प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १४ वें.
सामाजिक दृढीकरण व समाजविस्तार या क्रियांचें जगद्विकासांत स्थान.
समाजांतील भेद. - सर्व मनुष्यजातीची उत्पत्ति एकाच मूळापासून झालेली आहे असें प्रतिपादन करणार्या तत्त्ववेत्त्यांस हे एकाच ठिकाणाहून उत्पन्न झालेले निरनिराळे लोक आतां एकमेकांत मिसळून जाण्यास नाखुष असतात या गोष्टीचें आश्चर्य वाटतें. परंतु वास्तविक यांत आश्चर्य करण्यासारखें कांहींच नाहीं. कोणतेहि लोक घेतले तरी ते आपल्या शेजारच्या लोकांहून फारसे भिन्न नसतात. आपण जर ऑस्ट्रेलियापासून आरंभ करून उत्तरेच्या बाजूनें हिंदी महासागरांतील निरनिराळ्या बेटांतील लोकांचें निरिक्षण करीत करीत सयाम, चीन, जपान कामश्चाटका इत्यादि ठिकाणीं गेलों व तेथून अमेरिकेकडे वळलों, किंवा सिलोनपासून आरंभ करून उत्तरेकडे काश्मीरपर्यंत जाऊन नंतर यूरोपकडे गेलों तर आपणांस असें आढळून येईल कीं, कोणत्या विशिष्ट रेषेपासून एका जातीचे लोक संपून दुसर्या जातीचे लागले हें सांगणें फार कठिण आहे. आपणांला लोकांच्या पोषाखांत, चालीरीतींत व वागणुकींत अंतराप्रमाणें हळूहळू फरक होत गेलेला सर्वत्र दिसेल. कोणत्याहि एका ठिकाणचे लोक त्यांच्या अलीकडच्या लोकांसारखेच जवळजवळ दिसतील व त्यांच्या पलीकडील लोक जवळजवळ त्यांच्या सारखे दिसतील. मात्र आपण दोन टोंकांकडील लोकांची तुलना केली तर आपणांस पुष्कळ फरक आढळून येईल. समतेचें तत्त्व बोलत असणार्या अमेरिकन लोकांमध्येंहि उच्चनीचभावनात्मक जातिसमुच्चयामध्यें सोपानपरंपरा तयार झाली आहे. मात्र ही परंपरा लावण्यामध्यें व निरनिराळ्या जातींचा समाजांतील दर्जा ठरविण्याच्या कामीं त्या जातीच्या मूलस्थानाचें अतलांतिक महासागरापासूनचें अंतर लक्षांत घेतलें जातें. जातिपंरपरा उत्पन्न होण्याचें कारण शोधण्यास आपणांस फार दूर जावयास नको. प्रगतीच्या प्रथमावस्थेंत मनुष्यांचें स्थलांतर फार सावकाश होत असे व त्यामुळें त्यांच्यामध्यें फरकहि फार थोडा पडत असे, परंतु हा फरक जरी जवळजवळच्या लोकांत फारसा नसला तरी बर्याच अंतरावर राहणार्या लोकांत फार वाढला आहे. जर मनुष्यें एकत्र होण्याचा क्रम सारखा चालला असता व एका जातीचे लोक शेजारच्या व फारसा फरक नसलेल्या लोकांशीं संघट्टनानें मिसळून जाऊन त्यांच्यामध्यें एक प्रकारचें शारीरिक व सांस्कृतिक ऐक्य उत्पन्न झालें असतें तर सध्यां दिसतात इतके जातिभेद व वंशभेद राहिले नसते. याप्रमाणें अमेरिकेंत जो जातिभेद दिसतो त्याचें कारण एकमेकांपासून फार भिन्न अशा निरनिराळ्या प्रदेशांतील जाती तेथें एकत्र झाल्या आहेत हें होय. या जातींचें एकत्र येणें हें आकस्मिक कारणांनीं झालेलें आहे. त्याची पूर्वतयारी मुळींच झालेली नव्हती.
जगाचा बराचसा भाग कांहीं थोड्या युरोपांतील राष्ट्रांनीं व्यापिला आहे. त्यामुळें कांहीं उच्च संस्कृतींतील लोकांचा कांहीं कनिष्ठ दर्जाच्या संस्कृतींतील लोकांशीं व कांहीं सर्वतः भिन्न संस्कृतींतील लोकांशीं संबंध आला आहे. ज्या वेळीं चिनी व जपानी लोकांनीं परदेशगमनास सुरूवात केली त्या वेळीं त्यांचा त्यांच्यापासून अनेक रीतींनीं भिन्न अशा गोर्या लोकांशीं संबंध आला. याप्रमाणें या एकत्र येणार्या लोकांमध्यें इतके भेद आहेत कीं त्यांचें सर्वथा एकीकरण होणें अशक्य आहे.
अनेक जातींच्या लोकांच्या संघट्टनाची क्रिया चालू असतांना या लोकांच्या कल्पनांत, योग्यायोग्यतेंत व त्यांच्या सामाजिक संस्थांत बदल होत असतो.
मनुष्य दिवसेंदिवस अधिकाधिक स्वतंत्र विचाराचा होऊं लागला आहे. सर्व लोकांच्या आचारांत आणि विचांरात साम्य असावें अशी आतां फारसे लोक अपेक्षा करीत नाहींत. रानटी लोक व हिंदू (या दोहोंमध्यें सध्यां फारसा फरक नाहीं!) अतिशय क्षुल्लक भेद असलेल्या लोकांशींहि करण्याचें नाकारतात. सध्यांचे यूरोपीय लग्नव्यवहाराच्या बाबतींत परकीयांत व त्यांच्यांत शारीरिक व सांस्कृतिक फरक पुष्कळच असेल तरच मिश्रविवाहास प्रतिकूल असतात.
कालमानानें व संस्कृतीच्या प्रगतीबरोबर मनुष्याची एकमेकांत मिसळून जाण्याची शक्तीहि वाढत चालली आहे. अमेरिकेंतील संयुक्त संस्थानांतील लोकांइतकी परस्परसंमिश्रणाची शक्ति दुसर्या कोणत्याहि लोकांनीं दाखविलेली नाहीं. अमेरिकेंतील लोकांनीं परकीय लोकांस अमेरिकन बनविण्याच्या बाबतींत इतकें यश संपादन केलें आहे कीं, यासंबंधींच्या वर्णानावर प्रत्यक्ष तेथें जाऊन पाहून आलेल्या मनुष्यशिवाय इतराचा विश्वास बसणें शक्य नाहीं. अमेरिकन लोकांचा परकीयांस आपल्यासारखें बनविण्याच्या स्वतःच्या शक्तीवर इतका विश्वास आहे कीं, ते अमेरिकेंत पांच किंवा अधिक वर्षें राहिलेल्या परकीयांस आपल्या राज्याचा कारभारामध्यें आणि संस्थांच्या कारभारामध्यें भाग घेऊं देतात. ही त्यांची मुक्तद्वारपद्धति त्यांच्या सात्मीकरणाच्या शक्तींत भर टाकते.