प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १४ वें.
सामाजिक दृढीकरण व समाजविस्तार या क्रियांचें जगद्विकासांत स्थान.

पूर्ण दृढीकरणाचा समाज.- ज्याचें पूर्णत्वानें दृढीकरण झालें आहे असा समाज आढळणें अशक्य आहे. बहुतेक प्रचलित समाजांमध्यें कोणतीना कोणती उणीव आढळून येते. लहान लहान समुच्चय एकत्र होऊन त्यांचा मोठा समुच्चय होण्याची क्रिया सतत चालू असल्यामुळें कोणत्याहि एका समजाचें पूर्ण दृढीकरण होण्यास अवकाशच मिळत नाहीं. ज्या समाजामध्यें निरनिराळ्या व परस्परविरूद्ध अशा दृढीकरणाच्या क्रिया त्या समाजांतील व्यक्तींच्या दुर्भाग्यामुळें चालू असतील त्यांच्या दृढीकरणामध्यें अधिकच अडचणी उत्पन्न होतात. असो. आजची दृढीकरणाची स्थिति पाहिली तर असें दिसतें कीं, एका वंशांतील लोकांनीं आपली राजकीय सत्ता दुसर्‍या एका अगदींच भिन्न भाषा बोलणार्‍या, भिन्न चालीरीतींच्या व भिन्न संस्कृतीच्या लोकांवर प्रस्थापित केली आहे आणि एकच भाषा बोलणारे व सारख्याच चालीरीती असणारे लोक निरनिराळ्या सत्तांखालीं गेले आहेत. तसेंच वंश, चालीरीती व आचार हे ज्यांचे एकमेकांपासून अगदीं विसदृश आहेत असे लोक एकाच संप्रदायाचे अनुयायी झाले आहेत आणि अनेक बाबतींत सदृश असणारे लोक भिन्न संप्रदायांत गेले आहेत, किंवा एकाच राज्यामध्यें अनेक संप्रदाय प्रचलित आहेत.

जरी पूर्णत्वानें दृढीकरण झालेला समाज सांपडणें अशक्य आहे तरी अशा समाजाचीं कांहीं लक्षणें आपणांस सांगता येतील.

ज्या समाजामध्यें दृढीकरणाची क्रिया पूर्ण झाली आहे त्या समाजाचे घटक असणारे निरनिराळ्या वंशांतील लोक रक्तानें, चालीरीतींनीं व संस्कृतीनें एकमेकांशीं पूर्णपणें मिसळून गेले पाहिजेत. अशा समाजांत पूर्वींची वंशविषयक कल्पना पूर्णपणें मावळून तिच्या जागीं या संयुक्त समाजाची कल्पना स्थापित झाली पाहिजे. सदरील वंशविषयक कल्पनेची जाणीव पूर्णपणें बुजून गेली असली पाहिजे, नाहीं तर ती प्रेम अथवा द्वेष उत्पन्न करण्यास कारणीभूत होईल.

जेव्हा निरनिराळ्या संस्कृतींचें ऐक्य होईल तेव्हां पूर्वींची श्रमविभागणी नाहींशी होऊन तिच्या जागीं नवीन श्रमविभागाचीं तत्त्वें येतील. ऐक्यापूर्वींचा जातींचा आयुष्यक्रम, चालीरीती व वागणूक भिन्न असल्यामुळें त्यांच्या गरजाहि भिन्न असतील. त्या गरजा पुरविणारे लोकहि भिन्न असतील. उदाहरणार्थ, दोन परस्परांपासून भिन्न असणार्‍या जातींचा शिंप्यांचा वर्गहि निरनिराळा असतो. कधीं कधीं एका जातींत खप होणार्‍या वस्तूंचा दुसर्‍या जातींत खप होत नाहीं. अशा स्थितींत त्या वस्तू तयार करणार्‍या लोकांचा संबंध एका जातीशीं येईल, दुसर्‍या जातीशीं येणार नाहीं. परंतु संस्कृतींचें ऐक्य झालें म्हणजे या जातींच्या वंशजांचा आयुष्यक्रम सारखाच होईल आणि त्यामुळें श्रमविभागणीची पुर्नघटना करावी लागेल.

संस्कृतींच्या ऐक्याचा दुसरा एक परिणाम म्हटला म्हणजे समाजांतील उच्च वर्ग एकच असणें हा होय. जेव्हां समाजांतील एक विभाग एका विशिष्ट वर्गाला श्रेष्ठपणा देतो व दुसरा विभाग तो मान्य करीत नाहीं किंवा उलट एका घटकाच्या सत्ताधार्‍यास अथवा समाजधुरीणास दुसरा एखादा घटक विधर्मी किंवा समाजबाह्य समजतो तेव्हां अशा समाजामध्यें एकाच वर्गाकडे सामाजिक श्रेष्ठत्व येणार नाहीं. राजकीय सत्ताधारी वर्गच समाजधुरीण असला पाहिजे असें नाहीं. एखाद्या पूर्ण दृढीकरण झालेल्या समाजामध्यें सत्ताधारी वर्गापासून समाजधुरीण वर्ग भिन्न असूं शकेल. त्याच्या धुरीणत्वाच्या अधिकारास व पदवीस त्या सत्तेखालीं असलेल्या सर्व लोकांकडून अनुमति असली म्हणजे झालें.