प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १४ वें.
सामाजिक दृढीकरण व समाजविस्तार या क्रियांचें जगद्विकासांत स्थान.
दृढीकरणास प्रत्यवाय.- याप्रमाणें समाजाचें पूर्णपणें दृढीकरण होण्यास जनतेमध्यें निरनिराळे भेद असणें हानिकारक आहे. अशा तर्हेचे मुख्य भेद पुढें दिले आहेत.
१. लोकांच्या उपासनापद्धती, दैवतें व परंपरागत चालत आलेले विचार यांमध्यें पूर्वींच्या विशिष्ट जातींच्या संस्कृतींचे अवशेष म्हणून राहिलेले फरक.
२. लोकांच्या भाषांत असणारे फरकहि त्यांनां एकमेकांपासून दूर ठेवण्यास व समाजविघट्टन करण्यास कारणीभूत होतात.
३. चालीरीती, पोषाख, उपभोग्य वस्तू आणि मनावर झालेले संस्कार-जे पूर्वींच्या जातिविशिष्ट संस्कृतींतून आले असल्यामुळें आनुवंशिक झाले असतील ते-समाजास विघातक होतात.