प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १४ वें.
सामाजिक दृढीकरण व समाजविस्तार या क्रियांचें जगद्विकासांत स्थान.

हिंदुसमाजव्यवस्थेंतील दोष.- आपल्या स्वतःचें भवितव्यनियमन करणें ज्या समाजाच्या हातीं असेल तो समाज दुसर्‍यांपेक्षां अधिक सुधारलेला समजावा. हिंदुस्थानच्या समाजाला स्वच्छेनें भवितव्यनियमन करण्याची शक्ति आज दिसत नाहीं. समाज जागृत होऊन स्वच्छेनें समाजस्वरूपनियमनाची चळवळ करण्यासाठीं कंबर बांधू लागला तर त्यास गुणदोषविषयक विचार आणि त्यांतल्या त्यांत दोषशोध अगोदर केला पाहिजे.

दोष शोधून काढण्याचें काम कांहीं सोपें नाहीं, तरी पण कांहीं ढोबळ दोषांचा आपण परामर्श घेऊं.

हिंदुसमाजव्यवस्थेतींल सर्वांत मोठा दोष म्हटला म्हणजे दृढीकरणाची अल्पता हा होय. हिंदुसमाजांत परस्परांपासून विभक्त अशा तीन हजारांहून अधिक जाती व त्याहीपेक्षां अधिक पोटजाती आहेत. हा प्रकार म्हणजे अलीकडे उत्पन्न झालेलें अत्यंत भयंकर द्वैत असें जगाला दिसतें. पण जें हें द्वैत दिसतें त्याचा अर्थ एक समाजाचे अनेक तुकडे पडले असा नाहीं, तर दृढीकरणाचें कार्य अपूर्ण राहिलें असा आहे. हें दृढीकरणाचें कार्य व्हावयापूर्वींचें कार्य म्हणजे अनेक जनसमाज एका सामान्य संस्कृतीखालीं आणावयाचें. तें कार्य झालें. हें उत्पन्न केलेलें सादृश्य दृढ करावयाचें कार्य उरलें. तें कार्य करण्याचा प्रयत्‍न अनेक संस्थांनीं केला परंतु तें करण्यांत या संस्था दुर्बल ठरल्या.

निरनिराळ्या जाती व मनुष्यवर्ग यांचें ऐक्य घडवून आणणारी जी संप्रदाय नांवाची एकीकरणपद्धति आहे, तिच्या योगानें मुसुलमानी व ख्रिस्ती देशांत लोकांची एकी घडून आलेली आहे. या एकीला मुसुलमानी संप्रदाय व ख्रिस्ती संप्रदाय हे दोन बलिष्ठ संप्रदाय कारण झालेले आहेत. हिंदुस्थानांतहि संप्रदायसंस्था उद्भूत झाली. परंतु या संप्रदायांनां हिंदुस्थानांत एकी घडवून आणतां आली नाहीं. हिंदुस्थानांतील संप्रदायाचे संस्थापक ख्रिस्त अथवा महंमद यांच्या दर्जाचे नव्हते म्हणून त्यांनां ऐक्याच्या कार्यांत अपयश आलें असेंच केवळ म्हणतां येणार नाहीं. त्यांच्या अपयशाचें कारण या देशांत पूर्वापार चालत आलेली बौद्धिक संपत्तीची परंपरा होय. ही परंपरा इतकी सार्वत्रिक असून श्रेष्ठ दर्जाची होती कीं, येथें जे संप्रदाय उत्पन्न झाले ते या परंपरागत बौद्धिक संपत्तीशीं तुलना करितां फार आकुंचित असेच वाटले. पाश्चात्त्य जगताला रिलिजन्सनीं ज्या गोष्टी दिल्या त्या हिंदु जगताला संप्रदायांकडून प्राप्त होणें अशक्य होतें.

