसे, आणि अनुयायांनांहि सदसद् विचार पूर्णपणें धाब्यावर बसविण्यास त्याची संमति असे. खून व कत्तली त्यानें बेफिकीरपणें वाटेल तशा घडवून आणलेल्या होत्या. मदीना येथील त्याचाजुलमीं कारभार पाहिला म्हणजे तो निव्वळ दरोडे खोराचा नायक होता असें दिसतें. कारण, वाटेल तशी लुटालुट करून जमविलेला पैसा आपल्या अनुयायांत वांटून द्यावयाचा एवढेंच कायतें अर्थशास्त्र त्याला माहीत होतें असें म्हणावे लागतें. इतकेंच नव्हे तर लुटींची वांटणी करण्यातही तो फार पक्षपात करतो, अशी अनुयायांची ओरड असे. तो स्वत:विषयोपभोग बेसुमार करीत असे व अनुयायानाहि तेंच करण्यास त्याची पूर्ण मुभा होती पुन्हां आपण जें जें करतो तें सर्व ईश्वराज्ञेनेंच करतों, असें म्हणण्यास तो नेहमी तयार असें उलटपक्षीं कोणतेहि तत्त्व राजकीय फायद्याकरितां पायाखाली तुडविण्यास त्यास केव्हाहि हरकत वाटत नसे.
वरील वर्णन कोणा महंमदाच्या शत्रीनें केलेलें नसून प्रत्यक्ष त्याच्या अनुयायानें केलेलें आहे, आणि तें खोडून काढण्याचाही कोणी मुसुलमान लेखकानें प्रयत्न केलेला नाहीं उलट महंमदाच्या आयुष्यातील सर्व गोष्टी धर्मप्रमाण असें मानून त्या बरहुकुम हजारों लाखों मुसुलमान आज कित्यक शतकें वागत असल्यामुळें भयंकर अनर्थ होत आहेत. महंमदाच्या वर्तनाबद्दल तरफदारी किंवा समर्थन करणारे लेखक १८ व्या शतकापासून पुढें येऊं लागलें असून त्यांत यूरोपियन विद्वान प्रमुख आहेत. गिबन, कार्लाईल व बास्वर्थ स्मिथ यांनीं महंमदाची फार स्तुति केलेली आहे. परंतु या लेखकांतला मुख्य दोष हा कीं त्यांनीं महंमदाचा सुप्रसिद्ध असा मदीना येथील वर्तनक्रम विचारांत न घेतां त्याच्या मक्का येथील अल्पज्ञात चरित्रक्रमावर मुख्य भिस्त ठेविली. शिवाय प्रत्यक्ष अरबी भाषेंतील चरित्रलेखन साहित्याशीं यांपैकीं कोणीहि परिचय करून घेतलेला नाहीं. अर्थात् त्यांच्या मतींस फारशीं किंमत देतां येत नाहीं. अगदीं अलीकडे मुसुलमानी देशांत यूरोपियन संस्कृति बरीच ज्ञात झाल्यापासून या विषयावर लिहिण्याची जरूरी खुद्द मुसुलमानाना वाटूं लागली असून त्याप्रमाणें कांहीं लेखकांनीं प्रयत्न केलेला आहे. त्यांत सय्यद अमीर अल्ली हा प्रमुख होय. त्यानें इबन् इशाकचें चरित्र कित्येक ठिकाणीं विस्वासास अपात्र असल्याचें म्हटलें आहे; व तसें म्हणणें शक्य नसेल तेथें महंमदाच्या वर्तनाला विशिष्ट उच्च हेतु जोऊन देण्याचा प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ, अनेक बायकांऐवजीं चारच बायका करण्याची मर्यादा महंमदानें घातली ती एकपत्नीव्रताकडे अरबांची हळूहळू प्रवृत्ति करावी म्हणून होय असें हा भाष्याकार म्हणतो, व स्व:महंम तर एकपत्नी व्रत पाळणाराच होता असें तो विधान करतो. या युक्तिवादानें कोणाचें समाधान होण्यासारखें नाहीं हें उघड: आहे. असें मार्गोलिथ म्हणतो.
कुराणाची ईश्वरदत्तता हें मत स्थापन करण्यासाठीं महंमदानें कुराणांतच प्रयत्न केला आहे व आक्षेपकांस इशारा दिला आहे महंमद म्हणतो:
“२३ आणि आम्हीं आपला सेवक (मोहंमद) यास जें (कुराण) प्रकट केलें आहे त्या संबंधानें जर तुम्ही संशयांत असाल, (व समजत असाल कीं हें ईश्वरी पुस्तक नव्हे, पण मनुष्यानें रचिलेलें आहे) आणि तुम्ही (आपल्या त्या दाव्यांत) खरे असाल; तर ह्या सारखाच एक अध्याय (सूरा तुम्हीहि रचून) आणा व परमेश्वराखेरीज तुम्ही आपले प्रत्यक्ष हिमाईतीहि बोलावून घ्या. २३. मग जर तुम्हीं (एवढी गोष्टहि) न करूं शकला व (ती) तुमच्यानें केव्हांहि करवणारच नाहीं, तर ज्या नरकाग्नीचें इंधन मनुष्यें व दगड होतील, त्याचें भय बाळगा; तो नास्तिकांकरितां (भडकवून) तयार ठेवलेला आहे. २३. (सूरतुल्-बक अध्याय २ रा.)”
चवथ्या अध्यायांत यहुदी लोकांप्रमाणें आदम व हव्वा यांपासून जगाची उत्पत्ति झाली अशी समजूत दाखवितो. याच अध्यायांत स्त्रियांसंबंधी संप्रदायाची वृत्ति कशी असावी याविषयीं आज्ञा आहेत.
