प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १४ वें.
सामाजिक दृढीकरण व समाजविस्तार या क्रियांचें जगद्विकासांत स्थान.
भारतीय ऐक्यास उपाय.- वरील विवेचनावरून भारतीयांत ऐक्य घडून येण्याचे मुख्य उपाय उघड होतात ते येणेंप्रमाणेः- पारमार्थिक बाबतींत उदारपणाच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार आम्हीं करीत रहावें. हिंदुस्थानांत या तत्त्वज्ञानाचा प्रसार करीत असतां आमच्याकडून सर्व जगताची महत्त्वाची सेवा घडेल. राजकीय आणि सामाजिक बाबतींत माझा संप्रदाय अमुक, माझी उपासना अमुक, इत्यादी प्रकारचे विचार पुढें आणणें हळूहळू बंद होत जाईल अशी व्यवस्था झाली पाहिजे. मुसुलमान व ख्रिस्ती हे म्लेच्छ आहेत हें आपलें मत हिंदु समाजानें टाकून दिलें पाहिजे. समाजाच्या दृष्टीनें सर्व जाती व वर्ग सारखेच आहेत ही कल्पना आणच्यामध्यें निर्माण झाली पाहिजे. जातींचा हा तात्त्विक सारखेपणा व्यवहारांत यावा म्हणून आमच्या सोंवळ्याच्या व विटाळाच्या ज्या अश्रौत आणि अनार्य कल्पना आहेत त्यांचा आम्हीं त्याग केला पाहिजे. आमच्यांतील भिन्न जातींचें पूर्ण ऐक्य व्हावें व उच्चनीचतेच्या कल्पना आमच्यामध्यें राहू नयेत यासाठीं लग्नासंबंधाचे निर्बंधहि आम्हीं काढून टाकले पाहिजेत.
हिंदुत्वांत हे सर्व फेरबदल करतांना मुख्य गोष्ट आपण केली पाहिजे ती ही कीं, हे सर्व फेरफार जुन्या पुराणसंरक्षणप्रिय लोकांच्या पद्धतीनें आपण घडवून आणले पाहिजेत, म्हणजे एखाद्या जातीचें रूप घेणारा कोणताहि नवा संप्रदाय उत्पन्न न करितां कोणत्याहि चालू संप्रदायाला उत्तेजन न देतां वर निर्दिष्ट केलेले फेरबदल झाले पाहिजेत.
याप्रमाणें हिंदुत्वाची पुनर्घटना करणें याचा अर्थ हिंदु या भावनेच्या ऐवजीं लोकांच्या ठिकाणीं भारतीय ही बुद्धि उत्पन्न करणें किंवा हिंदु संस्कृतीचें रूपांतर भारतीय राष्ट्रधर्मांत घडवून आणणें हा होय. हें काम सोपें नाहीं. वर्तमानपत्री चळवळ करून प्रत्येक हिंदी माणसाच्या कानावर भारतीयत्व अथवा भारतीय राष्ट्रधर्म हे शब्द पुनःपुनः आदळणें, प्रत्येकाला मराठा, बंगाली, हिंदु, मुसुलमान, पारशी ही संकुचित समूहनामें टाकावयास सांगून मी हिंदी अथवा भारतीय आहे ही वृत्ति धरावयास शिकविणें एवढ्यानें कांहीं इष्ट फेरफार घडून येणार नाहींत. कारण प्रश्न नांवांचा नाहीं, तर निरनिराळ्या समूहांनां विभागणार्या सामाजिक बंधनांचा आहे. वस्तुस्थितीकडे पाहतां असें दिसून येईल कीं, फ्रेंच लोक आणि रशियन लोक यांजमध्यें त्यांनां एकमेकांपासून दूर ठेवणारे जितके सामाजिक निर्बंध आहेत, त्यांहून मराठे व बंगाली ह्यांच्यामध्यें दूरीभाव उत्पन्न करणारे निर्बंध अधिक आहेत. मराठे लोक व बंगाली लोक स्वतःला भारतीय म्हणविण्यास उत्सुक आहेत एवढेंच नव्हे, तर त्यांनां त्या नांवाचा अभिमान वाटतो असें असून आणि राजकीय व आर्थिक हितसंबंधांच्या सूत्रांनीं ते एकत्र बांधलेले असतांहि समाजबंधनांची स्थिति वरील प्रकारची आहे हें ध्यानांत ठेवलें पाहिजे. हिंदुस्थानच्या लोकांत जर राष्ट्रीयत्व उत्पन्न व्हावयाचें असेल तर त्यांनां यूरोपियन लोक ज्या ज्या स्थितींतून गेले त्या त्या स्थितींतून क्रमाक्रमानें परंतु यूरोपियनांपेक्षां अधिक त्वरेनें पार झालें पाहिजे.