यूरोपांतील लोकांनां न्यायशास्त्र आणि ईश्वरविषयक व इतर व्यापक विचार संप्रदायसंस्थेकडून प्राप्त झाले. उलटपक्षीं, भारतीयांनां या गोष्टी संप्रदायांबाहेरील सामान्य संस्कृतीमधूनच प्राप्त झाल्या होत्या. भारतीय तात्त्विक विचार व कल्पना, ख्रिस्ती संप्रदाय व महंमदी संप्रदाय या दोघांच्या हल्ल्यांतून आजला टिकून राहिल्या आहेत त्याचें कारण कोणताहि संप्रदाय त्यांच्या मुळाशीं नव्हता हें आहे. ख्रिस्ताच्या व महंमदाच्या संप्रदायांनीं हिंदुस्थानांतील अडाणी समाजांतून माणसें उचललीं हें खरें आहे. परंतु अडाणी लोकांखेरीज इतरांनां म्हणजे बुद्धिमान वर्गाला या संप्रदायांच्या तत्त्वांची फारशी किंमत वाटली नाहीं हें तितकेंच खरें आहे. ख्रैस्त्य व इस्लाम हे संप्रदाय म्हणजे केवळ अर्धसंस्कृत टोळ्यांचे पंथ असून त्यांत परस्परविसंगत अशाच गोष्टी पुष्कळ आहेत, त्यांत मौल्यवान् असें नवें तत्त्व कांहीं नाहीं, अशी हिंदुस्थानांतील बुद्धिमान वर्गाची सदरील संप्रदायांसंबंधानें ठाम कल्पना आहे; व म्हणून त्याजवर त्या संप्रदायांच्या उपदेशकांचा कांहींच परिणाम होत नाहीं. याशिवाय हिंदूंची वृत्ति अशी आहे कीं, जर एखादें मत चांगलें असेल तर तें घ्यावें, ज्ञान कोठूनहि घ्यावें, त्याकरितां जात बदलावयास लावणार्‍या संप्रदायास मिळावयाचें कारण नाहीं. असो. या आणि दुसर्‍या अनेक कारणांनीं संप्रदायसंस्थेस हिंदुस्थानांत एकी करण्याच्या कामीं यश आलें नाहीं. तेव्हां याखेरीज कांहीं दुसरी संघटित योजना एकीकरणाच्या कार्यासाठीं आपण केली पाहिजे.

येथील ऐक्याच्या अभावाचीं मूळ कारणें तरी काय याचा विचार करितां असें दिसतें कीं, देशांतील निरनिराळ्या टोळ्या व राष्ट्रकें यांनां आत्मसात् करून आपलें व त्यांचें मिळून एक मोठें बलिष्ठ राष्ट्र निर्माण करण्याचा उपदेश करणारे व्यापक विचार आणि भावना हिंदुस्थानांत उदय न पावल्यानें येथें पाहिजें तें ऐक्य घडून आलें नाहीं. कोणत्याहि प्रकारची राष्ट्रीय भावना म्हणून हिंदुत्वांत उत्पन्न झाली नाहीं. जातीची कल्पना व त्यानंतर एकदम मानव्याची कल्पना अशा दोनच ऐक्याच्या कल्पना प्राचीन हिंदू लोकांस अवगत होत्या. पृथ्वीवरील सर्व मनुष्यांचा एकच समाज असावा, या समाजांत श्रेष्ठ कनिष्ठ असें चार वर्ण असावेत, व या वर्णांत ब्राह्मण सर्वांच्या वर असावेत, ही हिंदूंची समाजघटनेची कल्पना होती. हें त्यांचें सामाजिक ध्येय होतें. परंतु, हें ध्येय व्यवहारांत आणतांना जो मार्ग त्यांनीं पत्करला त्यायोगें हिंदुस्थानांत व शेजारच्या देशांत म्हणजे हिंदी महासागरांतील द्वीपें व पूर्वेकडील उपभारत वगैरे प्रदेशांत पुष्कळशा जातींची सोपानपरंपरा निर्माण होऊन त्यांत ब्राह्मण जात सर्वश्रेष्ठ व बाकीच्या उच्चनीचतेच्या कल्पनेनें एकाखालीं एक अशा पायरीनें लाविलेल्या ही स्थिति कायमची रूढ होण्यापलीकडे कांहीं झालें नाहीं. ब्राह्मणांचें ध्येय जाती कायम टिकाव्या हें नव्हतेंच. त्यांचें ध्येय मनुष्यांसमाजांत चार वर्ण किंबहुना शक्य तर ब्राह्मण व शूद्र हे दोनच वर्ण रहावे असें होतें. वर्णभावना जागृत करून जातिभावना कमी करावी आणि चातुर्वर्ण्यसंस्थापना करावी म्हणजे जातिभेद नष्ट करावा हें ब्राह्मणांचें प्राचीन ध्येय जसें विफळ झालें तसेंच ब्राह्मणेतर निरनिराळ्या जाती आपलें जातिवैशिष्ट्य गौण मानून ज्या एका नांवाखालीं एकत्र होतील अशी पदवी ‘शूद्र’ ही खास नसल्यानें ब्राह्मणांचें दोन वर्णांचें ध्येयहि फळास आलें नाहीं.