“अहो लोकांनों! आपल्या पालनकर्त्यास भ्या, कीं ज्यानें तुम्हांस एका तनमना (म्हणजे आदम) पासून निर्माण केलें; आणि (तें अशा प्रकारें कीं प्रथमारंभीं) त्यापासून त्याची पत्नी (हब्बा) इला पैदा केलें व त्या उभयतां (पति पत्नी) पासून पुष्कळ पुरूष व स्त्रिया (जगांत) फैलाविल्या. आणि ज्या परमेश्वराच्या नांवानें तुम्हीं एकमेकांकडून (आपलीं कित्येक) कामें काढून घेतां त्याच्या व गणगोत्रांच्या (मर्यादां) विषयीं जपून वागा; (कारण), परमेश्वराची तुम्हांवर (नित्य) नजर आहे. १. आणि अनाथ बालकांची मालमत्ता तुम्ही त्यांच्या हवालीं करा; आणि चांगल्या मालाच्या बदलीं रद्दी माल घेऊं नका, व त्यांचे माल आपल्या मालांत मिसळून गीळंकृत करूं नका. (कारण हें (फारच) महा पातक होय. आणि जर तुम्हांस या गोष्टीची भीति असेल कीं तुम्हीं अनाथ बालकियांच्या बाबतींत इन साफ कायम न ठेवूं शकाल, तर तुम्हांस भल्या वाटतील त्या दोन दोन व तीन तीन व चार चार स्त्रियांशीं लग्न लावून घ्या. पण जर तुम्हांस या गोष्टीचें भय असेल कीं (अनेक बायकांमध्यें) (बरोबरीच्या नात्याचें वर्तन) न करूं शकाल, तर (अशा परिस्थितींत) एकच (बायको करणें) अगर जी (दासी) तुमच्या हस्तगत असेल (तिच्यावरच संतुष्ट राहणें. तुमच्या हातून अन्याय न घडावा म्हणून ही (युक्ति बुद्धीस) विशेष अनुसरती होय. ३. आणि स्त्रियांस त्यांचीं स्त्रीधनें खुशीनें देऊन टाका. मग जर त्या तुम्हाला त्यांतून कांहीं आपल्या राजीखुशीनें सोडून देतील, तर तें तुम्ही रूचतें पचतें (समजून खुशाल) खा (प्या).
“४ आणि मालमत्ता जिला परमेश्वरानें तुम्हांसाठीं (एका प्रकारचा) आधार बनविला आहे, तो कमअक्कल (अनाथ) बालकांच्या हवालीं करूं नका. पण त्यांतून त्यांच्या पोटापाण्यास द्या व त्यांचे कपडलत्ते करा; आणि त्यांनां (जें) बोलणें (तें) नरमाईनें बोलून समजावा. ५. आणि अनाथ बालकांस (संसार) व्यवहारांत लावून ठेवां; येथपर्यंत कीं लग्ना (च्या वया) स पोहोंचतील. त्या वेळीं जर तुम्ही त्यांच्यांत कांहीं योग्यता पहाल, तर त्याचा माल त्यांच्या हवालीं करून टाका. आणि असें करूं नका कीं (उद्याला) ते मोठे होतील म्हणून उधळा उधळ करून व घाईघाईनें तो (त्यांचा माल) खाऊन (पिऊन) टाका. आणि जो (पालक) श्रीमंत असेल त्यानें (अनाथांचा माल आपल्यावर खर्च करण्याविषयीं) जपलें पाहिजे; आणि जो गरीब असेल त्यानें यथारीति (निर्वाहा पुरतें) खावें; (त्यास हरकत नाहीं). आणि जेव्हां तुम्ही त्यांचा माल त्यांच्या स्वाधीन करूं लागाल, तेव्हां (लोकांस) त्यां (नीं आपला माल घेतल्या) चे साक्षी करून ठेवा आणि (एरवीं) हिशेब घेण्यास तर परमेश्वर पुरा होय. ६. आईबाप व अगदीं जवळचे नातलग यांनीं जें काहीं मागें सोडलें असेल त्यांत थोडा असो वा बहुत, पुरुषांचा हिस्सा होय; आणि (तसाच) आईबाप व अगदीं जवळचें नातलग यांनीं जें कांहीं मागें सोडलें असेल त्यांत स्त्रियांचाहि हिस्सा होय. (हा) हिस्सा (आम्हीं ठरविलेला (होय.) ७. आणि जेव्हां (हिस्याच्या) विभागणीच्या वेळीं (दूरचे) नातलग व अनाथ मुलें व गोरगरीब हीं येऊन हजर होतील, तेव्हां त्यांतून त्यांनांहि कांहीं देत जा; व (त्यांच्या मर्जीप्रमाणें त्यांनां देतां येण्यासारखें नसेल तर) त्यांनां नरमाईनें बोलून समजावून लावा. ८. आणि जे (हक्कदार वारस) होत त्यांनां भ्यालें पाहिजे कीं जर ते (खुद्द) आपल्या (मरणा) पश्चात् दुर्बल संतति सोडून जाते तर त्यांच्या [स्थिती] संबंधानें त्यांनां [कसला काय] घोर करावा लागता ! म्हणून [गोरगरिबांवर