डॉ. केतकरांच्या ज्ञानकोशांची रचना

डॉ. केतकरांच्या ज्ञानकोशाची रचना पारंपारिक ज्ञानकोशापेक्षा थोडी निराळी आहे. ती समजावून न घेता पुढे गेल्यास भरकटण्याचा अनुभव येण्याची शक्यता आहे. त्यांच्या छापील ज्ञानकोशांचे खंड चाळणे असो, वा ketkardnyankosh.com ह्या संकेतस्थळात भ्रमंती करणे असो त्यांच्या ज्ञानकोशांच्या रचनेविषयी सुरूवातीस जाणून घेणे आवश्यक आहे.

केतकरांनी एकूण २३ खंडांची विभागणी खालील चार प्रकारांमध्ये केलेली आहे.:

 खंड १ ते खंड ५  सर्व प्रस्तावना खंड
 खंड ६ ते खंड २१  सर्व शरीर खंड
 खंड २२  सूची खंड
 खंड २३  पुरवणी खंड

 

 

 

प्रस्तावना खंड म्हणजे काय?

'प्रस्तावना' हा शब्द केतकरांनी एखाद्या विषयाची सर्वसमावेशकता ह्या अर्थाने वापरला आहे. त्यानुसार हे पाचही प्रस्तावना खंड एकेका मुख्य विषयाला वाहिलेले आहेत. पहिला विषय - हिंदुस्थान आणि जग. यात जगभरचे देश, आपला देश यांचा सर्वांगीण विचार आहे. यात विषय आणि मुद्दे यांची मांडणी अकारविल्हे नाही. म्हणजे अफगाणिस्तान पहिला असावा आणि झिंबाब्वे अखेरचा अशी अक्षरानुक्रमे मांडणी त्यात नाही. हिंदुस्थान आणि जग ह्या पहिल्या प्रस्तावना खंडात एकूण १५ प्रकरणे आणि १ परिशिष्ट आहे. आपण ketkardnyankosh.com ह्या संकेतस्थळाच्या मुख्य पानावर जाऊन डावीकडील खंड १ वर क्लीक केलेत तर सर्व १५ प्रकरणांच्या स्वतंत्र लिक्स तुमच्यासमोर येतील. त्या लिंकवर क्लीक करताच तुम्हाला ते प्रकरण वाचता येईल. अशाच प्रकारे खंड २ चे व इतर पुढल्या ३, ४ व ५ चेही आहे. 

प्रस्तावना खंड क्रमांक २ हा त्यांनी 'वेदविद्या' ह्या विषयाला वाहिलेला आहे. म्हणजेच तो संपूर्ण खंड केवळ वेदविद्या विषयक माहितीने भरलेला आहे. त्या खंडात वेदविद्येशी संबंधित निरनिराळी स्वतंत्र प्रकरणे आहेत. उदाहरणार्थ प्रकरण २ हे ऋग्वेदाबद्दलचे, प्रकरण ३ मध्ये अथर्ववेद, प्रकरण ४ मध्ये यजुर्वेद, प्रकरण ५ मध्ये सामवेद अशा विविध प्रकरणांमध्ये प्रस्तावना खंड २ बांधला गेला आहे.

प्रस्तावना खंड क्रमांक ३ चा विषय आहे 'बुद्धपूर्वजग'. वेदविद्येचा परिचय करून दिल्यानंतर केतकर बुद्धपूर्वकालाकडे वळले आहेत. यात विश्वाच्या उत्पत्तीपासून ते ब्राम्हण्याच्या इतिहासापर्यंतची ७ प्रकरणे आहेत. जैन वाङ्मयाबाबतचे एक परिशिष्टही शेवटी आहे. 

प्रस्तावना खंड क्रमांक ४ चा विषय आहे बुद्धोत्तर जग. गौतम बुद्धाच्या उदयानंतरची इराण, ग्रीक, रोमन, चीन, जपान, खिलाफत, मुस्लीम वगैरे संस्कृतींची माहिती देणारी, तसेच बुद्धाचे चरित्र सांगणारी, किंवा सत्ता आणि संस्कृती यांचा जागतिक इतिहास सांगणारी एकूण ३० स्वतंत्र प्रकरणे प्रस्तावना खंड ४ मध्ये आहेत. 

शेवटच्या म्हणजे पाचव्या प्रस्तावना खंडाचा विषय आहे - विज्ञानेतिहास. विविध शास्त्रांचे स्वरूप व इतिहास सांगणारी एकूण १६ प्रकरणे यात आहेत. रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, ज्योतिष (खगोल) शास्त्र, गणित, भूगर्भशास्त्र, जीवशास्त्र, लेखनपद्धती (लिपीशास्त्र) वगैरेंचे सखोल ज्ञान ह्या खंडात साठलेले आहे. 
प्रस्तावना खंडात जी माहिती वा तपशील आला आहे त्याची पुनरावृत्ती केतकरांनी पुढील खंडांमध्ये केलेली नाही. मात्र त्याचे संदर्भ वेळोवेळी दिले आहेत. 
प्रस्तावना खंडांविषयी एका वाक्यात सांगायचे तर प्रत्येक प्रस्तावना खंड हा त्या त्या विषयावरचा सखोल ज्ञान देणारा स्वतंत्र ग्रंथच आहे. 

