सुरूवात करण्यापूर्वी हे वाचा

डॉ. केतकर आणि त्यांचे ज्ञानकोशः एक महत्त्वाचे टिपण

  डॉ. श्री.व्यं. केतकरांविषयी थोडक्यात..

डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हे त्यांच्या ज्ञानकोशांचे प्रमुख संपादक होते. ज्या काळात केतकरांनी ज्ञानकोशाच्या २३ खंडांचे काम केले तो काळ १९१६ ते १९२८ हा आहे. ह्या काळात खुद्द लोकमान्य टिळकांनी सुद्धा त्यांना 'हे काम फार मोठे आहे, एका माणसाचे हे काम नाही' अशा प्रकारचा सल्ला दिला होता. पण केतकरांचा निर्धार पक्का होता. त्या निर्धाराला चिकटून सर्व संकटांवर मात करीत त्यांनी १२ वर्षांमध्ये हा ऐतिहासिक महत्त्वाचा मराठी प्रकल्प पूर्ण केला.

एक लक्षात घ्यायला हवे की केतकरांनी ज्ञानकोशाचे काम सुरू केले तेव्हा त्यांच्यापुढे पथदर्शक म्हणून 'एनसायक्लोपेडिया ब्रिटानिका' सारखा एखादा इंग्रजी ज्ञानकोशच तेवढा होता. गुजराथी, तेलुगू सारख्या काही भारतीय भाषांमध्ये ज्ञानकोश निर्मितीचे काम होत आहे अशी चिन्हे वा चर्चा तेव्हा होती, पण मराठी ज्ञानकोशाला पथदर्शक ठरू शकतील अशी त्यांची स्थिती नव्हती. ते काम मोठे आहे याची कल्पना केतकरांना नसेल असे म्हणता येणार नाही. दुसरीकडे एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी पुरेशी आर्थिक ताकद वा साधनसामग्री आपल्याकडे नाही याची जाणीव त्यांना त्यावेळी नसेल असेही संभवत नाही. पण मराठी ज्ञानकोश निर्मितीच्या पराकोटीच्या महत्त्वाकांक्षेने पेटून उठत त्यांनी एकांड्या शिलेदाराप्रमाणे पदरचे सारे पैसे टाकून कामाला सुरूवात केली. केतकर वयाच्या केवळ ५३ व्या वर्षी पुण्याच्या ससून इस्पितळात एखाद्या सामान्य रूग्णाप्रमाणे गेले. त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांच्या पत्नीला १०० रूपये उसने मागण्याची वेळ आली अशी नोंद त्यांच्या चरित्रात आहे. मुद्दा हा की ब्रिटीशांच्या काळात मराठी ज्ञानकोश निर्मितीसाठी त्यांनी केलेला त्याग हा अनन्यसाधारण आहे.