सक्ती करण्यांत] त्यांनां परमेश्वराचें भय बाळगावें व [त्यांच्याशीं] नीट भाषण करावें. ९. जे लोक अन्यायानें अनाथ बालकांची मालमत्ता खाऊन चट करतात ते आपल्या पोटांत केवळ अंगारेच भरतात. आणि ते लवकरच [मेल्यावर] नरकाग्नींत पडतील. १० [मुसुलमानांनों!] तुमच्या संतती [च्या वांठ्या] संबंधानें परमेश्वर तुम्हांस बजावून ठेवितो कीं मुलग्याला दोन मुलींच्या बरोबर हिस्सा [देत जा] मग जर मुली [दोन वा] दोहोंहून जास्ती असतील, तर [मरणारा] जें मागें सोडील त्यांत त्यांचा [हिस्सा] दोन तृतीयांश होय. आणि जर ती एकटीच असेल. तर तिला निम्मेनिम. आणि मयताचे आईबापांस [म्हणजे] दोहोंतून प्रत्येकांस, तो जें मागें सोडील त्यांतून, जर त्याला कांहीं संतान असेल तर एक षष्ठांश होय. पण जर त्याला संतान नसेल व त्याचे वारस [फक्त] आईबाप असतील, तर त्याच्या आईचा [हिस्सा] एक तृतीयांश; [बाकी बापाचा]. परंतु जर [आईबापां खेरीज] मयताचीं [एकांपेक्षां अधिक बहीण] भावंडें असतील, तर आईचा [हिस्सा] एक षष्ठांश. [पण हे हिस्से] मयत इसम जो मृत्युलेख करील त्या [च्या बजावणी] नंतर व कर्जा [च्या फेडी] नंतर [दिले जावेत]. तुम्ही आपले बाप [-दादे म्हणजे मूळ] आणि आपले पुत्र [-पौत्रादि म्हणजे शाखा] यांस जाणूं शकत नाहीं कीं नफ्याच्या मानानें त्यांजपैकीं कोणते तुम्हांशीं विशेष जवळ होत ? [तर तुम्ही आपलें मत चालवूं नका व पक्कें समजा कीं ही] हिस्सेरसी परमेश्वराची ठरविलेली होय. परमेश्वर नि:संशय [सर्व कांहीं] जाणतो [व सर्व प्रयोजनांशीं] वाकब होय. ११ आणि जें कांहीं तुमच्या पल्या मागें सोडतील त्यातून जर त्यांनां संतान नसेल तर, तुमचें अर्धे; आणि जर त्यांनां संतान असेल तर त्या जें कांहीं मागें सोडतील त्यांतून तुमचें एक चतुर्थांश; [पण तेंहि] त्या जो मृत्युलेख करतील त्या [च्या बजावणी] नंतर व कर्जा [च्या फेडी] नंतर आणि तुम्ही जें कांहीं मागें सोडाल त्यांतून, जर तुम्हांला कांहीं सतंति नसेल तर, (विधवा) स्त्रियांस एक चतुर्थांश. आणि जर तुम्हांला संतति असेल तर तुम्ही जे कांहीं मागें सोडाल त्यांतून, (विधवा) स्त्रियांस एक अष्टमांश; (आणि तेंहि) तुम्ही जो मृत्युलेख कराल त्या (च्या बजावणी) नंतर व कर्जा (च्या फेडी) नंतर (दिलें जावें) आणि जर कोणा पुरूष वा स्त्रीचा (लांबचा) वारसा असेल व त्यांचा पिता व पुत्र (म्हणजे मूळ व शाखा) नसेल व (दुस-या बापापासून) त्यांचा कोणी भाऊ वा बहीण असेल; तर त्या दोहोंपैकीं प्रत्येकास एक षष्ठांश. पण जर ते ह्याहून जास्त असतील तर एक तृतीयांशांमध्यें ते (सर्व बरोबरीचे) पातीदार होत. (हे हिस्सेहि मयत इसमानें) केलेल्या मृत्युलेखा (च्या बजावणी) नंतर व कर्जा (च्या फेडी) नंतर, (मयताकडून)कोणालाहि अपाय न होईल अशा अटीनें [दिले जावेत]. [ही] परमेश्वराची ताकीद होय. आणि परमेश्वर [सर्व कांहीं] जाणतो [व लोकांची आज्ञाभंजक वृत्ति] सहन करतो. १२. ह्या, परमेश्वराच्या [बांधीव] मर्यादा होत. आणि जो परमेश्वर व त्याचा पैगंबर यांच्या हुकुमाप्रमाणें चालेल. [परलोकीं] त्याला परमेश्वर अशा वागांत [नेऊन] दाखल करील की ज्यांच्या खालून [पाण्याचे] पाट वहात असतील, [व ते] त्यांत सदासर्वदा राहतील. आणि हें मोठें सार्थक होय. १३. आणि जो कोणी, परमेश्वर व त्याचा पैगंबर यांच्या हुकुमांचा अनादर करील व परमेश्वराच्या [बांधीव] मर्यादांचें उल्लंघन करील, त्याला परमेश्वर नरकाग्नींत [नेऊन] दाखल करील, [व] तो त्यांत निरंतर राहील, व त्याला फजितीची शिक्षा [प्राप्त] होईल.
