डॉ. श्री.व्यं. केतकरांविषयी थोडक्यात..
केतकर ज्ञानकोशाचे संस्थापक, संपादक, मुख्य व्यवस्थापक, मुख्य अर्थपुरवठादार असे सर्व काही होते. पुढे त्यांना अनेक चांगले सहकारी लाभले. पण ती मंडळी मुख्यत्वे वेतनावर काम करणारी होती. केतकरांची आर्थिक स्थिती अगदी सुरूवातीपासूनच सामान्य होती. वयाच्या २२ व्या वर्षी १९०६मध्ये मोठ्या पराकाष्ठेने पैसे गोळा करून पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले. तेथे पाच वर्षे राहिले. तेथून १९११ मध्ये वयाच्या २७ व्या वर्षी जेव्हा ते भारतात परतले तेव्हा त्यांच्याकडे अमेरिकेतील कार्नेल विद्यापीठातून घेतलेल्या एम.ए., आणि पीएच.डी. ह्या पदव्या होत्या. पीएच.डी. साठी त्यांनी लिहीलेल्या प्रबंधाचा विषय होता 'The history of caste in India'. अशी भरगच्च शैक्षणिक अर्हता वयाच्या २७ व्या वर्षी असणाऱ्या माणसाच्या स्वागतासाठी चलाख इंग्रजांनी सहजपणे पायघड्या अंथरल्या असत्या. पण केतकरांनी त्या तयार सुखाकडे पाठ फिरवली आणि मराठीसाठी प्रवाहाविरूद्ध पोहण्याचे ठरवले. मराठी ज्ञानकोशाच्या निर्मितीच्या आतबट्ट्याच्या कामासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित करून टाकले. मराठी समाज कालही त्यांचे देणे लागत होता, आजही लागतो.