प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १४ वें.
सामाजिक दृढीकरण व समाजविस्तार या क्रियांचें जगद्विकासांत स्थान.
समाजदृढीकरण - समाजाचा विस्तार झाला म्हणजे त्याचें दृढिकरण करण्याची आवश्यकता उत्पन्न होते, आणि समाजाचें दृढीकरण झालें म्हणजे समाज आणखी विस्तारक्षम होतो असा विस्तार व दृढीकरण या दोन कार्यांचा संबंध आहे. समाजदृढीकरण आणि समाजविस्तार यांचीं तत्त्वें समजलीं म्हणजे पुष्कळ प्रकारच्या कार्यांची युक्तायुक्तता तपासण्यास आपण समर्थ होऊं.
समाजाच्या निरनिराळ्या स्थितींत समाजदृढीकरणाचें कार्य अव्याहत चालू असतें. प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र यांचा विषय जे जीव त्यांच्या सादृश्याच्या दृष्टीनें आणि सदृशांत महत्त्व आणि सावयवत्त्व यांच्या दृष्टीनें बनविलेल्या परंपरा तपासल्या असतां आणि सामाजिक घटना अवलोकिल्या असतां ही दृढीकरणाची क्रिया त्या ठिकाणीं चालू दिसते. सामाजिक घटनेबद्दल कित्येक विशेष गोष्टी हर्बर्ट स्पेन्सर यानें लोकांच्या नजरेस आणल्या आहेत. तो म्हणतो, वैयक्तिक घटना आणि सामाजिक घटना यांमध्यें सामान्य असे चार धर्म आहेत.
१. घटनेचा आरंभ भ्रूणत्वापासून किंवा अतिशय लहान पुंजक्यांपासून होऊन त्यांची वाढ नकळत होत जाते. कांहींचा आकार वाढून मूळच्या आकाराच्या दहा हजारपट होतो .
२. या पुंजक्यांची रचा आरंभीं इतकी साधी असते कीं, त्यांनां कांहीं अवयवयुक्तता असेल असें वाटत नाहीं. परंतु ते जसजसे वाढत जातात तसतशी त्यांची रचना जास्त गुंतागुंतीची होत जाते.
३. आरंभीं जेव्हां त्यांची वाढ अर्धवट झालेली असते, तेव्हां त्यांच्या घटकांमध्यें परस्परावलंबित्व फारच थोडें असतें. तें हळूहळू वाढत जाऊन पुढें इतकें पूर्णतेस येतें कीं, प्रत्येक घटकाचें जीवित अथवा चलनवनल हें सर्वस्वीं दुसर्या घटकाच्या जीवितावर व चलनवलनावर अवलंबून राहतें.
४. समाजाचें आयुष्य हें त्यांतील घटकांच्या आयुष्यावर अवलंबून नसून बरेंच दीर्घ कालीन असतें. प्रत्येक घटक हा स्वतंत्रपणें जन्मतो, वाढतो, कार्य करतो, उत्पादन करतो आणि मरून जातो. परंतु या घटकांचा झालेला समूह पिढ्यानपिढ्या जगतो. त्याची आकारामध्यें, रचनेच्या पूर्णतेमध्यें आणि क्रिया करणाच्या शक्तीमध्यें सारखी वाढ होत असते.
वर दिलेल्या चार गोष्टींपैकीं तिसर्या गोष्टीकडे आपणांस विशेष लक्ष दिलें पाहिजे. समाजदृढीकरणाचें मर्म याच गोष्टींत असल्यामुळें तिचें विस्तृत विवेचन करणें अवश्य आहे.
