प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १४ वें.
सामाजिक दृढीकरण व समाजविस्तार या क्रियांचें जगद्विकासांत स्थान.

समाजाचे दोन प्रकार.- यूरोपियन राष्ट्रें सध्यांच्या राष्ट्रपदाला जीं पोहोंचलीं तीं कोणकोणत्या पायर्‍या चढून पोहोंचलीं हें आपण नीट समजून घेतलें पाहिजे. यूरोपियन लोकांचीं राष्ट्रें बनावयास जी गोष्ट सर्वांत अधिक कारणीभूत झाली ती ही कीं, त्यांनीं आपले समाज जात्यवलंबी होते ते क्षेत्रावलंबी केले. समाजाची जातिबद्धता काढून त्याला क्षेत्रबद्धतेचें स्वरूप देणें या गोष्टीचें किती महत्त्व आहे याची बरोबर कल्पना रॉचेस्टर येथील डॉक्टर मॉर्गन यांच्याखेरीज इतर कोणाहि समाजशास्त्रज्ञास झालेली दिसत नाहीं. समाजाच्या व्यवस्थेंत यूरोपमध्यें हा जो फरक झाला, त्याच्या योगानेंच त्या ठिकाणीं हिंदूंसारखी जातिव्यवस्था वाढ पावूं शकली नाहीं. जातिमूलक समाज आणि प्रादेशिक समाज हे भिन्न प्रकारचे समाज आहेत. जातिभावना आणि प्रादेशिक भावना यांचें कार्य ज्या समुच्चयांत होतें ते समुच्चय राजकीय असूं शकतात त्याप्रमाणें केवळ सामाजिकहि असूं शकतात.

एखाद्या प्रदेशांत तेथील विशिष्ट जातींवरच केवळ नव्हे तर सर्वांवर सारखीच जर राजकीय सत्ता चालत असेल तर त्या प्रदेशांतील समाजाला राजकीय स्वरूपाचा प्रादेशिक समाज म्हणावें. निरनिराळ्या प्रदेशांत राहणार्‍या निरनिराळ्या लोकसमूहांवर कोणीतरी एकाच प्रमुखाची अनेक सामाजिक बाबतींत जर सत्ता चालत असेल आणि या लोकांच्या सामाजिक रूढींत त्या त्या ठिकाणची राजसत्ता जर कोणत्याहि प्रकारें हात घालीत नसेल तर असल्या संस्थेला जातिस्वरूपी सामाजिक समुच्चय म्हणतां येईल. रोमन कॅथोलिक चर्च हें असल्या समुच्चयाचें चांगलें उदाहरण आहे. चीन आणि इराण यांसारख्या पौरस्त्य देशांत व हिंदुस्थानांतील देशी संस्थानांत असलेल्या ब्रिटिश प्रजाजनांवर ब्रिटिशांचा अधिकार हें राजकीय स्वरूपाच्या जातिघटित समाजाचें उदाहरण आहे. एखाद्या देशांत एखाद्या लोकसमूहाला फक्त जातीचे कायदे व वहिवाटी याच जर बंधनकारक असतील आणि तेथें असलेली राजसत्ता जर ह्या जातीच्या रूढींचा अंमल करण्याच्या कामीं लक्ष देत नसेल तर तेथें जातिघटीत शासनसंस्था आहे असें म्हणतां येईल. ज्या लोकांनां हक्काची समानता हें ध्येय आवडतें त्यांनीं अशी जातिस्वरूपी शासनसंस्था नाहींशी करण्याचा प्रयत्‍न करणें व तिच्या जागीं प्रादेशिक शासनसंस्था निर्माण करण्यास झटणें हें त्यांचें कर्तव्य आहे.

मानवी विकासामध्यें प्रादेशिक समाज ही कांहीं शेवटची पायरी नव्हे. शिवाय ही प्रादेशिक भावना नेहमींच कायम राहते असेंहि नाहीं. कोणताहि प्रादेशिक समाज संकुचित वृत्तीचा होऊन जातीच्या स्वरूपाचा होण्याचें भय नेहमींच असतें. जातीला जसा जातीचा अभिमान असतो व आपल्यापेक्षां कमी दर्जाच्या जातींत मिसळ्याची जशी तिची तयारी नसते तशीच प्रदेशमूलक समाजांची गोष्ट आहे. ह्या समाजांनां एकदां राष्ट्रस्वरूप प्राप्त झालें म्हणजे त्यांच्यामध्यें राष्ट्राभिमान वाढतो, व त्यायोगें ते अहंमन्य आणि एकलकोंडे  बनतात. कोणत्याहि देशांत जर निरनिराळे समाज एकत्र झाले व हे समाज परस्परांत मिसळून जाण्यासारखे नसले तर त्या देशांत प्रदेशमूलक समाज व प्रादेशिक भावना टिकून राहण्याची गोष्ट फार अवघड होते. देशांत येणारे बाहेरचे लोक पोषाख, चालीरीती, उपासनासंप्रदाय व संस्कृतीच्या इतर गोष्टी या बाबतींत आणि रंगारूपाच्या बाबतींत देशांतील लोकांहून निराळे असले तर तेथील प्रादेशिक समाजाला या बाहेरच्या लोकांनां  आपल्याशीं एकरूप करून घेण्याच्या कामांत फारच अडचण पडते. हिंदुस्थानांत निरनिराळ्या विभागांत प्रादेशिक समाज पूर्वीं झाले असतील यांत कांहीं अशक्य दिसत नाहीं. परंतु हे समाज पुढें पुन्हां जातिस्वरूप झाले असें दिसतें. उदाहरणार्थ कलिंगादि राष्ट्रें आज जातिस्वरूपी बनलेलीं आहेत.

जगांतील सर्व समाजांचा जर आपण हिशोब घेतला तर एक समाज पूर्णपणें जातिस्वरूपाचा व दुसरा पूर्णपणें प्रादेशिक असें आढळत नाहीं. जातकुळीवार बनलेले समाज व प्रदेशवार बनलेले समाज यांची भेसळ जगांत सांपडते. अमुक देशांत केवळ क्षेत्रवार बनलेले समाज आहेत व अमुक देशांत केवळ जातीवार समाज आहेत या प्रकारें जगाचे दोन विभाग करतां येतील अशी स्थिति नाहीं. इंग्लंड, फ्रान्स व पूर्वेकडील जपानी साम्राज्य हीं क्षेत्रनिश्चित समाजाचीं उदाहरणें म्हणतां येतील. यूरोपियन राष्ट्रांतील लोक ज्या देशांतून व वसाहतींतून राहत आहेत तेथें त्यांनीं आपल्या बरोबर क्षेत्रनिश्चित समाजाची कल्पना नेलेली आहे, परंतु या प्रदेशांत ज्या निरनिराळ्या भिन्न वंशांतील जातींबरोबर राहण्याचा प्रसंग येतो, त्यांची चालरीत अगदीं वेगळी असल्यानें आपलें क्षेत्रनिश्चित अथवा प्रादेशिक समाजाचें ध्येय अमलांत आणतांना त्यांची फार त्रेधा उडते. संयुक्त संस्थानांतील लोक आपल्या समाजाचें प्रादेशिक स्वरूप कायम राखण्याचा आटोकाट प्रयत्‍न करीत आहेत व त्यांच्या मार्गांतील अडचणींतून ते केव्हां तरी यशस्वितेनें पार निघून जातील असा पुष्कळ संभव दिसतो. उलट पक्षीं, हिंदुस्थानचा समाज हा जातिविशिष्ट समाजाच्या अमर्याद वाढीचें एक थोरलें उदाहरण म्हणून देतां येईल.