प्रस्तावना खंड.
विभाग पांचवा - विज्ञानेतिहास.
ग्रंथप्रवेश.
विज्ञानेतिहासाचा उपयोग, आणि त्यामुळे ज्ञानविकासास होणारी मदत याविषयींचे सविस्तर विवेचन पहिल्या प्रकरणात केले आहे.
प्रस्तावना ग्रंथकार ग्रंथ संपूर्ण झाल्यावर लिहितो, आणि जे करावे लागलें असेल तें कां करावें लागलें इत्यादि लिहून आपल्या कृतीचें मंडन करीत असतो. आम्हाला ज्या गोष्टबद्दल स्वत:चें समर्थन किंवा स्पष्टीकरण करावें गोष्ट म्हटली म्हणजे ग्रंथव्याप्तीसंबंधानें होय.
शास्त्रें अनेक आहेत.त्यांचा विकास अत्यंत प्राथमिक स्थितीपासुन वर्णन करावयाचा म्हणजे निवडानिवड बरीच करावी लागणार. प्रस्तुत ग्रंथात जीं ज्ञानांगे वगळलीं आहेत तीं निर्देशिलीं पाहिजेत. मनुष्य प्राण्यास पृथ्वीवरील निरनिराळ्या दिशाचीं ओळख कशी झाली याचा म्हणजे भुगोलविघेचा इतिहास हा वगळला लागला. तसेच समाजविषयक शास्त्रे हींहि बरींच वगळलीं मनुष्योतिहासाशीं संबध्द जीं शास्त्रें आहेत त्यांचे स्थूल विवेचन पहिला विभाग पृ. 90 व तिसरा विभाग पृ. 9 यात येऊन गेलेच आहे. जास्त व्यापक समाजशास्त्र म्हणजे अधिक प्रगत समाजांच्या अभ्यासावरून निघालेलें शास्त्र. हा विषय इतिहासाचे उपांग असल्यामुळें तिसर्या व चवथ्या विभागांत प्रसंगोपात आलेला दृष्टीस पडेल. या विभागांत वरील शास्त्रें वगळण्याचें कारण त्या शास्त्रांचे सयुक्तिक स्थल अन्यत्र आहे इतकेंच केवळ नव्हे तर ग्रंथाचीं नियमित पृष्ठें हे एक सबळ कारण होय. या ग्रंथाचा विस्तार दिलेल्या मजकुरामुळेंच वाढला हें ग्रंथावलोकनावरून दिसून येईल.
शास्त्राचां इतिहास हा विषय सामान्य इतिहासापेक्षां अर्थातच रूक्ष असणार. येथें लढाया वगौरे वर्णन करतां येत नाहित व दुसर्या अनेक मौजेच्याहि गोष्टी लिहितां येत नाहींत.
विज्ञानेतिहासांत मनोरंजकतेस बिलकुलच स्थान नाही असे नाहीं. संशोधकांस जुन्या समजुतींशीं झगडावे लागल्यामुळें त्याचे होणारे छळ, मत्सरपूर्ण मनुष्यवृत्तीमुळें एका संशोधकास दुसर्या संशोधकाकडून होणारे त्रास, खर्या संशोधकास श्रेय न ण्याविषयीं तत्कालीन लब्धप्रतिष्ठांची खटपट,लोकप्रिय होऊं पाहणारे तत्कालीन सवंग तत्त्ववेत्ते, यांकडून त्यांच्या सिहान्ताचें आभासात्मक खंडन इत्यादि गोष्टींविषयी माहिती देत बसण्यानें ग्रंथाची रूचिकरता अधिक वाढेल पण शास्त्रीय ज्ञानविकासाचें त्या प्रकारच्या इतिहासास चरित्र म्हणतां येणार नाही. तथापि संतांविषयीं आदर उत्पन्न करण्याकरितां ज्याप्रमाणें भरूविजय व संतलीलमृत उपयोगी पडतात त्याप्रमाणें शास्त्रप्रगत्यथे आयुष्य खर्चिणार्याच्या हालअपेष्टा व शेवटी जय वर्णन करून शास्त्रसंशोधकाभोवतीं तेजोवलय निर्माण करण्यास त्या प्रकारचे ग्रंथ उपयोगी पडतात. समाजांत ज्याप्रमाणें शासनसंस्थेशीं साकारिता व्यक्त व्हावी यासाठीं राजभक्ति किंवा कार्यकर्त्याविषयीं आदर अवश्य आहे त्याप्रमाणेंच जे प्रगतिसाधक अनेक तववेत्ते शास्त्रज्ञ निर्माण झाले त्यांच्याविषयीं आदरहि अवश्य आहे. तरूणांची महत्त्वाकांक्षा लोक कोणाचा आदर करतात हें पाहुन प्रज्वलित होते. केवळ प्रतिष्ठित धंघांत पैसा व अधिकांरं हीं मिळविणार्या लोकांबद्दलच समाजांत आदर असला आणि रांविषयी नसला तर समाजांतील तरूणांस हर्बर्ट स्पेन्सर किंवा कोपर्निकस यांचे उदाहरण अनुकरणीय आहे असें कसे वाटेल आदर असणें ही गोष्ट आपणा भारतीयांस नवीन नाही.
