प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १४ वें.
सामाजिक दृढीकरण व समाजविस्तार या क्रियांचें जगद्विकासांत स्थान.
पूर्वींचे समाजसुधारक.- पूर्वींचे समाजसुधारणेचे प्रयत्न व्यर्थ झाले याचें कारण तसा काळ आला नव्हता असें वर म्हटलें आहे, यावरून पूर्वींचे सर्व प्रयत्न सद्धेतुपूर्वक व सुयोजित होते असें म्हणतां येणार नाहीं. त्यांपैकीं बरेच असे नव्हते. धर्मसुधारक म्हणून म्हणविणार्यांपैकीं बहुतेक लोक सामाजिक सुधारणेच्या हेतूनें मुळींच प्रेरित झालेले नव्हते. त्यांपैकीं काहींचा ज्यांनां ‘ब्राह्मणांचें मौर्ख्य’ उघड करून दाखविण्याकरितां टपून बसलेल्या युरोपीय पंडितांनीं धर्मसुधारक असें म्हटलें आहे त्यांचा, या चळवळींत केवळ स्वतःपुढें धूप जाळून घेण्याच्या पलीकडे कोणताहि हेतु नव्हता. त्यांपैकीं कांहीं असत्यवादी व धूर्त होते आणि कांहीं परमार्थाच्या मार्गानें महत्त्व मिळविणाच्या व्यापारांत दांडगाई करूं पहाणारे गुंड होते. एखाद्या संप्रदायाच्या स्थापनेमध्यें यश येण्यास नेहमींच मोठीशी विद्वत्ता अथवा मनुष्यजातीचें भवितव्य सुधारण्याची उत्कट इच्छा किंवा उच्च सद्गुण लागतात असें नाहीं. बहुतेक प्रसंगीं अशा कामांत ज्या लोकांनां यश येतें त्यांच्या अंगीं बरेंचसें धार्ष्ट्य, अविनय, सन्मानाची हांव आणि लोकांस फसविण्याची म्हणजे चमत्कार करून दाखविण्याची शक्ति असते. कांही धार्मिक लोक व कांहीं ‘धर्मसुधारक’ आपल्या अनुयायांचीं मनें जगांतील नश्वर वस्तूंवर काढून टाकण्याचा प्रयत्न करीत. त्यांनां या पृथ्वीचें रूपांतर जर नरकांत झालें असतें तर आनंद झाला असता असें दिसतें. कारण, या स्थत्यंतरामुळें लोकांचीं मनें ऐहिक वस्तूंपासून आणि जगांतील सुखांपासून दूर होऊन त्यांच्या मतानें जें कांहीं उच्च व शाश्वत असें होतें तिकडे वळलीं असतीं. अशा तर्हेची विचारपद्धति असणार्या लोकांपासून सामाजिक हिताची अपेक्षा करणें जवळजवळ मूर्खपणाचें आहे.
ज्यांनां समाजघटनेंत खरोखरच कांहीं फेरफार करावयाचे होते असेहि कांहीं धार्मिक सुधारक वरील वर्गाखेरीज होते, परंतु त्यांनीं समाजांतील व्यंगें काढून टाकण्याच्या बाबतींत उत्तम वैद्य अथवा शस्त्रक्रिया करणार्या डॉक्टराच्या ऐवजीं वैदू किंवा न्हावीं यांचें काम केलें.
