प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १४ वें.
सामाजिक दृढीकरण व समाजविस्तार या क्रियांचें जगद्विकासांत स्थान.

संप्रदायप्रसार - आतां आपण संस्कृतीवर परिणाम करणार्‍या आणि जगाच्या एका भागामध्यें सारखेपणा उत्पन्न करणार्‍या दुसर्‍या एका कारणाचें महत्त्वमापन करण्याचा प्रयत्‍न करूं. हें कारण म्हटलें म्हणजे संप्रदायप्रसार हें होय. येथें संप्रदाय याचा अर्थ विशिष्ट तत्त्वज्ञानपद्धति अथवा विशिष्ट परमार्थसाधनपद्धति असा नव्हे तर ख्रिस्तीधर्म अथवा ख्रिश्च्यानिटी म्हणून जो एक रिलिजन अथवा कांहीं समजुती व आचार यांचें कोडबोळें आहे तसल्या प्रकारच्या कोडबोळ्यास येथें संप्रदाय हा शब्द लावला आहे. कोणत्याहि संप्रदायानें आयुष्याच्या श्रेष्ठ प्रकारच्या अंतिम ध्येयाचाच केवळ प्रसार करण्याच्या इच्छेनें प्रेरित होऊन आजपर्यंत चळवळ केली नाहीं, व प्रचारहि केला नाहीं. ख्रिस्ती संप्रदायांतील नैतिक कल्पनांवर आणि आयुष्याच्या श्रेष्ठ प्रतीच्या ध्येयावर विशेष लक्ष देण्याचें काम त्या संप्रदायांतहि केवळ अलीकडेच सुरू झालें आहे. अद्यापहि नैतिक कल्पनांची निवड करून केवळ त्यांचाच प्रचारकांमार्फत प्रसार करण्याची कल्पना त्या संप्रदायांत निघालेली नाहीं. ख्रिस्ती संप्रदायांतील जुन्या कल्पना धरून बसलेले लोक अद्यापहि रानटिपणा म्हणजे अधार्मिकपणा अथवा ख्रिस्ती कळपापासून दूर राहणें असें समजतात. त्यांचा आशय असा कीं, ख्रिस्ती संप्रदाच्या बाहेर राहणें अथवा परमार्थकल्पनांमध्यें मतभेद असणें किंवा भिन्न संप्रदायाचा अनुयायी असणें हि गोष्ट केवळ दुर्लक्षिण्यासारखी नव्हे, कारण लोक निराळ्या संप्रदायाचे अनुयायी झाल्यामुळें कित्येक ठिकाणीं त्यांच्या संस्कृतीमध्येंहि बदल झालेला आहे. आतां आपण ख्रिस्ती संप्रदायाच्या प्रसाराचें उदाहरण घेऊन ह्या गोष्टी कशा होतात तें पाहूं.

परंतु या मुद्दयाचा विचार करण्यापूर्वीं आपण या संप्रदायाच्या निरनिराळ्या अंगांचा विचार करून त्याचें स्वरूप स्पष्ट करूं आणि मग या परकीय संप्रदायाचा स्वीकार म्हणजे काय व त्याचा व्यक्तीवर काय परिणाम होतो तें पाहूं.

एकाद्या संस्थेच्या प्रसाराचे परिणाम मोजण्याकरितां प्रथम त्या संस्थेच्या निरनिराळ्या घटकांचे परिणाम मोजण्यापासून आरंभ करणें चांगलें. कोणत्याहि संप्रदायाचा प्रसार करणारे लोक पुष्कळदां हें विसरतात कीं, एखाद्या विशिष्ट संप्रदायाचा प्रसार करणें योग्य आहे कीं नाहीं हें पहावयाचें म्हणजे त्या संप्रदायांतील सर्व कल्पना दुसर्‍या एका समाजावर लादल्या असतां त्यांचा एकंदर परिणाम काय होईल हें पहावयाचें असतें.