आपल्या प्रस्तावना खंडांमागील भूमिका सांगताना केतकर काय लिहीतात पहाः "ज्ञानकोशाचा उद्देश महाराष्ट्रीयांस अनेक शास्त्राचें ज्ञान करून देण्याचा आहे. प्रस्तावनाखंडाचे उद्देश दोन आहेत. एक उद्देश जें ज्ञान गोष्टीच्या रूपानें मांडणें अधिक चांगलें तें त्या रूपांत मांडणें हा आहे, व दुसरा उद्देश प्रत्येक शास्त्राविषयीं जिज्ञासा उत्पन्न करून देण्याचा आहे."

ग्रंथ प्रवेश म्हणजे काय?
प्रस्तावना खंडांविषयीची वरील माहिती वाचल्यानंतर कोणालाही स्वाभाविकच प्रश्न पडेल की केतकरांनी आपली संपादकीय प्रस्तावना त्या त्या खंडाला लिहीली आहे की नाही? तर त्याचे उत्तर म्हणजे 'होय, प्रत्येक खंडाच्या सुरूवातीस केतकरांनी त्या खंडासाठीची संपादकीय भूमिका मांडली आहे. मात्र त्याला 'प्रस्तावना' असे न म्हणता 'ग्रंथ प्रवेश' असे म्हंटले आहे.' 

शरीर खंड म्हणजे काय?
शरीर खंड म्हणजे अकारविल्हे माहिती देणारे खंड. 'अ' अक्षरापासून सुरूवात करून नंतर 'क' 'ख' 'ग' अशा क्रमाने 'ज्ञ' पर्यंत माहिती देत येणारे खंड म्हणजे शरीर खंड. त्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे १६ आहे. खंड क्रमांक ६ (अ ते अर्थशास्त्र) पासून शरीर खंड सुरू होतात, आणि खंड क्रमांक २१ (सांचिन ते ज्ञेयवाद) पर्यंत येतात. ह्या सर्व १६ खंडांमध्ये अकारविल्हे लेखनोंदी आहेत. कोणताही खंड प्रस्तावना खंडासारखा एखाद्या विशिष्ट विषयाला वाहिलेला नाही. 

सूची खंड म्हणजे काय?
सर्व खंडांचे काम संपल्यानंतर १९२९ साली केतकरांनी खंड क्रमांक २२ म्हणजे सूची खंड प्रकाशित केला. त्यात कोणत्याही पुस्तकाच्या अखेरीस असते तशी इंडेक्स अर्थात सूची आहे. वेगवेगळे विषय व उपविषय काढून त्यात त्या त्या विषय वा उपविषयाशी संबंधित लेखनोंदींची अकारविल्हे सूची देण्यासाठी केतकरांनी अपरिमित कष्ट घेतलेले स्पष्ट दिसतात. केवळ सूची व यादी इतकीच ह्या सूची खंडाची व्याप्ती आहे. त्यात कोणतेही ज्ञान वा नवा लेख नाही. संकेतस्थळावर Search ची सुविधा असल्याने एखाद्या विषयावरील लेख शोधण्यासाठी कोणाला सूची खंडात जाऊन पहावे लागेल असे वाटत नाही. सूची खंडातील यादीत नसलेल्या एखाद्या विषयावरील वा शब्दावरील संदर्भही Search मधून काही क्षणात मिळण्याची व्यवस्था आधुनिक संगणक तंत्रज्ञानाने केली आहे. केतकरांनी ही व्यवस्था पाहिली असती तर कदाचित त्यांनी हा सूची खंड रद्दच करून टाकला असता. मात्र तरीही संकेतस्थळावर सूची खंडही दिला आहे. विषय वा उपविषयांची विभागणी केतकरांनी कशी केली आहे, व त्यात कोणत्या नोंदीचे वर्गीकरण केले आहे याची वाचकांना व अभ्यासकांना कल्पना यावी ह्या हेतूनेच सूची खंडही संकेतस्थळावर उपलब्ध केला आहे. 

पुरवणी खंड म्हणजे काय?
एकूण २३ खंडांमध्ये पुरवणी खंड एकच आहे. तो म्हणजे शेवटचा खंड क्रमांक २३. पुरवणी खंड हा प्रस्तावना खंडाच्या पद्धतीचा आहे. म्हणजे त्यात स्वतंत्र प्रकरणे आहेत. प्रकरणांची संख्या ११ आहे. पहिल्या खंडाचा विषय होता - हिंदुस्थान आणि जग. तो खंड प्रसिद्ध झाला १९२० मध्ये. खंड (पुरवणी) २३ चा विषय आहे - हिंदुस्थान. आणि तो प्रकाशित झाला १९२७ मध्ये. म्हणजे मधल्या ७ वर्षात 'हिंदुस्थान' ह्या विषयावर केतकरांना आणखी काही माहितीचा समावेश करावासा वाटला. एकूण ५१० पानांचा हा खंड त्या दृष्टीने महत्त्वाचा म्हणावा लागेल.