१४ ''आणि [मुसुलमानांनों ?] तुमच्या स्त्रियांपैकीं ज्या स्त्रिया बदकर्म करतील, तर त्यांच्या [बदफैली] वर आपल्या (लोकां) तून चौघांची साक्ष घ्या. मग जर साक्षी (त्यांच्या बदकर्माची) साक्ष देतील, तर (शिक्षेपरी) त्या (स्त्रियां) स घरांत बंदिस्थ ठेवा, येथपर्यंत कीं मृत्यु त्यांचा अंत आणील अगर परमेश्वर त्यांच्यासाठीं (आणखी) कांहीं मार्ग काढील. १५ आणि तुम्हां (लोकां) पैकीं जे दोघे बदकर्म करतील त्यांनां मारहाण करा. मग जर ते उभयतां पश्चात्ताप पावतील व आपली स्थिति सुधारतील तर तुम्ही त्यांच्या (आणखी जास्त) वाटेस जाऊं नका. कारण, परमेश्वर मोठा पश्चात्ताप मान्यकर्ता व दयाळू होय. १६ परमेश्वर पश्चात्ताप तर मान्य करतोच, (पण) जे लोक अज्ञानामुळें एखादें दुष्कर्म करतील, मग लवकरच पश्चात्तापहि पावतील त्या लोकांचाच मात्र. तर परमेश्वरहि अशांचा पश्चात्ताप मान्य करून घेतो. आणि परमेश्वर (सर्वांची स्थिति) जाणतो (व सर्व-) युक्तिसंपन्न होय. १७ आणि जे लोक (आयुष्यभर) वाईट कामें करीत राहतील, येथपर्यंत कीं त्यांच्यांतून जेव्हां एखाद्यास मृत्यु येऊन ठेपेल, तेव्हां तो म्हणूं लागेल कीं आतां मी अनुताप पावलों; अशा लोकांचा पश्चात्ताप (मान्य) नाही. आणि (तसाच) जे लोक नास्तिक असतांनाच मरण पावले त्यांचाहि (पश्चाताप मान्य) नाहीं. हेच होत कीं ज्यांच्यासाठीं आम्हीं दुःखदायक शिक्षा तयार करून ठेविली आहे. १८ अहो मुसुलमानानों ! तुम्हांला याची मुभा नाहीं कीं, स्त्रियांस (मयताचा) वारसा समजून बळेंच त्यांच्यावर कबजा मिळवावा. आणि जें कांही तुम्ही त्यांनां (नव-याच्या वारश्यांतून) दिलें असेल त्यांतून कांहीं हिरावून घेण्याच्या हेतूनें त्यांनां (घरांत) अडकवून ठेवूं नका, (कीं त्यांनां दुस-या कोणाशीं लग्न करतां न यावें). परंतु त्या जर एखादें उघड बदकर्म करतील (तर त्यांनां बंदिस्थ ठेवण्यास हरकत नाहीं). आणि तुम्हीं पत्न्यांशीं जनशिरस्त्याप्रमाणें नांदणूक करा. मग जर (कोणा कारणानें) तुम्हीं त्यांनां नापसंत कराल तर नवल नव्हे कीं, तुम्हांस एक वस्तु नापसंत असेल व परमेश्वर त्यांत पुष्कळ हित (व कल्याण) देईल. १९ आणि जर तुमचा बेत एका पत्नीच्या जागीं दुसरी पत्नी बदलून करण्याचा असेल तर त्यांतून (पहिल्या) एका पत्नीला तुम्हीं ढीगभर द्रव्य देऊन टाकलें असेल; तरीहि त्यांतून कांहींच (परत) घेऊं नका. कां, (तुमच्या सभ्यपणास ही गोष्ट शोभते कीं) कोणा त-हेंचें कुभांड लावून व प्रत्यक्ष अनाठायीं गोष्ट करून (आपण दिलेलें तिच्यापासून परत) घ्यावें. २० आणि तुम्हीं (दिलेलें परत) कसें घ्याल ? व वास्तविक पाहतां, तुम्ही एकमेकांच्या समागमांत येऊन चुकलां आहां व त्या तुम्हांपाशीं (लग्नाच्यावेळीं स्त्रीधन व पालनपोषण वगैरे संबंधींचें) पक्कें वचन घेऊन चुकल्या आहेत. २१ आणि ज्या स्त्रियांशीं तुमच्या बापांनीं लग्न लाविलें असेल, तुम्ही त्यांच्याशीं लग्न लावूं नका. परंतु जें पूर्वीं होऊन चुकलें (तें होऊन चुकलें) तथापि अर्थात ही (मोठ्या) निर्लज्जपणाची व गहजबची गोष्ट होय! आणि तो (फारच) वाईट प्रघात होता. २२ (मुसुलमानांनों !) तुमच्या आई व तुमच्या मुली व तुमच्या बहिणी व तुमच्या चुलत्या मावश्या व भावाच्या मुली (म्हणजे पुतण्या) व बहिणीच्या मुली (म्हणजे भाच्या) व तुम्हांस ज्यांनीं दूध पाजिलें आहे त्या तुमच्या आया व तुमच्या दूधबहिणी आणि तुमच्या सास्वा (ह्या सर्व) तुम्हांस निषिद्ध होत. आणि ज्या स्त्रियांशीं तुम्हीं समागम करून चुकलां आहां त्यांच्या पाळलेल्या कन्या कीं ज्यां (प्रायः) तुमच्या ओट्यांत (पालन) होतात त्या (तुम्हांस निषिद्ध होत.) पण जर तुम्हीं त्या (स्त्रियां) शीं समागम केला नसेल, तर (त्या पाळलेल्या मुलींशीं लग्न लावून घेतल्यास) तुम्हांवर कांहीं पाप नाहीं. आणि तुमच्या (खुद्द) पोटच्या मुलांच्या पत्न्या (म्हणजे तुमच्या सुना, ह्या तुम्हांस निषिद्ध होत.) आणि दोघां बहिणींशीं एकत्र लग्न करणें (ही निषिद्ध होय.) पण जें पूर्वीं होऊन चुकलें [तें होऊन चुकलें]. निःसंशय परमेश्वर क्षमाकर्ता व दयाळू होय.