जेव्हां अनेक लहानलहान सामाजिक घटक एक मोठा एकरूपी समाज बनविण्याकरतां एकत्र येतात, तेव्हां या निरनिराळ्या घटकांमध्यें एक नवीन रचना करण्याच्या हेतूनें जी अंतःक्रिया होते तिला दृढीकरण असें म्हणतात. जे निरनिराळे समाज अशा दृष्टीनें एक होतात त्यांनां नेहमींच दृढीकरणाच्या बाबतींत यश येतें असें नाहीं. व्यक्तीवरील जातीचें बंधन तोडून टाकून तिला राष्ट्राच्या समूहामध्यें प्रत्यक्ष सामील करण्याकरितां बरेच श्रम करावे लागतात. अनेक जाती एका ठिकाणीं मिळून त्यांची एक मोठी एकस्वरूपी जात किंवा एक राष्ट्र होण्यापूर्वीं त्या जातींनां अनेक स्थितींतून जावें लागतें. या स्थित्यंतरांतील पायर्या जगांतील अनेक निरनिराळ्या लोकांचें निरीक्षण केलें असतां सहज नजरेस येतील. या पायर्यांचीं, जातिभेद, साम्राज्यें आणि वंशपरंपरागत वर्गभेद हीं उदाहरणें होत. आधुनिक जगांत या पायर्यांचें अस्तित्व समाजाच्या दृढीकरणाची क्रिया अपूर्ण राहिली आहे अशी साक्ष देतें.
जो समाज विविध राष्ट्रें एक प्रदेशांत आल्यामुळें बनला असेल त्याच्या घटकांच्या एक प्रकरचा उच्चनीच भाव उत्पन्न होतो, आणि या निरनिराळ्या घटकांत राष्ट्रमर्यादेचें वैवाहिक बाबतींत अतिक्रमण झालें नाहीं म्हणजे जातिभेद उत्पन्न होतो.
जेव्हां अनेक जाती अगर राष्ट्रें एका राजकीय सत्तेखालीं येतात आणि ती राजसत्ता या निरनिराळ्या भाषा बोलणार्या व निरनिराळे संप्रदाय मानणार्या जातींनां एकच सामाजिक संघांत आणण्यास अपुरी पडते तेव्हां त्या सामाजिक रचनेस साम्राज्य असें म्हणतां येईल.
केव्हां केव्हां साम्रज्यांतील सत्ताधारी जात स्वसमाजामध्यें परजनप्रवेशास विरोध करीत नाहीं. अशा प्रसंगीं या जातीचा आनुवंशिक वर्ग बनतो.
जेव्हां अशा निरनिराळ्या जातींनां सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टीनें एकाच दर्ज्यावर आणलें जातें, तेव्हां त्यांची एकच जात बनणें शक्य होऊं लागतें. अशा वेळीं त्यांचें दृढीकरण होण्यास सुरुवात झाली असें म्हणतां येईल.
जीविशास्त्रामध्यें ज्या क्रियेमुळें गुंतागुंतीचा रचना असणारा अवयवी साध्या रचनेचा परंतु चिरकालीन असा होतो त्या क्रियेस दृढीकरण असें म्हणतात. समाजशास्त्रामध्यें हा शब्द याच अर्थानें वापरतां येईल. हा शब्द वास्तविक कोणत्याहि एका विशिष्ट शास्त्रांतला नसून उत्क्रांतीविषयक सामान्य तत्त्वज्ञानांतील आहे. सामाजिक उत्क्रांतीमध्यें दृढीकरणाची क्रिया म्हणजे निरनिराळ्या जातींच्या समुच्चयापासून एकरूपी जात उत्पन्न होणें ही होय, निरनिराळ्या जातींचा भाषा, संस्कृती, पोषाख, आचार, हे निरनिराळे असतां त्यांचें एकीकरण करणें म्हणजेच दृढीकरण होय. या दृढीकरणास अनेक गोष्टी उपकारक होतात.
राजकीय सत्तेची स्थापना, अनेक राष्ट्रांचे संघ बनणें, संप्रदायाचा प्रसार, एक मोठा समाज बनवावा ही इच्छा व दळणवळण वाढल्यामुळें संस्कृतींत उत्पन्न झालेला सारखेपणा, निरनिराळ्या जातींमध्यें अथवा वर्गांमध्यें मिश्र विवाहाची वाढ, एक भाषा होणें, जाती, वंश, अथवा राष्ट्रें यांच्या जीवनाची सांपत्तिक पुनर्घटना, या सर्वांमुळें सामाजिक दृढीकरणास मदत होते. सामाजिक दृढीकरणास साह्यभूत होणार्या सर्व क्रियांची यादी देतां येणार नाहीं. त्याप्रमाणेंच वर दिलेल्या सर्व गोष्टींचीं सर्व कार्यें विस्तृतपणें देणें हेंहि शक्य नाहीं. तथापि एक दोन गोष्टींचा येथें विचार करूं.