शास्त्रज्ञांबद्दल जुन्या काळांत जे ब्राह्राण न्याय किंवा व्याकरण अगर मीमांसा इत्यादि शास्त्रांत पारंगत होत त्याविषयीं समाजात आदर वाटे; पण तो काल गेला. अर्वाचीन पध्दतीच्या शास्त्रव्यासंगी व्यक्तिबद्दल आदर वाटण्याचा काळ अजून फारसा आला नाही. प्रस्तुत विज्ञानेतिहास शास्त्रवर्धनास मार्गदर्शक होईल असें आज म्हणण्याचें जरी आम्ही साहस करीत नाहीं तरी हा इतिहास इतर इतिहासांइतका किंवा जागतिक इतिहासामध्यें विशिष्ट राष्ट्राच्या इतिहासापेक्षां अधिक महत्त्वाचा आहे अशी जर भावना सामान्यांमध्ये या ग्रंथाच्या अवलोकनानें उत्पन्न होईल तर आमचें बरेंचसे कार्य झालें असे आम्हांस वाटेल.
विज्ञानेतिहासाचा उपक्रम करतांना आम्हीं व्यापक विचाराच्या इतिहासाला बहुतेक फांटा दिला आहे, याचें कारणं केवळ ग्रंथविस्तार नव्हे. प्रत्येक देशांत व्यापक विचार करण्याची खाज पुष्कळ लोकांस असावयाचीच. शास्त्रप्रगति मात्र फारशी झाली नाहीं अशा प्रसंगी जे अनेक व्यापक विचार बाहेर पडतात त्यांपैकी कांही तत्कालीन शास्त्रज्ञांस थोडेबहुत उपयोगी पडले असतील; तथापि त्या अनेक विचारपध्दतींचें आज महत्व कांहीं नाहीं. या अनेक विचारपध्दती वाङमयोपव नांतून तीक्ष्ण कुर्हाडीनें छाटून टांकल्या पाहिजेत असें आमचें मत आहे. आणि तें आम्ही छेदनतत्वांसह पहिल्या प्रकरणात मांडलेहि आहे.
या ग्रंथाची अपूर्वता ज्या कांहीं गोष्टींमुळे आहे त्या येणेंप्रमाणे:
1. अक्षरोत्पत्ति व कालगणना यासारख्या प्राथमिक स्वरूपाच्या दिसणार्या ज्ञानापासून प्रारंभ केला आहे.
2. इतिहासानें वर्णनीय शास्त्रांचे क्षेत्र भैतिक शास्त्रांपुरते मर्यादित न करतां, भाषाविषयक शास्त्रें, लेखनकला इत्यादि गोष्टींनीं व्यापक केलें आहे.
3. शास्त्रविकास वर्णन करण्यास जें क्षेत्र घेतलें आहे तें अनेक राष्ट्रव्यापी आहे; आणि होतां होईल तितकं प्रत्येक प्राचीन व अर्वाचीन राष्ट्रास या क्षेत्रातील कामगिरीसंबंधीं श्रेय देण्याची काळजी घेतली आहे. प्रचलीत असलेले विज्ञानेतिहास यूरोपीय संस्कृतीच्या बाहेर क्वचितच जातात.
