प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १४ वें.
सामाजिक दृढीकरण व समाजविस्तार या क्रियांचें जगद्विकासांत स्थान.

हिंदुत्वाचें भवितव्य.- हिंदुत्वाचा प्रसार होईल किंवा नाहीं? या प्रश्नाचें उत्तर देण्यापूर्वीं त्याला कांहीं तरी निश्चित अर्थ देणें जरूर आहे. वरील प्रश्नाचे अनेक अर्थ होऊं शकतात. एक अर्थ हिंदू कल्पनांचा प्रसार होईल काय, असा होऊं शकतो. दुसरा, हिंदुसमाजाबाहेरील लोक भविष्य काळीं या समाजांत येतील काय असा होऊं शकतो. वरील प्रश्न दोनहि अर्थीं घेऊन त्याला होकारार्थीं उत्तर देतां येईल. मात्र या उत्तरांतील कल्पना नीट लक्षांत याव्यात म्हणून या विधानाबरोबर समाजघटनाविषयक दोन शब्द सांगितले पाहिजेत. ‘ख्रैस्त्याचा प्रसार’ या शब्दसमुच्चयाचा जो अर्थ आपण घेतों, तसा अर्थ हिंदुत्वाचा प्रसार या शब्दांचा घ्यावयाचा नाहीं. ख्रैस्त्याचा प्रसार म्हणजे इतर जातींतून कांहीं लोक ख्रिस्ती संप्रदायांत घेऊन त्या संप्रदायाचा अनुयायी वर्ग वाढविणें होय. उलटपक्षीं, हिंदुत्वाचा प्रसार होणें याचा अर्थ असा आहे कीं, जे लोक हिंदुसंस्कृतीचें अंग बनले नाहींत अशा लोकांत हिंदुसंस्कृतीचा प्रसार करणें म्हणजे हिंदू व इतर यांमध्यें असें सादृश्य उत्पन्न करणें कीं, ज्या सादृश्यानें हिंदूंनां हे दुसरे लोक आपल्या जवळचे वाटावेत व त्याचप्रमाणें हिंदूंच्या सन्निध आलेल्या या लोकांनां हिंदू हे इतरांपेक्षां आपल्या जवळचे आहेत अशी जाणीव व्हावी. प्रत्यक्ष कार्य करावयाचें तें सादृश्य उत्पन्न करावयाचें कार्य होय. शास्त्रार्थाच्या दृष्टीनें जें कार्य करावयाचें तें निराळें आहे. तें कार्य म्हणजे धर्मशास्त्राची समाजनियामक तत्त्वें तपासून, परक्यांचा समावेश स्वजनांत कोणत्या नियमांच्या अनुषंगानें होईल तें ठरविण्याचें आहे.

हिंदुसमजाच्या स्वरूपाचें जें वर्णन वर आलेलें आहे त्यावरून आणि समाजस्थितिमूलक कल्पनांचें निरिक्षण केलें असतां त्यावरून हिंदूंची सामान्य सामाजिक कल्पना जी दिसते ती ही कीं, जगांतील सर्व जाती व कुळें मिळून एकच समाज असून त्या समाजाचे ब्राह्मण व दुसरे आर्य (म्हणजे थोर व चांगले लोक अर्थात् हिंदू) आणि म्लेच्छयवनादि बाह्य लोक हे घटक आहेत. बाह्य शब्दांत हिंदुस्थानांतील जंगली जाती व हिंदुस्थानाबाहेरील परकीय लोक यांचा अंतर्भाव होतो. या समाजवैविध्याच्या वर्णनांत जें तत्व लावलें आहे तें वस्तुस्थितीचें नसून चातुर्वर्ण्याचें आहे. यासाठीं वस्तुस्थितीची आणि तत्त्वाची जुळणी करून घेतली पाहिजे. समाजाची वस्तुस्थिति आणि त्याचें चातुर्वर्ण्यानें नियमन या दोन गोष्टींची संगति इतपत झाली आहे कीं, ब्राह्मण हा वर्ग निश्चित आहे व बाह्य हाहि वर्ग निश्चित आहे. मधला वर्ग पुष्कळ अंशीं अनिश्चित पद आहे. तथापि या वर्गांतील व्यक्तींची आपलें चातुर्व्यांत कांहीं तरी स्थान आहे अशी समजूत आहे आणि ब्राह्मणांस देखील ही गोष्ट देखील मान्य आहे. समाजाची ही घटना अथवा घटनाविषयक कल्पना लक्षांत घेतली असतां हें प्रथमच स्पष्ट होईल कीं, अहिंदूंनां हिंदू करणें याचा अर्थ परकीय कुलांनां चातुर्वर्ण्यांत स्थान देणें अथवा विशेषेंकरून त्यांनां आर्यत्वाची पदवी प्राप्त करून देणें इतकाच काय तो आहे. इच्छिलेल्या फेरफारांची चातुर्वर्ण्यतत्त्वांशीं जुळणी कशी करावयची हा कायद्याचा अथवा धर्मशास्त्रीय विचार एका बाजूस ठेवून प्रथम वस्तुस्थितीच्या दृष्टीनें इष्टस्थळीं कसें पोंचता येईल तें पाहूं.