प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १४ वें.
सामाजिक दृढीकरण व समाजविस्तार या क्रियांचें जगद्विकासांत स्थान.

आपलें साध्य. - भारतीय लोकांचें ऐक्य व्हावें यासाठीं कांहीं सुधारणा करावयाचा आपण विचार करितों, तेव्हां आपल्याला साधावयाचें काय त्याची नीट कल्पना करून देणारी समाजविषयक विचारपद्धति आपल्या समोर असली पाहिजे. आपल्याला साधावयाचें काय त्याची स्पष्ट कल्पना आपल्या समोर असल्याशिवाय तें साध्य करून घेण्यासाठीं सुविवेकसंमत आणि सुव्यवस्थित अशी उपाययोजना आपणांस करितां येणार नाहीं. हिंदु समाजाच्या स्वरूपांत फेरफार करणें जरूर आहे, एवढी गोष्ट कोणीहि सहज मान्य करील. परंतु यानंतर आपणांपुढें प्रश्न उभा राहतो तो हा कीं, जुन्या व्यवस्थेंतील कोणता भाग ठेवावयाचा व कोणता काढून टाकावयाचा आणि या व्यवस्थेंत कोणत्या नव्या गोष्टींची भर टाकावयाची. या प्रकारची निवड करण्यासाठीं आपणांस प्रथम जगाच्या संस्कृतीचें भवितव्य काय होणार यासंबंधानें कांहीं अंदाज बांधून ठेवला पाहिजे. हा अंदाज बरोबर यावा म्हणून आजच्या संस्कृतींमधील अनेक अंगांची कोणत्या प्रकारची भवितव्यता आहे तें तपासलें पाहिज व त्याचप्रमाणें जागतिक संस्कृतीला विवक्षित इष्ट वळण मिळावें यासाठीं तिच्यांत कोणते फेरबदल करणें शक्य आहे तेंहि आपणांस ठरविलें पाहिजे.

जगांतील सर्व मनुष्यांचा एक समाज बनवावयाचा हें ध्येय आपणांसमोर ठेविल्यास त्याला कोणी विरोध करील असें वाटत नाहीं. अगदीं प्राचीन काळापासूनच्या मनुष्याच्या राजकीय इतिहासाकडे पहा, त्याच्या सांपत्तिक इतिहासाकडे पहा, सामाजिक व्यवहारशास्त्रें व कला यांच्या इतिहासाकडे पहा. या सर्व ठिकाणीं या गोष्टीचा भरपूर पुरावा आढळून येईल कीं, जगाची प्रवृत्ति त्यांतील मनुष्यांचा एक मोठा समाज होण्याकडे आहे. लहान राजकीय समूहांचे मोठाले राजकीय समूह होणें, जीवनकलहांत दुर्बलांचा विनाश होणें, संप्रदाय अथवा रिलिजन ह्यांच्या पायावर मोठाले समाज बनणें, वरिष्ठ संस्कृतींचा सर्वत्र प्रसार होणें, या सर्व क्रियांचा रोंख जगाचा एक समाज घडवून आणण्याकडे आहे.

या दृष्टीनें हिंदुत्वाच्या सुधारणेचा विचार करावयाचा तर या ठिकाणीं आपलें मुख्य कार्य, ज्या समुच्चयाचें घटनातत्त्व जागतिक समाजघटनेच्या तत्त्वाशीं अगर पद्धतीशीं विरोधी होणार नाहीं व जो अंतर्गत व्यवस्थेच्या दृष्टीनें एक, पूर्ण व दृढ असेल असा समुच्चय निर्माण करण्याचें आहे.