''२३ आणि ज्या स्त्रिया (दुस-यांच्या लग्न -) बंधनांत असतील त्याहि (निषिद्ध होत), पण ज्या, (नास्तिकांचे लढाईंत बंदिवान होऊन) तुमच्या हस्तगत झाल्या असतील त्या मात्र (निषिद्ध नव्हत.) (ही) परमेश्वराची लेखी आज्ञा होय (व तिचें पाळणें) तुम्हांस (आवश्यक होय). आणि (ज्या स्त्रिया तुम्हांस निषिद्ध होत) ह्या खेरीज (इतर स्त्रियांची) तुम्हांस मुभा आहे, या अटीवर कीं तुम्हीं कामतृप्तीसाठीं नव्हे तर (लग्न) बंधनांत आणण्याकरितां, द्रव्याचे (म्हणजे स्त्रीधनाचे) देण्यानें (विवाह करूं) इच्छावें. मग ज्या स्त्रियांपासून तुम्हीं त्या (स्त्रीधनाचे) बदला सुखोपभोग घेतला असेल, त्यांच्याशीं जें स्त्रीधन ठरलें होतें तें त्यांच्या हवालीं करा. आणि (स्त्रीधन) ठरविल्यापश्चात् (त्याच्या कमीजास्त करण्यास) तुम्हीं आपसांत राजी होऊन जाल, तर त्यांत तुम्हांकडे कांहीं पाप नाहीं. परमेश्वर (सर्वांच्या स्थितीशीं) वाकब (व सर्व) युक्तिसंपन्न होय. २४ आणि तुम्हांपैकीं ज्याला स्वतंत्र मुसलमान स्त्रियांशीं विवाह करण्याचें सामर्थ्यं नसेल तर ज्या दासी (नास्तिकांचे लढाईंत) तुम्हा मुसलमानांचे हस्तगत होऊन जातील (व) त्या विश्वासूहि असतील, त्यांच्याशीं (विवाह करा.) आणि परमेश्वर तुमच्या विश्वासास खूप जाणून आहे. (मानवी उत्पत्तीच्या दृष्टीनें) तुम्हीं एक मेकांचे सजातीय आहां, तर त्या (दास्यां) च्या मालकांचे परवानगीनें तुम्ही त्यांच्याशीं (बिनधडक) विवाह करून घ्या, आणि शिष्टसंप्रदायाप्रमाणें त्यांचीं, स्त्रीधनें त्यांच्या हवालीं करून टाका. (पण) शर्त अशी कीं त्या विवाहबंधनांत आणिल्या जाव्यात (व) त्या बाहेरख्याली व चोरी छपी यार राखणा-या अशा नसाव्यात. मग जेव्हां त्या लग्नबंधनांत येतील तेव्हां, जर त्या निर्लज्जपणाचें एखादें काम करतील तर जी शिक्षा स्वतंत्र स्त्रियांची तिच्या निम्मी दासींची. ही (दासीशी विवाह करण्याची परवानगी) तुम्हांपैकीं ज्याला पातका (च्या घडण्या) चा अंदेशा असेल त्यालाच होय. आणि जर सहनशीलता राखल तर तुमच्या ठायीं हें उत्तम होय. आणि परमेश्वर क्षमाकर्ता व दयाळू होय. २५'' (सूरतु -न्निसा अ.४).
कुराणांत स्त्रियांचें समाजांत स्थान दाखविणारे आणि स्त्रियांशीं वर्तन कसें असावें याविषयींचे सूचक, आणखी उतारे देतों.
'' (मुसुलमानांनो !) उपासांच्या रात्रींत तुम्हांस आपल्या पत्न्यांपाशीं जाण्याची मुभा दिली आहे. त्या तुमचा पदर होत व तुम्ही त्यांचा पदर आहां. परमेश्वरानें पाहिलें कीं तुम्ही (चोरून छपून त्यांच्यापाशीं गेल्यानें) खुद्द आपलेंच (धार्मिक) नुकसान करीत होतां, म्हणून त्यानें तुमचा पश्चात्ताप मान्य केला व तुमच्या अपराधाची क्षमा केली. तर आतां (उपासांत रात्रीच्या समयीं) तुम्ही त्यांच्याशीं अंगसंग करा, आणि (अंगसंगाचा परिणाम) जी पुत्रप्राप्ति परमेश्वरानें तुम्हांसाठीं लिहून ठेविली आहे तिची आकांक्षा धरा, (व निव्वळ कामतृप्तीच्या नादास लागूं नका) आणि तुम्ही खा व प्या, येथपर्यंत कीं (रात्रीच्या काळ्या धारेपासून प्रातःकाळची पांढरी धार तुम्हांस स्पष्ट दिसूं लागेल. नंतर रात्र (पडे) पर्यंत उपास पुरा करा, आणि (होय,) तुम्ही मशिदींत व्रतस्थ असाल, तर (रात्रीहि) त्यांच्याशीं अंगसंग करूं नका. ह्या परमेश्वराच्या (ठराविक) मर्यादा होत. तर तुम्ही त्यांच्याजवळहि फिरकुं नका. अशाच त-हेनें परमेश्वर आपले नियम लोकांस स्पष्ट सांगतो, कीं, कदाचित् ते (आज्ञाभंगास) जपून वागतील.'' [अ.२.१८६]
''आणि (मुसुलमानानों !) मूर्तिपूजक स्त्रिया विश्वास धरीपर्यंत त्यांच्याशीं तुम्ही लग्न करूं नका. आणि मूर्तिपूजक स्त्री, तुम्हांला कितीहि भली (कां) वाटेना, तिच्या परती मुसुलमान दासी बेहेत्तर. आणि मूर्तिपूजक पुरुष विश्वास धरीपर्यंत तुम्ही त्यांचा विवाहसंबंध करूं नका. आणि मूर्तिपूजक तुम्हांला कसाहि भला (कां) लागेना त्याच्यापरता मुसुलमान दास बेहत्तर. हीं (मूर्तिपूजक स्त्रीपुरुषें) नरकाकडे पाचारण करतात, व परमेश्वर आपल्या आज्ञेनें स्वर्ग व तारण यांकडे पाचारितो. आणि तो आपले नियम लोकांस स्पष्ट करून सांगतो कीं, तो कदाचित् हुशार राहतील. आणि (हे पैगंबरा लोक) तुला ॠतुस्त्रावाविषयीं विचारतात. तर (तूं त्यांनां) समजावून दे कीं तो मल होय, तर विटाळांत तुम्ही स्त्रियांपासून अलग रहा. आणि त्या चोख्या होईपर्यंत त्यांच्यापाशीं जाऊ नका. मग जेव्हां त्या नाहून धुवून घेतील तेव्हां जेथून परमेश्वरानें तुम्हांस सांगून दिलें आहे तेथून त्यांच्यापाशीं या. निःसंशय परमेश्वर पश्चाताप करणा-यांस पसंत करतो व सफाई राखणा-यासहि पसंत करतो. तुमच्या पत्न्या (जणूं काय) तुमची क्षेत्रें होत. तर तुम्ही आपल्या क्षेत्रांत जसें पाहिजे तसें या, आणि आपल्या पुढची (परलोकीचीहि) व्यवस्थ ठेवा.'' [अ.२.२२०-२२०]
