प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १४ वें.
सामाजिक दृढीकरण व समाजविस्तार या क्रियांचें जगद्विकासांत स्थान.
जातिविशिष्ट समाज.- उलट पक्षीं परकीय लोकांनां त्यांच्या चाली व कायदे असतील त्याप्रमाणें चालूं दिलें तर समाजाचें जातिबद्ध स्वरूप कायम राहतें आणि जातिभेदाची व्यवस्था समाजांत निर्माण होण्यास मदत होते. परकी लोकांच्या चालीरीतींकडे अतिशय विरोधबुद्धीनें पहावयाचें हाच लोकसत्ताक समाजांचा सामान्यतः स्वभाव दिसतो. आपल्या व परकी लोकांच्या चालीरीतींत फरक जितका जास्त तितकें त्यांनां आपल्यांत मिळवून घेणें अधिक कठिण असा अनुभव आल्यानें लोकसत्ताक समाजांची ही अशी बाह्यताविद्वेषी तीव्र वृत्ति दिसून येते.
आपलेपणा वंशानुरूप धरावयाचा या सामाजिक वृत्तीचा अंतिम परिणाम उघड आहे. या वृत्तीमुळें विशिष्ट प्रदेशांत असलेल्या जाती कमी अधिक कायम राहून जातिभेद ज्या समाजांत असतो त्या समाजाची सर्व पद्धति तेथें उत्पन्न होईल.
इंग्रज, अमेरिकन व यांसारखे दुसरे जे क्षेत्रनिश्चित समाज आहेत ते जर सावधानतेनें वागले नाहींत तर तेहि जातिबद्ध समाज होऊन त्या समाजांप्रमाणें भविष्यत् काळीं त्यांच्यांत जातिभेद रूढ होईल. माणसें जोंपर्यंत एका देशांतून दुसर्या देशांत जातात तोंपर्यंत विवक्षित समाज आज देशकृत आहे कीं जातिकृत आहे यावर त्याची पुढची भवितव्यता अवलंबून राहत नाहीं. तो समाज आपल्यापुढें ध्येय कोणतें ठेवितो, प्रादेशिक समाजाचें किंवा जातिस्वरूपी समाजाचें, यावर त्याची भवितव्याता अवलंबून असते. इंग्रज आणि गोरे अमेरिकन स्वतःला अँग्लोसाक्सन जातीचे म्हणवितात. त्यांजमध्यें नवीनच प्रकारचा रक्ताचा गर्व वाढत आहे; आणि त्यांचें प्रादेशिकसमाजाचें स्वरूप जाऊन त्यांनां जातिसमाजाचें स्वरूप प्राप्त होण्याचीं लक्षणें दिसत आहेत. जातां जातां हें सांगणें उचित होईल कीं, अमेरिकन नीग्रो लोकांनां स्वतःला अँग्लोसाक्सन म्हणवून घेण्याचा जितका हक्क पोहोंचतो, त्यापेक्षां जास्त गोर्या अमेरिकन लोकांनां तसें म्हणविण्याचा हक्क बिलकुल पोहोंचत नाहीं.
प्रदेशविशिष्ट सत्तेस मुख्य अडथळा एकमेकांत न मिसळणार्या निरनिराळ्या वंशांतील व जातींतील लोकांचा एखाद्या प्रदेशांत अंतर्भाव होणें हा होय. लोकांचें एकमेकांत मिसळून जाणें त्यांच्यांत असणार्या साम्यावर अवलंबून असतें. तेव्हां ज्या गोष्टीमुळें लोकांत विषमता उत्पन्न होऊन त्यांनां एकमेकांपासून दूर राहण्याची प्रवृत्ति होते त्या गोष्टी प्रदेशनिश्चित समाजास विघातक होत हें उघड आहे.