आपल्या रुचीला न आवडणारी अथवा आपल्या स्वाभिमानाला कमीपणा आणणारी अशी एक गोष्ट आपणांला कबूल केली पाहिजे ती ही कीं, आपल्या समाजाचें दृढीकरण करण्याच्या बाबतींत फार महत्त्वाचें असें काम एका परकीय सत्तेनें केलें आहे. या परकीयांनीं सर्व हिंदुस्थानाला एका बलिष्ठ सत्तेखालीं एकत्रित करून देशांतील निरनिराळ्या वंशांनां व राष्ट्रकांनां पारतंत्र्याच्या सामान्य जाणीवेनें आपआपसांतील वैर बाजूस ठेवण्यास शिकविलें आहे. त्यांनीं राजकीय सत्तेंत बहुतेक एकरूपता आणून आपणांस साहाय्य केलें एवढेंच नव्हे, तर त्यांनीं पाश्चात्त्य सुधारणेचीं फळें आमच्या दारांत आणून ठेवलीं. त्यांनीं हिंदुस्थानांतील सर्व लोकांस एकत्र जमण्यास व परस्परांची ओळख करून घेण्यास शिकविलें. या परकीयांच्या प्रतिनिधींनीं केलेल्या गैरमुत्सद्दीपणाच्या कृत्याबद्दल सर्व लोकांस वाटणारा त्वेष आपणांस एकत्र आणतो. याखेरीज यूरोपीयन राष्ट्रांची स्पष्ट उदाहरणें डोळ्यापुढें ठेऊन आपणांस जातिभेद मोडणें म्हणजे काय याची यथार्थ कल्पना येऊं लागली आहे. हें यूरोपियन राष्ट्रांचें निरीक्षण आपणांस या परकीयांमुळेंच सुकर झालें आहे. आपण जर पूर्वींच्या काळाकडे थोडी नजर दिली तर आपणांस असें दिसून येईल कीं, जातिभेद मोडावा म्हणून ओरड करणार्या लोकांनां जातिभेद मोडणें म्हणजे काय याची यथार्थ कल्पनाच नव्हती. पुष्कळ लोकांनां जातिभेद मोडणें याचा अर्थ ब्राह्मणांचें वर्चस्व नाहींसें करणें असाच वाटे आणि ब्राह्मणांचें वर्चस्व ही तर जातिभेदांतील सर्वांत निरुपद्रवी गोष्ट आहे.
या वरील एकंदर विवेचनावरून आपणांस काय दिसून येतें ? प्रथम हें विवेचन आपणांस आशावादी बनण्यास बरेंसचें सबळ कारण देतें. जातिभेद मोडणें हें कांहीं एकंदरींत मनुष्याच्या शक्तीच्या पलीकडील काम नाहीं असें आपणांस वाटूं लागतें. पूर्वींच्या सुधारकांस यश आलें नाहीं याचें कारण त्यांची पद्धति चुकीची होती आणि त्या वेळीं योग्य समय प्राप्त झाला नव्हता हें होय. या गोष्टींचें ज्ञान होण्यानेंच आपणांला अशी आशा करण्यास आधार मिळतो कीं, आपल्या प्रयत्नास यश येण्याचा पुष्कळच संभव आहे; मात्र आपण पूर्वींच्या गौतमापासून राममोहनरायापर्यंत होऊन गेलेल्या लोकांनीं केलेल्या घोडचुका करतां कामा नये. अर्थात् या कामाला उच्च दर्जाचा स्वार्थत्याग, बंधुत्वाची व्यापक कल्पना यांची आणि यापुढें उत्पन्न होणार्या सामाजिक शास्त्रांच्या धोरणानें अनेक तर्हेचे प्रयत्न बर्याच मोठ्या प्रमाणावर करण्याची आवश्यकता आहे.
जातिभेद मोडणें म्हणजे हिंदुत्वाचा उच्छेद करणें नाहीं. जातिभेद मोडण्याचा अथवा समाजदृढीकरणाचा प्रश्न म्हणजे समाज अनेक क्रिया करण्यास समर्थ करण्याचा प्रश्न होय. हें सामर्थ्य हिंदुस्थानच्या समाजांत हिंदुत्वाच्या उच्छेदानें नव्हे तर त्याच्या प्रसारानेंच येणारें असल्यानें आतां हिंदुत्वाच्या भवितव्याकडे वळणें इष्ट आहे.