प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १४ वें.
सामाजिक दृढीकरण व समाजविस्तार या क्रियांचें जगद्विकासांत स्थान.
संप्रदायांची आवश्यकता - यापुढें राष्ट्रीकरणाचा विकास होऊन संप्रदाय नष्ट होणार. प्रस्तुत भविष्यात्मक विधान जेव्हा आम्ही करतों तेव्हां समाजाला संप्रदायांची आवश्यकता आहे काय असा एक प्रश्न विचारण्यांत येतो; या प्रश्नाला स्पष्टपणें उत्तर द्यावयाचें म्हणजे नकरार्थीं देतां येईल. परंतु या उत्तरामुळें गैरसमज होऊं नये म्हणून कांहीं स्पष्टीकरण दिलें पाहिजे.
संप्रदायांनीं आजपर्यंत जीं नैतिक तत्त्वें उपदेशिलीं त्यांनीं आपलें काम केलेलें आहे. त्यांनीं जगांतील नैतिक विचाराचा पाया घातला आहे. या बाबतींत त्यांनीं केलेलें कार्य कायम राहील आणि त्याचा समाजाला मार्ग दाखविण्याच्या कामीं उपयोग होत राहील. स्वर्ग, नरक, निर्वाण, यांसारख्या कल्पनाहि कायम राहतील आणि त्यांचा सामान्य लोकांस थोडासा उपयोगहि होईल. सर्व लोकांमध्यें सामान्य असणार्या कांहीं अद्भुत कल्पनाहि कायम राहतील व त्यांचाहि उपयोग आहे. समाजाला अनवश्यक असा जो भाग आहे तो एखाद्या विशिष्ट ग्रंथांतील कल्पनांवर श्रद्धा ठेवून आपलें पृथक् सामाजिक अस्तित्व ठेवणें हा होय. हा भाग म्हणजेच संप्रदायघटना व म्हणूनच संप्रदायाच्या म्हणजे घटनेच्या नाशानें समाजाचें यापुढें नुकसान होणार नाहीं असें आम्ही म्हणतों.
हिंदुसमाज हा अनेक जाती एकत्र मिळून झालेला व परंपरागत विचारांनीं चालत आलेला समाज होय. यामध्यें आणि ख्रिस्ती व महंमदी यांसारख्या शास्त्रग्रंथप्रधान समाजांमध्यें बराच फरक आहे. ब्रिटिश राज्यघटना म्हणून जिला म्हणतात त्या परंपरागत राज्यपद्धतीमध्यें आणि संयुक्त संस्थानांच्या पूर्वलिखितानें चालणार्या घटनेमध्यें जितकें अंतर आहे तितकेंच वरील दोन प्रकारच्या समाजांमध्यें आहे. परंपरागत कल्पनांप्रमाणें चालणार्या समाजामध्यें एक पिढी पूर्वींपासून चालत आलेल्या चालीरीतींचा व कल्पनांचा स्वीकार करून त्यांमध्यें आपल्या सोयीनें कांहीं फेरफार करिते व या बदललेल्या स्वरूपांत ती त्या कल्पना व चालीरीती पुढच्या पिढीस देते. निरनिराळ्या जाती एकत्र येऊन एका ठिकाणीं मिसळतात, आपल्या परंपरागत समजुतींची देवघेव करितात आणि याप्रमाणें एक सामान्य अशी परंपरा उत्पन्न करितात.
एखाद्या संप्रदायामध्यें, उपासकसंघामध्यें, गुप्तमंडळामध्यें, किंवा पवित्र द्विजवर्गामध्यें समावेश होण्याकरितां कांहीं संस्कार करावे लागत असतील, परंतु कोणत्याहि व्यक्तीला अगर संघाला परंपरेमध्यें समावेश करून घेण्यास कोणताहि संस्कार करावा लागत नाहीं. परकीय परंपरेचा स्वीकार करण्याची क्रिया फार सावकाश किंवा नकळत चालू असते. कनिष्ठ संस्कृतीच्या जातींनीं हिंदु संस्कृतीचा स्वीकार अशाच तर्हेनें केला आहे. जेव्हां ब्राह्मण आणि ब्राह्मणानुयायी हिंदु आपल्या परंपरेचा प्रसार करीत होते तेव्हां ते आपल्यापेक्षां संस्कृतीनें कनिष्ठ असलेल्या जातीच्या कल्पनांचा आणि संस्कृतींचा स्वीकारहि करीत होते.