''पुरुष हे स्त्रियांवर सत्ताधारक होत. (त्यास.) कारण (एक तर हें) कीं (मानवजातींत) परमेश्वरानें कित्येकां (पुरुषां) नां कित्येकां (स्त्रियां) वर (मानसिक व शारीरिक बलांत) श्रेष्ठत्व दिलें आहे, आणि (दुसरें कारण) हें कीं पुरुषांनीं (स्त्रियांसाठी) आपलें द्रव्य खर्ची घातलें आहे. तर ज्या सदाचरणी (स्त्रिया) होत त्या, (आपल्या भ्रतारांचा) कह्या मानतात (व) परमेश्वरानें (पतिकरवीं) जसा सांभाळ ठेविला आहे तसाच त्या (त्यांच्या) पाठीमागें (हरएक वस्तूचा) सांभाळ ठेवितात. आणि तुम्हांस ज्या स्त्रियांचा शिरजोर होण्याचा अंदेशा असेल त्यांस (पहिल्यानें) समजावून सांगा, व (मग) त्यांचा शेजत्याग करा, आणि (यावरहि त्या न समजल्या तर) त्यांनां (हलकासा) चोप द्या. मग जर त्या तुमचा कह्या मानूं लागतील, तर तुम्हीहि त्यांच्यावर (विनाकारण ठपका ठेवण्याचा) मार्ग शोधीत फिरूं नये. परमेश्वर (अति) महिमाशाली व बडा होय. आणि जर तुम्हांस उभयतां (पति-पत्नी) त बिघाडाचा अंदेशा असेल, तर एक पंच त्या (पती) च्या कुटुंबांतून मुक्रर करा. व एक पंच त्या पत्नीच्या कुटुंबांतून जर पंचाचा (मनापासूनचा) इरादा (पतिपत्नींत) समेट (करविण्याचा) असेल तर परमेश्वर उभयतांत मिलाफ करून देईल'' [अ.४.३३-३४].
''आणि जे लोक आपल्या पत्न्यांवर व्यभिचाराचा दोष लावतील व आपणा स्वतःशिवाय त्यांचे कोणी साक्षी नसतील, तर असल्या (वाद्यां पैकीं प्रत्येकाची शाबिती हीच होय कीं त्यानें चार वेळां परमेश्वराची शपथ घेऊन असें प्रतिपादन करावें कीं निःसंशय मी [आपल्या दाव्यांत] खरा आहे. आणि पांचव्यांदा असें [म्हणावें] कीं जर खोटें बोलत असेन, तर मजवर परमेश्वराचा धिक्कार असो. आणि पुरुषाच्या शपथेनंतर] स्त्रीच्या (शिरा) वरून अशा प्रकारें शिक्षा टळूं शकते कीं तिनें चारदां शपथ वाहून प्रतिपादन करावें कीं हा [गृहस्थ] अगदींच लबाडांपैकीं आहे. आणि पांचव्यांदा असें म्हणावें कीं जर हा [गृहस्थ आपल्या विधानांत] ख-यापैकीं असेल, तर मजवर परमेश्वराचा कोप [कोसळो]. [अ.२४.५-८].
''परमेश्वरानें कोणाहि माणसाच्या उरांत दोन अंतःकरणें ठेविली नाहींत. आणि त्यानें तर तुम्हां लोकांच्या बायका कीं ज्यांना तुम्ही मातेसमान गणून काडी मोडून देतां, त्यांनां तुमच्या माता बनविल्या नाहींत, व त्यानें तुमच्या दत्तक मुलांस तुमचे मुलगेहि बनविलेले नाहींत. हें तुमच्या तोंडांनीं तुमचे बोलणें आहे. दत्तकांस त्यांच्या (ख-या) बापाच्या नांवानें बोलावीत जा. हीच गोष्ट परमेश्वरासमीप विशेष न्याय्य होय. मग जर तुम्हांस त्यांचे बाप माहीत नसतील तर ते धर्मांत तुमचे भाऊ व तुमचे मित्र होत.'' [अ.३३ ३-४]
''अहो पैगंबराच्या पत्न्यांनों ! तुम्ही कोणा (सामान्य) स्त्रियांसारख्या तर नाहींतच. (मग) जर तुम्ही परमेश्वराला भीत असाल तर (कोणशीहि) बोलतांना कोमल स्वर काढीत जाऊं नका, (की असें कराल) तर ज्याच्या मनांत (कोणाहि त-हेचा) रोग आहे तो (तुमच्याशीं कोणत्या त-हेची) लालूच बाळगेल (नकळे), आणि (बोलालहि तर) वाजवी रीतीनें बोलणें बोला. आणि आपल्या घरांत जमून (बसलेल्या) राहा आणि पूर्वींच्या अज्ञानकालचे शृंगार दाखवीत फिरूं नका, आणि नमाज पढा व जकात द्या आणि परमेश्वर व त्याचा पैगंबर यांची आज्ञा पाळा.'' [अ.३३.३१-३२]
''आणि (मुसुलमानांनों !) तुमच्या सोडचिठ्ठया दिलेल्या स्त्रियांतून ज्यांनां (वयातीतपणामुळें) विटाळाकडून निराशा होऊन राहिली आहे, (व त्याविषयीं) तुम्हांस संशय असेल तर त्यांची 'इद्दत' (विटाळापासून नव्हे, दिनमानाप्रमाणें) तीन महिने, आणि (त्याचप्रमाणें) ज्या स्त्रियांस विटाळ आलाच नाहीं (त्यांची इद्दतहि तीन महिने) आणि (राहिल्या) गर्भिणी स्त्रिया, तर त्यांची मुदत, त्यांच्या मूल प्रसवण्यापर्यंत होय.'' [अ.६५.३].
