प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १४ वें.
सामाजिक दृढीकरण व समाजविस्तार या क्रियांचें जगद्विकासांत स्थान.
जित आणि जेते यांचा संबंध.- प्रथमतः परकीय सत्ता जुन्या संस्कृतीचा पूर्ण नाश करून टाकण्याचा प्रयत्न करते. कित्येकदां ती जित राष्ट्रावर आपला संप्रदाय लादण्याचा प्रयत्न करते. ही संप्रदायप्रस्थापनेची कल्पना पूर्वयुगांत फार बळावलेली होती. परंतु आतां ती स्थिति राहिलेली नाहीं. परकीय राजकीय सत्ता बहुतकरून जित लोकांच्या भाषेचा नाश करून तेथें आपली म्हणजे जेत्यांची भाषा प्रस्थापित करते. जित राष्ट्रांतील लोकांचा देशाभिमान कांहींसा यो गोष्टीस विरोध करतो. परंतु त्याला आपला पराभव कबूल करून स्वस्थ बसावें लागतें. जित राष्ट्राच्या भाषेचें उन्मूलन व जेत्या राष्ट्राच्या भाषेचें प्रस्थापन याचा परिणाम जित व जेते यांच्या विचारांत व कल्पनांत साम्य आणण्याच्या कामीं होतो. उच्च शिक्षण बहुतकरून जित राष्ट्राच्या भाषेंत न देतां जेत्या राष्ट्राच्या भाषेंत दिलें जातें, आणि याला कारण असें सांगितलें जातें कीं, जित लोकांच्या भाषेंत उच्च विचार आणि त्याचप्रमाणें प्रगति पावलेलें शास्त्र व श्रेष्ठ संस्कृति यांतील कल्पना प्रदर्शित करण्याचें सामर्थ्य नाहीं. राज्यकारभारहि जेत्यांच्या भाषेंत चालतो.
जित राष्ट्रें जेत्या राष्ट्राचें अनुकरण करूं लागतात. बहुतकरून जेत्यांच्या जातीला जित व जेते मिळून होणार्या एकंदर समाजांतील उच्च पदवी प्राप्त होते. आणि ज्याप्रमाणें समाजांतील कनिष्ठ वर्ग उच्च वर्गांचें अनुकरण करतो त्याप्रमाणें या जेत्या जातीचें अनुकरण जित लोक करूं लागतात. ज्या देशांत समाजांतील लोकांच्या कल्पनांप्रमाणें जेत्यांची जात समाजबाह्य समजली जात असेल त्या देशांतहि त्यांचें अनुकरण करणारे बरेचसे लोक आढळतात. ज्या अर्थीं अनुकरण करणें ही एक प्रकारची खुषामत आहे, त्या अर्थीं सत्ताधारी लोकांचें अनुकरण करणार्या लोकांवर सत्ताधार्यांचा अनुग्रह होतो. जे लोक स्वाभिमानाच्या कल्पना बाजूस सारून जेत्यांचें अनुकरण करतात त्यांनां जेत्यांकडून ‘प्रागतिक’ असें विशेषण मिळतें. एखाद्या गोषाची चाल पाळणार्या राष्ट्रानें जर दुसरें राष्ट्र जिंकलें तर ते जित लोकहि आपल्या बायकांनां गोषांत घालतील. जर जेत्या राष्ट्राच्या स्त्रिया स्वतंत्र व धीट असतील तर जित राष्ट्रांतील लोकहि आपल्या समाजांतील स्त्रीपुरुषव्यवहारासंबंधींच्या नियमांत सुधारणा करूं लागतील.
वरील गोष्टींखेरीज आणखीहि कांहीं गोष्टी जित लोक करूं लागतात. बाह्य स्वरूपामध्यें जेत्या राष्ट्राशीं साम्य असल्यास जित राष्ट्रांतील व्यक्तीस अपमान व मानखंडना सोसण्याचे बरेचसे प्रंसग टाळतां येतात. जित राष्ट्रांतील व्यक्तीस जेत्यांचें अनुकरण करून आपण जेत्या राष्ट्रांतील आहों असें पुष्कळ वेळां भासवितां येतें.
या अनुकरणप्रवृत्तीचा उगम नेहमीं खुषामतींतच होतो असें नाहीं. कित्येक वेळां जित राष्ट्रांतील मनुष्यास जेत्या राष्ट्रांतील संस्थांच्या गुणाधिक्याची जाणीव झाल्यामुळें तो त्या संस्थांचा स्वीकार करतो. राजकीय वर्चस्वस्थापनेचा मनावार परिणाम इतका मोठा होतो कीं, जेत्या राष्ट्रांतील खुळेपणाहि जित राष्ट्रांतील लोकांस सद्गुणासारखा वाटूं लागून त्याचा ते अंगीकार करूं लागतात.
जेत्या राष्ट्रास जित राष्ट्रापेक्षां आपला परमार्थसंप्रदाय व दैवतें हीं श्रेष्ठ आहेत असें भासविण्यास फारसे श्रम पडत नाहींत. जित लोक जेत्या लोकांच्या देवांनां वस्तुतः पिशाच्च म्हणत असले तरी ते देव आपल्या देवांपेक्षां बलवान आहेत अशी त्यांची थोडीफार समजूत होऊं लागते. जर जेत्या राष्ट्रांतील लोक एका विशिष्ट दैवतसंप्रदायाचे अनुयायी असतील तर त्या संप्रदायाचा अनुयायी होणार्या जित राष्ट्रांतील मनुष्यास थोडाफार फायदा होतो. जर त्या दैवतसंप्रदायांतील लोकांत संप्रदायबंधुत्वाची कल्पना विशेष दृढ असेल तर त्या संप्रदायांत शिरणारे जित राष्ट्रांतील लोक जेत्या राष्ट्रांत मिळून जाण्याचा पुष्कळ संभव असतो. जर ही संप्रदायबंधुत्वाची कल्पना विशेष बलवत्तर नसेल तर त्या जेत्यांच्या संप्रदायांत शिरणार्या जित लोकांचा तिरस्कारच होतो, तथापि संप्रदायाबाहेर असणार्या लोकांपेक्षां यांनां थोड्या जास्त सहृदयतेनें वागविलें जातें.