4.शास्त्रविकासामध्यें जेव्हां शास्त्राचा प्रादेशिक साहित्यांशीं संबध येतो आणि प्रदेशनियमित साहित्याच्या स्वरूपाने पाने बध्द होतें तेव्हां प्रदेशविशिष्ट शास्त्राविषयीं भावनाप्राधान्य आढळून येतें. वैघक, संगीत,छंद:शास्त्र, व नाटर्य ही या प्रकाराचीं शास्त्रें होत. असल्या प्रकारच्या प्रश्र्नाविषयीं विवेचन करतांना स्थानिक विकासाच्या अभिमानानें बध्द न होण्याबद्दल या ग्रंथात बरीच खबरदारी घेतली आहे.
5.शास्त्ररचनेचीं तत्वें व विज्ञानेइतिहास लिहिण्याचीं तत्वे स्वत:स पाळतां येतील किंवा नाही याचा विचार न करता धैर्याने पुढें मांडलीं आहेत.
6. वेदविघा हा ग्रंथ, तिसरा विभाग व पाचवा विभाग यांस प्रस्तावनेसारखा असल्यामुळे आणि भारतीय प्रयत्नास वेदविघेपासून प्रारंभ झाला असल्यामुळें वेदविघेचा आणि उत्तरकालीन शास्त्रप्रगतीचा जितका संबध
तितका जोडून दिला आहे. त्यामुळें अनेक प्राचीन ऋषींचीं व आचार्यांचीं नांवें श्रौतग्रंथातून उध्दृत केली आहेत.
असो. प्रस्तावनाखंडामध्ये ज्या विषयांचे सविस्तरपणे विवेचन झालें त्यांची पुनरूत्त्किं शरीरखंडात होता होईल तो टाळण्यांत येईल आणि शरीरखंडांत योग्य तेथे संदर्भ दिले जातील.
विज्ञानेतिहासाची काहीं अपूर्णता आधुनिक संशोधनाच्या अपूर्णतेवर अवलंबून आहे. अशी अनेक ज्ञानागें आहेत कीं, त्यांविषयींच्या भारतीय कामगिरीचा इतिहासच लिहिला गेला नाही आणि त्यामुळे व ज्ञानकोशकरांचा काल नियमित असल्यामळे त्या ज्ञानांगांवर येथे सविस्तर विवेचन नाही. असलीं अंगे म्हटलीं म्हणजे भारतीय वनस्पतिशास्त्र व प्राणिशास्त्र यांचे इतिहास होत.
आपल्या वेदपुराणांत सर्व कांहीं आहे असे सिध्द करण्याकडे बर्याच व्यक्तींचा कल असतो. गेल्या शतकांत दयानंद सरस्वती स्वामींनी या बाबतींत जो प्रयत्न केला होता तो सर्वांस विदितच आहे. तसल्या प्रकारच्या शोधांची परंपरा संपली नाही. उदाहरणार्थ ना. भ. पावगी यांचे “ जिऑलॉजिकल फादर्स ऑफ इंडिया ” व रा. सातवळेकरांचे “ वेदांतील पदार्थविज्ञान (विविधज्ञानविस्तार, पु. 38 व 39 आणि “ ( वि. ज्ञा विस्तार पु. 44. अं. 5 ) इत्यादि लेख पहावेत. मागे सालीं टी, परमशिवय्यर यानीं इंद्र=प्रचंड ज्वालामुखी पर्वत; सोम=शिलाजित; गायत्री= “ मार्गवायु ” परबरह्म = “ हायड्रोजन ” वायु इत्यादि उपपत्त्या दिल्या होत्या ( मॉडर्न रिव्ह्यू एप्रिल 1913 ) . आम्ही यांच्या “ शोधां ” स आपल्या इतिहासांत उघड कारणामुळे जागा दिली नाही.
हा ग्रंथ तयार करतांना ज्या व्यक्तींच्या मेहनतीचा येथे निर्देश केला पाहिजे त्या व्यक्तींमध्ये प्रमुख स्थान रा. लक्ष्मण केशव भावे. बी. ए, रा. वाडदेकर व रा. सर्वोत्तम वासुदेव देशपांडे बी. ए. यांस दिलें पाहिजे. ज्या बाहेरच्या व्यक्तींची आम्हांस मदत झाली त्यांत डॉ. नीलकंठ रानडे, बी. ए. एम्. बी.एस्. व प्रो.एस्. गोडबोले. एम्. ए यांचा उल्लेख करतां येईल.
- श्रीधर व्यंकटेश केतकर