महंमदाला आपल्या अनुयायांच्या मध्यें एकनिष्ठ भक्ति उत्पन्न करावयाची होती या साठीं प्रयत्न कुराणांत जागोजाग दिसतो.
''पैगंबर व त्याचे अनुयायी यांचा एकमेकांशीं संबंध काय होता याविषयीं कुराणवाक्य येणेंप्रमाणें: ''पैगंबर मुसुलमानांवर खुद्द त्यांच्या जीवापेक्षांहि जास्त हक्क राखतो. व पैगंबराच्या पत्न्या त्यांच्या आई होत. आणि नातलग हे ईश्वरी पुस्तकानुरूप मुसुलमान व मुहाजिरीन यांच्या पेक्षांहि जास्त एकमेकांचे हक्कदार होत.'' (अ.३३.५).''
कुराणाच्या महत्वाविषयीं उल्लेखहि वारंवार येतात.
''(ह्या) सुव्यक्त व सुबोध पुस्तका (कुराणा) ची शपथ आहे कीं, आम्ही एका शुभ रात्रीं हें (प्रथमतः) प्रकटलें. (कारण) आम्हांला (लोकांनां आपल्या शिक्षेचें) भय दाखवावयाचें होतें. (जगाच्या) सा-या व्यवस्था, ज्यांस युक्ति (व प्रयोजन हीं) आधारभूत होत त्या, त्याच रात्रीं निर्णय पावतात.'' [अ. ४० १-३]
''आणि (हे पैगंबरा !) जरी आम्ही कागदावर (आयतें लिहिलेलें) पुस्तकहि तुला सादर करतों, व हे लोक त्याला आपल्या हातांनीं स्पर्शहि करून पाहते, तरीहि जे लोक नास्तिक होत ते हेंच म्हणाले असते कीं ही तर केवळ बोलून चालून जादूच होय.'' [अ.६.६]
यहुदी व ख्रिस्ती हे दोघेहि परमेश्वराचे मूर्तीपूजक नसलेले उपासक आहेत अशी महंमदाची भावना होती तथापि त्यांविषयीं त्याची वृत्ति कांहीं अंशीं त्यांच्या स्वतःविषयीच्या मताहून भिन्न होती हें पुढील वाक्यांवरून लक्षांत येईल.
''आणि यहुदी व ख्रिस्ती असें प्रतिपादन करितात कीं आम्ही परमेश्वराचीं लेकरें व त्याचे आवडते आहोंत. (हे पैगंबरा ! तूं त्यांनां) सांग (की जर तुम्ही परमेश्वराचीं लेकरें व आवडते आहां) तर मग तो तुमच्या पापांबद्दल तुम्हांस (वेळोवेळीं) शिक्षाच कां देत असतो ? (अतएव तुम्ही परमेश्वराची लेंकरें नव्हत व आवडतेहि नव्हत) किंबहुना परमेश्वरानें जीं (आणखी मनुष्यें) निर्माण केलीं आहेत त्यांतलींच मनुष्यें तुम्हीहि आहां. परमेश्वर ज्याला इच्छील त्याला क्षमा करील व ज्याला इच्छील त्याला शिक्षा देईल.'' [अ. ५:१७]
बेनी इस्त्राएलांस उद्देशन वाक्यें कुराणांतील प्रत्येक भागांत दिसून येतात त्यावरून अरब लोकांत देखील यहुदी लोकांचे त्या वेळचें सामाजिक महत्त्व दिसून येतें.
यहुदी लोकांतील प्रवक्ते येशूख्रिस्त आणि महंमद या तिघांची कामगिरी कांहीं अंशीं सारख्या प्रकारची होती. व्यवहारोपयोगी नीतिशास्त्र आणि नीतिनियम यांच्याकडून प्रसृत झाले. आणि स्थानिक दैवतांची उपासना मूर्तिपूजा यांशीं या तिघांनीं विरोध केला. जुन्या करारांतील प्रवक्त्यांचीं नीतिप्रवर्तक व आवेशयुक्त भाषणें, तशींच येशू ख्रिस्ताचीं सुंदर प्रवचनें, आणि येशूच्या शिष्यांचीं प्रवचनें व पत्रें हीं प्राचीन जगांतील सुंदर वाङ्मयांत मोडतील. त्या वाङ्मयासारखें वाङ्मय उपनिषदांतील महाभारतांतील व भगवद्गीतेंतील कांहीं भाग वगळला तर प्राचीन जगांत कोठें सांपडावयाचें नाहीं. निदान चिनी तत्त्ववेत्ते, उपनिषदांतील ब्रह्मवेत्ते, आणि वेदव्यास यांच्या वाक्यांशीं स्पर्धा करण्याजोगें वाङ्मय प्राचीन सेमेटिक लोकांत उत्पन्न झालें होतें असें म्हणण्यास हरकत नाहीं. महमदानें केवळ संप्रदायच स्थापन केला असें नाहीं तर राज्य स्थापन केलें, आणि तरवारीच्या सत्तेस नीत्यात्मक उपदेशाचा जोर दिला. तेणेंकरून मोठ्या साम्राज्यांत एक उपासनासंप्रदाय व एक नीतिपद्धति यांचा प्रसार झाला. ख्रिस्ती संप्रदाय पुढें रोमन साम्राज्यांत वाढला आणि त्या साम्राज्याचा आधारस्तंभ झाला आणि त्यानें यूरोपच्या इतिहासावर हजार पंधराशें वर्षे महत्त्वाचा परिणाम घडविला. सेमेटिक लोकांनीं लोकांस एकत्र जोडणा-या उपासनापद्धति व धार्मिक विचार यांच्या एकीकरणानें साम्राज्य तयार करून किंवा साम्राज्यास नेट देऊन जगावर कार्य केलें आणि राज्यास कांहीं ध्येयें असावीं आणि त्या ध्येयार्थ राज्य आहे ही भावना जगांत प्रसृत केली, ही सेमेटिक लोकांची मोठी कामगिरी होय.
