प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १४ वें.
सामाजिक दृढीकरण व समाजविस्तार या क्रियांचें जगद्विकासांत स्थान.
प्रादेशिक समाज कसा बनतो? - जातिस्वरूपी समाजाला प्रादेशिक समाजाचें स्वरूप कसें येतें हें समजण्यासाठीं आपण एक भटकणारी जात घेऊं. या भटक्या लोकांचा एक नायक आहे, त्यांत उच्च समजला जाणारा एक वर्ग आहे आणि त्यांनां बंधनकारक असे जे कायदे आहेत ते त्यांच्या जुन्या रूढीच आहेत असें आपण समजूं. यानंतर ही भटकी जात एका प्रदेशांत बरेच दिवस टिकून राहिली व तेथें थोडाफार स्थिर असा जीवनक्रम पतकरून शेतकी व दुसरे कांहीं उद्योगधंदे यांत मन घालून तिनें त्यांची थोडीफार वाढ केली असें आपण समजूं. सदरील जातीच्या राहणींत अशा तर्हेचा फरक झाल्यानें त्या जातीच्या इतर व्यवस्थेंत काय फरक होतील ते पहा. एक फरक असा होण्याचा संभव आहे कीं, परकी जातींतला मनुष्य आपल्या जातींत घेण्याचें काम तिला सोपें होईल. जात भटक्या स्वरूपाची असतांना परकी लोक तिच्यांत येण्याचें अगदींच असंभवनीय नसलें तरी फार थोड्या प्रमाणांत तें संभवनीय असते. असें कित्येकदां होतें कीं, भटक्या जातींत तिच्याशीं विरोध असलेल्या जातींतून कांहीं लोक पळून येऊन मिसळतात; तसेंच इतर जातींतील मुलें पळवून आणून किंवा मोठीं माणसें गुलाम करून आणून तीं आपल्या जातींत कायम करून टाकण्याचें कामहि भटक्या जाती करितात. या रीतीनें त्यांच्यांत परकीयांचा समावेश होतो. {kosh कैकाडी नांवाच्या जातींत पूर्वीं कर्हाडा ब्राह्मण असलेला महाजनी आडनांवाचा एक मुलगा शिरून तो पूर्ण कैकाडी व त्यांचा पुढारी बनला असें एक पोलिसाचे अधिकारी कळवितात.}*{/kosh} परंतु आपलें भटकणें सोडून या जाती एखाद्या प्रदेशांत लहानमोठ्या गांवांतून स्थिरपणें राहूं लागल्या म्हणजे त्यांच्या ज्या जातीच्या वहिवाटी व कायदे असतात त्यांनां हळूहळू प्रादेशिक कायद्यांचें व वहिवाटींचें स्वरूप येतें. त्या जातीचा जो नायक असेल तो त्या प्रदेशाचा राजा होतो. तो परकीयांकडून कर घेतो आणि त्यांचें संरक्षण करितो. हीं परकीं माणसें त्या देशांतील लोकांत लग्ने करितात व त्यांच्या देशी कायद्याप्रमाणें वागून तेथील देश्य समाजाशीं एकरूप होऊन जातात.
या परकीय लोकांनां पुष्कळ वेळां अनेक तर्हेच्या अपात्रतेचा डाग मारला जातो. कांहीं नागरिकी हक्क त्यांनां देण्याचें नाकरिलें जातें. त्यांचें सामाजिक जीवन दुर्लक्षिलें जातें. आपल्या सामाजिक गोष्टी परकीय लोकांनीं आपल्या मर्जीप्रमाणें चालवाव्या, विवाह, वारसा, मृत्युपत्र, इत्यादि बाबतींत त्यांच्या रूढी असतील त्यांप्रमाणें त्यांनीं वागावें अशा तर्हेची जेथें व्यवस्था असेल परंतु समाजामध्यें बरेवाइट नियम करण्यास कोणीच अधिकारी नाहीं असें असेल तर त्या समाजाचें जातिस्वरूप पुष्कळच संरक्षिलें जातें. विजातीय म्हणून त्यांकरितां सरकारनें कायदा करावयाचा नाहीं, आणि त्यांच्यामध्यें कायदे करण्यास अधिकारीच नाहीं ही स्थिति समाजास जुन्या नियमांनीं गच्च बांधणारी आणि समाजाची प्रगति बंद करणारी आहे. उलट पक्षीं रोमन लोकांमध्यें जातींचा (Jus Gentium) म्हणून जो कायदा निर्माण झाला त्या कायद्याच्या निर्माणपद्धतीप्रमाणें जेथें परकी जातींच्या कांहीं रूढी निवडून घेऊन त्या निवडक रूढींचाच अंमल प्रथमतः त्या परकी लोकांत करावयाचा, अशा रीतीनें त्या देशांतील परकी लोकांसाठीं नवे कायदे निर्माण होतात त्या देशांतील परकी लोकांसाठीं नवे कायदे निर्माण होतात त्या देशांतील तत्रत्य समाजाशीं देशांत आलेले परकीय लोक थोडेबहुत दृढतेनें बद्ध होतात. या परकीय लोकांकरितां तयार केलेले नवे कायदे बंधनकारक म्हणून देश्यांनींहि मान्य केल्यास परकी व देशी लोकांतील अंतर आणखी कमी होतें. पुढें परीयांची सामाजिक अपात्रता सर्वस्वी दूर केली गेली म्हणजे त्यांनां पूर्वीं खालची जात म्हणून जे लेखिलें जात असतें तें तसें लेखणें नाहींसें होतें.