सामाजिक दृढीकरणाचीं अंगें पुढें दिल्याप्रमाणें आहेत. प्रथमतः ज्यांचें दृढीकरण करून नवीन समाज बनवावयाचा आहे असे निरनिराळे मनुष्यसमूह पाहिजेत. दुसरें, त्यांचें दृढीकरण होण्यास पोषक अशा गोष्टी व कारणें पाहिजेत. दोन अथवा अधिक मूलतः भिन्न अशा समूहांनीं आपलें पृथक्त्व सोडून एक समाजांत येण्यास कांहीं तरी निश्चित असें कारण पाहिजे. सामान्यतः दोन अथवा अधिक समाज एकत्र येऊन त्यांचें एका समाजांत दृढीकरण होणें हें सावकाश व बहुतेक नाखुषीनेंच होतें. बहुतकरून एखाद्या संघाच्या राजकीय सत्तेची वृद्धि अथवा एखाद्या सामान्य शत्रूविरुद्ध राजकीय सत्तांचें संघीकरण या गोष्टी एक मोठा समाज बनण्याच्या क्रियेचा पाया घालतात. प्रसणरशील संप्रदाय आणि संस्कृती याहि कांहीं प्रसंगीं हें कार्य करतात. अशा तर्हेनें दृढीकरणास प्रारंभ झाल्यानंतर त्या कार्यास मदत करणार्या गोष्टी पुष्कळच असतात.
जुने समुच्चय नष्ट करून नव्या एकच आणि एकरूप अशा समुच्चयाची घटना करणें फार कठिण काम आहे. अशा कार्यांत कमीअधिक यश येणें हें कार्याच्या विस्तारावर अवलंबून असतें. जर एकत्र आणावयाचे दोन समुच्चय एकच भाषा बोलणारे, एकाच पारमार्थिक परंपरेंतील अथवा एकाच वंशांतील असले तर हें काम बरेंच सोपें जातें; परंतु ते जर या सर्व बाबतींत भिन्न असतील तर हें कार्य बरेंच कठिण होतें.
जगांतील निरनिराळ्या लोकांचें दूरीकरण होणें व त्यांच्यांतील फरक वाढत जाणें या क्रिया आतां बहुतेक बंद झाल्या आहेत. जगामध्यें एकत्व उत्पन्न होण्याची क्रिया आतां सुरू झाली आहे. अमेरिकेचा यूरोपीयांस लागलेला शोध व यूरोपमधून हिंदुस्थानास जाण्याकरितां लागणार्या समुद्रमार्गाचें त्यांस झालेलें ज्ञान या एकत्वोत्पादन क्रियेंतील दोन महत्त्वाच्या पायर्या होत. सध्यांच्या युगांत देशादेशामध्यें दळणवळण वाढणें, सांस्कृतिक गोष्टींची अदलाबदल होणें, आणि मिश्रविवाह होणें या गोष्टी सामान्य होत चालल्या आहेत. सर्व जगाची प्रवृत्ति सारख्याच विचारांकडे, आचारांकडे व चालीरीतींकडे, अर्थात् थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे एकाच संस्कृतीकडे होऊं लागली आहे.
या एकीकरणाच्या क्रियेमध्यें प्रमुखत्व कोणत्या गोष्टीकडे यावयाचें हें काल व स्थल यांवर अवलंबून असतें. कांहीं देशांमध्यें संप्रदायप्रसारानें बरेंच कार्य केलें, तर कांहीं देशांमध्यें परराष्ट्रीय सत्तेनें हें कार्य बजावलें. राजकीय सत्तेचा विजय आणि सांप्रदायिक सत्तेचा विजय हीं दोन महत्त्वाचीं कारणें आहेत. पण यांखेरीज आणखींहि कारणें आहेत. राजकीय सत्तेच्या विजयामुळें निरनिराळ्या राजकीय सत्तांखालीं असलेले समूह एका सत्तेखालीं येतात, पण त्यामुळें नेहमींच समाजदृढीकरण होतें असें नाहीं. कित्येक वेळां एकाच सत्तेखालीं आणलेल्या निरनिराळ्या समूहांचें राष्ट्रीकरण करण्याच्या कामांत त्या सत्तेस यश येत नाहीं. तरी पण राजकीय वर्चस्वाची या क्रियेस मदत होते एवढें खरें. या गोष्टी कशा होतात तें आपण पाहूं.