महंमदी संप्रदायाचा उदय होऊन मुसुलमान लोकांच्या टोळ्या जेते या नात्यानें हिंदुस्थानांत घूसून येथें वस्ती करीपावेतों भारतीय म्हणून आपण अभारतीयांहून वेगळे आहोंत ही जाणीव भारतीयांनां नव्हती, व त्यांनां तसें वैशिष्ट्यदर्शक नांवहि नव्हतें. मुसुलमान आल्यावरहि आपली ब्राह्मणप्रमुख उच्चनीच जातिपरंपरेची कल्पना हिंदूंनीं टाकली नाहीं. देशांत घुसलेल्या मुसुलमानांनां त्यांनीं म्लेचछ अथवा अनार्य जात असें नांव देऊन आपल्या समाजाच्या अगदी तळाच्या खालीं एक नीच जात म्हणून तिला आपल्या सामाजिक विचारांत स्थान देऊन टाकलें. आतां ख्रिस्ती संप्रदायाचे लोक राज्य करीत आहेत तरी भारतीयांनीं आपली जुनी समाजकल्पना टाकलेली नाहीं. खालच्या नीच जाती म्हणून इंग्रज व दुसरे ख्रिस्ती लोक यांची आजहि ते एकत्र गणना करितात.

याप्रमाणें हिंदूंनीं जरी आपल्यापुरतें सर्वव्यापी असें समाजव्यवस्थाशास्त्र निर्माण केलें तरी सर्व जग आपलें म्हणून स्वीकारील असें या व्यववस्थेचें स्वरूप नव्हतें व नाहीं. हिंदू लोकांमध्यें आपली समाजव्यवस्था जगावर जबरदस्तीनें लादण्याइतकें सामर्थ्यहि नव्हतें. हिंदूस्थानांतील राजेरजवाडे ब्राह्मणांच्या ज्ञानाची मदत घेऊन जग जिंकूं शकले असते तर, किंवा ब्राह्मण सर्व जगावर जाऊन ते भारतीयांचे पुरोहित झाले तसे जगांतील इतर सर्व लोकांचे पुरोहित झाले असते तर, त्यांच्या सामाजिक विचारांनां सर्व जगभर मान्यता मिळाली असती. परंतु हिंदुंच्या इतिहासांत त्यांच्या सामर्थ्याभावामुळें असाहि योग घडून आला नाहीं.

हिंदुस्थानांत बाह्य संप्रदाय शिरून त्यांच्या सान्निध्यानें व हल्ल्यानें हिंदु संस्कृतीचा समूळ नाश होतो कीं काय अशी भीति उत्पन्न होईपावेतों हिंदुमध्यें सर्वांचें ऐक्य करून स्वसमाजसवर्धन या एका ध्येयाची साधना करण्याची विचार पद्धति व वृत्ति उत्पन्न झाली नाहीं. ख्रिस्त आणि महंमद यांच्या संप्रदायांत ज्या जाती ओढल्या गेल्या त्यांच्या ठिकाणीं स्वसमाजवर्धनाची प्रेरणा करणारी भावना जागृत होती आणि यामुलें पुष्कळ लोकांचें ऐक्य या जाती करूं शकल्या.