येथें हें सांगणें अवश्य आहे कीं, भूतकालीन गोष्टींचें अंतरंग बघतांना किंवा भविष्यकालची कोणतीहि योजना करतांना मानवी स्वभावांतील एका विशेषाकडे आपणांस दुर्लक्ष करतां कामा नये. आपणांस कित्येक वेळा आढळून आलें आहे कीं, फार मोठें ध्येय पुढें ठेवणारांपेक्षां बेताचें ध्येय ठेवणारांच्या हातून जास्त कार्य घडलेलें आहे. महंमदी संप्रदाय आणि ख्रिस्ती संप्रदाय यांनीं आपल्या संप्रदायांतील लोक एकमेकांचे बंधू असून त्यांनां समान हक्क आहेत ही भावना आपआपल्या सांप्रदायिकांत जागृत करण्याचें ध्येय ठेवून तदनुरूप प्रयत्‍न केले व या संप्रदायांचे हे प्रयत्‍न केले व या संप्रदायांचे हे प्रयत्‍न पुष्कळ अंशानें यशस्वी झाले आहेत. उलट पक्षीं, हिंदूंनीं जें तत्त्वज्ञान निर्माण केलें व लोकांनां शिकविलें तें वस्तुतः वरील संप्रदायांपेक्षां कितीतरी अधिक थोर असतां त्यांच्या हातून ऐक्याचें कार्य झालें नाहीं. हिंदूंचा वेदांत सर्व हिंदू एकमेकांचे बंधू आहेत एवढेंच सांगून रहात नाहीं, तर सर्व मनुष्यें एकमेकांचे बंधू आहेत- इतकेंच नव्हे तर तुम्ही आणि मी एकच आहोंत-असें सांगतो; बंधुता आणि समानता या भावनांच्या ऐवजीं आमूलाग्र एकतेची भावना वेदांत आमच्या ठिकाणी उत्पन्न करूं पाहतो; तथापि हिंदूंचें अशा प्रकारचे थोर तत्त्वज्ञान असतांहि हिंदुस्थानांत एकी उत्पन्न झाली नाहीं. याचें कारण काय? कारण असें आहे कीं, जगांतील सर्व माणसें भाऊभाऊ आहेत किंवा एखाद्या लहान समुदायांतील घटक बंधुभावानें बांधलेले आहेत असलें तत्त्वज्ञान कोणा तत्त्वेत्त्यानें कितीहि कुशलतेनें विवेचन करून सांगितलें तरी सामान्य जनसमूहावर व त्याच्या कृतीवर त्याचा परिणाम होण्यापूर्वीं त्या जनसमूहाला हें तत्त्वज्ञान आपल्या कृतींत उतरविण्याची अत्यंत आवश्यकता भासावी लागते. वरील प्रकारचें तत्तवज्ञान व्यवहारांत आणण्याची आवश्यकता लूट मिळविण्याच्या हव्यासानें भासूं लागेल, किंवा स्वसंरक्षणाची इच्छा अथवा एखाद्या देवतेचा किंवा उपासनामताचा प्रचार करण्याची इच्छा सदरील आवश्यकतेची जाणीव उत्पन्न करील. ठग लोक आणि निरनिराळ्या संप्रदायांतील मिशनरी लोक यांच्यामध्यें परस्परांसंबधानें सामान्यतः तीव्र अशी बंधुभावना असते, कारण एक वर्गाला स्वेतरांच्या खिशांतून पैसे चोरावयाचे असतात व दुसर्‍या वर्गाला इतर वर्गांतून माणसें चोरावयाचीं असतात.

केवळ विश्वबंधुत्वाच्या कल्पनेनें सर्व हिंदूंचा एकोपा होणें शक्य नाहीं. केवळ ह्या कल्पनेच्या आधारानें निरनिराळ्या हिंदू जाती व वर्ग हे एकांत एक मिसळून जाऊन त्यांचा खरोखरीचा एक समाज होणें अशक्य आहे. असा समाज होणें हें आपलें ध्येय असेल तर तें साध्य होण्यासाठीं कांहीं काळापावेतों तरी विश्वबंधुत्वापेक्षां कमी कक्षेची असी समाजभावना आपणांत जागृत झाली पाहिजे. या संकुचित क्षेत्राच्या समाजतत्त्वज्ञानाची उभारणी पारमार्थिक अथवा जातिविषयक भावना यांजवर केलेली नसावी. आपल्याला जी भावना पाहिजे आहे ती भूमिविषयक भावना होय. संप्रदाय अथवा जात, कुळ, वंश यांसंबंधाचा सर्व विचार बाजूला ठेऊन अगदीं शुद्ध अशी देशभावना आपणांस हवी आहे. हिंदुस्थान हें माझें राष्ट्र, हिंदुस्थान हा माझा मायदेश, असें मनापासून वदविणारी राष्ट्रभक्ति अथवा देशभक्ति भारतीयांत उत्पन्न झाली पाहिजे. अशी राष्ट्रभावना उत्पन्न करणें हें. भारतीय कवींचें, लेखकांचें व मुत्सद्दयांचें कर्तव्य आहे. अशा प्रकारची बलवत्तर राष्ट्रभावना उत्पन्न होऊन भारतीयांनां आपण सगळे एका समाजाचे अवयव आहोंत, रक्ताच्या, ऐतिहासिक परंपरेच्या आणि हिताहिताच्या बंधनांनीं आम्ही सर्व एकत्र बांधलेले आहोंत, असें जेव्हां वाटूं लागेल तेव्हां मग पुढें विश्वबंधुत्वाची कल्पना येथील जनसमूहांत पेरून तिचा विस्तार करणें हिताचें होईल.