खलीफात आणि रोमन साम्राज्य यांची तुलना केली असतां दोघांत सादृश्यें अनेक आढळून येतील रोमन सम्राट आपणांस (इंपेरेटार = एम्परर = आज्ञारक) आज्ञापक म्हणवीत त्याप्रमाणें, खलीफ हेहि आपणांस आज्ञापक म्हणवीत. खलीफातीचा महंमदाच्या वंशाशीं जातीशीं किंवा अरबस्थानाशींहि संबंध राहिला नाहीं तरी केवळ अधिकारपरंपरेच्या सातत्यानें मुसुलमान जगाशीं संबंध राहिला त्याप्रमाणेंच रोमन पातशाहीचा रोमशीं, किंवा रोमन जातीशा संबंध न रहातां केवळ अधिकार सातत्यामुळेंच रोमन पादशाही अशी कल्पना चालू राहिली. रोमन पातशाहीमध्यें सर्व पाश्चात्य जग प्रथम रोमन नागरिकत्वाच्या विस्तारानें एकत्रित झालें आणि पुढें रोमन नागरिकत्व आणि ख्रैस्त्य यांचें एकत्व होऊन ख्रिस्तीसंप्रदायाच्या विस्तारानें साम्राज्यांतील विविध लोक एकत्रित झाले. तर जिंकलेल्या प्रदेशांतील लोक इस्लामाचा अंगीकार करून खलीफातीचें नागरिकत्व मिळवूं लागून सदृश व एका साम्राज्याचे अभिमानी बनले. पारमार्थिक विचारपद्धति आणि ऐहिक राजशक्ति यांचे एकत्व खलीफातींत जन्मतः होतें तर रोमन साम्राज्यांत तें मागाहून तयार करावें लागलें. रोमन पातशाहीनें ख्रिस्ती संप्रदायाचा प्रसार आपल्या साम्राज्याच्या बलवृद्धीसाठीं केला, तर खलीफातीनें इस्लामाचा विस्तार आपल्या साम्राज्यासाठीं केला. सहाव्या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंत दोन्हीं साम्राज्यें सदृश्य क्रिया करीत होतीं. आणि सोळाव्या आणि सतराव्या शतकांत जेव्हां राष्ट्रीय भावना जागृत होऊं लागली तेव्हां या दोन्ही साम्राज्यांविषयींच्या भावनांशी राष्ट्रीयभावनेस यूरोपांत आणि एशियांत लढावें लागलें. संस्थांच्या संरक्षणासाठीं अभिमान लागतो तो घराण्याविषयीं उत्पन्न होवो. अगर साम्राज्याविषयीं उत्पन्न होवो अगर संप्रदायाविषयीं उत्पन्न होवो. रोमनसाम्राज्यानें संरक्षणार्थ ख्रिस्ती संप्रदायाचा अभिमान धरला आणि त्या संप्रदायाला आपला अभिमान धरावयास लावला ही गोष्ट उपासनासंप्रदाय व साम्राज्य यांचें एकत्व मूळपासून धारण करणा-या इस्लामाचा रोमन साम्राज्यावर नैतिक विजय दाखविते. गोब्राह्मणप्रतिपालनाचें तत्व शिवाजी आणि गुरूगोविंदसिंग यांनीं अंगीकारलें आणि राष्ट्रीयतेचा विशिष्ट तत्वाशीं संबंध जोडला या क्रियेंत देखील इस्लामाचाच भारतीय संस्कृतीवर नैतिक विजय दृष्टीस पडतो. पारमार्थिक विचारांचा राजसत्तेवर इतका पगडा बसला की राष्ट्रीय भावना जरी जागृत झाली तरी प्रत्यक्ष संग्रामांत युद्धार्थ बद्धपरिकर होतानां कांहीं तरी तात्त्विक पारमार्थिक तत्त्व पुढें मांडावें लागलें. स्काटलंडांत मतशुद्धीचा पुरस्कार करावा लागला. इंग्लंडला आपला मतभेद मांडावा लागला. जर्मनींतील अनेक संस्थानांत पारमार्थिक मतभेदाचा आश्रय करावा लागला. एवढेंच केवळ नव्हे तर पाश्चात्य रोमनसाम्राज्य आणि पौर्व रोमन साम्राज्य यांतील भेद जास्त पद्धतशीर करण्यासाठीं ख्रिस्ती संप्रदायास दोन पीठें तयार करावीं लागलीं. पौर्व यूरोप आणि पाश्चिम यूरोप यांतील आजचा आचारभेद हा पौर्व आणि पाश्चिम रोमन साम्राज्यांचा अवशेष आहे. पण तो दिसतांना ख्रिस्ती संप्रदायामुळें रक्षिला गेला आहे असें दिसतें. जगाच्या ऐतिहासिक वृत्ताच्या प्रवाहाकडे वळावयाचें म्हणजे रोमन साम्राज्याच्या उत्तरकालीन इतिहासाकडे वळून यूरोपच्या इतिहासाकडे वळावयाचें. आणि त्यांत उपासना संप्रदाय व साम्राज्य यांच्या मूलभूत द्वैतामुळें इतिहास स्वरूप कसें झालें हे वर्णन करावयाचें. इस्लामाला या द्वैताचा त्रास झाला नाहीं. तथापि संप्रदायप्रसार आणि साम्राज्यप्रसार या क्रिया कांहीं अंशीं एकत्र आणि कांहीं अंशी पृथक्त्वानें चालू होत्या त्यांकडे वळावयाचें. खलीफात आणि रोमन साम्राज्य यांच्याकडे वळण्यापूर्वीं जगांतील निरनिराळ्या भागांची एकमेकांशीं कशी ओळख झाली इकडे थोडेसें वळलें पाहिजे.