प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १४ वें.
सामाजिक दृढीकरण व समाजविस्तार या क्रियांचें जगद्विकासांत स्थान.
सात्मीकरण. - सात्मीकरण म्हणजे परकीय लोकांस आपणांसारखे करणें आणि स्वकीयांचीं मनें परकीय लोकांचा स्वसमाजांत स्वीकार करण्यास तयार करणें. या गोष्टीला दोन्हीहि बाजूंकजून तयारी करावी लागते. या गोष्टीचें स्वकीय व परकीय या दोघांसहि शिक्षण द्यावें लागतें. जर परकीय लोक देश्य लोकांसारखे सहज बनण्यासारखे असतील तर देश्य लोकांत त्यांच्या संबंधानें परकीयभाव बराचसा कमी राहील. उलट पक्षीं, सत्ताधारी देश्य समाज आपलें सभासदत्व व तत्संबंधीं सामाजिक आणि राजकीय हक्क परकीयांस देण्यास तयार असेल तर परकीय मनुष्यांस देश्य लोकांची राहणी व त्यांचे आचारविचार यांचा स्वीकार करण्याची जास्त प्रवृत्ति होते. सात्मीकरणाची शक्ति जितकी वाढत जाते तितका देश्य व परकीय यांजमधील विरोध कमी होत जातो.
परदेशगमन जर विशेष सुलभ होत जाईल तर या प्रदेश विशिष्ट समाजपद्धतीचा शेवटीं एक परिणाम हा होईल कीं, मनुष्याची प्रवृत्ति अधिकाअधिक व्यक्तिहितवादी होत जाईल; तो कोणत्याहि देशांत जन्मला असला तरी जन्मभूमिविषयक विचार बाजूस ठेवून आपण कोणत्या समाजाचें घटक व्हावें हें ठरविणें त्याला शक्य होईल; तो ज्या प्रदेशांत राहत असेल त्या प्रदेशांतील समाजाशीं त्याला एकरूप होतां येईल. त्याचप्रमाणें सर्व जगांतील मनुष्यांमध्यें एक प्रकारचें साम्य उत्पन्न होईल आणि त्यामुळें एका समाजांत जन्मलेल्या मनुष्यास जगांतील दुसर्या कोणत्याहि समाजांतील संस्कृतीचा स्वीकार करणें सुलभ होईल. लोकांतील शारीरिक फरकहि कमी होत जातील अगर त्यांचें महत्त्व तरी कमी होत जाईल. तसेंच निरनिरळ्या राष्ट्रांतील, संप्रदायांतील अथवा वंशांतील लोकांमध्यें परस्परविवाह होऊं लागतील आणि त्यामुळें जगांतील निरनिराळ्या लोकांचे सामाजिक संबंध बरेचसे कमी गुंतागुंतीचे होतील.