प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १४ वें.
सामाजिक दृढीकरण व समाजविस्तार या क्रियांचें जगद्विकासांत स्थान.

विविक्षित समाजाच्या अस्तित्वाचें समर्थन करतां येईल किंवा नाहीं या प्रश्नाचा विचार करतांना कित्येक गोष्टींचा विचार करणें प्राप्त होतें. जगद्विकासाची एकंदर क्रिया कशा स्वरूपाची आहे? तिचा आज दृश्य होतो असा अंतिम हेतु कोणता? समाजाच्या विस्ताराचा हेतु काय? समाजदृढीकरणाची क्रिया म्हणजे काय? या प्रकारचे प्रश्न हिंदुसमाजाच्या भवितव्याच्या नियमनाच्या दृष्टीनें हातीं घेण्यापूर्वीं बरेंचसें तात्त्विक विवेचन करणें जरूर आहे. विवेचनसौकर्यासाठीं समाजदृढीकरणाची क्रिया प्रथम स्पष्ट करूं.