प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ३ रें.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति-संख्यालेखन.
प्राचीन ग्रीक, हब्रू व सिरियन अक्षरांक:- प्राचीन काळीं निरनिराळ्या राष्ट्रांत संख्यावाचक चिन्हांकरितां अक्षरांचा उपयोग करण्याचा बराच प्रघात होता. संख्यावाचक शब्दाच्या आद्याक्षराचा अशा प्रकारें उपयोग करण्याची एक रीत हेरोडियन नामक ग्रीक व्याकरणकारानें इ. स. २०० च्या सुमारास लिहून ठेविलेली आढळते. तथापि असें म्हणतात कीं, ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकाच्या आरंभाच्या सुमारास होऊन गेलेल्या सोलोनच्या काळापासून ही रीत ग्रीक लोकांमध्यें प्रचलित होती. ह्या रीतींत एक, पांच, दहा, शंभर, हजार व दहा हजार ह्यांकरितां I,II,∆,H,X व M हीं अक्षरें योजण्यांत येत असून पांचाच्या अक्षरांकाच्या पोटांत दहाचा अक्षरांक लिहिला असतां पन्नास व शंभराचा लिहिला असतां पांचशें दर्शविले जात. ह्या हेरोडियन अंकाच्या जागीं रूढ झालेल्या व ग्रीक, हिब्रू व सिरियन लोकांत प्रचलित असलेल्या दुसर्या एका अक्षरांकपद्धतींत, वर्णमालेंतील पहिलीं नऊ अक्षरें एक, दोन, तीन इत्यादि पहिल्या नऊ अंकांकरितां नियुक्त केलेलीं असून, दहा, वीस इत्यादी दशकांच्या व शंभर, दोनशें इत्यादि शतकांच्या नऊ नऊ संख्यांकरितां पुढच्या अक्षरांचा उपयोग करण्यांत येत असे. जुन्या सेमेटिक वर्णमालेंत बावीसच अक्षरें असल्यामुळें, चारशेंच्या पुढील शतकाच्या पांच संख्यांकरितां आरंभी संयुक्त अक्षरांचा व नंतर चार चतुष्कोनी वर्णांचा उपयोग केला जात होता. ग्रीक वर्णमालेंत अधिक अक्षरें असल्याकारणानें त्यांना फक्त तीनच चिन्हें बाहेरून घ्यावीं लागलीं. यांतील दोन जुनीं फिनीशियन अक्षरें असून तिसरें ‘ सँपि ’ नांवाचे एक चिन्ह होतें, व तीं सहा, नव्वद व नऊशें ह्या संख्यांची वाचक ठरविण्यात आली होती. ह्या नूतन अक्षरांकपद्धतीच्या प्रचाराचा खात्रीलायक पुरावा ग्रीक लोकांत दुसर्या टालेमीच्या (ख्रि. पू. ३०९-२४६) नाण्यांवर, व सेमेटिक भुमीवर हास्मोनिअनांच्या यहुदी नाण्यांवर प्रथम दृष्टीस पडतो. बीजगणिताचा उदय समीकरणें सोडविण्याच्या प्रसंगामुळें झाला. आज सामान्य व्यवहारांत अंकगणितानें काम भागतें अशी स्थिति असतां प्राचीनांच्या कोणत्या व्यवहारासाठी बीजगणित उत्पन्न झालें आणि समीकरणें सोडविण्याचा प्रसंग तरी कसा आला असा प्रश्न उत्पन्न होतो. आमची या विषयावर आम्ही एक समजूत व्यक्त करतों, तिची युक्तायुक्तता तज्ज्ञांनी ठरवावी. आम्हांस असें वाटतें की दोन निरनिराळ्या राष्ट्रांत संख्यावाचक चिन्हांसाठी अक्षरांचा उपयोग केला जात असतां आणि- दशमान पद्धतीची सार्वत्रिकता नसतां हिशेबाच्या रूजुवातीच्या प्रंसंगीं हिशेब आपल्या पद्धतीनेंच तपासून त्याचा परिणाम आपल्या पद्धतीनें लिहावयाचा या क्रियेसाठी समीकरणाची पद्धति उत्पन्न झालीं असावी.